8/19/2015

सर्वव्यापी 'क्‍यूआर कोड' (वेबटेक)

लेखकाच्या मोबाइल क्रमांकासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.



माणसाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची अफाट शक्ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज अनुभवास येत असते. कमीत कमी श्रमात अपेक्षित उद्दिष्ट गाठून अत्यल्प वेळात कार्य सिद्धीस नेणे, हा तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व क्रांतीचा प्रमुख हेतू आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या माध्यमातून मोबाईलक्रांती, थ्री- डी प्रिंटिंग आदी आविष्कार आपण अनुभवत आहोतच. ‘क्‍यूआर कोड‘ हा त्यापैकीच एक. 

वाहन उत्पादन क्षेत्रात वाहनाचे उत्पादन होत असताना, वाहनाच्या विविध भागांची स्थिती जाणून घेण्यासाठी केवळ यंत्रालाच वाचता येतील, अशा बारकोडचा उपयोग करण्यात येत होता. त्यातून पुढे केवळ द्विमितीय पद्धतीसाठी ‘क्‍यूआर कोड‘चा जन्म झाला. जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता या वैशिष्ट्यांमुळे विविध क्षेत्रांमध्ये या तंत्राचा वापर होत आहे. स्मार्ट फोनचा उपयोग वाढत असताना या तंत्राला नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे. 

काय आहे ‘क्‍यूआर कोड‘? 
‘क्‍यूआर कोड‘ म्हणजे Quick Response Code अर्थात जलद प्रतिसाद संकेतावली. केवळ यंत्रालाच वाचता येईल अशा भाषेतील उभ्या आणि आडव्या चौकोनांच्या संचाला ‘क्‍यूआर कोड‘ म्हणतात. ‘डेन्सो‘ या जपानमधील वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपनीच्या ‘डेन्सो वेव्ह‘ विभागाने 1994 मध्ये जपान रोबो असोसिएशनच्या सहकार्याने ‘क्‍यूआर कोड‘चे तंत्र विकसित केले. वाहन उत्पादन क्षेत्रातील या तंत्राच्या यशस्वी वापरानंतर इतर क्षेत्रांतही त्याचा वापर सुरू झाला. मानवाला न समजणारी भाषा समाविष्ट असलेला, डिजिटल पडद्यावर प्रतिमेच्या किंवा कागदावरील प्रतिमेच्या स्वरूपात हा कोड तयार करता येतो. 

‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग 
स्मार्टफोनद्वारे एखाद्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी प्रथम ब्राऊजर उघडून यूआरएल टाइप करावी लागते. यावर मात करण्यासाठी एखाद्या संकेतस्थळाचा ‘क्‍यूआर कोड‘ स्मार्टफोनद्वारे स्कॅन केला की थेट त्या संकेतस्थळाला भेट देता येते. हा अगदी प्राथमिक उपयोग आहे. मोबाईलमध्ये नवा कॉन्टॅक्‍ट सेव्ह करण्यासाठी, एखादा संदेश पाठविण्यासाठी, उत्पादनादरम्यान उत्पादनाची स्थिती जाणून घेण्यासाठी, मार्केटिंगसारख्या अनेक क्षेत्रांतही या तंत्राचा वापर वाढत आहे. मॉलसारख्या मोठ्या ठिकाणी ग्राहकांची बिले तयार करण्यासाठीही या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ग्राहकांना आकर्षित करून विविध ऑफर देण्यासाठी हा कोड वापरण्याची पद्धत हळूहळू लोकप्रिय होत आहे. 

‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन कसा करायचा? 
‘क्‍यूआर कोड‘ वाचण्यासाठी तो आधी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अनेक विनामूल्य मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. ते स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे आवश्‍यक असते. एकदा ऍप इन्स्टॉल केले की त्याद्वारे कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ समोर मोबाईल धरून कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करावा लागतो. साधारण अर्धा- एक सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण होते. स्मार्टफोन स्कॅन केलेला ‘क्‍यूआर कोड‘ वाचतो आणि त्यातील आज्ञावलीप्रमाणे कार्य करतो. कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी हीच पद्धती अवलंबिली जाते. अल्पावधीतच स्मार्टफोन्समध्येच ‘क्‍यूआर कोड रीडर‘ची ‘इन बिल्ट‘ सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावरील ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी इतर डिव्हाईसही उपलब्ध आहेत. 

