12/26/2015

व्हॉटस्‌ ऍप'वर हे असले मेसेजेस?

कॉलेजची मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र आली होती. बहुतेक जण नोकरी करणारे होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. त्यामुळे निवांत गप्पा सुरु होत्या. तरीही मध्ये-मध्ये काहीजण व्हॉटस्‌ ऍप पाहत होते. बराच वेळ हा प्रकार चालला होता. त्यावर नाराजी व्यक्त करत एकाने झापायला सुरुवात केली. "आयला, आमी काय इथं मुडदे हायत का? जे आहेत त्यांच्यापेक्षा जे नाहीत त्यांच्याशीच गप्पा. काय राव? बंद करा की ते...‘, अशा शब्दांत नव्या विषयालाच सुरुवात झाली. "या फोनमुळं ना लय ताप झालाय राव!‘, आणखी एकाने सुरात सूर मिसळला. तो बोलू लागला, "परवा मला मेसेज आला काय तर "नोकरीमें मजा मारने के तरीके‘ कुणाला एवडा टाइम असल राव. सुचवायचं, टाईप करायचं आणि पाठवायचं?‘ त्यावर मार्केटिंगमध्ये काम करणारा एक मित्र म्हणाला, "व्हॉटस्‌ ऍप‘वर हे असले मेसेजेस म्हणजे धंदा हैं भौ धंदा... हे असले मेसेज कोणीतरी प्रमोशनसाठी वापरतात आणि पुढे कॉपी-पेस्ट करत आपल्यापर्यंत पोचतोत ते‘, त्याच्याशी मात्र फार जणांनी सहमती दर्शविली नाही. "छोड ना यार, गप्पा मारू‘, मगाशी फोनला टच करण्यात गुंग असणाऱ्यानेच शहाणपणाचा सल्ला दिला. 

"काही म्हणा राव पण या व्हॉटस्‌ ऍपमुळे टाईमपास होतो.‘ एकाने तक्रारीच्या सुरात सांगितले. तर त्यावर दुसऱ्याने तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली, "माणसाचा स्वत:च्या मनावर ताबा नाही. त्याला एखादी गोष्ट मिळाली की ती ओरबाडून तिचा चोथा करायची सवयच असते. त्यामुळे एकवेळ अशी येते की ती गोष्टच नकोशी होते. मग ते व्हॉटस्‌ ऍप असो नाहीतर काहीही...‘ त्यानंतर बराच वेळ या विषयावर खलबते झाली. अगदी टोकाची मतं समोर आली. अर्थात जे बोलत होते ते सगळे रोजच "व्हॉटस्‌ ऍप‘चा वापर करत होते. "खाजगी चॅटिंगसाठी हे फार सोपे आणि फास्ट मेसेंजर ऍप आहे‘, असा विचार एकाने मांडला. तर त्यावर "अरे, भौ तुला माहितेय का खाजगी-बिजगी काहीही नसतं. तू व्हॉटस्‌ऍपवर ज्या गप्पा मारतो त्यावर कंपन्यांचं लक्ष असतं. तुझ्या गप्पांच्या विषयानुसारच तुझ्या फेसबुकवर जाहिराती दिसतात‘, पुन्हा मार्केटिंगवाल्याने ज्ञानदान केले. "अरे ते कसं शक्‍य आहे.?‘ एकाने आश्‍चर्य व्यक्त केलं. "टेक्‍नॉलॉजी है. टेक्‍नॉलॉजी यहॉं कुछ भी असंभव नही है।‘ मार्केटिंगवाला चांगलाच पेटला होता. 

एवढा वेळ शांत असलेल्या एका मित्राने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मौन सोडत म्हटले, "तुम्ही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवू नका रे. त्यात बी पॉझिटिव्ह काय आहे तेवढं बघा.‘ पुढचे काही क्षण शांतता पसरली. "त्यात काय बे बी पॉझिटिव्ह. तू काय करतो सांग की? म्हणे बी पॉझिटिव्ह...‘, एकाने तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. "आता हे बघा. आम्ही काही चांगल्या गोष्टी आमच्या व्हॉटस्‌ ऍप वरून करतो. सगळ्यात पहिली की शक्‍यतो "अनवॉन्टेड‘ वाटणारे मेसेजेस फॉरवर्ड करत नाहीत किंवा रिसीव्ह झाले तर तिथंच पाठवणाऱ्याला कडक सुनावतो. ग्रुपवर शक्‍यतो पॉझिटिव्ह चर्चा ठेवतो. गरज नसताना फालतू मेसेज फॉरवर्ड करतच नाही. कोणी चुकून केलाच तर मात्र त्याला गय नाही. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून दोन दिवस ग्रुपच्या बाहेरचा रस्ता दाखवतो. "पुन्हा अशी चूक करणार नाही‘ अशा अटीवर दोन दिवसांनी ग्रुपमध्ये घेतो. अर्थात कसलेही विनोद आम्ही सहन करतो. पण ते ही ठराविक मर्यादेपर्यंतच. उगाच एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा व्यक्तीला किंवा कोणाच्या भावना दुखावतील अशा मेसेजेस अजिबात थारा नाही.‘ सगळेजण जरा जास्तच मौन सोडलेल्या त्या मित्राला शांतपणे ऐकत होते. 

तो पुढे बोलू लागला, "ग्रुपमध्ये महिन्याला किंवा जेव्हा जमेल तेव्हा सर्वांच्या सोयीने एखाद्या विषयाच्या एक्‍स्पर्टला ग्रुपमध्ये इनव्हाईट करतो. काही तासांसाठी किंवा फार-फार तर दिवसभरासाठी. त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. त्या त्या फिल्डची माहिती घेतो. प्रश्‍न विचारतो. आणि गप्पा झाल्या की ठरल्यावेळी आनंदाने निरोपही देतो. असंच आमच्या एका ग्रुपमधल्या मित्राला दुसऱ्या ग्रुपमध्ये एक दिवसासाठी ऍड करतो. सर्वांच्या ओळखी करून देतो आणि निरोप देतो. त्यातून ओळखी निर्माण होतात. खरंखुरं "सोशल नेटवर्किंग‘ घडतं. शिवाय एखाद्या गरवंताला आर्थिक किंवा अन्य काही मदत हवी असल्यास माहितीची शहानिशा करून त्याबाबतचा संदेशही अनेक ग्रुपवर पाठवतो.‘ एवढं बोलून तो थांबला. 

"तसं अवघड आहे. एवढा खटाटोप करणं. पण अशक्‍य मात्र नाही‘, असं म्हणत सर्वांनीच या पॉझिटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला.
 
(Courtesy: eSakal.com)

12/02/2015

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌...

दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी जिंदगीच बदलून जाते‘, दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्यानं अनुभव सांगितला. "पण लग्नाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. दोनाचे चार हात चाराचे मग...‘ एका सुखी विवाहितानं उत्तर दिलं. "अरे, तुमचे अनुभव लादू नका. त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. अन्‌ ठरवू द्या ना!‘, ऑफिसमधील एका स्कॉलरने विचार मांडला. काही काळ शांतता पसरली. पुन्हा स्कॉलर बोलू लागला, "काय आहे, की 1981-1990 या दहा वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता त्यामुळे या नव्या पोरांना मुली मिळत नाहीएत?‘, स्कॉलरने पुन्हा "स्कॉलर‘ विचार मांडला. "आणि ज्या आहेत त्यांच्या अपेक्षा फारच... हे नको, ते हवं. ते नको हे हवं‘, मुली पाहणाऱ्या अविवाहितानं त्याच्यासमोरील आव्हानं सांगितली. काही वेळातच सगळेजण आपल्या कामाला लागले. हळूहळू चर्चा थांबली.

दुपारच्या चहाची वेळ झाली होती. सर्वजण कॅंटीनमध्ये चहाला जमले. तिथं काम करणारा पोऱ्या चुणचुणीत होता. तो आनंदाने आणि उत्साहाने चहा देत होता. यांच्यामध्ये पुन्हा सकाळची चर्चा रंगली. "हा पोरा बघा. काय फिकर-बिकर काय नाय. दिवसाला पगार. दिवसाचा खर्च भागला. संपलं...‘ एकाने पोराची जिंदगी उलगडून सांगितली. तेवढ्यात चहा घेऊन पोरा आला. "का रे? कशी झाली दिवाळी? सुटी घेतली का नाय?‘, एकाने पोराला सवाल केला. "होय, सायब चांगली 15 दिवस सुटी होती‘, पोराने उत्तर दिलं. "अरे 15 दिवस काय केलस मग?‘, पोराशी संवाद वाढविण्यात आला. "काय, नाय लग्न केलं सायब!‘, पोराने लाजत उत्तर दिलं. "अरे, पण मागे एकदा तू लग्न केलसं म्हणाला होतास ना?‘, एका वरिष्ठ सहकार्याने सवाल केला. "हो! आता हे दुसरं लग्न होतं...‘, पोराने निरागसपणे उत्तर दिलं. त्यावर सर्वांना धक्काच बसला. "आयला, आमाला एक मुलगी मिळना अन्‌ तू दोन दोन लग्न...‘, अविवाहितानं नेमका मर्मावर बोट ठेवला. आता पोरा बोलू लागला, "काय आहे सायब की पटवून घेतलं, समजून घेतलं की भागून जातं. नाय पटलं, नाय आवडलं तर फारकत घेतलेली बरी. मी तसचं केलं. पहिल्या बायकोशी नाय पटलं. तिला, तिच्या घरच्याला बोलावलं. आपलं पटत नाय सांगितलं. कोर्ट, फिर्ट चक्कर नकोय. आमीच तिचं दुसरं लग्न लावून देऊ असं सांगितलं. झालं..‘ पोरा तेवढ्यातच थांबला. आता त्याच्या स्टोरीत सगळ्यांनाच इंटरेस्ट निर्माण झाला होता. "मग, पुढं काय झालं?‘ स्कॉलरने उत्सुकता दाखवली. पोरा पुन्हा बोलू लागला, "सायब, तिनं बी सांगितलं नाय पटत. शेवटी माझ्या गावाकडच्या नात्यातल्यानं त्याना मदत केली दुसरं लग्नबी लावलं. आता माजंबी लग्न झालं. ती खूष मी बी खूष!‘ पोराने स्टोरी पूर्ण केली अन्‌ तो निघूनही गेला.




"बघा, साधा चहा विकणारा पोरगा दोन-दोन लग्न करतो. आपल्याला शहाणपणा शिकवतो. बघा...‘, स्कॉलरनं उपदेश सुरु केला. "त्याचं काय रे त्याची जिंदगी साधी आहे. दिवस भागला. संपलं. आपल्याकडच्या पोरी भविष्याचा विचार करतात. प्रॉपर्टी बघतात...‘, अविवाहितानं त्रागा केला. त्यावर दुसरा एक सहकारी म्हणाला, "अरे पण कसलं भविष्य अन्‌ कसलं काय. चहा विकणारा पोरा काय बी करू शकतो भौ..‘ आता चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. चहाचा कप रिकामा होत होता. चहावाल्या पोराला अनेकांना प्रश्‍न विचारायचे होते. त्यांनी त्याला पुन्हा आवाज दिला. पोरा आला. "काय रे? तुझी कमाई किती? बायको त्रास देत नाही का?‘ एकाने त्याला थेट सवाल विचारला. "सायब, पहिलीला पण मी लग्नाआधीच सांगितलं होतं. आपली कमाई एवढी. पुडं-मागं वाढलं. पर गॅरंटी नाय. वन रूम किचनचं छोटं घर बाप देऊन गेला. तीच प्रॉपर्टी. पर तिला नाय आवडलं. आपण बी जास्त इचार नाय केला. शेवटी इचार करून काय होतं सायब... जिंदगी महत्वाची ना..‘, पोराने तत्वज्ञानचं मांडलं. "लईच बोलतो रे तू....?‘, एकाने पोराची खेचली. त्यावर पोरा सुटलाच, "सायब, तुमच्या जिंदगीशी कंपेर करू नका आमाला. आमच्याकडं मोटं घर नाय. साधी दोन चाकाची गाडी बी नाय. रोजच्या रोज पगार. जे मिळलं त्यात सुख. आता घराजवळ एक चहाची टपरी सुरु केलीया. इथनं गेलं की तिथं धंदा सुरु. कमाई वाडतीया. रोज सुखानं झोप येतीया. बॅंकेच्या हप्त्याची कटकट नाय की हाय-फाय राहणीची... बापाने जिंदगी जगली. अन्‌ सोडली बी. बायको अन्‌ माय सोबत हाय... त्या बी टपरीसाठी मदत करत्यात... हप्त्यातून एकदा कोंबडं कापतो. महिन्यातनं एकदा गोड-धोड करतो. वर्षातनं एकदा फिरायलाबी जातो. एकाद्या दिवशी उपाशी झोपण्याचीबी तयारी हाय. काय जिंदगी असतीया अजून... दररोज पोटभर कष्टाची भाकर अन्‌ रोज रातच्याला शांत झोप...‘, पोरानं त्याचं आयुष्यच वाचून दाखवलं. आता सगळेच शांत झाले. तो तुलना करू नका म्हणत होता. पण सगळेजण स्वत:च्या जगण्याचीच त्याच्याशी तुलना करत होते.

सगळीकडे स्मशान शांतता पसरली. काही वेळाने स्कॉलर बोलू लागला, "काय असतं. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं नाही. मुलांच्या पण अपेक्षा असतातच. गोरी हवी, काळी नको. स्वयंपाक यायला हवा. गाडी यायला हवी. साडी घालता यावी. बाप श्रीमंत असावा. जावयाचा लाड करावा. बहिण-भाऊ शक्‍यतो नसावेत. आदी आदी...‘ आता अविवाहित बोलू लागला, "समजा, यापैकी एकही अपेक्षा नसेल तरीही मुलींच्या अपेक्षा असतातच ना?‘ "बीऽऽऽऽ कूल... अरे जी मुलगी आपली अख्खी लाईफ सोडून तुमच्याकडे येणार असते तिनं अपेक्षा ठेवल्या तर बिघडलं काय रे? तिने नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात!‘ स्कॉलर पेटला.

आता वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "शेवटी काय आहे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा एकूणात विचार हवा. शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्‍न असतो. प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींचं प्रमाणही ठरवायला हवं. अन्‌ त्या स्वीकारून आयुष्यभर परस्परांची साथ देण्याची हिम्मतही असावी. तसं झालं नाही तर प्रसंगी फारकत घेऊन दूर जाण्याचीही तयारी असावी. या पोरासारखी. जे आहे त्यात सुख मानायला हवं. जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नही अवश्‍य करावा. पण वास्तवाचं भान हवं. परस्परांना साथ द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... लक्षात ठेवा नवरा आणि बायको अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असताता, इतरांची खात्री नसते...‘सर्व वातावरण गंभीर झाले. ‘सिरीयसली विचार करा मित्रांनो आणि मात्र आता चला काम पडलीत...‘ असं म्हणत स्कॉलरने पूर्णविराम दिला.

(Courtesy: esakal.com)

11/18/2015

लहानपणीची दिवाळी!

प्रिय बाबा,
परवा तुमच्या जुन्या पेटीतून नवा आकाशदिवा काढत होतो. आणि एकदमच लहानपणीच्या आपल्या मोठ्या वाड्यातील दिवाळीची आठवण झाली. किती मजा यायची ना! तुम्हीच सगळं करायचात. आम्ही फक्त मज्जा करायचो. दिवाळीच्या आधी पहिल्या सत्राची परिक्षा व्हायची. त्यानंतर लागणाऱ्या सुट्यांची आम्ही महिनाभर आधीच वाट पाहायचो. सुट्या लागायच्या. मग घरातील सगळे छोटे मिळून दिवाळीचे नियोजन करायचो. फटाक्‍यांची यादी करायचो, "आई काय-काय बनविणार?‘ असा दिवाळीचा बेत आईला विचारायचो. दिवसभर काय करायचं ते ठरवायचो... खूप मज्जा यायची. मावशी यायची, मामा यायचे, आत्या यायची, काका यायचे. सगळी भावंडे भेटायची.



