5/06/2016

हो, आम्ही लग्न करून आलो !

नुकतेच त्याचे लग्न ठरले होते. तसे त्याचे ‘ऍरेंज्ड मॅरेज‘ होते. पण त्यांच्यात आता मैत्री वाढली होती. दोघांच्या पसंती आल्यानंतर लग्न ठरले. त्यामुळे दोघांच्या मर्जीनेच तीन-चार महिन्यांनंतरचा मुहूर्त काढण्यात आला. मुलीच्या घरची परिस्थिती फार संपन्न नव्हती. मुलगा-मुलगी दोघेही सज्ञान असल्याने दोघांच्या परस्पर संमतीनेच लग्न अगदी साध्या पद्धतीने कोणताही बडेजाव न करता करायचे ठरले. तशी औपचारिक चर्चाही झाली होती. मुलाच्या आईला हे काही फार पसंत पडले नव्हते. लग्न कसे थाटात व्हावे वगैरे तिला वाटत होते. पण मुलाच्या हट्टापायी तिने आपला विचार बाजूला ठेवला. तरीही नातेवाईक-मैत्रिणींसमोर लग्नाविषयीची तिची नाराजी व्यक्त व्हायची.



एकेदिवशी त्याचे कोणीतरी दूरचे दोन-तीन नातेवाईक घरी राहायला आले. त्याच्या आईची आणि त्यांची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये लग्नाच्या तयारीबाबत वगैरे चर्चा झाली. त्यावर नातेवाईकांनी "तुमचा एकुलता एक मुलगा, पोराचं काय ऐकता हो? लग्न थाटामाटात करायचं! जा मुलीच्या घरी आणि सांगून टाका. लग्न थाटामाटातच करायचे आहे म्हणून!‘ त्या सर्वांचेच त्यावर एकमत झाले. मग त्यासाठी स्नेहभेटीच्या निमित्ताने मुलीच्या घरी जाऊन एक बैठक घ्यायचेही ठरले. त्याप्रमाणे मुलीकडच्यांना फोनही केला. सुटीच्या दिवशी भेटीसाठी संध्याकाळची वेळ ठरली. मुलगा या सगळ्या प्रक्रियेत सहभागी नव्हता. पण हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. आता सगळेच मोठे असल्याने त्याला मध्येच असे बोलणे बरे वाटले नाही.

स्नेहभेटीतील बैठकीचा दिवस जवळ जवळ येत होता. मुलीला हा सारा प्रकार सांगणे मुलाला बरे वाटले नाही. त्याची आतल्या आत कुचंबणा होत होती. दरम्यान नातेवाईक आणि मुलाची आई मुलाच्या लग्नाच्या भव्यतेचे स्वप्न रंगवत होते. तर याची घुसमट आणखीनच वाढत होती. तरीही त्याने "हे सगळं थांबवा‘ असा आग्रह केला. पण "तू आमच्यात पडू नको‘ म्हणत त्याला रोखण्यात आले. आता त्याचा संयम सुटत चालला होता. तरीही तो काही करू शकत नव्हता.

स्नेहभेटीनिमित्त होणाऱ्या बैठकीचा दिवस उजाडला. तोपर्यंत सर्वांनी तयारी पक्की केली होती. भूमिका ठाम आणि स्पष्ट ठेवण्याची तयारी केली होती. मुलालाही येण्याचा आग्रह धरण्यात येत होता. पण त्याने स्पष्ट नकार दिला. तो सकाळीच बाहेर कुठेतरी निघून गेला. भेटीची वेळ संध्याकाळची होती. दिवस पुढे जात होता. सर्वांची उत्सुकता वाढत होती. या सर्वांत सकाळी बाहेर पडलेला मुलगा परत आलाच नसल्याचे कोणालाच भान नव्हते. साधारण दुपार उलटत होती. दुपारचे पाच वाजत होते. तासाभरात निघण्याची वेळ होणार होती. दरम्यान दारावरची बेल वाजली. दार उघडायला त्याची आई गेली. दार उघडल्यानंतर तिला जबरदस्त धक्का बसला. कारण समोर तिचा मुलगा लग्न ठरलेल्या मुलीसोबत लग्न करून घरी आला होता. ‘तुम्ही माझे ऐकत नव्हता. मलाही ते सांगता येत नव्हते. मग काय आम्ही माझ्या आणि तिच्या कोणाच्याच घरी न कळवता थेट नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि आलो घरी‘, त्याने खुलासा केला.