‘क्‍यूआर कोड‘चे भविष्य 
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सध्या कार्डबाबतची माहिती, तसेच पासवर्डही देणे आवश्‍यक आहे. मात्र, नजीकच्या काळात ही सर्व माहिती असलेला ‘क्‍यूआर कोड‘ तयार करून, केवळ त्याच ‘क्‍यूआर कोड‘द्वारे कोड पेमेंटची सुविधा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यामध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डऐवजी बॅंकेने दिलेला ‘क्‍यूआर कोड‘ खिशात दिसण्याची शक्‍यता आहे. ‘क्‍यूआर कोड‘च्या गुणवैशिष्ट्यांमुळे नजीकच्या काळात बहुतेक सर्वच क्षेत्रांत ‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग वाढणार आहे.
(Courtesy: www.eSakal.com) 

8/07/2015

चल ब्रेकअप करू?

"एवढा वेळ का लावलास?‘ बागेतल्या बाकावर बसूनच त्यानं तिला आल्या आल्या पहिलाच प्रश्‍न विचारला.
"मला तुला काही तरी सांगायचयं..‘ तिने वेगळ्याच विषयाला हात घातला.
"म्हणून उशिरा आलीस का?‘ त्याचा त्रागा थांबला नाही.
"तू माझं ऐकणार आहेस का?‘ तिने आपले म्हणणे पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला.
"मी इथे कॉलेज सोडून तुझी वाट पाहतोय. या आधी पण दोनवेळा तू उशिरा आलीस!‘ त्यानं आपलाच प्रश्‍न लावून धरला.
"मी पण कॉलेज सोडून आलेय आता इथे! पण...‘ ती काही बोलणार तेवढ्यात त्यानं तिला थांबवलं.
"आधी मला सांग तुला उशिर का झाला? नंतरच आपण पुढचं बोलू‘ तो ठाम राहिला.
"चल, तुला माझं काही ऐकून घ्यायचं नाहीए! बाय‘ बघता बघता ती निघूनही गेली.
तो प्रचंड अस्वस्थ झाला. तसाच तो रूमकडे निघाला.

***


याची अस्वस्थता पाहून रूममेटने विचारपूस केली.
"साला, त्याच्यामुळे तू एवढा परेशान झालास का?‘ रूममेट त्याला रिलॅक्‍स करत पुढे म्हणाला, "चलता, है भाई! समुद्राचा तळ आणि मुलीच्या मनाचा तळ आयशप्पथ कोणालाच समजत नाय! तू किस झाड की पत्ती?‘ याची उत्सुकता ताणली. त्याने मग सगळ्या घटना सांगायला सुरुवात केली. "तिच्याशी कॉलेजात फ्रेशर्स पार्टीत झालेली ओळख. ती सेकंडला आणि मी थर्डला. दोघांच्या ब्रॅंचेसपण वेगळ्या. फ्रेशर्स..‘ त्याला थांबवत रूममेट म्हणाला, "बस्स.... मग ती तुला, तू तिला असं करत करत... फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, इमोशन, सेंटीपणा, घरचे वगैरे, मग शेअरिंग, मग लव्ह.. तू तिचा बच्चू, जानू आणि काय काय झालास‘
तो आता चांगलाच खुलला होता. "आयला तुला कसं माहित रे!‘ त्याचं कुतूहल जागृत झालं. "ये सब दुनियादारी है! काय वेगळं नसतं. हे असचं असतं बघ. प्रेम, प्यार, इश्‍क, लव्ह वगैरे वगैरे!‘ तो थांबला.
"बरं मग आता आमच्यात जे होत आहे, त्याचं काय?‘ तो पुन्हा मुद्यावर आला. रूममेटचं लेक्‍चर सुरु झालं, "हे बघ, ती फर्स्टला तू सेकंडला असताना तुमची ओळख. म्हणजे दोन वर्षांची ओळख. पण अलिकडे अलिकडे ती तुला टाळते. भेट कमी करते. वेळेत येत नाही. कॉलेजातही फार बोलत नाही. आणि तिचं सेकंड इअर.. तुझं शेवटचं. तुला पुढे शिकायचं अन्‌ तिचे घरचे तिच्या लग्नाच्या मागे.. कदाचित...‘ याच्या अंगावर हळूहळू रोमांच उभे राहत होते. जणू काही रूममेट भविष्यवेत्ताच होता. "कदाचित... कदाचित, काय?‘ त्याने प्राण कानात आणून प्रश्‍न विचारला. रूममेट पुन्हा खुलला, "हे बघ शांत रहा. कदाचित तिला एखादा दुसरा मुलगा...‘ याचा पार अपेक्षाभंग झाला. "ये ये काय बोलतोस तू?‘ तो रूममेटवर भडकला. "चल जाऊ दे...‘ तुला नाय पटायच्या गोष्टी. पण त्याची उत्सुकता आणखी चाळवली, "बरं बरं सांग‘ रूममेट पुन्हा सुरु झाला, "हे बघ, हे कॉलेज असंच असतं. तिथून फार लग्न ठरत नाहीत. ते काय मॅरेज ब्युरो आहे का? आणि कॉलेज संपलं की भेट कमी कमी होत जाते. पुढे पुढे मग... असो. त्यामुळेच कॉलेजात "लव्ह, ब्रेकअप, लव्ह‘ असं चालूच असतं दोस्ता. आणि तिची आताची चिन्हे "ब्रेकअप‘च्या दिशेने आहेत?‘
याला धक्काच बसला... पुढे बराच काळ शांतता पसरली. शेवटी रूममेट समारोपाचं म्हणाला, "इसिको तो लाईफ कहते है, दोस्त!‘ 

