12/27/2014

प्रशासकीय संस्कार

पले राष्ट्र हे विविधतेत एकता साधणारे राष्ट्र आहे. आपल्या देशात विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक वास्तव्य करतात. एवढी सारी विविधता असूनदेखील आपण सारे परस्परांचे बंधू आहोत, अशी प्रगल्भ विचारसरणी आपण निर्माण केली आहे. आणि हा बंधुभाव आपण प्रत्यक्ष अंगीकारलेला देखील आहे. हा आपल्यावर झालेल्या संस्काराचाच एक भाग आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श दिनक्रम आवश्यक असतो. भारतातील विविध धर्मांनी आदर्श दिनक्रम,  दाखवून दिला आहे.  साधारणपणे यालाच संस्कार असे संबोधता येऊ शकेल.  संस्कार हा मूळ हिंदी भाषेतून आलेला शब्द आहे. सांस्कृतिक वारसा आणि त्याचे जतन असाही अर्थ संस्कार या शब्दातून प्रतीत होतो. माणसाचे आयुष्य हे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्टीने विकसित करण्याकरिता संस्कार मोलाची भूमिका बजावत असतात. जीवनातील काही मूलभूत अत्यावश्यक अशा मूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच संस्कारांची निर्मिती आणि त्यांचा विकास झालेला आहे. थोरांचा आदर करावा, सत्य बोलावे, सर्वांचा सन्मान करावा अशा प्रकारच्या काही मूल्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

अलिकडे अनेक क्षेत्रांमध्ये हळूहळू संस्कार ही संकल्पना रूढ होत आहे. आज  संस्कार या संकल्पनेकडे व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकात प्रशासन अधिक गतिशील, पारदर्शक आणि लोकसहभागी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातही ‘संस्कार’ ही संकल्पना राबविता येऊ शकेल. या संकल्पनेला ‘प्रशासकीय संस्कार’ असे संबोधता येऊ शकेल. शासकीय सेवेत सध्या कार्यरत असणार्‍या आणि विशेषत: नव्याने येऊ इच्छिणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अशा संस्कारांचे संस्करण करता येऊ शकेल. हे प्रशासकीय संस्कार काय असतील याविषयी चर्चा करूयात.

सर्वांवर प्रेम करा

प्रेम या संकल्पनेकडे अधिक व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. प्रेम हे केवळ दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच असते असे नाही, तर कोणत्याही दोन गोष्टींमध्ये निरपेक्ष प्रेम असू शकते. येथे प्रेम हे अलौकिक अर्थाने अभिप्रेत आहे.

पोथी पढ पढ जग मुआ। 
पंडित भया न कोई॥
ढाई आखर प्रेम के। 
पढे सो पंडित होई॥

कितीही शास्त्रं वाचली, मनुष्य ज्ञानी झाला, पंडित झाला तरी त्याचा उपयोग नाही. ज्याने प्रेमाची अडीच अक्षरे वाचली तोच खरा पंडित होय. असे संत कबीर आपल्या एका वचनात म्हणतात.


शासकीय कार्यालयांमध्ये दररोज विविध कामांच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचा वावर असतो. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी काम घेऊन कार्यालयात येणार्‍या व्यक्तीला प्रेमाने, आपुलकीची वागणूक मिळत नाही.  त्यांना ‘बसा, तुमचे काय काम आहे?’ अशीही चौकशीही बर्‍याचदा होत नाही. या पार्श्वभूमीवर कार्यालयात आलेल्या नागरिकांवर बंधुभावाच्या भावनेने पाहून त्यांच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. कवी रूमी यांनी म्हटले आहे, ‘‘प्रेम शोधणे हे तुमचं काम नाही. पण स्वत:मधील प्रेमाला विरोध करणार्‍या सर्व गोष्टींचा नाश करणे हे तुमचं काम आहे.’’ ज्याप्रमाणे आपण आपल्या घराबाहेर आपल्या कुटुंबातील सदस्यांना  वागणूक देतो, तसेच वर्तन सामान्य नागरिक भेटल्यावर करणे हा एक प्रशासकीय संस्कारच आहे. याशिवाय आपले सहकारी, आपले वरिष्ठ, आपले कनिष्ठ यांना देखील अशाच प्रकारची वागणूक देणे आवश्यक आहे. त्यामुळे जनमानसामध्ये शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी मदत होईल आणि पर्यायाने शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. प्रशासनातील सारीच यंत्रणा ज्यादिवशी अशा-प्रकारचा बंधुभाव आणि प्रेमभाव सर्वांप्रती दाखवेल त्यादिवशी आपण खर्‍या अर्थाने विकसित होऊ. सर्वांवर प्रेम करणे हा प्राथमिक ‘प्रशासकीय संस्कार’ असू शकेल. तो प्रत्येकाने स्वत:मध्ये रूजविणे नितांत आवश्यकता आहे.


कामाप्रती निष्ठा













आपण ज्या आस्थापनेमध्ये, ज्या यंत्रणेमध्ये जे काम करतो; त्या कामाप्रती आपली निष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे. कामातून मिळणारा मोबदला हा उदरनिर्वाह असतो; तर प्रत्यक्ष केलेले काम हा व्यक्ती विकास असतो. जो मनुष्य आयुष्यभर केवळ जबाबदारी म्हणून काम करतो; तो आयुष्याच्या उतारवयात आयुष्यभर काहीच न केल्याची खंत व्यक्त करत असतो. जेवढे अधिक काम तुम्ही कराल, तेवढे अधिक तुम्हाला शिकायला मिळेल. मग भलेही नव्याने काही शिकताना अनावधनाने चूक झाली तरी चालेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘एखादा दिवस जर तुमची एकही चूक झाली नाही किंवा तुम्हाला एकही संकट आले नाही, तर समजा की तुम्ही चुकीच्या वाटेने प्रवास करीत आहात.’’ म्हणून प्रशासनात काम करत असताना स्वत:च्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी निष्ठेने, सचोटीने काम करणे हा ही एक महत्त्वाचा प्रशासकीय संस्कार म्हणून संबोधता येईल.

तंत्रज्ञानाचा वापर

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण सध्या वावरत आहोत. संगणकाचा, तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामात अधिकाधिक उपयोग करून प्रशासन गतिशील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ई-ऑफिसच्या, लेस पेपर ऑफिसच्या दिशेने आपली घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्य झाला आहे. पूर्वी ज्यांना लिहिता, वाचता येत नव्हते; त्यांना निरक्षर संबोधले जात होते. लवकरच संगणक साक्षर नसणे म्हणजे निरक्षर असे म्हटले जाईल. प्रशासन सुलभ पद्धतीने आणि गतीने कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा-संगणकाचा वापर हा ही प्रशासकीय संस्कार म्हणून समोर आणता येईल.

शिकण्याची आवड

तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे संस्कार करतानाच तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली पाहिजे. तसेच दैनंदिन कामात सुलभता येण्यासाठी सहकार्‍यांकडून, कनिष्ठांकडून, वरिष्ठांकडून जे जे शिकायला मिळेल; ते ते शिकत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठमोठ्या रूग्णांवर हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टर्सना चशवळलरश्र झीरलींळींळेपशी म्हणून संबोधले जाते. कारण ते ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत असतात. शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरूच असते. ती आवश्यकही असते. केवळ त्यात आवड दाखविली की आपल्याला त्यात अधिक रस निर्माण होईल. शिकण्याची आवड प्रत्येकाला असते. मात्र, आपण काही नवीन शिकले तर आपल्याला अधिक काम करावे लागेल, अशा भ्रमात राहून आपण स्वत:लाच अधोगतीकडे घेऊन जात असतो. त्यामुळे शिकण्याची आवड हा एक ‘प्रशासकीय संस्कार’ होऊ शकतो.

कार्यालयीन स्वच्छता अनेक कार्यालयात अधिकारी कर्मचार्‍यांची भेट घेण्यासाठी अभ्यागतांना ताटकळत उभे राहावे लागते. बर्‍याच कार्यालयात काम करणार्‍यांनी लक्ष घालून आपले कार्यालय स्वच्छ, टापटीप, प्रसन्न ठेवले पाहिजे. ज्यामुळे कामातील उत्साह वाढण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे स्वच्छता हा ही एक प्रशासकीय संस्कार आवश्यक आहे.

नैतिक आचरण

नैतिक आचरण हे आपल्या वैयक्तिक निर्णयाशी संबंधित असते. जेव्हा कृती व्यवस्थेच्या मूल्यांशी सुसंगत असते, तेव्हा ते आचरण नैतिक असते. उत्तरदायित्त्व, पारदर्शीपणा आणि गती ही प्रशासनाची काही मूल्ये आहेत. आपला प्रत्येक कार्यालयीन निर्णय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येक निर्णयाला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. ज्यावेळी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक अशा प्रकारची दृष्टी ठेवेल त्यावेळी सगळीकडे समृद्धता पसरलेली पाहायला मिळेल. यामुळे ‘नैतिक आचरण’ हा ही एक प्रशासकीय संस्कार गृहित धरता येऊ शकेल.

प्रशासकीय संस्कार समजून घेतल्यावर हे सारे संस्कार कोणी कोणावर कोठे करावेत असा प्रश्‍न उपस्थित राहणे नैसर्गिक आहे. अर्थातच यातील सर्वच किंवा काही संस्कार अनेकजण अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलात आणत असतील. त्यांचे कार्य कौतुकास्पदच आहे. हे संस्कार शासकीय कार्यामधील वरिष्ठांनी आपल्या सहकार्‍यांवर करणे अपेक्षित आहे. प्रसंगी आपण स्वत: आपल्या सहकार्‍यांसह याविषयी चर्चा करू शकता. अर्थातच त्यासाठी प्रत्यक्ष वर्गखोलीतून हे संस्कार करण्याची आवश्यकता नाही. प्रवासात, जेवणाच्या सुटीत जेथे शक्य असेल आणि जेथे अगदी अनौपचारिक वातावरण असेल अशाच वातावरणात याविषयीची चर्चा अधिक फलदायी ठरू शकेल. हे संस्कार एका रात्रीत प्रत्यक्षात अवतरतील असे नाही. तर हळूहळू एक-एक करून अंगिकारणे ही सुप्रशासनाची वाटचाल ठरेल, हे नि:संशय!

(या लेखासाठी मानवशास्त्रज्ञ अनुज घाणेकर यांनी सहाय्य केले आहे.)

(यशदा यशमंथन जानेवारी-मार्च २०१४ मध्ये प्रकाशित)

12/26/2014

तिचे दुःख पिणारा तो…


ती त्याला कधीतरी भेटलेली असते. आणि त्याच भेटीमुळे तो तिच्या मनात घर करून राहिलेला असतो. नकळतपणानं तो तिच्या अगदी खोलवर आत तो विराजमान होतो. पण ती कधी व्यक्त होत नाही. त्याला आतल्या आत दाबून टाकते. त्याचा विचार आतच ठेवते. अगदी इच्छा असतांनाही त्याला तसेच ठेवते, मनाच्या खोल गाभार्‍यात. तो अस्वस्थ होतो. अगदी अचल होतो. तो आतून ओरडून सांगतो, ‘‘फक्त एक संधी दे मला, तुझे दु:ख दूर करण्याची, तुझ्या वेदना संपवून टाकण्याची, गालांवरची... मी येऊन निघून जाईल, कधीच न येण्यासाठी’’ ती ‘नाही’च म्हणते. अगदी शेवटपर्यंत ‘नाही’. तो खूप प्रयत्न करतो. अगदी अखेरपर्यंत. मात्र, ती कठोर होते. ती म्हणत तू आतच रहा. कधीच बाहेर येऊ नकोस. तिच्या ‘नकारा’वर त्याला समाधान मानावे लागते. तिच्या ‘नकारा’समवेत तो जगत राहतो. तरीदेखील तो तिच्या वेदनांशी, तिच्या दु:खांशी समरस होऊन जातो. तो आतल्या आत तिच्याशी समरूप होण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला शक्य तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कधीच त्याला जवळ येऊ देत नाही. 