(Courtesy: eSakal.com)

5/05/2016

देशप्रेम आणि गप्पा

त्यांचा आठ जणांचा ग्रुप होता. त्यामध्ये तीन मुलीही होत्या. प्रत्येकाची आवड-निवड, विचार वेगवेगळे होते. तरीही कॉलेजपासून त्यांची चांगली मैत्री होती. जमेल तेव्हा सगळेजण एकत्र भेटत असत. रोज त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर मोबाईलच्या माध्यमातून गप्पा चालत होत्या. त्यांच्या चर्चेत राष्ट्रीय विषयांना सर्वोच्च प्राधान्य होते. राष्ट्रीय घटनांचे त्यांच्या ग्रुपमध्ये रोज विश्‍लेषण केले जायचे. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे मते मांडत. आपल्या म्हणण्याला शक्‍य तेवढे पुरावेही देण्याचा प्रयत्न करत. अशा गप्पा दिवसभर कधी कधी रात्री उशिरापर्यंतही चालत. त्यांच्यापैकी एकजण मात्र नेहमी शांत असायचा. या साऱ्या गप्पा वेळ मिळेल तसे वाचायचा. फार फार तर कधी कधी एखादी चांगली गोष्ट शेअर करायचा.

एका सुटीच्या दिवशी सगळ्यांनी भेटायचे ठरले. ठरलेल्या वेळी सगळेजण आले. मंगळ, चंद्र, पृथ्वी, विज्ञान, अध्यात्म, सहिष्णुता, देशप्रेम, चित्रपट, श्रद्धा-अंधश्रद्धा, दहशतवाद, शांती, धर्म वगैरे वगैरे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा सुरु झाली. नेहमी शांत असणारा मित्र आजही शांतच होता. काही निवडक विषयांवरच बोलत होते. त्याला पाहून एकाने विचारले, "का, रे तू सदा न कदा नुसतं बघत काय बसतो? बोल रे, कळू दे ना तुला काय वाटतं ते! बोलत जा. सगळ्याच विषयांवर‘ त्यावर इतर काही जणांनीही त्याला मत मांडण्याचा आग्रह धरला. त्यावर तो म्हणाला, "हे बघा, मी मतं मांडतोच ना. फक्त राजकारण वगैरे विषयांवर चर्चा मला फारशी पटत नाही‘ त्यावर एका मैत्रिणीने सांगितले, "हे हे तुझ्यासारखे शांत बसून या सगळ्या गंभीर विषयांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांमुळेच काही चांगलं होत नाही.‘

आता शांत बसणारा मित्रही किंचित मोठ्या आवाजात बोलला, "तुम्ही या सगळ्या सगळ्या विषयांवर बोलता. काय मिळतं तुम्हाला?‘ त्याला मध्येच थांबवत अन्य एकाने तावातावाने सांगितले, "अरे, परस्परांचे विचार कळतात. नवे संदर्भ समजतात. एखाद्या विषयाकडे नव्या दृष्टीकोनातून बघता येते‘, त्यावर पुन्हा शांत मित्र म्हणाला, "बरं कळले विचार. कळले संदर्भ. कळली दृष्टी. पुढे?‘ पुन्हा मैत्रिण म्हणाली, "शांत बसल्याने तरी काय मिळतं रे तुला?‘ शांत मित्र म्हणाला, "हे बघा. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता. अगदी दुसऱ्या दिवशी एखादा देशातील एखादा मोठा माणूसही तुम्ही सांगितल्यापैकी एखादा संदर्भही वापरतो. पण आपल्या ग्रुपमध्ये कोणीही लोकप्रतिनिधी नाही. या चर्चेचा चर्चेतून एखादा सर्वानुमते निष्कर्ष काढून तो अनेकांपर्यंत पोचविण्याचीही आपल्याकडे यंत्रणा नाही. त्यामुळे या चर्चेला काहीही अर्थ उरत नाही. उरला प्रश्‍न दृष्टीकोनाचा तर गुगलवर शोधा हवी ती दृष्टी निर्माण करता येईल. हवी ती गोष्ट खरीच आहे म्हणून तुम्हाला पटवून सांगता येईल, एवढे पुरावेही मिळतील.‘

त्याला मध्येच थांबवत एक मित्र म्हणाला, "मग आम्ही काय नुसतं गुगल करत बसावं, असं तुला वाटतं का? गप्पा मारूच नयेत. फक्त गप्प बसावं तुझ्यासारखं?‘ शांत मित्र म्हणाला, "गप्पा जरूर माराव्यात. पण शक्‍य तेवढ्या सकारात्मक. अरे तुम्ही दहा विषयांवर दहा वेगळी मतं निष्फळपणे ऐकून घेण्यापेक्षा एक चांगला विचार दिवसभरात जमेल तेवढ्या वेळा वाचा. तसं वागण्याचा प्रयत्न करा. तो विचार इतरांना सांगा. शेवटी पॉझिटिव्ह विचारांनीच जग कितीही वाईट असलं तरीही बदलू शकतं. तुम्ही दिवसभर देशभरातील चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा केलीत तर त्यातून काही मिळणार नाही. पण तुम्ही एक चांगला विचार जमेल तेवढ्या लोकांना सांगितलात तर कदाचित देश बदलूही शकेल. कोणत्याही व्यक्तीला, समूहाला किंवा विचारसरणीला जमेल तेवढी टीका करून, उणेदुणे काढण्यापेक्षा एक चांगला अनेकांना सांगणे हेच माझ्यामते देशप्रेमाचे उत्तम उदाहरण ठरेल ना?‘

पुढे बराच काळ ग्रुपमध्ये शांतता पसरली होती.

