1/25/2015

तुमचा आवाज जगाला बदलू शकतो - ओबामा

आजपासून बरोबर 6 वर्षे अन्‌ 6 दिवसांपूर्वी जगाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. विकासाच्या, नेतृत्वाच्या अन्‌ कर्तृत्वाच्या क्षेत्रात जगावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा बाळगून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबामा नावाचा अवघ्या 47 वर्षांचा तरूण विराजमान झाला. केनिया या वडिलांच्या मूळ देशाला त्यादिवशी राष्ट्रीय शासकीय सुटी जाहीर करण्यात आली. मुलाच्या अद्वितीय कर्तृत्वामुळे आनंदीत झालेल्या वडिलांच्या मूळ देशाने राष्ट्रीय सुटी जाहीर करण्याची ही जगाच्या इतिहासातील दुर्मिळ अशी पहिलीच घटना असावी.


सावळा रंग, चेहऱ्यावर तेज, प्रचंड आत्मविश्‍वास असलेला तरुण ज्यावेळी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाला त्यावेळी भीतीलाच भीती बसली. आकाशाला उंची दिसली. कर्तृत्वाला कर्तृत्वाची भेट घडली. आत्मविश्‍वासामध्येच आत्मविश्‍वास जागृत झाला. पाकिस्तानमधील दहतशवाद्यांचा खातमा करण्यासाठी पाकिस्तानच्या कोणत्याही परवानगीची आम्हाला गरज नसल्याची स्पष्ट आणि कठोर भूमिका त्यांनी मांडली. जगाला शांतता अन्‌ सुव्यवस्थेपासून दूर ठेवणाऱ्या तालिबान आणि अल कायदा या अतिरेकी संघटनांना अपकृत्यांपासून रोखायचे असेल तर पाकिस्तानच्या सहकार्याशिवाय ते शक्‍य नाही, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. राजकारण्यांप्रमाणे ते फक्त वक्तव्य करून थांबले नाहीत तर अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या 833 दिवसांनंतर म्हणजेच 2 मे 2011 रोजी ज्याच्यापासून जगाला मोठा धोका आहे अशा ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा पाकिस्तानातील इस्लामाबादमधील अब्बोटाबाद येथे त्याच्या घरात घुसून खात्मा केला. विशेष म्हणजे या घटनेबाबत पाकिस्तानलाही फार उशिरा समजले. अन्‌ जगाला अमेरिकेचा अन्‌ पर्यायाने ओबामांच्या धैर्याचा साक्षात्कार झाला.


त्यांची आई अमेरिकेतील, वडिल केनियाचे, शिक्षण इंडोनेशियातील जकार्तामध्ये. पालक आजी-आजोबा. कोलंबिया विद्यापीठातील राजकारणशास्त्रातील पदवी. हार्वर्डमधून उच्च पदवी. तर 1996 साली राजकारणात येऊन अवघ्या 12 वर्षानंतर जगातील सर्वात मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष. त्यामुळेच अमेरिकेच्या 44 व्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या ओबामा यांचे अध्यक्षपद 2008 नंतर 2012 सालीही कायम राहिले. पहिल्या आफ्रिकन वंशाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ओबामांना जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानामुळे 2009 साली नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.


सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या ओबामांचे वैयिक्तक आयुष्यही तेवढेच अर्थपूर्ण आहे. आपल्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या मिशेल रॉबिन्सन या 1989 साली शिकागोमध्ये ओबामांना प्रथम भेटल्या. पुढे भेटीचे रुपांतर प्रेमात अन्‌ प्रेमबंधाचे 1992 साली विवाहबंधनात रुपांतरन झाले. एकेकाळी वैवाहिक आयुष्यात अगदी निर्वाणीच्या निर्णयापर्यंत पोचलेले ओबामा आणि मिशेल आजही एकत्र असून त्यांना मलिया ही 10 वर्षांची तर नताशा ही 7 वर्षांची कन्यारत्ने आहेत. तरुणपणी मद्य तसेच अंमली पदार्थांचे सेवन केलेल्या ओबामा यांनी वेळीच सावरत दुर्गुणांपासून स्वत:ला अन्‌ पुढे देशाला दूर ठेवण्याचा मनस्वी अन्‌ यशस्वी प्रयत्न केला आहे. एखाद्या श्रीमंत, सौंदर्यवान अन्‌ कर्तृत्ववान मुलीला अनेक स्थळे यावीत, अनेक मैत्रीचे प्रस्ताव यावेत त्याप्रमाणेच अमेरिकेलाही मैत्रीसाठी जगभरातून प्रचंड मागणी असून त्यामागे जागतिक राजकारणाची झालर आहे. ओबामांचे कर्तृत्व आभाळापेक्षा नक्कीच उंच आहे. यापुढे उंचीचे मोजमाप आभाळामध्ये नव्हे तर ओबामांच्या कर्तृत्वाने करण्यात आले तर नवल वाटणार नाही. त्यामुळेच ते म्हणतात, "तुमचा आवाज जगाला बदलू शकतो'.


