2/24/2014

स्वर्गस्थ पित्याला आर्त हाक!

प्रिय दादा,

तुम्ही जेथे गेला आहात, तेथपर्यंत हे पत्र पोचेल की नाही याची शाश्वती नाही. पण मला नक्कीच खात्री आहे. देव आहे. त्याच्या चरणाजवळ आपण सध्या बसलेला आहात. आणि तोच तुम्हाला सांगेल, ‘‘उत्तमराव बघा तुमच्या बाळूनं तुमच्यासाठी पत्र लिहिलं आहे...’’


लहानपणी माझा हात तुमच्या हातात होता आणि अगदी परवापर्यंत तुमचा हात माझ्या हातात होता. आता तुमचे हातांसहित तुम्ही कुठे गेले आहात हे माझे मलाच ठाऊक नाही. मी छोटा असताना तुम्ही घरात नसलात की सांगायचो दादा ऑफिसला गेलेत, दादा बाहेर गेलेत म्हणून! पण आज कोणी घरी आलं आणि विचारलं तर मी काय सांगू? तेव्हा आपण कोठे चालला आहात हे सांगून जात होत. मात्र, पुरवा तुम्ही कोठे चाललात हे सांगून गेला नाहीत. तुम्हीच शिकवलतं ना, ‘बाहेर जाणार्‍यांना कोठे चाललात हे विचारू नये!’ म्हणून त्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला विचारलं नाही, ‘‘दादा कोठे चाललात?’’


दादा तुम्ही गेला नाहीत तर फक्त तुम्ही नश्वर जगाची गाडी सोडून इहलोकाचा प्रवास सुरु केलात. पण या नश्वर जगातून काय गेलं बघा... श्री.उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर नावाच्या 73 वर्षाच्या माणसाचा क्षणार्धात ‘मृतदेह’ झाला. दादा तुम्ही गेलात. आईचे ‘मालक, सौभाग्य’ गेले, माझे, स्वातीताईचे, ज्योतीताईचे ‘दादा’ गेले, कीर्तीताईचे, आरतीचे ‘पप्पा’ गेले. अनिषचे ‘आबा’ गेले. किरणभाऊजी, महेशभाऊजी आणि अंकुशराव यांचे ‘सासरे’ गेले. कुणालआर्याचे, तन्वी-तन्मयचे ‘आजोबा’ गेले. तुमच्या सहकार्‍यांचे ‘नाचणे मामा’ गेले...


दादा तुम्ही आयुष्यभर आम्हाला जेथे न्याल तेथे स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. परवा तुम्ही आम्हाला सोबत नेले नाहीत किंवा स्वर्गही निर्माण केला नाहीत. कारण तुम्ही जेथे गेला होता, तेथे प्रत्यक्ष स्वर्ग होता. तुमच्या दशक्रियाविधीच्यावेळी तुमच्याच अंशातून निर्माण झालेल्या मला ‘मीच’ स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा भास झाला.


दादा, तुम्हाला आठवतयं? लहानपणी तुम्ही आम्हा सार्‍या भावंडांना घेऊन नदीशेजारच्या बागेत जात होता. बागेतील ससा, हरिण आणि माकड या प्राण्यांना जाळीतून आपण मुरकुलं खायला देत होतो. एकेदिवशी नदीला पूर आला आणि पूरासोबत बागही वाहून गेली, सारे प्राणीसुद्धा. त्यादिवशी तुम्ही घरी आल्यावर तुमच्या मांडीवर आम्ही सारे जण रडलो होतो. तेव्हा तुम्ही नि:शब्द होता. परवा तुम्ही जगाच्या प्रवाहातून निघून गेलात तेव्हा मीसुद्धा नि:शब्द होतो. त्यावेळी मला तुमच्या नि:शब्दतेचा अर्थ समजला होता.


दादा, तुम्हाला आठवतयं. आपल्या स्वातीताईचं लग्न जेव्हा मी ठरवलं, त्यावेळी मी लग्नाचं सारं मॅनेज केलं, लग्न व्यवस्थित पार पडलं. अन् मी पुन्हा बीडमधून पुण्याला यायला निघालो, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, ‘‘बाळू, तू आता एवढा मोठा झाला आहेस की मी आता डोळे मिटले तरी हरकत नाही...!’’ तुमचं वाक्य तुम्ही खोटं ठरवलतं कारण जाताना तुम्ही डोळे उघडेच ठेवून गेलात. कदाचित माझे भावी कर्तृत्त्व तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहायचे असावेत. दादा जिवंतपणी मरणाची कल्पना करणं आणि त्याला कवेत घेण्यासाठी उत्सुक असणं, यापेक्षा जीवनाचं दुसरं कृतार्थपण नाही. डोळे मिटण्याची गोष्ट केल्यावर केवळ 3 वर्षे आपण हे जग उघड्या डोळ्यांनी पाहिलतं. अगदी कृतार्थपणे. दरम्यानच्या काळात तुम्हाला गुडघ्याला होणार्‍या वेदनांवरील साधी एक दोन रुपयांची वेदनाशामक गोळी आणल्यानंतर तुम्हाला केवढा आनंद व्हायचा ना! त्या गोळीच्या वेदनेपेक्षा ‘माझ्या बाळूनं ती माझ्यासाठी अगदी आठवणीनं आणली आहे’ ही भावनाच आपल्या जीवनातील सार्‍या वेदना दूर करीत होती.


देव आहे असे आपण नेहमी म्हणायचात. आपण प्रामाणिकपणानं कष्ट केले तर कधीच उपाशी राहणार नाहीत, तसंच कामाच्या मोबदल्याशिवाय कामावरील निष्ठा अधिक महत्त्वाची असते. मोबदला हा उदरनिर्वाह असतो, तर काम हा व्यक्तिविकास असतो. एवढे थोर विचार आपण अगदी सहजपणे शिकवलेत. लौकिक अर्थानं नव्हे तर अलौकिक अर्थाने आपण आम्हाला गर्भश्रीमंत केलेत.


सरकारी नोकरीत असतानाही आपण स्वत:चे घर घेतले नाहीत. प्रत्यक्ष घरापेक्षा हृदयाहृदयांमध्ये ‘घर’ बांधण्याचा अनमोल संदेश आपण आपल्या हयातभर देत राहिलात! त्यामुळेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील आपल्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला सार्‍यानं अश्रू ढाळून आपल्याबद्दलचा कृतार्थभाव दर्शविला होता...
 

जाता जाता एक सांगतो आईला अहैवपणी मरण्याची इच्छा होती. पण कदाचित तुमची अन् देवाचीच अशी इच्छा असेल की, आईनं आमच्यासाठी अजून खूप जगावं म्हणून...
 

दादा, तुम्हाला मी नेहमी वेगवेगळ्या कविता वाचून दाखवायचो आजपण मला विंदा करंदीकर यांच्या दोन ओळी आठवत आहेत. कदाचित विंदा आपल्या शेजारीच बसले असतील. 
‘भावनेला गंध नाही, वेदनेला छंद नाही, जीवनाची गद्य गाथा वाहते ही बंध नाही।’
 

दादा, तुम्ही या नश्वर जगातून गेलात, पण आमच्या हृदयातून नाही... त्यामुळे आमच्यासाठी तुम्ही कोठेच गेला नाहीत...

तुमचाच
बाळू
Related Posts Plugin for WordPress, Blogger...