6/29/2016

'...पैशाशिवाय काही खरं नाही?'

त्याने रूममेटकडून प्रवासापुरते पैसे उसने घेतले. तो त्याच्या एका बालमित्राच्या गावाला जायला निघाला. जाताना त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. मात्र, आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द त्याला ऊर्जा देत होती. अशा विचारातच मित्राचे गावही आले. ठरल्याप्रमाणे थेट तो मित्राच्या घरी पोचला. मित्राने, त्याच्या पत्नीने आणि लहानग्या मुलीनेही चांगले स्वागत केले. जेवण वगैरे झाले. "नको नको‘ म्हणत असताना मित्राने याला मुक्कामी राहण्यास भाग पाडले. रात्री दोघेही बाहेर समुद्रकिनारी फिरायला गेले. बालपणीच्या, शाळेतल्या खूप गप्पा सुरु झाल्या. "शाळेत मी शेवटच्या बाकावर बसायचो आणि तू पहिल्या बाकावर... तुम्ही सारे मागे बसलेल्यांना "ढ‘ समजायचा!...‘ मित्राने लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. एकाएकी लहानपणीच्या गोष्टीचा याने मोठेपणीशी संबंध जोडला. आणि नकळतच म्हणाला, "आणि आज आयुष्याच्या स्पर्धेत तू पहिल्या बाकावर आणि मी...‘ मित्राने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येत राहिला. 



"तू कशासाठी आला आहेस, हे ही मला माहित आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. पण सध्या करतोय काय तू?‘, मित्राने मर्मावर बोट ठेवले. त्यावर याने आपला जीवनग्रंथ वाचायला सुरुवात केली, "तुझे आतापर्यंत घेतलेले सगळे पैसे मी परत करणार आहे. पण मला खूप काही करायचं आहे... काहीतरी वेगळं करायचं आहे मला. तुला तर माहिती आहेच ना... शाळेत नंतर कॉलेजात मला नाटकाची आवड होती. मला मोठी बक्षिसेही मिळाली आहेत. त्यामुळेच ऍक्‍टिंगमध्ये मोठं काम करून "सेलिब्रिटी‘ व्हायचं आहे. त्यामुळेच सध्याची स्ट्रगल सेलिब्रेट करत आहे‘ पुन्हा काही काळ शांतता गेली. मित्राने समज देत म्हटले, "अरे, पण बघ तू खूप हुशार आहेस. ऍक्‍टिंगही चांगली आहे. पण बघ ना. स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल आणखी किती स्ट्रगल.. म्हणजे तू कर तुला काय करायचं आहे ते. पण मी बघ तुझ्याएवढाच पण सेटल झालो आहे. लग्न झाले आहे. "बाप‘पण झालो आहे. मात्र तुझं आयुष्य पुढं सरकत नाही याचं दु:ख आहे‘ त्यावर हा थोडासा अस्वस्थ होत म्हणाला, "प्लीज तुझ्याशी तुलना नको करूस माझी. पैसा कमावणं हे तुझं टार्गेट. माझं तसं नाही. मला आधी जगायचं आहे अन्‌ त्यानंतर... ऍक्‍टिंग माझा छंद आहे अन्‌ तोच मी जपणार आहे. तू बघ एक दिवस...‘ त्याला मध्येच थांबवत मित्र म्हणाला, "ते सगळं खरं आहे रे. पण बघ तू आता कुठेतरी किरकोळ नोकरी करून तुझ्यापुरते पैसे कमावतोस. मी तर आहेच रे तुला वेळोवेळी मदत करायला. पण ऍक्‍टिंगच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष जगात जगायला श्‍वासाश्‍वासाला पैसा लागतो. आता हेच बघ तू इथं आलास कुणाकडून तरी पैसे घेऊन. आता माझ्याकडून पैसे घेऊन घरी देणार... अन्‌ पुन्हा तुझी स्ट्रगल... ती थांबेलही एक दिवस, पण कधी? त्यामुळे एक सल्ला देतो ऐकायचा का नाही ते तुझं तू ठरव.‘ मागे समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. तरीही त्याचे कान मित्राच्या सल्ल्या ऐकण्याकडेच होते.

मित्र पुन्हा सुरु झाला, "हे बघ... छंद, पॅशन, स्ट्रगल, स्वप्ने हे सगळं बोलायला, काही काळ बोलायला आणि करायलाही बरं वाटतं. पण प्रत्यक्ष जीवनात पैसा लागतो. तुझ्याकडे पैसा नाही. तुझं वय होत चाललं आहे. चांगली नोकरी-धंदा नाही म्हणून पैसा नाही. नोकरी नाही म्हणून तुझ्या आयुष्यात छोकरी नाही. आणि त्यामुळे सगळी लाईफच स्टॉप झाली आहे तुझी. शिवाय महिन्याकाठी पैशाची चिंता आहेच. यार, सगळं कसं वेळेत व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पैसा लागतो. काय पण म्हण पण पैशाशिवाय जिंदगीला मजा नाय दोस्ता‘ एवढे बोलून मित्र थांबला. आता त्याचं लक्ष केवळ समुद्राकडेच होतं. पुन्हा बराच काळ केवळ समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. त्यापेक्षाही अधिक लाटा याच्या मनात उसळत होत्या.

काही वेळाने दोघेही घराकडे निघाले. ठरल्याप्रमाणे मित्राने मदत केली आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मित्र निघाला. "मदत करतोय म्हणून ऐकून घ्यावं लागतयं. शेवटी पैसा बोलतोच ना. कारण पैशाशिवाय काही खरं नाही‘, हा विचार काही केल्या त्याचा पाठलाग सोडत नव्हता.

(सौजन्य : www.esakal.com)

6/28/2016

ते देवीकडं काय मागतात?

देवीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. दररोज लाखो फक्तांची दूरपर्यंत रांग लागत होती. शहरातील संपन्न कुटुंबातील भक्त देवीच्या चरणी माथा टेकायला येत होते. "मोठ्या‘ भक्तांना पैसे देऊन देवीजवळ लवकर पोचण्याची व्यवस्था होती. आलिशान गाड्यांमधून उंची वस्त्रे घातलेले भक्त सहकुटुंब देवीकडे येत होते. देवीला नमस्कार करून मागणे मागून झाले की भक्तगण मंदिर परिसरातील जत्रा एन्जॉय करत होते. 

दुसरीकडे एक कुटुंब भक्तांच्या लेकरांना फुगे आणि खेळणे विकून एन्जॉय देत होते. फुगे विकणाऱ्यांमध्ये माय, बाप, त्यांची एक धाकटी मुलगी तर थोरला मुलगा असे कुटुंब होते. विक्रीच्या ठिकाणीच त्यांनी तात्पुरतं बस्तान बसवलं होतं. त्यालाच ते घर म्हणत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळी, रात्र जत्रेची साक्षीदार होत होती. आज शेवटचा असल्याने फुगे आणि खेळण्यांची चांगलीच विक्री झाली होती. त्यामुळे ते चार जण अगदी आनंदात होते. उद्या ही जागा रिकामी होणार होती. आणि मुक्काम हलणार होता. दरम्यान आजचा दिवस आनंदात जाणार होता. साधारण रात्री जेवणाच्या वेळी वडिलांनी दोन्ही पोरांना काही पैसे दिले आणि जत्रेतून काहीतरी खाऊन घेण्यास सांगितले. इतके दिवस फुगे विकून दुसऱ्यांना आनंद देणारे आज स्वत:च जत्रेचा आनंद घेणार होते. दोघेही खूप वेळ जत्रेत फिरले. दरम्यान त्यांनी खूप काही बघितलं. जेवण म्हणून भेळपुरीही खाल्ली. आता ते परत आपल्या मुक्कामाकडे आले. आई-वडिल दोघेही आवराआवर करत होते.उद्यापासून नवी "जत्रा‘ शोधायची होती. काही वेळातच खूप थकल्याने चौघेही घरात झोपायला आले. झोपताना धाकल्या मुलीने वडिलांना अनेक प्रश्‍न विचारले. "आपण उंद्या कुटं जाणार? कसं जाणार?‘ अशा प्रश्‍नांची बरसात करत राहिली. वडिलही तिच्या प्रश्‍नांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत राहिले. तिचे प्रश्‍न सुरुच राहिले. एका प्रश्‍नाने तिने वडिलांना निशब्द केले. ती म्हणाली, ‘आपल्याकडं जेवायला नाय त्यामुळं आपण कायबाय इकून पैकं कमावतो. त्याच्याकरता जत्रेत इतो. पण जत्रेत लई लोकं येतेत. छान छान कपडे घालून मोट-मोट्या गाड्यांमदे येतेत. त्यांच्या घरी पैकं असतील, त्यांच्या घरी खेळणीबी असतील. त्यांच्या घरी जेवायलाबी असल. तरीबी ते देवीकडे काय मागत असतील ओ?‘

(सौजन्य www.esakal.com)

6/27/2016

माय आपल्याला जेवण का नाय?

संध्याकाळचे चार वाजून गेले होते. समारंभासाठी हॉल छान सजला होता. नयनररम्य डेकोरेशन, कर्णमधूर सनईवादन, लज्जतदार जेवणाची तयारी आदी व्यवस्था चोख होती . विवाहसमारंभ वाटावा एवढा मोठा समारंभ होता. पण विवाह समारंभ नसून घरगुती कार्यक्रम होता. फुलांची आरास करण्यात आली. आजूबाजूच्या परिसरात फुलांचा सुगंध पसरू लागला. विद्युत रोषणाई, वाद्य वगैरेने वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली. कुटुंब गर्भश्रीमंत, हौशी आणि मोठे असल्याने खूप पाहुणे अपेक्षित होते. काही दिवसातच "त्या‘ कुटुंबात एका नव्या पाहुण्याचे अगमन होणार होते. "डोहाळजेवण‘ हे निमित्त होतं. खरं तर नव्या पाहुण्याच्या आगमनापूर्वी, त्याच्या स्वागताचा हा समारंभ होता. 

हॉलच्या शेजारच्या मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर एक कुटुंब राहात होतं. या कुटुंबात केवळ तीन जण होते. सहा-सात वर्षांचा चिमुकला, दोन वर्षांची चिमुकली आणि त्यांची आई. चिमुकलीला कडेवर घेऊन फुटपाथवर, शेजारच्या सिग्नलवर फिरून फिरून आई फुगे विकायची. त्यातून जे काही मिळायचं त्यावर दिवस पुढे जायचा. बऱ्याचदा काहीच मिळायचं नाही. दिवस मात्र पुढे निघून जायचा. मात्र कुटुंब भीक मागत नव्हतं किंवा चोरीही करत नव्हतं. जे मिळेल त्यात आनंदी होतं. हॉलमधील समारंभाच्या दिवशी मात्र बऱ्याचदा या चांगली फुगे विकली जायची. त्यामुळे तो दिवस आनंदात जायचा. आज समारंभ असल्याचं या कुटुंबाला माहित होतं. त्यामुळे आजचा दिवस आनंदातच जाईल अशी आशा सर्वांनाच होती. हॉलमध्ये ज्या कुटुंबाचा समारंभ होता त्या कुटुंबात आणि फुटपाथवरील कुटुंबात दोन टोकांचा फरक होता. फुटपाथवरील कुटुंबातील जिवंत माणसांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. तर हॉलमधील कुटुंबात अद्याप जन्मही न झालेल्या व्यक्तीचं स्वागत करण्यात येत होतं. त्याला छान छान पदार्थ खाऊ घालण्यात येत होते. 