अगदी रात्रीच घड्याळाला गजर लावून झोपायचो. न चुकता सकाळी सकाळी उठायचो. आई सगळ्यांच्या अंगाला सुगंधीतेल लावायची. ओवाळायची. सगळ्यांना दोन बादल्या गरम पाण्याने "अभ्यंगस्नान‘ घालायची. त्यानंतर आईसोबत देवदर्शन करून घरी परतायचो. बाबांची आंघोळ होताना आम्ही चिल्लेपिल्ले फुलझड्या उडवायचो. किती मजा यायची... त्यानंतर सगळी भावंडे दिवसभर अक्षरश: धिंगाणा करायचो. काहीही फिकिर नाही, कसलीच चिंता नाही, कुणाचीही भिती नाही... फक्त मजा करायचो! सगळ्या भावंडांचा खायचा आणि खेळायचाही कार्यक्रमही ठरलेला नसायचा. वाटलं की घरात येऊन एक लाडू तोंडात कोंबत आणि मूठभर चिवडा हातात घेऊन बाहेर धावत सुटायचो. वाटलं तर बाबांची सायकलची किल्ली हळूच घेऊन गल्लीतून राऊंड मारायचो. वाटलं तर उगाच दोन-तीन गल्लीत फिरून यायचो. दररोज भावंडांमध्ये कोणाचे तरी भांडणं व्हायची. रूसवा-फुगवा. मग आई, मावशी, आत्या भांडणं मिटवायची. आम्ही सारे पुन्हा एकत्र येऊन खेळायचो. दररोज पहाटे आणि संध्याकाळी दारात पणत्या लावायचो. दररोज संध्याकाळी दारात आईच्या मदतीने सगळेजण मिळून अंगणात छानशी रांगोळी काढायचो. मोठ्या आणि आवाजाच्या फटाक्‍यांना तुम्ही आम्हाला हात लावू देत नव्हता. ते आपण रात्री उडवायचो. वाड्याच्या मध्यभागी भुईनळे फुलताना वाड्यातील सगळी छोटी-छोटी मुले आणि आम्ही भावंडे किती उड्या मारायचो ना..! फटाक्‍यांमध्ये असणाऱ्या टिकल्या आणि नागगोळ्या दिवसभर पुरायच्या. नागगोळीतून नाग वर यायचा आणि आमच्या आनंदाला उधाण यायचे.

बाबा, माहितेय एकदा तुम्हाला बोनस मिळाला नव्हता. मी फटाक्‍यांसाठी हट्ट करत होतो. घरात किराणा सामानही आणायचे होते. मी आईला फराळाची यादी विचारत होतो. आई ती सांगतच नव्हती. मी तुमच्यावर, आईवर खूप रागावलो होतो. दिवाळीच्या सुट्या सुरु झाल्या तरी घरात दिवाळीची काहीच हालचाल नव्हती. तरीही तुम्ही कुठूनतरी पैसे आणलेत आणि दिवाळी अगदी व्यवस्थित पार पाडली. असचं एकदा आईशी बोलताना तिनं सांगितलं त्यावेळी तुम्ही दिवाळीसाठी व्याजाने पैसे आणले होते. "मी त्यावेळी तुमच्यावर का रागावलो?‘ याचा विचार करून आजही मला माझाच पश्‍चाताप होतोय.

बाबा, त्यावेळी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद मिळायचा. आता मात्र मोठ्या-मोठ्या गोष्टीतूनही बऱ्याचदा छोटासा आनंदही शोधता येत नाही. आता तो वाडा नाही. तुमचा ठेवणीतला आकाशदिवाही मला जपता आला नाही. दिवाळी म्हणजे झोपण्याची संधी समजली जाते. एखाद दिवस अभ्यंग झालं तरीही मी धन्यता मानतो. दिवाळीतला फराळ वर्षभर हवा तेव्हा मिळतो, त्यामुळे त्याचीही वाट पाहावी लागत नाही. कोऱ्या करकरीत नोटांचा सुगंध शोधता शोधता अभ्यंगस्नानावेळच्या सुगंधीतेलाचाही सुगंध येईनासा झाला आहे. अगदी परवा-परवापर्यंत तुम्ही होता तोवर दिवाळी आल्यासारखी वाटायची. तुम्ही मागे लागत होता. "हे आणलं का? ते आणलं का?‘ तरीही "जास्त खर्चात पडू नको!‘ असं तुम्ही सतत सांगायचात. आता, तुम्हीच कोठे आहात हे सगळं सांगायला....

तुमचाच


(Courtesy: eSakal.com) 

10/15/2015

'आयटी'त जगण्याची व्यथा...!

एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत तो तीन-चार दिवसांपासून इंटर्नशिपसाठी जॉईन झाला होता. एका बॅंकेच्या प्रोजेक्‍टसाठी "जीयूआय‘ तयार करणाऱ्या टीमला अस्टिट करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. टीमसोबत त्याची नुकतीच ओळख होत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात एक्‍सपर्ट होता. टीममधला एक मेंबर आज दौऱ्यानिमित्त बाहेर गेला होता. तो आज परतणार होता. तो आला त्यावेळी संपूर्ण टीम एका मिटिंगसाठी गेली होती. फक्त हा नवा पोरा काम करत होता. मेंबर आला आणि नव्या पोराला हाय-हॅलो करून त्यानं त्याचा कॉम्प्युटर सुरू केला. नाव-गाव वगैरे विचारलं.

नव्या पोराची थोडी मजा घ्यावी म्हणून त्याने त्याला हाक मारली आणि गप्पा सुरु केल्या. "चल, तुला एक पझल टाकतो. फक्त प्रोग्रामिंग पझल आहे.‘ नव्या पोराने माईंडला रिफ्रेश केले आणि "ओके‘ म्हणाला. "विथआऊट युजिंग थर्ड व्हेरिएबल हाऊ टू एक्‍सचेंज व्हॅल्यूज्‌ ऑफ टू व्हेरिएबल्स‘ मेंबरने सवाल टाकला. काही क्षण विचार करून नव्या पोराने कागदावर लिहून दाखवले, "दोन्ही व्हेरिएबलची ऍडिशन पहिल्या व्हेरिएबलला असाईन करून त्या व्हॅल्यू एक्‍सचेंज करायच्या. खालीलप्रमाणे -


a = 2;
b = 3;
a = a + b;
b = a - b;
a = a - b;

"एक्‍सलंट‘ म्हणत मेंबर खूश झाला. तरीही त्याने पुढचा सवाल केला, "इनपुट केलेल्या एखाद्या भारतीय नावावरून जनरली ते नाव मुलीचे आहे की मुलाचे ठरवता येईल का?‘ त्याने पुन्हा 5-10 मिनिटे विचार केला आणि उत्तर दिले, "तसे नेमके सांगता येत नाही. पण बहुतांश मुलींच्या नावातील शेवटचे अक्षर हे व्हॉवेल अर्थात स्वर असते. त्यामुळे शेवटचे अक्षर आयडेंटिफाय करून ते चेक करून व्हॅलिडेट करता येऊ शकेल. पण ते 100 टक्के बरोबर असणार नाही. कारण काही नावांना हा प्रोग्राम अपवाद ठरू शकेल‘ त्याने आपले उत्तर दिले. आता मात्र मेंबर अधिकच खूश झाला. आणि, "चल, मला कॉलेजच्या लाईफची आठवण करून दिलीस. खाली टपरीवर जाऊन चहा पिऊ‘ दोघेही खाली टपरीवर आले.

मेंबरने त्याला आवड-निवड विचारली. नव्या पोराला बऱ्याच आवडी निवडी होत्या. तो हुशारच होता. आता त्यांच्यात दोस्ती निर्माण होत होती. "तुम्ही तर बऱ्याच वर्षांपासून येथे आहात. तुमच्याकडे फोर व्हिलर असेल, बंगला असेल, महिन्याला पगारही जमा होतो. एसीमध्ये आवडीचं अन्‌ इंटरेस्टिंग काम. तुम्ही खूप सुखी आणि समाधानी असाल ना?‘ असा सवाल करत नव्या पोराने मेंबरच्या नेमक्‍या मर्मावर बोट ठेवले. त्यानंतर काही मिनिटे शांततेतच गेले. आणि मेंबर आपली व्यथा सांगू लागला, "अरे, सुखी आहे, खूप सुखी आहे. पण ते जगाला दाखवण्यासाठी. महिन्याला 50-60 हजारापेक्षा जास्तच पैसे पडतात पगार म्हणून. पण खर्चही तेवढाच. कर्जाचे हप्ते, लाईफ स्टाईल मेंटेनन्स वगैरे वगैरे... शिवाय सतत माणसाला समजेल अशी नव्हे तर मशिनला, कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेत प्रोग्राम लिहायचा. त्यातच दररोज काय काय नवीन येते त्याचे अपडेटस्‌ ठेवायचे. वर तुमच्यासारखी नवीन कमी पगारात काम करणारी हुशार पोरं आली की आणखी सावध रहावं लागतं‘, त्याला मध्येच थांबवत नवा पोरा म्हणाला, "पण तुम्हाला वेळेचं काही बंधन नसतं ना?‘ मेंबर पुन्हा व्यथा सांगू लागला, "कदाचित ते असतं तर बरं झालं असतं. मात्र तसं नाहीए. आम्हाला प्रोजेक्‍ट पूर्ण करण्याचं टार्गेट असतं. कमी वेळ आणि जास्त काम. त्यामुळे दररोजच ओव्हर टाईम काम करावं लागतं. शिवाय अंतिम टप्प्यात तर प्रत्यक्ष आयुष्यातले "एरर‘ दूर ठेऊन प्रोग्राममधले "एरर‘ शोधत कधी कधी 30-30 तासही बसावं लागतं. घर, ऑफिस, प्रवास सगळीकडे कॉम्प्युटरच्या लॉजिकचा विचार करावा लागतो. माणसांशी केवळ आभासी जगातूनच भेटता येतं. प्रत्यक्ष भेट फार कमी वेळा होते. त्यामुळे इतरांचे गैरसमजही होतात.‘

आता नवा पोराही समजू लागला होता. त्याने आता एक शेवटचा प्रश्‍न विचारायचं ठरवलं, "मग, एवढं सगळं असताना तुम्हाला दुसरी संधीही मिळत असेल ना! तुमच्यापैकी बरेच जण अमेरिकेतही जातात. काही जण काही वर्षे नोकरी करून पैसे कमवून सोडून देतात‘ त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यामुळेच मेंबरही अगदी मनातून उत्तरे देत होतो. मेंबर म्हणाला, "खरं आहे. नोकरी बदलू शकतो. परदेशी जाऊ शकतो. सोडूनही देऊ शकतो. पण ते"ऐट‘ म्हणून "आयटी‘त नोकरी करणाऱ्यांसाठी ठीक आहे.आपल्यासारख्या सॉरी माझ्यासारख्या "पगारा‘ची वाट पाहणाऱ्यांसाठी नाही. कारण, महिन्याला कर्जाच्या हप्त्याची टांगती तलवार माझ्यावर लटकलेली असते. नोकरी बदलायला किंवा बाहेरच्या देशात जायला काहीतरी परफॉर्मन्स दाखवावा लागतो. त्यात पुन्हा "पॉलिटिक्‍स‘ वगैरे...‘ पुन्हा काही काळ शांतता पसरली.

‘पण एवढं करूनही तुम्ही दोन वेळा सुखाची भाकरी एसीमध्ये बसून खाऊ शकता ना? मी तर मेरिटवर इंजिनिअरिंगला आलो. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे एखाद दिवशी जर मेसला सुटी असेल तर उपाशीही रहावं लागतं‘ नवा पोराची उत्सुकता ताणली. त्यावर मेंबर पुन्हा बोलू लागला, "मी पण माझ्या कॉलेजच्या दिवसात असाच काहीवेळा उपाशी झोपलो आहे. मजा यायची तेव्हा. आता "एसी‘त बसलो तरी "मेस‘मधील मित्र-मैत्रिणणींसोबतच्या जेवणाची रंगत नाही येत. तुला एक सल्ला देतो. ऐकायचं का नाही ते तू ठरव. इथं नक्की जॉईन हो. पण काही वर्षांसाठी. कर्जाच्या चक्रात अडकून राहून एसीमध्ये पिझ्झा खाण्यापेक्षा गावाकडे आईच्या हातची चुलीवरची भाकरी आयुष्यभर खाऊ शकशील एवढेच पैसे कमव. आणि आयुष्य जगायला शिक‘ मेंबरने सहजपणे मोठा संदेशच नव्या पोराला दिला होता.

9/30/2015

खूप मुली पाहिल्या पण...!

तो आयुष्यात चांगला सेट झाला होता. त्याच्या आई-बाबांचे घर होते. त्याला चांगली नोकरीही होती. आता तो वधूसंशोधन करत होता. जवळपास वर्षभराहून अधिक काळ निघून गेला होता. आई-बाबा, नातेवाईक, वधू-वर संस्था अनेक चांगल्या मुली आणत होते. मुली पाहण्याचा आकडा दोन डझनाहून वर गेला होता. पण त्याला काही मुलगी पसंत पडत नव्हती. त्यामुळे वय वाढत चालले होते. त्याची आई-बाबांना चिंता लागली होती. शिवाय सुयोग्य मुली शोधणे, त्यांच्या पालकांशी बोलणे, नंतर कांदापोह्याचा कार्यक्रम ठरवणे आदींमुळे आई-बाबा त्रस्त होते. आता त्यांना हा सारा प्रकार नकोनकोसा झाला होता. मात्र, तो काहीच तडजोड करायला तयार नव्हता. आतापर्यंत बघितलेल्या अनेक मुली त्याला अगदी अनुरूपच होत्या. काही काही तर त्याच्यापेक्षा अधिक सरस होत्या. पण याला काही मुलगी पसंत पडत नव्हती.

एकेदिवशी वधूवर संस्थेच्या एका कार्यशाळेला जाण्याविषयी आई-बाबांनी त्याला सांगितले. त्याला काही ते आवडले नाही. मात्र, आई-बाबांनी त्याच्या मित्राकडून त्याचे प्रबोधन केले. अखेर इच्छा नसतानाही तो कार्यशाळेला जाण्यास तयार झाला. ठरल्याप्रमाणे तो पोचला. ती केवळ अविवाहीत मुला-मुलींसाठी कार्यशाळा होती. मुलींची उपस्थितीही बऱ्यापैकी होती. कार्यशाळेत प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍नही विचारात घेतले जात होते. सुरुवातीला विवाहपूर्व समुपदेशनाचे व्याख्याने झाली. त्यानंतर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍न विचारात घेतले जाऊ लागले. एका मुलीने सांगितले, "मला आई-बाबा नसलेला मुलगा हवा आहे, स्वतंत्र राहणारा‘ समुपदेशकाने तिला समजावत सांगितले, "आई-बाबा नसणे ही पूर्वी उणीव समजली जायची. आता ती फॅशन होत चालली आहे. मात्र, त्यामागे आपला वैयक्तिक स्वार्थ पाहणेही हिताचे आहे. उद्या तुझे लग्न होईल. भलेही ते स्वतंत्र राहणाऱ्या मुलाशी. तुम्ही दोघेही नोकरी करणारे. पुढे तुम्हाला मूल होईल. मग मूल मोठे होईपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार? पैसे देऊन माणसे मिळतील, पण प्रेम देऊन सांभाळणारी माणसे पैसे देऊन मिळतील का? शिवाय तुमच्या बाळाला आजी-आजोबा कल्पना कशी समजेल? हे सारं बाजूला राहू दे. त्याच मुलाने मोठे झाल्यावर लग्नापूर्वी तुमच्यापासून वेगळं राहिलं तर तुम्हाला चालेल का?‘ आता मात्र कार्यशाळेला एक वेगळेच वळण मिळाले. त्या मुलीचंही समाधान झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्याचेही लक्षही आता कार्यशाळेकडे वळले.



