3/24/2015

'तो' नसल्याची खंत...

त्यानं थोरलीला संसार थाटून दिला. कमीत कमी खर्चात कसंबसं लग्न पार पाडलं. माणसं चांगली शिकली सवरलेली होती. समजून घेणारी होती. तरीही लग्नात मुलाकडील मंडळींनी किरकोळ कुरबुरी चालू होत्याच. जगाची रित म्हणून त्याला काही वाटलं नाही. पण माणसं सांभाळून घेतील असे वाटले. उलट मनात कृतार्थतेचा आनंद पसरला. पण इतक्‍यात समाधानी होऊन चालणार नव्हतं. दुसरी मुलगीही लग्नाला आली होती. वर्षभरातच तिलाही संसार थाटून द्यायचा होता. शिवाय शिल्लक काहीच नव्हतं. पहिलीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यातच आणखी काही वर्षे जाणार होती. तरीही काहीतरी तजवीज करून लग्न करणं आवश्‍यक होतं. त्यानंतर साऱ्या जबाबदाऱ्यातून तो मुक्त होणार होता. तरीही मुलगा नसल्याची त्यानं कधी खंत केली नाही.  
 
पाहता पाहता वर्ष लोटलं. अजून दुसरीच्या स्थळाचा शोध संपला नव्हता. एक-दोन वेळा योग आला होता. पण मागण्या पूर्ण करता येत नव्हत्या. शिवाय खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर काहीतरी तजवीत करायची होती. दरम्यान पहिलीचे सणवार करताना आणखी कर्ज झालं होतं. उत्पन्न मात्र तेवढंच. खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या आकड्याची दोन दोन महिने भेट होत नव्हती. त्यांच्या भेटीसाठी त्यानं आणखी एक अर्धवेळ नोकरी पत्करली होती. जास्तीचे श्रम शरीराला झेपत नव्हते. पण परिस्थितीच त्याला बळ देत होती. त्यामुळे संसाराची गाडी पुढे जात होती. दोन्ही मुलींचे हट्ट त्याला पुरविता आले नव्हते. पण बापाचे प्रेम त्याने भरभरून पुरविले होते. त्याने हट्टापेक्षा प्रेमाला अधिक उंच नेले होते. भावाची कमतरताही त्याने कधी जाणवू दिली नाही. त्यामुळे मुलीही संस्कारक्षम बनल्या होत्या. त्यांना बापाची आदरयुक्त भीती वाटत होती. 

एके दिवशी अचानक थोरलीच्या सासऱ्याचा फोन आला. भेटायला या म्हणाले. दोन्ही नोकरीला सुट्या, भाड्याला पैसे सारच अवघड होतं. पण त्यानं सारचं सोपं केलं अन्‌ भेटायला गेला. सासरकडील मंडळींनी चांगलं स्वागत केलं. जेवण वगैरे झालं. थोरलीचा संसार पाहून तो भारावून गेला. व्याही बोलू लागले, "अहो, तुम्ही आता आजोबा होणार आहात. आम्हाला नातू दिसणार आहे. चार महिन्यांनी न्या. हीच गोड बातमी सांगायला तुम्हाला बोलावलं. पण सुनबाईला काही आताच न्यायची गरज नाही.' बापाच्या मनाला आनंदाचं उधाण आलं. तो सगळं विसरून गेला. मात्र काही वेळातच त्याची समाधी भंग पावली. मुलीच्या सासरी येण्यासाठी केलेली उसनवारी, धाकटीचं लग्न, मासिक खर्च आणि उत्पन्नाची भेट, शिवाय थोरलीच्या बाळंतपणासाठी येणारा खर्च हे सगळं चित्र त्याच्यासमोर नाचू लागलं. तशातही त्यानं सावरत सर्वांना शुभेच्छा देत, शुभेच्छा स्वीकारत घराचा रस्ता धरला. जाताना प्रथमच त्याला दोन मुलीच असल्याची अन्‌ एकही "मुलगा' नसल्याची खंत जाणवू लागली...

3/22/2015

स्पर्श : स्मार्ट पोराचा 'स्मार्ट फोन'

त्याला आज सुटीच होती. आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वृद्धापकाळ आणि आजारामुळे त्रस्त वडिल घरातील बेडरूममध्ये आराम करत होते. तर स्मार्ट मुलगा बाहेरच्या खोलीत स्मार्ट फोनला प्रेमळ स्पर्श करत होता. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवरून तो अपडेट राहत होता. प्रत्येक प्रेमळ स्पर्शागणिक त्याला जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळत होती, मनोरंजन होत होते. त्याच प्रेमळ स्पर्शासाठी याचे वडिल मात्र आतल्या खोलीत तळमळत होते. कानाला हेडफोन लावून संगीताचा आनंद लुटणाऱ्या स्मार्ट पोराला त्याची कल्पनाही नव्हती.