फुटपाथवरील कुटुंबाने दुपारपासूनच मेहनतीने खूप फुगे फुगवून ठेवली होती. सोबत मदतीला चिमुकलाही होताच. वेगवेगळ्या रंगाची फुगे घेऊन हे कुटुंब हॉल जवळ आले. आत सगळी "मोठी‘ माणसे आहेत त्यामुळे आपली चांगली विक्री होईल, याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी विक्री सुरू केली. हॉलमधील समारंभ सुरू झाला. बराच वेळ झाला तरी एकही फुगा विकला गेला नाही. आलिशान चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये गर्दी करू लागल्या. त्यातून उंची वस्त्रे परिधान केलेली बायका आणि माणसे हातात काहीतरी "गिफ्ट‘ घेऊन हॉलच्या दिशेने जाऊ लागले. भोजनातील पदार्थांचा सुगंध बाहेरपर्यंत येत होता. त्यामुळे चिमुकल्याने खिडकीतून हॉलमध्ये डोकावून पाहिले. हॉलमधील बायका आणि माणसे "गिफ्ट‘ देत होते. गिफ्ट स्वीकारून त्यांना स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याचा आग्रह करण्यात येत होता. बुफे पद्धतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू होता. चिमुकल्याने नजर फिरवली तर त्याला अचानकच फुगे न विकण्याचे कारण समजले. हॉलमध्ये आधीच एक फुगेवाला येऊन फुगे देत होता. बहुधा त्या "श्रीमंत‘ कुटुंबाने त्याला कॉन्ट्रॅक्‍ट दिले होते. चिमुकल्याने ही गोष्ट आईला सांगितली. आई प्रचंड अस्वस्थ झाली. आता काय करायचे? संध्याकाळ उलटून गेली होती. फुगे विकले नव्हते. दुसरीकडे जाऊन फुगे विकण्याचे त्राण नव्हते. "माय, समदी लोकं येत्यात एका माणसाला कायबाय देतात अन्‌ त्यामुळं त्यांना खायला मिळतय. आपल्याकडचे सगळे फुगे दिऊ मंग आपल्यालाबी जेवाया मिळल!‘, चिमुकल्याने साधा सोपा उपाय सांगितला. 

चिमुकल्याने जग पाहिले नव्हते. त्याला तो उपाय साधा वाटत होता. न जन्मलेल्या बाळाला खाऊ घालणारी माणसं आपल्यालाही खायला देतील याबद्दल चिमुकल्याला शंकाच नव्हती. आईला मात्र हे सारं अशक्‍य वाटत होतं. पण तरीही दुसरा कोणताच पर्याय नसल्याने शेवटचा उपाय म्हणून ती तयार झाली. चिमुकल्याच्या मदतीने आईने सगळ्या फुग्यांचा एक गुच्छ तयार केला. हा गुच्छ फारच सुंदर दिसत होता. कडेवर चिमुकलीला आणि गुच्छ धरलेल्या चिमुकलेल्या हाताने धरून हे कुटुंब स्नेहभोजनाच्या आशेने हॉलमध्ये आले. थेट "गिफ्ट‘ स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे गेले. काळीकुट्ट शरीरयष्टी, मळकट-फाटकी वस्त्रे, विस्कटलेले केस आणि हातातील फुग्यांचा गुच्छ या साऱ्या अवस्थेमुळे ते हॉलमध्ये उठून दिसले. "गिफ्ट‘ स्वीकारणाऱ्याकडे व्यक्तीकडे फुग्यांचा गुच्छ देणार इतक्‍यात "अरे बाहेर काढा यांना‘ असे म्हणत दोन-चार जण पुढे आले. त्यांनी या सर्वांना ढकलत हॉलबाहेर आणू लागले. भोजनाचा आस्वाद घेणारी माणसं हा सारा प्रकार पाहात होती. फुटपाथवरील कुटुंबाचं जेवणाचं स्वप्न भंग पावलं. त्यांना पुन्हा आत न येण्याचा इशारा देऊन हॉलबाहेर काढण्यात आलं. एवढ्या साऱ्या गडबडीत सकाळपासून मेहनत घेऊन फुगविलेली फुगे हॉलमध्ये इतरत्र विखुरली.

हा सारा प्रकार पाहून चिमुकला म्हणाला, "माय आपण तर इतके फुगे दिले मंग आपल्याला जेवण का नाय दिलं?‘ आईकडे आता फुगेही नव्हते. पोटात अन्नही नव्हते. मुलांना खाऊ घालायलाही काही नव्हतं अन्‌ चिमुकल्याच्या प्रश्‍नाचे उत्तरही नव्हते.

(Courtesy: eSakal.com)

6/24/2016

माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी

तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा होता. त्याला जात, पात, धर्म, पंथ वगैरे वगैरे बंधने अजिबातच मान्य नव्हती. ही व्यवस्था बदलायला हवी, त्यासाठी आपण काहीतरी करायला हवे असे तो नेहमी म्हणायचा. त्याची मुलगी आता बोलू लागली होती. शाळेत जाऊ शकेल एवढी मोठी झाली होती. त्यामुळे तो आता चांगल्या शाळेची शोधाशोध करू लागला. शेवटी मराठी माध्यमाची एक अनुदानित शाळा त्याला पसंत पडली. तेथे त्याने प्रवेशासंबंधी चौकशी केली. शाळा नामवंत असल्याने प्रवेशासाठी मुलाखत वगैरे मोठी प्रक्रिया पार पाडावी लागणार होती. विशेष म्हणजे पालकांसह लहान मुलांचीही परीक्षा घेण्यात येणार होता. ही एवढी किचकट प्रक्रिया पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. लहान मुलाची परीक्षा म्हणजे तर अतिरेक वाटला. पण व्यवस्था अशी एकदम बदलता येणार नव्हती. तरीही त्याने जमेल तेथे बदल घडवायचा निश्‍चय केला. त्याने प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज घेतला. त्यानंतर काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे मुलाखत झाली. त्याची मुलगी त्यात पास झाली. आता त्याने प्रवेशासाठी अर्ज खरेदी केला.