ओबामांची अमेरिका स्वत:च्या वेगळेपण जपत विविध देशांच्या मैत्रीप्रस्तावांचा विविध दृष्टिकोनातून बारीक-सारीक, सखोल अन्‌ तेवढाच अर्थपूर्ण विचार करत असते. मग ते कोणतेही देश असोत. अशाही परिस्थितीत "आई' म्हणून संबोधण्यात येणाऱ्या भारताशी संबंध प्रस्थापित करण्यात अमेरिकेला प्रचंड उत्सुकता, स्वारस्य अन्‌ आनंद वाटावा यापेक्षा "भारतीय' असल्याचा दुसरा अभिमान असूच शकत नाही.

1/21/2015

जोपर्यंत कठीण आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करू शकता...

जगाच्या कोणत्यातरी एका कोपऱ्यात 73 वर्षांचा एक तरुण आजही जगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे ताऱ्यातील ऊर्जा संपल्यावर तो बिंदूवत होतो. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्‍वाची ऊर्जा संपल्यावर विश्‍वही बिंदूवत होणार आहे, असा अनुमान या तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी जगाच्या समोर मांडला. याच विषयावर या तरुणाने डॉक्‍टरेटही प्राप्त केली आहे. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. आपला 21 वा जन्मदिन साजरा करत असताना या तरुणाला असाध्य अशा अर्धांगवायूचा आजार जडल्याचे समजले. हळूहळू आपल्या संपूर्ण शरीरावर हा अर्धांगवायू कार्यरत होऊन एक वेळ संपूर्ण शरीर प्राण असतानाही निश्‍चल होणार असल्याचे त्याला समजले. सर्वसामान्य माणूस यानंतर कोलमडला असता अन्‌ काही वर्षांनी जगाच्या इतिहासातून निघून गेला असता. मात्र, अशा परिस्थितीतही तो तरुण किंचितही डगमगला नाही, आपल्या ध्येयापासून तीळमात्रही दूर सरकला नाही. तर प्रयत्नांना आपलेसे करत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिला. हळूहळू शरीर निश्‍चल होत असताना नियतीने आणखी एक घाला घातला. 1985 साली या तरुणाला न्युमोनिया झाला. न्युमोनियावर श्‍वासनलिकेतून छिद्र घालून केलेली शस्त्रक्रिया तर यशस्वी झाली; मात्र त्यासाठी त्या तरुणाला मोठी किंमत मोजावी लागली. यानंतर आजतागायत हा तरुण स्वत:च्या तोंडातून, स्वत:च्या वाणीने कधीच बोलू शकला नाही.

तुम्हाला काही करायचे असेल तर अवघं जग तुम्हाला मदत करतं, त्याप्रमाणे ज्या नियतीने त्याच्यावर मोठा घाला घातला होता. त्याच नियतीने त्याची भेट डेव्हिड मेसन या संगणकतज्ज्ञाशी यापूर्वीच घालून दिली होती. त्याच्या सल्ल्यानुसार त्याच्याच मदतीने या तरुणाने स्वत:च्या विचार करण्याचे निरनिराळ्या प्रकारचे "इनपुट' अनेकवर्षे संगणकाला दिले. मेंदूत करत असलेले विचार वाचून त्यांना वाणी प्राप्त करून देण्यासाठी तयार करावयाच्या संगणकीय प्रणालीसाठी त्या तरुणाच्या पाठीच्या कण्यातून अपारदर्शक असा एक द्रवपदार्थ इंजेक्‍शनद्वारे आत सोडण्यात आला. त्या द्रव पदार्थाच्या गतीसह त्याचा मेंदू विविध गोष्टींचा विचार करत असताना मेंदूमध्ये निर्माण होणारे विद्युत कंपने, कंपनांची गती, क्षमता अन्‌ शक्ती तपासण्यात आली. तसेच दरम्यान शरीरातील रक्ताच्या प्रवाहाची दिशा, रक्ताचा दाबही अभ्यासण्यात आला. अशा प्रकारे अनेक वेळा असे प्रयोग करून नेमके डोक्‍यात आलेले विचार, विविध स्वरुपात डिजिटलपद्धतीने संगणकाने आपल्या अंत:करणात साठवून ठेवले. त्यांची वेळोवेळी तपासणी करून त्यामध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात आले. दरम्यानच्या काळात डॉक्‍टरांनी तरुणाच्या निरोपाचा अपेक्षित कालावधीही जाहीर करून टाकला. परंतु, त्या तरुणाला तेव्हाही वाटत होते. मला आणखी काहीतरी करायचे बाकी आहे...

