12/31/2013

प्रत्येक क्षण नवा असतो...

आज फेसबुकवर हजारो, लाखो अपडेटस् येतील. कितीतरी फोटोे शेअर केले जातील. दारूच्या बाटलीपासून, दारू पिऊ नकापर्यंत. ट्विटरवर अनेकांची ‘टिव टिव’ वाढेल. तर व्हॉटस् ऍपवरून कितीतरी मेसेज पाठविले जातील. कोणी या जगात असेल, तर कोणी एन्जॉयमेंटसाठी स्वत:चं जग निर्माण करेल. कोणी नवे स्वप्नं रंगवीत असतील, तर कोणी कर्तृत्त्वाचा आलेख उंचावण्याचे मनसुबे रचत असेल. कारण काय तर नववर्षाचे स्वागत. पण थोडासा डोळसपणे विचार केला तर प्रत्येक क्षण नवा असतो, याचा अनुभव येईल. आलेला प्रत्येक क्षण अगणित घटना, आठवणी पोटात घेऊन काळाच्या ओघात निघून जातो. निघून गेलेल्या क्षणांना आपण जुनं, तर येणार्‍या क्षणांना नवं म्हणतो. पण खरं तर जुनं-नवं असं काहीही नसतं. सूर्य हजारो वर्षांपासून उगवतो आणि मावळतो. सूर्य तोच असतो. नभांगणही तेच असतं. पण आपलं कॅलेंडर बदललं की आपण जुनं-नवं असा भेद करतो. आणि पुन्हा नवी स्वप्ने रंगवीत बसतो. माणसामाणसांनी माणसांच्या सोयीसाठी या सार्‍या गोष्टी निर्माण केल्या आहेत. ज्यांना खरेच नवं काहीतरी करायचं आहे त्यांना निमित्ताची गरज भासत नाही. त्यांच्या मनगटात तेवढं बळ कोणत्याही क्षणी असतं किंवा तसं ते निर्माण करू शकतात. आणि काहीच न करणार्‍यांना सतत निमित्ताचा शोध असतो. एक दिवस आपण संपून जातो, पण निमित्ताचा शोध संपत नाही.

चला, तर मग आता सर्वमान्य नूतन वर्षाचे स्वागत करीतच आहोत तर मनाशी काही गोष्टी ठरवून घेऊयात. या नूतन वर्षात आपण आहोत त्यापेक्षा मोठं होण्याचा विचार करूयात. पैशानं तर होऊयातच पण बुद्धिनं, मनानं अन् कर्तृत्त्वानंसुद्धा मोठं होऊयात. या वर्षात आपल्या समस्येची कमीत कमी चिंता करूयात. प्रत्येक गोष्टीला विशिष्ट आणि मर्यादित वेळ देऊयात. अगदी काळजी करण्याला, एन्जॉय करायला सुद्धा! नाहीतर काय होतं की आपण चिंता करण्यात अमर्याद वेळ घालवतो आणि वेळ गेल्याच्या दु:खाशिवाय पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे या नववर्षात समस्येची चिंता, काळजी करीत बसण्यापेक्षा त्यावरील उपायांवर विचार करायला वेळ देण्याचा प्रयत्न करूयात. तो ही विशिष्ट अन् मर्यादितच. जमलं तर चांगल्या वाईट घटनांची लेखी नोंद ठेवूयात. घटना काळाच्या पोटात गेली तरी आपल्या स्मरणात असते; मात्र लेखी स्वरूपात असेल तर पुढे कधीतरी ती वाचताना आपल्याला वेगळीच अनुभूती येते. बर्‍याच वेळा त्यातून काही नवीन शिकायला मिळतं किंवा चुका सुधारण्याची दृष्टीही मिळते. म्हणून या नववर्षात डायरी लिहिण्याचा प्रयत्न करूयात. आणि विशेष म्हणजे आपल्या ‘आतला आवाज ऐकूयात. तो नक्कीच आपल्याला समृद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. लौकिक अर्थाने आणि अलौकिक अर्थानेसुद्धा. चला तर, एन्जॉय द न्यू इअर....

12/27/2013

प्रेमात पडल्यावर काय होतं?

बर्‍याच वेळा आपल्याला आपण प्रेमात पडलो आहोत की नाहीत हे समजत नाही किंवा समजत जरी असलं तरी आपण जे अनुभवत आहोत; त्याला ‘प्रेमात पडणं’ म्हणतात हे आपल्याला माहित नसतं. पण तरीही आपण प्रेमात पडलेलो असतो, हे वास्तव असतं. चला तर मग, प्रेमात पडल्यावर होणार्‍या बदलांचा, येणार्‍या अनुभवांचा प्रवास करूयात.

प्रेमात पडल्यावर आपली प्रिय व्यक्ती आपल्यासमोर आली की आपल्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पडायला लागतात. ते स्पष्टपणे आपल्या शरीराला जाणवायला लागतं. ठोके तेच असतात. हृदयही तेच असतं. पण आपली प्रिय व्यक्ती असते. त्यानंतर जगातील सार्‍या गोष्टींना आपण निमिषार्धात विसरून जातो आणि समोर असलेल्या त्या व्यक्तीबद्दलच विचार करू लागतो. आपल्या सार्‍या जाणिवा, नेणिवा अन् अस्तित्त्व त्या व्यक्तीभोवती केंद्रित होतं. आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचा आभास होतो. त्यातून आपण अवघ्या जगाला जिंकू असा विश्वास निर्माण होतो. ‘जग सुंदर आहे, जगणं मखमली आहे.’ असं वाटायला सुरुवात होते. आपल्या शरीरावर आपलं हृदय अधिराज्य गाजवू लागतं. काही क्षणांपुरतं तरी आपलं ‘हृदय’ म्हणजे अनभिषज्ञ सम्राट होतं.

काही वेळात ती व्यक्ती तशीच समोरून निघून जाते. तरीही पुढे काही मिनिटे आपण त्या अवस्थेतून बाहेर आलेलो नसतो. मात्र, पूर्वीपेक्षा थोडं हलकं वाटायला लागतं. हळूहळू आपण पूर्वावस्था प्राप्त करतो. पण तो क्षण आणि ती व्यक्ती आपल्या डोक्यात घर करून राहते. दिवसरात्र आपण तो विचार करू लागतो. पुढे सुखस्वप्नांचे भास होऊ लागतात. त्यातून आपण स्वत:ला अधिकाधिक सुशोभित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आरश्यासमोर स्वत:चं अनेकवेळा परीक्षण केलं जातं. टापटीपपणा, स्वच्छता, सौंदर्य यांना उच्चकोटीचं महत्त्व दिलं जातं. आणि ती व्यक्ती अनेकवेळा समोर यावी असं वाटू लागतं.  विशेष म्हणजे आपण ज्या व्यक्तीबद्दल विचार करीत असतो; त्या व्यक्तीला आपसूकच आपले भाव जाणवू लागतात, असं वाटायला लागतं. अशा अनाकलनीय अवस्थेत पुन:पुन्हा जावसं वाटतं. ती अवस्था आयुष्यभर संपूच नये असं वाटतं. ही अवस्था अगदी सुरुवातीची असते. पुढे धैर्यानं आपण त्या व्यक्तीसमोर आपले भाव व्यक्त करू लागतो.  समोरून सकारात्मक प्रतिसाद आला तर, आपल्या आनंदाला आभाळ कमी पडतं.

आता, थोडा वास्तवाचा विचार करूयात. जर समोरच्या व्यक्तीच्या मनात तसे काहीच भाव नसतील किंवा आपल्याला पाहून तसे काही भाव निर्माण होत नसतील तर? तर आपल्या शरीरात ‘प्रेमाने’ निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचं ‘कर्तृत्त्वात’ रूपांतर करण्याची जबरदस्त संधी आपल्यासाठी निर्माण होते. जगात बरीच अशी उदाहरणं आहेत की त्यांनी ‘प्रेमातून कर्तृत्त्वाकडे’ गरूड भरारी घेतली आहे. केवळ अशावेळी आपला विवेक जागृत ठेऊन, पावलं उचलण्याची गरज असते. अशावेळी वस्तुनिष्ठपणाने विचार करून जगाकडे बघण्याची दृष्टि जागृत ठेवायला हवी.  अशाच वेळी तेच ‘प्रेम’ अवघ्या जगावर करायला हवं.... त्यावेळी तुमचं ’प्रेम’ भंग झालेलं नसतं. भंग पावते ती भोगण्याची सुप्त इच्छा! कारण प्रेम कधीच भंग पावत नाही.

12/17/2013

प्रिय बाबास...

का कोणास ठाऊक काल तुमचा थरथरणारा हात पाहिला अन् अंत:करण दाटून आलं. दाटून येणं काय असतं ते त्यावेळी मी प्रत्यक्ष अनुभवलं. तुमच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त व्हाव्यात म्हणून हे पत्र. बाबा, पूर्वी तुमच्या हातात माझा हात होता; तुमचा हात मला आधार देत होता, तोच तुमचा हात आज माझ्या हातात आहे. अन् माझा हात तुमच्या हाताला आधार देत आहे. चित्रपटातील प्रतिमा बदलाव्यात त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील काळ बदलतो, पण नातं तेच असतं.

आम्हाला एक चांगला ‘माणूस’ म्हणून घडविण्याकरिता बाबा तुम्ही किती कष्ट केलेत. मी आईच्या गर्भात असताना तुम्ही हॉस्पिटलच्या दारात अगदी अस्वस्थपणाने मारलेल्या फेर्‍या अन् केलेली काळजी मला उमगत होती. पण व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य त्यावेळी मला नव्हतं. म्हणूनच मी जन्मल्याचं ओरडून सांगण्याकरिता मी रडत होतो. माझ्या रडण्याच्या आवाजानं तुम्ही सुखावलात. त्यानंतर मात्र मी रडत असताना तुम्ही कधीही सुखावला नाहीत. नंतर तुम्ही मला कधीच रडू दिलं नाहीत. प्रसंगी मला हसलेलं पाहण्याकरिता आपण कितीतरी वेळा रडलात. तुमचं रडणं त्यावेळी मला ऐकू आलं नाही. मात्र, मी स्वत: बाप झाल्यावर ते मी स्वत:च अनुभवलं. त्यामुळे आपल्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. पुढे मी जस-जसा मोठा होऊ लागलो. तसतसे तुम्ही मला बाहेरचं जग दाखवू लागलात. कधी फुलाफुलांच्या बागेत नेलेत, तर एकदा मुलामुलींच्या शाळेत नेऊन सोडलेत. बागेतील पानाफुलांवर, मुक्या प्राण्यांवर तर प्रेम करायला शिकविलेतच पण शाळेतील वर्गमित्रांवर, माणसामाणसांवर प्रेम करायला शिकविलेत. प्रसंगी मी चुकल्यावर मार दिलात, रागाने ओरडलात. मला त्यावेळी तुमचा राग यायचा. पण आज समजतं तेव्हा तुम्ही मारलं नसततं तर मी संस्कारांशिवायच ‘मेलो’च असतो.

बाप झाल्यावर किती कष्ट पडतात, हे शब्दात सांगण्यासारखं नाही. नवी जबाबदारी, नवा आनंद! एका मातीच्या निरागस गोळ्याचं संस्कारक्षम  व्यक्तीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया खरोखरच अद्भूत आहे. प्रेम, कारूण्य अन् ममतेनं ओथंबून वाहणारं हृदय असल्याशिवाय हे शक्य नाही. आई तर मुलाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावते. खरे तर वडिलांबद्दल आदराची भावना असावी हे  ही आईच शिकविते. कारण अजाणतेपणी सुरुवातीला बाळ बापाला एकेरी हाक मारते; त्याचवेळी आदरानं बोलण्याचं आई शिकविते. दादा, बाबा, तात्या, अण्णा, अप्पा आदी नावांनी हाक मारलेल्या बापाला कधी विसरून चालणार नाही. ती प्रेमानं मारलेली हाक मारतात. काही ठिकाणी तर बापाला ‘बाप’ म्हणण्याची देखील म्हणतात. पण त्या सार्‍या मागची भावना आदराचीच, अतीव प्रेमाची, आपुलकीचीच असते.

जेवढे प्रेम तुम्ही माझ्यावर केलेत, तेवढेच माझ्या ताईवरदेखिल केलेत. मुलगा-मुलगी असा भेदभाव आपण कधीही केला नाहीत. अशा स्वकृतीतून आपण आमच्यावर संस्कारांचा अभिषेक केलात. बाबा, आठवतं लहानपणी संध्याकाळच्या वेळी तुमच्या सायकलची घंटी वाजली की दारात येऊन उभा राहत होतो. अन् आज माझ्या गाडीची घंटा वाजली की तुम्ही गॅलरीत येऊन मजकडे पाहता. शाळेत असताना मला तुमचा मुलगा म्हणून ओळखायचे. तुम्ही मला सतत सांगितलतं की ‘तुझा बाप म्हणून मला लोकांनी ओळखलं पाहिजे.!’ आज लोक तुम्हाला माझे बाबा म्हणून ओळखतात, ते केवळ तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेरणेच्या संस्करणामुळे.

