7/28/2015

'आडनावात काय आहे?'

त्याने पदवी प्राप्त केली होती. कौटुंबिक पार्श्‍वभूमी फारशी चांगली नव्हती. पण धडपडण्याची जिद्द होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी होती. शिक्षणाच्या निमित्ताने तालुक्‍याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणावरून तो एका महानगरात दाखल झाला होता. या शहरातील झगमगाट पाहून त्याला किंचितशी भीतीही वाटत होती. आपला टिकाव लागेल का? आपण स्वत:ला सिद्ध करू शकू का? पण तरीही प्रबळ इच्छाशक्तीमुळे तो प्रयत्न करत राहिला. धडपडत राहिला. त्याला डॉक्‍टरेट करायची होती. मात्र, उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे अपरिहार्य होते. नोकरीसाठी तो अनेक ठिकाणी फिरला. पण बऱ्याच ठिकाणी त्याला स्वत:चे आडनावच अडचणीचे ठरत होते.

शेवटी अनेक ठिकाणी फिरल्यानंतर एका कनिष्ठ महाविद्यालयात त्याला सहायक प्राध्यापकाची छोटीशी नोकरी मिळाली. अर्थात तेथेही जाचक अडचणी होत्या. कागदोपत्री असणारा पगार हातात येत नव्हता. आणि कॉट्रॅक्‍ट असल्याने कामाचा व्यापही मोठा होता. तरीही तो आनंदाने काम करत होता. अशातच वर्ष उलटले. तो हळूहळू शहराच्या वातावरणात रूळू लागला. एकदा त्याने जवळच्या एका सहकाऱ्याला डॉक्‍टरेट करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्याने एक जबरदस्त उपाय सुचविला! तसेच अशा वातावरणात हा उपाय केला नाही तर तुझे सगळे आयुष्य "कॉट्रॅक्‍ट‘वर काम करण्यात वाया जाईल अशा धोक्‍याची इशाऱ्याबाबतही सांगितले.

त्याने महिनाभर खूप विचार केला. मात्र, त्याला दुसरा कोणताही मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे सहकाऱ्याने सांगितलेला उपाय करण्यासाठी तो नाईलाजानेच तयार झाला. मात्र, अल्पावधीतच त्याला त्या उपायाचा अपेक्षित फायदा झाला. ही नोकरी सोडून तो आता दुसऱ्या महाविद्यालयात रूजू झाला. तेथे पगारही पूर्वीपेक्षा बरा मिळू लागला. बघता बघता याने डॉक्‍टरेटला प्रवेशही घेतला. त्याला हवा तो विषय आणि हवा तोच मार्गदर्शक मिळविण्यातही यश मिळाले. दिवस जात होते. याची धडपडही सुरु होती. बघता बघता याची डॉक्‍टरेट पूर्ण होण्याची वेळ आली. पण तरीही आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य? असा प्रश्‍न अस्वस्थ करत होता.
***

आज एका निवांत क्षणी तो मागे वळून पाहत होता. काय जालीम उपाय सुचवला होता मित्रानं. एवढ्या मोठ्या महानगरात किती छान निभाव लागला आपला? छोटी नोकरी. नंतर थोडी मोठी नोकरी. डॉक्‍टरेट. त्यानंतर विभाग प्रमुख. आणि आता प्राचार्य. डॉक्‍टरेटच्या प्रबंधाचे पेटंट. एवढे सारे पदरी होते. दरम्यानच्या काळात प्राध्यापक पत्नीही मिळाली. संसारही थाटला. घरही झालं. किती बदललो आपण गेल्या काही वर्षांत! पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, निभाव लागण्यासाठी मित्रानं सांगितल्याप्रमाणे आडनाव बदलण्याचा जालीम उपाय केला. केवळ आडनावाच बदललं नाही, तर चालण्या-बोलण्याची, राहण्या-खाण्याची रीतही बदलली आपण. जे लोक आपल्यापासून तुटक वागत होते, त्यांचाच तथाकथित सुसंस्कृतपणा, शिष्टाचार किती हुबेहूब अंगिकारला. म्हणूनच का त्यांना माझ्यासारखा परका आपलासा वाटू लागला? जाऊ द्या! पण एवढं करून आपलं ईप्सित साध्य केलंच! उद्या एका आंतराष्ट्रीय व्यासपीठावर अभूतपूर्व सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणार आहे. म्हणून तो कितीतरी वेळ गतकाळातील आठवणीत रमत स्वत:शीच बोलत राहिला...
***