5/04/2016

कोणी मुलगी देता का मुलगी?

लग्न करावं की करू नये हा एकच सवाल आहे.
या प्रपंच्याच्या चक्रव्युहात फाटक्या संसाराचा गुलाम बनून, बायको आणि आईची समजूत घालत बसावं आयुष्यभर आणि जगावं बेशरम लाचार आनंदानं.. की फेकून द्यावी या तारुण्याची उमेद लग्नाचा विचार न करता, त्यात गुंफलेल्या स्वप्नांच्या जगासह...
एक निर्णय आयुष्य वाचवेल, माझे, तिचे आणि आईचेही...
लग्न नावाच्या या महासर्पाने असा डंख मारावा की येणाऱ्या आयुष्याला न उरावी आशेची किनार. कधीही.. पण नंतर पुन्हा लग्नाचे स्वप्न पडू लागले तर?...
तर-तर इथंच तर मेख आहे...



आजन्म ब्रह्मचर्यात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे उपवर मुलींच्या अपेक्षांचे ओझे, त्यांच्या पालकांनी नाकं मुरडत दिलेले अगणित नकार आणि माजघरात थाटलेल्या वधूसंशोधनाच्या रंगमंचावरील ही नसती उठाठेव...
निर्जीवपणाने पुन्हा पुन्हा चकरा मारत राहतो वधू-वर केंद्रांच्या दारात. उभे राहतो पुन्हा वधू-वर मंडळात आणि मेळाव्यातही... आणि अखेर लग्नाचा प्रस्ताव घेऊन शोधत राहतो योग्य वधू...
विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आमच्यासाठी मुली शोधणं विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला तारुण्य दिलं तो तूही आम्हाला विसरतोस...
मग कर्तृत्त्वाचा आलेख, पगाराचा आकडा, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आणि सुंदरसा फोटो घेऊन हे करुणाकरा आम्हा अविवाहितांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर, कोणाच्या?

कोणी मुलगी देता का मुलगी?
एका सुसंस्कृत, निर्व्यसनी, देखण्या, सज्जन, तरुण तडफदार तुफानाला कोणी मुलगी देता का?
फक्त बायको नकोय, हवीय आयुष्यभराची साथ... कदाचित त्यानंतरचीसुद्धा...

- एक अविवाहित 

(Courtesy : www.esakal.com)

5/03/2016

'आम्हाला आत्महत्या करायची आहे!'

तो पदवीधर होता. चांगली नोकरीही होती. त्याच्या घरची परिस्थितीत संपन्न होती. तो एका मैत्रिणीच्या प्रेमातही पडला होता. तिचीही परिस्थिती चांगली होती. पण दोघांमध्ये भेदाभेदाच्या मोठमोठ्याला भिंती उभ्या होत्या. त्या भींती पार करून सर्वांच्या परवानगीने एकत्र येणे सहज शक्‍य नव्हते. सगळ्या परिस्थितीसमोर तो हतबल झाला होता. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. मात्र ती खंबीर होती. त्याला जगण्यासाठी, लढण्यासाठी आणि एक होण्यासाठी बळ देत होती. साधारण वर्षभरापासून हे सारं सुरू होतं. आता काहीतरी निर्णय घेण्याचा क्षण जवळ येत होता. अनेकदा सगळं सोडून दूर कुठेतरी पळून जावं असं तिनं सुचवलं होतं. पण इच्छा असूनही तो घाबरत असल्याने त्याची हिम्मत होत नव्हती. एकदा आपण एकत्र आलो की सगळेजण मान्य करतील, असा विश्‍वास ती त्याला देत होती. अर्थात तसे होण्याची शक्‍यताही होती. याबाबत त्यांनी दोघांच्या ओळखीच्या एका मित्राचा सल्ला घेतला. त्यानेही त्यांनी दोघांनी मिळून योग्य तो निर्णय घ्यावा असेच सांगितले.