एक दिवस एक अवखळ क्षण तिच्या आयुष्यात येतो. त्या अनामिक, अनोळखी, अवखळ क्षणी ती डोळे गच्च मिटून घेते. आणि त्याला आठवण्याचा प्रयत्न करते. अगदी मनापासून. तिच्या दु:खांचा, वेदनांचा तो पराकोटीचा परमबिंदू असतो. अशावेळी तिलाही तो हवाच असतो. पण ती त्याला काहीच बोलत नाही. तिच्या मौनाची भाषा तो चपखलपणानं जाणतो. आणि सारी बंधनं झुगारून देतो. तिच्या दु:खांचा नाश करण्यासाठी तो तळमळत तळमळत तिच्याही नकळत तिच्या गालांवर अगदी अलवारपणे येतो. तिचीच वेदना पिऊन, तीच वेदना दूर करण्यासाठी तो अनावर होतो. तिची दु:ख दूर करण्यासाठी तो तिचेच सांत्त्वन करीत करीत निघून जातो, दूर कुठेतरी पुन्हा न भेटण्यासाठी... पुन्हा कधीच न भेटण्यासाठी... तिच्या अवघ्या शरीरभरावरून प्रेमानं स्पर्श करीत तो निघून जातो. शेवटी तिच्या पदांना स्पर्श करत, तो धरणीशी एकरूप होतो. 
तिचं दु:ख गाडून टाकण्यासाठी. पुन्हा कधीच तिला न भेटण्यासाठी... 

हे वेडं जग तेव्हा तिला ‘रडू नकोस’ म्हणतं. 
अन् हेच वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं... 
हे वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं...

12/15/2014

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

परवाचे तुझे पत्र मिळाले. ते पत्र केवळ पत्र नव्हते तर भावनांनी ओतप्रोत वाहणारा जलौघ होता. ते वाचून मी खरेच तुझ्या भावनांच्या प्रेमात पडले. अर्थात याचा अनुभव मी यापूर्वीच घेतला होता. त्यादिवशी तुझा ओठ थरथरत होता. तुझे शब्ददेखिल हरवले होते आणि मी समोर बसले होते. तू मला म्हणालास ’तुम्ही मला आवडता’ आणि मी म्हणाले उद्या सांगितले तर चालेल का? त्यानंतर दोन दिवस आपण दोघंही या जगात नव्हतो. तू स्वप्नात जगत होता आणि मी वास्तवात कसे जगावे याचा विचार करत होते. नंतर मी तुला मी माझा नकार कळविला.

तुझा अल्लड, अवखळ, निरागस स्वभाव मला समजत नाही असे तुला वाटते का? तुझ्या डोळ्यातील पवित्र अन मंगल भाव मी जाणत नाही असे तुला वाटते का? तुझ्यासाठी म्हणून सांगते स्त्रीला इश्वराने एक अशी शक्ती दिली आहे की ज्यावरुन ती पुरुषाच्या एका नजरेतून त्याच्या मनातील भाग ओळखू शकते. आपण तर जवळपास वर्षभरापासून एकमेकांना ओळखतो. मर्यादा पाळण्याचे तुझ्याकडे विलक्षण सामर्थ्य आहे. जिंकण्याची जिद्द तुझ्याकडे आहे. पराभव स्विकारण्याचं मोठं मन तुझ्याकडे आहे.

म्हणूनच तुला सांगते स्वप्नांचे जग सोडून आपणांस या जिवंत जगात जगायचे आहे. इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेले बंधने पाळणे हे आपले कर्तव्य नाही का? माझे तुझ्यावर प्रेम आहेसुध्दा आणि नाहीसुध्दा! तुला जर मी भोगण्यासाठी हवी असेल तर ते या जन्मात शक्य नाही. कारण जगातील कोणतीही स्त्री भोगल्यावर तुला तो आनंद मिळू शकेल.

मात्र तुला प्रेमासाठी त्यागाची अन समर्पणाची भावना स्वतःमध्ये रुजविण्याची गरज वाटत असेल अन तेवढी तुझ्यात पात्रता असेल तर मी तुझीच आहे. प्रेमासाठी तू माझा त्याग करायला तयार आहेस का? या व्यवस्थेच्या भिंतीत जगताना मी तुला काहीही देऊ शकत नाही. म्हणूनच माझा ’नकार’ तुझ्याकडे दिला आहे. त्याच्यावरसुध्दा माझ्याइतकेच प्रेम कर.

आपण एकत्र आलोच नाहीत म्हणून काय झाले. आपण युगानयुगापर्यंत भेटलो नाही म्हणून काय झाले. खरे अन पवित्र प्रेम त्याग, समर्पित भावना यांच्यासह सहवास, संवाद यांच्यापलिकडची अनुभूती असते. त्या अनुभूतीला खरेच नाव नाही. ती भावना शब्दातीत आहे.

हे माझे शेवटचे पत्र आहे. मला विश्वास आहे. तू विवेकी आहेस. मला नक्कीच समजून घेशील. या दिसणा-या जगात जरी आपण भेटू शकलो नाही. तरी इथलं जगणं झाल्यावर त्या न दिसणा-या जगात आपण नक्की भेटू!

तुझी न होऊ शकणारी,

12/10/2014

जेव्हा मन प्रेमात असतं!


12/09/2014

...पण कोणी आतला आवाज ऐकेल का?


नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूला त्यांनी विचारले, ‘देवा,  माणसाचा जगात सर्वांत जवळचा मित्र कोणता?’

श्रीविष्णूंनी मिष्किल हास्य करीत म्हटले, ‘नारदा, आतल्या आवाजाला विचार?’ नारदमुनींना काही उलगडा होईना. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, ‘अरे, नारदा माणसाचा आतला आवाज म्हणजेच ‘आत्मा’ त्याचा सर्वात जवळचा मित्र असतो. तो गेला की शरीर थांबते.’ नारदमुनी भगवंतांना अडवत म्हणाले, ‘‘पण तो त्याचा आवाज ऐकत नाही. ना!’ अन् भगवंतांचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच... (Continue Reading)

12/08/2014

'धैर्य', 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा!

तुमच्याकडे प्रचंड "धैर्य' आणि तेवढीच 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा. नसता, प्रेमाच्या भानगडीतच पडू नका!

जगभरातील तमाम प्रेम करणारे आणि प्रेम मिळविणारे खूप नशीबवान असतात. प्रेम करण्यासाठी आणि मिळविण्यासाठी तसेच मिळालेलं प्रेम स्विकारण्यासाठी स्वत:च्या ठायी सामर्थ्य असावं लागतं. मग प्रेम निभावणं, लग्नाच्या बेड्यात अडकणं, शरीरानं जवळ येणं या साऱ्या लौकिकार्थाने क्षुल्लक गोष्टी आहेत. जगातील साऱ्या पुरुषांना कोणतीही स्त्री भोगल्यावर एकाच प्रकारचं सुख मिळतं. तर साऱ्या स्त्रियांनाही कोणत्याही पुरुषाकडून एकाच प्रकारचं सुख मिळतं. त्यामुळे 'भोगण्या'पेक्षा खऱ्याखुऱ्या प्रेमाला अधिक महत्व द्यायला हवं.

प्रेम करण्यासाठी प्रेम करणाऱ्याच्या ठायी प्रचंड धैर्य, मोठा संयम आणि स्थिर चित्त असावं लागतं. प्रेमात पडल्यावर वाट पाहणं, उतावीळ न होणं या गुणांना आत्मसात करावं लागतं. तसेच आजूबाजूच्या जगाचं भानही ठेवावं लागतं. बऱ्याच वेळा नव्हे प्रत्येक प्रेमाच्या बाबतीत आपल्याला असं वाटत असतं की आपण जे करत आहोत, ते कोणालाच ठाऊक नसतं.

आपण जे करत असतो ते ठाऊक नसलेलं आपल्या आजूबाजूला कोणीच नसतं. सगळ्यांना सगळं ठाऊक असतं आणि तसं झालं नाही तर नक्की समजा की तुम्ही प्रेम हे वरवरचं आहे, मनापासूनच नाही! 

एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर तिच्यासमोर व्यक्त होण्यासाठी मोठं धैय लागत असतं. तिला 'तू मला आवडतेस' एवढं साधं वाक्‍य म्हणायला जगातील सारी शक्ती खर्ची पडल्यासारखं त्याला वाटत असतं. याशिवाय तिच्याकडून आलेली प्रतिक्रिया पचवायला आणखी धैर्य. अर्थातच ती 'हो' मध्ये असेल तर जगातील सारा आनंद आपल्या वाट्याला आल्यासारखं वाटतं. तर 'नकार'आला तर तो पचवायलाही धैर्यच लागतं.


प्रेमात यश आलं आणि एकत्र येण्यात पुढे काही संकटं आली तर पुन्हा त्यांच्यावर मात करायला हिम्मत लागते. अन्‌ नकार आला तर न कोसळता उभं राहण्यासाठी मोठं बळ लागतं.

त्यामुळे जगभरातील भावी 'प्रेमवीरां'ना एवढचं सांगावसं वाटतं की, तुमच्याकडे प्रचंड "धैर्य' आणि तेवढीच 'हिम्मत' अन संयम असेल तरच प्रेमात पडा. नसता, प्रेमाच्या भानगडीतच पडू नका!

11/30/2014

ब्लॉग कसा लिहावा

प्रत्येकात एक उत्तम लेखक दडलेला असतो. प्रत्येक माणसानं जेवढं आयुष्य जगलं आहे तेवढ्याच आयुष्यावर एक कादंबरी होइाल एवढं मोठं असतं. आता हेच बघा ना, आपण स्वत: कसे जगलो? आपल्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे विवाहसोहळे, आपण नोकरीसाठी दिलेली मुलाखत किंवा व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात या साऱ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात. त्याला शब्दांच्या माळेमध्ये गुंफून फुलांची सुंदरशी माळ पाहणाऱ्याला मोहित केल्याशिवाय राहणार नाही.

कधी-कधी आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की आपण काहीतरी लिहावं. लिहिलेलं कोणीतरी वाचावं. वाचून प्रतिक्रिया द्यावी. परंतु त्यासाठी आपल्याला योग्य व्यासपीठ कोण उपलब्ध करून देणार? आपलं लेखन कोण वाचणार? त्यावर प्रतिक्रिया तर दूरची गोष्ट, असं आपल्याला सतत वाटत रहातं. परंतु हो, हे शक्‍य आहे. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता तुमचं स्वत:चं लेखन जगासमोर अगदी अवघ्या जगासमोर मांडू शकता. त्यासाठी आपल्याकडे केवळ एक संगणक आणि इंटरनेटची जोडणी असली की झालं. मग तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तरीही काही अडचण नाही. चला तर मग या साऱ्या गोष्टी कशा करायच्या हे शिकून घेऊयात.


Official Definition of Blog

A blog (a truncation of the expression weblog) is a discussion or informational site published on the World Wide Web and consisting of discrete entries ("posts") typically displayed in reverse chronological order (the most recent post appears first).


शिकण्यापूवी 
जगात गुगल हे  Searching च्या लोकप्रिय सेवेसह, इमेल, युट्युब, गुगल प्लस आदी सुविधा पुरविते. त्यामध्ये ब्लॉगिंग सेवेचाही समावेश आहे. गुगलच्या सेवा लोकप्रिय आणि तुलनेने अधिक विश्‍वसनीय असल्याने गुगलच्या सेवा वापरून ब्लॉग तयार करण्यासाठी ब्लॉगस्पॉट  या साइटचा वापर करून ब्लॉग कसा तयार करायचा हे येथे सांगितले आहे. गुगलशिवाय वर्डप्रेससारख्या अन्य असंख्य सेवाही उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी ब्लॉग तयार करण्यचीा प्राथमिक प्रक्रिया ही सारखीच आहे. त्यामुळे कोणतीही एक प्रक्रिया शिकल्यास अन्य ठिकाणी सहज ब्लॉग तयार करता येणे शक्‍य आहे.