***

कॉलेजच्या कॅंटिनमध्ये ती तिच्या "बेस्ट फ्रेंड‘सोबत बसली होती. "बघ ना गं. त्यानं काल माझं ऐकूनच घेतलं नाही. माझ्या घरी माझ्या लग्नाचं बघत आहेत. आणि हा मला पुन्हा पुन्हा भेटायला बोलवतो. त्याला कसं सांगू?‘ बेस्ट फ्रेंड म्हणाली, "अगं, हे असंच असतं. कॉलेज संपत चाललं की पोरांना जास्तीत जास्त भेटावसं वाटतं. पुन्हा थोडीच वेळ मिळेल त्याला....‘ "म्हणजे?‘ तिने तिला थांबवत म्हटलं, "अगं कॉलेजातलं प्रेम असंच असतं. माझं, आपल्या वर्गातल्या कितीतरी मुलामुलींचं बघ. ब्रेकअप, लव्ह सुरु असतचं! परवा तर मी एका "ब्रेकअप‘ पार्टीला गेले होते‘ तिला हे सगळं ऐकनंही असह्य होऊ लागलं. पण एका अर्थानं खरं वाटू लागलं.

***

रात्रीचे दहा वाजले होते. तो त्याच्या रूममध्ये. तर ती तिच्या घरी. दरम्यान त्यांचा संवादही कमी झाला होता. त्यानं तिला सहजच मेसेज केला. "मिस यू डिअर, युअर बच्चू!‘ तिने बराच वेळ विचार केला आणि रिप्लाय दिला, "मिस यू बट वॉन्ट टू टेल समथिंग...‘ त्याचा रिप्लाय, "हो मलाही काही सांगायचं?‘ तिचा रिप्लाय, "चल, तू सांग‘ आधी कोणी सांगायचं यावरून एकमत होईना. त्यामुळे तिने तोडगा काढला. एक वेळ ठरवली आणि त्या वेळेला दोघांनीही एकदाच मेसेज पाठवायचा. त्यालाही कल्पना आवडली. पण दोघांच्याही मनात संदिग्धता होतीच. शेवटी ठरलेली वेळ आली आणि दोघांनीही मेसेज डिलिव्हर केला, "मी तुला फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवरून कधीच बॅन करणार नाही. पण, आता आपण येथेच थांबूयात. ब्रेकअप करूयात....‘

8/05/2015

सिग्नल पाळणारी माणसे!

"बाबा, प्रवासासाठी शुभेच्छा, या मी तुमची वाट पाहतोय!‘ पोराने फोन ठेवला. वडिलांनी पोराला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पोरगाही मोठा शिकून परदेशात नोकरी करत होता. आणि आज तर त्याने चक्क वडिलांनाही काही दिवसांसाठी आपल्याकडे बोलाविले होते. तरीही आपला एवढा चांगला देश सोडून तू एवढ्या दूर जातोस याबद्दल वडिलांची काही अंशी नाराजी होतीच.