तुमच्या निवृत्तीच्या वेळी जेवढा पगार तुम्हाला होता. तेवढा माझा पहिला पगार होता. पण तुमचा पगार झाला की तुम्ही आणलेला खाऊ खातानाची मजा मी कितीही पगारात परत कधीच आणू शकणार नाही. बाबा, म्हणूनच मोठेपणीच्या स्वातंत्र्यापेक्षा मला बालपणीचे पारतंत्र्य अधिक आनंददायी वाटते. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जगाच्या बापाकडे जाणं आवश्यक आहे. पण तुम्ही कोठेही असा माझे ‘बाबा’च असाल हे नि:संशय! युगानयुगागांपर्यंत हेच बाबा मला मिळावेत हीच प्रार्थना!

12/13/2013

प्रेरणेचा प्रकाश देणारे ‘तारांगण’ - पुस्तक परिचय

प्रेरणेचा प्रकाश देणारे ‘तारांगण’ - पुस्तक परिचय

तारांगण
सुरेश व्दादशीवार
साधना प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे
मूल्य: रु. 200/- पृष्ठे: 220

निरनिराळ्या प्रकृतीची, विचाराची अन् मानसिकतेची माणसे आयुष्याच्या प्रवासात सतत भेटत राहतात.  काही माणसे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांमुळे कायम स्मरणात राहतात. मग त्यांचा या जगात असण्याचा वा नसण्याचा प्रश्न उरत नाही. त्यांच्या अद्वितीय कर्तृत्त्वाने दुसर्‍यांच्या हृदयात घर करून राहण्याचं सामर्थ्य त्यांच्या नकळतच त्यांना प्राप्त होत राहतं.  अशा काही व्यक्तींबद्दल अनेकांच्या मनात नितांत आदर असतो. जणू अशा काही व्यक्तींचं मिळून मनात निर्माण झालेलं ‘तारांगण’ कित्येकांना सतत प्रेरणेचा प्रकाश देत असतं. मनामनात प्रकाशणार्‍या अशाच काही तारांकित व्यक्तींचं ‘तारांगण’ सुरेश द्वादशीवार यांनी पुस्तकाच्या रूपात वाचकांच्या समोर उभं केलं आहे.

आपल्या स्वत:च्या आईच्या वाट्याला आलेले अपार दु:ख केवळ एका वाक्यात सांगून आईला पुस्तक अर्पण करीत लेखकाने पुस्तकाच्या प्रारंभीच वाचकांशी भावनिक नाते जोडले आहे.  प्रदीर्घ लेखनाचा समृद्ध अनुभव असलेले सुरेश द्वादशीवार यांनी काही वर्षांपूर्वी ‘साधना’ साप्ताहिकात ‘तारांगण’ ही लेखमाला लिहिली होती. वाचकांच्या उदंड प्रतिसादानंतर अन् त्यांच्याच आग्रहाखातर या लेखमालेचे पुस्तकाच्या रूपाने एकत्रित संकलन ‘साधना प्रकाशनाने’ नुकतेच वाचकांना सादर केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्याच्या आतच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होऊन ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. ‘मराठी वाचक कमी झाला’ असे म्हणणार्‍यांसाठी ‘तारांगण’ म्हणजे तडाखेबाज उत्तर आहे.

‘तारांगण’ म्हणजे असामान्य कर्तृत्त्व गाजविलेल्या व्यक्तींचं निव्वळ चरित्र नसून सामान्यातील सामान्यांवर प्रेरणेचे संस्करण करणारा प्रेरणाग्रंथच म्हणावा लागेल. आपापल्या क्षेत्रात माणसाला शक्य असेल तेवढी उंची प्राप्त करणार्‍या कर्तृत्त्ववान व्यक्तीच्या संघर्षाची इत्यंभूत कहाणी ‘तारांगणात’ आढळत नाही, तर परिस्थितीच्या काळोखावर अन् व्यवस्थेच्या उरावर मात करीत आपल्या ध्येयाचा झेंडा रोवणार्‍या उमद्या ‘तरुणां’ची संघर्षकथा वाचकांना भारावून टाकणारी आहे. तसेच वाचकांच्या मनात प्रेरणेची ठिणगी प्रज्वलित करण्यासाठी ती पुरेशी आहे.

लेखकाने केवळ चरित्रग्रंथांवरून, ऐकीव माहितीवरून, माध्यमांच्या संदर्भातून लिहिलेले वर्णन वगळून अगदी एकेरी हाकेच्या अंतरावरून त्या त्या व्यक्तींबद्दल आलेले अनुभव अगदी प्रामाणिकपणे मांडले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या प्रत्येक व्यक्तीला (अपवाद एम.एफ.हुसैन) अगदी जवळून अनुभवून त्यांचे केलेले निरीक्षण, परीक्षण आणि त्यातून काढलेले निष्कर्ष  या पुस्तकाच्या पानापानात वाचकांची भेट घेत राहतात. संबंधित व्यक्तींबद्दल त्यांच्या आयुष्यातील अगदी काही मोजके अन् निवडक प्रसंग लेखकाने प्रातिनिधीक स्वरुपात मांडले आहेत. ज्यातून त्या व्यक्तींनी परिस्थितीसोबत केलेल्या संघर्षाची अन् त्यातून प्राप्त केलेल्या भव्यतेची प्रचिती वाचकांना येते. हे सगळं वर्णन, संघर्ष अन् भव्यता वाचकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. म्हणूनच या पुस्तकातील व्यक्तींसोबतच लेखकाबद्दलही वाचकांच्या मनात आदराचे स्थान केव्हा निर्माण होते, ते वाचकालासुद्धा कळत नाही.

राजकारण, समाजसेवा, कला, साहित्य, अध्यात्म अशा निरनिराळ्या क्षेत्रांत गौरवास्पद नावलौकिक प्राप्त झालेल्या व्यक्ती या पुस्तकात वाचकांच्या भेटीत येत राहतात. क्रांतीवीर अनंत भालेराव, गुणांचा सतत शोध घेणारे यदुनाथ थत्ते, आपल्या जवळच्या व्यक्तींना उंची वाढल्याचा भास देणारे नरहर कुरूंदकर, स्वत:च्या नावातच राम असणारे राम शेवाळकर, आपल्या समयसूचक नेतृत्वगुणाच्या बळावर राजकारण गाजविणारे प्रमोद महाजन, गझलेला मराठी चेहरा देणारे सुरेश भट या नामवंत अन् सर्वांना सुपरिचित व्यक्तींची संघर्षकथा, स्थायीभाव अन् त्यांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग खरोखर वाचनीयच आहे. यांसह पुरातन वास्तू केवळ वर्णनाने जिवंत करणारे पंडित विष्णुदत्त शर्मा, ‘या देशाला आसामाविषयी काही का वाटत नाही’ असे निर्भयपणे म्हणणार्‍या सविता डेका अशा बर्‍याचश्या नामवंत मात्र फार थोडे माहित असलेल्या व्यक्तींचे चित्रणही वाचकांना त्या व्यक्तींच्या असामान्यत्वाचा साक्षात्कार देणारे आहे. अशा विविधांगी व्यक्तिमत्वाच्या 16 व्यक्तींचे निरीक्षण बारकाईने मांडले आहे. ठिकठिकाणी जागतिक तत्त्ववेत्यांचे संदर्भासह दिलेले विचार ंवाचकाला पुस्तकासमोर खिळवून ठेवून एका वेगळ्या विचारविश्वात घेऊन जाण्यास पुरेसे ठरतात. प्रकरणात समाविष्ट नसणार्‍या बर्‍याच थोर व्यक्तींच्या विचारसरणीचे वेगळ्या बाजूने केलेले चिंतन वाचकांना त्या व्यक्तींच्या भूमिकेबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडणारेच आहेत. मात्र, बर्‍याच ठिकाणी लेखकाची त्या त्या व्यक्तींबद्दलची काही वैयक्तिक मतेही प्रदर्शित झाल्याचे आढळून येते. अर्थात् पुस्तकाच्या सुरुवातीसच लेखकाने हे कबूल करून तसे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे.
प्रत्येक मराठी वाचकाने वाचून संग्रही ठेवावे आणि या निमित्ताने शक्य तेवढी उंची गाठण्याकरिता मनात पेटलेल्या प्रेरणेच्या ज्योतीला उद्दिपित्त करावे असे राष्ट्रकार्य लेखक आणि प्रकाशकांनी पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

12/12/2013

ती...





















मी तिच्या आयुष्यभर खूप मागे लागतो
अगदी आयुष्यभर
ती थांबत नाही, मला सापडत नाही
कधी गवसत नाही, दूरपर्यंत दिसत नाही
मी अगतिक होतो, अनामिक होतो
मी अगदी असह्य होतो,
तिला हे माहित असतं
तरी सुद्धा ती येत नाही,
ती अगदी निष्ठुर होते
शेवटी एका अनामिक क्षणी
ती मला कडकडून भेटते.
अगदी कधीच न जाण्यासाठी
मात्र मला तेव्हा ती नको असते.
कारण, हे वेडं जग तेव्हा मला ‘मृतदेह’
तर तिला ‘शांती’ म्हणतं…




12/11/2013

जगतात माणसे ही


















जगतात माणसे ही
मरतात माणसे ही
बनूनी फुले सुगंधी
स्मरतात माणसे ही

येतात माणसे ही
जातात माणसे ही
बनूनी सुरेल गाणी
गातात माणसे ही

हसतात माणसे अन्‌
रडतात माणसे ही
पडूनी दरीत खोल
उठतात माणसे ही

सरतात माणसे ही
उरतात माणसे ही
उरूनी पुन्हा जगात
असतात माणसे ही


फेसबुक प्रत्यक्ष कधी अवतरणार?

फेसबुक म्हटलं की काही लोकांना राग येतो. तर काही लोकांना शब्दातीत आनंद होतो. आनंद होणारा बहुतेक वर्ग हा कॉलेजात जाणारा, तरुण आहे. राग येणार्‍यांमध्ये ज्यांना फेसबुक वापरता येत नाही, अथवा थोडेसे वापरून कंटाळा आला आहे अशांचा वर्ग आहे. पण चला, आज आपली आवड निवड बाजूला ठेवून फेसबुककडे एका वेगळ्या दृष्टीने पाहूयात.

फेसबुकवर वयाची विशिष्ट मर्यादा पार करणारा वर्ग आपले खाते विनामूल्य उघडू शकतो. अर्थात् त्याकरिता कॉम्प्युटर अथवा स्मार्टफोनसह इंटरनेट लागणार हे निराळे सांगण्याची गरज नाही. खाते उघडताना किरकोळ माहिती दिली की आपण फेसबुकच्या जगात प्रवेश करू शकतो. मग आपण आपल्याला हवी ते तिथे लिहू शकतो, हवा तो फोटो शेअर करू शकतो, हवा तो व्हिडिओ अपलोड करू शकतो. त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो आणि एकप्रकारे परस्परांशी या ना त्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो. याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणतात. त्याचप्रमाणे इतरांनी शेअर केलेल्या गोष्टींना आपण लाईक करू शकतो, त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतो. याला सोशल नेटवर्किंग असे संबोधतात.

फेसबुकवर अकाऊंट उघडत असताना तिथे कोठेही तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या वर्णाचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही कोणत्या प्रदेशातील असा भेदाभेद केला जात नाही. (इंटरनेटसेवा पुरविणे सोयीचे व्हावे म्हणून तुम्ही कुठल्या देशाचे हे मात्र विचारले जाते.) तिथे सर्वांना समान संधी असतात. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला फेसबुकवर जेवढ्या सोयी वापरता येतात तेवढ्याच सोयी झोपडीत राहणार्‍या सामान्य व्यक्तीला देखील वापरता येतात. तिथे कोणताही भेदभाव नाही. तसेच (सुरक्षेचे अपवाद वगळता) कोणीही कोणाच्याही फोटोला लाईक करू शकतो, अन् त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकतो.

फेसबुकवर कोणताही भेदाभेद नाही. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय हे तर सोडाच. मात्र वर्णभेद, लिंगभेद, लहान-थोर, वरिष्ठ-कनिष्ठ, प्रदेशाचेही भेदाभेद येथे आढळून येत नाहीत. त्यामुळेच तर जगाच्या एका कोपर्‍यात बसलेली व्यक्ती जगातील दुसर्‍या कोपर्‍याशी संपर्क साधू शकते. तेथे भेटलेेले सारे सारे फक्त फेसबुक वापरकर्ते आहेत. दुसरे कोणीही नाही. सारे एक आहेत. फेसबुकवाले!

तिथे कोणतेही वाद नाहीत. कोणतेही तंटे नाहीत. असतील तर या प्रत्यक्ष जगातील वाद काही कंटकांनी तेथे नेऊन चर्चिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या जगात कोणतेही वाद नाहीत. हवं त्याला आपण शोधू शकतो अन् व्हर्च्युअली भेटू शकतो. अर्थात या सार्‍यांना सुरक्षेच्या मर्यादा आहेत. पण त्याचं देखील प्रत्येकाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ज्याला हवं तो तेवढं स्वत:चं जग सुरक्षित ठेवू शकतो. असं कोणतेच भेद नसलेलं, पूर्ण स्वातंत्र्य असलेलं जग प्रत्यक्ष कधी अवतरणार?

12/08/2013

हे इतकं सोपं असतं!

हे इतकं सोपं असतं!