अखेर एकेदिवशी दोघांनीही एकत्र येण्याची तारीख, वेळ, ठिकाण ठरवले. पुढचे पुढे पाहू असेही ठरले. ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले. ठरल्याप्रमाणे काही वेळाने त्याच ठिकाणी मित्रही मदतीसाठी आला. इथपर्यंतच ठरले होते. पण आता पुढे काय? मात्र मित्राने अलिकडेच घेतलेल्या फ्लॅटमध्ये त्यांची सोय केली होती. अर्थात तो फ्लॅट दुसऱ्या शहरात होता. त्याने प्रवासाची तिकिटेही बुक केली होती. शिवाय एक-दोन दिवसांनी तो त्यांना भेटायलाही जाणार होता. दोघांचा प्रवास सुरू झाला. आता ते आनंदीत झाले होते. पण तरीही परिणामांची चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. अशी सारी अवस्था असतानाच प्रवास संपलाही. ते ठरलेल्या मित्राच्या फ्लॅटवर पोचले. इकडे दोघांच्याही घरी शोधाशोध सुरू झाली. मदत करणाऱ्या मित्राकडेही विचारणा झाली. मात्र त्याने फार काही माहिती दिली नाही. फक्त दोघेही सज्ञान आहेत, चिंता करू नका असे समजावून सांगितले. दरम्यान एक-दोन वेळा त्याला घरून फोन आला. त्यानेही त्रोटक उत्तरे देत वेळ मारून नेली. आता आपल्यासमोर काहीही पर्याय नाही. जगण्याला अर्थ नाही, अशा निष्कर्षापर्यंत दोघेही पोचले. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला. मग "तुझ्यासोबत मी ही येते‘ असे म्हणून ती ही तसाच विचार करू लागली. अशातच एक दिवस गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलीच्या घरचा मुलाला धमकीचा फोन आला. आता मात्र दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. आता ते प्रचंड अस्वस्थ झाले. दरम्यान ठरल्याप्रमाणे संध्याकाळी मित्र आला. त्याला त्यांनी घडलेला सारा प्रकार त्याला सांगितला. त्यावर त्याने दोघांनाही धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही यातून बाहेर पडण्याचा काहीही मार्ग नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मित्राने यातून बाहेर पडता येईल, असे सांगितले. त्यावर आपण विचार करू, ठरवू असा विश्‍वासही दिला. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर बराच वेळ शांतता पसरली.

काही वेळाने मित्र बोलू लागला, "चला, तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम असाल तर मी काहीही करू शकत नाही. आत्महत्या कशी करायची आहे, ते ठरवा. पण प्लिज इथे फ्लॅटमध्ये फास घेऊन किंवा विष घेऊन करू नका. मला अडचण होईल. दरीतून खाली उडी घ्यायची म्हटले तर दरी येथून खूप दूर आहे. पुन्हा तुम्हाला शोधताना घरच्यांची धावपळ होईल. त्यापेक्षा अगदी सोपा उपाय म्हणजे रेल्वेच्या रूळाखाली जाणे. रेल्वेचा रूळ येथून जवळच आहे. आणि हो प्लिज एक्‍सप्रेस खालीच झोपा. म्हणजे काही सेकंदात सगळं संपून जाईल.‘ हे सगळं ऐकून दोघे थरथर कापत होते. मात्र मित्र पुढे बोलतच होता. "एक्‍सप्रेस नसलेल्या रेल्वे सिग्ननला थांबण्याची शक्‍यता असते. त्यामुळे तुमच्या मरण्यालाही सिग्नल लागायचा आणि वाट पाहावी लागायची. माझ्याकडे एक्‍सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक आहे. ते तुम्हाला देतो. त्या वेळेप्रमाणे रूळावर झोपा. बाकी रेल्वेच करेल काय करायचे ते. काही क्षणांत तुम्ही मोकळे व्हाल.‘ आता दोघांच्याही डोळ्यांत पाणी येऊ लागले. मात्र मित्र थांबला नाही. तो बोलतच राहिला, "माझ्या झालेल्या खर्च देण्याची गरज नाही. फक्त काय करा तुम्ही मेल्याचे बातमी कोणाला-कोणाला कळववी लागेल याची यादी फोन क्रमांकासह द्या. म्हणजे अडचण नको. तुमची शेवटची इच्छा काय असेल ते तुमचे तुम्हीच पूर्ण करा. मला ती पूर्ण करणे जमेलच असे नाही. त्यामुळे मला हुरहूर नको. कधी निघताय ते ही सांगा?‘ एवढे बोलून तो मित्र थांबला.

साक्षात मृत्यु समोर दिसू लागल्याने दोघेही प्रचंड घाबरले. मित्राने एवढे सारे भयानक वर्णन केल्याने दोघेही ढसाढसा रडू लागले. मित्र मात्र शांतच होता. त्याने दोघांनाही खूप रडू दिले. पुढचा बराच वेळ रडण्याचाच कार्यक्रम सुरू होता. शेवटी दोघांनीही हात जोडले आणि मित्राला यावर काय पर्याय आहे हे सांगण्याची विनंती केली. त्यावर मित्राने धीर देत सांगितले, "जगात प्रत्येकाला अडचणी असतात रे. फक्त त्यावर मात करून खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक जणच अडचणींना कंटाळून मेला असता तर जगात कोणीच उरल नसतं. मात्र जगातील प्रत्येक गोष्टीवर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय असतोच. फक्त त्या दुसऱ्या पर्यायाचा थोडासा शोध घ्यायला हवा.‘ आणि पुढे मग तिघेही दुसऱ्या पर्यायावर विचार करू लागले.

5/02/2016

हो, आम्ही सरकारी नोकरदार!