सारी औपचारिकता पूर्ण झाली. बाबांसोबत आईसुद्धा परदेशी जायला निघाली होती. संध्याकाळची फ्लाइट होती. आठवड्याचा पहिलाच दिवस होता. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी एक मित्र त्याची चारचाकी घेऊन आला होता. नियोजित वेळेपेक्षा तीन तास आधीच निघण्याचे ठरले. मात्र, मित्राला नंतर काही काम असेल म्हणून काहीही तक्रार न करता आई-बाबा निघाले. जाताना अनेक ठिकाणी सिग्नल लागले. गाड्याचे हॉर्न वगैरे कानावर पडत होते. दुचाकीवरून प्रवास करणारे शक्‍य तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. "पुढे जाणे‘ हे सगळ्यांचे ध्येय होते. पण त्यासाठी सिग्नल मोडण्याचाही पराक्रम अनेक जण करत होते. अर्थात त्यात त्यांना अभिमानच वाटत होता. अशाच सिग्नल असताना इकडून-तिकडून काही येत नसल्याने अनेक जण आमच्या मागून पुढे गेले. अशाच एका ठिकाणी तर यांची गाडी एका मोठ्या अपघातातून बचावली. पण त्यामुळे सगळेचजण घाबरून गेले. अशातच कसेबसे विमानतळही आले. वेळेअगोदरच पोचेल असे वाटत असतानाच अगदी योग्य वेळेत विमानतळावर गाडी पोचली. आई-बाबा विमानापर्यंत पोचलेही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे ते अपेक्षित स्थळीही पोचले. स्वत:चा देश त्यांनी प्रथमच सोडल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटत होते. सगळेजण नियमांचे पालन करत होते, सिग्नल पाळत होते, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. घरी आल्यावर मुलाकडून कुतूहलाने अनेक गोष्टी जाणून घेता-घेता रात्र झाली.

एवढ्या दूर आपला मुलगा कर्तृत्त्व करून आल्याचे त्यांना पुन्हा एकदा कौतुक वाटू लागले. "लहानपणी त्याचा हात माझ्या हातात होता. आज माझ्या हातात त्याचा हात होता. माझा हात हातात घेऊन त्याने मला घरात आणले‘, मुलाच्या कर्तृत्वामुळे बाबांचे डोळे पाणावले. आई-बाबांच्या अशाच गप्पा बराच वेळ सुरु होत्या. मुद्दामच मुलानेही त्यांना काही अडथळा आणला नाही. घराच्या गॅलरीमध्ये दोघे जण बराच वेळ गप्पा मारत होते. बघता बघता रात्रीचे दोन वाजले. समोर चकाचक रस्ते दिसत होते. कोठेही अस्वच्छता नाही. कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही. सगळीकडे निरव शांतता. रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती. सगळा देश शांत झोपल्यासारखा भासत होता. पण अद्यापही सिग्नल सुरूच. लाल, हिरवा रंग चालू-बंद होत होता. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, "अहो, एवढ्या रात्री कोण पाळणार सिग्नल‘ तेवढ्यात भरधाव वेगात येत असलेली एक मोटार सिग्नलवरील लाल रंग पाहून थांबली आणि हिरव्या रंगाची प्रतिक्षा करू लागला.

आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना अपार कौतुक वाटले. विमान प्रवासापूर्वी दिवसाढवळ्या वाहतूकीला अडथळा निर्माण करत सिग्नल तोडून धावणाऱ्या माणसांची उभयतांना आठवण झाली. मात्र त्या देशापासून ते कितीतरी दूर होते. ते अशा देशात होते की जेथे मध्यरात्री रस्ता रिकामा असताना हिरव्या सिग्नलची वाट पाहणारी माणसे दिसत होती.

8/04/2015

'थ्रीडी प्रिंटिंग'चे अनोखे तंत्रज्ञान

माणूस सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत असतो. हा ध्यास जगणे समृद्ध करण्याकडे असतो. कमी श्रम, कमी वेळ आणि जास्त फायदा हे गणित अलीकडे रूढ होत चालले आहे. त्यातूनच नव्या युगातील शॉपिंगची परिभाषा बदलली आहे. संकेतस्थळावरून ऑनलाइन शॉपिंगच्या सुविधेनंतर बेडरूममधून "स्मार्ट फोन‘द्वारे आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या खरेदीचा आनंद लुटता येत आहे. यापुढे कदाचित किरकोळ वस्तू खरेदी करण्याचीही गरज भासणार नाही. कारण "थ्रीडी प्रिंटर‘ नावाचं तंत्रज्ञान विकसित होत आहे. या प्रिंटरमुळे हळूहळू नव्या क्रांतीचा उगम होत असून, त्यामुळे उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे आहेत.