संगणकाच्या बाराखडीपासून, सोप्या भाषेत संगणक प्रशिक्षण देणारे खास या ब्लॉगच्या वाचकांसाठी दर रविवारी सदर लिहित आहेत पुण्यातून व्यंकटेश कल्याणकर-

‘अवघे विश्र्वचि माझे घर’
संत श्रीज्ञानेश्र्वर महाराजांनी वैचारिक बैठकीतून रूजविलेल्या विचारांची प्रत्यक्ष प्रचिती आज आपण घेत आहोत. आपल्या संगणकाच्या काही इंचावर
अवघं जग एकवटलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण अंतरावर मात केली आहे. संगणकाचा पसारा नको म्हणून आता तर आपल्या हातात मावणा-या इवल्याश्या मोबाईलमध्येच ही सारी सोय उपलब्ध झाली आहे. खरेच, काही दशकांपूर्वी तांत्रिकदृष्ट्या एवढ्या प्रगतीची आपण अजिबातच कल्पना केली नसेल. मात्र, एवढं सारं असूनदेखील आपल्याला त्यातलं किती समजतं? आपण त्याचा किती वापर करतो? हे महत्वाचं आहे. या धावत्या, प्रचंड आधुनिक जगात जगायचं असेल तर आपण तंत्रज्ञानातील किमान गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं.
जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जण।।

असा समर्थ रामदासांचा विचार अंगीकारत या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दर रविवारी मला ठाऊक असलेल्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरूवात करण्यापूर्वी सांगावेसे वाटते की प्रत्येक लेखाच्या शेवटी मी तुम्हाला काही छोट्या गोष्टी प्रत्यक्ष संगणकावर करायला सांगणार आहे. त्यातून तुमची संगणकाशी मैत्री वाढावी, हा हेतू. त्यातील अडचणींवरही आपण येथे चर्चा करीत राहू. अगदी प्राथमिक स्तरावरून ॲडव्हान्स्ड ब्लॉग रायटिंगपर्यंत टप्प्याटप्प्याने सारं जाणून घेऊयात.

प्रकरण १) संगणकाची ओळख 

अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगणक म्हणजे माहिती साठवूण ठेवणारं, आकडेमोड करणारं, अनेक उपकरणांचं मिळून बनलेलं एक यंत्र. आता अनेक उपकरणे म्हणजे काय तर कीबोर्ड, माऊस, मॉनिटर (सीआरटी/एलसीडी) आणि महत्वाचं म्हणजे सीपीयु इत्यादी उपकरणे म्हणजे ज्यांच्याशिवाय संगणक सुरूच होऊ शकणार नाही किंवा आपण संगणकावर काम करू शकणार नाहीत अशी उपकरणं. चला या उपकरणांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात

१) कीबोर्ड: अनेक ‘की’ अर्थात बटणांचा मिळून बनलेला बोर्ड म्हणजे किबोर्ड आधुनिक कीबोर्ड वर साधारणपणाने 104 बटणं असतात. अलिकडे कीबोर्डच्या काही अगदी आधुनिक आवृत्त्या बाजारात आल्या आहेत ज्यावर यापेक्षा अधिक बटणे आढळतील. कीबोर्डवरील काही माहित नसलेल्या बटणांविषयी आपण नंतरच्या पाठात चर्चा करणार आहोतच. 

२) माऊस: माऊसच्या बाबतीत सांगण्यासारखे फार नाही. मात्र लक्षात ठेवण्यासारखे बरेच आहे. कारण ब-याच वेळा आपला त्यात गोंधळ होतो. माऊसला एकूण मुख्य दोन बटणे असतात. एक डावीकडे एक उजवीकडे. वरून खाली येण्यासाठी अर्थात स्क्रोलिंगसाठीचे साधारण अर्धवर्तुळाकृती बटण माऊसच्या मध्यभागी असते. त्याला स्क्रोलर असे म्हणतात. जास्तीत जास्त वेळा आपल्याला डाव्या बटणाचा वापर करावा लागतो डावीकडे क्लिक करण्याच्या प्रक्रियेला ‘लेफ्ट क्लिक’ तर उजवीकडे क्लिक करण्याच्या प्रक्रियेला ‘राईट क्लिक’ म्हणतात. 
आज एवढेच…

  जाता जाता हे करा….  
१) तुमच्याकडे असणा-या कीबोर्डवरील एकूण बटणे मोजा.
२) तुम्ही आजपर्यंत माऊसचे ‘राईट क्लिक’ बटण कशासाठी वापरले ते सांगा?
३) की बोर्ड वरील सर्वांत मोठी की कोणती ते शोधा?
(पुढील रविवारी भेटुयात)
(क्रमश:)

व्यंकटेश कल्याणकर (आनंदयात्री)
माध्यम व प्रकाशन केंद्र
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,
यशदा, बाणेर रोड,पुणे ४११ ००७
संपर्कः +९१-९८९०१०४८२७
Email: vu_kalyankar@rediffmail.com

12/07/2013

माणसा माणसा पळ रे...


















माणसा माणसा पळ रे
पायी तुझ्या बळ रे
सोस थोडी कळ रे
मिळेल गोड फळ रे

पळता पळता पडशील रे
तूच पुन्हा उठशील रे
नवा खेळ मांडशील रे
परिस्थितीशी भांडशील रे

घाम तुझा गळेल रे
देह तुझा मळेल रे
जग तुला छळेल रे
यातून जग कळेल रे

ठेव विश्वास, सोड निश्वास
एक दिवस, अडेल श्र्वास
म्हणून म्हणतो पळ रे,
पायी तुझ्या बळ रे।।

12/06/2013

‘गुण’ देणारी शाळा

साधारण 1989 चा जून महिना. बाहेर चिंब पाऊस. पाठीवर पाटी पेन्सिलचं दप्तर. डाव्या हाताचं बोटं आईच्या मुठीत. रडवेला चेहरा अन् आईनं धरलेल्या छत्रीच्या छायेत पावासापासून कसा-बसा बचाव करत मी ‘राजस्थानी विद्यालया’च्या ‘बालवाडीत’ प्रवेश केला. आई दूर जात होती, पाऊस जोर धरत होता, अन् शाळेच्या ‘बाई’ वर्गात ओढत होत्या. पांढरा खडू, काळा फळा, निरागस चेहरे, छडी घेतलेल्या बाई, जेवणाचा डब्बा, पाटी, पेन्सिल, दप्तर, दगडांच्या भिंती अन् लाकडाचे बाक म्हणजे वर्ग. अन् असे अनेक वर्ग म्हणजे ‘शाळा’ तेव्हा समजली, 1989 मध्ये.

पुढे पुढे अभ्यास, खेळ, वर्गमित्र, शिक्षक, सर, गृहपाठ या सगळ्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवू लागलो. सुदैवाने वडिलांची सरकारी नोकरी असूनसुद्धा माझ्या दहावीपर्यंत त्यांची ‘बदली’ झाली नाही अन् माझी शाळा कायम राहिली, माध्यमिकपर्यंत. त्यावेळी शाळा आणि घर यांतील अंतर साधारण 4-5 किमी होतं, आज ते कितीतरी मैल आहे; उद्या कदाचित एका विश्वाएवढं असेल तरीसुद्धा ‘माझी शाळा’ माझ्याजवळच असेल अगदी माझ्या मनात, अन् हृदयातसुद्धा.

बालवाडी, नंतर पहिली, दुसरी, तिसरी करीत करीत मी विप्रनगरच्या ‘द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड’मध्ये कधी प्रवेश केला हे माझे मलाच काय कदाचित शाळेलासुद्धा समजले नाही. एवढे ऋणानुबंध त्या शाळेच्या शिक्षकांसमवेत, भिंतींशी निर्माण झाले होते. तेव्हा इयत्ता आठवीनंतर आमची शाळा विप्रनगरच्या भव्य इमारतीत भरायची. एव्हाना घरातील साखरेच्या डब्यापर्यंत हात पोचेल एवढी उंची प्राप्त केली होती, मात्र शाळेत जाण्या-येण्याची, मैदानात खेळण्याची, पळण्याची, पडण्याची उठून पुन्हा पळण्यातील आनंदाची उंची केव्हाच गाठली होती. ती उंची पुन्हा या जन्मात गाठू शकणार नाही.  ज्या दिवशी ‘शाळेवर लेख लिहा’ असा शाळेतून निरोप आला; त्यादिवसापासून आजतागायत मी शाळेच्या जुन्या आठवणीत अगदी रमून गेलो होतो. शाळेची इमारत, तिथला शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, जन्मदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा, शाळेच्या भिंतीवर असलेली गुणवंतांची नामावली केवळ बोलकीच नव्हती तर सतत प्रेरणादायी अन् काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करणारी होती. शाळेतील सर्व शिक्षकांना मी हवा तेव्हा हवा तो प्रश्न विचारायचो. अगदी ‘लोकसभेतील शून्य प्रहर म्हणजे काय’ पासून ‘माणूस मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित’ इथंपर्यंत. पण सांगताना आनंद होतो आहे की दरवेळी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईपर्यंत सर उत्तर देत होते. अगदी कधीकधी नंतर निवांत वेळ देऊनसुद्धा. विद्यार्थ्यांनं केवळ पास होऊन गुणवत्ता प्राप्त करण्यापेक्षा हे कितीतरी अधिक मौल्यवान होतं.
शाळेेचे ग्रंथालय, क्रीडामैदान आजही जसेच्या तसे आठवते. ते दिवसच विलक्षण होते. घरची परिस्थिती बेताची. मात्र आई-दादांनी तसे कधी भासू दिले नाही. सोबत ‘शाळा‘ होतीच. माझी ‘राजस्थानी शाळा’ म्हणजे एक विश्व होतं. आजही कुठं 1-2 मिनिटंही उशिर झाला की, शिक्षकांनी शाळेत उशिरा पोचल्यावर मारलेले हातावरचे वळ आठवतात, अन् तेच वेळेवर पोचण्याचं ‘बळ’ देतात.

इयत्ता 6 वीत असताना मराठीच्या  बाईंनी ‘मी पाहिलेला गणेशोत्सव’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा माझ्या निबंधाचं केलेलं कौतुक फार मोलाचं वाटतं. असंच इयत्ता आठवीत असताना मराठीच्या सरांनी ‘मी फुलपाखरू बोलतोय’ या विषयावर लिहिलेल्या निबंधाचं केलेलं कौतुक आज मला जगातील कोठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान वाटतं, अन् त्यामुळेच मला ‘लिहिण्याची’ प्रेरणा मिळते.

कोणत्याही परिस्थितीत वेळ पाळावी, मुक्या प्राण्यांना अन् झाडांना इजा पोचवू नये, मोठ्यांना आदरानं बोलावं, खूप शिकावं, मोठं व्हावं पण आई-वडिलांना कधी विसरू नये. या संस्कारगोष्टी राजस्थानी शाळेनचं मला दिल्या असं मी नेहमी कौतुकानं सांगत असतो. शाळेत साजरे होणारे गणेशोत्सव, रक्षाबंधन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, त्यांच्या आई-बाबांना दिलेले निमंत्रण या गोष्टी दरवर्षी मला खूप आवडायच्या अन् आपल्याही आई-बाबांना शाळेनं बोलवावं असं वाटायचं. दुर्दैवानं इयत्ता दहावीत तेवढी गुणवत्ता मी प्राप्त करू शकलो नाही, मात्र त्याहीपेक्षा अधिक ‘गुण’ शाळेनं दिल्याचं आठवलं की अक्षरश: मला दाटून येतं. इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम जवळजवळ संपला होता. त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता. वर्गशिक्षक परीक्षेबद्दल निरनिराळ्या सूचना देत होते. मात्र, मी माझ्या मनात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत होता. शाळा संपून जगात वावरण्याच्या स्वातंत्र्याचा. शाळेची घंटा वाजली, अन् आम्ही स्वतंत्र झालो. अगदी स्वतंत्र... आता छडी मारणारं कोणी नव्हतं... गृहपाठ झाला का विचारणारं कोणी नव्हतं... पण नंतर हळूहळू लक्षात आलं आपण ‘शाळा’ या विश्वात एवढे स्वतंत्र होतो की उगाच आपण जगाच्या शाळेत उतरलो अन् ‘पारतंत्र्यात’ गेलो. उगाच शाळा संपली... ती शाळा आता कधीच भरणार नाही...

(माझ्या शाळेच्या विशेषांकाकरिता  लिहिलेला लेख )

12/05/2013

काही बोलणार नाही


















काही बोलणार नाही
काही सांगणार नाही
भाव तोडणारे आता
कोणी जोडणार नाही

तोडणारे नाते
कधी जोडणार नाही
मीच माझा डावा
पुन्हा मांडणार नाही

डाव डावाचा हा खेळ
राज्य माझ्याच वाट्याला
फसवा हा खेळ
कधी खेळणार नाही

आता तोलणार नाही
राग मोजणार नाही
मीच माझी जखम
कधी सोलणार नाही

प्रेमाच्या या गावा
प्रेम ओतणार नाही
ओतणारे कोणी कधी
शोधणार नाही

12/04/2013

जीवनमूल्यांचे आदर्श

अवघ्या पृथ्वीतलावरील समस्त मनुष्यमात्र हा शाश्वत सुख, आंतरिक समाधान, मानसिक शांती आणि निस्सीम प्रेमाच्या शोधात असतो. त्याकरिता तो वेगवेगळे मार्ग अवलंबित असतो. मात्र, या सार्‍यांकडे जाणारे मार्ग मूल्यांच्या वाटेवरूनच जात असतात. इंद्रियसुखातून आपणास क्षणिक सुख आणि अशाश्‍वत आनंद मिळतो, तर आत्मसुखातून चिरंतन आनंद मिळतो. एखाद्या गर्दीच्या बसमधून तुम्ही बसून आनंदाने प्रवास करीत आहात. मात्र, बसमधील गर्दीत एखादी वृद्ध व्यक्ती उभ्याने प्रवास करीत असताना तुम्हाला दिसते. अशा वेळी तुम्ही जर स्वत: उभे राहिलात अन् त्या वृद्धाला बसण्याकरिता जागा दिलीत तर त्यातून जो आनंद मिळेल तो शाश्वत आनंद असेल.