आज देशाच्या राजधानीतील एका मोठ्या समारंभात त्याच्या कामगिरीबद्दल सत्कार समारंभ सुरु होता. तो मोठ्या सन्मानाने व्यासपीठावर विराजमान झाला. उपस्थित दिग्गज त्याच्या कामगिरीचे कौतुक करत होते. परंतु अशा या सोहळ्यातही ज्यानं आडनाव बदलण्याचा जालीम उपाय सुचविला होता त्याची आठवण त्याला झाली. तो जुना सहकारी सध्या कुठं असतो असा प्रश्‍न याच्या मनात अचानकच चमकला. सध्या त्याचा काहीही ठावठिकाणा माहित नव्हता. त्यानेही आडनाव बदलण्याचा उपाय केला असेल का? तो ही यशस्वी झाला असेल का? अशा अनेक प्रश्‍नांचं काहूर त्याच्या मनात माजलं. अशातच पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करण्याचा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. पूर्वीचे आडनाव धारण केले तर माझ्या यशाची उंची हीच राहील? माझं वलय टिकून राहील का? लोकांचा दृष्टीकोन हाच राहील का? माझ्या गुणवत्तेवर कोणी संशय घेईल का? हे यश माझं आहे की माझ्या बदललेल्या आडनावाचं?

समोर स्वत:चाच कौतुक सोहळा सुरु असताना अशा साऱ्या विचारांचा गोंधळ त्याचा मनात सुरू होता. पण काही केल्या पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करावे का? याचा निर्णय होत नव्हता.
***

(Courtesy : www.esakal.com)

7/21/2015

मैत्रिणी चालणार नाहीत!

"लग्नानंतर तुमच्या मैत्रिणी घरी आलेल्या चालणार नाहीत‘ तिनं स्पष्टपणाने आपल्या भावी पतीला बजावलं. तो काहीच बोलला नाही. एका नातेवाईकाकडून हे स्थळ त्याला आलं होतं. दोघांची ही दुसरी भेट होती. अर्थात अद्याप काहीच निश्‍चित झालं नव्हतं. पहिली भेट तिच्या घरी होती. तर दुसरी भेट त्याच्या घरी होती. दुसऱ्या भेटीमध्ये दोघेजण आतल्या खोलीत जाऊन बोलत होते. "तुम्ही फेसबुक वगैरे वापरता. तुम्हाला मैत्रिणी असतीलच. मला तुमच्या मैत्रिणी असलेल्या आवडणार नाहीत. लग्नानंतर कोणतीही मैत्रिण घरी आलेली चालणार नाही‘ असे तिने स्पष्ट सांगितले. एवढ्या अपेक्षेशिवाय तिने काहीही इतर अपेक्षा सांगितल्या नाहीत. परस्परांमध्ये इतर काही विचारपूस वगैरे झाल्यावर दुसरी भेटही संपली.

तो तत्वज्ञानाचा पदवीधर होता. तर ती विज्ञान शाखेची पदवीधर होती. दोघांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सारखीच होती. दोन्ही कुटुंबियांच्या या विवाहासाठी होकार होता. "मैत्रिणी चालणार नाहीत!‘ हा एकच विचार मुलाच्या मनात घुमू लागला. त्यासाठी त्याने अद्याप काहीही निर्णय कळविला नाही. पुढील 2-3 दिवस तो आपल्या जवळच्या मित्रांकडून याबाबत चर्चा करत होता. एक मित्र म्हणाला, "तिचे मित्र घरी आलेले तुला चालतील का? मग तुझ्या मैत्रिणी तरी तिला कशा चालतील? तिला सांगून टाक. लग्नानंतर मैत्रिणी घरी येणार नाहीत‘ पण तरीही ती आतापासूनच स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचं मुलाला वाटत होतं. अशातच दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "हो म्हणायचं, लग्न झालं की सगळं बरोबर होतं‘ तर तिसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "काय कर, तिला प्रेमाने समजून सांग. की माझ्या मैत्रिणी आहेत. पण मैत्री निखळ आहे.‘ तर त्याच्या कुटुंबियांनी मात्र स्पष्ट सांगितलं. "मुलगी जर आताच मुलाला धाक दाखवत असेल, तर पुढे आयुष्य कसे निभावून नेईल?‘

तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्याने अशा साऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर लग्नाच्या विषयापेक्षाही एखाद्या मुलीच्या दृष्टीकोनाबाबत समाजाची भूमिका किंवा विचार करण्याची पद्धत त्याला नव्याने समजली होती. मात्र, त्याचा या स्थळाबाबत काहीही नेमका निर्णय होत नव्हता. कारण "मैत्रिणी चालणार नाहीत‘ हा विचारच त्याच्या मनात घोळत होता.