प्रत्येकजण प्रश्‍न विचारत होता. त्यातून अनेक नवनवे प्रश्‍न समोर येत होते. कुणाला दाढी असलेला मुलगा हवा होता. तर कोणाला स्वयंपाक येणारा भावी पती हवा होता. कोणाला आपल्या पाळीव प्राण्याला स्वीकारणारा मुलगा हवा होता. तर कोणाला 24 तास घरात राहणारी मुलगी हवी होती. समुदेशक त्यांच्या पद्धतीने प्रश्‍नांची उकल करत होते. आता याचा क्रमांक आला, याची सारी पार्श्‍वभूमी आधीच नोंदवली होती. त्यामुळे त्याने थेट प्रश्‍नच केला, "मी खूप मुली पाहिल्या पण त्या प्रश्‍नाचे अपेक्षित उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत‘ समुपदेशकाने प्रश्‍न कोणता ते विचारले. त्यावर तो म्हणाला, "मी मुलीला विचारतो की तुम्ही शनिवार-रविवार किंवा सुटीच्या दिवशी काय करता? या माझ्या प्रश्‍नावर मला अपेक्षित उत्तर देणारी एकही मुलगी मला सापडली नाही‘ त्यावर समुदेशकाने त्याचे अपेक्षित उत्तर विचारले. तो म्हणाला, "जी मुलगी शनिवार-रविवार आपले कपाट आवरते, घर आवरते ती मुलगी मला हवी आहे. पण शनिवार-रविवार सगळ्याच मुली बहुतेक करून फिरायला जातात, मुव्हीला जातात किंवा दिवसभर आराम करतात‘ त्यावर समुपदेशक म्हणाले, "तू एवढ्या मुली पाहिल्या आहेत. तर त्यातील कदाचित प्रत्येकच मुलगी घरातील कपाट किंवा घर आवरत असेल. पण ती गोष्ट त्यांना इतकी क्षुल्लक वाटत असेल की ती तुला कांद्या-पोह्याची कार्यक्रमात सांगावी असे त्यांना वाटत नसेल. तसेच बऱ्याच मुलींनी कदाचित संगितले असेलही, पण तुला हव्या त्या शब्दांत सांगितले नसेल. ही अतिशय किरकोळ गोष्ट आहे. या प्रश्‍नाऐवजी तू थेट घरातील कपाट किंवा घर कधी आवरते किंवा आवरते का? असा साधा प्रश्‍न विचारल्यास अधिक अचूक उत्तर मिळाले असते. असो, पण तू हा भ्रम काढून टाक की मुली कपाट आवरत नाहीत. आणि पहा बदल कसा घडेल...‘ समुपदेशकाने अगदी नेमके कारण शोधून दिले होते. त्याच्या मनातही हाच प्रश्‍न आला. आपण इतके दिवस आपले अपेक्षित उत्तर घेऊनच विचार करत होतो. तिच्या भूमिकेतून आपण कधीच विचार केला नाही.

"आपण बहुतेकदा काहीतरी गृहितकं धरूनच कल्पनाविश्‍वात रमतो, त्याला समर्पक उत्तराचीच अपेक्षा करतो. मात्र, वास्तवाची किनार जोडायला हवी. स्वत:च्या पलिकडे जाऊन इतरांच्या भूमिकेतून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. त्याचवेळी सगळ्या प्रश्‍नांची उकल होऊ शकते‘ समुपदेशकांनी सर्व उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.

(Courtesy: eSakal.com) 

9/22/2015

बालकांच्या प्रतिभेचा आविष्कार

पुराणामध्ये, दंतकथांमध्ये किंवा काल्पनिक कथांमधून आपण बालकांनी केलेल्या करामती ऐकलेल्या आहेतच; मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही बालके "चमत्कार‘ करत असल्याचे चित्र आहे. विज्ञानाची कास धरून तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांच्या साह्याने जगभरातील बालके आपल्या प्रतिभेद्वारे जगाला थक्क करत आहेत. लोकप्रिय सर्च इंजिन "गुगल‘च्या "गुगल सायन्स फेअर‘मध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.

तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण, कल्पक, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या जगभरातील बालकांच्या प्रयोगांचे स्पर्धावजा प्रदर्शन म्हणजे "गुगल सायन्स फेअर‘. या स्पर्धेत 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. जगभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक 20 प्रयोगांना अंतिम स्थान देण्यात येते आणि त्यातून विजेत्याची निवड होते. विजेत्यांना अन्य प्रायोजकांमार्फत विविध पुरस्कार, तसेच पुढील प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि अन्य स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. तसेच गुगलच्या माध्यमातून हे प्रयोग जगासमोर मांडले जातात. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची जागतिक माध्यमांकडूनही दखल घेण्यात येते. या स्पर्धेत ऑनलाइन अर्ज भरून सहभागी होता येते.

यंदाची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असून अंतिम वीस प्रयोगांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुरुध गानेसन या अमेरिकेतील 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांने बर्फ तसेच वीजविरहित रेफ्रिजरेटर तयार केले आहे. दुर्गम भागात वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याचदा लसीची वाहतूक करणे आवश्‍यक असते. रुग्णाला तातडीने आणि योग्य त्या तापमानात साठविलेली लस पोचवण्याची आवश्‍यकता ओळखून विजेशिवाय आणि बर्फाशिवाय 2-8 अंश सेल्सिअस तापमानात लसीची वाहतूक करता येणारे तंत्र अनुरुधने प्रयोगाद्वारे सादर केले आहे. सिंगापूरमधील गिरीश कुमार या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रमातून प्रश्‍नपत्रिका तयार करताना शिक्षकांसाठी उपयोगी ठरेल, असे दिलेल्या उताऱ्यावरून बहुपर्यायी प्रश्‍न तयार करणारे तंत्र विकसित केले आहे, तर अमेरिकेतील दीपिका कुरूप या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने टाकाऊ पदार्थ आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यातील विषारी घटक काढून टाकून पाण्याला शुद्ध करणारा प्रयोग सादर केला आहे, तर वातावरणात असलेले पाणी प्रत्यक्ष भांड्यात साठविता यावे यासाठी कॅनडातील 18 वर्षाच्या कॅलविन रायडर नावाच्या विद्यार्थ्याने नवा शोध लावला आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य ऊर्जेचा वापर न करता केवळ सौरऊर्जेवर आधारलेले यंत्र विकसित केल्याचे कॅलविनने आपल्या प्रयोगात म्हटले आहे. विषारी दारू पिऊन दगावल्याच्या अनेक घटना जगामध्ये सातत्याने घडत असतात. यावर मात करण्यासाठी तैवानमधील यो हसू आणि जिंग टॉंग विंग या तेरा वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी बंद बाटलीचे झाकण न उघडता त्यातील द्रव पदार्थ ओळखता येणारे तंत्र शोधले आहे. द्रवपदार्थ असलेल्या बाटलीला विशिष्ट वजनाच्या ठोकळ्याने धक्का दिल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींमधून बाटलीतील द्रव पदार्थ ओळखता येत असल्याचा दावा या प्रयोगामध्ये केला आहे. त्यातून आतील द्रवपदार्थामध्ये असलेले विषाचे प्रमाणही समजणार आहे. अशा प्रकारचे विविध कल्पक 20 प्रयोग अंतिम स्पर्धेत आहेत.

अशा प्रकारच्या अनोख्या, कल्पक, नावीन्यपूर्ण, जीवनावश्‍यक प्रयोगांचे प्रदर्शन गुगलने संकेतस्थळाद्वारे जगासमोर सादर केले आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून सप्टेंबरमध्ये अंतिम विजेते घोषित होणार आहेत. मूकबधिर व्यक्तींना इतरांशी संवाद साधता यावा यासाठी श्‍वासातील कंपने शब्दांमध्ये परावर्तित करणारे तंत्र भारतातील अर्श शाह दिलबागी या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने मागील वर्षी गुगल सायन्स फेअरमध्ये सादर केले होते. या प्रयोगाला पुरस्कारही प्राप्त झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "डिजिटल इंडिया‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने अशा बालप्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(Courtesy: eSakal.com)

8/19/2015

सर्वव्यापी 'क्‍यूआर कोड' (वेबटेक)

लेखकाच्या मोबाइल क्रमांकासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.



माणसाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची अफाट शक्ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज अनुभवास येत असते. कमीत कमी श्रमात अपेक्षित उद्दिष्ट गाठून अत्यल्प वेळात कार्य सिद्धीस नेणे, हा तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व क्रांतीचा प्रमुख हेतू आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या माध्यमातून मोबाईलक्रांती, थ्री- डी प्रिंटिंग आदी आविष्कार आपण अनुभवत आहोतच. ‘क्‍यूआर कोड‘ हा त्यापैकीच एक. 

वाहन उत्पादन क्षेत्रात वाहनाचे उत्पादन होत असताना, वाहनाच्या विविध भागांची स्थिती जाणून घेण्यासाठी केवळ यंत्रालाच वाचता येतील, अशा बारकोडचा उपयोग करण्यात येत होता. त्यातून पुढे केवळ द्विमितीय पद्धतीसाठी ‘क्‍यूआर कोड‘चा जन्म झाला. जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता या वैशिष्ट्यांमुळे विविध क्षेत्रांमध्ये या तंत्राचा वापर होत आहे. स्मार्ट फोनचा उपयोग वाढत असताना या तंत्राला नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे. 

काय आहे ‘क्‍यूआर कोड‘? 
‘क्‍यूआर कोड‘ म्हणजे Quick Response Code अर्थात जलद प्रतिसाद संकेतावली. केवळ यंत्रालाच वाचता येईल अशा भाषेतील उभ्या आणि आडव्या चौकोनांच्या संचाला ‘क्‍यूआर कोड‘ म्हणतात. ‘डेन्सो‘ या जपानमधील वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपनीच्या ‘डेन्सो वेव्ह‘ विभागाने 1994 मध्ये जपान रोबो असोसिएशनच्या सहकार्याने ‘क्‍यूआर कोड‘चे तंत्र विकसित केले. वाहन उत्पादन क्षेत्रातील या तंत्राच्या यशस्वी वापरानंतर इतर क्षेत्रांतही त्याचा वापर सुरू झाला. मानवाला न समजणारी भाषा समाविष्ट असलेला, डिजिटल पडद्यावर प्रतिमेच्या किंवा कागदावरील प्रतिमेच्या स्वरूपात हा कोड तयार करता येतो. 

‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग 
स्मार्टफोनद्वारे एखाद्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी प्रथम ब्राऊजर उघडून यूआरएल टाइप करावी लागते. यावर मात करण्यासाठी एखाद्या संकेतस्थळाचा ‘क्‍यूआर कोड‘ स्मार्टफोनद्वारे स्कॅन केला की थेट त्या संकेतस्थळाला भेट देता येते. हा अगदी प्राथमिक उपयोग आहे. मोबाईलमध्ये नवा कॉन्टॅक्‍ट सेव्ह करण्यासाठी, एखादा संदेश पाठविण्यासाठी, उत्पादनादरम्यान उत्पादनाची स्थिती जाणून घेण्यासाठी, मार्केटिंगसारख्या अनेक क्षेत्रांतही या तंत्राचा वापर वाढत आहे. मॉलसारख्या मोठ्या ठिकाणी ग्राहकांची बिले तयार करण्यासाठीही या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ग्राहकांना आकर्षित करून विविध ऑफर देण्यासाठी हा कोड वापरण्याची पद्धत हळूहळू लोकप्रिय होत आहे. 

‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन कसा करायचा? 
‘क्‍यूआर कोड‘ वाचण्यासाठी तो आधी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अनेक विनामूल्य मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. ते स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे आवश्‍यक असते. एकदा ऍप इन्स्टॉल केले की त्याद्वारे कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ समोर मोबाईल धरून कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करावा लागतो. साधारण अर्धा- एक सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण होते. स्मार्टफोन स्कॅन केलेला ‘क्‍यूआर कोड‘ वाचतो आणि त्यातील आज्ञावलीप्रमाणे कार्य करतो. कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी हीच पद्धती अवलंबिली जाते. अल्पावधीतच स्मार्टफोन्समध्येच ‘क्‍यूआर कोड रीडर‘ची ‘इन बिल्ट‘ सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावरील ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी इतर डिव्हाईसही उपलब्ध आहेत. 

‘क्‍यूआर कोड‘चे भविष्य 
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सध्या कार्डबाबतची माहिती, तसेच पासवर्डही देणे आवश्‍यक आहे. मात्र, नजीकच्या काळात ही सर्व माहिती असलेला ‘क्‍यूआर कोड‘ तयार करून, केवळ त्याच ‘क्‍यूआर कोड‘द्वारे कोड पेमेंटची सुविधा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यामध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डऐवजी बॅंकेने दिलेला ‘क्‍यूआर कोड‘ खिशात दिसण्याची शक्‍यता आहे. ‘क्‍यूआर कोड‘च्या गुणवैशिष्ट्यांमुळे नजीकच्या काळात बहुतेक सर्वच क्षेत्रांत ‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग वाढणार आहे.
(Courtesy: www.eSakal.com) 

8/07/2015

चल ब्रेकअप करू?

"एवढा वेळ का लावलास?‘ बागेतल्या बाकावर बसूनच त्यानं तिला आल्या आल्या पहिलाच प्रश्‍न विचारला.
"मला तुला काही तरी सांगायचयं..‘ तिने वेगळ्याच विषयाला हात घातला.
"म्हणून उशिरा आलीस का?‘ त्याचा त्रागा थांबला नाही.
"तू माझं ऐकणार आहेस का?‘ तिने आपले म्हणणे पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला.
"मी इथे कॉलेज सोडून तुझी वाट पाहतोय. या आधी पण दोनवेळा तू उशिरा आलीस!‘ त्यानं आपलाच प्रश्‍न लावून धरला.
"मी पण कॉलेज सोडून आलेय आता इथे! पण...‘ ती काही बोलणार तेवढ्यात त्यानं तिला थांबवलं.
"आधी मला सांग तुला उशिर का झाला? नंतरच आपण पुढचं बोलू‘ तो ठाम राहिला.
"चल, तुला माझं काही ऐकून घ्यायचं नाहीए! बाय‘ बघता बघता ती निघूनही गेली.
तो प्रचंड अस्वस्थ झाला. तसाच तो रूमकडे निघाला.