दैनंदिन जीवनात अशा छोट्या छोट्या गोष्टी अवलंबिल्या तर तुम्ही असंख्य वेळा शाश्‍वत सुख अनुभवू शकाल. साधारणपणे स्वत:चे जीवनमान स्वत:च्या दृष्टीतून उंचावणारे सत्त्व म्हणजे मूल्य किंवा जीवनमूल्य असे आपल्याला म्हणता येईल. जीवन-मूल्यांवर आपली निष्ठा हवी. कै. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, ‘‘लोकांवरील, लोकशाहीवरील श्रद्धेच्या बळावर राष्ट्रनिष्ठा, समूहनिष्ठा, मानवतेवरील निष्ठा या जीवननिष्ठेपासून मी कधीही अलग होऊ दिल्या नाहीत.’’

प्रत्येक काळातील  राज्यकर्त्यांनी, पराक्रमी पुरुषांनी त्यांच्या कारकिर्दीत जीवनमूल्यांना सर्वोच्च स्थान देण्याचा प्रयत्न केला आहेे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तर मूल्ये जोपासणार्‍या राजाचे जाज्वल्य आणि आदर्श उदाहरणच आहे. स्त्रीवर केल्या जाणार्‍या अत्याचाराविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद महाराजांनी आपल्या कार्यकाळात अवलंबिली होती. यामुळे अवघ्या स्त्रीवर्गाला सन्मान देण्याचे मूल्यशिक्षण त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवून दिले. अशा प्रकारच्या अनेक मार्गांतून त्यांनी राज्यातील रयतेमध्ये मूल्यांचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला होता.

सत्यवचन, प्रामाणिकपणा, अहिंसा, समता, स्त्री-पुरुष समानता यासारखे उच्चकोटीचे जीवनादर्श म्हणजेच जीवनमूल्य होय. एखाद्या व्यक्तीचे मूल्य (रुपयांतील नव्हे) निश्‍चित करायचे असेल तर त्याच्या जीवनात त्याने अंगीकारलेल्या मूल्यांचा विचार करणे अनिवार्य आहे. फुलांंचा सुगंध, एखाद्या पदार्थाची चव, मायेचा कोमल स्पर्श या गोष्टी ज्याप्रमाणे इंद्रियांना संतुष्ट करतात, त्याचप्रमाणे ‘जीवनमूल्ये’  मनाला संतुष्ट करतात, त्यातून चिरंतन आनंदाचा अनुभव देतात. जीवनमूल्ये प्रत्यक्ष दिसत नाहीत, ती अनुभवावी लागतात. त्यामुळेच येथे प्रत्यक्ष कृतीतून जीवनमूल्ये अंगीकारणार्‍या महापुरुषांची उदाहरणे दिली आहेत.
संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींनी किंवा महापुरुषांनी सर्वच्या सर्व जीवनमूल्यांना आपल्या जीवनात अग्रक्रम दिला. या मूल्यसंवर्धनाकरिता, जनसामान्यांमध्ये ते रुजविण्याकरिता, त्यांच्या प्रचार-प्रसाराकरिता आपले अवघे जीवन खर्ची घातले. भारता-सारख्या विविध संस्कृतींनी नटलेल्या देशात प्रत्येक सांस्कृतिक परंपरेमध्येही याच मूल्यांच्या संवर्धनाला वेळोवेळी अधोरेखित केले आहेे.

सत्यवचन

फार पूर्वी राजा हरिश्चंद्र नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने आपल्या हयातभर आपले वचन पाळण्या- करण्याकरिता प्रयत्न केले. त्यासाठी त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्याला अक्षरश: तिलांजली दिली. सत्य-वचनाचा आदर्श ठेवताना राजा हरिश्चंद्राचे नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सत्यवचन हे जीवनमूल्य अंगीकारणे सद्यकाळात अत्यंत आवश्यक आहे. नव्हे, ती काळाची गरज बनत चालली आहे.

अहिंसा

अहिंसा या मूल्याचा विचार करताना आपणास अलीकडच्या काळात आदर्श उदाहरण ठरलेल्या गांधीजींचा उल्लेख करावा लागेल. गांधीजींनी अहिंसा-मूल्याला आपले जीवन मानले. बालपणी एकदा गांधीजींना त्यांच्या आईने बाजारातून आंबे आणायला सांगितले. गांधीजी बाजारात गेले. त्यांनी सर्वोत्कृष्ट असे दिसणारे आंबे खरेदी करून घरी आणले. ज्या वेळी त्या आंब्याचा आमरस करण्यात आला. त्या वेळी ते आंबे अत्यंत निकृष्ट प्रतीचे आढळून आले. तेव्हा गांधीजीं आमरसाचे ते भांडे जसेच्या तसे घेऊन बाजारात गेले. जेथून आंबे खरेदी केले होते त्या व्यापार्‍याकडे ते आले आणि आंबेखरेदी केलेले पैसे परत करण्याविषयी त्यांनी विनंती केली. छोट्या मुलाला पाहून व्यापार्‍याने त्याकडे दुर्लक्ष केले. पैसे मिळणार नाहीत, असे त्याने सांगितले. त्यावर गांधीजी तेथेच शेजारी उभे राहिले आणि त्यांनी त्या व्यापार्‍याकडे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला त्या भांड्यातील आमरसाची चव दिली आणि सांगितले, की येथून आंबे खरेदी करू नका, येथे आंबे निकृष्ट प्रतीचे आहेत. ही घटना पाहून त्या व्यापार्‍याने गांधीजींना पैसे परत दिले. अशा प्रकारे त्यांनी बालपणापासूनच अहिंसेचा मार्ग अवलंबिला. त्याच बळावर त्यांनी मोठा जनसमुदाय या मूल्याकडे वळविला. या समुदायाचे प्रबोधन करून अहिंसेच्या माध्यमातून परकीय आक्रमकांविरूद्ध लढा दिला. आपले आजचे स्वातंत्र्य हे त्यांच्या लढ्याचे फळ आहे.

समता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि सामाजिक न्याय या जीवन-मूल्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले. त्याकरिता त्यांनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा संत तुकाराम महाराजांचा विचार त्यांनी जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. सगळी माणसे सारखी आहेत. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. त्यामुळे सर्वांना समतेची, न्यायाची वागणूक मिळावी, असा विचार त्यांनी अधोरेखित केला. त्याकरिता व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करून दाखविले.

शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांकरिता जीवनमूल्य

अलीकडेच शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेत नव्याने येऊ इच्छिणार्‍यांकरिता तसेच शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतही नीती व मूल्य हे विषय समाविष्ट केले आहेत.

या पार्श्वभूमीवर शासकीय कामाकरिता कार्यालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देणे, कामावर श्रद्धा-निष्ठा ठेवणे, काम पारदर्शकपणाने करणे, कामात प्रामाणिकपणा ठेवणे, यासारखी अनेक जीवनमूल्ये प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे. त्यातून आपले परमवैभवाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईलच त्याशिवाय स्वत:ला शाश्‍वत आनंदाचाही अनुभव येईल.

(यशदा यशमंथन  जुलै-सप्टेंबर २०१३)

12/03/2013

प्रिय बाप्पास...

बाप्पा, ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दरवर्षी आम्ही तुझं मोठ्या उत्साहानं स्वागत करतो. नेहमीची आमची दु:खं, आमच्या वेदना, आमची संकटं बाजूला ठेवून खर्‍याखुर्‍या भक्तिभावाने तुला पुजतो. अगदी अनंत चतुदर्शी पर्यंत तुझं पूजन करतो. इथं झाडं हलतात, हवा मिळते; समुद्राच्या तर्‍हेवर चंद्राची कोर ठरते, नद्या समुद्राला मिळतात, समुद्र आकाशला मिळतो अन् आकाशातून पाण्याचा वर्षाव होतो; रोज कित्येक प्राणी जन्म घेतात, कित्येक तुझ्या भेटीसाठी येतात; युगं संपतात, युगं सुरु होतात; पण आम्ही मात्र जगत राहतो, मरेपर्यंत, मरण हातात घेऊन. केवळ तुझ्यावर भरवसा ठेऊन. हे सगळं तुझ्यामुळेच घडतं ना! कदाचित तुला हे सारं सारं घडण्यापूर्वीच माहिती असेलही...

बाप्पा, आमचा भोळा भाव, तू समजून घेतोसच. पण यंदाच्या वर्षी आमचं थोडं ऐकशील. खरंच आम्ही दररोज मरण हातात घेऊन जगतो रे, अक्षरश: मरण हातात घेऊन. केवळ तुझ्या आशेवर. कधी, कोठे, कसे आणि काय घडेल याची कल्पना आम्ही सामान्य करूच शकत नाहीत. कदाचित तू करू शकशील. कधी धरणी फुटेल अन् आम्ही तिच्या पोटात जाऊ, सांगता येत नाही. कधी चंद्राची कोर बदलणारा समुद्र खवळेल आणि आम्हाला कवेत घेऊन जाईल, सांगता येत नाही. तर कधी कोठे आकाशातून बरसणारे पाणी आम्हाला आकाशात घेऊन जाईल, सांगता येत नाही. कदाचित हे तुला सांगता येत असेल पण आजतरी चंद्राला स्पर्श करणार्‍या आमच्यासाठी आमचाच जीव कधी जाईल याचा शोध अजून लागायचा आहे. का आमच्या बांधवांचे निष्पाप प्राण स्वत:कडे घेऊन जातोस? त्यांचा त्यात काय दोष असतो?

गणराया, नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत आम्ही तुझ्यावर भरवसा ठेऊन जगतो. पण कैकवेळा आमच्याच बांधवांनी निर्माण केलेल्या मानवनिर्मित आपत्तींचे काय? कधी कोणत्या लोकलमध्ये बॉम्ब फुटेल, कधी कोठे दंगल उसळेल, सांगता येत नाही. कधी कोठे मारामार्‍या होतील आणि आम्हाला आमचा प्राण घेऊन तुझ्या भेटीला यावे लागेल याची आम्हाला शाश्वती नाही. बाप्पा, हातात बंदुका घेऊन ‘मानवते’चा खून करायला निघालेल्या माणसांना तू अशी दुर्बद्धी का देतोस. देश, वर्ण, धर्म, पंथ, संप्रदाय आणि तुझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग जरी निरनिराळा असेल तरी सगळे मार्ग तुझ्यापर्यंतच पोचतात ना... कोणी तुला अल्ला म्हणतो, कोणी खुदा म्हणतो, कुणी ‘गॉड’ म्हणतो पण सगळ्याचा अर्थ ‘देव’च ना... आणि जगातील कोठल्यातरी ग्रंथात तुच निर्माण केलेल्या माणसांना मारून तुझ्यापर्यंत पोचण्याचा संदेश दिला आहे काय?

आम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणसाच्या ठायी ईश्वर असतो. मग अशा सगळ्याच माणसांना तू सुबुद्धी का देत नाहीस. का त्यांना तुझ्या घरून या मृत्युलोकात पाठविताना मानवतेचा संदेश देत नाहीस. का त्यांच्या हातातील बंदुका निष्पापांचा प्राण घेताना थरथरत नाहीत. आम्ही बापडे काय करणार जमेल तेवढी हळहळ व्यक्त करणार, फार-फार तर रक्ताच्या नसलेल्या नातांकरिता चार अश्रू ढाळणार अन् पुन्हा आमचं मरण आणि तुझी सोबत घेऊन जगण्याकडे मार्गस्थ होणार...