घरी आल्यावर संध्याकाळी त्याने प्रवेश अर्ज भरायला सुरूवात केली. त्यावर नाव, गाव, पत्ता, संपर्क क्रमांक, पालकाचा व्यवसाय या सर्व माहितीसह जात आणि धर्म ही माहिती देणेही बंधनकारक होते. इतर सर्व माहिती भरून त्याने जात आणि धर्माबाबत काय माहिती द्यावी, याचा विचार केला. काही वेळाने त्याच्या डोक्‍यात प्रकाश पडला. त्याने लिहिले "जात माणूस आणि धर्म माणुसकी‘! मात्र त्याने दिलेल्या माहितीमुळे त्याची पत्नी थोडीशी नाराज झाली. ती म्हणाली, "अहो तुमच्या या अशा वागण्यामुळे आपल्या पोरीचे वर्ष वाया जाईल.‘ त्यावर त्याला अगदी स्फुरण चढले. तो म्हणाला, "मी दिलेली माहिती खरी आहे. त्यामुळे मला काहीही भीती नाही. आणि हो जर तिचे वर्ष वाया जाऊन हे जग माणूस नावाची जात आणि माणुसकी नावाचा धर्म मानणार असेल तर मला त्यात आनंदच आहे.‘ त्यावर ती म्हणाली, "तुमचं आपलं काहीतरीच...‘ त्यावर "बघू गं मी करतो बरोबर. तू काळजी करू नको‘ असे म्हणत त्याने पूर्णविराम दिला.

दुसऱ्या तो प्रवेश अर्ज घेऊन शाळेत गेला. शाळेतील संबंधितांनी त्याचा अर्ज दाखल करून घेतला. ते म्हणाले, "अहो तुमची कॅटॅगरी कोणती?‘ तो म्हणाला, "म्हणजे?‘ "अहो म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटॅगरीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे?‘ त्यावर तो निरागसपणे म्हणाला, "विद्यार्थ्यांच्या कॅटॅगरीत‘ त्यावर संबंधित व्यक्तीने चिडून मुलीचा प्रवेश अर्ज देत सांगितले, "तुम्ही मुख्याध्यापकांना भेटा‘ त्यामुळे तो मुख्याध्यापकांना भेटायला गेला. मुख्याध्यापकांना त्याने सांगितले, "सर, माझी जात माणूस आहे आणि माझा धर्म माणुसकी आहे. माझी माहिती खरी आहे आणि माझ्या मुलीला विद्यार्थ्यांच्या कॅटॅगरीत प्रवेश हवा आहे‘ त्यावर मुख्याध्यापकांनी त्याला समजावले. "हे बघा. तुमची जात आणि धर्म जाणून घेण्यात आम्हाला रस नाही. मात्र नियमांप्रमाणे आम्हाला ही सारी माहिती शासनाकडे सादर करावी लागते. त्यांनी जर काही त्रुटी काढली आणि तुमचा प्रवेश रद्द झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.‘ तो म्हणाला, "हरकत नाही‘ "ठीक आहे. मग तुम्ही तसे लिहून द्या‘ मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने लिहून दिले.

शाळा नियमितपणे सुरू झाली. आठ दिवसांनी मुख्याध्यापकांनी त्याला शाळेत बोलावून घेतले. तो आला. त्याच्या मुलीचा प्रवेश अर्ज दाखवत त्याने शासकीय अधिकाऱ्याने मारलेला शेरा दाखवला. त्यावर हा म्हणाला, "हे बघा मी हीच जात आणि हाच धर्म लिहिणार. आणि तो खोटा नाही. मी आता जाऊन या अधिकाऱ्याला भेटतो. "हा घ्या अर्ज. तुम्ही तुमच्या पातळीवर काय करायचे ते करा‘, असे म्हणत मुख्याध्यापकांनी विषय संपवला. तो थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात आला. अर्ज दाखवत त्याने सांगितले, "माझी जात आणि माझा धर्म हाच आहे‘ त्यावर अधिकारी म्हणाला, "हे बघा. रेकॉर्डला तुमच्या मुलीला कोणत्या कॅटॅगरीत प्रवेश देणार मग? प्रत्येक कॅटॅगरीत काही जागांचा कोटा असतो. तुमच्या या अशा माहितीमुळे अडचण निर्माण होईल.‘ त्यावर तो म्हणाला, "हे बघा तुम्हाला ज्या कॅटॅगरीत वाटेल, त्या कॅटॅगरीत प्रवेश द्या. मात्र मी माझी माहिती बदलणार नाही.‘ "ठीकाय. तसे लिहून द्या. मी आमच्या वरिष्ठांना विचारतो आणि कळवतो. पण फार काही फरक पडणार नाही. जोपर्यंत ही व्यवस्था आहे, तोपर्यंत तुम्हाला तुमची जात आणि तुमचा धर्म लिहावाच लागेल. बदल असा एका रात्रीतून होत नसतो हो. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागतील‘, असे म्हणत अधिकाऱ्याने त्याची समजूत काढली.

काही दिवसांनी त्याला समजले की वरिष्ठांनाही ही नाविन्यपूर्ण कृती आवडली आणि त्याच्या मुलीचा किमान एका वर्षासाठी तरी प्रवेश निश्‍चित झाला. त्याच्या मुलीची जात ठरली माणूस आणि धर्म ठरला माणुसकी. आता मुलगी सर्वांना सांगू शकणार होती माझी जात माणूस आहे आणि माझा धर्म माणुसकी. त्याने अखेरपर्यंत हीच जात आणि हाच धर्म लिहिण्याचे ठरवले. अगदी कितीही अडचणी आल्या तरी...