(Courtesy: esakal.com )

7/12/2015

'आपलं ध्येय काय?'

मोठ्या कष्टानं त्याचा बाप वैभव उभारण्याचा प्रयत्न करत होता. छोटे-मोठे नोकऱ्या, व्यवसाय पडेल ते काम करून बापाने पैसा जमविला. अलिकडेच शहराच्या जवळ जागाही खरेदी केली. आता त्यावर घर बांधण्याचं काम सुरु होतं. पत्नी आणि दोन मुले एवढंच त्यांचं कुटुंब. दोन्ही मुलं कॉलेजात शिकत होती. थोरला कायद्याचा अभ्यास करत होता. तर धाकटा सायन्समध्ये शिकत होता. दोन्ही मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बापाने त्यांच्या वेळा बघूनच घराचं बांधकाम काढलं. दोन्ही मुलांना बांधकामावर देखरेख करण्यास ठेवले. दोन्ही मुलं बापाचा मान ठेवत होते. त्यामुळे दोघेही मनापासून बांधकामाच्या कामात लक्ष देत होते.

एके दिवशी वाळूचा एक ट्रक बांधकामाच्या ठिकाणी आला. आजूबाजूला जागा नव्हती म्हणून वाळू शेजारच्या एका बंगल्याच्या दारात उतरविण्यात आली. आणि बांधकाम सुरु झाले. काही वेळातच ती वेळा बांधकामासाठी उपयोगात येणार होती. आणि ती जागा रिकामी होणार होती. मात्र त्याआधीच शेजारच्या बंगल्याचा मालक बाहेर आला. आरडाओरडा करू लागला. माझ्या दारात वाळू ठेवल्याबद्दल बोलू लागला. ते पाहून दोन्ही मुलांना राग आला. ते तडक त्याच्याजवळ येऊन वाद घालू लागले. प्रकरण वाढू लागले. थोरल्या पोराने शेजाऱ्याला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. दरम्यान वाद सुरु असतानाच कोणीतरी बापाला कळविले. बाप धावत बांधकामाच्या जागी आला. दोघांचा वाद पाहून त्याने दोन्ही पोरांना बाजूला नेले. आणि शेजाऱ्याकडे येऊन हात जोडून अतिशय नम्रपणाने म्हणाला, "जागा नव्हती म्हणून एक-दोन तासासाठीच तुमच्या दारात वाळूचा ट्रक रिकामा करावा लागला. तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अवघ्या अर्ध्या तासात तुमच्या दारातील वाळू रिकामी करतो आणि जागा पूर्ववत स्वच्छ करून देतो. कृपया तुम्ही सहकार्य करा.‘ बापाचा नरमाई पाहून शेजारीही शरमला. आणि "ठिकाय ठिकाय‘ म्हणत निघून गेला.

त्यानंतर बापाने वाळू काढून घेण्याची सूचना दिली. बांधकाम सुरु असलेल्या जागेकडे बोट दाखवून दोन्ही पोरांना बाप म्हणाला, ‘मुलांनो, आपले ध्येय ही इमारत बांधणे आहे. या शेजाऱ्याशी भांडत बसणे हे नव्हे. माणसाला आपलं नेमकं ध्येय समजत नाही. त्यामुळे सगळा गोंधळ उडतो.‘

(Courtest: esakal.com)

7/01/2015

आनंदाश्रू (बोधकथा)


अंजनीपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक हुशार मुलगी राहत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. गाणंही छान म्हणायची. शाळेतील सगळ्या उपक्रमांत ती उत्साहाने सहभाग घ्यायची आणि हो, दररोज आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन शाळेत जायची. शाळेतील सर्व शिक्षकांची ती लाडकी विद्यार्थिनी होती. ती आई-बाबांकडे कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत नसे. तिला सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडत होत्या. ती दररोज पोळी-भाजी, भात-आमटी, कोंशिबीर खात असे. ती आईला घर आवरण्यासाठी मदतही करायची.