शरीराने विज्ञानाला साथ दिली. संवादातील अडथळा दूर झाला. यंत्राचा मेंदूशी समन्वय घडला. अन्‌ एके दिवशी त्या तरुणाच्या डोक्‍यावर लावलेल्या यंत्रातून मेंदूमध्ये करण्यात येत असलेले विचार संगणकापर्यंत पोचले. मानवी आवाजातून तो तरुण संगणकाच्या स्पीकरमधून जगाशी संवाद साधू शकला. आपले म्हणणे सांगू लागला. त्या परमोच्च क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी शरीर निश्‍चल असतानाही या तरुणाने केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ओठ किंचितसे हलवले. तेवढीच हालचाल त्याला पुढील ऊर्जा देण्यासाठी पुरेशी ठरली. एक वाणी गेली होती. पण दुसऱ्या वाणीतून जग त्या महान संशोधकाला ऐकत होते. आता बोलण्याचा अडथळा दूर झाला होता. पुन्हा नव्या ऊर्जेने काम करण्याची वेळ आली होती. एव्हाना अर्धांगवायूने संपूर्ण शरीरावर नियंत्रण मिळविले होते. चाकांच्या एका खुर्चीतून पुढील आयुष्य कंठावे लागणार होते. एकाच जागी निश्‍चल अवस्थेत असताना "तो' तरुण करीत असलेला विचार संगणकाद्वारे मानवी आवाजातून जगाशी संवाद साधत होता. त्यातून निरनिराळे संशोधने करण्यात हा तरुण यशस्वी ठरला. पुढे त्या तरुणाने सहाय्यकांच्या मदतीने संगणकाच्या वाणीतून "जगाच्या विस्ताराचे गुणधर्म' जगापुढे मांडले. सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या अन्य अनेक सिद्धांताशी जोडणी करून मोठेमोठे निष्कर्ष मांडले. कृष्णविवरावर मोठे संशोधन केले. विश्‍वउत्पत्तीशास्त्राचा त्या तरुणाचा शोध अखंडपणाने सुरुच आहे.

संशोधनाच्या क्षेत्रात जमिनीवरून मोठी झेप घेतलेल्या त्या तरुणाला आता अवकाश झेपेचे वेध लागले. अशक्‍यप्राय ही गोष्ट देखील त्या तरुणाने साकार केली. 727 क्रमांकाच्या एका बोईंगमधून तो अटलांटिक नावाच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणी पोचला. आपण आयुष्यात एकटेच आलो आहोत, अन्‌ एकटेच जायचे आहे. त्यामुळे त्याने त्या गुरुत्वाकर्षणरहित परिसरात आपल्या खुर्चीपासून दूर होत जवळपास 100 मिनिटांपेक्षा अधिक काळ घालवला. त्यावेळी त्या तरुणाने त्या जमिनीचे घेतलेले चुंबन केवळ दोन पदार्थांचा स्पर्श नव्हता तर त्याने स्वत:च्या कर्तृत्वाला, अपार निष्ठेला, अविरत प्रयत्नातून साकारलेल्या यशाला केलेला स्पर्श होता...