(Courtesy: eSakal.com)

6/23/2016

इतक्‍या पगारात कसे भागेल?

तो चांगल्या कुटुंबातील होता. शिक्षणही चांगले झाले होते. एक चांगली कायम नोकरीही त्याला होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. तो त्याचे आई आणि वडील असे त्यांचे कुटुंब होते. वडिल खाजगी सेवेतून निवृत्त झाले होते. तर आई गृहिणी होती. तो आई-वडिलांच्या आज्ञेत होता. आता त्याचे लग्नाचे वय झाले होते. वधू संशोधन जोरात सुरू होते. 

"मुलाला सरकारी नोकरी हवी‘, "मुलाला एवढाच पगार हवा‘ अशा प्रकारच्या मुलीकडून आलेल्या प्रतिसादामुळे आई-वडिल त्रस्त होते. तरीही आई-वडिल प्रयत्न सुरूच ठेवत होते. एकदा एका मुलीच्या आईला फोन केला. मुलाची माहिती वगैरे सांगितली. शेवटी चर्चा मुख्य प्रश्‍नापर्यंत पोचली. "मुलाला पॅकेज किती?‘ मुलीच्या आईने प्रश्‍न केला. त्यावर याच्या आईने पगाराचा आकडा सांगितला. "इतक्‍या पगारात कसे भागेल हो?‘, असे खडे बोल सुनावत मुलीच्या आईने अप्रत्यक्षपणे नकार कळविला. त्यावर काय उत्तर द्यावे हे याच्या आईला समजलेच नाही. तिने कशीबशी चर्चा थांबविली आणि फोन ठेवला. मात्र त्यानंतर आई-वडिल पुन्हा व्यथित झाले. हा सारा प्रकार घडताना मुलगा समोरच होता. तो ही जरा व्यथित झाला आणि आपल्या मित्राला भेटायला बाहेर पडला. 

मित्र नोकरी करत नव्हता. काहीतरी उलाढाली करून चांगले पैसे कमवायचा. घडलेला सारा प्रकार त्याने मित्राला सांगितला. मित्र म्हणाला, "अरे पेमेंट, इन्कम, पैसा, रुपया तर मेन पॉईंट आहे ना!‘ त्यावर हा म्हणाला, "अरे पण सगळं पैशातच मोजणार का?‘ मित्राने सरळ सांगितले, "तू काही म्हण पण या जगात एखाद्याची इमेज पैशात मोजण्याची या जगाची पद्धत आहे.‘ त्यावर प्रचंड त्रागा करत हा म्हणाला, "अरे पण ही असली तुलना करणं बरोबर आहे का?‘ "अगदीच बरोबर नाही. ते मलाही समजतयं. पण भावा, पैसे कमवायला अक्कल लागते. हुशारी नाही. आणि आपलं जग अक्कल पाहतं. हुशारी नाही. तुला राग येऊ देऊ नको. पण तुझं लग्नाचं वय झालं आहे. धडपड करून तू खूप पैसे कमावू शकला असतास ना? पण नाही तू तुझ्या कोषात राहिलास. रिस्क घेतली नाहीस. म्हणून तू धडपडच करणेही विसरलास ना! म्हणून ही अशी अवस्था.‘

त्यावर याने नाराजी व्यक्त करत म्हटले, "चल, तू ही आमच्यावरच...‘ त्याला थांबवत मित्र म्हणाला, "तुला राग येऊ देऊ नको. पण तुझ्याबद्दल मनातून वाटतं म्हणून बोलतो. शेवटी तुला राग आला तरी चालेल पण वास्तवाची जाणीव करून देणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. अजूनही प्रयत्न कर ना! मी आहे. सोडून दे कोष. शोध नवी नोकरी. नाहीतर काहीतरी बिझनेस जमतो का बघ?‘ "पण भीती वाटते रे!‘ मित्र शांतपणे म्हणाला, "हे बघ फार काय होईल तुला नुकसान होईल किंवा एखादवेळी कमी पैसे मिळतील, नोकरी मिळणार नाही. पण तू मरणार तर नाहीस ना? दोन वेळचे अन्न खाशील एवढे कमावशील ना!‘ याच्या डोक्‍यात ट्युब चमकल्यासारखे झाले. हा म्हणाला, "ठीक आहे. काहीतरी हालचाल करायलाच हवी.‘ "एस्स. क्‍या बात हैं। जगायचं असेल तर हालचाल करावीच लागते. पैसे कमवावेच लागतात. रिस्क घ्यावीच लागते. त्यानंतर तर जगायला अर्थ प्राप्त होतो‘, मित्राने पाठीवर हात ठेऊन लढण्याची प्रेरणा दिली.

(Courtesy: eSakal.com)

6/22/2016

हे अपंगत्व व्यवस्थेचे!

साधारण सकाळचे अकरा वाजत होते. पंचायत समितीचे कार्यालयही उघडले होते. आज आठवड्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. कार्यालय तसे छोटेच होते. बहुतेकजण रजेवर असल्याने कार्यालयात केवळ एकच महिला कर्मचारी उपस्थित होती. ती तिच्या टेबलावर कामात व्यस्त होती. काही वेळातच तेथे एक 20-22 वर्षांचा तरुण आला. त्याला पंचायतीकडून एक प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्याने मुदतीत अर्जदेखील केला होता. एका अधिकाऱ्याने त्याला आज बोलावले होते. मात्र संबंधित अधिकारी आज जागेवर नव्हता. त्यामुळे तो या महिला कर्मचाऱ्याकडे वळला. तिच्याकडे त्याने प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. महिलेने जवळचे कपाट दाखवत ‘थोडा वेळ थांबा. आमचा शिपाई येईल. तो या कपाटातून काढून देईल तुमचे प्रमाणपत्र‘ असे म्हणत त्याला थांबायला सांगितले. तरुण समोरच्या लाकडी बाकावर वाट पाहात बसला. 

