4/16/2014

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी या लेखातील लिंकवर क्लिक करा

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा. 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आपल्या देशात साजरा होत आहे. अर्थात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागलेत. आपल्याकडे अनेकत्व मतदान पद्धती अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांपैकी ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजेता ठरतो. अन्य लोकशाही देशात विज्येत्या उमेदवाराला मतांची विशिष्ठ टक्केवारी मिळाल्याशिवाय मतदान पूर्ण होत नाही. तेवढी टक्केवारी पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा मतदान घ्यावे लागते. असो. 

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा. 

 यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांना पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रतीक्षा आहे मतदानाची.  आपल्याकडे अवैध पद्धतीने मत विकले जाते. अर्थात गोपनीय पद्धतीने. खरे तर मत विकने म्हणजे देश विकण्यासारखेच आहे. ५००-१००० रुपयांत आपण देशाची सत्ता विकत असतो. जर विचार करा खरेच आपल्या मताची किंमत तेवढीच आहे का? आपली गरज असते आणि ती भागते पण त्याबदल्यात आपण काय करत असतो याची जाणीव ना घेणा-याला असते ना देणा-याला. त्यामुळे पैसे घेताना किमान आपण ज्या स्वतंत्र भारतात राहतो त्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांना आठवा. ज्यांनी आपल्या तन, मन, धनाची आहुती देशासाठी समर्पित केली. आता कोणी जर असा प्रश्न उपस्थित केला की निवडुन येणारा नेता कितीतरी संपत्ती कमवतो. मग आमच्या ५००-१००० ने काय कोणार आहे? सृजनहो, जर तुम्ही कोणाचे पैसे घेतले नसतील तरच तुम्हाला याची जाणीव असेल. जेणेकरून तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व करणा-याला त्याविषयी जाब विचारू शकाल. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासून करावी लागते. 


आता, मुख्य प्रश्न आहे तो मतदानासाठी बाहेर पडण्याचा. लक्षात ठेवा; रक्ताचा एक थेंब, अश्रुचा एका थेंब आणि एक मत मोठ्ठं परिवर्तन करू शकतं. त्यामुळे माझ्या मताने काय फरक पडणार असा विचार सोडून द्या. मत कोणालाही द्या, कोणालाही देऊ (नकाराचा अधिकार)  नका. पण तुमचं मत व्यक्त करा. अर्थात ते गोपनीयच असणार!  मताचा टक्का ज्यावेळी वाढेल त्यावेळीच चांगला उमेदवार देशाला मिळेल. त्यामुळे चला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होउयात. मतदान करूयात! त्यासाठी शुभेच्छा! महाराष्ट्रातील सर्वात जास्त टक्के मतदान करणारा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवुयात! त्यासाठीही शुभेच्छा!


मतदान यादीत नाव शोधण्यासाठी येथे  क्लिक करा.

4/11/2014

माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास

मित्रहो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वावरत आहोत. संगणकाच्या समोर बसून आपण जगातील घडामोडी प्रत्यक्ष  डोळ्यांनी पाहू शकतो. क्षणार्धात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात विविध माध्यमातून संपर्क साधू शकतो. अगदी कल्पनेपलिकडच्या विकासाच्या युगात आपण जगत आहोत. मात्र, हे सारे होत असताना आपल्या गावाच्या विकासात माहिती तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होत आहे याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.  दररोज तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

एकविसाव्या शतकात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे.  याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. जमिनीच्या नोंदणीसंदर्भातील प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा अधिक गतीने उपलब्ध होऊ लागली आहे. संगणकीय प्रणालीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत शेतकर्‍यांना उत्पादनाच्या किंमती मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यावरून शेतकर्‍यांना बाजारभावाचा अंदाज येत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्याचा उपयोग अपेक्षित भाव देणारे उत्पादन घेण्यासाठी होत आहे. आपली शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकर्‍याला हवामानाच्या अंदाजाची आवश्यकता असते. यासाठी दररोजच्या हवामानाच्या अंदाजासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध संगणकीय प्रणाली शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्यामुळे अनपेक्षित नुकसान टाळता येणे काही अंशी शक्य झाले आहे. खुल्या झालेल्या माहितीच्या महाजालामुळे विविध उत्पादनांविषयी त्यांच्या लागवडीविषयी, त्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या भौगोलिक परिस्थितीविषयी, त्यावर पडणार्‍या संभाव्य रोगांविषयी, त्यासाठी आवश्यक असणार्‍या उपाययोजनेविषयी, सविस्तर माहिती घेणे शक्य झाले आहे. जेणेकरून शेतकरी ‘प्रगती’च्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. याबरोबरच शेतीमालावर कुठे कुठे काय संशोधन सुरू आहे, त्याचे काय निष्कर्ष आहेत, पिकाच्या नवीन जातींचे आगमन, प्रतिकारशक्ती, उत्पादकता याबरोबरच प्रक्रियेसाठी लागणार्‍या मालाचा दर्जा, उपलब्धता, बाजारभाव, क्षेत्राची निश्‍चिती, पुरवठ्याचा हंगाम इत्यादी अनेक गोष्टींची माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून शेतकर्‍यांपर्यंत पोचत आहे. तसेच शेतीसंदर्भातील जोडधंद्यांविषयीही सविस्तर माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.

गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. महाराष्ट्र शासनाने महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती देणारी देणारे संकेतस्थळाचे अर्थात वेबसाईटचे नुकतेच उद्घाटन केले आहे. www.mahalaxmisaras.org या संकेतस्थळावर राज्यातील 700 हून अधिक बचतगटांची माहिती, संपर्क क्रमांक आणि त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे. यातून या बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसाराकरिता नवे माध्यम उपलब्ध झाले आहे.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून परस्पर संपर्कात राहता येणे तर शक्य झाले आहेच शिवाय संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम आपल्या गावात बसूनच पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय तिकिट बुकिंग, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज, माहितीसाठी इंटरनेट सुविधा आदी सुविधा उपलब्ध असलेले केंद्र उभे करून स्वतंत्र व्यवसायाची संधी प्राप्त झाली आहे. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते. याशिवाय गावाच्या ठिकाणी राहूनच इंटरनेटच्या माध्यमातून बहिस्थ पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक प्रशिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. त्यामधून माहिती तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांकरिता ग्रामीण युवक पात्र ठरत आहे.

मित्रांनो, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला संगणक साक्षर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीही आता गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. आता गावोगावी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा केंद्रांमार्फत माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. एमएस-सीआयटी अर्थात महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि प्रमाणित अभ्यासक्रमातून संगणक साक्षर होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या अभ्यासक्रमामध्ये संगणकाच्या प्राथमिक माहितीपासून ते सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच संगणकाशी संबंधित विविध उपकरणांची हाताळणी जसे की स्कॅनर, प्रिंटर इत्यादींविषयीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता तुमच्याकडे केवळ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती आणि एसएससी अर्थात दहावी पास असणे आवश्यक आहे. मात्र दहावी पास असणे ही अट अनिवार्य नाही. याचाच अर्थ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती असली तरी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमांसह हिंदी, गुजराती, तेलगु, कन्नाडा, माध्यमातूनही उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून या अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा प्रकारची नोकरी मिळू शकते.

मनोरंजन क्षेत्राच्या प्रसारामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे ग्रामस्थांना सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून दर्जेदार आणि विनाअडथळा मनोरंजन तसेच वृत्त वाहिन्यांचा आनंद घेता येऊ लागला आहे. त्याचप्रमाणे माध्यम क्षेत्रातही उल्लेखनीय बदल झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील वृत्तपत्रे वाचता येणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वांना खुल्या असलेल्या विविध ठिकाणी अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्यही प्राप्त झाले आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नावर संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासही तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ज्यामुळे विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. थोडक्यात, ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही उक्ती प्रत्यक्ष अनुभवली जात आहे. ग्रामीण भागात विविध कला आणि गुण असणारे अनेक कलाकार असतात. परंतु संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या कलेची माहिती जगासमोर येत नाही. सोशल नेटवर्किंग माध्यमातून त्यांच्या जगासमोर प्रस्तुत करता येते. त्यामुळे त्यांना व्यासपीठ उपलब्ध होणे आणि त्यातून त्यांची कलाकार म्हणून जडणघडण होणे शक्य झाले आहे.

शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे उपलब्ध असल्याने ग्रामस्थांना संबंधित कार्यालयांना थेटपणाने संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. जेणेकरून शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत जाऊन सुप्रशासनाकडे वाटचाल होत आहे. शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक, शासनाचे अध्यादेश, नवी नोकरभरती प्रक्रिया आदी माहिती शासनाच्या ुुु.ारहरीरीहीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.
गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून थेट प्रशिक्षण वर्ग प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. मदत घेऊ शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे शासनातील रिक्त पदांकरिता अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर संकेतस्थळाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज करता येणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मदतीने शासनाच्या विविध विभागांच्या रिक्त पदाच्या भरतीसाठी संकेतस्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे गावकर्‍यांचा वेळ आणि श्रम वाचतात.
याहीपलिकडे जाऊन काही कारणामुळे गावाबाहेर गेेलेल्या गावकर्‍यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या गावाची माहिती, भौगोलिक परिस्थिती तसेच ताज्या घडामोडी आणि गावातील विविध कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.
मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आपल्या आणि पर्यायाने गावाच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात. धन्यवाद!

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर झालेले भाषण)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...