9/30/2015

खूप मुली पाहिल्या पण...!

तो आयुष्यात चांगला सेट झाला होता. त्याच्या आई-बाबांचे घर होते. त्याला चांगली नोकरीही होती. आता तो वधूसंशोधन करत होता. जवळपास वर्षभराहून अधिक काळ निघून गेला होता. आई-बाबा, नातेवाईक, वधू-वर संस्था अनेक चांगल्या मुली आणत होते. मुली पाहण्याचा आकडा दोन डझनाहून वर गेला होता. पण त्याला काही मुलगी पसंत पडत नव्हती. त्यामुळे वय वाढत चालले होते. त्याची आई-बाबांना चिंता लागली होती. शिवाय सुयोग्य मुली शोधणे, त्यांच्या पालकांशी बोलणे, नंतर कांदापोह्याचा कार्यक्रम ठरवणे आदींमुळे आई-बाबा त्रस्त होते. आता त्यांना हा सारा प्रकार नकोनकोसा झाला होता. मात्र, तो काहीच तडजोड करायला तयार नव्हता. आतापर्यंत बघितलेल्या अनेक मुली त्याला अगदी अनुरूपच होत्या. काही काही तर त्याच्यापेक्षा अधिक सरस होत्या. पण याला काही मुलगी पसंत पडत नव्हती.

एकेदिवशी वधूवर संस्थेच्या एका कार्यशाळेला जाण्याविषयी आई-बाबांनी त्याला सांगितले. त्याला काही ते आवडले नाही. मात्र, आई-बाबांनी त्याच्या मित्राकडून त्याचे प्रबोधन केले. अखेर इच्छा नसतानाही तो कार्यशाळेला जाण्यास तयार झाला. ठरल्याप्रमाणे तो पोचला. ती केवळ अविवाहीत मुला-मुलींसाठी कार्यशाळा होती. मुलींची उपस्थितीही बऱ्यापैकी होती. कार्यशाळेत प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍नही विचारात घेतले जात होते. सुरुवातीला विवाहपूर्व समुपदेशनाचे व्याख्याने झाली. त्यानंतर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍न विचारात घेतले जाऊ लागले. एका मुलीने सांगितले, "मला आई-बाबा नसलेला मुलगा हवा आहे, स्वतंत्र राहणारा‘ समुपदेशकाने तिला समजावत सांगितले, "आई-बाबा नसणे ही पूर्वी उणीव समजली जायची. आता ती फॅशन होत चालली आहे. मात्र, त्यामागे आपला वैयक्तिक स्वार्थ पाहणेही हिताचे आहे. उद्या तुझे लग्न होईल. भलेही ते स्वतंत्र राहणाऱ्या मुलाशी. तुम्ही दोघेही नोकरी करणारे. पुढे तुम्हाला मूल होईल. मग मूल मोठे होईपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार? पैसे देऊन माणसे मिळतील, पण प्रेम देऊन सांभाळणारी माणसे पैसे देऊन मिळतील का? शिवाय तुमच्या बाळाला आजी-आजोबा कल्पना कशी समजेल? हे सारं बाजूला राहू दे. त्याच मुलाने मोठे झाल्यावर लग्नापूर्वी तुमच्यापासून वेगळं राहिलं तर तुम्हाला चालेल का?‘ आता मात्र कार्यशाळेला एक वेगळेच वळण मिळाले. त्या मुलीचंही समाधान झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्याचेही लक्षही आता कार्यशाळेकडे वळले.