बाप्पा, आम्हाला नुसतेच हाड, मांस, रक्त दिसले की अनामिक भिती वाटते, मग याच सर्वांचा मिळून बनलेला जिवंत माणूस भेटला की आम्हाला अनामिक आनंद वाटतो. हाच आनंद आम्हाला आमच्या गावाकडचा माणूस भेटला की वाटतो, दुसर्‍या राज्यात गेल्यावर आमच्या राज्यातील माणूस भेटला की वाटतो, परदेशात देशात गेल्यात आमचा देशवासी भेटला की आनंद वाटतो! मग परगृहावर गेल्यावर नुसता माणूस दिसला की आनंद वाटेल ना! मग इथंच फक्त ‘माणूस’ भेटला की आम्हाला आनंद वाटतो का? तो ‘आनंद’ आम्ही आज तुझ्याकडं मागत आहोत. जगातील प्रत्येक मानवाची दुष्कर्म करण्याची बुद्धी काढून घे आणि त्याजागी केवळ सद्बुद्धी दे!  मग बघ,

...घराघरात मांगल्याचे, संस्कारांचे, मूल्यांचे धडे मिळतील. प्रत्येकजण आपल्या माता-पित्यांना वंदनीय मानेल. वृद्धाश्रमांना टाळा लावावा लागेल. कोणीही भांडणं करणार नाहीत. त्यामुळे ती निवारण्यासाठी कोणत्याही व्यवस्थेची गरज उरणार नाही. कारण प्रत्येकाला तू सद्बुद्धी दिलेली असशील. ...बघता बघता प्रत्येक देश ‘परमवैभवा’च्या परमोच्च शिखरावर पोचला असेल. त्यावेळी जगातील कोणतेही राष्ट्र कधीही कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही. कारण प्रत्येकाला तू सद्बुद्धी दिलेली असशील. ...अचेतनाला चेतना मिळेल. अनितीला मोक्ष मिळेल. असत्याला अंधार मिळेल. सत्याला प्रकाश मिळेल. प्रकाशाला तेज मिळेल. त्या तेजातून दिव्यत्वाची प्रचिती मिळेल... सारी सृष्टी दिव्य तेजाने झळाळून निघेल... कारण सर्वांना सद्बुद्धी मिळाली असेल.

बाप्पा आमच्यासाठी एवढं करशील... 

12/02/2013

ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता

काळ्यारात्रीला पार करून शुभ्र सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगत असतांना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याच्या शोधात आहे. अशा नाविन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपला विकास साधत असतो. आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी आकाशवाणीचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

अलिकडच्या काळात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे. याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. प्रथम कृषीक्षेत्रातील काही नव्या तंत्रांची माहिती घेऊयात.

अलिकडच्या दशकात शेतीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नॅनो म्हणजे छोटा. 80 च्या दशकात जन्म घेतलेल्या नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनस्पतींमधील सुप्त गुणांवर प्रयोग करून नवीन जाती विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. नॅनो चिप्सच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये असणारी विविध जनुके यांची चाचणी केली जाते. त्यातून कोणते जनुक वनस्पतीच्या चांगल्या स्थितीत व आजारपणाच्या काळात स्थिरावते किंवा क्रियाशील राहते याची कल्पना येते. या नॅनो तंत्राचा वापर करून पिकांवर पडणार्‍या किडी आणि रोगाचे नियंत्रण करता येते. नॅनो यंत्र अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतीची सुदृढता करून घेता येते. याच तंत्राच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून या खतांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम व जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पिकांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठीही या तंत्राची मोठी मदत होते. भाजीपाला साठवण व त्यावरील प्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत तर होतेच मात्र त्यातून गावातील शेतकर्‍यांचा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्यास मदत होते. याशिवाय लेसरचा वापर करून शेताचे सपाटीकरण, शेतात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जमिनीचे परीक्षण करण्याची पोर्टेबल किट वापरणे इत्यादी देखील नव्या तंत्रज्ञानाचे कृषि क्षेत्रातील उपयोगाची उदाहरणे देता येतील.

शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराला देखिल नव्या तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य झाले आहे. सौर ऊर्जेचा उपयोग पाणी गरम करणे, पदार्थ शिजविणे याबरोबरच रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो. अलिकडच्याच संशोधनाने आता आपली पिके, फलोद्यान, खुली कोठारे, कृषिभवने इत्यादींचे संरक्षणासाठीसुद्धा सौरऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे. ‘सौर फोटोव्होटाईक विद्युत कुंपण’ या तंत्राद्वारे हे संरक्षण करता येऊ शकते. यामध्ये रक्षित करावयाच्या क्षेत्राला दिलेल्या कुंपणामध्ये सौरऊर्जेद्वारे सौम्य प्रमाणात वीज प्रवाहित केली   जाते. ज्याद्वारे रानटी जनावरे, गुरेढोरे इत्यादींनी विद्युत कुंपणाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना 0.0003 सेकंद एवढा विद्युत धक्का जाणवतो, शिवाय ज्यातून त्या जनावरांना कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. मात्र ती जनावरे पुन्हा त्या कुंपणाला स्पर्श करीत नाहीत आणि आपले क्षेत्र त्यांच्यापासून सुरक्षित राहते. या तंत्राला ‘सौर कुंपण’ म्हणूनही संबोधले जाते.

एखाद्या रोगाची लागण कोणत्याही प्रदेशात झाली तरी त्यावर त्या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या योग्य आणि यशस्वी उपाययोजनेबाबतची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ज्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर त्या उपाययोजनांची माहिती घेता येऊ शकते. तसेच अधिक उत्पादन देणार्‍या  नव्या प्रयोगांची माहितीही आपल्याला इंटरनेटद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्यामुळे प्रयोगशील शेतकर्‍यांना नवे प्रयोग राबविण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय दररोजचे हवामान, वेधशाळेचा पावसाचा अंदाज इत्यादी माहितीदेखिल आपण इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून घेऊ शकते.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येऊ शकते. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते.
गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.  

गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून प्रशिक्षण थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. ज्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण संगणकाची मदत घेऊ शकतो.  याहीपलिकडे जाऊन गावाबाहेर असणार्‍या गावकर्‍यांना गावाच्या विकासात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना गावातील परिस्थिती, हवामान, पीक-पाऊस, गावातील एखादी महत्त्वाची घटना इत्यादीं माहितीच्या देवाणघेवाणीकरिता ई-मेलचा, एसएमएसचा, मोबाईलचा वापर करता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.

मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात.

धन्यवाद!

12/01/2013

हरीच्या ‘गुज’गोष्टी

जगण्याच्या पलिकडे अन् मरण्याच्या अलिकडे, श्‍वासाच्या पलिकडे अन् हृदयाच्या अलिकडे असणार्‍या भावना शब्दांच्या पलिकडल्या आहेत. त्या भावना प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या, ममतेनं ओथंबलेल्या, समाधानानं ओसंडणार्‍या आणि हृदयापासून निघून हृदयापर्यंत पोचणार्‍या असतात. या सर्वांची जाणीव करून घेण्याकरिता ‘स्व‘त्वाच्या पलिकडे, अहंकाराच्याही पलिकडे जाण्याची आवश्यकता आहे. 
छोट्या हरीला त्याच्या आईनं या जाणीवांची जाणीव करून देण्याकरिता सांगितलेल्या काही गुजगोष्टी...

हरीच्या घरातील देव्हारा समईतील मंद अन् तेजस्वी प्रकाशाने उजळत होता. हरीची आई अंगणात तुळशीवृंदावनापुढे दिवा लावीत होती. हरी वाड्यातील ओसरीवर अभ्यास करीत बसला होता. हरीची आई म्हणाली, ‘‘हरी, ये इकडे. आज आपण इथेच शुभंकरोति म्हणूयात.’’ त्या छोट्या हरीची छोटी पावलं धावतच अंगणातल्या तुळशीवृंदावनापर्यंत पोचली. हरी म्हणाला, ‘‘आई, शुभं करोति कधी तुळशीसमोर म्हणतात का?’’ हरीचा बाळबोध प्रश्न. तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘बाळ, हरी कुठलीही चांगली गोष्ट करण्याकरिता कुठलेही ठिकाण चांगलेच चालते. त्यामुळे इथं शुभंकरोति म्हटली तरी हरकत नाही.’’

आकाशात चंद्राचा प्रवास सुरु होता. हरीची शुभंकरोति संपली. आणि त्या चंद्राकडे हरीने आईला गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला. आईला हरीचा हट्ट मोडवला नाही. आई म्हणाली, ‘‘हरी आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे, त्याआधी तू मला शपथ दे की, तू आयुष्यात कितीही मोठा झालास तरी नम्रपणाने वागशील.’’ थोड्याश्या निराशेने हरी म्हणाला, ‘‘पण नम्रपणा म्हणजे काय गं आई?’’ आईने निर्विकारपणे उत्तर दिले, ‘‘बाळ, हरी! नदीला जेव्हा पूर येतात तेव्हा मोठमोठाली वृक्षे उन्मळून पडतात, मात्र त्याच नदीत असणारी नम्रपणाने वाकलेली लव्हाळे पूर ओसरला की मोठ्या उमेदीने पुन्हा उभी राहतात. समईतील मंद प्रकाश देणारी कापसाची वात आपला नम्रपणा कधी सोडते का? अर्धे शरीर नम्रपणाने तेलात तर अर्धे शरीर जळून प्रकाश देण्यासाठी समईच्या बाहेर डोकावत असते. माझ्या ‘हरी’चा जेव्हा मोठा हरी होईल. तेव्हा तू ही असंच वाग बरं! नम्र, अहंकाररहित!’’ आकाशातील चंद्राकडं, आईच्या चेहर्‍याकडं अन् तुळशीतल्या रोपाकडे पाहत पाहत हरी अगदी तन्मयतेनं सगळं ऐकत होता.

‘‘सांग ना आता आई गोष्ट’’ हरी मोठ्या आशेनं आईच्या डोळ्यात पाहून म्हणाला.
‘‘मग लक्षपूर्वक ऐक आता मी जी गोष्ट सांगते ती!’’ आणि आईनं गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
एकदा एका आश्रमात गुरुंकडे काही शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. गुरुंनी सर्वांची परीक्षा घेण्याचे ठरविले. दुसर्‍या दिवशी पहाटे गुरुजींनी सर्वांना बोलाविले आणि प्रत्येकाच्या हातात एक आंबा दिला आणि म्हणाले, तुम्ही प्रत्येकाने हा आंबा खायचा मात्र, तो खाताना कोणी पाहणार नाही याची दक्षता घ्यायची. अशा ठिकाणी जाऊन आंबा खा. ज्याठिकाणाहून तुम्हाला कोणीही पाहणार नाही. आणि दिवस मावळायच्या आत तुम्ही सर्वजण आंबा खाऊन या. अगदी गडबडीनं मग सारे शिष्य आपापली जागा शोधू लागले. कोणी झाडाच्या टोकाला, कोणी दूरवर रानात, कोणी खोल दरीत दगडाच्या मागे, तर कोणी आश्रमातील मेजाखाली जाऊन लपले. सूर्य जसजसा पुढे सरकू लागला तसतसे एक-एक करत सारे शिष्यगण जमा झाले. सूर्य बुडाल्यानंतर गुरु आले आणि म्हणाले की मुलांना आता प्रत्येकाने पुढे यायचे आणि सांगायचे की तुम्ही कोठे बसून आंबा खाल्ला आणि आंबा कसा होता. सर्व शिष्यांनी आपण बसलेली जागा सांगितली आणि आंब्याची चवपण सांगितली. सर्वांनी जवळजवळ आंबा गोड होता असेच सांगितले. सर्व शिष्यांचे सांगून झाले. गुरूजी उभे राहिले आणि त्यांनी शिष्यांवर एकवार नजर फिरविली. ‘अरे, माधव तू आंबा खाल्ला नाहीस का? तुझ्या हाताच दिसतोय’ माधवकडे पाहून गुरूजी म्हणाले. माधव बोलला, ‘‘गुरूजी तुम्ही अशा जागी जावयास सांगितले की जेथे कोणी बघणार नाही. मात्र देव या चराचरात आहे, इथल्या कणाकणात आहे, प्रत्येक माणसामाणसात आहे म्हटल्यावर माझ्या अंत:करणातील, इथल्या चराचरातील, इथल्या कणाकणातील देवाला सोडून मी कोठे जाऊ शकतो आणि अशी एकांतातील जागा मला या ब्रह्मांडात तरी सापडेल का? म्हणून मी आंबा खाल्ला नाही?’’ गुरुजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.’’  गुरुजींनी माधवच्या पाठीवर शाब्बासकी देऊन म्हटले की माधवला मी जे काही आजपर्यंत शिकविले त्याचे चांगले ग्रहण झाले असून तो माझा आदर्श शिष्य आहे.

हरीची आई हरीला म्हणाली, ‘‘बघ हरी, तू सुद्धा शिकलेले चांगले ग्रहण करून एक आदर्श विद्यार्थी हो बरे!’’ ‘‘हो आई. पण मग हरीचे पुढे काय झाले?’’ हरी मोठ्या उत्सुकतेनं म्हणाला. ‘‘अरे हरी, एकाच दिवशी सगळ्या गोष्ट सांगू का? उद्या सांगेन बरे.’’ हरीने तरीही आईकडे आणखी एक गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला. हरीचा बालहट्ट आईला मोडवला नाही. आईने पुन्हा गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

माधवचे सगळे शिक्षण पुढे पूर्ण झाले. मग पुढे माधव सोबतच शिकत असलेल्या दुसर्‍या एका केशव नावाच्या शिष्याला गुरुजींचा काही वर्षांनी असे वाटायला लागले की, आपण आता सर्वश्रेष्ठ शिष्य झालो. तो गुरुजींकडे जाऊन म्हणाला, ‘‘गुरूजी मला आपण दिलेले ज्ञान ज्ञात झाले असून आता मी आपल्या सर्व शिष्यांमध्ये आणि कदाचित सर्व मनुष्यमात्रामध्येच श्रेष्ठ ठरू शकतो, ना?’’ गुरूजी अगदी निरलसपणे त्या शिष्याकडे पाहून म्हणाले, ‘‘केशवा, तू सर्व मनुष्यमात्रामध्येच काय सर्व प्राणीमात्रांमध्येही सर्वश्रेष्ठ ठरू शकतोस फक्त तू एक सजीव अथवा निर्जीव वस्तू आण जी की तुझ्यापेक्षा कनिष्ठ असेल’’ केशव जिंकल्याच्या आवीर्भावात म्हणाला, ‘‘काय गुरूजी, मी असा माझ्या मातृग्रही जातो आणि लगेच माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेली एक काय अनेक गोष्टी घेऊन येतो.’’ पुढे काहीही न ऐकता गुरूजींना नमस्कार करून केशव निघाला.