हो, आम्ही सरकारी नोकरदार!

सरकारी कार्यालय. सकाळचे 11 वाजून गेलेले. एका सरकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी. "सर, झालं का माझं प्रमाणपत्र तयार?‘ एका तरुणाने एका कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. कर्मचारी कामात व्यग्र होता. बराच वेळ पॉज घेऊन त्याने उत्तर दिले, "चार वाजता या!‘ नाराज होत तरुणानं म्हणाला, "पण तुम्ही मला 11 वाजता सांगितलं होतं!‘ आता कर्मचारी चिडला. खड्या आवाजात म्हणाला, "अहो, साहेब नाहीत सही करायला. तसचं देऊ का?‘ तरुणही पेटला, "अहो, पण...‘ त्याला मध्येच थांबवत कर्मचारी म्हणाला, "अहो, आम्हाला काय स्वप्नं पडलं का साहेब आज उशिरा येणार आहेत ते?‘ आता कार्यालयातील बहुतेक लोक या दोघांकडेच पाहत होते. तरुणाला ओशाळल्यागत झालं. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत, आजूबाजूला न पाहता तो थेट बाहेर पडला.


संध्याकाळचे साधारण 5 वाजून गेले. सकाळी सांगितल्याप्रमाणे तरुण पुन्हा आला. त्याच कर्मचाऱ्याच्या टेबलापुढे उभा राहिला. आता कार्यालय अगदीच रिकामं झालं होतं. बहुतेक कर्मचारी निघण्याच्या तयारीत होते. सकाळी खड्या आवाजात बोललेला कर्मचारी मागे एका कॅबिनमध्ये दोन-तीन सहकाऱ्यांसोबत चहा पीत होता. त्याने तरुणाला कॅबिनमध्ये येण्याचा इशारा केला. तरुण गेला. तिथे त्याला बसायला खुर्ची देऊन चहासुद्धा देण्यात आला. हे सारं दृश्‍य पाहून तरुण आश्‍चर्यचकित झाला. ज्याने सकाळी आपल्यावर राग काढला तो बसायला खुर्ची आणि चहा देतो, हा विचार त्याला बेचैन करू लागला. दरम्यान कॅबिनमधील इतर सहकारी निघून गेले होते. आता फक्त तो कर्मचारी आणि तो तरुण. तरुणाच्या चेहऱ्यावरील भाव जाणून कर्मचारी बोलू लागला, "अरे, बाबा एवढं आश्‍चर्य वाटून घेऊ नको. आम्ही पण माणसच आहोत.‘ "पण मग सकाळी...‘ त्यावर कर्मचारी बोलू लागला, "अरे सकाळी-सकाळी कामाचा ताण असतो. गर्दी असते. शिवाय साहेब नव्हते. त्यामुळे जरा तोल सुटला. तसं तुझ्यावर रागावून मला पण फार वाईट वाटलं. त्यामुळेच तुला आता आत बोलावलं.‘

आता तरुण जरा खुलला. "सर, पण तुमचे साहेब अचानक गायब कसे?‘ आता कर्मचारीही खुल्या मनाने बोलू लागला, "चल, आता तुला दोन-चार गोष्टी सांगतोच. अरे, सरकारी नोकरी म्हणजे लय ताण असतो. नेतेमंडळी कधीही येतात. काहीही काम करायला सांगतात. तशाच एका प्रकारात साहेब होते आज सकाळी.‘ तरुणाची उत्सुकता जागृत झाली. "आणखी बरेच ताण म्हणजे?‘ कर्मचारी आता अधिक विस्ताराने सांगू लागला, "हे बघ, सरकारी नोकरदाराची इमेज आता फार वाईट करण्यात आली आहे. भ्रष्टाचारी, कामचुकार वगैरे वगैरे. पण मुळात आम्ही माणसं आहोत रे. आमच्या रोजीरोटीची आम्हालाही चिंता आहेच. लोकांच्या समोर चांगलं बोलायला हवं हे आम्ही समजू शकतो. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. पण जबाबदाऱ्या अनेक आहेत. दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसावं लागतं. शिवाय मध्ये-मध्ये ऑडिटर येतात. मग रात्र-रात्र ऑफिसातच. माणसांची मनं सांभाळण्यापेक्षा कागदपत्रे अधिक महत्वाची आहेत, असे संस्कारच होतात नकळतपणे सरकारी नोकरदारांवर. शिवाय आता माहिती अधिकार आला आहे. कोण कधी काय माहिती मागेल याचा नेम नाही. मग सगळी कामं सोडून ती माहिती वेळेत गोळा करावी लागते. त्यासाठी पुन्हा अतिरिक्त काम. मग नेहमीची कामं बाजूला. मग पुन्हा ताण. त्यातच एका जागी बसून स्थूलपणा वाढतो. त्यामुळे रोगांना आमंत्रण वगैरे वगैरे..‘