चला ब्लाग तयार करू या...

  1. ब्लॉग तयार करण्यासाठी तुमच्याकडे ज्याला इंटरनेटची जोडणी केलेली आहे असा एक चांगला संगणक असणे आवश्‍यक आहे. तसेच जीमेलचा इमेल आयडी असणे आवश्‍यक आहे. तो नसल्यास तुम्ही केवळ काही मिनिटांत तो तयार करू शकता. त्यासाठी येथे क्‍लिक करा. (www,gmail.com) 
  2. आता blogger.com ही साइट ओपन करा. तेथे आपला जीमेलचा इमेल आणि पासवड द्यावा. 
  3. आता आपणांस जी स्क्रिन दिसेल तिच्या डाव्या बाजूला New Blog अशी स्क्रीन मिळेल. तेथे क्‍लिक करा. 
  4. आता समोर केवळ तीन जागा भरणे आवश्‍यक आहे. एक Title (तुमच्या ब्लॉगचे टायटल जे ब्राऊजरच्या वर निळ्या पट्टीत दिसेल), Address (तुमचा ब्लॉगचा पत्ता) and Template (तुमच्या ब्लॉगची डिझाइन) बस्स या तीन जागा भरून आपण Create Blog म्हणालात की झाला तुमचा ब्लाग तयार! 


माहिती असायला हवी अशी माहिती... 
1) ब्लॉग तयार करण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. तसेच कोणताही खच येत नाही.

2) एका इमेल आयडीवरून कितीही ब्लॉग तयार करता येतात. एका ब्लागवर कितीही लेख लिहिता येतात. एका लेखात कितीही शब्द, फोटो, व्हिडीओ वापरता येतात. तसेच ब्लॉग कधीही आपोआप डिलीट होत नाही.


पुढील लेखात
सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगमध्ये काय फरक आहे?
ब्लॉगमध्ये लेख कसे लिहायचे?
ब्लॉगचा प्रचार कसा करायचा?
ब्लॉगवरून पैसे कसे कमवायचे?

11/27/2014

सुरुवात स्वत:पासून....

दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले,  "समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' 

दारावरची बेल वाजली. रखमाने दार उघडले. 

दारात कडक पांढरे कपडे परिधान केलेले काही नेत्यासारखे दिसणारे कार्यकर्ते होते.
कार्यकर्त्यांना अदबीनं विचारलं, ""बाईसाहेब आहेत का घरात?''
रखमानंही तेवढ्याच अदबीनं उत्तर दिलं, ""व्हय, या, या!''

***

बाईसाहेब बैठकीतच बसल्या होत्या. घर तसं मोठ्ठं होतं. घर कसलं बंगलाच होता तो. बाईंनी भाषणं करून करून कमावलेला. पण घरात रखमा, बाई आणि एक कुत्रं यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. चार-पाच नोकर होते पण ते मुक्कामी नव्हते. 


बाईंची एक मुलगा देशाबाहेर नोकरी करत होता. त्यांची भेट फक्त वर्षातून एकदाच होत होती. तीही काही अगदी बोटावर मोजण्याएवढ्या शब्दांनी. त्याला काही कमी नव्हतं. बाईंचंही बरं चाललं होतं. देण्या-घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. ना पैसा, ना प्रेम! शिवाय बाईंचा दुसरा मुलगा बाईंच्या बरोबरविरूद्ध होता. खराखुरा समाजसेवक. विद्यार्थी होता पण समाजाबद्दल तळमळ होती. त्यामुळेच त्यानं समाजकार्यात पदव्युत्तर पदवी मिळविली होती.

***
 
प्रवेशाची प्रतिक्षा खोली ओलांडल्यावर बाईंचे दर्शन घडले. बाईंनीही बसल्याजागीच स्वागत केले आणि "बसा' असा आदेश फर्मावला. प्रथेप्रमाणे रखमा पाहुण्यांसाठी लिंबूशरबत आणण्यासाठी गेली.
सर्वांनी नमस्कार-चमत्कार केले. 


एक कार्यकर्ता बोलू लागला, "बाईसाहेब गेल्यावेळी वर्धापनदिनानिमित्त आपण जबरदस्त बोलला होता. त्यामुळे यंदाही आपणच यावं अशी आमची विनंती आहे.'' 


बाईसाहेब आनंददायी स्वरात म्हणाल्या, ""आपल्याला ठाऊक असलेलं लोकांना सांगण्यात काय हरकत आहे. कधी आणि कुठं सांगा!'' 


कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण बाई येणार म्हटलं की कार्यक्रम हाऊसफुल्ल. बाई काहीतरी वेगळं बोलणार म्हणून मिडियावालेपण येणार. संस्थेच्या वर्धापनदिन उत्साहातच होणार.

कार्यकर्त्याने तारीख वगैरे औपचारिकता पूर्ण केली. बाई म्हणाल्या, ""बाकी मानधनाचं पूर्वीप्रमाणेच. काय आहे मी ते स्वत:कडे घेत नाही. संस्थेला दान करते! तेवढंच समाजकार्य''
कार्यकर्ते मनातल्या मनात बाईंच्या थोरपणाचे कौतुक करू लागले. तेवढ्यात रखमा लिंबूशरबत घेऊन आली.
बाईंच्या उत्साहाला चेव फुटला, ""आता हेच पहा ना, ही रखमा आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून काम करतेय. पण तिला आम्ही कधी परकी मानलेच नाही.''

कार्यकर्ते अधिक खूष झाले आणि शरबत पिऊन पुढील तयारीसाठी बाहेर पडले.
***
बाईंच्या मनात विचारांची चक्रे सुरू झाली. कोणत्या विषयावर बोलावं, बाईंनी 2-4 पुस्तके चाळली आणि त्यांना विषय सुचला. पुढील 2-3 दिवसांत त्यांनी तो लिहूनही काढला. कार्यक्रमाला अद्याप 8-10 दिवस बाकी होते. त्यामुळे बाईंनी पुरेशी तयारी केली.
***
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. बरोबर कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी गाडी बाईंच्या दारात एक चकाचक नवी कोरी गाडी उभी राहिली. बाई कार्यक्रमाच्या स्थळी रवाना झाल्या. कार्यक्रम सुरू झाला. बाईंचं भाषणही जोरदार झालं. लोकांनी टाळ्यांच्या कडकडटात दाद दिली. कार्यक्रम संपला. बाई घरी आल्या. रखमाने लिंबूशरबत दिले. बाई मानधनाची रक्कम मोजू लागल्या आणि त्यांनी रक्कम पर्समध्ये व्यवस्थित ठेऊन दिली. उद्या त्यांना काहीतरी खरेदी करायचं होतं. कारण त्याही या समाजातील एक घटक होत्या. त्यांनी मानधन स्वत:लाच दान केलं होतं.

***

दुसऱ्या दिवशी सकाळीच कार्यकर्ते बाईंच्या दारात हजर. बाईसाहेब योगायोगाने बाहेरच्याच खोली होत्या. त्यांना पाहून कार्यकर्त्याला रहावलच नाही. ""बाईसाहेब काय जबरदस्त भाषण केलत. सगळे एकदम खूष. मिडियावाले तर जाम इंप्रेस! आमच्या संस्थेतील ऍडमिशन पण वाढली....'' सोबतच्या कार्यकर्त्यानं त्याचं भान सुटायच्या आत त्याला धक्का दिला.
बाई, शांत, धीरगंभीर. त्यानंतर पुन्हा एका कार्यकर्त्यानं कालच्या कार्यक्रमाची पेपरची कात्रणं बाईंना देऊ केली. तसेच उद्या सकाळी 9 वाजता आपले भाषण रेडिओवरून प्रसारित होणार असल्याचंही सांगून टाकलं.
***
इतका वेळ दाबून ठेवलेला आनंद बाईंनी व्यक्त करायला सुरूवात केली. कात्रणं नजरेखालून घातली आणि त्यांना आपण खरच मोठे झाल्याचा भास झाला. आता दुसऱ्या दिवशीची त्या वाट पाहू लागल्या. दरम्यान समाजातील "प्रतिष्ठितांचे' कालच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया देणारे अनेक दूरध्वनी दिवसभर खणखणत होते. बाईंच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यातच त्यांनी रखमालाही कालचं भाषण ऐकायला बोलावलं. विशेष म्हणजे आपण एकत्र ऐकूयात असच सांगितलं.
***
दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले, 
"समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' पुढे 10-12 मिनिटे भाषण चाललं. 

रखमा मोहित झाली. तिच्या उत्साहाला उधाण आलं.
ती बाईंना म्हणाली, ""बाई एक विचारू?'' बाई प्रचंड आनंदात,
"विचार संकोच करू नको.'' रखमाने मनातल्या मनात 2-3 वेळा विचार केला.
तिची मुलगी तीही वयात आलेली. बाईंचा भारतातील मुलगा तोही वयात आलेला. बाईंच्या इकडं तिकडं दौऱ्यावर त्यामुळे दोघं लहानपणी एकत्रच खेळत होते. आतासुद्धा ते...

"अगं विचार ना!'' बाईंनी तिला प्रेरणा दिली. "

"बाई, सुरुवात आपण स्वत:पासून करायला पायजेल ना'' बाई हो म्हणाल्या.
"मग, आपणच माझी मुलगी पदरात घेऊन सुरुवात करा ना तुमच्या मुलासाठी!''
बाईंचा आनंद झटकन उतरला अन्‌ त्याची जागा प्रचंड संतापाने आणि रागाने घेतली.
"अगं तुझी लायकी काय तू बोलतीस काय? तुझी हिंमतच कशी झाली असं बोलायची? लाज वाटली नाही का तुला? मला म्हणतेस सुरुवात जगापासून करायची. जा आत्ताच्या आत्ता चालती हो येथून. पुन्हा तुझं काळ तोंड दाखवू नकोस.'' 


रखमा थरथर कापू लागली. रडत-रडत अन्‌ धावत-धावत ती पार्किंगमधील तिच्या खोलीत शिरली आणि मुक्काम हलवण्यासाठी तयारी करू लागली. जाताना म्हणू लागली ""सुरुवात स्वत:पासून नसते करायची?'' 


***

11/16/2014

अन तो निराधार झाला....



ती उठून निघून गेली. तिने तिच्या ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.


ती : भिऊ नकोस, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी प्रथमच करत असतो.

तो : पण, तिने "नाही' म्हटले तर....
ती : तिने "नाही' म्हटल्यावर हा विचार करू
तो : आणि तिने "हो' म्हटले आणि तितक्यात जग बुडाले तर...
ती : तुम्ही दोघं "प्रेमा'त बुडल्यावर जगाच्या भानगडीत कशाला पडता?

रविवारीदेखील त्यांचं एसएमएसवर बोलणं सुरुच होतं. तो अगदी साधा आणि भोळा होता. आणि त्याला ठाऊक होतं "ती' तिच आहे म्हणून. तिलाही नक्कीच ठाऊक होतं "ती' मीच आहे म्हणून. पण तरीही त्यांचा असा लुटूपुटूचा खेळ रंग भरत होता. पुन्हा त्यानं तिला विचारलं, ""मला तिला सांगायचयं मला जे वाटतं, ते कसं सांगू? एसएमएस, समोरासमोर का फोनवर?'' तिचं तात्काळ उत्तर, ""कोणत्याही मुलीला समोरासमोर धीटपणे बोलणारी मुलं आवडतात, पण तू तुझं ठरवं!'' त्यानं ठरवलं. आता थांबायचं नाही. उशिर झाला तर... नको नको उद्याच सांगून टाकू. कारण तो आणि ती एकाच ठिकाणी नोकरी करत होते.