कार्यालयात आता थोडीशी गर्दी होत होती. महिला कर्मचारी कामात व्यग्र होती. माणसे येत होती. महिला माहिती देत होती. लोक अर्ज वगैरे करत होते. निघून जात होते. अशातच जवळपास 20-25 मिनिटे गेली. मात्र महिला कर्मचारी जागेवरून हलली नाही. आता तरुण फार त्रस्त होत म्हणाला, "अहो कधी येणार तुमचा शिपाई?‘ त्यावर "आतापर्यंत यायला पाहिजे. येईल 5-10 मिनिटांत. तुम्ही थांबा.‘ त्यावर तरुण संयम बाळगत वाट पाहू लागला. हळूहळू कार्यालयात आणखी लोकं येऊ लागली. काम करून निघून जाऊ लागली. तरुण हा सारा प्रकार पाहत होता. याच्यानंतर आलेल्या काही लोकांची कामे याच्या आधी होत असल्याचे याला वाटू लागले. आता त्याला कार्यालयात येऊन जवळपास अर्धा तास झाला होता. तो त्रागा करत महिलेकडे येऊन म्हणाला, "अहो, मॅडम अर्धा तास झाला आहे. अजून का नाही येत तुमचा शिपाई?, असा त्रागा तो तरुण करू लागला. त्यावर "आता येईलच तो. तुम्ही थांबा. नाहीतर जरा वेळाने या‘, महिला कर्मचाऱ्याने शांतपणे सांगितले. 

त्यावर काहीच उत्तर न देता तरुण बाहेर पडला. चहाच्या टपरीवर त्याने कटींगची ऑर्डर दिली. टपरीवर थोडी गर्दी होती. झक्कासपैकी चहा घेऊन त्याने डोके शांत ठेवायचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या मनात राग होताच. ‘आपली व्यवस्था अशी का?‘ असा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तरुण रक्त असल्याने यावरची उपाय योजनेवर तो विचार करू लागला. तेवढ्यात "गोड बोलून आपली कामं करायची भाऊ‘ असा शेजारच्या दोन माणसांचा संवाद त्याच्या कानावर पडला. त्यामुळे याने गोड बोलूनच काम करून घ्यायचं ठरवलं. तो पुन्हा कार्यालयात आला. अतिशय नम्रपणाने त्याने महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. त्यावर पुन्हा त्याला थांबण्याचा सल्ला मिळाला. या सर्व प्रकाराला आता तास झाला होता. यामुळे आता तरुणाचा संयम सुटत चालला होता. कार्यालयातही आता फार कोणीच नव्हते. सगळेजण आपले काम करून निघून गेले होते. काही वेळाने तो तरुण महिला कर्मचाऱ्याकडे येऊन म्हणाला, "अहो, आम्हाला काही दुसरे काम नाही का? तुम्हाला आमच्या वेळेची काही किंमतच नाही. तुम्ही देता प्रमाणपत्र की मी स्वत:च घेऊ? आणि या इथल्या कपाटातून तुम्हाला माझा कागद काढता येत नाही का?‘ तरुण रागामुळे चांगलाच पेटला होता. आता महिला कर्मचाऱ्याला जागेवरून उठून कपाटातून प्रमाणपत्र काढून देण्याशिवाय पर्याय नव्हता. महिला कर्मचारी काहीच बोलली नाही. तिने शांतपणाने आपल्या समोरील फाईल बंद केली. पुढे काही क्षण काहीच घडले नाही. आजूबाजूला कोणीच नव्हते. एकाएकी ती महिला कर्मचारी खाली वाकल्यासारखे तरुणाला वाटले. आता तर तिचे डोके वगैरे काहीच दिसत नव्हते. 

मात्र तरुणाला पुढे जे दिसले त्यामुळे गेल्या तासाभरातील घडामोडींबद्दल प्रचंड पश्‍चाताप होऊ लागला. महिला खुर्चीतून खाली उतरली होती. कपाटाच्या दिशेने पुढे जात होती. फरक फक्त एवढाच होता की महिलेला दोन्ही पाय नसल्याने ती घसरत घसरत कपाटाच्या दिशेने पुढे सरकत होती. तिची गती अगदी संथ होती. घसरत पुढे जात असल्याने तिला थोडा त्रासही होत होता. निष्ठेने आपले काम करणाऱ्या महिलेबद्दल आपण विनाकारण संशय घेतला म्हणून तरुणाला पश्‍चाताप होत होता. तर कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे व्यवस्थेल्या आलेल्या अपंगत्वावर पर्याय शोधत होता.

(Courtesy: eSakal.com)

6/21/2016

भाड्याचे घर

"आठ हजार रुपये भाडे. तीस हजार रुपये डिपॉझीट. सोसायटी, लाईटबिल वेगळे. कमिनश दोन महिन्यांचे भाडे‘, भाड्याचे घर दाखवत इस्टेट एजंटाने व्यवहाराच्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्या दोघांनी ठीक आहे, म्हणत "काही कमी जास्त वगैरे..‘ अशी विचारणा केली. त्यावर "कमीत कमी आहे बघा, एरिया पॉश आहे. सोसायटी चांगली आहे चिंताच करू नका.‘ असे सांगितले. त्यावर दोन दिवसांनी कळविण्याचे आश्‍वासन देत, पती-पत्नीने एजंटाचा निरोप घेतला. त्या दोघांचा विवाह होऊन दोनच वर्षे झाली होती. आई-बाबा गावाकडे राहात होते. त्यांना लवकरच इकडे आणायचे होते. त्यासाठी जरा मोठे घराचा शोध घेण्यात येत होता. पती-पत्नी दोघेही नोकरी करत होते. सध्या ते वन रूम किचनमध्ये राहात होते. एजंटाने दाखविलेले घर वन बीएचके होते. पुरेसे होते. दोघेही समजूतदार होते. नोकरी करत होते. परस्परांना समजून घेत होते.