त्यानंतर काही वेळ शांतता पसरली. आता तरुणाने पुन्हा प्रश्‍न केला, "पण तुम्हाला नोकरीची खात्री असते. सहजासहजी कोणी तुम्हाला काढू शकत नाही आणि त्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांना कामाची फिकीर नसते.‘ त्यावर कर्मचारी बोलू लागला, "हे बघ नोकरीची खात्री होती. आता तशी नाही. कॉम्प्युटर शिकणं आम्हाला कंपलसरी केलं आहे. काही कार्यालयात तर कॉम्प्युटरमध्ये गती नसेल तर इन्क्रिमेंटही रोखण्यात आले आहे. अर्थात ती गरज आम्ही समजू शकतो. पण कामं वेळेत झाली नाहीत, अनावधनाने काही चुका झाल्या तर गडचिरोली, चंद्रपूर अशा दुर्गम भागात बदलीची भीती. आमच्यातील कित्येकजणांनी तर तिकडं बदली झाल्यामुळे राजीनामा दिला आहे. शिवाय सतत बदली. सतत साहेब बदलणार. सतत टेबल बदलणार. नवीन काम समजावून घ्यायचे. साहेबांच्या मर्जीत राहायचे. शिवाय नेते वगैरे. हे सगळं करावचं लागतं नाही तर प्रमोशन थांबण्याची भीती.‘

"पण मग तुमच्यापैकी बरेच लोकं कामचुकार असल्याचं म्हटलं जातं. त्याचं काय...?‘ तरुणाची जिज्ञासा चांगलीच जागृत झाली. "अरे बाबा, खाजगी क्षेत्रात पण कामचुकार लोकं आहेतच की. प्रत्येक ठिकाणी कामचुकार लोकं असतातच. इथं सरकारी किंवा खाजगी असा भेदभाव करता येत नाही. या प्रकाराला मानसिक प्रवृत्ती किंवा विकृती म्हणावे फार तर. नाही म्हणायला इतर क्षेत्रांपेक्षा सरकारी लोकांमध्ये हे प्रमाण कदाचित किंचित जास्त असेल. पण आता त्यामध्येही सुधारणा होत चालली आहे.‘

"आणि मग वरकमाईचं काय? खूप लोकं तर पेमेंटकडे पाहत नाहीत म्हणे!‘, तरुणानं नेमक्‍या वर्मावर बोट ठेवलं. कर्मचारी म्हणाला, "हे बघ, जरा बारकाईने पाहिलं तर भ्रष्टाचार किंवा वरकमाई सगळीकडेच असते. अर्थात पैसे खर्च करण्याचे अधिकार हातात आले, तर माणसाची बुद्धी फिरू शकते यात दुमत नाही. अर्थात ते चुकीचेच आहे. मात्र जे काही करायचं ते सगळं कायद्यात राहून आणि नियमात बसवूनच करावं लागतं. पण सरकारी नोकरीतील सगळीच लोकं तशी नसतात रे. यावर कोणी विश्‍वासच ठेवत नाही. एखाद-दुसऱ्यामुळे सगळे बदनाम होतात बघ‘ "पण मग हे सगळं नियमात बसून कसं काय करू शकतात ही सगळी मंडळी?‘ आता तरुण अधिक जाणून घेऊ लागला. त्यावर कर्मचारी स्पष्टीकरण देऊ लागला, "हे बघ आमच्याकडे पूर्वी बहुतेक कामे मॅन्युअल फाईल्समार्फत होत होती. आता जरा कॉम्प्युटरची पद्धत वेगळी आहे. त्यात फार कमी करप्शन होण्याची शक्‍यता आहे, बहुधा शून्य टक्केच. पण पूर्वी एखाद्या फाईलमधील एखाद्या नोटवर जर मान्य करावी लागणार रक्कम लिहिली असेल तर त्याखाली अंडरलाईन करून "अ‘ अशा अक्षराने त्या वाक्‍याचं महत्व अधोरेखित केलं जातं. त्यानंतर पैसे खाणारा एखादा व्यक्ती "अमान्य‘ असं लिहितो. आणि पुन्हा मान्य करण्यासाठी पैसे मिळाले की, "अ‘मान्य लिहून मान्यता मिळवून दिली जाते.‘ "अरे, बापरे! असं असतं का?‘, तरुणाला फार काही तरी जाणून घेतल्याचा प्रचंड आनंद झाला होता.

