11/30/2014

ब्लॉग कसा लिहावा

प्रत्येकात एक उत्तम लेखक दडलेला असतो. प्रत्येक माणसानं जेवढं आयुष्य जगलं आहे तेवढ्याच आयुष्यावर एक कादंबरी होइाल एवढं मोठं असतं. आता हेच बघा ना, आपण स्वत: कसे जगलो? आपल्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे विवाहसोहळे, आपण नोकरीसाठी दिलेली मुलाखत किंवा व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात या साऱ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात. त्याला शब्दांच्या माळेमध्ये गुंफून फुलांची सुंदरशी माळ पाहणाऱ्याला मोहित केल्याशिवाय राहणार नाही.

कधी-कधी आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की आपण काहीतरी लिहावं. लिहिलेलं कोणीतरी वाचावं. वाचून प्रतिक्रिया द्यावी. परंतु त्यासाठी आपल्याला योग्य व्यासपीठ कोण उपलब्ध करून देणार? आपलं लेखन कोण वाचणार? त्यावर प्रतिक्रिया तर दूरची गोष्ट, असं आपल्याला सतत वाटत रहातं. परंतु हो, हे शक्‍य आहे. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता तुमचं स्वत:चं लेखन जगासमोर अगदी अवघ्या जगासमोर मांडू शकता. त्यासाठी आपल्याकडे केवळ एक संगणक आणि इंटरनेटची जोडणी असली की झालं. मग तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तरीही काही अडचण नाही. चला तर मग या साऱ्या गोष्टी कशा करायच्या हे शिकून घेऊयात.


Official Definition of Blog

A blog (a truncation of the expression weblog) is a discussion or informational site published on the World Wide Web and consisting of discrete entries ("posts") typically displayed in reverse chronological order (the most recent post appears first).


शिकण्यापूवी 
जगात गुगल हे  Searching च्या लोकप्रिय सेवेसह, इमेल, युट्युब, गुगल प्लस आदी सुविधा पुरविते. त्यामध्ये ब्लॉगिंग सेवेचाही समावेश आहे. गुगलच्या सेवा लोकप्रिय आणि तुलनेने अधिक विश्‍वसनीय असल्याने गुगलच्या सेवा वापरून ब्लॉग तयार करण्यासाठी ब्लॉगस्पॉट  या साइटचा वापर करून ब्लॉग कसा तयार करायचा हे येथे सांगितले आहे. गुगलशिवाय वर्डप्रेससारख्या अन्य असंख्य सेवाही उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी ब्लॉग तयार करण्यचीा प्राथमिक प्रक्रिया ही सारखीच आहे. त्यामुळे कोणतीही एक प्रक्रिया शिकल्यास अन्य ठिकाणी सहज ब्लॉग तयार करता येणे शक्‍य आहे.



चला ब्लाग तयार करू या...

  1. ब्लॉग तयार करण्यासाठी तुमच्याकडे ज्याला इंटरनेटची जोडणी केलेली आहे असा एक चांगला संगणक असणे आवश्‍यक आहे. तसेच जीमेलचा इमेल आयडी असणे आवश्‍यक आहे. तो नसल्यास तुम्ही केवळ काही मिनिटांत तो तयार करू शकता. त्यासाठी येथे क्‍लिक करा. (www,gmail.com) 
  2. आता blogger.com ही साइट ओपन करा. तेथे आपला जीमेलचा इमेल आणि पासवड द्यावा. 
  3. आता आपणांस जी स्क्रिन दिसेल तिच्या डाव्या बाजूला New Blog अशी स्क्रीन मिळेल. तेथे क्‍लिक करा. 
  4. आता समोर केवळ तीन जागा भरणे आवश्‍यक आहे. एक Title (तुमच्या ब्लॉगचे टायटल जे ब्राऊजरच्या वर निळ्या पट्टीत दिसेल), Address (तुमचा ब्लॉगचा पत्ता) and Template (तुमच्या ब्लॉगची डिझाइन) बस्स या तीन जागा भरून आपण Create Blog म्हणालात की झाला तुमचा ब्लाग तयार! 


माहिती असायला हवी अशी माहिती... 
1) ब्लॉग तयार करण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. तसेच कोणताही खच येत नाही.

2) एका इमेल आयडीवरून कितीही ब्लॉग तयार करता येतात. एका ब्लागवर कितीही लेख लिहिता येतात. एका लेखात कितीही शब्द, फोटो, व्हिडीओ वापरता येतात. तसेच ब्लॉग कधीही आपोआप डिलीट होत नाही.