या पोराने अलिकडेच सोसायटीतील सर्वांचा एक ग्रुप केला होता. त्याद्वारे सोसाटीतील सगळे कामे चुटकीसरशी ऑनलाईन पार पडत होती. सोसायटीतील कित्येक लोकांची चेहरेदेखील त्यानं कधी पाहिले नव्हते; पण आभासी जगात त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. सोसायटीची मासिक बैठकही यानं ऑनलाईन सुरु केली होती. शिवाय अभिनव कल्पनाशक्तीमुळे प्रत्येक फ्लॅधारकाच्या फ्लॅटला क्रमांकाऐवजी फुलांची नावं दिली होती. स्वत:च्या फ्लॅटलाही हा "रेड रोझ‘ म्हणत होता. प्रत्यक्षात नाही पण व्हॉटस्‌ऍपवरून सोसायटीत याचं फार कौतुक होत होतं. तो स्मार्ट फोनच्या अधिकाधिक जवळ जात होता, तर जवळच्या माणसांपासून अधिकाधिक दूर जात होता.

दरम्यान वडिलांच्या कोणत्यातरी आजारावरील गोळीची वेळ झाली. वडिल पोराला अंत:करणातून आवाज देत होते. पण स्मार्ट मुलगा त्यांच्या जगापासून कितीतरी दूर गेला होता. शिवाय कानात हेडफोन असल्याने जवळचे ऐकण्याची क्षमताही गमावून बसला होता. घरात बोअर झाल्याने काही वेळात स्मार्ट पोरगा आपल्या मित्राला भेटायला जवळच्या कॉफी शॉपमध्ये पोचला. इथेही मित्रापेक्षा तो स्मार्टफोनच्याच अधिक जवळ होता. बोलता बोलता मुव्ही पाहण्याचा कार्यक्रम ठरला. दोघे थिएटरमध्ये पोचले. मुव्हीमध्येही त्याला स्मार्ट फोनपासून दूर करण्याचं सामर्थ्य नव्हतं. त्याचा प्रेमळ स्पर्श स्मार्टफोनला होत होताच. मुव्ही सुरु झाल्यानंतर तासाभरानं सोसायटीच्या ग्रुपवर एक व्हॉटस्‌ऍप मेसेज आला, ‘सॉरी टू से बट आवर रेड रोझ ओनर्स फादर इज नो मोअर. आरआयपी!‘ याच्या संवेदना अचानक जागृत झाल्या. तो तसाच धावत रेड रोझवर आला. व्हॉटस्‌ऍपचा मेसेज खराच होता. जिवंतपणी नव्हे तर मेल्यानंतर बापाला पोराचा प्रेमळ स्पर्श लाभला होता. कदाचित यानं फक्त एकदा रेड रोझमधून बाहेर पडताना वडिलांकडे पाहिले असते तर... त्यानंतर त्याला व्हॉटस्‌ऍपवर मेसेज येऊ लागले "आरआयपी टू युअर फादर!‘

(Courtesy: www.esakal.com)

3/15/2015

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील ब्लॉग क्रांती

यशदामधील माध्यम आणि प्रकाशन केंद्रामध्ये कार्यरत असताना केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने तसेच डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली "शिक्षणामध्ये माध्यमांची भूमिका' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात मी "नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर व्याख्यान दिले होते. या व्याख्यानामधून प्रेरणा घेऊन सातारा जिल्ह्यातील एक सहशिक्षण मित्रवर्य राम सालगुडे यांनी त्यांचा स्वत:चा ब्लॉग तयार केला.

त्या ब्लॉगला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रात ब्लॉग तयार करणाऱ्यांची एक पिढीच उभी राहिली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक सहशिक्षक काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण राज्यातील कल्पक शिक्षकांनी दाखविली. त्यानंतर राम राज्यभरात लोकप्रिय झाले. त्यांना विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन राज्यातील 100 पेक्षा अधिक शिक्षकांनी आपापल्या केंद्रातील ब्लॉग तयार केले आहेत. ते सक्रिय देखील आहेत. शिक्षण क्षेत्रात राज्यात होत असलेल्या "ब्लॉग क्रांतीच्या' पायाभरणीतील एक किरकोळ घटक होऊ शकलो यापेक्षा मला दुसरा आनंद नाही. 