दोघेही घरी पोचले. एजंटाच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला. "अरे, आठ हजार भाडे. सोसायटी आणि लाईटबिल म्हणजे जवळपास दहा हजाराच्या घरात जाणार रे आणि पुन्हा अकरा महिन्यांनी टांगती तलवार. घर बदलायला परत पैसे...‘, पत्नीने व्यथा मांडली. "अगं आपण एकटेच आहोत का जगात असे? अनेक लोकं राहातात की भाड्याने आणि घेऊ एक ना एक दिवस आपले स्वत:चे घर, हळूहळू पैसे जमा करून.‘, पतीने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुन्हा पत्नी बोलू लागली, "पण बघ ना आता दोन वर्षांत आपण दोन वेळा घर बदलले. त्यातच मालकांना सोसायटीचे पैसे कमी आणि भाडेकरूंना जास्त. आपण काय माणसं नाहीत का? का आपण जास्त जागा वापरतो?‘ त्यावर पती पुन्हा समजावू लागला, "अगं, तो व्यवहाराचा प्रश्‍न आहे. त्यावर तोडगा निघायला हवा. पण सध्या तरी आपल्याला जे आहे ते स्वीकारायला हवयं ना! आणि या जगात आपणच एकटे भाड्याने राहातो का? खूप जण राहतात की. कॉट बेसीस, पेईंग गेस्ट, रूम करून, हॉस्टेलमध्ये किती जण जगतात..‘ त्यावर पत्नीने मुद्यालाच हात घातला, "ते राहु दे रे.. पण गावाकडची जमीन विकून आपण थेट स्वत:च्या घरातच राहायला जाऊ शकतो ना रे. काही तरी घे की निर्णय‘ आता पती थोडासा अस्वस्थ दिसला. "अगं, तुला तर माहित आहेच मी आतापर्यंत आई-बाबांकडून काहीच घेतलेले नाही. त्यांनी मोठ्या कष्टाने थोडीशी जमीन घेतली आहे. शिवाय तोच त्यांचा आधार आहे. त्यांचं मन इकडं रमत नाही. बघू मागे पुढे. तोपर्यंत आपले पैसेही जमतील. घेऊ की घर‘, एवढ्यावर त्यांचा संवाद थांबला. तसेच एजंटाने दाखविलेल्या घरात जाण्याचा निर्णय झाला.

घर बदलून आता आठ दिवस झाले. घरातील सामान अद्यापही व्यवस्थित लागलेले नव्हते. रविवारचा दिवस होता. "भाड्याने राहाणे म्हणजे गणपतीच्या देखाव्यासारखे असते. दरवर्षी हलवावा लागतो‘, साऱ्या कामामुळे थकल्याने तिने नवऱ्यापुढे व्यथा मांडली. "खरं आहे गं! पण आज आपल्याला नीट सामान लावावे लागेल. आज आई-बाबा येणार आहेत. संध्याकाळपर्यंत पोचतील‘ त्याने आठवण करून दिली. दोघे मिळून घरातील सामान आवरू लागले.

संध्याकाळ झाली. ठरल्याप्रमाणे आई-बाबा आले. संध्याकाळचे जेवणे उरकून सारे जण गप्पा मारू लागले. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर बाबा म्हणाले, "सूनबाई, जरा नीट ऐक. लय त्रास व्हतो तुमाला या भाड्याच्या खोलीत. होतो तुम्हाला या भाड्याच्या घरात. सारखं सामान हलवायचा. मी बी नोकरीत असताना असच व्हायचं. 2-3 वर्षांनी सारखी बदली व्हायची. शेवटी रिटायर झालो अन्‌ गाव गाठलं. पण तुमाला हा त्रास नकू म्हणून आमी एक निर्णय घेतलाय‘ सगळे जण शांतपणे आणि उत्सुकतेने ऐकत होते. "अरे, आम्ही आता म्हतारे झालो. आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचा बी आधार नाय. गावाकडं एकटे राहताना मन नाय रमत. सारखं तुमची चिंता. शिवाय तुमालाबी स्वत:चं घर हवंच की. गावातल्या एकाला बोललोय. जमीन काढतोय. चांगला भाव येतोय. जे काय पैसे येतील ते घरासाठी उपयोगी पडतील. जे काय उरतील त्याचं लोन करू. आम्हालाही तुमच्याजवळच राहाता येईल, कायम! आता या घरातून जायचं ते थेट स्वत:च्या घरात‘ बाबांनी बोलणे संपवले. थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली.

(Courtesy: eSakal.com)