कल्पित आनंदाच्या विश्वात फिरत फिरत माधव मातृग्रही परतला आणि थेट आपल्या आईकडे जाऊन आईला नमस्कार करून म्हणाला, ‘‘आई, आज मी गुरु कडून सगळी सगळी विद्या ग्रहण करून आलो आहे. केवळ एक कनिष्ठ गोष्ट मी गुरुंकडे घेऊन गेलो की मी आता सर्व प्राणीमात्रांमध्येही श्रेष्ठ ठरणार आहे. आई, तू माझ्यासोबत येशील?’’ आईनं माधवच्या डोक्यावरून अगदी प्रेमभावाने हात फिरविला आणि म्हणाली, ‘‘बाळ माधवा, मी तुझ्यापेक्षा नक्कीच कनिष्ठ आहे रे, पण मी जर तुझ्यापेक्षा कनिष्ठ ठरले, तर तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि मोठा ठरशील आणि तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी लहानच आहेस ना, मग मी तुझ्यासोबत  कशी येऊ?’’ निराश मनाने माधव आपल्या वडिलांकडे गेला, नमस्कार करून म्हणाला, ‘‘पिताश्री, गुरूंनी सांगितले आहे की सर्वश्रेष्ठ होण्यासाठी केवळ एक माझ्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट मला हवी आहे. आपण मजसोबत याल का?’’ माधवच्या वडिलांची प्रसन्न आणि भारदस्त देहयष्टी क्षणार्धात कापू लागली आणि तो नरदेह डोळ्यात आग ओकू लागला. वडिलांची ही अवस्था पाहून माधवने वडिलांना नमस्कार केला आणि म्हणाला, ‘‘पिताजी क्षमा असावी.’’

आपल्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट शोधता शोधता पंधरा दिवस झाले. पण माधवने आपला निश्चय बदलला नाही. तो आपल्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, ‘‘तू माझ्यापेक्षा कनिष्ठ म्हणून गुरुजींकडे येशील?’’ त्यावर पत्नी म्हणाली, ‘‘माझ्या वडिलांच्या घरी असतांना मी सुखात होते, तुमच्याकडे आले आणि माझे सुख कमी झाले. मग मी तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे ठरेल?’’ पत्नीशी वाद न घालता माधव सगळ्या सगळ्या ठिकाणी जाऊन आला. आपल्या पुत्रांकडे, मित्रांकडे अगदी सगळीकडे. मात्र त्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट सापडली नाही. अशातच एका वर्षाचा कालावधी लोटला. मग मात्र त्याला आठवले, की गुरूजी म्हणाले होते की कुठलीही सजीव अथवा निर्जिव गोष्ट कनिष्ठ म्हणून चालेल. मग तो थेट आपल्या स्वत:च्या विष्ठेला आपल्यापेक्षा कनिष्ठ म्हणून स्पर्श करण्यास गेला. तेवढ्यात त्या मानवी आवाजात ती विष्ठा बोलू लागली, ‘‘खबरदार, जर मला कनिष्ठ म्हणून हात लावशील तर! अरे, तुझा स्पर्श होण्यापूर्वी मी स्वादिष्ट आणि रूचकर मिष्टान्न होते, तुझा स्पर्श झाला आणि माझी विष्ठा झाली, मग तू कनिष्ठ की मी?’’ माधवचा चेहरा अगदी उतरला. त्याला आपल्या स्वत्वाची जाणीव झाली, आपण किती क्षुद्र आहोत आणि आपण किती श्रेष्ठत्वाचे स्वप्न पाहत होतो  असे त्याला वाटायला लागले. त्याचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आणि तो थेट गुरूकडे माफी मागण्यास गेला. गुरूजींना नमस्कार करून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. गुरूजी म्हणाले, ‘‘माधवा, तुला तुझ्या स्वत्वाची जाणीव झाली आहे हे फार मोलाचे आहे. ब्रह्मांड खूप मोठे आहे. या विशाल अशा ब्रह्मांडात तू एका बिंदूपेक्षासुद्धा लहान आहेस. मात्र एक लक्षात ठेव. तू सर्वश्रेष्ठ नसलास तरी सर्वांना सोबत घेऊन तू कीर्तीनं, समाजातील गोरगरिबांना मदत करून मोठा होऊ शकतोस. तेव्हा श्रेष्ठत्वापेक्षाही आपल्या कार्याचा उपयोग समाजासाठी कर!’’

हरी अगदी तल्लीन होऊन हे सारं ऐकत होता. हरीनं प्रश्नार्थक नजरेनं आईला विचारलं, ‘‘पण आई माणसाला हे सारं ठाऊक असून त्याला अहंकार कसा काय होतो गं?’’ आई म्हणाली, ‘‘बाळ कुठलाही मनुष्य परिपूर्ण असत नाही किंवा कुठलाही मनुष्य कनिष्ठही असू शकत नाही. प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकण्यासारखे असते. तर प्रत्येक माणसात काही ना काही उणीव असते. त्यामुळे हरी, तू सुद्धा कधीही स्वत:ला मोठा, श्रेष्ठ समजू नकोस. प्रत्येकासोबत नम्रपणाने वागत जा. कधीही खोटे बोलू नकोस. दुवर्तन करू नकोस. सतत मोठ्यांचा, लहान्यांचा आणि सर्व मनुष्यमात्रांचा आदर करीत जा. सतत आपल्या आतला अर्थात् आत्म्याचा आवाज ऐकत जा. जेव्हा माणसाचं मरतो ना हरी त्यानंतर केवळ आपला आत्मा आपल्याला साथ देतो. त्यावेळी आपणांस त्याची किंमत कळते. त्यामुळे सर्वांनी जरी आपल्याला सोडले तरी आपला आत्मा आपली साथ सोडत नाही. आणि म्हणूनच तो आपल्याला कधी चुकीची दिशा दाखवित नाही, तर सतत योग्य दिशादर्शन करीत असतो. हरी, आज आपण पक्वान्न खात आहोत उद्या कदाचित भाजी-भाकरी खावी लागेल. पण तरीही तू सत्याला सोडू नकोस. भलेही प्राण गेला तरी चालेल. किमान तू सत्यवचनी, सद्वर्तनी म्हणून तरी देवाकडे जाशील.’’

हरी म्हणाला, ‘‘आई, तू फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतेस गं. मला एवढं सारं काही कळत नाही. पण तू जे सांगशील ते मी आयुष्यभर ऐकेल बरे!’’ हरीने अलगद आईच्या मांडीवर आपले डोके टेकवले. तुळशीवृंदावनासमोर दिवा जळत होता. पौर्णिमेचा चंद्र प्रकाशत होता. जणू काही हरीच्या गुजगोष्टी ऐकून तुळससुद्धा आनंदानं, समाधानानं डुलत होती आणि हरी आणि त्याच्या आईच्या डोळ्यात पौर्णिमेच्या चंद्रासोबतच अश्रू कधी ओघळले ते दोघांनाही समजले नाही.

(चिंतन आदेश दिवाळी अंक २०११)

11/30/2013

नाव नसलेले पदार्थ

खाणं अन् जगणं एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील एवढं आता माणसाचं जगणं अन् खाणं समृद्ध होत चाललं आहे. दररोजच्या आयुष्यात आपण अनेक पदार्थ खातो, अनेक चवी चाखतो. पदार्थ तेच असतात, कमी अधिक फरकाने चवही तिच असते. पण त्यातून प्रतीत होणार्‍या भावना प्रत्येकवेळी वेगळ्या असतात. त्यांना गंभीर अर्थ असतो पण नाव नसते. प्रत्येकानं आपापल्या जगात त्या-त्या प्रसंगी त्याच-त्याच पदार्थांना, त्याच त्या पेयाला विशिष्ट नाव दिलेले असते. पण प्रत्येकाचे अर्थ वेगळे असतात. म्हणूनच आजही असे शब्द लौकिकार्थाने सार्वत्रिक ठरलेले दिसून येत नाहीत.

थकून भागून घरी आल्यावर पत्नीनं घरात प्रवेश करताच अत्यंत लडिवाळपणे, प्रेमाने आपल्या पुढ्यात ठेवलेला चहाचा झुरका घेताना मिळणारी चव आणि त्या चहाचे नाव शब्दात मांडता येण्यासारखे नाही. मुलीच्या विवाहासंदर्भातील बैठकीच्या वेळी बापाच्या ओठांतून आत जाणार्‍या चहाचे नाव कदाचित त्या चहाला सामावून घेणार्‍या कपालादेखिल आजतागायत माहित पडले नसेल. तोच चहा जेव्हा कॉलेजच्या कॅटींनमध्ये आपल्या प्रिय  मित्रांसमवेत कॉलेजातील सौंदर्याच्या चर्चा तोंडी लावत उदरात जातो तेव्हा त्या चहाला काही नाव असेल काय? त्यातल्या त्याष चहाचे ‘देयक बिल’ जेव्हा आपला परममित्र ‘पे’ करतो; तेव्हा तो आनंद गगनात मावत नाही अन् तो चहा उदरात मावत नाही. तेव्हा त्या विशाल चहाला काही नाव देता येईल का? इथंसुद्धा चहा तोच असतो, चव तिच असते. भावना किती बदलतात ना.

कल्पना करा. सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही घरी आलात. पत्नी बाहेर गेली आहे. घरी तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. घरात काहीही पदार्थ तयार नाहीत. अशावेळी डबे चाचपत असताना तुम्हाला शुभ्र रंग धारण केलेला ‘मुरमुरे’ नावाचा पदार्थ दिसतो अन् तुमची भूक आणखीन चाळावेत. तुमच्याकडून त्या मुरमुर्‍यात तेल, मिरची अन् मीठ कधी एकरुप होतं ते तुमचे तुम्हालाच कळत नाही. पण हेच ‘एकरुप’ खुशखुशीत चवीसह तुमची भूक शमविण्याची ताकद धारण करतं. याला बहुतेक रसिक खवय्ये ‘तिखट-मीठ-मुरमुरे’ असे म्हणतात. पण या सर्वांचं मिळून एकत्रित बारसं अद्याप व्हावयाचे आहे. विकेंडच्या रात्री तुमचा कुटुंबासमवेत अचानक बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरतो. पत्नीने घरी रात्रीचा स्वयंपाक केलेला असतो. दुसर्‍या दिवशी  सकाळकरिता त्या पोळ्या तुमची वाट पाहत असतात. मग त्या पोळ्यांचे छोटे-छोटे तुकडे करून त्याला फोडणी टाकून खाताना तुम्ही ‘पोहे’ खाल्ल्याचा आनंद लुटता. पोह्यांचा आनंद देणार्‍या पोळीच्या त्या तुकड्यांना काही निराळं नावच नाही. आता खरेखुरे पोहेसुद्धा बघा किती भाव बदलतात, ते! रेल्वेच्या डब्यातून तुम्ही प्रवास करीत आहात अन् भल्या पहाटे ‘गरम गरम पोहे, गरम गरम पोहे’ म्हणून ओरडत फिरणार्‍या त्या विक्रेत्याला अडवण्याचा मोह तुम्हाला आवरत नाही. त्या प्रवासात तो आनंद देणार्‍या त्या गरम पोह्यांना काही नावच नाही. तेच पोहे जेव्हा ‘कांदा-पोहे’ कार्यक्रमात मुलीच्या थरथरणार्‍या हातातून सर्वांना वितरित केले जातात, मुलीच्या थरथरणार्‍या त्या हातातील पोह्यांना काही निराळे नाव असेल काय!  जगातील सर्व मित्र-मैत्रिणींना एक वेगळाच संदेश देणारे अन् इतिहासाच्या गर्भात घेऊन जाणारे सुदाम्याच्या पोह्यांनासुद्धा वेगळे असे नाव नाही. मैत्रिचे संबंध जाणणार्‍या त्या भावना मात्र किती बोलक्या आहेत ना!
तुम्ही बसने प्रवास करीत आहात. कोणत्यातरी गावात तुमची बस थांबली आहे. तुम्हाला फार तहान लागली आहे. अन् त्याचवेळी कंडक्टरने खाली न उतरण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. अशावेळी बसच्या खिडकीतून ‘लेमनऽऽ गोळ्या, लेमनऽऽ गोळ्या’ म्हणून ओरडणार्‍या पोराकडे तुम्ही आशेने बघता. अन् त्याच्याकडून त्या गोळ्या घेऊन तोंडात टाकता. त्यावेळी तुमची तहान भागविणार्‍या त्या गोळ्यांना तुम्हाला ‘पाणी’ म्हणण्याचा मोह आवरत नाही.