***


याची अस्वस्थता पाहून रूममेटने विचारपूस केली.
"साला, त्याच्यामुळे तू एवढा परेशान झालास का?‘ रूममेट त्याला रिलॅक्‍स करत पुढे म्हणाला, "चलता, है भाई! समुद्राचा तळ आणि मुलीच्या मनाचा तळ आयशप्पथ कोणालाच समजत नाय! तू किस झाड की पत्ती?‘ याची उत्सुकता ताणली. त्याने मग सगळ्या घटना सांगायला सुरुवात केली. "तिच्याशी कॉलेजात फ्रेशर्स पार्टीत झालेली ओळख. ती सेकंडला आणि मी थर्डला. दोघांच्या ब्रॅंचेसपण वेगळ्या. फ्रेशर्स..‘ त्याला थांबवत रूममेट म्हणाला, "बस्स.... मग ती तुला, तू तिला असं करत करत... फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, इमोशन, सेंटीपणा, घरचे वगैरे, मग शेअरिंग, मग लव्ह.. तू तिचा बच्चू, जानू आणि काय काय झालास‘
तो आता चांगलाच खुलला होता. "आयला तुला कसं माहित रे!‘ त्याचं कुतूहल जागृत झालं. "ये सब दुनियादारी है! काय वेगळं नसतं. हे असचं असतं बघ. प्रेम, प्यार, इश्‍क, लव्ह वगैरे वगैरे!‘ तो थांबला.
"बरं मग आता आमच्यात जे होत आहे, त्याचं काय?‘ तो पुन्हा मुद्यावर आला. रूममेटचं लेक्‍चर सुरु झालं, "हे बघ, ती फर्स्टला तू सेकंडला असताना तुमची ओळख. म्हणजे दोन वर्षांची ओळख. पण अलिकडे अलिकडे ती तुला टाळते. भेट कमी करते. वेळेत येत नाही. कॉलेजातही फार बोलत नाही. आणि तिचं सेकंड इअर.. तुझं शेवटचं. तुला पुढे शिकायचं अन्‌ तिचे घरचे तिच्या लग्नाच्या मागे.. कदाचित...‘ याच्या अंगावर हळूहळू रोमांच उभे राहत होते. जणू काही रूममेट भविष्यवेत्ताच होता. "कदाचित... कदाचित, काय?‘ त्याने प्राण कानात आणून प्रश्‍न विचारला. रूममेट पुन्हा खुलला, "हे बघ शांत रहा. कदाचित तिला एखादा दुसरा मुलगा...‘ याचा पार अपेक्षाभंग झाला. "ये ये काय बोलतोस तू?‘ तो रूममेटवर भडकला. "चल जाऊ दे...‘ तुला नाय पटायच्या गोष्टी. पण त्याची उत्सुकता आणखी चाळवली, "बरं बरं सांग‘ रूममेट पुन्हा सुरु झाला, "हे बघ, हे कॉलेज असंच असतं. तिथून फार लग्न ठरत नाहीत. ते काय मॅरेज ब्युरो आहे का? आणि कॉलेज संपलं की भेट कमी कमी होत जाते. पुढे पुढे मग... असो. त्यामुळेच कॉलेजात "लव्ह, ब्रेकअप, लव्ह‘ असं चालूच असतं दोस्ता. आणि तिची आताची चिन्हे "ब्रेकअप‘च्या दिशेने आहेत?‘
याला धक्काच बसला... पुढे बराच काळ शांतता पसरली. शेवटी रूममेट समारोपाचं म्हणाला, "इसिको तो लाईफ कहते है, दोस्त!‘ 

***

कॉलेजच्या कॅंटिनमध्ये ती तिच्या "बेस्ट फ्रेंड‘सोबत बसली होती. "बघ ना गं. त्यानं काल माझं ऐकूनच घेतलं नाही. माझ्या घरी माझ्या लग्नाचं बघत आहेत. आणि हा मला पुन्हा पुन्हा भेटायला बोलवतो. त्याला कसं सांगू?‘ बेस्ट फ्रेंड म्हणाली, "अगं, हे असंच असतं. कॉलेज संपत चाललं की पोरांना जास्तीत जास्त भेटावसं वाटतं. पुन्हा थोडीच वेळ मिळेल त्याला....‘ "म्हणजे?‘ तिने तिला थांबवत म्हटलं, "अगं कॉलेजातलं प्रेम असंच असतं. माझं, आपल्या वर्गातल्या कितीतरी मुलामुलींचं बघ. ब्रेकअप, लव्ह सुरु असतचं! परवा तर मी एका "ब्रेकअप‘ पार्टीला गेले होते‘ तिला हे सगळं ऐकनंही असह्य होऊ लागलं. पण एका अर्थानं खरं वाटू लागलं.

***

रात्रीचे दहा वाजले होते. तो त्याच्या रूममध्ये. तर ती तिच्या घरी. दरम्यान त्यांचा संवादही कमी झाला होता. त्यानं तिला सहजच मेसेज केला. "मिस यू डिअर, युअर बच्चू!‘ तिने बराच वेळ विचार केला आणि रिप्लाय दिला, "मिस यू बट वॉन्ट टू टेल समथिंग...‘ त्याचा रिप्लाय, "हो मलाही काही सांगायचं?‘ तिचा रिप्लाय, "चल, तू सांग‘ आधी कोणी सांगायचं यावरून एकमत होईना. त्यामुळे तिने तोडगा काढला. एक वेळ ठरवली आणि त्या वेळेला दोघांनीही एकदाच मेसेज पाठवायचा. त्यालाही कल्पना आवडली. पण दोघांच्याही मनात संदिग्धता होतीच. शेवटी ठरलेली वेळ आली आणि दोघांनीही मेसेज डिलिव्हर केला, "मी तुला फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवरून कधीच बॅन करणार नाही. पण, आता आपण येथेच थांबूयात. ब्रेकअप करूयात....‘

8/05/2015

सिग्नल पाळणारी माणसे!

"बाबा, प्रवासासाठी शुभेच्छा, या मी तुमची वाट पाहतोय!‘ पोराने फोन ठेवला. वडिलांनी पोराला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पोरगाही मोठा शिकून परदेशात नोकरी करत होता. आणि आज तर त्याने चक्क वडिलांनाही काही दिवसांसाठी आपल्याकडे बोलाविले होते. तरीही आपला एवढा चांगला देश सोडून तू एवढ्या दूर जातोस याबद्दल वडिलांची काही अंशी नाराजी होतीच.

सारी औपचारिकता पूर्ण झाली. बाबांसोबत आईसुद्धा परदेशी जायला निघाली होती. संध्याकाळची फ्लाइट होती. आठवड्याचा पहिलाच दिवस होता. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी एक मित्र त्याची चारचाकी घेऊन आला होता. नियोजित वेळेपेक्षा तीन तास आधीच निघण्याचे ठरले. मात्र, मित्राला नंतर काही काम असेल म्हणून काहीही तक्रार न करता आई-बाबा निघाले. जाताना अनेक ठिकाणी सिग्नल लागले. गाड्याचे हॉर्न वगैरे कानावर पडत होते. दुचाकीवरून प्रवास करणारे शक्‍य तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. "पुढे जाणे‘ हे सगळ्यांचे ध्येय होते. पण त्यासाठी सिग्नल मोडण्याचाही पराक्रम अनेक जण करत होते. अर्थात त्यात त्यांना अभिमानच वाटत होता. अशाच सिग्नल असताना इकडून-तिकडून काही येत नसल्याने अनेक जण आमच्या मागून पुढे गेले. अशाच एका ठिकाणी तर यांची गाडी एका मोठ्या अपघातातून बचावली. पण त्यामुळे सगळेचजण घाबरून गेले. अशातच कसेबसे विमानतळही आले. वेळेअगोदरच पोचेल असे वाटत असतानाच अगदी योग्य वेळेत विमानतळावर गाडी पोचली. आई-बाबा विमानापर्यंत पोचलेही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे ते अपेक्षित स्थळीही पोचले. स्वत:चा देश त्यांनी प्रथमच सोडल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटत होते. सगळेजण नियमांचे पालन करत होते, सिग्नल पाळत होते, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. घरी आल्यावर मुलाकडून कुतूहलाने अनेक गोष्टी जाणून घेता-घेता रात्र झाली.

एवढ्या दूर आपला मुलगा कर्तृत्त्व करून आल्याचे त्यांना पुन्हा एकदा कौतुक वाटू लागले. "लहानपणी त्याचा हात माझ्या हातात होता. आज माझ्या हातात त्याचा हात होता. माझा हात हातात घेऊन त्याने मला घरात आणले‘, मुलाच्या कर्तृत्वामुळे बाबांचे डोळे पाणावले. आई-बाबांच्या अशाच गप्पा बराच वेळ सुरु होत्या. मुद्दामच मुलानेही त्यांना काही अडथळा आणला नाही. घराच्या गॅलरीमध्ये दोघे जण बराच वेळ गप्पा मारत होते. बघता बघता रात्रीचे दोन वाजले. समोर चकाचक रस्ते दिसत होते. कोठेही अस्वच्छता नाही. कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही. सगळीकडे निरव शांतता. रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती. सगळा देश शांत झोपल्यासारखा भासत होता. पण अद्यापही सिग्नल सुरूच. लाल, हिरवा रंग चालू-बंद होत होता. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, "अहो, एवढ्या रात्री कोण पाळणार सिग्नल‘ तेवढ्यात भरधाव वेगात येत असलेली एक मोटार सिग्नलवरील लाल रंग पाहून थांबली आणि हिरव्या रंगाची प्रतिक्षा करू लागला.

आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना अपार कौतुक वाटले. विमान प्रवासापूर्वी दिवसाढवळ्या वाहतूकीला अडथळा निर्माण करत सिग्नल तोडून धावणाऱ्या माणसांची उभयतांना आठवण झाली. मात्र त्या देशापासून ते कितीतरी दूर होते. ते अशा देशात होते की जेथे मध्यरात्री रस्ता रिकामा असताना हिरव्या सिग्नलची वाट पाहणारी माणसे दिसत होती.

8/04/2015

'थ्रीडी प्रिंटिंग'चे अनोखे तंत्रज्ञान

माणूस सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत असतो. हा ध्यास जगणे समृद्ध करण्याकडे असतो. कमी श्रम, कमी वेळ आणि जास्त फायदा हे गणित अलीकडे रूढ होत चालले आहे. त्यातूनच नव्या युगातील शॉपिंगची परिभाषा बदलली आहे. संकेतस्थळावरून ऑनलाइन शॉपिंगच्या सुविधेनंतर बेडरूममधून "स्मार्ट फोन‘द्वारे आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या खरेदीचा आनंद लुटता येत आहे. यापुढे कदाचित किरकोळ वस्तू खरेदी करण्याचीही गरज भासणार नाही. कारण "थ्रीडी प्रिंटर‘ नावाचं तंत्रज्ञान विकसित होत आहे. या प्रिंटरमुळे हळूहळू नव्या क्रांतीचा उगम होत असून, त्यामुळे उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे आहेत.

‘थ्रीडी प्रिंटर‘चा इतिहास
चार्ल्सस हल यांनी 1984 मध्ये "थ्रीडी प्रिंटर‘चा शोध लावला. सर्वप्रथम स्टेरिओलिथोग्राफी अर्थात एखाद्या वस्तूला त्रिमितीय स्वरूपात तयार करण्याच्या पद्धतीद्वारे "थ्रीडी प्रिंटर‘ तयार करण्यात आले. त्याद्वारे अत्यंत पातळ स्तर वापरून प्रिंटिंग करण्यात येत होते. आता त्या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. चहा पिता पिता चुकून चहाचा कप फुटला, तर तो कप "थ्रीडी‘ प्रिंटरच्या साह्याने तयार करता येतो. याशिवाय घरातील छोट्या- मोठ्या वस्तूही तयार करता येतात. अर्थात अशा प्रिंटरच्या मर्यादा आणि त्यांची व्यवहार्यता याबाबत संशोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. मात्र अशक्‍यप्राय वाटणाऱ्या क्रांतीला प्रत्यक्षात साकारणाऱ्या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात "थ्रीडी प्रिंटिंग‘ क्षेत्रातील क्रांती अशक्‍यप्राय नक्कीच नाही.

प्रिंटिंग कसे होते?
प्रिंटरद्वारे डिजिटल फाइलच्या माध्यमातून त्रिमितीय वस्तू तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे "थ्रीडी प्रिंटिंग‘. वस्तू तयार करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅस्टिक, पोलॅमाईड (नायलॉन), काचमिश्रित नायलॉन, चांदी, स्टील, मेण, फोटो पॉलिमर, पोलॅकार्बोनेट आदी घटकांचा उपयोग करण्यात येतो.

‘थ्रीडी प्रिंटर‘चे उपयोग
"थ्रीडी प्रिंटर‘चा विविध क्षेत्रांत प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. दक्षिण कोरियातील डॉ. शेन तोंग्या यांनी सहा तासांमध्ये मानवी शरीराच्या ओटीपोटाचा (पेलव्हिस) सांगाडा तयार करण्यात यश मिळविले. तसेच हाडाच्या कर्करोगाने त्रस्त झालेल्या एका किशोरवयीन मुलीच्या शरीरात या सांगाड्याचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपणही केले. आफ्रिकेमधील समुद्रात बेकायदा मच्छिमारी करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी "थ्रीडी प्रिंटर‘च्या साह्याने सौरऊर्जेवर हवेत चालणारे स्वयंचलित विमान तयार करण्यात आले आहे. तर चीनमधील एक "थ्रीडी प्रिंटर‘ उत्पादक कंपनी दुबईमध्ये पूर्णपणे "थ्रीडी प्रिंटर‘द्वारे तयार केलेली इमारत उभी करत आहे. याशिवाय वाहनातील विविध सुटे भाग, कृत्रिम मानवी पेशी, पुरातत्वशास्त्रातील वस्तू, मानवी हाडांची पुनर्निर्मिती यासह अनेक क्षेत्रांत "थ्रीडी प्रिंटर‘ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘थ्रीडी प्रिंटर‘चे व्यावसायिक गणित
जगभरात 2013 मध्ये "थ्रीडी प्रिंटिंग‘ क्षेत्रात 307 कोटी डॉलरचा महसूल मिळाला, तसेच 2018 पर्यंत 1200 कोटींपेक्षा अधिक, तर 2021 पर्यंत 2100 कोटी डॉलरहून अधिक महसूल मिळेल असा अंदाज आहे. वैयक्तिक उपयोगासाठी सध्यातरी "थ्रीडी प्रिंटिंग‘ फारसे व्यवहार्य वाटत नाही. मात्र वैयक्तिक उपयोगासाठी "थ्रीडी प्रिंटिंग‘ सेवा देणाऱ्या व्यवसायाचा उदय होऊन त्यामधूनही मोठ्या व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. नजीकच्या भविष्यात केवळ वस्तू विकण्यापेक्षा वस्तू तयार करण्याकडे जगभरातील व्यापाऱ्यांचा कल वाढण्याची शक्‍यता आहे.

(Courtesy: Daily Sakal, (dated 03 August 2015))

7/28/2015

'आडनावात काय आहे?'

त्याने पदवी प्राप्त केली होती. कौटुंबिक पार्श्‍वभूमी फारशी चांगली नव्हती. पण धडपडण्याची जिद्द होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी होती. शिक्षणाच्या निमित्ताने तालुक्‍याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणावरून तो एका महानगरात दाखल झाला होता. या शहरातील झगमगाट पाहून त्याला किंचितशी भीतीही वाटत होती. आपला टिकाव लागेल का? आपण स्वत:ला सिद्ध करू शकू का? पण तरीही प्रबळ इच्छाशक्तीमुळे तो प्रयत्न करत राहिला. धडपडत राहिला. त्याला डॉक्‍टरेट करायची होती. मात्र, उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे अपरिहार्य होते. नोकरीसाठी तो अनेक ठिकाणी फिरला. पण बऱ्याच ठिकाणी त्याला स्वत:चे आडनावच अडचणीचे ठरत होते.