लवकरच राज्यातील शिक्षकांसाठी ब्लॉग रायटिंग वरील राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करणार आहे. सध्याही शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षकांनाही ब्लॉगरायटिंग बद्दल व्याख्याने देत आहे. तसेच फेसुबक आणि ट्‌विटरच्या पलिकडील तंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी माझ्यापरीने जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला काही माहिती हवी असल्यास अवश्‍य कळवावे. (व्यंकटेश कल्याणकर  +91-94042 51751)

त्यापैकी (किंवा इतरही काही) ब्लॉग इथे माहितीसाठी दिले आहेत. आवश्य भेट द्या : 


 समूह साधन केंद्र मार्डी तालुका माण जिल्हा सातारा

दिपक नि. जाधव Prashikshak

समूह साधन केंद्र पाचेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड

समूह साधन केंद्र भिलार

अपंग कर्मचारी संघटना

Shikshan Mitra - Welcomes You!

जि प प्रा शाळा केसापुरी तांडा

आपला ब्लॉग इथे जोडण्यासाठी पाठवा
E Learning

3/10/2015

स्पर्श : 'खोटं कधी बोलू नये,चोरी कधी करू नये'

"खोटं कधी बोलू नये. चोरी कधी करू नये....‘ बोलता बोलता त्यानं आपल्या लहानग्या मुलीच्या डोळ्याकडं पाहिलं. ते मिटले होते. हा ही शांत झाला. स्वत:च्या मुलीवर अन्‌ तिच्या आईवर याचं फार फार प्रेम करत होता. मुलीवर चांगले संस्कारही करत होता. पण तुटपुंज्या उत्पन्नात त्यांचे लाड पुरवू शकत नव्हता. तरीही समाधानी होता. मुलगी कधीच हट्ट करत नव्हती. तर बायकोही केवळ "प्रेमा‘वरच समाधान मानत होती.

"बाबा, माझा वाढदिवस जवळ आला आहे. मला परीसारखा नवा फ्रॉक घ्याल?‘ मुलीने कधी नव्हे ते सहजच बापाकडं मागणी केली. त्यानं लाडाने "घेऊ, घेऊ‘ म्हणत वेळ मारून नेली. नेमकं त्याच दिवशी मुलगी शाळेत गेल्यावर बायकोनंही "कधी जमलं तर मला पण दुकानाच्या शोकेसमधील पैठणी घ्या म्हटलं!‘ तो तिलाही लाडाने "घेऊ‘ म्हणाला. आणि ऑफिसला पोचला.
β स्पर्श : देवाचा नवस तो सरकारी खात्यात नोकरीला होता. सरळ स्वभावामुळे कधीच कोणताही "व्यवहार‘ करत नव्हता. मात्र आज फार व्यथित झाला होता. दोघींनी आज कसं काय हट्ट केला? याआधी त्यांनी कधीच असा हट्ट केला नव्हता? शिवाय तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर पुढील महिनाभराचं बजेट कोलमडून पडणार होतं. त्यामुळं काय पुढच्या पाच-सहा महिन्यातही त्यांचा हट्ट पुरवणं आपल्याला शक्‍य नाही. काय करावे बरे? अशा उद्विग्न मनावस्थेत तो काम करू लागला. क्षणभर एखादा चमत्कार घडावा असंही त्याला वाटलं. अशा विचारात अर्धा दिवस संपलाही. बघता बघता दुपार झाली.

दुपारी अचानक त्याच्या टेबलावर एका माणसानं एक बंद पाकिट आणून ठेवलं. त्यानं ते उघडलं तर त्यात कोऱ्या करकरीत नोटा होत्या. त्यांना ते नित्याचच होतं. हा पाकिट घेत नाही, हे नव्या कंत्राटदाराला माहित नव्हतं. म्हणून त्याच्या टेबलापर्यंत पाकिट पोचलं होतं. त्यानं आजूबाजूला पाहिलं तर निर्जीव पाकिटामुळं अनेक सजीव जीव आनंदी झाले होते. उठून तडक साहेबांच्या केबिनमध्ये जावं. तिथं बसलेल्या कंत्राटदाराच्या तोंडावर पाकिट फेकून द्यावं असं त्याला वाटलं. केबिनच्या दिशेने तो निघाला. तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर मुलीचा परीसारखा फ्रॉक अन्‌ बायकोची पैठणी दिसू लागली. तो तसाच मागे फिरला. शांत बसला. ऑफिस सुटल्यावर घराच्या दिशेने निघू लागला.