‘थ्रीडी प्रिंटर‘चा इतिहास
चार्ल्सस हल यांनी 1984 मध्ये "थ्रीडी प्रिंटर‘चा शोध लावला. सर्वप्रथम स्टेरिओलिथोग्राफी अर्थात एखाद्या वस्तूला त्रिमितीय स्वरूपात तयार करण्याच्या पद्धतीद्वारे "थ्रीडी प्रिंटर‘ तयार करण्यात आले. त्याद्वारे अत्यंत पातळ स्तर वापरून प्रिंटिंग करण्यात येत होते. आता त्या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. चहा पिता पिता चुकून चहाचा कप फुटला, तर तो कप "थ्रीडी‘ प्रिंटरच्या साह्याने तयार करता येतो. याशिवाय घरातील छोट्या- मोठ्या वस्तूही तयार करता येतात. अर्थात अशा प्रिंटरच्या मर्यादा आणि त्यांची व्यवहार्यता याबाबत संशोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. मात्र अशक्‍यप्राय वाटणाऱ्या क्रांतीला प्रत्यक्षात साकारणाऱ्या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात "थ्रीडी प्रिंटिंग‘ क्षेत्रातील क्रांती अशक्‍यप्राय नक्कीच नाही.

प्रिंटिंग कसे होते?
प्रिंटरद्वारे डिजिटल फाइलच्या माध्यमातून त्रिमितीय वस्तू तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे "थ्रीडी प्रिंटिंग‘. वस्तू तयार करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅस्टिक, पोलॅमाईड (नायलॉन), काचमिश्रित नायलॉन, चांदी, स्टील, मेण, फोटो पॉलिमर, पोलॅकार्बोनेट आदी घटकांचा उपयोग करण्यात येतो.

‘थ्रीडी प्रिंटर‘चे उपयोग
"थ्रीडी प्रिंटर‘चा विविध क्षेत्रांत प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. दक्षिण कोरियातील डॉ. शेन तोंग्या यांनी सहा तासांमध्ये मानवी शरीराच्या ओटीपोटाचा (पेलव्हिस) सांगाडा तयार करण्यात यश मिळविले. तसेच हाडाच्या कर्करोगाने त्रस्त झालेल्या एका किशोरवयीन मुलीच्या शरीरात या सांगाड्याचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपणही केले. आफ्रिकेमधील समुद्रात बेकायदा मच्छिमारी करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी "थ्रीडी प्रिंटर‘च्या साह्याने सौरऊर्जेवर हवेत चालणारे स्वयंचलित विमान तयार करण्यात आले आहे. तर चीनमधील एक "थ्रीडी प्रिंटर‘ उत्पादक कंपनी दुबईमध्ये पूर्णपणे "थ्रीडी प्रिंटर‘द्वारे तयार केलेली इमारत उभी करत आहे. याशिवाय वाहनातील विविध सुटे भाग, कृत्रिम मानवी पेशी, पुरातत्वशास्त्रातील वस्तू, मानवी हाडांची पुनर्निर्मिती यासह अनेक क्षेत्रांत "थ्रीडी प्रिंटर‘ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘थ्रीडी प्रिंटर‘चे व्यावसायिक गणित
जगभरात 2013 मध्ये "थ्रीडी प्रिंटिंग‘ क्षेत्रात 307 कोटी डॉलरचा महसूल मिळाला, तसेच 2018 पर्यंत 1200 कोटींपेक्षा अधिक, तर 2021 पर्यंत 2100 कोटी डॉलरहून अधिक महसूल मिळेल असा अंदाज आहे. वैयक्तिक उपयोगासाठी सध्यातरी "थ्रीडी प्रिंटिंग‘ फारसे व्यवहार्य वाटत नाही. मात्र वैयक्तिक उपयोगासाठी "थ्रीडी प्रिंटिंग‘ सेवा देणाऱ्या व्यवसायाचा उदय होऊन त्यामधूनही मोठ्या व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. नजीकच्या भविष्यात केवळ वस्तू विकण्यापेक्षा वस्तू तयार करण्याकडे जगभरातील व्यापाऱ्यांचा कल वाढण्याची शक्‍यता आहे.

(Courtesy: Daily Sakal, (dated 03 August 2015))
Related Posts Plugin for WordPress, Blogger...