शेवटी अनेक ठिकाणी फिरल्यानंतर एका कनिष्ठ महाविद्यालयात त्याला सहायक प्राध्यापकाची छोटीशी नोकरी मिळाली. अर्थात तेथेही जाचक अडचणी होत्या. कागदोपत्री असणारा पगार हातात येत नव्हता. आणि कॉट्रॅक्‍ट असल्याने कामाचा व्यापही मोठा होता. तरीही तो आनंदाने काम करत होता. अशातच वर्ष उलटले. तो हळूहळू शहराच्या वातावरणात रूळू लागला. एकदा त्याने जवळच्या एका सहकाऱ्याला डॉक्‍टरेट करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्याने एक जबरदस्त उपाय सुचविला! तसेच अशा वातावरणात हा उपाय केला नाही तर तुझे सगळे आयुष्य "कॉट्रॅक्‍ट‘वर काम करण्यात वाया जाईल अशा धोक्‍याची इशाऱ्याबाबतही सांगितले.

त्याने महिनाभर खूप विचार केला. मात्र, त्याला दुसरा कोणताही मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे सहकाऱ्याने सांगितलेला उपाय करण्यासाठी तो नाईलाजानेच तयार झाला. मात्र, अल्पावधीतच त्याला त्या उपायाचा अपेक्षित फायदा झाला. ही नोकरी सोडून तो आता दुसऱ्या महाविद्यालयात रूजू झाला. तेथे पगारही पूर्वीपेक्षा बरा मिळू लागला. बघता बघता याने डॉक्‍टरेटला प्रवेशही घेतला. त्याला हवा तो विषय आणि हवा तोच मार्गदर्शक मिळविण्यातही यश मिळाले. दिवस जात होते. याची धडपडही सुरु होती. बघता बघता याची डॉक्‍टरेट पूर्ण होण्याची वेळ आली. पण तरीही आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य? असा प्रश्‍न अस्वस्थ करत होता.
***

आज एका निवांत क्षणी तो मागे वळून पाहत होता. काय जालीम उपाय सुचवला होता मित्रानं. एवढ्या मोठ्या महानगरात किती छान निभाव लागला आपला? छोटी नोकरी. नंतर थोडी मोठी नोकरी. डॉक्‍टरेट. त्यानंतर विभाग प्रमुख. आणि आता प्राचार्य. डॉक्‍टरेटच्या प्रबंधाचे पेटंट. एवढे सारे पदरी होते. दरम्यानच्या काळात प्राध्यापक पत्नीही मिळाली. संसारही थाटला. घरही झालं. किती बदललो आपण गेल्या काही वर्षांत! पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, निभाव लागण्यासाठी मित्रानं सांगितल्याप्रमाणे आडनाव बदलण्याचा जालीम उपाय केला. केवळ आडनावाच बदललं नाही, तर चालण्या-बोलण्याची, राहण्या-खाण्याची रीतही बदलली आपण. जे लोक आपल्यापासून तुटक वागत होते, त्यांचाच तथाकथित सुसंस्कृतपणा, शिष्टाचार किती हुबेहूब अंगिकारला. म्हणूनच का त्यांना माझ्यासारखा परका आपलासा वाटू लागला? जाऊ द्या! पण एवढं करून आपलं ईप्सित साध्य केलंच! उद्या एका आंतराष्ट्रीय व्यासपीठावर अभूतपूर्व सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणार आहे. म्हणून तो कितीतरी वेळ गतकाळातील आठवणीत रमत स्वत:शीच बोलत राहिला...
***

आज देशाच्या राजधानीतील एका मोठ्या समारंभात त्याच्या कामगिरीबद्दल सत्कार समारंभ सुरु होता. तो मोठ्या सन्मानाने व्यासपीठावर विराजमान झाला. उपस्थित दिग्गज त्याच्या कामगिरीचे कौतुक करत होते. परंतु अशा या सोहळ्यातही ज्यानं आडनाव बदलण्याचा जालीम उपाय सुचविला होता त्याची आठवण त्याला झाली. तो जुना सहकारी सध्या कुठं असतो असा प्रश्‍न याच्या मनात अचानकच चमकला. सध्या त्याचा काहीही ठावठिकाणा माहित नव्हता. त्यानेही आडनाव बदलण्याचा उपाय केला असेल का? तो ही यशस्वी झाला असेल का? अशा अनेक प्रश्‍नांचं काहूर त्याच्या मनात माजलं. अशातच पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करण्याचा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. पूर्वीचे आडनाव धारण केले तर माझ्या यशाची उंची हीच राहील? माझं वलय टिकून राहील का? लोकांचा दृष्टीकोन हाच राहील का? माझ्या गुणवत्तेवर कोणी संशय घेईल का? हे यश माझं आहे की माझ्या बदललेल्या आडनावाचं?

समोर स्वत:चाच कौतुक सोहळा सुरु असताना अशा साऱ्या विचारांचा गोंधळ त्याचा मनात सुरू होता. पण काही केल्या पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करावे का? याचा निर्णय होत नव्हता.
***

(Courtesy : www.esakal.com)

7/21/2015

मैत्रिणी चालणार नाहीत!

"लग्नानंतर तुमच्या मैत्रिणी घरी आलेल्या चालणार नाहीत‘ तिनं स्पष्टपणाने आपल्या भावी पतीला बजावलं. तो काहीच बोलला नाही. एका नातेवाईकाकडून हे स्थळ त्याला आलं होतं. दोघांची ही दुसरी भेट होती. अर्थात अद्याप काहीच निश्‍चित झालं नव्हतं. पहिली भेट तिच्या घरी होती. तर दुसरी भेट त्याच्या घरी होती. दुसऱ्या भेटीमध्ये दोघेजण आतल्या खोलीत जाऊन बोलत होते. "तुम्ही फेसबुक वगैरे वापरता. तुम्हाला मैत्रिणी असतीलच. मला तुमच्या मैत्रिणी असलेल्या आवडणार नाहीत. लग्नानंतर कोणतीही मैत्रिण घरी आलेली चालणार नाही‘ असे तिने स्पष्ट सांगितले. एवढ्या अपेक्षेशिवाय तिने काहीही इतर अपेक्षा सांगितल्या नाहीत. परस्परांमध्ये इतर काही विचारपूस वगैरे झाल्यावर दुसरी भेटही संपली.

तो तत्वज्ञानाचा पदवीधर होता. तर ती विज्ञान शाखेची पदवीधर होती. दोघांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सारखीच होती. दोन्ही कुटुंबियांच्या या विवाहासाठी होकार होता. "मैत्रिणी चालणार नाहीत!‘ हा एकच विचार मुलाच्या मनात घुमू लागला. त्यासाठी त्याने अद्याप काहीही निर्णय कळविला नाही. पुढील 2-3 दिवस तो आपल्या जवळच्या मित्रांकडून याबाबत चर्चा करत होता. एक मित्र म्हणाला, "तिचे मित्र घरी आलेले तुला चालतील का? मग तुझ्या मैत्रिणी तरी तिला कशा चालतील? तिला सांगून टाक. लग्नानंतर मैत्रिणी घरी येणार नाहीत‘ पण तरीही ती आतापासूनच स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचं मुलाला वाटत होतं. अशातच दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "हो म्हणायचं, लग्न झालं की सगळं बरोबर होतं‘ तर तिसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "काय कर, तिला प्रेमाने समजून सांग. की माझ्या मैत्रिणी आहेत. पण मैत्री निखळ आहे.‘ तर त्याच्या कुटुंबियांनी मात्र स्पष्ट सांगितलं. "मुलगी जर आताच मुलाला धाक दाखवत असेल, तर पुढे आयुष्य कसे निभावून नेईल?‘

तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्याने अशा साऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर लग्नाच्या विषयापेक्षाही एखाद्या मुलीच्या दृष्टीकोनाबाबत समाजाची भूमिका किंवा विचार करण्याची पद्धत त्याला नव्याने समजली होती. मात्र, त्याचा या स्थळाबाबत काहीही नेमका निर्णय होत नव्हता. कारण "मैत्रिणी चालणार नाहीत‘ हा विचारच त्याच्या मनात घोळत होता.

(Courtesy: esakal.com )

7/12/2015

'आपलं ध्येय काय?'

मोठ्या कष्टानं त्याचा बाप वैभव उभारण्याचा प्रयत्न करत होता. छोटे-मोठे नोकऱ्या, व्यवसाय पडेल ते काम करून बापाने पैसा जमविला. अलिकडेच शहराच्या जवळ जागाही खरेदी केली. आता त्यावर घर बांधण्याचं काम सुरु होतं. पत्नी आणि दोन मुले एवढंच त्यांचं कुटुंब. दोन्ही मुलं कॉलेजात शिकत होती. थोरला कायद्याचा अभ्यास करत होता. तर धाकटा सायन्समध्ये शिकत होता. दोन्ही मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बापाने त्यांच्या वेळा बघूनच घराचं बांधकाम काढलं. दोन्ही मुलांना बांधकामावर देखरेख करण्यास ठेवले. दोन्ही मुलं बापाचा मान ठेवत होते. त्यामुळे दोघेही मनापासून बांधकामाच्या कामात लक्ष देत होते.

एके दिवशी वाळूचा एक ट्रक बांधकामाच्या ठिकाणी आला. आजूबाजूला जागा नव्हती म्हणून वाळू शेजारच्या एका बंगल्याच्या दारात उतरविण्यात आली. आणि बांधकाम सुरु झाले. काही वेळातच ती वेळा बांधकामासाठी उपयोगात येणार होती. आणि ती जागा रिकामी होणार होती. मात्र त्याआधीच शेजारच्या बंगल्याचा मालक बाहेर आला. आरडाओरडा करू लागला. माझ्या दारात वाळू ठेवल्याबद्दल बोलू लागला. ते पाहून दोन्ही मुलांना राग आला. ते तडक त्याच्याजवळ येऊन वाद घालू लागले. प्रकरण वाढू लागले. थोरल्या पोराने शेजाऱ्याला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. दरम्यान वाद सुरु असतानाच कोणीतरी बापाला कळविले. बाप धावत बांधकामाच्या जागी आला. दोघांचा वाद पाहून त्याने दोन्ही पोरांना बाजूला नेले. आणि शेजाऱ्याकडे येऊन हात जोडून अतिशय नम्रपणाने म्हणाला, "जागा नव्हती म्हणून एक-दोन तासासाठीच तुमच्या दारात वाळूचा ट्रक रिकामा करावा लागला. तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अवघ्या अर्ध्या तासात तुमच्या दारातील वाळू रिकामी करतो आणि जागा पूर्ववत स्वच्छ करून देतो. कृपया तुम्ही सहकार्य करा.‘ बापाचा नरमाई पाहून शेजारीही शरमला. आणि "ठिकाय ठिकाय‘ म्हणत निघून गेला.

त्यानंतर बापाने वाळू काढून घेण्याची सूचना दिली. बांधकाम सुरु असलेल्या जागेकडे बोट दाखवून दोन्ही पोरांना बाप म्हणाला, ‘मुलांनो, आपले ध्येय ही इमारत बांधणे आहे. या शेजाऱ्याशी भांडत बसणे हे नव्हे. माणसाला आपलं नेमकं ध्येय समजत नाही. त्यामुळे सगळा गोंधळ उडतो.‘

(Courtest: esakal.com)

7/01/2015

आनंदाश्रू (बोधकथा)


अंजनीपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक हुशार मुलगी राहत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. गाणंही छान म्हणायची. शाळेतील सगळ्या उपक्रमांत ती उत्साहाने सहभाग घ्यायची आणि हो, दररोज आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन शाळेत जायची. शाळेतील सर्व शिक्षकांची ती लाडकी विद्यार्थिनी होती. ती आई-बाबांकडे कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत नसे. तिला सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडत होत्या. ती दररोज पोळी-भाजी, भात-आमटी, कोंशिबीर खात असे. ती आईला घर आवरण्यासाठी मदतही करायची.

शाळेतील विद्यार्थ्यांनाही ती मदत करत होती. गावकऱ्यांचीही ती लाडकी मुलगी होती. तिला गाण्यामध्ये खूप बक्षिसेही मिळाली होती. ती कायम हसतमुख असायची. बाबांकडून ती दररोजच्या वृत्तपत्रातील बातम्या माहिती करून घेत असे. शाळेतील गृहपाठही ती वेळेत पूर्ण करायची. ती लवकर झोपायची आणि लवकर उठायची. एके दिवशी तिने "आनंदाश्रू‘ हा शब्द ऐकला आणि आईला त्याचा अर्थ विचारला. त्यावर आई म्हणाली, "आनंदात असल्यावर डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ त्यावर तिचे समाधान झाले नाही. "आई, डोळ्यातून पाणी येणे म्हणजे रडणे. आनंदात असल्यावर रडू कशाला येईल.‘ त्यावर "तुला अनुभव आल्यावर समजेल‘ असे म्हणत आईने तिला समजावले.

अंजनीपूरमध्ये केवळ चौथ्या इयत्तेपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या अर्धापूर गावाला जावे लागत. शाळेत जाण्यासाठी मुलींना बसचा मोफत पास मिळायचा. तसाच पास तिलाही मिळाला होता. दररोज गावातील सर्व मुली एकत्र बसमधून शाळेत जात. त्यांच्यासोबतच ती देखिल जात होती. एकदा तिला मामाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जायचे होते. मामाचे गाव अर्धापूरजवळच होते. अर्धापूरला मामा तिला घेण्यासाठी येणार होता. त्यादिवशी शाळा होती. तिने मैत्रिणीजवळ शिक्षकांसाठी शाळेत येणार नसल्याबाबतची चिठ्ठी दिली. ती शाळेच्या वेळेत असलेल्या बसनेच अर्धापूरला जाणार होती. आईने तिच्याकडे काही पैसेही दिले. तिला शाळा बुडवून मामाकडे जाणे बरे वाटले नाही; पण आई-बाबांनी सांगितल्यामुळे ती निघाली होती. बसमध्ये बसल्यावर पास दाखविण्याऐवजी कंडक्‍टर काकांना तिने तिकिटासाठी पैसे दिले. तिच्याकडे पास असल्याचे माहीत असल्याने कंडक्‍टरकाका म्हणाले, "तुझ्याकडे पास आहे ना. मग तिकीट का काढतेस?‘ त्यावर ती म्हणाली, "काका माझा पास केवळ शाळेत जाण्यासाठी आहे; मामाकडे जाण्यासाठी नाही. आज मी शाळेत जाणार नाही. त्यामुळे मी तिकिटासाठी पैसे आणले आहेत. हे पैसे घ्या आणि मला तिकीट द्या.‘‘ त्यावर कंडक्‍टर काकांनी "शाब्बास, शाब्बास!‘ म्हणत तिला तिकीट दिले. बसमधील मैत्रिणी हे सारे पाहत होत्या. त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांना ही गोष्ट सांगितली. शिक्षकांनाही तिचे कौतुक वाटले.