एरवी आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणाऱ्या जगातील कोट्यवधी "तरुणां'ना संदेश देत या 73 वर्षाच्या तरुणाने परिस्थितीला फोडून यशाला आपलसं केलं होतं. अन्‌ परिस्थिती, नियती, आजार, अशक्‍यता या साऱ्या गोष्टींचे तुकडे करत त्यांच्यावर उभे राहून कितीतरी उंच पोचला होता. जगाला संदेश देण्यासाठी, लढण्याचा, पळण्याचा, पडण्याचा, पडून पुन्हा उठण्याचा, अन्‌ उंच झेप घेण्याचा... त्या 73 वर्षाच्या तरुणाला साष्टांग दंडवत... सलाम.... त्या तरुणाचे नाव स्टिफन हॉकिन्स! आजही स्टिफन संगणकाच्या स्पीकरमधून जगाला कर्तृत्वाचा संदेश देत म्हणत आहे, "जोपर्यंत कठीण आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यश मिळवू शकता...'

1/16/2015

पेशावर हल्ल्यातील विद्यार्थ्याचे पत्र


पेशावरमधील आर्मी स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज (शुक्रवार) एक महिना पूर्ण झाला. या हल्ल्यात एकूण 132 विद्यार्थ्यांसह एकूण 145 जणांचा बळी गेला. या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या एका निरागस विद्यार्थ्याने त्याच्या आईला लिहिलेले पत्र -

डिअर अम्मी,

पत्र पाहून सरप्राइज वाटलं असेल ना! कारण मी जिथे आलो आहे ना तेथून कोणीच कधीच पत्र लिहित नाहीत. पण मी ट्राय करत आहे. आजपासून बरोबर वन मंथआधी माझी स्कूल सुरू होती. त्या दिवशी माझी एक्‍झाम होती. खूप टेन्शन आलं होतं. स्कूलमधील मॅम क्वशनपेपर देत होत्या. मी क्वशनपेपर वाचत होतो आणि अचानक आमच्या क्‍लासमध्ये मिलिटरी ड्रेसवाले एक गनमॅन घुसले. मला वाटले आम्ही कॉपी करू नये म्हणून ते आम्हाला भीती दाखवायला आले असावेत. पण थोडाच वेळात त्यांनी काहीही न बोलता आमच्या मॅमवर गोळ्या झाडल्या. बंदुकीचा मोठा आवाज झाला. मॅम रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर त्या गनमॅनने आमच्या प्रिन्सिपल काझी मॅमला वर्गात आणलं और अम्मी त्यांनी माचीसने मॅमला डायरेक्‍ट पेटवलं, मी खूप ओरडलो. तर त्यांनी माझ्यावर गोळ्याच झाडल्या. अम्मी, मी तर कॉपी करत नव्हतो, मग माझ्यावर त्यांनी फायरिंग का केले? माझ्या अंगातून खूप रक्त आलं, अन्‌...

त्यानंतर मी एका शांत ठिकाणी पोचलो. जिथं खूप शांतता होती. अगदी शाळेत टिचर आम्हाला "पिन ड्रॉप सायलेन्स' म्हणतात त्यापेक्षा जास्त. माझ्या आधीच तिथं रांगेत खूप जण उभे होते. आणि माझ्या मागे स्कूलमधील फ्रेंडस्‌ हळूहळू रांग लावत होते. मी काऊंट केले तेव्हा ते हंड्रेडपेक्षा जास्त होते. पुढे मी काऊंटिंग केलेच नाही. मला कळतच नव्हते की मी कोठे आलो आहे. पण स्कूलमधील खूप फ्रेंडस्‌ सोबत होते म्हणून मला भीती नाही वाटली. अम्मी, तू कधीच मला या दुनियेबद्दल सांगितलं नव्हतसं. ही दुनिया खूप शांत आणि अजब आहे. त्यानंतर इथून मला आपली स्कूल दिसत होती. सगळी दुनिया दिसत होती. स्कूलमध्ये अजूनही ते मिलिटरी ड्रेसवाले गनमॅन होतेच. ते स्कूलमधील सगळ्यांना गोळ्या मारत होते. अम्मी तू और अब्बा छोट्या बाजीला (बेहन) घेऊन शाळेच्या बाहेर आला होता. तुमच्या डोळ्यात आसू होते. अम्मी मी रडल्यावर तुला किती वाईट वाटायचं, मग तू म्हणायचीस "कधीच रडायचं नाही', पण मग त्यादिवशी तू का रडत होतीस? आणि त्या दिवशी सगळेजण माझ्या नावाऐवजी, रोलनंबरऐवजी मला 'बॉडी, बॉडी' का म्हणत होते? मला त्याच्या आधी कोणी कधीच "बॉडी' म्हणून पुकारले नव्हते. आई, मला वाटलं तुझ्या जवळ यावं, रडावं अन्‌ तुला सबकुछ सांगावं, पण...