शाळेतील विद्यार्थ्यांनाही ती मदत करत होती. गावकऱ्यांचीही ती लाडकी मुलगी होती. तिला गाण्यामध्ये खूप बक्षिसेही मिळाली होती. ती कायम हसतमुख असायची. बाबांकडून ती दररोजच्या वृत्तपत्रातील बातम्या माहिती करून घेत असे. शाळेतील गृहपाठही ती वेळेत पूर्ण करायची. ती लवकर झोपायची आणि लवकर उठायची. एके दिवशी तिने "आनंदाश्रू‘ हा शब्द ऐकला आणि आईला त्याचा अर्थ विचारला. त्यावर आई म्हणाली, "आनंदात असल्यावर डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ त्यावर तिचे समाधान झाले नाही. "आई, डोळ्यातून पाणी येणे म्हणजे रडणे. आनंदात असल्यावर रडू कशाला येईल.‘ त्यावर "तुला अनुभव आल्यावर समजेल‘ असे म्हणत आईने तिला समजावले.

अंजनीपूरमध्ये केवळ चौथ्या इयत्तेपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या अर्धापूर गावाला जावे लागत. शाळेत जाण्यासाठी मुलींना बसचा मोफत पास मिळायचा. तसाच पास तिलाही मिळाला होता. दररोज गावातील सर्व मुली एकत्र बसमधून शाळेत जात. त्यांच्यासोबतच ती देखिल जात होती. एकदा तिला मामाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जायचे होते. मामाचे गाव अर्धापूरजवळच होते. अर्धापूरला मामा तिला घेण्यासाठी येणार होता. त्यादिवशी शाळा होती. तिने मैत्रिणीजवळ शिक्षकांसाठी शाळेत येणार नसल्याबाबतची चिठ्ठी दिली. ती शाळेच्या वेळेत असलेल्या बसनेच अर्धापूरला जाणार होती. आईने तिच्याकडे काही पैसेही दिले. तिला शाळा बुडवून मामाकडे जाणे बरे वाटले नाही; पण आई-बाबांनी सांगितल्यामुळे ती निघाली होती. बसमध्ये बसल्यावर पास दाखविण्याऐवजी कंडक्‍टर काकांना तिने तिकिटासाठी पैसे दिले. तिच्याकडे पास असल्याचे माहीत असल्याने कंडक्‍टरकाका म्हणाले, "तुझ्याकडे पास आहे ना. मग तिकीट का काढतेस?‘ त्यावर ती म्हणाली, "काका माझा पास केवळ शाळेत जाण्यासाठी आहे; मामाकडे जाण्यासाठी नाही. आज मी शाळेत जाणार नाही. त्यामुळे मी तिकिटासाठी पैसे आणले आहेत. हे पैसे घ्या आणि मला तिकीट द्या.‘‘ त्यावर कंडक्‍टर काकांनी "शाब्बास, शाब्बास!‘ म्हणत तिला तिकीट दिले. बसमधील मैत्रिणी हे सारे पाहत होत्या. त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांना ही गोष्ट सांगितली. शिक्षकांनाही तिचे कौतुक वाटले.

दुसरा दिवस उजाडला. मामानेही तिला शाळेत आणून सोडले. प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकांनी तिची बसमधील गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि बोधकथेचे एक पुस्तक देऊन तिचा सत्कार केला. मुख्याध्यापक म्हणाले, ‘ही एक आदर्श मुलगी आहे. तिने बसचा पास फक्त शाळेसाठीच वापरला. मामाच्या गावी जाण्यासाठी वापरला नाही. मुलांनो, तुम्ही तिचा आदर्श घ्यायला हवा. तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. उद्या तुम्ही मोठे व्हाल. अधिकारी व्हाल. कार्यालयाच्या कामासाठी तुम्हाला अनेक सोयीसुविधा मिळतील. त्या वेळी तुम्हीदेखील तिच्याप्रमाणेच आपल्या अधिकारातील गोष्टींचा खासगी कामासाठी वापर करू नका. आपल्या अधिकारातील कोणत्याही सार्वजनिक सुविधेचा स्वत:च्या खासगी कामासाठी वापर करणे स्वत:साठी आणि देशासाठीही अयोग्य आहे.‘

अंजनीपूरमधील गावकऱ्यांनाही आर्याची गोष्ट समजली. त्यांनीही ती गावात आल्यावर तिचे आणि आई बाबांचे कौतुक करून तिचा सत्कार केला. सत्कार कार्यक्रम झाल्यावर तिच्या डोळ्यांतून पाणी आले. त्या वेळी तिची आई तिला म्हणाली, "तुझ्या डोळ्यांतून जे पाणी येत आहे ना त्याला "आनंदाश्रू‘ म्हणतात.‘ हे ऐकल्यावर आनंदात ती आईच्या कुशीत शिरली.

व्यंकटेश कल्याणकर
(सौजन्य :  esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...