दुसरा दिवस उजाडला. मामानेही तिला शाळेत आणून सोडले. प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकांनी तिची बसमधील गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि बोधकथेचे एक पुस्तक देऊन तिचा सत्कार केला. मुख्याध्यापक म्हणाले, ‘ही एक आदर्श मुलगी आहे. तिने बसचा पास फक्त शाळेसाठीच वापरला. मामाच्या गावी जाण्यासाठी वापरला नाही. मुलांनो, तुम्ही तिचा आदर्श घ्यायला हवा. तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. उद्या तुम्ही मोठे व्हाल. अधिकारी व्हाल. कार्यालयाच्या कामासाठी तुम्हाला अनेक सोयीसुविधा मिळतील. त्या वेळी तुम्हीदेखील तिच्याप्रमाणेच आपल्या अधिकारातील गोष्टींचा खासगी कामासाठी वापर करू नका. आपल्या अधिकारातील कोणत्याही सार्वजनिक सुविधेचा स्वत:च्या खासगी कामासाठी वापर करणे स्वत:साठी आणि देशासाठीही अयोग्य आहे.‘

अंजनीपूरमधील गावकऱ्यांनाही आर्याची गोष्ट समजली. त्यांनीही ती गावात आल्यावर तिचे आणि आई बाबांचे कौतुक करून तिचा सत्कार केला. सत्कार कार्यक्रम झाल्यावर तिच्या डोळ्यांतून पाणी आले. त्या वेळी तिची आई तिला म्हणाली, "तुझ्या डोळ्यांतून जे पाणी येत आहे ना त्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ हे ऐकल्यावर आनंदात ती आईच्या कुशीत शिरली.

व्यंकटेश कल्याणकर
(सौजन्य :  esakal.com)

6/26/2015

दारिद्य्र दूर करण्याचं 'प्रॅक्‍टिकल'

तो एका महाविद्यालयात चांगल्या पदावर कार्यरत होता. विद्यार्थ्यांना अध्ययन करणे हा ही त्याच्या कामाचा एक भाग होता. त्याची डॉक्‍टरेटही सुरू होता. देशातील दारिद्य्रासंबंधी एका विषयावर त्याचे अध्ययन सुरू होते. डॉक्‍टरेट पूर्ण झाल्यावर दारिद्य्राचं काय होणार हे माहित नव्हतं, पण त्याला बढती मिळणार हे मात्र नक्की होतं. विहित कालावधीत त्याने आपला अहवालही संबंधित विद्यापीठात सादर केला होता. त्यामध्ये देशातील दारिद्य्राची जगातील दारिद्य्राशी तुलना केली होती. दारिद्य्र हटविण्यासाठी समाजातील विविध घटकांनी केलेल्या उपाययोजना यांचाही अहवालात ऊहापोह करण्यात आला होता. तसेच त्यातून विविध निष्कर्षही काढण्यात आले होते. आता लवकरच विद्यापीठातील मंडळासमोर त्याची प्रत्यक्ष तोंडी परीक्षा होणार होती. परीक्षेच्या तयारीसाठी तो मार्गदर्शकासोबत अनेकदा चर्चा करत होता. मार्गदर्शकही त्याला दिशा देत होता. अर्थात मार्गदर्शकाच्या कर्तृत्वातही आणखी एका "डॉक्‍टरेट‘ विद्यार्थ्याची भर पडणार होती.

मिळेल तेथे मिळेल तेव्हा डॉक्‍टरेटचा विद्यार्थी आपल्या विषयासंबंधित थिअरी मजबूत करत होता. सोबत आवश्‍यक तेथे मार्गदर्शकाची भेटही घेत होता. मागदर्शकाला वेळ नसला तर त्याच्या प्रवासाच्या वेळेत त्याचे मार्गदर्शन घेत होता. असाच आज तो मार्गदर्शकासोबत प्रवास करत होता. मार्गदर्शकाची गाडी वातानुकूलित आणि डोळ्यात भरणारी होती. तोंडी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी आपले मुद्दे पटवून देत होता. गाडी एका शहरातील गर्दीच्या चौकात आली. गाडीच्या खिडक्‍या बंद होत्या. गाडी सिग्नलला थांबली. बाहेरून एक मुलगा काचेवर थाप मारत होता. प्रत्यक्षात जीवनात आपल्या दारिद्य्रावर मात करण्यासाठी तो सिग्नलला काहीतरी विकत होता. लाल सिग्नल लागला की त्याच्या विक्रीसाठीचा हिरवा कंदील लागल्यासारखे वाटायचे. डॉक्‍टरेटचा विद्यार्थी निष्कर्षांची उजळणी करत होता. तर मार्गदर्शक दारिद्य्र दूर करण्यासाठी प्रत्यक्ष टीप्स्‌ द्याव्यात असा सल्ला देत होते. बाहेर पोरा काचेवर थाप मारत होता.
उद्या जगासमोर दारिद्य्राबद्दलची थिअरी मांडून स्वत:चा विकास करून घेणाऱ्या विद्यार्थ्याची आणि त्याच्या मार्गदर्शकाची खिडकीबाहेर नजर गेली होती. बाहेरच्या पोराकडून काहीतरी खरेदी करून त्याला मदतीचं "प्रॅक्‍टिकल‘ करण्याची दृष्टी डॉक्‍टरेटच्या विद्यार्थ्याकडे नव्हती. तसेच मार्गदर्शकालाही आपल्या विद्यार्थ्याला दारिद्य्र दूर करण्याचं अगदी छोटंसं "प्रॅक्‍टिकल‘ करून दाखवावं याची गरज वाटत नव्हती. कारण त्यातून मार्गदर्शकाला किंवा विद्यार्थ्याला काहीही फायदा होण्याची तीळमात्रही शक्‍यता नव्हती.
(Courtesy: esakal.com)

6/20/2015

स्पर्श : तिचे यश

तिची दहावीची परीक्षा पार पडली. आज तिचा दहावीचा निकाल समजणार होता. तरीही निकाल पाहण्यास जाताना तिला भीती वाटत होती. निकालावरून घरात कोणी काही बोलणारं नव्हतं. तिच्या घरात आई, बाबा आणि तिला एक लहान भाऊ होता. कुटुंब छोटं होतं, पण समाधानी होतं. घरातही ती आईला घरकामात मदत करत होती. तिने अभ्यासही खूप केला होता. पण तरीही तिला धाकधूक होतीच. आई, बाबा आणि छोट्या भावालाही काहीशी चिंता लागली होती. वडिल नोकरी करत होते. त्यांना वेतनही फार जास्त नव्हते. तसे त्यांचे गावही छोटे होते. मात्र, याच गावातून देशाला मोठमोठे लोक मिळाले होते.

जे आहे त्यात हे कुटुंब समाधानी होतं. मात्र मुलगी मोठी होत असल्याने बाबांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. तिच्या लग्नासाठीच्या आर्थिक तरतूदीच्या विचाराने ते अधिकच चिंताग्रस्त होत. तरीही ती वडिलांना आधार देत होती. तरीही "मी मोठी झाल्यावर तुमच्या सगळ्या चिंता दूर करेल‘, असा विश्‍वास ती आपल्या बाबांना देत होती.

तिचा निकाल लागला. ती धावतच घरी आली. निकाल आनंददायी होता. तिच्या आनंदाला आकाश ढेंगणे झाले होते. ती शाळेत सर्वप्रथम आली होती. आई, बाबा आणि छोट्या भावालाही खूप आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी शाळेमध्ये तिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरी आल्यावरसुद्धा आई-बाबांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नव्हते. "पोरीने नाव काढलं‘ म्हणत ते तिचं कौतुक करत होते. तसेच तिच्या लग्नाच्या विचारापेक्षा तिच्या पुढील शिक्षणाचा विचार करण्याचे त्यांनी ठरविले.

शेजारच्या मिठाईच्या दुकानातून त्या दिवशी बाबांनी उधारीने मिठाई खरेदी केली आणि जवळजवळ संपूर्ण गावाला मिठाई वाटली. "मुलगी‘ झाली म्हणून तिच्या जन्माच्या वेळीही त्यांनी एवढी मिठाई वाटली नव्हती. मुलगीही काहीतरी करू शकते यावर त्यांचा विश्वास दृढ झाला होता.

6/09/2015

"ब्लॉग रायटिंग'ने टाकली कात

फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात "ब्लॉग रायटिंग‘ मागे पडते की काय, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. प्रदीर्घ लेखन ऑनलाइन करण्याचे नवे माध्यम म्हणून "ब्लॉग रायटिंग‘ पुन्हा नव्याने समोर येत आहे.

व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात आपल्याला दररोज अनेक मेसेजेस येत असतात. त्यामध्ये कधी कधी प्रदीर्घ लेखही फॉरवर्ड केले जातात. हे लेख येतात कुठून, एवढे मोठे लेख लिहितात कोण; तर हे जे लेखक मंडळी असतात ते बहुतेकवेळा "ब्लॉगर्स‘ असतात. ऑनलाइन माध्यमांत ब्लॉगवर लेखन करणाऱ्यांना "ब्लॉगर्स‘ म्हणतात. किरकोळ मर्यादा सोडल्या तर संकेतस्थळ आणि ब्लॉगमध्ये फार फरक नाही.

गुगल, वर्डप्रेससारख्या माध्यमातून आपण अगदी तासाभरात आपला ब्लॉग सुरू करू शकतो. आपल्या हव्या त्या विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. जी-मेलचा ई-मेल आयडी वापरून आपण गुगलच्या "ब्लॉगर‘ सेवेद्वारे स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकतो. एका ई-मेलवरून आपण अनेक ब्लॉग तयार करू शकतो. एका ब्लॉगवर अनेक लेख लिहू शकतो.

ब्लॉगिंगची सेवा नि:शुल्क उपलब्ध आहे. याशिवाय ब्लॉगला भेटी देणाऱ्या "व्हिजिटर्स‘च्या संख्येवरून जाहिरातीही मिळू शकतात. गुगल ऍड्‌सच्या माध्यमातून मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्नही उपलब्ध होऊ शकते. मराठी भाषेत ही पद्धत अद्याप फारशी प्रचलित नाही. मात्र, पाश्‍चिमात्य देशात ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय झाला आहे. अगदी कथा, कविता, राजकारण, साहित्य, पाककृती, पर्यटन आदी विषयांवरचे ब्लॉग्ज्‌ लोकप्रिय आहेत. 

मराठीमधील ब्लॉग्ज्‌वर दर्जेदार साहित्य प्रकाशित होत राहते. प्रसार आणि प्रचाराअभावी "मराठी ब्लॉगर‘ अद्यापही काही अंशी दुर्लक्षितच आहे. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय विषयांवर काहीतरी खळबळजनक लिहिणारे ब्लॉगर अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
ब्लॉग लेखनामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये खासगी ब्लॉग, समूह ब्लॉग, संस्थेचे ब्लॉग वगैरे प्रकार करता येतात. विशेष म्हणजे फेसबुक, ट्‌विटर वगैरे म्हणजे एक प्रकारचे ब्लॉगिंगच आहे. ते मायक्रोब्लॉगिंग प्रकारात मोडते. ब्लॉगची लोकप्रियता वाढली, तर आपण विहित शुल्क अदा करून आपल्या ब्लॉगला संकेतस्थळात परावर्तित करू शकतो.

जॉन बर्गर यांची वेबलॉगची संकल्पना
जॉन बर्गर यांनी 1990 मध्ये वेबलॉग ही संकल्पना आणली. पुढे तीच ब्लॉग म्हणून नावारूपास आली.
दररोज विशिष्ट व्हिजिटर्सचा आकडा गाठला की ब्लॉगला गुगल ऍड्‌स मिळतात. अधिकृत शासकीय ब्लॉग तयार करणारा इस्राईल हा पहिला देश आहे. पाश्‍चिमात्य देशात वैयक्तिक ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय आहे.

(Courtesy: www.esakal.com)

6/08/2015

स्पर्श : 'दहावीचा निकाल!'

बापाच्या मागं मोठ्ठं कर्ज होतं. एका पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं. आता एक मुलगा अन्‌ बायको एवढाच त्याचं कुटुंब होतं. ऊस तोडत तोडत तो हळूहळू कर्ज फेडत होता. पण अनेक वर्षे झाले तरी कर्ज फिटत नव्हते. तुटपुंजे उत्पन्न, फिरता संसार यामुळे पोराला शाळेत पाठविता येत नव्हतं. नाही म्हणायला वारसानं मिळालेलं एक छोटसं घर होतं. पण तिथं तो फारसा नव्हताच. पोटाची खळगी आणि कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी कधी पडेल ते काम, पडेल तिथं जायचं. कधी ऊस तोडायचा, कधी दगड फोडायचे अन्‌ कधी लोकांना चालण्यासाठी रस्ते निर्माण करायचे. स्वत:साठी रस्ता मात्र कधीच तयार करू शकत नव्हता. पैसे येत होते. पण नियोजन करता येत नव्हते.

एक पोरा मात्र कधीच ऊस तोडायला आला नाही. आला तरी दूरवरून सगळं बघत बसायचा. त्याला शाळेत जायचं होतं. अन्‌ बाप शिकवू शकत नव्हता. ऊस तोडणीचा मोसम आला होता. आता ऊस तोडायचे कामही मिळाले होते. काम देणाऱ्यानं ट्रॅक्‍टरही दिला होता. तसेच सोबत गावातील इतर काही मंडळींनाही घेऊन येण्यास सांगितले होते. यानं सगळी तयारी केली. सगळेजण तयारीनिशी कामाला निघाले. बापानं पोऱ्याला आवाज दिला, "पोऱ्या चल. बैस टॅक्‍टरात. तेवडच पैकं मिळतील जास्तीचे‘ बापानं पोराला आदेश दिला. मात्र पोर जागचा हलला नाही. काही वेळातच किशोरवयातला तो पोऱ्या "मला नाय तोडायचा ऊस. मला साळंला जायचयं‘ असं म्हणत रडू लागला.

पोराला आपल्याशिवाय पर्याय नाय. अन्‌ परत पुन्हा आपल्याकडं येईल या विचाराने बाप पुढे निघाला. मायचा जीव खालीवर होऊ लागला. बापानं दोन-चार वेळा हाका मारल्या. पण पोऱ्या जागचा हलला नाही. आता मात्र, बापाला राग आला. तो ट्रॅक्‍टरातून खाली उतरला. अन्‌ त्याच्या दिशेने धावू लागला. पोरा दूरवरून हे पाहत होता. कोणताही विचार न करता तो दूर धावत गेला. पुढे जाण्यासाठी मागे वळून न बघताही पोरा पुढे धावू लागला. "पोरगं हातचं गेलं‘ म्हणत बापानंही सोडून दिलं.

इकडं हा तालुक्‍याच्या ठिकाणी आला. 2-4 दिवस तो भेदरला. पण पुन्हा जिद्दीनं उभं राहिला. दिवसभरात पडेल ते काम करू लागला. रात्री मिळेल तिथे पडू लागला. हळूहळू त्याला जगातील अनेक गोष्टी समजू लागल्या. अशातच वर्षही गेलं. दरम्यान त्यानं शाळेत जायचं स्वप्नही पूर्ण केलं. बापाचं कर्ज किती, व्याज किती, त्यानं दिले किती याचाही त्यानं हिशेब मांडला. बघता बघता आणखी काही वर्षेही सरली. त्यानं मागे वळून पाहिलचं नाही. काम आणि शिकण्याचं स्वप्न यातच तो रमून गेला. शिकता शिकता तो दहावीतही पोचला. परीक्षाही दिली. आता आज त्याच्या दहावीचा निकाल होता. निकाल पाहण्यासाठी तो कुठल्यातरी इंटरनेट कॅफेत आला आणि काही वेळातच हर्षोल्हासाने धावतच बाहेर पडला... त्यानंतर शाळेत भेटण्यासाठी गेला. तो त्याच्या शाळेत पहिला आला होता. त्यामुळे त्याला कुठलीतरी शिष्यवृत्तीही मिळाली होती. आता त्याला आई-बापाची फार आठवण आली. तो तातडीने गावाच्या दिशेने निघाला. बापाच्या कर्जदाराला तो हिशोब मांडून दाखविणार होता. कर्जदाराला जाब विचारणार होता. आणि पुढे खूप शिकून मोठ्ठं होणार होता...