त्यादिवशीपासून आम्हाला सगळं जग दिसू लागलं. पण या जगात आम्हाला कोणत्याच "बॉर्डर' दिसत नाहीएत. इथं आमच्या जवळच असलेल्या मॅमलाही माहित नाही की त्या "बॉर्डर' का दिसत नाहीत ते. इथंच असलेल्या प्रिन्सिपलला पण माहित नाही. कारण आमच्या टेक्‍स्टबुकमध्ये त्या दिसत होत्या. इथून आम्हाला फक्त "अर्थ'चा एक राऊंडेड शेप दिसत आहे. "त्या' दिवशीनंतर दोन-तीन दिवस सगळी दुनिया "त्या' गनमॅननी केलेल्या ऍटॅकबद्दल चॅट करत होती. खूप जण गनमॅनला टेररिस्ट, टेररिस्ट म्हणत होते. पण तू तर कधी मला टेररिस्ट स्कूलमध्ये येऊन अशा गोळ्या मारतात हे सांगितलं नव्हतसं, गोळ्या तर "ब्रेव्ह सोल्जर' कंट्रीच्या एनिमीला मारतात ना? मग आम्ही काय कंट्रीचे एनिमी होतो का? आणि माझा देश काय त्या गनमॅनचा होता का? आई खरं सांग मी एनिमी होतो का? स्कूलच्या मॅमनीसुद्धा याबद्दल कधीच काहीच सांगितलं नव्हतं. कोणी म्हटलं की आपल्याला "पेनल्टी' मिळाली. पण मी काय गुन्हा केला होता, अम्मी? त्यानंतर 2-3 दिवस आम्हाला सगळ्या दुनियेतून फुलं वाहण्यात आली. पण का वाहण्यात आली?

अम्मी मला तुझी अब्बाची, बाजीची (बेहन) खूप याद येते. पण तू कधीच या दुनियेत येऊ नको. इथं खूप बोअर होतंय. अम्मी मी मोठा होण्याची वाट पाहत होतो. क्‍योंकी तू जो मिठाईचा बॉक्‍स एकदम वर ठेवला होतास ना तिथे हात पोचण्यासाठी. आता इथं मिठाईचा बॉक्‍स नाही. आपल्या किचनमधला मिठाईचा बॉक्‍स प्लिज जरा खाली ठेवशील? म्हणजे बाजीला (बेहन) आपल्या हातानं मिठाई खायसाठी मोठ्ठं होण्याची वेट नाही करावं लागणार!

अम्मी मी खूपदा तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते जमलेच नाही. आता एक महिन्यानंतर "ट्राय' म्हणून हे पत्र लिहून खाली सोडत आहे. तुझ्यापर्यंत पोचेल ना? अम्मी पत्र पोचले तर माझा मेसेज सर्वांना सांग. सगळ्यांना सांग की, सगळ्या शाळेतील जिओग्राफीची बुक्‍स बदलून टाका, कारण माझ्या बुकमध्ये होत्या तशा "बॉर्डर्स' दुनियेत कोठेच नाहीत. सगळी दुनिया फक्त एक राऊंडेड शेप आहे, असंच शिकवा. त्या "गनमॅन'ना मारू नका, त्यांना विचारा गोळ्या का मारल्या ते! शायद त्यांना वाटत असेल की आपण त्यांचे एनिमी आहोत. त्यांना सांगा कोणीच कोणाचे एनिमी नसतात. कारण जगात बॉर्डरच नाहीत. बॉर्डर नसल्या तर सोल्जरची गरज नाही. सोल्जर नसल्याने गनची पण गरज नाही. टोटल "अर्थ' एक कंट्रीच आहे, इथले इन्सान अलग अलग ठिकाणी राहतात. इथे अलग अलग कलरचे इन्सान राहतात. ते अलग अलग लॅंग्वेज बोलतात... या राऊंडेड अर्थवरील बंदूकच्या सगळ्या फॅक्‍टरी क्‍लोज करून टाकायला पण सांग अम्मी!

अम्मी, गुड बाय! सबको सलाम बोल. माझा मेसेज जरूर दे. आणि हो, रडू नको. तू मेसेज दिला की मला बरे वाटेल...

सिर्फ तुम्हारा (अजब दुनिया से)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...