सोमवारची सकाळ उजाडली. ऑफिसला पोचल्यावर खुर्चीवर बसण्याआधी तिचा एसएमएस "काय, विचारलसं का तिला?' त्याच्या छातीतील धडधड आता प्रत्यक्ष जाणवण्याइतपत वाढली होती. यातच तिचा होकार असल्याचं त्याला जाणवत होतं. त्याने थरथरत्या हातानेच रिप्लाय केला, "नाही, आज विचारतो!' दिवसभर तो तिच्या अपेक्षित-अनपेक्षित उत्तराच्या कल्पना विश्वात रमत राहिला. शेवटी निर्धार करुन मोठ्या धैर्यानं त्याने तिला चारच्या सुमारास एसएमएस केलाच, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे. काहीतरी बोलायचं आहे!' वाट पाहत असणाऱ्या तिचा तात्काळ रिप्लाय, "आजच का?' त्याला क्षणभर वाटलं, तूच म्हणालीस लवकरात लवकर सांग म्हणून... पण... त्यानं रिप्लाय बदलला आणि फक्त "प्लिज' म्हणून उत्तर पाठवलं. तिचाही वेगवान रिप्लाय, "ऑफिस सुटल्यावर कॅंटिनमध्ये भेटू!'  "ओके...' म्हणत त्याच्या धडधडीनं अधिक वेग घेतला.


संध्याकाळचे सहा वाजलेले....

तो आला. काही क्षणात तीही आली.
रिकाम्या कॅंटिनमध्ये ते दोघेच....
आता त्याची धाकधूक चेहऱ्यावर अन्‌ शरीरावरही परिणाम करत चालली होती.  त्यानं तिला विचारलं. "थंड' की "गरम'! ती "काहीच नको!' म्हणत असताना त्याने कोल्ड्रिंकची बाटली अन्‌ दोन रिकामे ग्लास आणले. रिकाम्या ग्लासाकडे पाहत त्यानं आतापर्यंतचं आयुष्य कसं रिकामं गेलं याचं मनातल्या मनात चिंतन केलं. अन्‌ दोघांच्या ग्लासात अर्ध्यापर्यंत कोल्ड्रिंक भरलं. तिच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासात त्याला स्वत:चं मनच दिसलं.

सगळं जग संपून गेलं आहे की काय अशी स्मशान शांतता त्याला वाटत होती. मात्र ती समोर असल्यानं त्याला जगाची फिकिर नव्हती. शेवटी तीच म्हणाली, "बोल, तुला काय बोलायचे आहे ते' तो म्हणाला, "मला काय बोलायचं आहे ते तुला माहितच आहे' "पण मला ते तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे' आता त्याची धडधड एवढी वाढली की छाती फुटून जाते की काय असं वाटू लागलं. तो काही क्षण गप्पच राहिला. त्यावेळी ती काही बोलत नसतानाही त्याला ऐकू येऊ लागलं, "बोल, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच करत असतो' तो धीर एकवटत छातीवर नियंत्रण मिळवत तिच्या डोळ्याला डोळे भिडवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याची हिम्मत झाली नाही. पुन्हा स्वत:समोरच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासाकडे पाहत थरथरतच तो म्हणाला, "तू मला आवडतेस!' त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तिने भुवया किंचितश्‍या उंचावून एकदा त्याच्या डोळ्यात एकदा जमिनीकडे पाहून दीर्घ श्‍वास घेतला. त्याला अशा गोष्टींचा कधीच अनुभव नव्हता. त्याची धडधड काही अंशी कमी झाल्याची अनुभूती येत असतानाच तिच्या कटाक्षाने त्याच्यावर घाव केले होते. त्यामुळे त्याची धडधड पुन्हा वाढली होती. ती म्हणाली, "पण मी तसा कधी विचार केलाच नाही' त्याच्याकडे बोलण्यासाठी बळच उरलं नव्हतं. कारण यापूर्वीच त्याने त्यासाठी खूप शक्ती खच केली होती. ती पुढे म्हणाली, "मी, उद्या सांगितलं तर चालेल!' त्याने मानेनेच होकार दिला.

ती उठून निघून गेली. तिने ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.
तो दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्यासाठी तेथून बाहेर पडला. आता पुढचा क्षणन्‌क्षण जाण्यासाठी तो घड्याळाच्या काट्याकडे पाहू लागला. त्याला वाटत होतं, आयुष्य थांबून गेलं आहे. उद्या कधीच उगवणार नाही. पण त्याचक्षणी तिच्या "होकारा'ची त्याच्या मनात कल्पना येत होती अन्‌ तो पुन्हा मोठ्या आशेने घड्याळीकडे पाहत होता. त्याचे असेच विचारचक्र सुरु असताना दिवसानं अंधारात प्रवेश करून रात्रीचा मार्ग खुला केला होता.  त्याच्या कानाभोवती फक्त तिचे शब्द घुमत होते. "उद्या सांगितलं तर चालेल!'

संपूर्ण रात्रभर फार फार प्रत्येक तासात एक मिनिटच त्यानं डोळे बंद केले असतील. ते ही तिची आठवांसाठी.... सकाळ झाली तो मोठ्या आशेनं उठून धडपडू लागला. तिचा "होकार' किंवा "...' ऐकण्यासाठी...

तो ऑफिसला पोचला. त्याला राहवेचना. कसंतरी त्यानं मोठ्या कष्टानं दिवस ढकलला. साधारण पाच वाजता तिचा तोच मेसेज, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे, काही बोलायचे आहे!' ठरलं. कालचीच जागा, कालचीच वेळ...

सहा वाजले...

तीच कॅंटिन तेच कोल्ड्रिंक, अन्‌ दोन ग्लास...
त्याने पुन्हा ते अर्धे अर्धे ओतले. पुन्हा तीच कल्पना.
यावेळी त्याला फक्त भरलेले ग्लास दिसत होते. रिकामे नाही.
ती बोलू लागली, "मी कधी असा विचार केलाच नाही. आमच्याकडे असं काही चालत नाही. तुझी ... अन्‌ माझी ... वेगळी आहे. आपलं होऊ शकणार नाही.' 
तो पुरता कोसळून गेला. होतं नव्हतं तेवढं बळ "ठीक आहे' म्हणण्यात त्यानं वाया घातलं. ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या "छबी'कडंही त्यानं पाहिलं नाही. कारण तिचं त्याचं जमणार नव्हतं.

त्याच्या प्रेमाऐवजी तिनं दोघांमधील भिंतीचाच आधार घेत त्याला कायमचं निराधार केलं होतं. 


11/08/2014

प्रेरणादायी विचार... (02)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात 
हे सारे विचार वाचून होतील. 
मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं 
आयुष्य कमी पडेल 
असे काही प्रेरणादायी विचार....









10/04/2014

प्रसिद्धीसाठी "हाफ गर्लफ्रेंड'..!

दैनिक सकाळकरिता लिहिलेला एक लेख…

चेतन भागातच्या नव्या कादंबरीवर विवेचन

8/04/2014

हृदयस्पर्शी : डबा

आज तो मोठ्या आशेने वेशीजवळ थांबला होता. मजूरअड्डा त्या वेशीचं नाव. लोखंडाचा एक डबा अन् सोबत फडक्यात बांधलेली भाकरी त्याला बळ देण्यास पुरेशी होती. मुकादम येत होते. मजूर घेत होते. अन् निघून जात होते. सगळ्या मुकादमांचे मजूर ठरलेले. त्यातील त्यांचे कमिशनही ठरलेले. हा या बाजारात नवीनच होता. 2-4 दिवस कुठलेतरी काम मिळाले म्हणून भागले. आता पुढे काय? ही चिंता त्याला कधीच नव्हती. तशी ती आजही नव्हती. पण दिवस पुढे जाऊ लागला. सूर्यासोबत ह्याच्या पोटातील भूकही तापू लागली. दुपारचे 2 वाजले तरी याला काम नाही.

आज दुपारचा डबा भरलेला होता. पण ह्याला आजच्या रात्रीची चिंता होती. घरी गेल्यावर दोन लेकरं अन् बायको वाटेकडं आस लावून बसलेली असतील. जो डबा सकाळी आणला त्याच डब्यात उद्या शिजवून खायचं सामान घेऊन जायचं होतं. प्रश्‍न भुकेचा होता. काम करावं हे एकच उत्तर होतं. पण प्रश्‍नात अन् उत्तरात अंतर खूप होतं. उद्यासाठी लागणार्‍या सामानाचं दुकान घराच्या समोर होतं. पण तिथं जाण्यासाठी या ‘मजुरअड्ड्याच्या’ रस्त्यानं जावं लागत होतं. तिथं जाण्याचा दुसरा मार्गच नव्हता.

संध्याकाळ झाली तरी कामाचा पत्ता नव्हता. आता आशा संपली होती. पोटातल्या भुकेनंही आशा सोडली होती. त्याच्यापुरता आजचा दिवस भरला होता. कामाशिवाय. अन्नाशिवाय. आता उद्याची फिकिर सतावत होती. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. आपण स्वत: दुपार अन्नाशिवाय काढली. रात्र कशीतरी जाईल. मात्र उद्याच्या दुपारसाठी आजची संध्याकाळ ‘उपाशी’ राहण्याची विनंती वाट बघणार्‍या घरातल्या लोकांना करण्याचं  बळ एकवटत तो घराच्या वाटेकडं निघाला...

7/11/2014

बोधकथा : ध्येय

का संस्थेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होते. इमारतीचा  परिसर निवासी असल्याने गजबलेला होता. इमारती जवळ जवळ होत्या. बांधकामाकरिता आवश्यक असणारा कच्चा माल शेजारील एका बंगल्याच्या दारात उतरविण्यात आला.

तेवढ्यात त्या बंगल्याचा मालक बाहेर आला आणि बांधकामावर देखरेख करणार्‍या कार्यकर्त्यांवर ओरडू लागला. बोलता बोलता त्यांचे वाद वाढत गेले. कार्यकर्ता त्या बंगला मालकाला कोर्टात खेचण्याची भाषा करू लागला. दरम्यान इतर कार्यकर्त्यांनी संस्थाप्रमुखांना बोलावून घेतले. संस्थाप्रमुख आले आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला बाजूला नेण्यास सांगितले. बंगला मालकासमोर संस्थाप्रमुख हात जोडून म्हणाले, ‘‘आपणांस आमच्यामुळे त्रास होत आहे, त्याबद्दल आम्ही आपले दिलगीर आहोत. 1-2 तासात आपल्या बंगल्याच्या दारातील माल आम्ही इतरत्र हलवतो आणि जागा पूर्ववत स्वच्छ करून देतो. कृपया आपण केवळ 1-2 तास सहकार्य केल्यास आम्ही आपले आभारी राहू.’’ एवढ्या नम्रपणाने बोलल्याने बंगला मालकही वरमला आणि त्याने ‘‘ठीक आहे, ठीक आहे’’ म्हणत सहकार्य केले.

संस्थाप्रमुख त्या कार्यकर्त्याजवळ येऊन म्हणाले, ‘‘आपले ध्येय ही इमारत बांधणे आहे, या माणसाशी भांडत बसणे नव्हे!’’

बोध: जीवनातील टाळता येणार्‍या छोट्या-मोठ्या गोष्टींकरिता ऊर्जा खर्च न करता आपण आपल्या मुख्य ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला हवे.

5/05/2014

प्रेम नाकारलेल्या प्रियकराचे पत्र...

प्रिये,

‘प्रिये’ हा शब्द ऐकून तुला आश्चर्य वाटलं असेल. मात्र, ज्या शब्दासाठी तू अगदी आतूर होतीस तो तुझ्याचसाठी लिहिला आहे आणि केवळ लिहिलाच नाही तर तू खरच मला प्रिय आहेस. हे तुला इतक्या दिवस मी सांगितलं नाही अगदी तू विचारल्यावरसुद्धा. त्यावेळी मी केवळ निशब्द होतो, निशब्द! इथल्या व्यवस्थेनं आपल्यावर लादलेली बंधनं आपण नको असताना स्विकारलेलीच आहेत. ती पाळणं आपलं कर्तव्यच आहे. आपण देहानं जवळ आलो नाहीत म्हणून काय झालं आपण हृदयानं एक आहोतच. ही सारी सृष्टी एकच आहे. मग आपण भिन्न कसे असू? असो. तत्त्वज्ञान सांगण्यासाठी तुला पत्र लिहित नाही, तर केवळ तुला माझ्या मनातील भावना समजाव्यात म्हणून हा उपद्व्याप.