"जाऊ दे! खूप गोष्टी आहेत रे अजून सरकारी नोकरीत. पण गैरसमज करून घेऊ नकोस. मी अीाण माझ्यासारखी कित्येक कर्मचारी या साऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचा त्रास होऊ लागला की सकाळी तुला बोललो तसा प्रकार घडतो. एकदा काय झालं की आमच्या ऑफिसला मी एकटाच होतो. संध्याकाळी मीच ऑफिस बंद करू लागलो. तेवढ्यात एक माणूस त्याच्या लहान मुलाला घेऊन कोणतं तरी प्रमाणपत्र मागू लागला. प्रमाणपत्र तयार होतं. पण ऑफिसची वेळ संपली होती. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्याला उशीर झाला होता. ते दोघं इतके धावत आले होते की त्यांना धाप लागली होती. "साहेब प्रमाणपत्र‘ म्हटल्यावर मी त्यांना सहज विचारलं, आधी काय घेणार? "पाणी की प्रमाणपत्र‘ त्यावर त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी आलं रे. माणसांची सेवा करण्याशिवाय दुसरं काही नसतं, हे आम्हाला कळतं रे. पण सर्वांनी समजून घ्यायला हवं. आमच्यापैकी कित्येक जण त्यांच्यातील क्रिएटिव्ह माईंड वापरून खूप काही वेगळे प्रयोग करत असतात. त्यामुळे मला अभिमान वाटतो "हो, मी सरकारी नोकरदार‘ असं म्हणायला. चल, तुझं प्रमाणपत्र देतो. जायची वेळ झाली आहे.‘ असं म्हणून दोघंही कॅबिनबाहेर पडले. आता तरुणाच्या मनातील सरकारी कर्मचाऱ्याबद्दलची प्रतिमा मात्र बरीच बदलली होती.

(Courtesy: www.esakal.com)

5/01/2016

स्पर्धा परीक्षांचे जग

पेढ्याचा बॉक्‍स घेऊन तो अभ्यासिकेच्या दारात आला. संध्याकाळची वेळ असल्याने सगळा ग्रुप बाहेरच उभा होता. "हे घ्या पेढे. काल रिझल्ट लागला. गावाकडे होतो. मेन्सपण क्‍लिअर झालो. मुलाखत पण छान झाली. क्‍लास वनची पोस्ट मिळाली आहे‘, असा आनंद व्यक्त करत त्याने सर्वांना पेढे वाटले. त्याच्यासारखेच पेढे वाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले. "आणखी खूप मित्रांना पेढे द्यायचेत. येतो मी‘, असे म्हणत तो निघूनही गेला. अन्‌ ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली.