केशवाय नम:, माधवाय नम:, गोविंदाय नम: म्हणत पळीभर पाण्याचं प्राषण केल्यावर ते पाणी आपल्या ठायी पाणी उरत नाही, पण त्याला नेमकं नावसुद्धा देता येत नाही. कारण त्या पाण्याला श्रद्धेचा काठ असतो.
चंद्राचं आणि माणसाच्या आयुष्याचं नातं अगदी जवळचं आहे. बालपणी चंद्र मामा भासतो, तर तोच चंद्र प्रेयसीसमवेत असताना वेगळाच संदर्भ घेऊन आपल्यासमोर उगवतो. कोजागिरीच्या रात्री तर त्याला काय मिजास चढतो ना. तो थेट आकाशातून आपल्या दुधाच्या भांड्यात अवतरतो. त्यानं आपल्या केवळ सावलीच्या अस्तित्वानं पावन केलेलं दुध आपण प्रसाद म्हणून पाशन करतो. दूध तेच असतं. चवही तिच असते. पण संदर्भ बदलतो मात्र कोजागिरीच्या दुधाला नेमकं नाव काही सापडत नाही. तोच चंद्र जेव्हा रमजानच्या रात्री उगवतो तेव्हा ‘रोजा’धरलेल्या कित्येक श्रद्धाळूंना तो जणू निरनिराळे पदार्थ खाण्याचे निमंत्रणच देतो. मग शिरखुरम्यावर ताव मारला जातो. दुधात निरनिराळे पदार्थ एकत्र करून तयार करण्यात आलेला शिरखुरमा म्हणजे दुधच.  इथंसुद्धा दूध तेच असते. पण दोन्हीही ठिकाणी श्रद्धेचे माध्यम बदलते. अंतिम भावना मात्र श्रद्धेचीच असते.

एखाद्याच्या लग्नाचे लाडू खाताना आपल्याला अतिशय आनंद होतो. त्या व्यक्तीच्या आनंदात समरस होऊन आपण लाडवांचा आनंद लुटतो. आणि हाच लाडू नावाचा पदार्थ आपण जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीच्या गोडजेवणाच्या वेळी खातो, तेव्हा काय भावना असतात लिहिण्यापलिकडचंच आहे. या दोन्ही प्रसंगांच्या वेळी पदार्थ तोच असतो नावही तेच असतं पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्थ बदलत जातो.

(चिंतन आदेश दिवाळी अंक २०१२)

11/29/2013

प्रिय मृत्युस..

जिवंतपणी तुला पत्र लिहिणं म्हणजे धैर्याचं काम आहे. अर्थात हे पत्र तुझ्यापर्यंत कोणत्या माध्यमातून पाठवावं अन् ते तुझ्यापर्यंत पोचेल की नाही, याचीदेखिल खात्री नाही. तरीसुद्धा कदाचित मी तुझ्याकडे आल्यावर तुला माझ्या पत्राची आठवण होईल म्हणून हा पत्रव्याप. तुझे स्मरण किंवा तुझी चर्चाही आम्हा पामरांना भयदायक, अशुभ वाटते. पण जिवंतपणी एकदा तुला तुझ्याबद्दलच्या आमच्या भावना सांगाव्यात म्हणून हा खटाटोप. पुन्हा मेल्यावर ‘अभिव्यक्ती’चं स्वातंत्र्यात तुझ्या राज्यात आहे की नाही कोणास ठाऊक?

कसा आहेस रे तू? लपून लपून राहतोस. कधी ‘धप्पा’ करशील अन् तुझ्या ‘राज्या’त घेऊन जाशील ठाऊक नाही. पण कधीतरी तू सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जातोस. आम्ही आपले आमच्याच राज्यात अधिकाधिक ‘जिवंत’ राहण्याचा प्रयत्न करतो. तू आपला आम्हा सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जायचा प्रयत्न करतोस. तुझं राज्य कसं आहे रे? तिथं सगळी माणसं असतील ना, सार्‍यांना वाटतं की तुझ्याकडं आलं की ‘मेलं’ पण ते खरचं मरत असतील का? बरं तू किती मोठा आहेस हे तुलादेखील ठाऊक नसेल. बघ ना, तुझ्याकडे कोणी आला की आम्ही त्याला ‘देव’ झाला म्हणतो. म्हणजे जसं परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं; त्याप्रमाणे तुझ्यास्पर्शाने आम्ही ‘देव’ होतो. शिवाय आम्ही ज्या ‘शांती’ला आयुष्यभर शोधायला प्रयत्न करतो, ती तुला भेटल्यावर आम्हाला मिळते. (अर्थात् तेव्हा ती आम्हाला नको असते) मग तरीसुद्धा तू सर्वांना नकोनकोसा का वाटतो? तुझ्याबाबतीतलं बाबा सारं सारं गूढच आहे आणि त्याची उत्तरं शोधणं हे त्यापेक्षा अधिक मोठं गूढ! एकवेळ सागराची खोली मोजणं शक्य आहे, आकाशाचं अनुमान करणंदेखील शक्य होईल पण तुझा शोध घेणं ‘जिवंत’पणी शक्य होणार नाही.

आम्ही कोणाकोणाला घाबरत नाहीत; फक्त तू सोडून. तू सत्य आहेस. अंतिम सत्य. तू देवत्त्व बहाल करणारा दाता आहेस. कारण आम्ही मरू नयेत म्हणून जगत राहतो. अर्थात तू जगण्याचं बळ आहेस. तू युगायुगांपासून आहेस. तुझ्याठायी कोणताही भेदभाव नाही. रंग, रूप, जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वेष, भूषा-भाषा वगैरे कसले कसलेच भेदभाव असत नाहीत. जगात तू एकटाच असशील की जे तुला आवडतात, त्यांना तू क्षणार्धात आपल्या ‘कवेत’ घेऊ शकतोस. कदाचित तू अमर असावास. कारण जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत तू आहेस. तू आहेस म्हणून आम्हा माणसांना किमान एका ‘भीती’ची तरी जाणीव आहे. त्यामुळे तू अमर रहा, जन्म असेपर्यंत अन् मरेपर्यंत. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर सविस्तर बोलूच!

धन्यवाद

मरेपर्यंत तुझाच,

11/28/2013

आकाशाचं उडण्याचं निमंत्रण स्वीकारा!

तांबडं फुटतं, कोंबडं आरवतं, अंधार संपतो अन् प्रकाशणारा सूर्य उगवतो. शेतकरी रानाकडं जातो, विद्यार्थी ज्ञानाकडं जातो, व्यापारी धनाकडं जातो, अन् माणूस जगण्याकडं जातो. मित्रहो, हे असं युगान्युगांपासून चालत आलेलं जग युगान्युगांपर्यंत चालू राहणार आहे. हे सगळं चालू असतानाच इथं जगणार्‍या प्रत्येक माणसानं  स्वत:च्या विकासाचं, आत्मवैभवाचं स्वप्न बघण्यास काय हरकत आहे?

चला स्वप्नं पाहुयात अन् ती सत्यात आणण्याचा प्रयत्न करूयात. अर्थात् त्यात वास्तवता असायला हवीच. पण आपल्या खिशात फुटकी कवडी नाही अन् हा माणूस स्वप्नं बघायला सांगतो, असं समजत असाल तर आपण निरर्थक जगत आहोत असंच समजा. स्वप्नं बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळं खिशात पैसे असण्याची गरजच नाही. गरज आहे केवळ प्रबळ इच्छाशक्तीची अन् दुर्दम्य आत्मविश्वासाची!

संत तुकाराम महाराजांनी ‘सकाळासी येथे आहे अधिकारी, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हटले आहे. प्रदेशाचा भेदाभेद करणं केव्हाही अमंगळच. मात्र, आपल्या जन्मभूमीचा अभिमान असणं हे मांगल्याचं लक्षण आहे. तरीसुद्धा माझा मराठवाडा म्हटलं की दुष्काळग्रस्त भाग, राजकीय-सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक उदासिनता, उद्योग-धंद्यांनी फिरविलेली पाठ, ऊस तोडणारा कामगार वर्ग, गुणवत्ता नसलेला विद्यार्थी अशी ओळख कशी आणि का निर्माण झाली कळत नाही? सकारात्मक दृष्टी ठेऊन विचार करा.

निसर्गानं फिरविलेली पाठ हा काय तिथं राहणार्‍या लोकांचा दोष आहे? ‘पाणी’ नाही. त्यामुळे विकासाला गती नाही. गतीशिवाय विकास नाही. या न संपणार्‍या चक्राच्या विचारात मराठवाड्यातला ‘माणूस’ अडकत राहतो.  जरा, सुक्ष्म निरीक्षणं केलं तर असं दिसून येईल की अलिकडे परिस्थिती, व्यवस्था अन् काही प्रमाणात निसर्गातही बदल झालेला आहे. आता मनाला अन् मानसिकतेला बदलणं आवश्यक आहे. चला तर आपली मानसिकता बदलूयात!

आता तुम्ही म्हणाल की स्वप्नं बघायचं ठरवलं तर, रोज उठून स्वप्नं काय बघायचं? तेच ते अन् तेच ते! भल्या सकाळी तुम्ही उठायच्या आधी तुमची ‘माय’ रानात जायच्या तयारीत असते. रात्री उरकायला कितीही उशीर झाला तरी घरासाठी धडपडत असते. एका सकाळी लवकर उठून त्या ‘माय’ला थांबवून तिच्या डोळ्यात बारकाईनं बघा, तुमची स्वप्नं तुम्हाला तिथं दिसतील. तिनं आयुष्यभर खाल्लेला खस्ता, तुम्हाला सांभाळण्यासाठी घेतलेले कष्ट तिच्या दोन डोळ्यात दिसतील. तिथंच तुमचं स्वप्नं तुम्हाला दिसेल. ते इथं लिहिण्याची गरज नाही. दिवसभर कष्ट करून रात्री घरी आलेल्या तुमच्या बापाच्या जवळ घडीभर बसा. त्याच्या डोळ्यांत बघा, तुमच्या मागण्या पूर्ण करता करता, घर चालवण्यासाठी त्यानं डोळ्यांतच अडवलेले वेदनेचे अश्रू तिथं तुम्हाला स्पष्ट दिसतील. त्याच अश्रूंत तुमची स्वप्नं तुम्हाला भेटण्याची धडपड करत असतील.

त्या स्वप्नांना हेरा, आत्मभान जागृत करा, मी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला हजार वेळा सांगा. शेवटच्या श्‍वासापर्यंत खूप शिकण्याची, भव्य-दिव्य कर्तृत्त्व गाजवून मोठ्ठं होण्याची जिद्द बाळगा! एवढी जिद्द बाळगलीत तर तुम्ही अर्धं युद्ध जिंकल्यातच जमा आहे. शाळेतल्या अन् कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा आयुष्याच्या शाळेत अधिक शिकायला मिळतं, त्या शाळेत भरती व्हा, पैशांशिवाय! एकदा वैचारिक बैठक पक्की झाली की जिंकणं म्हणजे औपचारिकता ठरते.

लढण्यासाठी तुम्ही एकदा सिद्ध झालात की पुढे सारी सृष्टी तुम्हाला मदत करेल, तीच तुम्हाला कवेत घेईल, या दिशा तुम्हाला रस्ता दाखवतील, आकाश तुम्हाला उडण्याचं आमंत्रण देईल. मग पुण्या-मुंबईची भीती उरणार नाही. पैसे नसल्याची चिंता उरणार नाही. तुमचं पाऊल कोठेही थबकणार नाही. ती पावलं कधीच थकणार नाहीत. त्या पावलांमध्ये हत्तीचं बळ येईल.  मात्र कधीतरी मायची, बापाची आठवण येईल. पण हे सारं तुम्ही त्यांच्यासाठीच करीत आहात हे आठवल्यावर ती आठवण सुद्धा तुम्हाला लढायला बळ देईल.

प्रत्येकाची स्वप्नं वेगळी असतील. कोणी शिकून सवरून मोठा अधिकारी बनण्याची स्वप्नं बाळगत असेल, कोणी पायलट होऊन आपल्या गावावरून विमान उडवण्याचं स्वप्नं पाहत असेल, कोणी चित्रपटाचा हिरो बनण्याचं स्वप्न बाळगत असेल. कोणी नेता होऊन आपल्या गावाला सुधारण्याचं स्वप्नं पाहत असेल. स्वप्नं कोणतंही बघायला हरकत नाही, मात्र ‘त्या’ स्वप्नांवर जिवापेक्षाही अधिक प्रेम करण्याची क्षमता हवी. त्यासाठी प्रामाणिक आणि जीवापाड प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कोणत्याही परिस्थितीत नितीमूल्य, संस्कार, प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका.

कल्पना करा एके दिवशी तुमच्या गावाकडं तांबडं फुटल, कोंबडं आरवल, अंधार संपेल अन् प्रकाशणारा सूर्य उगवेल. शेतकरी रानाकडं जाईल, विद्यार्थी ज्ञानाकडं जाईल. व्यापारी धनाकडं जाईल, अन् माणूस जगण्याकडं जाईल. तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोचला असाल. 

11/26/2013

प्रेम कधीच "भंग' होत नाही!