प्रत्येकजण प्रश्‍न विचारत होता. त्यातून अनेक नवनवे प्रश्‍न समोर येत होते. कुणाला दाढी असलेला मुलगा हवा होता. तर कोणाला स्वयंपाक येणारा भावी पती हवा होता. कोणाला आपल्या पाळीव प्राण्याला स्वीकारणारा मुलगा हवा होता. तर कोणाला 24 तास घरात राहणारी मुलगी हवी होती. समुदेशक त्यांच्या पद्धतीने प्रश्‍नांची उकल करत होते. आता याचा क्रमांक आला, याची सारी पार्श्‍वभूमी आधीच नोंदवली होती. त्यामुळे त्याने थेट प्रश्‍नच केला, "मी खूप मुली पाहिल्या पण त्या प्रश्‍नाचे अपेक्षित उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत‘ समुपदेशकाने प्रश्‍न कोणता ते विचारले. त्यावर तो म्हणाला, "मी मुलीला विचारतो की तुम्ही शनिवार-रविवार किंवा सुटीच्या दिवशी काय करता? या माझ्या प्रश्‍नावर मला अपेक्षित उत्तर देणारी एकही मुलगी मला सापडली नाही‘ त्यावर समुदेशकाने त्याचे अपेक्षित उत्तर विचारले. तो म्हणाला, "जी मुलगी शनिवार-रविवार आपले कपाट आवरते, घर आवरते ती मुलगी मला हवी आहे. पण शनिवार-रविवार सगळ्याच मुली बहुतेक करून फिरायला जातात, मुव्हीला जातात किंवा दिवसभर आराम करतात‘ त्यावर समुपदेशक म्हणाले, "तू एवढ्या मुली पाहिल्या आहेत. तर त्यातील कदाचित प्रत्येकच मुलगी घरातील कपाट किंवा घर आवरत असेल. पण ती गोष्ट त्यांना इतकी क्षुल्लक वाटत असेल की ती तुला कांद्या-पोह्याची कार्यक्रमात सांगावी असे त्यांना वाटत नसेल. तसेच बऱ्याच मुलींनी कदाचित संगितले असेलही, पण तुला हव्या त्या शब्दांत सांगितले नसेल. ही अतिशय किरकोळ गोष्ट आहे. या प्रश्‍नाऐवजी तू थेट घरातील कपाट किंवा घर कधी आवरते किंवा आवरते का? असा साधा प्रश्‍न विचारल्यास अधिक अचूक उत्तर मिळाले असते. असो, पण तू हा भ्रम काढून टाक की मुली कपाट आवरत नाहीत. आणि पहा बदल कसा घडेल...‘ समुपदेशकाने अगदी नेमके कारण शोधून दिले होते. त्याच्या मनातही हाच प्रश्‍न आला. आपण इतके दिवस आपले अपेक्षित उत्तर घेऊनच विचार करत होतो. तिच्या भूमिकेतून आपण कधीच विचार केला नाही.

"आपण बहुतेकदा काहीतरी गृहितकं धरूनच कल्पनाविश्‍वात रमतो, त्याला समर्पक उत्तराचीच अपेक्षा करतो. मात्र, वास्तवाची किनार जोडायला हवी. स्वत:च्या पलिकडे जाऊन इतरांच्या भूमिकेतून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. त्याचवेळी सगळ्या प्रश्‍नांची उकल होऊ शकते‘ समुपदेशकांनी सर्व उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.

(Courtesy: eSakal.com) 

9/22/2015

बालकांच्या प्रतिभेचा आविष्कार

पुराणामध्ये, दंतकथांमध्ये किंवा काल्पनिक कथांमधून आपण बालकांनी केलेल्या करामती ऐकलेल्या आहेतच; मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही बालके "चमत्कार‘ करत असल्याचे चित्र आहे. विज्ञानाची कास धरून तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांच्या साह्याने जगभरातील बालके आपल्या प्रतिभेद्वारे जगाला थक्क करत आहेत. लोकप्रिय सर्च इंजिन "गुगल‘च्या "गुगल सायन्स फेअर‘मध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.

तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण, कल्पक, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या जगभरातील बालकांच्या प्रयोगांचे स्पर्धावजा प्रदर्शन म्हणजे "गुगल सायन्स फेअर‘. या स्पर्धेत 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. जगभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक 20 प्रयोगांना अंतिम स्थान देण्यात येते आणि त्यातून विजेत्याची निवड होते. विजेत्यांना अन्य प्रायोजकांमार्फत विविध पुरस्कार, तसेच पुढील प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि अन्य स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. तसेच गुगलच्या माध्यमातून हे प्रयोग जगासमोर मांडले जातात. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची जागतिक माध्यमांकडूनही दखल घेण्यात येते. या स्पर्धेत ऑनलाइन अर्ज भरून सहभागी होता येते.

यंदाची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असून अंतिम वीस प्रयोगांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुरुध गानेसन या अमेरिकेतील 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांने बर्फ तसेच वीजविरहित रेफ्रिजरेटर तयार केले आहे. दुर्गम भागात वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याचदा लसीची वाहतूक करणे आवश्‍यक असते. रुग्णाला तातडीने आणि योग्य त्या तापमानात साठविलेली लस पोचवण्याची आवश्‍यकता ओळखून विजेशिवाय आणि बर्फाशिवाय 2-8 अंश सेल्सिअस तापमानात लसीची वाहतूक करता येणारे तंत्र अनुरुधने प्रयोगाद्वारे सादर केले आहे. सिंगापूरमधील गिरीश कुमार या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रमातून प्रश्‍नपत्रिका तयार करताना शिक्षकांसाठी उपयोगी ठरेल, असे दिलेल्या उताऱ्यावरून बहुपर्यायी प्रश्‍न तयार करणारे तंत्र विकसित केले आहे, तर अमेरिकेतील दीपिका कुरूप या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने टाकाऊ पदार्थ आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यातील विषारी घटक काढून टाकून पाण्याला शुद्ध करणारा प्रयोग सादर केला आहे, तर वातावरणात असलेले पाणी प्रत्यक्ष भांड्यात साठविता यावे यासाठी कॅनडातील 18 वर्षाच्या कॅलविन रायडर नावाच्या विद्यार्थ्याने नवा शोध लावला आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य ऊर्जेचा वापर न करता केवळ सौरऊर्जेवर आधारलेले यंत्र विकसित केल्याचे कॅलविनने आपल्या प्रयोगात म्हटले आहे. विषारी दारू पिऊन दगावल्याच्या अनेक घटना जगामध्ये सातत्याने घडत असतात. यावर मात करण्यासाठी तैवानमधील यो हसू आणि जिंग टॉंग विंग या तेरा वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी बंद बाटलीचे झाकण न उघडता त्यातील द्रव पदार्थ ओळखता येणारे तंत्र शोधले आहे. द्रवपदार्थ असलेल्या बाटलीला विशिष्ट वजनाच्या ठोकळ्याने धक्का दिल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींमधून बाटलीतील द्रव पदार्थ ओळखता येत असल्याचा दावा या प्रयोगामध्ये केला आहे. त्यातून आतील द्रवपदार्थामध्ये असलेले विषाचे प्रमाणही समजणार आहे. अशा प्रकारचे विविध कल्पक 20 प्रयोग अंतिम स्पर्धेत आहेत.

अशा प्रकारच्या अनोख्या, कल्पक, नावीन्यपूर्ण, जीवनावश्‍यक प्रयोगांचे प्रदर्शन गुगलने संकेतस्थळाद्वारे जगासमोर सादर केले आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून सप्टेंबरमध्ये अंतिम विजेते घोषित होणार आहेत. मूकबधिर व्यक्तींना इतरांशी संवाद साधता यावा यासाठी श्‍वासातील कंपने शब्दांमध्ये परावर्तित करणारे तंत्र भारतातील अर्श शाह दिलबागी या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने मागील वर्षी गुगल सायन्स फेअरमध्ये सादर केले होते. या प्रयोगाला पुरस्कारही प्राप्त झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "डिजिटल इंडिया‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने अशा बालप्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(Courtesy: eSakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...