6/20/2016

अल्लाह की मर्जी।

तो त्याच्या कुटुंबीयांसह एका मोठ्या शहरात राहात होता. त्याचं छोटं किराणा मालाचं दुकान होतं. त्याचं कुटुंब अगदी सर्वांशी मिळून मिसळून राहात होतं. परिस्थिती फार संपन्न नसली तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होतं. घरात तो, त्याची बीबी, एक मुलगा आणि एक मुलगी, अम्मीजान असे सारे होते. वडील काही वर्षांपूर्वी अल्लाहला प्यारे झाले होते. वडील अतिशय प्रामाणिक आणि प्रतिष्ठेचं जीवन जगले होते. भुकेलेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्याला पाणी द्यावे, "माणूस‘ म्हणून प्रत्येकाला शक्‍य ती मदत करावी, असे संस्कार वडिलांनी मुलावर केले होते. मुलगाही वडिलांप्रमाणेच होता. मुलाने आपल्या दोन बहिणींच्या निकाहची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे त्याच्यावर कर्ज होते. तरीही अल्लाहकडे जाण्यापूर्वी काही वर्षे आधी त्याने वडिलांच्या हज यात्रेची इच्छा पूर्ण केली होती. "बेटे की मदत से हज यात्रा पुरी हुई और हमारी जिंदगी सफल हुई‘, असे वडिल सर्वांना अभिमानाने सांगत. तसेच "जब पैसे इकठ्ठा होंगे, तब तुम जिंदगी में एक बार जरूर हज को जाना‘, असे त्यांनी मुलाला सांगितले होते. मुलानेही वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवून शेजाऱ्यांपासून ते दुकानातील कामगारापर्यंत सर्वांच्या मनात त्याने आदराचे स्थान मिळविले होते. मुलांवरही चांगले संस्कार करत होता. या साऱ्या घटनेला आता बरीच वर्षे झाली होती. रमजानला याच्या घरी सर्वांना निमंत्रण असे, तर गणेशोत्सव, नवरात्रीसारख्या समारंभात याचे सारे कुटुंबीय उत्साहाने सहभागी होत. त्याला आता वडिलांचा संदेश आठवत होता. हजच्या यात्रेला जावे, असे मनोमन वाटत होते. कर्ज हळूहळू फिटत होते. कर्जासह घरातला सारा खर्च भागवून गेल्या काही वर्षांपासून तो हजसाठी थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवत होता. घरात उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने तो हजसाठीचे पैसे कधी जमा होतील, असा विचार करत कधी कधी अस्वस्थ व्हायचा. मात्र "अल्लाह का बुलावा आना चाहिए बेटा‘, असे अम्मीजान त्याला सतत धीर द्यायची.

आता बरीचशी रक्कम जमा झाली होती. या वर्षी हजला जाता येईल, असे त्याला मनोमन वाटू लागले. एकेदिवशी सकाळी सकाळीच तो अर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात दुकानातील एक कामगार धावत धावत आला आणि दुकानातील दुसऱ्या एका कामगाराचा रात्री घरी जाताना मोठा अपघात झाल्याचे सांगितले. कोणताही विचार न करता हा धावत धावत रुग्णालयात त्याला भेटायला गेला. डोक्‍याला मार लागल्याने मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. कामगाराकडे थोडे फार पैसे होते; पण ते पुरेसे नव्हते. त्याने कामगाराच्या घरच्या सर्वांना मोठा आधार देत कोणताही विचार न करता थेट हजसाठी जमा केलेले सगळे पैसे मदत म्हणून दिले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कामगाराचे कुटुंबीय त्याच्या पाया पडू लागले. कामगाराला मदत केल्याने त्याच्या मनाला एक प्रकारची शांती मिळाली होती. या सर्व प्रकारात हजसाठी जमा केलेले सगळेच पैसे खर्च झाले.

त्यानंतर काही दिवसांनी कामगार कामावर आला, "आप मेरे लिए अल्लाह हैं। आपकी पाई-पाई चुका दूँगा‘, असे म्हणत त्याने चक्क पाय धरले. त्यावर "ये तो मेरी ड्युटी थी। जब तुम्हारे पास बहुत पैसे आएँगे, तब लौटा दे ना। क्‍या जल्दी है।‘ असे म्हणत त्याने त्याची समजूत काढली. घरी आल्यावर त्याने अम्मीजानला ही गोष्ट सांगितली. अम्मीजान म्हणाली, "बेटा, खुदा का बुलावा आना चाहिए और उस बंदे को तुमने जो मदत की है, वो भी कोई छोटी बात नहीं है। पैसे तो क्‍या फिरसे इकठ्ठा कर सकते हो।‘

त्याने पुन्हा पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आता निकाहचे कर्ज फिटल्याने पूर्वीपेक्षा लवकर रक्कम जमा झाली. एकदिवशी तो अर्जाच्या प्रक्रियेसाठी निघाला. त्या दिवशी मात्र त्याला काहीसे वेगळे वाटत होते. मागच्या वेळचा प्रसंग त्याला आठवला. तसे पुन्हा होणार नाही ना, अशी शंकाही मनात आली. तरीही चांगला विचार करत तो निघाला. खिशात पैसे होते, "यंदा हज अदा होणार‘ या आनंदात तो होता. जाताना मनात विचार येत होता. "पिछली बार अल्लाह की मर्जी के मुताबिक मैंने इन्सान की मदद की, फिर इस दुनिया में कितने लोग होंगे की जिनको पैसों की सक्त जरूरी होगी। शायद किसी की जान बच सकेगी, कोई पढ सकेगा, किसीके पेट की भूख मिट सकेगी, शायद किसी का निकाह हो सकेगा, इस बार तो मैं खुद की मर्जी से इन्सान की मदद कर सकता हूँ। शायद अब्बा की तरह मेरे भी नसीब में भी हज बेटे की मदद से होगी।‘ एवढा विचार करून तो प्रचंड अस्वस्थ झाला.

एका बाजूला अल्लाह आणि दुसऱ्या बाजूला इन्सान. त्याच्या मनाची प्रचंड घालमेल होत होती. अशा अवस्थेतच त्याने माघरी फिरण्याचा निर्णय घेतला. तो घरी आला. अब्बीजानला मनातला विचार बोलून दाखवला, "बेटा अल्लाह का बुलावा आना चाहिए। तुम्हे अगर दिलोजान से लगता है, कि तुमने जमा किए हुए पैसे से किसीको मदद करनी है, तो कर दो मदद! आखिरकार तुम्हारे मन में ऐसी बात आना ये भी खुदा की मर्जी होगी। और इन्सान की खिदमत भी अल्लाह के खिदमत से छोटी बात नहीं।‘ असे म्हणत तिने पोराला समजावले. त्यानेही जमवलेले पैसे गरजवंताला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने अम्मीजानला मिठी मारली आणि दोघांचेही डोळे भरून आले. तो मनातल्या मनात म्हणत होता, "शायद, अल्लाह ने हज इसी तरह पूरा कर लिया है।‘

(Courtesy: eSakal.com)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...