पुढील लेखात
सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगमध्ये काय फरक आहे?
ब्लॉगमध्ये लेख कसे लिहायचे?
ब्लॉगचा प्रचार कसा करायचा?
ब्लॉगवरून पैसे कसे कमवायचे?

11/27/2014

सुरुवात स्वत:पासून....

दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले,  "समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' 

दारावरची बेल वाजली. रखमाने दार उघडले. 

दारात कडक पांढरे कपडे परिधान केलेले काही नेत्यासारखे दिसणारे कार्यकर्ते होते.
कार्यकर्त्यांना अदबीनं विचारलं, ""बाईसाहेब आहेत का घरात?''
रखमानंही तेवढ्याच अदबीनं उत्तर दिलं, ""व्हय, या, या!''

***

बाईसाहेब बैठकीतच बसल्या होत्या. घर तसं मोठ्ठं होतं. घर कसलं बंगलाच होता तो. बाईंनी भाषणं करून करून कमावलेला. पण घरात रखमा, बाई आणि एक कुत्रं यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. चार-पाच नोकर होते पण ते मुक्कामी नव्हते. 


बाईंची एक मुलगा देशाबाहेर नोकरी करत होता. त्यांची भेट फक्त वर्षातून एकदाच होत होती. तीही काही अगदी बोटावर मोजण्याएवढ्या शब्दांनी. त्याला काही कमी नव्हतं. बाईंचंही बरं चाललं होतं. देण्या-घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. ना पैसा, ना प्रेम! शिवाय बाईंचा दुसरा मुलगा बाईंच्या बरोबरविरूद्ध होता. खराखुरा समाजसेवक. विद्यार्थी होता पण समाजाबद्दल तळमळ होती. त्यामुळेच त्यानं समाजकार्यात पदव्युत्तर पदवी मिळविली होती.

***
 
प्रवेशाची प्रतिक्षा खोली ओलांडल्यावर बाईंचे दर्शन घडले. बाईंनीही बसल्याजागीच स्वागत केले आणि "बसा' असा आदेश फर्मावला. प्रथेप्रमाणे रखमा पाहुण्यांसाठी लिंबूशरबत आणण्यासाठी गेली.
सर्वांनी नमस्कार-चमत्कार केले. 


एक कार्यकर्ता बोलू लागला, "बाईसाहेब गेल्यावेळी वर्धापनदिनानिमित्त आपण जबरदस्त बोलला होता. त्यामुळे यंदाही आपणच यावं अशी आमची विनंती आहे.'' 


बाईसाहेब आनंददायी स्वरात म्हणाल्या, ""आपल्याला ठाऊक असलेलं लोकांना सांगण्यात काय हरकत आहे. कधी आणि कुठं सांगा!'' 


कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण बाई येणार म्हटलं की कार्यक्रम हाऊसफुल्ल. बाई काहीतरी वेगळं बोलणार म्हणून मिडियावालेपण येणार. संस्थेच्या वर्धापनदिन उत्साहातच होणार.

कार्यकर्त्याने तारीख वगैरे औपचारिकता पूर्ण केली. बाई म्हणाल्या, ""बाकी मानधनाचं पूर्वीप्रमाणेच. काय आहे मी ते स्वत:कडे घेत नाही. संस्थेला दान करते! तेवढंच समाजकार्य''
कार्यकर्ते मनातल्या मनात बाईंच्या थोरपणाचे कौतुक करू लागले. तेवढ्यात रखमा लिंबूशरबत घेऊन आली.
बाईंच्या उत्साहाला चेव फुटला, ""आता हेच पहा ना, ही रखमा आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून काम करतेय. पण तिला आम्ही कधी परकी मानलेच नाही.''