प्रेम करणं खरचं एक विलक्षण अनुभूती आहे. ती एवढी विलक्षण आहे की आपलं प्रेम कोणी स्वीकारलं अथवा नाकरलं तरीसुद्धा आपल्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होत राहते. मात्र, भोगण्याच्या सुप्त इच्छेलाच जर का प्रेमासारख्या विशुद्ध अन्‌ पवित्र भावनेचे नाव दिले तर मात्र आपणांस प्रेमाचा खरा अर्थच कळला नाही. खरेखुरे प्रेम हे फुलांप्रमाणे असते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला तर ते गंध देतेच, मात्र पायदळी तुडविणाऱ्यांना देखील तोच अन्‌ तेवढाच गंध देते. प्रेम करायचं असेल तर फुलांप्रमाणे करायला हवं. पायदळी तुडविल्यावरदेखील प्रेम करणारं.

आपण कोणावर तरी प्रेम करतो किंवा तसं आपल्याला वाटतं. त्यावेळी आपल्या मनात नेमक्या भावना काय असतात? त्या व्यक्तीवर आयुष्यभराकरिता स्वामित्व हक्क गाजविणं? त्या व्यक्तीचा देह भोगणं? तसं असेल तर प्रेमाच्या परिभाषेत प्रेमानेच आपलं प्रेम तपासून बघा. कारण या साऱ्या भावनांच्या पलिकडेच खरं प्रेम सुरू होतं.   त्या प्रेमाला वास्तवाचं भान असतं. नैतिकतेचं अधिष्ठान असतं. संवाद, सहवास, स्पर्शाची अपरिहार्यता त्यात नसते. आपण काळ्या-पांढऱ्या कातड्यावर किंवा एखाद्या अवयवावर प्रेम करतो का? आसक्ती, वासना अन्‌ भोग यापासून खरं "प्रेम' कैक मैल दूर असतं!

"प्रेमभंग' ही संकल्पना का व कशी रूढ झालेली आहे समजत नाही. कारण प्रेम हे अभंग आहे. प्रेम हे विशाल आहे. तेथे सर्वांना प्रवेश आहे. ते कधीच भंग पावत नाही. प्रेम युगानयुगांपासून चालत आलेलं आहे. नश्र्वर अन्‌ क्षणार्धात नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टी भंग पावतात... भंग पावतात त्या भोगण्याच्या, वासनेच्या क्रूर इच्छा... भंग पावते ती स्वार्थी वृत्ती... एकवेळ देहसुद्धा भंग पावतो. नष्ट होतो. मात्र "प्रेम' कधीच नष्ट होत नाही. अर्थात भंग होणारं प्रेम हे प्रेमच नसतं!

इतरांवर प्रेम करण्याचं सामर्थ्य तुमच्यात असणं हे सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. प्रेम नाकारणं अथवा स्वीकारणं हे या जगातील सोपस्कर आहेत. प्रेमाचं जगच वेगळं असतं. "प्रेमभंग' झाला म्हणून प्रेम(?) मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गांचा अवलंब करणं म्हणजे केवळ वैचारिक क्षुद्रतेचं अन्‌ प्रेमाच्या अनुपस्थितीचं लक्षण आहे. प्रेम कधीही ओरबाडून घेता येत नसतं. ते हळूवारपणानं मिळत असतं. स्वत:च्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होणं अन्‌ त्यामुळे अवघ्या देहाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणं म्हणजे खरं प्रेम असतं. ती अनुभूती भंग कशी पावेल?

11/22/2013

प्रेम करा प्रेम...



प्रेम हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर केवळ प्रियकर अन्‌ प्रेयसी यांचे चित्र समोर उभे राहते. ते तर प्रेम आहेत; पण त्याशिवायदेखील अगणित जागी, साऱ्या चराचरामध्ये प्रेम आहे. प्रेम करणं म्हणजे केवळ देह भोगणं नव्हे तर प्रेम करणं ही विलक्षण अन्‌ अद्‌भूत अनुभूती आहे. ती फक्त अनुभवावी भोगाच्या पलिकडे जाऊन. जेथे दृष्टी टाकावी तेथे प्रेम आहे. अर्थात्‌ दृष्टी टाकण्यासाठी डोळे नाही तर नजर आवश्यक असते. प्रेमाची नजर... 

प्रेम कोणावर करावे? जन्म देणाऱ्या आईवर, घर आवरणाऱ्या ताईवर, संस्कार शिकवणाऱ्या आजीवर, गोष्टी सांगणाऱ्या आजोबांवर, कष्ट करणाऱ्या बापावर, "लढ' म्हणणाऱ्या मित्रांवर, भावावर, मावशीवर, मामावर, माणसामाणसांवर, पशु, पक्ष्यांवर प्रेम करता येतं, करायला हवं.

प्रेम जिवंत माणसावर तर करतातच, पण चैतन्यदायी निर्जिवावरसुद्धा करायला हवं. अंकुराला चैतन्य प्रदान करणाऱ्या काळ्याकुट्ट मातीवर प्रेम करायला हवं. प्राणवायूने अवघ्या मनुष्यजातीला जिवंत ठेवणाऱ्या झाडा-झुडपांवर वेलींवर प्रेम करायला हवं. पायदळी तुडवल्यावरदेखील आपल्या सुगंधाचा धर्म न सोडणाऱ्या फुलाफुलांवर प्रेम करायला हवं. शितलता देऊन शांत करणाऱ्या चंद्र-चांदण्यावर, उडण्याचं निमंत्रण देणाऱ्या निळ्याभोर नभावर, प्रकाशात नेणाऱ्या नभांगणातील सूर्यावर, साऱ्यांचे वजन पेलणाऱ्या पृथ्वीवर, पंखांमध्ये बळ आणून गगनभरारी शिकविणाऱ्या पक्षांवर साऱ्या साऱ्यांवर प्रेम करायला हवं. इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर, पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या वीरांवर, दोन टोकांना जोडणाऱ्या सेतूंवर, घराची ऊब देणाऱ्या निर्जिव भिंतींवर, शिस्त शिकविणाऱ्या घड्याळाच्या टिकटिकवर, कोसळतानाही आपलं सौंदर्य तसूभरही ढळू न देणाऱ्या पाण्यावर, धरणीला अन्‌ आकाशला जोडणाण्या आभास निर्माण करणाऱ्या क्षितीजावर, इंद्रधनूच्या सप्तरंगावर, शांतपणे वाहणाऱ्या जलौघावर, उसळणाऱ्या लाटांवर, जीवनसत्त्व देणाऱ्या फळांवर अशी अगणित अगदी सारीच स्थळे आहेत ज्यावर प्रेम करायला हवं.

आपल्या आत राहून आपली दु:खं समजावून घेऊन; शेवटी हवं तेव्हा आपलं दु:ख घेऊन जाणाऱ्या स्वत:च्या अश्रूंवरदेखील प्रेम करायला हवं. कष्ट केल्याची पावती देणाऱ्या आपल्या स्वत:च्या घामावरदेखील प्रेम करायला हवं. अन्‌ घाम का गाळायचा हे सांगणाऱ्या आपल्या आतल्या इवल्याश्या हृदयावरदेखील प्रेम करायला हवं. स्वत:च्या प्रयत्नांवर, स्वत:च्या यशावर, स्वत:च्या प्रगतीवर, स्वत:च्या स्वत:वर अर्थात प्रेमाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. स्वत:वर प्रेम करायला हवं.

एकदा का डोळ्यांना नजर प्राप्त करून दिलीत की सारीकडे प्रेम दिसू लागेल. निरामय, निस्सीम, निरागस प्रेम. मग बघा सारी सृष्टी, अवघं विश्र्व, सारी माणसंदेखिल तुमच्यावर प्रेम करत आहेत, याची अनुभूती घेता येईल. चला, त्या विलक्षण अनुभूतीच्या दिशेनं जाऊयात, "प्रेम करूयात प्रेम' साऱ्यांवर...

मधुचंद्राच्या पूर्वसंध्येला नववराला नववधूने लिहिलेले पत्र... ‘प्रिये...’














प्रिये,

तुला आठवतं तुला बघायला मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा तुझा तो लाजरा, बुजरा, अल्लड अन अवखळपणा. तुला माहितेय लाजाळूचं एक झाड असतं. त्याला सुंदर फुलं येतात. स्पर्श होताक्षणी ती फुलं आपल्या पाकळ्या मिटून घेतात. तू तर स्पर्शाशिवायच पाकळ्या मिटलेल्या लाजाळूच्या झाडासारखी त्यावेळी भासत होतीस.

आता नुकतेच तू उंबरठा ओलांडून आत आलीस. उंबरठ्यावरचे शुभ्र धान्याचे माप ओलांडलेस. तुझ्या नाजूक अस्तित्वानं ते मापसुद्धा हरखून गेलं. त्यातच त्यानं तुझा कोमल पदस्पर्श अनुभवला. काल कदाचित त्या मापाला या घरात राहण्याचं कृतार्थपण जाणवलं असेल. म्हणूनच त्यानं त्याच्यात सामावलेली समृद्धी कायम आपल्या घरात लोटण्याचा निश्‍चय केला असेल.

11/20/2013

प्रिय हृदयास....

 तू किती छोटा आहेस रे? अगदी लहान बालकाच्या हातात मावेल एवढासा? पण तुझ्यात केवढं सामर्थ्य आहे! तू रक्ताची निर्मिती करून आम्हा माणसाची सारी अवयवं जिवंत ठेवतोस. तर प्रेमाची निर्मिती करून आम्हा माणसांना जिवंत का रहायचं ते सांगतोस. तू सतत धडधडत राहतोस. तू सतत निर्मिती करीत राहतोस. अगदी आमचे सारे अवयव झोपलेले असताना देखील तू जिवंत असतोस. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मात्र आमचा जिवंतपणा संपतो आणि हे शरीर निरुपयोगी ठरून जाळलं जातं, गाडलं जातं किंवा पुरलं जातं!

तू निर्माण केलेल्या रक्तामुळेच आमचं डोकं चालतं, पण आम्ही पामर कधी कधी तुझ्याऐवजी आमच्या डोक्याचं ऐकतो. ज्याला तूच रक्तपुरवठा करून कार्यरत ठेवलेलं असतं. बाकी सार्‍या अवयवांच्या बाबतीतही तसचं आम्ही तुझे कधीच ऐकत नाही. तुझा सल्ला हा प्रेमाचा असतो. ममत्त्वाने भरलेला असतो. तू कधी आम्हाला चुकीचं अथवा खोटं मार्गदर्शन करणार नाहीस असा विश्‍वास आम्हाला असतोच असतो. त्यामुळेच तर एखादी वाईट घटना आमच्या हातून घडून गेली की ‘तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं’ असं आम्हांस वाटून जातं.

खरंच अरे हृदया जर आमच्या सार्‍या शरीराऐवजी केवळ तूच असलास तर? फक्त तू बदामाच्या आकाराचा, प्रेमाच्या रंगाचा फक्त तू! हृदय... तिथं मग सारी हृदयं सारखीच असतील. तिथं कोणताही भेदभाव असणार नाही. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय तर सोडाच पण अगदी लिंगाचा, रूपाचा अथवा सौंदर्याचासुद्धा भेद असणार नाही. ज्याला हवं तो हव्या त्या हृदयावर प्रेम करू शकेल. लिंगभेद नसल्याने शरीरसंबंध आणि त्याद्वारे येणार्‍या वासनेचाही प्रश्न उरणार नाही. फक्त हृदय असल्याने  शरीर चालविण्यासाठी रक्ताच्या निर्मितीचीसुद्धा गरज उरणार नाही. ज्यामुळे उदरनिर्वाहाची देखील गरज असणार नाही. कोणाला कशाचीच गरज नाही. अगदी प्राणवायूची देखील नाही. त्यामुळे रस्ते असणार नाहीत, वाहनं असणार नाहीत, अगदी कशाकशाचीच गरज उरणार नाही. फक्त हृदयं, बदामाच्या आकाराची... त्यांना कोणतेही अवयव असणार नाहीत. हवेत, पाण्यात कोठेच कसलेच प्रदूषण असणार नाही. सारीकडे शुद्ध अन् पवित्र प्रेमाचे वारे वाहतील. सारे हृदयं प्रेमाच्या सागरात डुंबून जातील. तिथं जन्म असणार नाही, मृत्यु असणार नाही. अगदी आकाशातील चांदण्यांसारखं जग. पण या जगात चंद्रसुद्धा असणार नाही. फक्त हृदयं. आणि एका हृदयाचं आयुष्य संपलं की त्याचा मोठा स्फोट होणार आणि त्यातून असंख्य हृदयं निर्माण होणार! प्रेम करणारी, शुद्ध, पवित्र अन् निर्मळ...

हृदया, जा तुला ज्यानं निर्माण केलं त्याला सांग की फक्त मलाच ठेवा. माणसाच्या रूपाचं प्रतिक बनून प्रेमाचा सागर निर्माण करण्यासाठी मला संधी द्या म्हणून त्याला सांग. मग बघ आम्ही फक्त तुझंच ऐकू... जगात सारीकडे शांतता असेल, प्रेम असेल.... फक्त प्रेम, प्रेम अन् प्रेम...!!!

बजावू माहिती अधिकार...


काळ बदलतो, नातं नाही...



फक्त प्रयत्न....


तुझ्या रक्ताचा थेंब...


Related Posts Plugin for WordPress, Blogger...