आज तो घरी फ्रॉक अन्‌ पैठणी घेऊन जाऊ शकणार होता. पण "खोटं कधी बोलू नये. चोरी कधी करू नये...‘ असं आपल्या मुलीला मरेपर्यंत सांगू शकणार नव्हता. कारण आपल्या प्रेमाचा हट्ट पुरविण्यासाठी निर्जीव पाकिटानं मोठ्ठा चमत्कार केला होता.
स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...' (Courtesy: esakal.com)

3/03/2015

स्पर्श : देवाचा नवस

"प्लिज देवा, मला, नोकरी मिळू दे. पहिल्या पगारातील 5 टक्के वाटा तुला अर्पण करेल. प्लिज देवा!‘ त्यानं देवापुढे हात जोडून देवापुढं प्रार्थना करत देवाशी व्यवहारही ठरवून टाकला. फक्त त्याचं नाव "नवस‘ असं ठेवलं. मुलाखत चांगली झाली होती. तसा तो हुशारही होता. पण घरची परिस्थिती हलाखीची होती. कॉलेज संपून महिनाही उलटला नव्हता. निकालाची वाट पाहण्यापेक्षा त्याला चांगली नोकरी शोधणं जास्त गरजेचं होतं. कॉलेजच्या कोणत्यातरी योजनेद्वारे तो नोकरी करतच शिकला होता. मात्र कॉलेज संपल्यानं नोकरी संपली. शिक्षण संपलं. आता पूर्णवेळ नोकरीतच तो पूर्ण आयुष्य घालणार होता. खिसा रिकामाच असल्याने दररोज एका एका मित्राच्या खोलीवर राहून कसेबसे दिवस काढत होता. यातच बाप अजूनही घरखर्चासाठी काही मागत नाही, यामुळं समाधान मानत होता.

काही दिवसांनी त्याला हवी असलेली अन्‌ देवाकडे मागितलेली नोकरी त्याला मिळाली. त्याच्या आनंदाला आकाश कमी पडले. नोकरीमुळे याचा आत्मविश्‍वासही उंचावला होता. ठरल्याप्रमाणे तो नोकरीला रूजूही झाला. पहिल्या पगाराच्या भरवशावर अनेकांना आश्वासनं देत कसा बसा महिनाही भरला. पहिल्या पगाराचा दिवसही उजाडला. ठरल्याप्रमाणं पगारही मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं देवाचा नवस पूर्ण करण्याचं ठरवलं. कामाचा दिवस असल्यानं आज देवळात फार गर्दी नव्हती. पहिल्या पगारातील ठरलेली रक्कम घेऊन तो देवाला नमस्कार करून दानपेटीजवळ आला. दानपेटी खिडकीजवळ होती. सहजच त्याची नजर खिडकीतून बाहेर गेली.

दुर्धर आजारानं कुरूप झालेला एक मनुष्य दोन्ही हातांनी मंदिरातील भक्तांना मदतीची याचना करत होता. देवळातील माणसं देवाकडं पाहत होती. अन्‌ देवळाबाहेरील याचक माणसांकडं पाहत होता. देवळातील देवासह सर्वांनाच याचकाचे हात दिसत होते. पण कोणाचेही पाय याचकाकडे वळत नव्हते. अर्थात याचकाचा अन्‌ देवळातील लोकांचा तो नित्यक्रमच होता. दानपेटीजवळ पैसे हातात घेऊन उभ्या असलेल्या यानं एकदा देवाकडं पाहिलं. एकदा याचकाकडं पाहिलं. देव निश्‍चल होता. याचक चलबिचल करत होता. देव काहीच मागत नव्हता. याचक काहीतरी मागत होता. पण देवाला खूपकाही मिळत होते. याचकाला फार काही मिळत नव्हते. याने देवाला नमस्कार केला. खिडकीबाहेरील याचकाजवळ गेला. याचकाच्या हातात पैसे ठेवले. याचकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याच आनंदाचे याच्याही चेहऱ्यावर प्रतिबिंब उमटले. तशाच अवस्थेत सांगता न येणारं समाधान घेऊन तो देवळाबाहेर पडला. पण त्याला ‘नवस‘ फिटला का नाही हे मात्र काही केल्या समजत नव्हतं.
(Courtesy: esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...