कार्यकर्ते अधिक खूष झाले आणि शरबत पिऊन पुढील तयारीसाठी बाहेर पडले.
***
बाईंच्या मनात विचारांची चक्रे सुरू झाली. कोणत्या विषयावर बोलावं, बाईंनी 2-4 पुस्तके चाळली आणि त्यांना विषय सुचला. पुढील 2-3 दिवसांत त्यांनी तो लिहूनही काढला. कार्यक्रमाला अद्याप 8-10 दिवस बाकी होते. त्यामुळे बाईंनी पुरेशी तयारी केली.
***
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. बरोबर कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी गाडी बाईंच्या दारात एक चकाचक नवी कोरी गाडी उभी राहिली. बाई कार्यक्रमाच्या स्थळी रवाना झाल्या. कार्यक्रम सुरू झाला. बाईंचं भाषणही जोरदार झालं. लोकांनी टाळ्यांच्या कडकडटात दाद दिली. कार्यक्रम संपला. बाई घरी आल्या. रखमाने लिंबूशरबत दिले. बाई मानधनाची रक्कम मोजू लागल्या आणि त्यांनी रक्कम पर्समध्ये व्यवस्थित ठेऊन दिली. उद्या त्यांना काहीतरी खरेदी करायचं होतं. कारण त्याही या समाजातील एक घटक होत्या. त्यांनी मानधन स्वत:लाच दान केलं होतं.

***

दुसऱ्या दिवशी सकाळीच कार्यकर्ते बाईंच्या दारात हजर. बाईसाहेब योगायोगाने बाहेरच्याच खोली होत्या. त्यांना पाहून कार्यकर्त्याला रहावलच नाही. ""बाईसाहेब काय जबरदस्त भाषण केलत. सगळे एकदम खूष. मिडियावाले तर जाम इंप्रेस! आमच्या संस्थेतील ऍडमिशन पण वाढली....'' सोबतच्या कार्यकर्त्यानं त्याचं भान सुटायच्या आत त्याला धक्का दिला.
बाई, शांत, धीरगंभीर. त्यानंतर पुन्हा एका कार्यकर्त्यानं कालच्या कार्यक्रमाची पेपरची कात्रणं बाईंना देऊ केली. तसेच उद्या सकाळी 9 वाजता आपले भाषण रेडिओवरून प्रसारित होणार असल्याचंही सांगून टाकलं.
***
इतका वेळ दाबून ठेवलेला आनंद बाईंनी व्यक्त करायला सुरूवात केली. कात्रणं नजरेखालून घातली आणि त्यांना आपण खरच मोठे झाल्याचा भास झाला. आता दुसऱ्या दिवशीची त्या वाट पाहू लागल्या. दरम्यान समाजातील "प्रतिष्ठितांचे' कालच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया देणारे अनेक दूरध्वनी दिवसभर खणखणत होते. बाईंच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यातच त्यांनी रखमालाही कालचं भाषण ऐकायला बोलावलं. विशेष म्हणजे आपण एकत्र ऐकूयात असच सांगितलं.
***
दुसरा दिवस उजाडला. रखमा आणि बाईसाहेब. रेडिओ सुरू झालेला. बाईसाहेबांचे भाषण सुरू झाले, 
"समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर झाले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय कोणतेही भेद ठेवायला नकोत. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत आहोत. आपणच आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुला-मुलींचे विवाह जमवताना या भेदांना थारा द्यायला नको. फक्त माणूस हा धर्म आणि स्त्री आणि पुरूष ही जात....'' पुढे 10-12 मिनिटे भाषण चाललं. 

रखमा मोहित झाली. तिच्या उत्साहाला उधाण आलं.
ती बाईंना म्हणाली, ""बाई एक विचारू?'' बाई प्रचंड आनंदात,
"विचार संकोच करू नको.'' रखमाने मनातल्या मनात 2-3 वेळा विचार केला.
तिची मुलगी तीही वयात आलेली. बाईंचा भारतातील मुलगा तोही वयात आलेला. बाईंच्या इकडं तिकडं दौऱ्यावर त्यामुळे दोघं लहानपणी एकत्रच खेळत होते. आतासुद्धा ते...

"अगं विचार ना!'' बाईंनी तिला प्रेरणा दिली. "

"बाई, सुरुवात आपण स्वत:पासून करायला पायजेल ना'' बाई हो म्हणाल्या.
"मग, आपणच माझी मुलगी पदरात घेऊन सुरुवात करा ना तुमच्या मुलासाठी!''
बाईंचा आनंद झटकन उतरला अन्‌ त्याची जागा प्रचंड संतापाने आणि रागाने घेतली.
"अगं तुझी लायकी काय तू बोलतीस काय? तुझी हिंमतच कशी झाली असं बोलायची? लाज वाटली नाही का तुला? मला म्हणतेस सुरुवात जगापासून करायची. जा आत्ताच्या आत्ता चालती हो येथून. पुन्हा तुझं काळ तोंड दाखवू नकोस.'' 


