8/04/2014

हृदयस्पर्शी : डबा

आज तो मोठ्या आशेने वेशीजवळ थांबला होता. मजूरअड्डा त्या वेशीचं नाव. लोखंडाचा एक डबा अन् सोबत फडक्यात बांधलेली भाकरी त्याला बळ देण्यास पुरेशी होती. मुकादम येत होते. मजूर घेत होते. अन् निघून जात होते. सगळ्या मुकादमांचे मजूर ठरलेले. त्यातील त्यांचे कमिशनही ठरलेले. हा या बाजारात नवीनच होता. 2-4 दिवस कुठलेतरी काम मिळाले म्हणून भागले. आता पुढे काय? ही चिंता त्याला कधीच नव्हती. तशी ती आजही नव्हती. पण दिवस पुढे जाऊ लागला. सूर्यासोबत ह्याच्या पोटातील भूकही तापू लागली. दुपारचे 2 वाजले तरी याला काम नाही.

आज दुपारचा डबा भरलेला होता. पण ह्याला आजच्या रात्रीची चिंता होती. घरी गेल्यावर दोन लेकरं अन् बायको वाटेकडं आस लावून बसलेली असतील. जो डबा सकाळी आणला त्याच डब्यात उद्या शिजवून खायचं सामान घेऊन जायचं होतं. प्रश्‍न भुकेचा होता. काम करावं हे एकच उत्तर होतं. पण प्रश्‍नात अन् उत्तरात अंतर खूप होतं. उद्यासाठी लागणार्‍या सामानाचं दुकान घराच्या समोर होतं. पण तिथं जाण्यासाठी या ‘मजुरअड्ड्याच्या’ रस्त्यानं जावं लागत होतं. तिथं जाण्याचा दुसरा मार्गच नव्हता.

संध्याकाळ झाली तरी कामाचा पत्ता नव्हता. आता आशा संपली होती. पोटातल्या भुकेनंही आशा सोडली होती. त्याच्यापुरता आजचा दिवस भरला होता. कामाशिवाय. अन्नाशिवाय. आता उद्याची फिकिर सतावत होती. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. आपण स्वत: दुपार अन्नाशिवाय काढली. रात्र कशीतरी जाईल. मात्र उद्याच्या दुपारसाठी आजची संध्याकाळ ‘उपाशी’ राहण्याची विनंती वाट बघणार्‍या घरातल्या लोकांना करण्याचं  बळ एकवटत तो घराच्या वाटेकडं निघाला...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...