तू माझ्यासाठी सारी सारी बंधनं तोडून यायला तयार होतीस. मी ही ती अगदी ताकदीनं तोडण्यासाठी समर्थ होतो. पण असल्या तोडाफोडीपेक्षा परस्परांचे जोडलेले हृदये कधीच तुटू न देण्याचं मी ठरवलं. अन् एक न होता वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. तोही तुझ्या नकळत! तुला थोडसं दुखावून... पण ‘प्रेमात’सारच माफ असतं ना. मात्र, माझ्याकडं ही बंधनं तोडण्याची हिम्मत नव्हती असा आरोप कदापि करू नकोस, ती हिम्मत नसती तर तुझं प्रेम स्विकारण्याची हिम्मतही मी दाखविली नसती.

तुला मी मिळू शकलो नाही म्हणून तू खूप अस्वस्थ झाल्याचं समजलं. अन् त्यामुळेच मला पत्र लिहिण्याचं बळ मिळालं. तुला एक सांगतो. मी तुला मिळालो नाही, म्हणून कधीही अस्वस्थ न होता फुलांकडं बघ! प्रत्येक फुलाचं काहीतरी स्वप्न असतं! कोणाला एखाद्याच्या कोटावर रूबाबात मिरवावसं वाटत असेल, कुणाला एखाद्या सौंदर्यवतीच्या काळ्याभोर केसांवर लोळावसं वाटत असेल, तर कोणाला एखाद्या वीराच्या देहाला चिरशांती देताना त्यासोबतच जळून जावसंं वाटत असेल. पण प्रत्येक फुलाचं स्वप्न साकार होतच असं नाही. तरीसुद्धा त्याच्या वाट्याला जे येतं त्यात ते आनंदी असतं अन् तेवढाच सुगंध अन् सौंदर्य ते त्याला देत राहतं. तूही तसंच रहा... फुलांसारखं...

कधी तुला फार वाईट वाटलं तर वाहणारं पाण्याकडं बघ! पुढे अडचणी आल्या म्हणून ते आपलं वाहणं कधीच थांबवत नाही. अडचणी आल्या की ते किंचितसा प्रवाह बदलतं अन् खळखळून वाहत पुढे जात राहतं. त्यावेळी जो आवाज होतो, तो अगदी कर्णमधूर असतो. आज आपल्यासमोर व्यवस्थेची जी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळं आपण आपलं प्रेम किंचितही कमी करत नाहीत, तर त्याचा प्रवाह किंचितसा बदलत आहोत. त्यातून जो आवाज निर्माण होईल, तो आज जरी नकोसा वाटत असेल, तरी उद्या जगाला तो कर्णमधूर वाटेल. त्यामुळे कोणतीही चिंता करू नकोस. माझी आठवण आली तर मी तुझ्या सोबतच आहे असं समज अन् तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न कर. त्यावेळी तुला तो कर्णमधूर भासेल.
तुझ्या प्रेमासाठी एवढं करशील....(?)

तुझाच

4/16/2014

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी या लेखातील लिंकवर क्लिक करा

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा. 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आपल्या देशात साजरा होत आहे. अर्थात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागलेत. आपल्याकडे अनेकत्व मतदान पद्धती अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांपैकी ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजेता ठरतो. अन्य लोकशाही देशात विज्येत्या उमेदवाराला मतांची विशिष्ठ टक्केवारी मिळाल्याशिवाय मतदान पूर्ण होत नाही. तेवढी टक्केवारी पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा मतदान घ्यावे लागते. असो. 

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा. 

 यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांना पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रतीक्षा आहे मतदानाची.  आपल्याकडे अवैध पद्धतीने मत विकले जाते. अर्थात गोपनीय पद्धतीने. खरे तर मत विकने म्हणजे देश विकण्यासारखेच आहे. ५००-१००० रुपयांत आपण देशाची सत्ता विकत असतो. जर विचार करा खरेच आपल्या मताची किंमत तेवढीच आहे का? आपली गरज असते आणि ती भागते पण त्याबदल्यात आपण काय करत असतो याची जाणीव ना घेणा-याला असते ना देणा-याला. त्यामुळे पैसे घेताना किमान आपण ज्या स्वतंत्र भारतात राहतो त्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांना आठवा. ज्यांनी आपल्या तन, मन, धनाची आहुती देशासाठी समर्पित केली. आता कोणी जर असा प्रश्न उपस्थित केला की निवडुन येणारा नेता कितीतरी संपत्ती कमवतो. मग आमच्या ५००-१००० ने काय कोणार आहे? सृजनहो, जर तुम्ही कोणाचे पैसे घेतले नसतील तरच तुम्हाला याची जाणीव असेल. जेणेकरून तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व करणा-याला त्याविषयी जाब विचारू शकाल. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासून करावी लागते. 


आता, मुख्य प्रश्न आहे तो मतदानासाठी बाहेर पडण्याचा. लक्षात ठेवा; रक्ताचा एक थेंब, अश्रुचा एका थेंब आणि एक मत मोठ्ठं परिवर्तन करू शकतं. त्यामुळे माझ्या मताने काय फरक पडणार असा विचार सोडून द्या. मत कोणालाही द्या, कोणालाही देऊ (नकाराचा अधिकार)  नका. पण तुमचं मत व्यक्त करा. अर्थात ते गोपनीयच असणार!  मताचा टक्का ज्यावेळी वाढेल त्यावेळीच चांगला उमेदवार देशाला मिळेल. त्यामुळे चला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होउयात. मतदान करूयात! त्यासाठी शुभेच्छा! महाराष्ट्रातील सर्वात जास्त टक्के मतदान करणारा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवुयात! त्यासाठीही शुभेच्छा!


मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा.

4/11/2014

माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास

मित्रहो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वावरत आहोत. संगणकाच्या समोर बसून आपण जगातील घडामोडी प्रत्यक्ष  डोळ्यांनी पाहू शकतो. क्षणार्धात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात विविध माध्यमातून संपर्क साधू शकतो. अगदी कल्पनेपलिकडच्या विकासाच्या युगात आपण जगत आहोत. मात्र, हे सारे होत असताना आपल्या गावाच्या विकासात माहिती तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होत आहे याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.  दररोज तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

एकविसाव्या शतकात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे.  याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. जमिनीच्या नोंदणीसंदर्भातील प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा अधिक गतीने उपलब्ध होऊ लागली आहे. संगणकीय प्रणालीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत शेतकर्‍यांना उत्पादनाच्या किंमती मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यावरून शेतकर्‍यांना बाजारभावाचा अंदाज येत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्याचा उपयोग अपेक्षित भाव देणारे उत्पादन घेण्यासाठी होत आहे. आपली शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकर्‍याला हवामानाच्या अंदाजाची आवश्यकता असते. यासाठी दररोजच्या हवामानाच्या अंदाजासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध संगणकीय प्रणाली शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्यामुळे अनपेक्षित नुकसान टाळता येणे काही अंशी शक्य झाले आहे. खुल्या झालेल्या माहितीच्या महाजालामुळे विविध उत्पादनांविषयी त्यांच्या लागवडीविषयी, त्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या भौगोलिक परिस्थितीविषयी, त्यावर पडणार्‍या संभाव्य रोगांविषयी, त्यासाठी आवश्यक असणार्‍या उपाययोजनेविषयी, सविस्तर माहिती घेणे शक्य झाले आहे. जेणेकरून शेतकरी ‘प्रगती’च्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. याबरोबरच शेतीमालावर कुठे कुठे काय संशोधन सुरू आहे, त्याचे काय निष्कर्ष आहेत, पिकाच्या नवीन जातींचे आगमन, प्रतिकारशक्ती, उत्पादकता याबरोबरच प्रक्रियेसाठी लागणार्‍या मालाचा दर्जा, उपलब्धता, बाजारभाव, क्षेत्राची निश्‍चिती, पुरवठ्याचा हंगाम इत्यादी अनेक गोष्टींची माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून शेतकर्‍यांपर्यंत पोचत आहे. तसेच शेतीसंदर्भातील जोडधंद्यांविषयीही सविस्तर माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.

गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. महाराष्ट्र शासनाने महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती देणारी देणारे संकेतस्थळाचे अर्थात वेबसाईटचे नुकतेच उद्घाटन केले आहे. www.mahalaxmisaras.org या संकेतस्थळावर राज्यातील 700 हून अधिक बचतगटांची माहिती, संपर्क क्रमांक आणि त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे. यातून या बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसाराकरिता नवे माध्यम उपलब्ध झाले आहे.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून परस्पर संपर्कात राहता येणे तर शक्य झाले आहेच शिवाय संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम आपल्या गावात बसूनच पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय तिकिट बुकिंग, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज, माहितीसाठी इंटरनेट सुविधा आदी सुविधा उपलब्ध असलेले केंद्र उभे करून स्वतंत्र व्यवसायाची संधी प्राप्त झाली आहे. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते. याशिवाय गावाच्या ठिकाणी राहूनच इंटरनेटच्या माध्यमातून बहिस्थ पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक प्रशिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. त्यामधून माहिती तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांकरिता ग्रामीण युवक पात्र ठरत आहे.

मित्रांनो, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला संगणक साक्षर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीही आता गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. आता गावोगावी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा केंद्रांमार्फत माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. एमएस-सीआयटी अर्थात महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि प्रमाणित अभ्यासक्रमातून संगणक साक्षर होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या अभ्यासक्रमामध्ये संगणकाच्या प्राथमिक माहितीपासून ते सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच संगणकाशी संबंधित विविध उपकरणांची हाताळणी जसे की स्कॅनर, प्रिंटर इत्यादींविषयीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता तुमच्याकडे केवळ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती आणि एसएससी अर्थात दहावी पास असणे आवश्यक आहे. मात्र दहावी पास असणे ही अट अनिवार्य नाही. याचाच अर्थ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती असली तरी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमांसह हिंदी, गुजराती, तेलगु, कन्नाडा, माध्यमातूनही उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून या अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा प्रकारची नोकरी मिळू शकते.

मनोरंजन क्षेत्राच्या प्रसारामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे ग्रामस्थांना सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून दर्जेदार आणि विनाअडथळा मनोरंजन तसेच वृत्त वाहिन्यांचा आनंद घेता येऊ लागला आहे. त्याचप्रमाणे माध्यम क्षेत्रातही उल्लेखनीय बदल झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील वृत्तपत्रे वाचता येणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वांना खुल्या असलेल्या विविध ठिकाणी अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्यही प्राप्त झाले आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नावर संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासही तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ज्यामुळे विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. थोडक्यात, ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही उक्ती प्रत्यक्ष अनुभवली जात आहे. ग्रामीण भागात विविध कला आणि गुण असणारे अनेक कलाकार असतात. परंतु संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या कलेची माहिती जगासमोर येत नाही. सोशल नेटवर्किंग माध्यमातून त्यांच्या जगासमोर प्रस्तुत करता येते. त्यामुळे त्यांना व्यासपीठ उपलब्ध होणे आणि त्यातून त्यांची कलाकार म्हणून जडणघडण होणे शक्य झाले आहे.

शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे उपलब्ध असल्याने ग्रामस्थांना संबंधित कार्यालयांना थेटपणाने संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. जेणेकरून शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत जाऊन सुप्रशासनाकडे वाटचाल होत आहे. शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक, शासनाचे अध्यादेश, नवी नोकरभरती प्रक्रिया आदी माहिती शासनाच्या ुुु.ारहरीरीहीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.
गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून थेट प्रशिक्षण वर्ग प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. मदत घेऊ शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे शासनातील रिक्त पदांकरिता अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर संकेतस्थळाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज करता येणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मदतीने शासनाच्या विविध विभागांच्या रिक्त पदाच्या भरतीसाठी संकेतस्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे गावकर्‍यांचा वेळ आणि श्रम वाचतात.
याहीपलिकडे जाऊन काही कारणामुळे गावाबाहेर गेेलेल्या गावकर्‍यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या गावाची माहिती, भौगोलिक परिस्थिती तसेच ताज्या घडामोडी आणि गावातील विविध कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.
मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आपल्या आणि पर्यायाने गावाच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात. धन्यवाद!

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर झालेले भाषण)

3/20/2014

माहिती अधिकार आणि संतांची भूमिका

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर दि. १८ मार्च २०१४ रोजी प्रसारित झालेले भाषण)


मंडळी, शासन नेहमीच लोककल्याणकारी कायदे लागू करण्याकरिता प्रयत्नशील असते. लोकांना अधिकाधिक हक्क, अधिकार प्राप्त व्हावेत आणि राज्यकारभार हा अधिक सुसूत्रपणाने, पारदर्शी आणि गतीने व्हावा. त्यात लोकसहभाग वाढावा हा हेतू त्यामागे  असतो. यातून राष्ट्राला परमवैभवी करण्याचा प्रयत्न असतो.

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 हा त्यापैकीच एक कायदा. या कायद्यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग या शब्दांना नव्याने अर्थ प्राप्त झाला आहे. माहितीचा अधिकार कायदा महात्मा गांधीजींची ‘विश्वस्त’ ही संकल्पना स्वीकारतो. या संकल्पनेनुसार शासनकर्ते सार्वजनिक संस्थांमधील माहितीचे मालक नसून केवळ विश्वस्त आहेत. माहितीच्या अधिकाराने माहितीच्या लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले आहे. यालाच सुराज्याच्या दिशेने जाणारे ‘दुसरे स्वातंत्र्य’ असेही म्हटले जाते. माहितीचा अधिकार हा घटनात्मक मूलभूत हक्क असणारा कायदा आहे. 12 ऑक्टोबर 2005 पासून माहिती अधिकार अधिनियम, 2005 या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या देशात सुरू झाली. या कायद्यात एकूण 31 कलमे आहेत. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे, नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणे, राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे, शासनयंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे, राज्यकारभार व व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे, माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे इत्यादी या कायद्याची उद्दिष्टे आहेत. या कायद्यात ‘माहिती’ याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धिपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणतीही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री आणि त्या त्या वेळी अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहिती यांचा समावेश होतो.

हा कायदा जरी 2005 साली शतकात प्रत्यक्ष अस्तित्त्वात आला असला तरी देखील प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणाने या कायद्याची अधिकृत मागणी आणि अंमलबजावणी फार पूर्वीपासूनच करण्यात येत होती. प्रत्येक वेळी तत्कालिन व्यवस्थेत सामान्यांपासून दडवून ठेवण्यात आलेली माहिती सर्वांसाठी खुली करण्याचे प्रयत्न केले गेले. यात त्या त्या काळातील महापुरुषांनी तसेच संतांनी आणि विद्वानांनी अधोरेखित केले होते. चला तर मग आज आपण माहिती अधिकार कायद्याविषयीची संतांची भूमिका जाणून घेऊयात-

‘ऐसा चैतन्याचा मेरू,
अवघ्या प्रसन्नतेचा तरू।
जैसा भास्कर या नभी शोभतो,
करू या तेजाची आरती ।
घेऊनिया हाती ज्योती॥

संत म्हणजे चैतन्याचा पर्वत असतात. संत म्हणजे प्रसन्नतेचे वृक्ष असतात. त्यांचे जीवन, उद्दिष्ट आणि ध्येय हे आकाशातील सूर्याएवढे शुभ्र आणि स्वच्छ असते. अशा या तेजाची आपण हातामध्ये ज्योती घेऊन आरती करत असतो. जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देह आणि अहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. श्रुतिसंपन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा संतांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसंपन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत सतत कृपेचा वर्षाव करतात. संत व्यक्ती केवळ अध्यात्म मार्गाचा अंगिकार जनमानसांमध्ये रूजवित नाहीत; तर राज्यकर्ते, प्रशासक आणि सामान्य नागरिक यांच्यासाठीही आदर्श जीवनाचरणाचे शिक्षण देतात. आदर्श जीवनाचरणाकरिता शासनाने अंगिकारलेले विविध कायदे त्यांची अंमलबजावणी याबाबतही संतांनी तत्कालिन व्यवस्थेतून भाष्य केले आहे. जे आजच्या काळातही उपयोगी पडतात. संत साहित्याकडे संशोधनाच्या दृष्टीने पाहिले असता असे लक्षात येते की, आज आपल्यासमोर जो माहिती अधिकार आहे त्याची अत्यंत सुक्ष्म बीजे ही त्याकाळीच रोवली गेली होती. एवढेच नव्हे तर माहिती मिळणे हा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा हक्कच आहे असे प्रतिपादनही तत्कालिन संतांनी केल्याचे आढळून येते. संतपरंपरेच्या कार्याकडे थोडेसे व्यापक दृष्टीने बघितले की ते कार्य कसे अपूर्व व अभूतपूर्व आहे हे लक्षात येते.

सतराव्या शतकात वारकरी संप्रदायात तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) नावाचे संत होऊन गेले. पुढे ते संत तुकाराम नावाने जनमानासत लोकप्रिय झाले. आज ते ‘जगद्गुरु’ नावानेही ओळखले जातात. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड संत कवी होते. तत्कालिन व्यवस्थेत विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. वेदांमधील माहितीच्या स्वरूपातील ज्ञान तत्कालिन व्यवस्थेत काही विशिष्ट समुदायांनी जनसामान्यांपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आले होते. त्या ज्ञानावर ते आपलाच हक्क आहे आणि ती आपलीच मक्तेदारी आहे असा दावा त्याकाळी विशिष्ट समुदाय करीत होते. तुकारामांना ही व्यवस्था मान्य नव्हती. वेदांमधील ज्ञानाच्या स्वरूपातील माहिती जनसामान्यांकरिता खुली करण्याकरिता त्यांनी आपल्या हयातभर लढा दिला. त्यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले. माहितीच्या स्वरूपातील ज्ञान सामान्य जनांना समजेल अशा भाषेत लिहिलेले ग्रंथ नष्ट करण्याचे प्रायश्चित त्यांना देण्यात आले. ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा॥ अशा शब्दात तुकारामांनी तत्कालिन व्यवस्थेतील भेदाभेद अधोरेखित केला होता. तरीदेखिल त्यांनी ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।’ असे सांगून तुकोबांनी आपण एक आहोत कोणत्याही प्रकारचा भेदाभेद आपल्यामध्ये नाही हा वैश्विक विचार मांडला आहे.  त्यामुळे सर्वांना समान सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक संधी उपलब्ध असाव्यात असा विचार त्यांनी व्यक्त केला. ‘सकळासि येथे आहे अधिकार।’ अशी स्पष्ट संकल्पना त्यांनी सतराव्या शतकात तुकाराम महाराजांनी मांडली आहे. समाजातील तळागाळातील वर्गापासून सर्वांना वेदांमधील ज्ञान जाणून घेण्याचा अधिकार आहे असे तुकोबांची अगदी स्पष्टपणाने म्हटले आहे. माहिती अधिकाराच्या निमित्ताने ती संकल्पना आज आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत.

संत परंपरेत अगदी अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या माणिक बंडोजी इंगळे अर्थात संत तुकडोजी महाराज यांनी समाजातील निरनिराळ्या समस्येवर भर भाष्य तर केलेच मात्र माहिती मिळविण्याच्या अधिकाराविषयीही आणि त्यासाठी आवश्यक त्या संसाधनांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. गावाच्या विकासासाठी लिहिलेल्या एकूण 41 अध्यायांच्या ग्रामगीता या अपूर्व ग्रंथांत त्यांनी तेराव्या अध्यायात 106 व्या ओवीत त्यांनी असे म्हटले आहे की-

सहज कळावे विचार आणि वृत्त। म्हणोनि फळा असावा चौकांत। 

आदर्श गावाचे उदाहरण देताना तुकडोजी महाराज म्हणतात की गावातील माहिती, विचार आणि वृत्त सर्वांना समजावेत म्हणून गावातील चौक चौकात फलकाच्या माध्यमाचा उपयोग करावा. माहिती अधिकारातील कलम 4 अंतर्गत ‘स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती’ या कलमाशी तुकडोजी महाराजांचा हा विचार अत्यंत मिळता जुळता आहे.

संत तुकोबांच्या आणि तुकडोजी महाराजांच्या याच विचारांशी सतराव्या शतकात होऊन गेलेल्या नारायणी सूर्याजी ठोसर ऊर्फ समर्थ रामदास यांनी मांडलेला आहे. समर्थांच्या दासबोध या अपूर्व ग्रंथराजात एकोणिसाव्या दशकातील दहाव्या समासात चौदाव्या ओवीत ‘विवेकलक्षणनिरूपण’ सांगताना ‘जितुकें काही आपणासी ठोवं। तितुकें हळुहळु सिकवावें। शाहाणे करून सोडावे। बहुत जन॥ असा विचार समर्थांनी अभिव्यक्त केला आहे. यात जे जे आपल्याला माहिती आहे ते ते इतरांना सांगावे आणि सर्वांना शहाणे करून सोडावे असे विवेकाचे लक्षण सांगितले आहे.

समर्थ रामदास यांनी मानवी जीवनाच्या व्यवस्थापनाविषयी मांडलेल्या विचारांवर देशातच नव्हे तर अवघ्या विश्वात अभ्यास सुरु असतो. मनाचे श्लोक, दासबोध यांसारख्या साहित्यातून त्यांनी आदर्श आचरणाचे नियम समजावून सांगितले. संत पदाला पोचलेले व्यक्ती सतत निरनिराळ्या गोष्टीतील सत्व शोधीत असतात. पुढे त्या सत्वाच्या मागचे तत्व आणि पुन्हा त्या तत्वाच्या मागील सत्वाचा शोध घेत असतात. एवढे करुनही या मंडळींकडे  हे सारं साध्या, सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडण्याचं सामर्थ्य असतं.

तेराव्या शतकातही संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ‘पसायदान’ या काव्यातून सर्व जगासाठी कल्याणाची मागणी केली आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो।’ अर्थात ज्याला जे हवे त्याला ते मिळो, अशी प्रार्थना त्यांनी विश्वात्मक देवाकडे केली आहे. आध्यात्मिक दृष्टीने असलेल्या या प्रार्थनेचा माहिती अधिकाराशी संबंध जोडता येऊ शकेल. इथल्या सामान्य नागरिकांना शासन दरबारी उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध व्हावी आणि तीदेखिल त्यांना मिळो असा अर्थबोधही उक्तीतून अधोरेखित होतो.

मंडळींनो संत गाडगेबाबा, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत निळोबा, संत पुंडलिक, संत सावतामाळी, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत भगवानबाबा, संत बसवेश्वर, संत मोरया गोसावी, संत दासगणू महाराज यांसह सकलसंतांनी आपण एक आहोत हा एकात्म, वैश्‍विक आणि समतेचा विचार मांडला. हा विचार एकदा समजामनात रूढ झाला की कोणतेही भेदाभेद राहत नाहीत आणि सर्वांना सारं काही विनासायास प्राप्त होऊ शकतं. तेव्हा चला तर मग संतांनी दिलेल्या प्रगल्भ विचारांच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासम मिळालेल्या माहिती अधिकाराचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घेऊयात.