रखमा थरथर कापू लागली. रडत-रडत अन्‌ धावत-धावत ती पार्किंगमधील तिच्या खोलीत शिरली आणि मुक्काम हलवण्यासाठी तयारी करू लागली. जाताना म्हणू लागली ""सुरुवात स्वत:पासून नसते करायची?'' 


***

11/16/2014

अन तो निराधार झाला....



ती उठून निघून गेली. तिने तिच्या ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.


ती : भिऊ नकोस, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी प्रथमच करत असतो.

तो : पण, तिने "नाही' म्हटले तर....
ती : तिने "नाही' म्हटल्यावर हा विचार करू
तो : आणि तिने "हो' म्हटले आणि तितक्यात जग बुडाले तर...
ती : तुम्ही दोघं "प्रेमा'त बुडल्यावर जगाच्या भानगडीत कशाला पडता?

रविवारीदेखील त्यांचं एसएमएसवर बोलणं सुरुच होतं. तो अगदी साधा आणि भोळा होता. आणि त्याला ठाऊक होतं "ती' तिच आहे म्हणून. तिलाही नक्कीच ठाऊक होतं "ती' मीच आहे म्हणून. पण तरीही त्यांचा असा लुटूपुटूचा खेळ रंग भरत होता. पुन्हा त्यानं तिला विचारलं, ""मला तिला सांगायचयं मला जे वाटतं, ते कसं सांगू? एसएमएस, समोरासमोर का फोनवर?'' तिचं तात्काळ उत्तर, ""कोणत्याही मुलीला समोरासमोर धीटपणे बोलणारी मुलं आवडतात, पण तू तुझं ठरवं!'' त्यानं ठरवलं. आता थांबायचं नाही. उशिर झाला तर... नको नको उद्याच सांगून टाकू. कारण तो आणि ती एकाच ठिकाणी नोकरी करत होते.


सोमवारची सकाळ उजाडली. ऑफिसला पोचल्यावर खुर्चीवर बसण्याआधी तिचा एसएमएस "काय, विचारलसं का तिला?' त्याच्या छातीतील धडधड आता प्रत्यक्ष जाणवण्याइतपत वाढली होती. यातच तिचा होकार असल्याचं त्याला जाणवत होतं. त्याने थरथरत्या हातानेच रिप्लाय केला, "नाही, आज विचारतो!' दिवसभर तो तिच्या अपेक्षित-अनपेक्षित उत्तराच्या कल्पना विश्वात रमत राहिला. शेवटी निर्धार करुन मोठ्या धैर्यानं त्याने तिला चारच्या सुमारास एसएमएस केलाच, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे. काहीतरी बोलायचं आहे!' वाट पाहत असणाऱ्या तिचा तात्काळ रिप्लाय, "आजच का?' त्याला क्षणभर वाटलं, तूच म्हणालीस लवकरात लवकर सांग म्हणून... पण... त्यानं रिप्लाय बदलला आणि फक्त "प्लिज' म्हणून उत्तर पाठवलं. तिचाही वेगवान रिप्लाय, "ऑफिस सुटल्यावर कॅंटिनमध्ये भेटू!'  "ओके...' म्हणत त्याच्या धडधडीनं अधिक वेग घेतला.


संध्याकाळचे सहा वाजलेले....

तो आला. काही क्षणात तीही आली.
रिकाम्या कॅंटिनमध्ये ते दोघेच....
आता त्याची धाकधूक चेहऱ्यावर अन्‌ शरीरावरही परिणाम करत चालली होती.  त्यानं तिला विचारलं. "थंड' की "गरम'! ती "काहीच नको!' म्हणत असताना त्याने कोल्ड्रिंकची बाटली अन्‌ दोन रिकामे ग्लास आणले. रिकाम्या ग्लासाकडे पाहत त्यानं आतापर्यंतचं आयुष्य कसं रिकामं गेलं याचं मनातल्या मनात चिंतन केलं. अन्‌ दोघांच्या ग्लासात अर्ध्यापर्यंत कोल्ड्रिंक भरलं. तिच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासात त्याला स्वत:चं मनच दिसलं.