(Courtesy: www.esakal.com)

5/22/2015

देवमूर्तीना विकायचे का?

पोराच्या शिक्षणासाठी त्यानं खूप कष्ट घेतले. वडिलोपार्जित थोडीफार जमीन आणि देवघरात देवाच्या पुरातन अन्‌ दुर्मिळ मूर्ती होत्या. संपत्ती म्हणून केवळ राहतं घर आणि थोडीफार जमीन होती. जमिनीमध्ये किरकोळ पीके घेऊन त्यातच घरखर्च आणि एकुलत्या एक पोराचं शिक्षणही कसबसं करत होता. पोरगा हुशार होता. नुकतीच पदवीही मिळवणार होता. दहावीनंतर तालुक्‍याच्या ठिकाणी आणि नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी पोरगा शिकत होता. परदेशात जाऊन काहीतरी शिकायचं म्हणत होता. बापानं पोराला कधीही अडवलं नाही. पोरगा जे करेल ते चांगलचं मानत आला होता. पोरगाही प्रामाणिक होता. त्याला परिस्थितीची जाण होती.

पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन पोरगा सुट्यांसाठी घरी आला. दरम्यान त्यानं काय शिकायचं, कोठे शिकायचं वगैरे माहितीसोबत अपेक्षित खर्चाचा आकडाही आणला होता. आई बापाला त्यातील फक्त खर्चाचा आकडाच समजणारा होता. आकडा चांगलाच मोठा होता. काही प्रमाणात शैक्षणिक कर्जही मिळणार होते. पण तरीही प्रवास, निवास आणि अन्य काही बाबींसाठी पैसा लागणारच होता. बापाची परिस्थिती त्याला माहित होती. त्यामुळे त्यानं आल्यावर आधी आईला खर्चाचा आकडा सांगितला. आणि एवढ्या खर्चासाठी पुढे शिकण्यापेक्षा नोकरी करतो, असेही सुचविले. त्यावर आईच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आईला पोराला धीर दिला. त्याच रात्री आईने पोराच्या बापाला ही गोष्ट सांगितली. बापाला पोराचा नाही तर परिस्थितीचा राग आला. "उद्या पोरगा मोठ्ठं झाल्यावर कोणाचं नाव काढणार? आपलचं ना. मग करू की पैसे गोळा‘ असे म्हणत बापाने आईला आश्‍वस्त केले. पोराच्या शिक्षणासाठी आधीच घर, जमीन गहाण टाकून बाप कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे जमीन, घर विकताही येत नव्हते. आतल्या खोलीतून पोरगा सगळं ऐकत होता. हळूच बाहेर येत तो म्हणाला, "पण, ते सगळं करून आपण आकडा गाठू शकत नाहीत. मी आधी नोकरी करतो. नंतर पैसे गोळा करून जातो की शिकायला‘ यावर बापाचे समाधान झाले नाही. "पोरा आधी शिक बाबा. पैशाच्या नादी लागलं की मग कशात ध्यान लागत नाही बघ! मी बघतोना पैशाचं काय तरी, तू कशाला चिंता करतोय?‘ असे म्हणत बापानं पोरालाही धीर दिला. गणित जमणार नव्हतं, पण बापाची माया बोलत होती. पोराचा बापावर फार विश्‍वास होता. तरीही प्रचंड द्विधा मन:स्थितीत पोरगा झोपी गेला.

आईला आणि बापाला चिंता सतावत असल्याने झोप येत नव्हती. बाप घरातच अस्वस्थ होऊन फेऱ्या मारू लागला. माणसाला काही सुचलं नाही की तो देवाला शरण जातो. त्याप्रमाणे बापही शेवटी देवघरात गेला. समईचा मंद प्रकाश उजळत होता. जणू काही समयाच अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणार होत्या. बाप हात जोडून देवासमोर बसला. "बाबा, तूच यातून काहीतरी मार्ग काढ‘, अशी मनोमन प्रार्थना करू लागला. काही क्षण डोळे मिटले. काही वेळाने डोळे उघडून त्यानं पुन्हा देवाकडं पाहिलं. काहीतरी मार्ग सापडल्याचा भास त्याला झाला. देवघरातील सगळे देव जणू काही त्याच्या मदतीला धावून आले होते. देवाच्या धातूच्या मूर्ती पुरातन, दुर्मिळ आणि मनोहारी होत्या. बापानं अनेकदा अशा दुर्मिळ मूर्त्यांचा लिलाव तसेच त्यांना मोठी किंमत मिळालेली पाहिली होती. शिवाय अशा मूर्त्या जिल्ह्याच्या ठिकाणी संग्रहालयातही त्यानं पाहिल्या होत्या. असाच भाव आपल्या या देवाच्या मूर्त्यांनाही मिळेल असा त्याला विश्‍वास होता. कारण मूर्त्याही सुंदर, वजनदार अन्‌ दुर्मिळ होत्या. अशाच विचारात असताना पोराची आई देवघरात आली. बापानं तिलाही ही कल्पना सांगितली. त्यानंतर काही काळ वातावरणात अंधारासह शांतताही पसरली. ज्या देवासमोर हात जोडले होते, ज्या देवासमोर नतमस्तक झालो होतो, त्याच देवाला आपल्या कामासाठी विकायचे? हा विचार दोघांनाही स्वस्थ बसू देत नव्हता. नंतर कितीतरी वेळ दोघेही देवघरातच बसून राहिले.

देव आणि देवमूर्त्या... श्रद्धा आणि कर्तव्य... अंधार आणि प्रकाश... भावना आणि व्यवहार... अशा द्वंदात फिरत राहिले. पोराच्या शिक्षणासाठी ते देवाला नव्हे तर देवाच्या मूर्त्यांना विकण्याचा विचार करत होते. पण तरीही मूर्ती विकाव्यात की नाही यावर त्यांचा निर्णय होत नव्हता...

5/17/2015

'माझी सुपारी घेशील का?'

शाळेतील एक मॅडम रजेवर होत्या. त्यामुळे दुसऱ्या एका मॅडमना मोकळा तास घ्यावा लागला. त्या मॅडम त्या वर्गाला शिकवतही नव्हत्या. परंतु मोकळा आणि शेवटचा तास असल्याने मुख्याध्यापकांनी त्यांना तेथे पाठविले. वर्गात गोंधळ होता. मॅडम आल्यावर काही मुले शांत झाली. पण काही विद्यार्थी अजूनही गोंधळ करत होते. बाहेर पाऊस पडत असल्याचे विद्यार्थ्यांना खेळायला सोडनेही शक्‍य नव्हते. एक तास काहीतरी सदुपयोगी लावावा म्हणून मॅडमनी वर्गावर नियंत्रण मिळवित "चला आपण गप्पा मारूया!‘ असे म्हटले. त्यानंतर वर्ग अधिक शांत झाला. मॅडमनी प्रत्येकाला तुम्हाला आयुष्यात काय व्हायचे आहे असे विचारायला सुरुवात केली. कोणी डॉक्‍टर, कोणी इंजिनिअर, कोणी शिक्षक वगैरे होण्याची इच्छा व्यक्त केली.

आता मागील बाकावरील एका उनाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर आला. तो म्हणाला, "मॅडम आपल्याला पेट्या कमावायच्या आहेत?‘ मॅडमला समजले नाही. त्या म्हणाल्या, "म्हणजे काय?‘ त्यावर त्या विद्यार्थ्याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मॅडम, पेट्या कमावणार म्हणजे सुपाऱ्या घेणार, अन्‌ पैसे कमावणार?‘ "सुपाऱ्या म्हणजे माणसांना मारण्याच्या?‘ मॅडम आश्‍चर्य व्यक्त करत म्हणाल्या. त्यावर पोराने मॅडमकडे पाहत, डोके खाजवू लागला. त्यानंतर कोणीच काहीच बोलले नाही. मॅडम एकदम भोवळ आल्यासारख्या जोरात खुर्चीवर बसल्या. अन्‌ नकळतच त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. सगळ्या वर्गात नको असलेली निरव शांतता पसरली. वर्गातील काही हळवी मुले मॅडमकडे पाहतच राहिली.

स्वत:ला सावरत मॅडमनी पर्समधील रूमाल काढत डोळे पुसले. त्या म्हणाल्या, "तुला माझी सुपारी दिली तर घेशील का?‘ तेवढ्यात वीजांचा प्रचंड कडकडाट झाला. वीजांच्या आवाजापेक्षाही वर्गातील परिस्थितीमुळे विद्यार्थी अधिक घाबरले. मागच्या बाकावरील विद्यार्थी धावत आला आणि मॅडमच्या पाया पडत म्हणाला, "मॅडम, तुमी आमच्या मॅडम हायेत, तुमची सुपारी कशी घेईल‘ त्यानंतर मॅडम म्हणाल्या, "तुझ्या आईची, बाबाची, भावाची, या वर्गातील मित्राची कोणाचीही सुपारी घेशील?‘ त्यावर विद्यार्थी, "मॅडम हे सगळे आपल्या जवळचे हायेत त्यांची सुपारी कशी घेईल?‘ मॅडम दीर्घ श्‍वास घेत म्हणाल्या, "मग तू ज्यांची सुपारी घेऊन ज्यांना मारशील ते पण कोणाच्या तरी जवळचे असतील ना?‘ बऱ्याचवेळा नेमक्‍या वेळी वेळ संपून जाते. त्याप्रमाणे तेवढ्यात तास संपल्याची घंटा वाजली. आणि प्रचंड हळवा झालेला वर्ग क्षणार्धात हळवेपणा सोडून शाळेबाहेर धावत सुटला.

दुसऱ्या दिवशी मॅडमनी त्या मुलाला बोलावून घेतले. त्याच्याशी अधिक संवाद साधला. त्याचे समुपदेशही केले. शाळेच्या परंपरेप्रमाणे शाळा भरण्यापूर्वीच्या प्रार्थनेसाठी त्याला सर्वांसमोर येऊन प्रार्थना म्हणण्यासाठी तयार केले. पुढील 2-4 दिवस त्याच्याकडून चांगली तयारी करून घेतली. आज तो दिवस उजाडला होता. त्यादिवशी तो विद्यार्थी प्रार्थना म्हणणार होता. मॅडमला थोडीशी चिंता वाटत होती. तो प्रार्थना नीट म्हणेल का? प्रार्थनेमुळे त्याच्या जीवनात काही फरक पडेल का?

(Courtesy  : www.esakal.com)

5/09/2015

तू मला विसरून जा जरी…।

मी आणि सौ कीर्ती देसाई (कल्याणकर) हिने मिळून लिहिलेले आणि सौ कीर्तीने संगीतबद्ध केलेले गीत - तू मला विसरून जा जरी…।

5/08/2015

स्पर्श : लघुकथा संग्रह

"इ-सकाळ'च्या वेब आवृत्तीसाठी मी दर सोमवारी "स्पर्श' नावाचे लघुकथेचे सदर लिहित आहे. त्यामध्ये कमीत कमी शब्दात वास्तव जीवनातील सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे -

आतापर्यंत जवळपास 8 पेक्षा अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांची लिंक येथे दिली आहे. त्यापैकी काही लघुकथांवर उत्तम डॉक्‍युमेंट्री होऊ शकते असे काही वाचकांनी निरीक्षण नोंदविले आहे.खास वाचकांसाठी सर्व लाघुकाथांची लिंक येथे देत आहे.
β स्पर्श : तू मला बी अशीच सोडून जाशील
β स्पर्श:'खोटं कधी बोलू नये,चोरी कधी करू नये'
β स्पर्श : स्मार्ट पोराचा "स्मार्ट फोन'
β स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...'
β स्पर्श : तिचा नकार
β स्पर्श : आपला धर्म कोणता?
β स्पर्श : देवाचा नवस
β स्पर्श : शहराचे दर्शन
β स्पर्श : नेमके खरे काय?
β स्पर्श : रिअल एरर!

5/03/2015

मनातला भूकंप

तो पुन्हा एकदा दारू पिऊन आला. बायकोला शिव्या देऊ लागला. जेवायला मागू लागला. बायकोने काहीही न बोलता त्याला जेवू घातले. जेवतानाही तो ओरडत होताच. कसेबसे जेवण संपवून तो पुन्हा बडबड करू लागला. त्या गोंधळाने त्यांची छोटीशी झोपडीही थरथरू लागली. त्याची बायको मोलमजूरी करायची. दोन पोरींसह त्यालाही पोसायची. तो ड्रायव्हर होता. कधीतरी कामावर जायचा. एरवी दारूत बुडायचा. दारूसाठी पैसाही बायकोकडेच मागायचा. दिले नाही तर मारायचा. बायको पोरींसाठी पै पै साठवायचा प्रयत्न करायची.

जेवण झाल्यावरही त्याची बडबड सुरूच होती. मध्यरात्र उलटून बराच अवधी झाला होता. गोंधळामुळे झोपडीत कोणीच झोपू शकले नाही. अनेक दिवसांपासून बायको शांत होती, सहन करत होती. आता तो तिला मारहाण करू लागला. ती शांत राहण्याची आर्जवं करू लागली. हळूहळू तिच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला. ती पुन्हा पुन्हा त्याला शांत करू लागली. तो तिला मारतच राहिला. तिचे स्वत:वरील नियंत्रणच सुटले. त्याच्या तावडीतून सुटून ती थेट झोपडीच्या बाहेर आली. बाहेर धुण्यासाठीचा मोठा दगड पडलेला होता. रागाच्या आवेशात तिने तो उचलला. पुन्हा झोपडीत आली. त्याला धक्का देऊन खाली पाडत तिने त्याच्या डोक्‍यातच दगड घातला. क्षणार्धात त्याचा आवाज बंद झाला. होत्याचे नव्हते झाले. झोपडीत निरव शांतता पसरली. रक्ताचे पाट झोपडीभर वाहू लागले. पण हिच्या मनात अशांतता पेटली.

पहाट उजाडायला आणखी काही अवधीच बाकी होता. तिच्यासह दोन पोरी सैरभैर झाल्या. त्यांना काय करावं कळेचना. काही क्षणात झोपडीही हलू लागली. हिचाही तोल गेला. मुलीही पाळण्यात बसल्याप्रमाणे हलल्या. भीती, अस्वस्थता आणि दु:खाच्या जगातून सावरत काही वेळाने ती झोपडीबाहेर आली. बाहेर सगळीकडे हा:हाकार माजलेला. "भूकंप भूकंप‘ म्हणून लोक पळत होते. मनातील चलबिचलीमुळे हिला भास झाल्यासारखे वाटले. पण बाहेर सगळीकडेच धावाधाव होती. सगळे मदतीसाठी याचना करत होते. शेजारच्या मोठ्या इमारतीला तडे गेले होते. हिने आतून आपल्या दोन्ही पोरीला बाहेर काढले. इकडे तिकडे धावू लागली. जवळच्याच झोपडीतील माणूस "भूकंप भूकंप‘ म्हणत हिच्या झोपडीकडे धावला. त्याने झोपडीतलं दृष्य पाहिलं. तो धावत पुन्हा तिला शोधू लागला. दरम्यान दिवस वर आला होता. तेवढ्यात शेजारच्या माणसाला ती सापडली. रडून रडून डोळे पार खोल गेलेले. केस विस्कटलेले. एव्हाना बचावपथकही घटनास्थळी पोचले होते. शेजारचा माणूस तिला सांगू लागला, "तुझा दादला मेला भूकंपात. लई वाईट वाटलं. जे झालं ते झालं. तू जा, अन्‌ त्या सायबाला सांग. नाव नोंदव. भूकंपात मेल्याची नुस्कानभरपाई देत्यात. किमान लाखभर तरी मिळतील!‘

तिच्या काळजात धस्सं झालं! काय केलं अन्‌ काय झालं... तिच्या मनात मोठा भूकंप झाला... नाव नोंदवावे की नाही हे मात्र काही केल्या तिला समजेना...