3/05/2014

नया है वह...!!

बीड येथे नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मिश्किलीचा प्रयत्न... (खेळीमेळीने घ्यावे, कोणाला दुखावण्याचा हेतू नाही)

 "महाराज, महाराज! गहजब जाहला.'
"प्रधानजी, आमच्या राज्यात काय गहजब जाहला आणि आम्हाला माहीत नाही?'
""महाराज, तुम्ही इलेक्शनच्या तिकीटामागं होते? त्यामुळे तुम्हाला आपल्या राज्यात काय होतयं ते माहीत पडलं नाय? तसं बी आपल्या राज्यात कुठल्या नळाला पाणी येत नाही, अन्‌ कुठल्या नळाला किती टायमाला पाणी येतं हे थोडीच तुमाला ठाव असतं?''
""प्रधानजी आता सांगाल का?''
""होय, महाराज! त्याच्यासाठीच तर आलो आहे!''
""आता, सांगताय का कडेलोटाची शिक्षा देऊ?''
""कडेलोट, नको महाराज! मला एक बायको आणि अनेक पोरं हायत, ते अनाथ होतील, त्यांनी कोणाकडे पहावं. शिवाय तुमाला दोन मतं मिळणार बी नाहीत!''
""दोन का बरे, तुझ्या एकट्याचेच मिळणार नाय ना!''
""काय खुळं का महाराज, मला तुमी मारल्यावर माजी बायली काय तुमाला मत देईल व्हय, त्या मंदू नटालाच देईल!''
""काय, मंदू नाधवला?''
""हेच, महाराज कितीक येळ झाला हेच सांगण्यासाठी मी तुमच्याकडं आलो व्हतो, मंदू नाधव तुमच्या वाट्याला चाललाय!''
""त्यो नट?''
""व्हो, आपल्या गावातला नट बी राजकारणाचा राजा व्हणार महाराज! त्यो इलेक्शनला उभा रायलाय...''
""प्रधानजी... तुमचं काय डोकं-बिकं फिरलं आहे की काय?''
""महाराज, आमचं नाय त्या मापवाल्याचं फिरलयं!''
""मापवाले म्हणजे ते नवीन पार्टीवाले...''
""होय महाराज, नया पार्टीवाले..! त्यांनीच लढवलं त्याला.''
""पण, त्यो मंदूतर कधी इलेक्शनच्या रिंगणात येईल असं वाटलं नव्हतं.''
""पण महाराज, जे वाटत नाही तेच व्हतं. अन्‌ जे वाटतं तेच व्हत नाय!''
""म्हणजे!''
""महाराज, अलिकडे तुमचा अब्यास कमी पडला दिसतोय. त्या मंदूची लक्षणच मला फार काय चांगली वाटत नव्हती!''
""ते कसं काय?''
""त्यानं बघा की, कामगाराच्या पोरांना नाटकात घेतलं, नाटक फेमस केलं. नाटकात सगळे शब्द घातले. एक शब्द राहिला होता त्यो बी नंतर घातला!''
""त्या नटाशी आम्ही लढायचं!''
""होय, महाराज!''
""हे काय बरोबर नाय, प्रधानजी! पण कसं लढायचं...?''
""महाराज, आपल्या राजकीय सल्लागाराचा सल्ला घ्यायचा का?''
""प्रधानजी, विचारता काय? बोलवा राजकीय सल्लागारांना...!!''
सल्लागार येतो.
""महाराजांना मुजरा असो...!''
""प्रधानजी यांना समजून सांगा सगळं!''
सल्लागार आणि प्रधानजी यांचा काही संवाद होतो. सल्लागार निघून जातात.
""प्रधानजी, आम्हाला सल्ला न देताच सल्लागार निघून जातोय, बघा...''
""महाराज, काळजी नसावी त्यांनी सल्ला दिला. अगदी उपयुक्त सल्ला!''
""काय सल्ला दिला त्यांनी?''
""तीन शब्दात दिला..!!''
""आता सांगताय का?''
""हिंदीत दिला!''
""आता पुन्हा कडेलोट करू का?''
""नको महाराज सांगतो.''
""सांगा, आता तरी...''
""नया है वह...!!!''

2/24/2014

स्वर्गस्थ पित्याला आर्त हाक!

प्रिय दादा,

तुम्ही जेथे गेला आहात, तेथपर्यंत हे पत्र पोचेल की नाही याची शाश्वती नाही. पण मला नक्कीच खात्री आहे. देव आहे. त्याच्या चरणाजवळ आपण सध्या बसलेला आहात. आणि तोच तुम्हाला सांगेल, ‘‘उत्तमराव बघा तुमच्या बाळूनं तुमच्यासाठी पत्र लिहिलं आहे...’’


लहानपणी माझा हात तुमच्या हातात होता आणि अगदी परवापर्यंत तुमचा हात माझ्या हातात होता. आता तुमचे हातांसहित तुम्ही कुठे गेले आहात हे माझे मलाच ठाऊक नाही. मी छोटा असताना तुम्ही घरात नसलात की सांगायचो दादा ऑफिसला गेलेत, दादा बाहेर गेलेत म्हणून! पण आज कोणी घरी आलं आणि विचारलं तर मी काय सांगू? तेव्हा आपण कोठे चालला आहात हे सांगून जात होत. मात्र, पुरवा तुम्ही कोठे चाललात हे सांगून गेला नाहीत. तुम्हीच शिकवलतं ना, ‘बाहेर जाणार्‍यांना कोठे चाललात हे विचारू नये!’ म्हणून त्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला विचारलं नाही, ‘‘दादा कोठे चाललात?’’


दादा तुम्ही गेला नाहीत तर फक्त तुम्ही नश्वर जगाची गाडी सोडून इहलोकाचा प्रवास सुरु केलात. पण या नश्वर जगातून काय गेलं बघा... श्री.उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर नावाच्या 73 वर्षाच्या माणसाचा क्षणार्धात ‘मृतदेह’ झाला. दादा तुम्ही गेलात. आईचे ‘मालक, सौभाग्य’ गेले, माझे, स्वातीताईचे, ज्योतीताईचे ‘दादा’ गेले, कीर्तीताईचे, आरतीचे ‘पप्पा’ गेले. अनिषचे ‘आबा’ गेले. किरणभाऊजी, महेशभाऊजी आणि अंकुशराव यांचे ‘सासरे’ गेले. कुणालआर्याचे, तन्वी-तन्मयचे ‘आजोबा’ गेले. तुमच्या सहकार्‍यांचे ‘नाचणे मामा’ गेले...


दादा तुम्ही आयुष्यभर आम्हाला जेथे न्याल तेथे स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. परवा तुम्ही आम्हाला सोबत नेले नाहीत किंवा स्वर्गही निर्माण केला नाहीत. कारण तुम्ही जेथे गेला होता, तेथे प्रत्यक्ष स्वर्ग होता. तुमच्या दशक्रियाविधीच्यावेळी तुमच्याच अंशातून निर्माण झालेल्या मला ‘मीच’ स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा भास झाला.


दादा, तुम्हाला आठवतयं? लहानपणी तुम्ही आम्हा सार्‍या भावंडांना घेऊन नदीशेजारच्या बागेत जात होता. बागेतील ससा, हरिण आणि माकड या प्राण्यांना जाळीतून आपण मुरकुलं खायला देत होतो. एकेदिवशी नदीला पूर आला आणि पूरासोबत बागही वाहून गेली, सारे प्राणीसुद्धा. त्यादिवशी तुम्ही घरी आल्यावर तुमच्या मांडीवर आम्ही सारे जण रडलो होतो. तेव्हा तुम्ही नि:शब्द होता. परवा तुम्ही जगाच्या प्रवाहातून निघून गेलात तेव्हा मीसुद्धा नि:शब्द होतो. त्यावेळी मला तुमच्या नि:शब्दतेचा अर्थ समजला होता.


दादा, तुम्हाला आठवतयं. आपल्या स्वातीताईचं लग्न जेव्हा मी ठरवलं, त्यावेळी मी लग्नाचं सारं मॅनेज केलं, लग्न व्यवस्थित पार पडलं. अन् मी पुन्हा बीडमधून पुण्याला यायला निघालो, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, ‘‘बाळू, तू आता एवढा मोठा झाला आहेस की मी आता डोळे मिटले तरी हरकत नाही...!’’ तुमचं वाक्य तुम्ही खोटं ठरवलतं कारण जाताना तुम्ही डोळे उघडेच ठेवून गेलात. कदाचित माझे भावी कर्तृत्त्व तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहायचे असावेत. दादा जिवंतपणी मरणाची कल्पना करणं आणि त्याला कवेत घेण्यासाठी उत्सुक असणं, यापेक्षा जीवनाचं दुसरं कृतार्थपण नाही. डोळे मिटण्याची गोष्ट केल्यावर केवळ 3 वर्षे आपण हे जग उघड्या डोळ्यांनी पाहिलतं. अगदी कृतार्थपणे. दरम्यानच्या काळात तुम्हाला गुडघ्याला होणार्‍या वेदनांवरील साधी एक दोन रुपयांची वेदनाशामक गोळी आणल्यानंतर तुम्हाला केवढा आनंद व्हायचा ना! त्या गोळीच्या वेदनेपेक्षा ‘माझ्या बाळूनं ती माझ्यासाठी अगदी आठवणीनं आणली आहे’ ही भावनाच आपल्या जीवनातील सार्‍या वेदना दूर करीत होती.


देव आहे असे आपण नेहमी म्हणायचात. आपण प्रामाणिकपणानं कष्ट केले तर कधीच उपाशी राहणार नाहीत, तसंच कामाच्या मोबदल्याशिवाय कामावरील निष्ठा अधिक महत्त्वाची असते. मोबदला हा उदरनिर्वाह असतो, तर काम हा व्यक्तिविकास असतो. एवढे थोर विचार आपण अगदी सहजपणे शिकवलेत. लौकिक अर्थानं नव्हे तर अलौकिक अर्थाने आपण आम्हाला गर्भश्रीमंत केलेत.


सरकारी नोकरीत असतानाही आपण स्वत:चे घर घेतले नाहीत. प्रत्यक्ष घरापेक्षा हृदयाहृदयांमध्ये ‘घर’ बांधण्याचा अनमोल संदेश आपण आपल्या हयातभर देत राहिलात! त्यामुळेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील आपल्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला सार्‍यानं अश्रू ढाळून आपल्याबद्दलचा कृतार्थभाव दर्शविला होता...
 

जाता जाता एक सांगतो आईला अहैवपणी मरण्याची इच्छा होती. पण कदाचित तुमची अन् देवाचीच अशी इच्छा असेल की, आईनं आमच्यासाठी अजून खूप जगावं म्हणून...
 

दादा, तुम्हाला मी नेहमी वेगवेगळ्या कविता वाचून दाखवायचो आजपण मला विंदा करंदीकर यांच्या दोन ओळी आठवत आहेत. कदाचित विंदा आपल्या शेजारीच बसले असतील. 
‘भावनेला गंध नाही, वेदनेला छंद नाही, जीवनाची गद्य गाथा वाहते ही बंध नाही।’
 

दादा, तुम्ही या नश्वर जगातून गेलात, पण आमच्या हृदयातून नाही... त्यामुळे आमच्यासाठी तुम्ही कोठेच गेला नाहीत...

