11/18/2015

लहानपणीची दिवाळी!

प्रिय बाबा,
परवा तुमच्या जुन्या पेटीतून नवा आकाशदिवा काढत होतो. आणि एकदमच लहानपणीच्या आपल्या मोठ्या वाड्यातील दिवाळीची आठवण झाली. किती मजा यायची ना! तुम्हीच सगळं करायचात. आम्ही फक्त मज्जा करायचो. दिवाळीच्या आधी पहिल्या सत्राची परिक्षा व्हायची. त्यानंतर लागणाऱ्या सुट्यांची आम्ही महिनाभर आधीच वाट पाहायचो. सुट्या लागायच्या. मग घरातील सगळे छोटे मिळून दिवाळीचे नियोजन करायचो. फटाक्‍यांची यादी करायचो, "आई काय-काय बनविणार?‘ असा दिवाळीचा बेत आईला विचारायचो. दिवसभर काय करायचं ते ठरवायचो... खूप मज्जा यायची. मावशी यायची, मामा यायचे, आत्या यायची, काका यायचे. सगळी भावंडे भेटायची.



अगदी रात्रीच घड्याळाला गजर लावून झोपायचो. न चुकता सकाळी सकाळी उठायचो. आई सगळ्यांच्या अंगाला सुगंधीतेल लावायची. ओवाळायची. सगळ्यांना दोन बादल्या गरम पाण्याने "अभ्यंगस्नान‘ घालायची. त्यानंतर आईसोबत देवदर्शन करून घरी परतायचो. बाबांची आंघोळ होताना आम्ही चिल्लेपिल्ले फुलझड्या उडवायचो. किती मजा यायची... त्यानंतर सगळी भावंडे दिवसभर अक्षरश: धिंगाणा करायचो. काहीही फिकिर नाही, कसलीच चिंता नाही, कुणाचीही भिती नाही... फक्त मजा करायचो! सगळ्या भावंडांचा खायचा आणि खेळायचाही कार्यक्रमही ठरलेला नसायचा. वाटलं की घरात येऊन एक लाडू तोंडात कोंबत आणि मूठभर चिवडा हातात घेऊन बाहेर धावत सुटायचो. वाटलं तर बाबांची सायकलची किल्ली हळूच घेऊन गल्लीतून राऊंड मारायचो. वाटलं तर उगाच दोन-तीन गल्लीत फिरून यायचो. दररोज भावंडांमध्ये कोणाचे तरी भांडणं व्हायची. रूसवा-फुगवा. मग आई, मावशी, आत्या भांडणं मिटवायची. आम्ही सारे पुन्हा एकत्र येऊन खेळायचो. दररोज पहाटे आणि संध्याकाळी दारात पणत्या लावायचो. दररोज संध्याकाळी दारात आईच्या मदतीने सगळेजण मिळून अंगणात छानशी रांगोळी काढायचो. मोठ्या आणि आवाजाच्या फटाक्‍यांना तुम्ही आम्हाला हात लावू देत नव्हता. ते आपण रात्री उडवायचो. वाड्याच्या मध्यभागी भुईनळे फुलताना वाड्यातील सगळी छोटी-छोटी मुले आणि आम्ही भावंडे किती उड्या मारायचो ना..! फटाक्‍यांमध्ये असणाऱ्या टिकल्या आणि नागगोळ्या दिवसभर पुरायच्या. नागगोळीतून नाग वर यायचा आणि आमच्या आनंदाला उधाण यायचे.

बाबा, माहितेय एकदा तुम्हाला बोनस मिळाला नव्हता. मी फटाक्‍यांसाठी हट्ट करत होतो. घरात किराणा सामानही आणायचे होते. मी आईला फराळाची यादी विचारत होतो. आई ती सांगतच नव्हती. मी तुमच्यावर, आईवर खूप रागावलो होतो. दिवाळीच्या सुट्या सुरु झाल्या तरी घरात दिवाळीची काहीच हालचाल नव्हती. तरीही तुम्ही कुठूनतरी पैसे आणलेत आणि दिवाळी अगदी व्यवस्थित पार पाडली. असचं एकदा आईशी बोलताना तिनं सांगितलं त्यावेळी तुम्ही दिवाळीसाठी व्याजाने पैसे आणले होते. "मी त्यावेळी तुमच्यावर का रागावलो?‘ याचा विचार करून आजही मला माझाच पश्‍चाताप होतोय.

बाबा, त्यावेळी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद मिळायचा. आता मात्र मोठ्या-मोठ्या गोष्टीतूनही बऱ्याचदा छोटासा आनंदही शोधता येत नाही. आता तो वाडा नाही. तुमचा ठेवणीतला आकाशदिवाही मला जपता आला नाही. दिवाळी म्हणजे झोपण्याची संधी समजली जाते. एखाद दिवस अभ्यंग झालं तरीही मी धन्यता मानतो. दिवाळीतला फराळ वर्षभर हवा तेव्हा मिळतो, त्यामुळे त्याचीही वाट पाहावी लागत नाही. कोऱ्या करकरीत नोटांचा सुगंध शोधता शोधता अभ्यंगस्नानावेळच्या सुगंधीतेलाचाही सुगंध येईनासा झाला आहे. अगदी परवा-परवापर्यंत तुम्ही होता तोवर दिवाळी आल्यासारखी वाटायची. तुम्ही मागे लागत होता. "हे आणलं का? ते आणलं का?‘ तरीही "जास्त खर्चात पडू नको!‘ असं तुम्ही सतत सांगायचात. आता, तुम्हीच कोठे आहात हे सगळं सांगायला....

तुमचाच


(Courtesy: eSakal.com) 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...