(Courtesy: esakal.com)

4/17/2015

फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुख

फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक
आईबापाला केले आम्ही जिवंतपणी विभक्त
पराक्रमाच्या पोवाड्यानं सळसळना आमचं रक्त

तोडली आम्ही तुळस अन्‌ सोडला आम्ही गाव
कुणाचा कुणालाच इथं लागना कसा ठाव?
हिरवा कंदिल पेटला की झाली आमची भेट
पाहिले नाही कित्येक दिवस सग्यासोयऱ्यांचे गेट

कसला आलाय सण अन्‌ कसला आलाय उत्सव
आमच्यासाठी चार भिंतीत स्वत:चाच महोत्सव
फेस झाले बुक, अन्‌ कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक...

वाटलं कधी खावं खमंग तर ऑनलाईन ऑर्डर
घरात असूनही होऊ लागला घरच्या चवीचा मर्डर
इंटरनेटवरूनच फिरतो आम्ही साऱ्या साऱ्या जगात
मग गरज काय कधी कोणाच्या डोकावयाची मनात

माणूस झाला खूप छोटा अन इंटरनेट झालं मोठं 

एवढ्या मोठ्या जगात समजेना काय खर काय खोट
फेस झाले बुक, अन्‌ कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक..


- व्यंकटेश कल्याणकर  

4/13/2015

माझे दादा...

दादांच्या (वडिल-उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर) आठवणीने आज मी फार अस्वस्थ झालो. त्यामुळे त्यांच्या आठवणींना त्यांनी केलेल्या संस्कारांना उजाळा देत आहे -
त्यावेळी मी पाचव्या वर्गात होतो. मी बीडच्या शनिमंदिराजवळील राजस्थानी शाळेत होतो. वडिल नोकरीत होते. आम्ही वडिलांना "दादा' म्हणायचो. शाळेची फीस भरायची होती. वर्गात सूचना मिळाली 40 रुपये फी भरा. काहीही मागितलं की वडिल जरा शहानिशा करून पैसे द्यायचे. वडिलांना फीस मागायला मला फार संकोच वाटायचा. त्यादिवशी घरी आल्यानंतर सांगू का नको असा खूप विचार केला. त्यातच रात्र झाली. झोपी जाण्यापूर्वी मी दादांना हळूच म्हणालो, "दादा उद्या फी भरायची आहे.' तर ते फक्त "ठीक आहे' म्हणाले. मला फार वाईट वाटले. यावेळी फिला उशीर होईल असे वाटले.


दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो. साधारण दोन तासांनी वडिल स्वत: शाळेत आले. गुरूजींना भेटले. माझ्या प्रगतीची चौकशी केली. आणि फी भरली. मला फार फार आनंद झाला. वर्गातील इतर संपन्न स्थितीतील मित्रांपेक्षा माझी फी सर्वात आधी भरली गेल्याने मी खूप आनंदी झालो. त्यादिवशीपासून शालेय शिक्षण संपेपर्यंत दरवर्षी सर्वात आधी फीस भरल्याने माझा हजेरीपटावरील क्रमांक "एक' होता. त्यानंतर वेळोवेळी दादा शाळेतील सर्वात हुशार अशा गणेश लोटके, महेश मोढवे या विद्यार्थ्यांना भेटायचे. त्यांच्याकडे कोणती पुस्तके आहेत वगैरे चौकशी करायचे. मला काय हवे नको ते पहायचे. आजही ते काय हवे नको ते पाहतात. फरक फक्त एवढाच की ते या जगातून नव्हे तर वेगळ्या जगातून... दादांनी मला एक रुपयाची देखील संपत्ती दिली नाही. परंतु त्यापेक्षा अधिक मौल्यवान जीवनमूल्ये दिली आहेत.

4/10/2015

अबब! १०० व्या वर्षी पोहण्याच्या स्पर्धेत बक्षीस?

दुर्दम्य इच्छाशक्तीचा शारिरिक क्षमतांशी होणाऱ्या संघर्षामध्ये नेहमीच इच्छाशक्तीचाच विजय होतो, हे नव्याने सिद्ध झाले आहे. कोणी कल्पनाही करू शकणार अशी अजब, अभिमानास्पद आणि स्फुरण देणारी घटना जगाच्या इतिहासात नुकतीच घडली आहे. इ.स. 1914 साली जन्मलेली एक 100 वर्षाची महिला दक्षिण जपानमध्ये आजही जिवंत आहे.

वयाच्या 80 व्या वर्षी ती गुडघ्याच्या वेदनेतून शस्त्रक्रियेमुळे मुक्त झाली. एरवी एखाद्या सुशिक्षिताने वयाच्या 80 व्या वर्षी शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारून इतरांकडून सेवा घेत दयेचे जीवन पत्करले असते. परंतु असल्या दयेला भीक न घालता ही महिला स्वत:च्या गुडघ्यावर पुन्हा एकदा उभी राहिली आहे. केवळ मनात प्रबळ इच्छाशक्ती होती काहीतरी करायचं! हा पुर्नजन्म सार्थकी लावायचा. चांगला विचार करणाऱ्याला अवघं विश्‍व सहकार्याचा हात पुढे करतं त्याप्रकाणे या महिलेलाही नियतीने साथ दिली. वयाच्या 82 वर्षांपर्यंत गुडघा पूर्ववत व्हावा म्हणून डॉक्‍टरांनी या महिलेला पोहण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत या महिलेला पोहता येत नव्हते. मात्र, विश्रांतीऐवजी या वयात पोहण्याचा व्यायाम करण्याचे धैर्य या महिलेने दाखविले. त्यासाठी पोहण्याचा सराव केला. कामातून निवृत्ती घेण्याच्या वय उलटून 20 वर्षे झाल्यानंतर या महिलेने शास्त्रीय पद्धतीने पोहणे शिकले. आणि नित्यनेमाने व्यायाम करून पुन्हा एकदा गुडघ्यात प्राण फुंकला. खरी कहाणी इथे संपत नाही तर इथून पुढे सुरू होते.

त्यानंतर तिने जपानमधील विविध पोहण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन जिंकण्याचा सपाटाच लावला. 2004 मध्ये या महिलेला इटलीत झालेल्या 50, 100 आणि 200 मीटर स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याने तसेच 90 व्या वर्षी 900 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविल्यानंतर राष्ट्रीय जलतरणपटूचा दर्जा मिळाला. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर या महिलेने इतर औपचारिक गोष्टींच्या अक्षरश: चिंधड्या केल्या. आज (रविवार. दि. 5 एप्रिल 2015) या महिलेने वयाच्या 100 व्या वर्षी जपानमधील मत्सुयामा येथे झालेल्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत 1500 मीटर अंतर एक तास 15 मिनिटे आणि 54.39 सेकंदात पार करून एक जागतिक विक्रम नोंदविला आहे. ही महिल जगातील सर्वात वयोवृद्ध जलतरणपटू झाली आहे.

यानिमित्ताने तिचे कुटुंब, तिला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम, तिचा उदरनिर्वाह, तिचे प्रकृतीस्वस्थ्य, तिच्या आवडी निवडी, तिचे भावी जीवन आदी क्षुल्लक गोष्टींपेक्षा "मियको नागाओका' या महिलेच्या कर्तृत्वाला सलाम करून प्रेरणा घेणेच अधिक संयुक्तिक ठरेल.

4/08/2015

स्पर्श : आपला धर्म कोणता?

शाळेची घंटा वाजली. पालकांनी त्याला शाळेत आणून सोडले. रोजच्याप्रमाणे तो शाळेत शिकू लागला, खेळू लागला, धमाल करू लागला. बघता बघता शाळेच्या मध्यंतराची वेळ झाली. रोजच्याप्रमाणे सर्वांनी एकत्र डबे खायला सुरुवात केली. त्याच्या बऱ्याचश्‍या बालदोस्तांनी आज डब्यात स्वीट डिश आणली होती. कोणता तरी सण असल्याने ही स्वीट डिश डब्यात अवतरली होती. याच्या डब्यात मात्र कोणताही स्वीट पदार्थ नव्हता. मात्र आईने दररोजप्रमाणे काहीतरी खास पदार्थ देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही रोज खास वाटणारा पदार्थ त्याला आज खास वाटत नव्हता. त्यामुळे तो थोडासा नाराज झाला. तसेच आपल्या डब्यात स्वीट डिश नसल्याचे कारण शोधू लागला. त्याला आईचा थोडासा रागही आला.

दरम्यान त्याने स्वीट डिशचे कारण आपल्या एका क्‍लोज फ्रेंडकडून जाणून घेतले. कोणता तरी सण होता असे त्याला समजले. काहीवेळाने त्याला शोध लागला की तो सण याच्या घरी नसतो. तो का नसतो? असा प्रश्‍न त्याला पडला. पुन्हा क्‍लोज फ्रेंड उपयोगी पडला. त्याला उत्तर मिळाले कि की त्याचा धर्म वेगळा आहे. मग तो कोणता आहे? हा प्रश्‍न त्याला स्वस्थ बसू देईना. अशातच मध्यंतर संपले आणि शाळा सुरू झाली. इवल्याश्‍या जिवाला ‘आपला धर्म कोणता?‘ हा प्रश्‍न स्वस्थ बसू देईना. मात्र, त्याच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तर सापडले नाही. क्‍लोज फ्रेंडही त्याचं फारसं समाधान करू शकला नाही. आता हा प्रश्‍न आपल्या आईला विचारायचा, असा निग्रह करून तो शाळा सुटण्याची तसेच आईला भेटण्याची वाट पाहू लागला. बघता बघता शाळा सुटली. आई आली. आता तो ‘आपला धर्म कोणता?‘ हे विचारण्यासाठी धावत आईकडे जाऊ लागला. ज्याचं उत्तर त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार होतं. आई त्याला कुठलं तरी एक नाव सांगणार होती. अर्थात्‌ आई खरंखुरं उत्तर देणार होती. पण ‘तू माणूस आहेस आणि माणुसकी हा तुझा धर्म आहे‘ असं आईचं उत्तर असेल का?

(Courtesy: esakal.com)

4/02/2015

स्पर्श : तिचा नकार

यावेळीही सारं काही व्यवस्थित जुळून आलं होतं. चांगल्या मॅट्रिमोनी साईटवरून तिच्यासाठी एक चांगलं प्रोफाईल सापडलं होतं. ती मास्टर्स करत होती तर तो चांगल्या नोकरीत सेटल होता. इतर बोलणंही झालं होतं. मुली-मुलींनी प्रोफाईल्सही पाहिली होती. बाकी औपचारिकता पार पाडल्यानंतर कांदा पोह्याचा कार्यक्रमही ठरला. साधारण नियोजित कार्यक्रमासाठी दोन-तीन दिवस आधी तिने त्याला पेâसबुकवर फ्रेंड रिकवेस्ट पाठवली. त्यानं ती स्विकारलीही. दुस-या दिवशी तिनं फेसबुकवर मेजेसही केला. ‘मला, तुम्हाला भेटायचे आहे’ त्याला किंचित आश्चर्य वाटलं. पण तो म्हणाला, ‘होय, तसा कार्यक्रमच ठरला आहे ना आपला’ तिचं उत्तर, ‘नाही, त्याआधी मला तुम्हाला भेटायचं आहे.’ दोघंही शहरात राहत असल्याने ‘ठीक आहे’ म्हणत भेटीची वेळ आणि स्थळही ठरले. दोघंही प्रामाणिक होते. कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. दोघांचा आत्मविश्वास त्यांच्या परिस्थितीपेक्षा अधिक मोठा होता. 

ठरल्याप्रमाणे दोघंही एका कॉफी शॉपमध्ये नियोजित वेळेत पोचले. कॉफीची ऑर्डरही दिली. तो सुरुवात करण्यासाठी म्हणाला, ‘बोला काय बोलायचं आहे?’ त्यावर तिनं अत्यंत आत्मविश्वासानं सांगितलं, ‘खरं तर मी तुम्हाला इथं असं बोलावणं चुकीचं वाटलं असेल. परंतु त्याला पर्याय नव्हता. अद्याप माझं शिक्षण सुरु आहे. मला अद्याप लग्न करायचं नाही. मी जर मुलगा असते तर मला कोणी लग्नाचा आग्रह धरला असता का? पण मी मुलगी आहे म्हणून मला घरचे लोक आग्रह करतात.’ तिनं थेट मूळ प्रश्नालाच हात घातला होता. तर त्याला हे सगळं ऐवूâन आश्चर्यमिश्रित आनंद झाला. दरम्यान दोन मोठ्या कपात अर्धी भरलेली कॉफी समोर आली होती. कोणाच्या तरी सहाय्याने त्याला जीवनाचा कप भरायचा होता. तर स्वत:च्या कर्तृत्वाने तिला व्यवस्थेतील पोकळी भरून काढायची होती. कॉफी पिता पिता त्यांचा संवाद अधिक बहरू लागला.

तो : पण मग तुमची मतं एवढी ठाम आहेत स्थळ तर मग स्थळ शोधण्यासाठी घरातील लोकांचा वेळ, श्रम अन् खर्च का वाया घालवता? 
ती : मी घरच्यांना अनेकदा सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही, पण ते ऐकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला असं परस्पर भेटायला बोलावलं आहे. बहुतेक जणांना मी असं प्रत्यक्ष भेटूनच माझं मत सांगते.
तो : तुमच्या शिक्षणाला किती वर्षे बाकी आहेत?
ती : प्रश्न फक्त शिक्षणाचा नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे.
तो : पण हे सगळं तुम्ही लग्नानंतरही करू शकता ना.
ती : येस्स. मला नेमवंâ हेच बदलायचं आहे. मी सज्ञान आहे. मला माझी स्वतंत्र विचारसरणी आहे. माझा निर्णय मीच घेणार आहे. त्यामुळे लग्न केव्हा करायचं ते फक्त मीच ठरविणार आहे. त्यामुळे सध्या तरी शिक्षण हे निमित्त आहे.
तो : सॉरी, केवळ कुतूहल म्हणून विचारतो, तुमचा पार्टनर तुम्ही शोधून ठेवलात का?
ती : माफ करा. पण आपल्याकडे मुलगी असा काही विचार करू लागली की तिला हाच प्रश्न विचारतात. तुमचं काही चूक नाही. पण पार्टनर अद्याप तरी शोधलेला नाही. मला जीवनाचा अर्थ शोधायचा आहे, माझ्याच पद्धतीने. आणि हो काहीतरी ‘सोशल वर्क‘ करायचं आहे.
तो : ज्याच्याशी आपलं लग्न ठरणार आहे, त्या अनोळखी माणसाला परस्पर भेटायला मोठं धैर्य लागतं. तुमच्या या धैर्याबद्दल तुमचं कौतुक करावसं वाटतं. त्यावरूनच तुम्ही काहीतरी करू शकता, असं दिसून येत आहे. काही मदत लागली तर अवश्य सांगा, चला निघूयात...
आणि दोघंही बाहेर पडले. तिच्या चेह-यावर आणखी एका ‘स्थळा’ला नाकारल्याचं समाधान होतं. तर घरच्यांच्या ‘मुलीचं लग्नच ठरत नाही’ या विचाराला खतपाणी घातल्याचं दु:ख वाटत होतं.
(Courtesy: esakal.com) 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...