तुमचाच
बाळू

1/24/2014

व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया - पुस्तक परीचय

पुस्तक परीचय

व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया 
सदानंद कोचे, भाप्रसे (जिल्हाधिकारी, बीड)
प्रकाशक: राहूल प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 38,, मूल्य: 75 रुपये

शासन नेहमीच सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर, संपन्न आणि समृद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतं. त्यासाठी आवश्यक असणार्‍या व्यवस्था उभारण्याकरिता, चालविण्याकरिता योग्य त्या व्यक्तींची निवड करीत असतं. त्या व्यक्तींच्या क्षमता वृद्धिंगत होण्याकरिता उच्च श्रेणीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कनिष्ठ पातळीवरच्या सर्वांपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतं असतं. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांकरिता लाल बहादूर शास्त्री ऍकेडमी ऑङ्ग ऍडमिनिस्ट्रेशन, मसुरी येथे ङ्गेज-1, ङ्गेज-2, ङ्गेज-3 अंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.  दहा-बारा वर्षे प्रशासकीय सेवा बजावलेल्या अधिकार्‍यांना मीड करिअर ट्रेनिंग म्हणून ङ्गेज-3 अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बुलडाण्याचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता बीडचे जिल्हाधिकारी असलेले श्री.सदानंद कोचे यांनी ङ्गेज-3 अंतर्गत अलिकडेच मसुरी येथे 60 दिवसांचे प्रशिक्षण घेतले.  त्यांच्या प्रशिक्षणात ‘ङ्गॉरेन एक्स्पोजर’ म्हणून 15 दिवसांच्या विदेशी प्रशासनाचा अभ्यास करण्याकरिता दक्षिण कोरिया या देशाच्या अभ्यास दौर्‍याचा समावेश होता.  दक्षिण कोरिया या प्रगत राष्ट्राला दिलेल्या भेटीवर आधारित ‘व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया’ हे दोन राष्ट्रांची विषयनिहाय तुलना करणारे, मसुरी येथील प्रशिक्षणाचा अनुभव कथन करणारे आणि राष्ट्रप्रेमाच्या तळमळीतून प्रगटलेले पुस्तक सदानंद कोचे यांनी लिहिले आहे.

वास्तविक अर्ध्या महाराष्ट्राएवढे क्षेत्रङ्गळ असणारे दक्षिण कोरिया या राष्ट्राची क्षेत्रङ्गळाच्या दृष्टिने बलाढ्य असणार्‍या भारताशी तुलना कशी होऊ शकते असा प्रश्न वाचकाला पडणे स्वाभाविक आहे. त्याचे कारण असे की, भारताप्रमाणेच परकीय आक्रमकांनी दक्षिण कोरियावर सुद्धा राज्य केले. आणि स्वातंत्र्याच्या वेळी दोन्ही देश सारख्याच परिस्थितीत होते. मात्र आता स्वातंत्र्यानंतर सहा दशकांहूनही अधिक काळाने भारत विकसनशील राष्ट्र तर दक्षिण कोरिया विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशात अस्तित्वात आले आहे. या स्पष्टीकरणापासूनच वाचकाच्या दृष्टिकोनातून पडणारे छोटे-छोटे प्रश्न समोर ठेवून लेखकाने वाचकांशी नाते जोडले आहे.

सुरुवातीला लेखकाने मांडलेली भूमिका, इथली व्यवस्था विषद करणारी पार्श्वभूमी, मूळ विषयाचा ऊहापोह करण्यापूर्वी उपयुक्त ठरणारी आहे. त्यानंतर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ऍकेडमी ऑङ्ग ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेतील सोयीसुविधा, प्रशिक्षणातील विविधता, संस्थेचा परिसर, प्रशिक्षणाचे स्वरुप या सर्वांची ओळख करून दिली आहे. विमानप्रवासाच्या वर्णनापासून सुरु झालेला विदेशदौरा वाचकांनाही विदेशी दौर्‍याची अनुभूती देणारा आहे. 

दक्षिण कोरियातील समाजव्यवस्था, शिक्षण, सुरक्षा, व्यावसायिक शिक्षण, विद्यापीठे, लष्करी शिक्षण, शिस्त, आरोग्य, वैद्यकीय सोयीसुविधा, आहार, लोकसंख्या, दळणवळण, वाहतूक नियंत्रण, उद्योग, क्रीडा, शेती इ. विषयांतर्गत केलेली चर्चा, भारताशी केलेली तुलना तळमळीतून प्रगट झाल्याचे या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते.

दररोज विद्यार्थ्यांचे शाळेत येताना शिक्षक करीत असलेले स्वागत, पालकांचा पाल्यांना शाळेत पाठविण्याचा उत्साह आणि अशा प्रसन्न वातावरणामुळे शंभर टक्के साक्षर झालेला दक्षिण कोरिया,  शिक्षणामुळे मुलींना वरसंशोधनाचे मिळालेले संपूर्ण स्वातंत्र्य, छोटे राष्ट्र असूनही उभारलेले 45 विद्यापीठे, 16 ते 19 वर्षादरम्यान 2 वर्षांचे सक्तीचे लष्करी शिक्षण, स्वयंशिस्त या गोष्टी लेखकांसमवेतच वाचकांनाही अचंबित करणार्‍या आहेत. लोकसंख्येवर असलेले नियंत्रण, आरोग्याच्या तारांकित परिपूर्ण सोयी आणि सकस आहारामुळे मिळालेल्या सुदृढतेला परिश्रमाची जोड आणि यातून मिळालेले सुखकर आयुष्य यातच द. कोरियाच्या प्रगतीचे रहस्य सामावल्याचे भासते. 

समुद्रावरील 21 किमीच्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या ब्रीजमुळे आणि सशक्त अंतर्गत वाहतुकीमुळे दळणवळणाच्या आणि पर्यायाने द.कोरियाच्या विकासाच्या वाटा सुकर झाल्याचे लेखकाने दर्शवून दिले आहे. 1988 मध्ये कोरियन शासनाने सेऊल याठिकाणी ऑलिपिंक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याकरिता 10,000 नव्या सदनिका उभारण्यात आल्या होत्या. या यशस्वी आयोजनामुळे द.कोरिया जगाच्या समोर आले. 2014 साली पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा येथेच होणार आहेत. अशाप्रकारे क्रीडा क्षेत्रातही या छोट्या राष्ट्राने मोठी प्रगती साधली. त्याची तयारी 2008 पासूनच सुरु आहे. उद्योगाच्या बाबतीतही द.कोरियाने मोठी प्रगती केली आहे. त्यांची उत्पादने जगात निरनिराळ्या ठिकाणी निर्यात केली जातात.

लेखकाने भूमिकेत वर्णन केल्याप्रमाणे विषयनिहाय वर्णन करताना भारताच्या बाबतीत निदर्शनास आलेले काही कडवे  अनुभवही स्पष्टपणे पुस्तकात मांडले आहेत. त्यात नको त्या गोष्टीतील राजकीय हस्तक्षेप, स्वयंशिस्तीचा अभाव, शिक्षणाची दुरावस्था अशा काही विषयांवर लेखकाने निर्भयपणे चर्चा आणि तुलना केल्याचे दिसते. मात्र हे सारे राष्ट्रप्रेमापोटी आल्याचे जाणवते. भारतीय माणसातील ऊर्जा खरोखरीच प्रज्वलित झाली तर हा देश येत्या 50 वर्षात परमवैभवाकडे जाऊ शकतो असा विश्वास लेखकाने व्यक्त केला आहे. जगाच्या नकाशावर एका बिंदूएवढ्या राष्ट्राकडून आपण काहीतरी का शिकावे याचे उत्तर ‘व्हाट वुई कॅन लर्न ङ्ग्रॉम साऊथ कोरिया’ हे पुस्तक वाचल्यानंतर आपसूकच मिळते आणि हा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
पुस्तकात दिलेले ऐतिहासिक संदर्भ, थेटपणे केलेली तुलना, वापरलेले भाषिक सौंदर्य, वाचकांच्या भूमिकेतून केलेले लिखाण, दोन्ही देशांच्या सद्य:स्थितीचा आणि व्यवस्थेचा केलेला अभ्यास पुस्तकाच्या पानोपानी प्रगट होतो. मसुरीच्या प्रशिक्षण केंद्राच्या सौंदर्यापासून ते द.कोरियापर्यंतच्या विकासाची दृष्यांची रंगीत छायाचित्रे समाविष्ट केल्याने वाचकांच्या कल्पनेला प्रतिमेची जोड मिळते.

1/23/2014

योजनांची विकासगंगा - पुस्तक परीचय

पुस्तक परीचय

योजनांची विकासगंगा
गजेंद्र बडे 
सार्थसंकेत प्रकाशन
पृष्ठे: 480 मूल्य: 500 रुपये

समाजातील सर्व स्तराचा विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. विशेषत: ग्रामविकासाच्या बाबतीत कल्याणकारी योजना राबविणे आणि त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करणे याचा शासनस्तरावर अधिक प्रयत्न केला जातो. अशा ग्रामीण विकासाच्या बाबतीतील विविध 400 पेक्षा अधिक योजनांचे एकत्रित संकलन ‘योजनांची विकासगंगा’ या पुस्तकात करण्यात आले आहे.

माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले आणि शासनाच्या कृषिमित्र पुरस्काराने गौरविण्यात आलेले गजेंद्र बडे यांनी या माहितीपूर्ण पुस्तकाचे संपादन-लेखन केले आहे. शासकीय योजनांच्या माहितीचे सलग पावणे दोन वर्षे एका दैनिकात लेखकाने सदर लिहिले होते. त्या लेखांसह अन्य काही योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. लेखक हे सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्‍या बीडसारख्या जिल्ह्यातील असल्याने ग्रामीण भागाकरिता शासकीय योजनांची आवश्यकता त्यांना पूर्वीपासून महत्त्वाची वाटत होती. पुढे पत्रकारितेत कारकीर्द घडवताना या विषयाला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यातून ‘योजनांची विकासगंगा’ हे पुस्तक साकारले आहे.

या पुस्तकात राज्य व केंद्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक इत्यादी शासनाच्या पातळीवरील योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विभागनिहाय योजनांचे वर्गीकरण करण्याऐवजी लेखकाने विषयनिहाय योजनांचे गट करून त्यासंदर्भातील योजनांचा एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे वाचकांना हवी असलेली योजना शोधणे अधिक सोयीचे झाले आहे. कृषी, पणन, ङ्गलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामोद्योग व मत्स्यसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, कामगार व समाजकल्याण, क्रीडा, युवक कल्याण व स्वयंरोजगार, महिला विकास, बालकल्याण, आदिवासी विकास, अपंग व अल्पसंख्यांक, महसूल व वन, टपाल खाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकासाच्या योजना (जिल्हा परिषद), माजी सैनिक कल्याण इत्यादी विषयांचा त्यामध्ये समावेश आहे.

प्रत्येक योजनेची मांडणी एका पानात अगदी नेमक्या शब्दात आणि प्रस्तावना, योजनेचे निकष (पात्रता), आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याकरिताची माहिती या नमुन्यात केल्याने अधिक सुटसुटीतपणा आला आहे. पुस्तकाच्या शेवटी शासनाच्या महत्त्वाच्या संकेतस्थळांचे पत्ते, सविस्तर पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासह कृषी संशोधन विषयक महत्त्वाच्या संस्थांची यादी इत्यादी पूरक माहिती समाविष्ट केल्याने वाचकांना संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो.

समर्पक मुखपृष्ठ, पुरेसा मोठा टाईप (ङ्गॉंट) आणि आवश्यक त्याठिकाणी रेखाचित्रांचा वापर केल्याने पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. या पुस्तकातील योजनांच्या अंमल-बजावणी तसेच कार्यप्रणालीविषयी सविस्तर माहिती शासनस्तरावरून घेण्यात यावी; असे प्रकाशकाने सुरुवातीलाच प्रामाणिकपणाने सूचित केले आहे.
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, लघुद्योजक, व्यावसायिक आदी वर्गाकडून पुस्तकाला विशेष प्रतिसाद मिळत असून, लवकरच पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.  शासनाच्या इतर योजनांचे स्वतंत्र पुस्तक (पुस्तके) लिहिण्याचे लेखकाने अक्षरकार्य हाती घ्यावे, अशी वाचकांकडून होत असलेली अपेक्षा या पुस्तकाचे यश अधोरेखित करते.

देशातील एक नागरिक म्हणून आणि शासकीय योजनांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्‍वास वाटतो.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...