सगळं जग संपून गेलं आहे की काय अशी स्मशान शांतता त्याला वाटत होती. मात्र ती समोर असल्यानं त्याला जगाची फिकिर नव्हती. शेवटी तीच म्हणाली, "बोल, तुला काय बोलायचे आहे ते' तो म्हणाला, "मला काय बोलायचं आहे ते तुला माहितच आहे' "पण मला ते तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे' आता त्याची धडधड एवढी वाढली की छाती फुटून जाते की काय असं वाटू लागलं. तो काही क्षण गप्पच राहिला. त्यावेळी ती काही बोलत नसतानाही त्याला ऐकू येऊ लागलं, "बोल, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच करत असतो' तो धीर एकवटत छातीवर नियंत्रण मिळवत तिच्या डोळ्याला डोळे भिडवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याची हिम्मत झाली नाही. पुन्हा स्वत:समोरच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासाकडे पाहत थरथरतच तो म्हणाला, "तू मला आवडतेस!' त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तिने भुवया किंचितश्‍या उंचावून एकदा त्याच्या डोळ्यात एकदा जमिनीकडे पाहून दीर्घ श्‍वास घेतला. त्याला अशा गोष्टींचा कधीच अनुभव नव्हता. त्याची धडधड काही अंशी कमी झाल्याची अनुभूती येत असतानाच तिच्या कटाक्षाने त्याच्यावर घाव केले होते. त्यामुळे त्याची धडधड पुन्हा वाढली होती. ती म्हणाली, "पण मी तसा कधी विचार केलाच नाही' त्याच्याकडे बोलण्यासाठी बळच उरलं नव्हतं. कारण यापूर्वीच त्याने त्यासाठी खूप शक्ती खच केली होती. ती पुढे म्हणाली, "मी, उद्या सांगितलं तर चालेल!' त्याने मानेनेच होकार दिला.

ती उठून निघून गेली. तिने ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.
तो दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्यासाठी तेथून बाहेर पडला. आता पुढचा क्षणन्‌क्षण जाण्यासाठी तो घड्याळाच्या काट्याकडे पाहू लागला. त्याला वाटत होतं, आयुष्य थांबून गेलं आहे. उद्या कधीच उगवणार नाही. पण त्याचक्षणी तिच्या "होकारा'ची त्याच्या मनात कल्पना येत होती अन्‌ तो पुन्हा मोठ्या आशेने घड्याळीकडे पाहत होता. त्याचे असेच विचारचक्र सुरु असताना दिवसानं अंधारात प्रवेश करून रात्रीचा मार्ग खुला केला होता.  त्याच्या कानाभोवती फक्त तिचे शब्द घुमत होते. "उद्या सांगितलं तर चालेल!'

संपूर्ण रात्रभर फार फार प्रत्येक तासात एक मिनिटच त्यानं डोळे बंद केले असतील. ते ही तिची आठवांसाठी.... सकाळ झाली तो मोठ्या आशेनं उठून धडपडू लागला. तिचा "होकार' किंवा "...' ऐकण्यासाठी...

तो ऑफिसला पोचला. त्याला राहवेचना. कसंतरी त्यानं मोठ्या कष्टानं दिवस ढकलला. साधारण पाच वाजता तिचा तोच मेसेज, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे, काही बोलायचे आहे!' ठरलं. कालचीच जागा, कालचीच वेळ...

सहा वाजले...

तीच कॅंटिन तेच कोल्ड्रिंक, अन्‌ दोन ग्लास...
त्याने पुन्हा ते अर्धे अर्धे ओतले. पुन्हा तीच कल्पना.
यावेळी त्याला फक्त भरलेले ग्लास दिसत होते. रिकामे नाही.
ती बोलू लागली, "मी कधी असा विचार केलाच नाही. आमच्याकडे असं काही चालत नाही. तुझी ... अन्‌ माझी ... वेगळी आहे. आपलं होऊ शकणार नाही.' 
तो पुरता कोसळून गेला. होतं नव्हतं तेवढं बळ "ठीक आहे' म्हणण्यात त्यानं वाया घातलं. ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या "छबी'कडंही त्यानं पाहिलं नाही. कारण तिचं त्याचं जमणार नव्हतं.

त्याच्या प्रेमाऐवजी तिनं दोघांमधील भिंतीचाच आधार घेत त्याला कायमचं निराधार केलं होतं. 


11/08/2014

प्रेरणादायी विचार... (02)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात 
हे सारे विचार वाचून होतील. 
मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं 
आयुष्य कमी पडेल 
असे काही प्रेरणादायी विचार....









Related Posts Plugin for WordPress, Blogger...