पहिला मित्र : लय कष्ट केले राव त्यानं. घरची परिस्थिती बेकार. लय अभ्यास करायचा राव. तीन-चार वेळा ट्राय करून आता यश मिळालयं. पेढे आणायलाबी त्याच्याकडं पैसे नव्हते. मित्रानच दिले.
दुसरा मित्र : आपण कधी द्यायचे असे पेढे?
(त्यावर ग्रुपमध्ये नव्याने आलेला तिसरा मित्र बोलू लागला)
तिसरा मित्र : अरे, सोप्प्या नाहीएत सरकारी परीक्षा...
(त्याला मध्येच थांबवत)
पहिला मित्र : सरकारी परीक्षा नाय रे स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्‍झाम म्हण!‘
तिसरा मित्र : तेच ते रे. बघा ना राव! बाहेर सगळी दुनिया एन्जॉय करत असती. अन्‌ आपण आपलं लायब्ररीतील बाकड्यावर बसून पुस्तकात डोकं खुपसायचं. लय बोअर होत राव. कधी कधी वाटतं सोडून द्यावं. पण नंतर अधिकारी झाल्यावर लय मजा. जिंदगीच बदलून जाणार म्हणून बसावं लागतं. पण त्या आधी वाचावं लागतं. सतत नवीन माहिती मिळवावी लागते. शिवाय पुस्तकांचा खर्च. घरी समजतही नाही काय करतय पोरगं. खर्चाचं तर लय टेन्शन कसाबसा भागवावा लागतो राव. लय मन मारावं लागतं.
(प्री क्‍लिअर झालेला मित्र)
चौथा मित्र : स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ग्रॅज्युएट होण्याइतकं सोप्पं नाहीए. ही परीक्षा पास झाल्यावर आपल्याला अधिकार मिळणार असतात. प्रतिष्ठा मिळणार असते. लोकांची सेवा करण्याची संधी मिळणार असते. ती काय अशी सहजासहजी मिळेल का?‘
तिसरा मित्र : मान्य आहे! सगळं भेटतं. पण तू सांग की पोलटिकल लिडरकडं काय असतं रे? त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी पट अधिक काहीतरी मिळत असतं. जिवंतपणी आणि त्यानंतरसुद्धा. कधी एखाद्या अधिकाऱ्याचा पुतळा उभारल्याचं कोणी ऐकलयं का?
पहिला मित्र : हे बघ नेत्यांनीही तिथपर्यंत पोचण्यासाठी कष्ट घेतलेले असतात की. आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर कष्ट घ्यावेच लागतात. पण असं परीक्षा देऊन सरळ सरकारात जाणं जास्त सोप्पं वाटतं मला. अन पुतळ्याचं जाऊ दे. सरकारदप्तरी तुझं कायम नाव लागतं ना अधिकारी म्हणून.
तिसरा मित्र : अरे मित्रा, एवढा अभ्यास करून तू ज्या सरकारी नोकरीत जाणार तिथं श्रेष्ठ कोण? तर तुुझ्याइतका अभ्यास न करता आलेला नेताच तुला काम सांगतो ना?
पहिला मित्र : अरे आपण पुस्तकातला अभ्यास करतो. नेते माणसांचा, समाजाचा थेट त्यांच्यात जाऊन अभ्यास करत असतात.
चौथा मित्र : हो आणि त्यांचं पद त्यांची प्रतिष्ठाही कायम टिकणारी नसते. पाच वर्षानंतर किंवा आधेमध्येच काय होईल काही सांगता येत नाही? आपण मात्र म्हातारे होईपर्यंत वरच्या पदावर जात राहतो.
दुसरा मित्र : पण तिथं वरवर जाण्यासाठी आधी इथं कष्ट घ्यावे लागतात. पुस्तक वाचावे लागतात. आई-वडिलांना आपण काय करत आहोत आणि काय होणार आहोत हे पटवून द्यावं लागतं.
तिसरा मित्र : होय, रे आमच्या गावाकडं तर लय ताप. "पोरगा मजा मारतोय जिल्ह्याला‘, "पोराचं लगीन करा‘, "पोरगं कामातून गेलं‘ असं म्हणून गावातली माणसं घरच्यांना डिवचतात.
चौथा मित्र : तीच गावातली माणसं तू अधिकारी झालास ना की तुझे सत्कार करायला चढाओढ लावतील एवढं लक्षात ठेव!
दुसरा मित्र : तेच ना त्याच्यामुळच इथं दिवसरात्र एक करून अभ्यास करावा लागतो.
तिसरा मित्र : त्यातच एखादी पोरगी लायब्ररीत अभ्यास करायला आली की संपलचं!
चौथा मित्र : तुझं लक्ष तिकडंच असतं. अभ्यासात नसतं. अशानं जिंदगी वाया जाईल. इथून असे कितीतरी पोरं गेल्याचं ऐकलयं मी.
पहिला मित्र : असं काही होऊ नये म्हणून दोनदा लायब्ररी बदलली मी. शेवटी काय असतं त्या मुलीपण स्वप्न घेऊन अभ्यास करायला येतात ना राव. अन्‌ एकदा अधिकारी झालो की बघा नेत्याच्या पोरीची स्थळे पण येतात चालून. नेते लोक हेरूनच असतात सरकारी लोकांना!
तिसरा मित्र : काय सांगतो?
पहिला मित्र : हो, अरे आज इथं लायब्ररीत डोकं खुपसणारं पोराला उद्या लय मागणी असते.
तिसरा मित्र : आयला, मग मी क्‍लास लावून थेट वर्षभरात अधिकारी होऊ का?
पहिला मित्र : क्‍लास लावायला पैसे बक्कळ लागतात. घरी मागायची लाज वाटते. आधीच ग्रॅज्युएटपर्यंत खूप खर्च केलेला असतो राव. अन्‌ क्‍लास लावला तरी अभ्यास चुकत नाही. मात्र अभ्यासाला जरा डायरेक्‍शन मिळते हे मात्र खरं.
तिसरा मित्र : मला तर पुस्तक कुठलं वाचावं ते बी कळत नाय. रोज काय ना काय येतं!
दुसरा मित्र : अरे, पुस्तक काढणाऱ्यांचा तो बिझनेसच आहे. जुन्या मित्रांना विचारून, सिलॅबस पाहून, दोन-चार दुकानात जाऊन आपणच ठरवायचं कोणतं पुस्तक वाचायचं ते.
तिसरा मित्र : अगदी बरोबर! अन्‌ अभ्यास कसा करायचा काय कळत नय राव?
दुसरा मित्र : अरे मित्रा, अभ्यास कसा करायचा याची काही जगात आदर्श पद्धत नाही. तर यश मिळालेल्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वाचण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या त्याप्रमाणे करायचा अभ्यास.
चौथा मित्र : शिवाय दिवसभराचं वेळापत्रकही जपावं लागतं. फक्त डोकं नव्हे तर शरीरही सुरू सुदृढ ठेवावं लागतं. व्यायामही आवश्‍यकच.
तिसरा मित्र : अरे लय समजतं राव तुमच्याकडून रोज. कष्टाला पर्याय नाही, यात वाद नाही. मला असचं सांगत राहा राव.
चौथा मित्र : हाच फायदा आहे लायब्ररीचा. फक्त अभ्यासासाठी जागा नाही, तर वातावरण आणि मित्रही भेटतात. त्यामुळेच तर कितीतरी श्रीमंतांची पोरं इथं येतात लायब्ररीत. चला, बस्सं झालं आजच्या पुरतं. जरा चहा घेऊन बसू वर.

‘चला, चला‘ म्हणत सगळेजण चहा घेण्यासाठी निघाले.
 

(Courtesy : www.esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...