11/30/2016

हो, मी 500 रुपयांची नोट बोलत आहे!

हो, हो! मी 500 रुपयांची एक नोट बोलत आहे. काही तासांपूर्वी मोठी किंमत असलेल्या माझी आता किंमत शून्य आहे. हा, माझे सारे नातेवाईक वगैरे एकत्र करून रद्दीमध्ये मला काही भाव येईल. पण पूर्वीसारखा नाही. जाऊ द्या! आपल्याकडे किंमत नसलेल्या सजीवाचं किंवा निर्जिवाचं ऐकून घेण्याची प्रथा नाही. पण तरीही मला तुम्हाला शेवटचं काही सांगायचं आहे. असं समजा की मला फाशी द्यायला नेले जात आहे आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.

दिवाळीत झालेल्या खर्चाचा ताण काढण्यासाठी माझा शेवटचा मालक काल त्याच्या मित्रासोबत हॉटेलत आला होता. हो, माझ्या हयातभर माझे मालक दररोज बदलत होते. कधी-कधी तर दिवसातून 10-10 मालकही बघितले आहेत मी. आता मात्र मला कधीच मालक नसेल. असो. तर हॉटेलमध्ये असलेल्या गल्ल्यातून मी थेट मालकाच्या खिशापर्यंत पोचले. मालकाने माझ्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकला. मला उलटून पालटून निरखून बघितले. माझं सौंदर्य, माझी सत्यता तपासून पाहिली आणि मी त्याच्या पाकिटात विराजमान झाले. तिथे मला माझ्यापेक्षा माझी दूरची भावकी असलेल्या 100 रुपयांच्या तीन नोटा भेटल्या. तिच्याकडे मी हीन कटाक्ष टाकला आणि पाकिटात आरामत पडून राहिले.

त्यानंतर मी मालकाच्या घरी आले. मालकाने घरी आल्यावर पाकिट त्याच्या हॉलमधील टीव्हीसमोरील एका काचेच्या टेबलावर ठेवले. त्यातून मी हळून बाहेर डोकावले. तर मला थेट टीव्ही दिसत होता. माझ्यासोबत असलेल्या 100 रुपयांच्या नोटांना मात्र मी टीव्ही बघू दिला नाही. त्यांच्या छाताडावर उभी राहून मी टीव्ही पाहत होते. तेवढ्यात मालकाचा एक मुलगा आला आणि तो बाबांकडे पैसे मागू लागला. मला माहित होतेच की माझी किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे मी एका 100 च्या नोटेकडे "चल, निघ इथून‘ अशा आविर्भावात पाहू लागले. काही वेळाने ती नोट गेलीदेखील. माझा गर्व आणि आत्मविश्‍वास आणखी बळावला. तेवढ्यात मालकाने बातम्यांचे चॅनेल लावले. "आज रात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा बंद‘ अशी घोषणा करण्यात आली आणि माझ्या काळजात धस्सं झालं. एखाद्या दहशतवाद्याने निष्पाप नागरिकाच्या गळ्यावर सुरी ठेवल्यावर त्याला जे वाटत असेल त्यापेक्षा अधिक वेदना मला झाल्या. मी जिवंत होते. पण मला किंमत नव्हती. एका क्षणात माझी किंमत जवळपास शून्य झाली होती. ज्यांच्या छाताडावर मी पाय रोवून उभी राहिली होते त्यांनी आता माझ्या पायाला धक्का पोचविला होता. मात्र त्या आधीच मी कोसळले होते. काही वेळाने मालकाने मला आणि त्याच्या घरातील माझ्या काही सख्या नातेवाईकांना सोबत घेतले. आता मी मालकाच्या खिशात 1000 रुपयांसोबत होते. आम्ही बोलू लागलो. "संपलं सारं. आता आपली किंमत शून्य‘, असे सारे वातावरण खिशात होते. आमच्याकडे एक जीर्ण झालेल्या नोटेने निर्वाणीचे भाषण सुरू केले. "फक्त माणसाचचं काही खरं नाही तर नोटांचंही काही खरं नाही. हे जग नश्‍वर आहे. आता आपण रद्दीत जाणार‘, त्याच्या या भाषणामुळे खिशात प्रचंड निराशा, अस्वस्थता आली. मालक कोठे घेऊन जात आहे काही कळेनासे झाले. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी आम्हाला मालकाने दाखविले. पण आमच्याकडे पाहून आनंदित होणारे चेहरे आता तोंड पाडत होते. एवढे वाईट झालो होतो का आम्ही? एका क्षणात आमची किंमत शून्य झाली होती. जगाची नश्‍वरता आम्हाला जाणवत होती.

काही वेळाने मला पेट्रोलपंप दिसला. पण तेथेही मालकाचा पंपवाल्याशी वाद झाला आणि मी पुन्हा खिशातच राहिले. त्यानंतर मालक कोणत्यातरी रांगेत थांबला. तेथे बराच वेळ थांबल्यानंतर मालकाने आम्हा सर्वांना एकत्र केले आणि एका मशिनमध्ये कोंबले. तेथे आमच्या कितीतरी पिढ्या एकत्र दिसत होत्या. ज्यांनी हजारो मालक पाहिले होते. कितीतरी कामे केली होती. कितीतरी लॉकअप पाहिली होती. बऱ्याच जणांना पुजेचा मान मिळाला होता. तर आमच्यापैकी काही जण तर "नवजात‘ होती. आताच काही काळापूर्वी त्यांनी जन्म घेतला. किती नश्‍वर जग हे. मला हे सारं सारं असह्य होत होतं. शेवटी माझा तोल गेला आणि मी रडू लागले. संपलं सारं. आमच्यामध्ये आमच्या नातेवाईकांची भरच पडत होती. अगदी चेंगराचेंगरी व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या मशिनमध्ये. आता मात्र यातून आपली सुटका नाही. किंमत संपली आहे जगण्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे आता मशिनमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात शेवट झाला असता तरीही आम्हाला त्याचे दु:ख उरलेले नव्हते. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही ज्यांच्या कामी आलो होतो त्यांनी आम्हाला या मशिनच्या काळकोठडीत डांबून ठेवण्याचा शिक्षा दिली होती. एकेकाळी आम्हाला कपाटामध्ये, पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये अगदी जीवापड जपण्यात आले होते यावर आमचाच विश्‍वास बसत नव्हता. तेवढ्यात मशिनच्या बाहेरून आवाज आला "बाबा मी एक नोट माझ्या पुस्तकात नाहीतर वहीत ठेवू का? आठवण म्हणून?‘ बहुतेक एक छोटा मुलगा त्याच्या बाबांकडे विनंती करत होता. त्यामुळे आमची जगण्याची, आम्हाला जोपासण्याची किरकोळ आशा पल्लवित झाली होती.

शेवटी माणसांनो एकच सांगणं आहे. छान जगा, जगू द्या. दुसऱ्यांना किंमत द्या. कारण तुमची किंमत कधी शून्य होईल हे सांगता येत नाही. बस्स, बाकी काही नाही...!

11/29/2016

नोटा बदलल्या, विचार बदलूया!

मोदी सरकारने 8 नोव्हेंबरच्या रात्री चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केले. सगळीकडे हल्लकल्लोळ माजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पेट्रोल पंप, रुग्णालये, औषध विक्रेते अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असेही जाहीर करण्यात आले. मात्र जुन्या नोटा रद्द झाल्याची बातमी झळकल्याने बहुतेक अतिमहत्वाच्या ठिकाणी या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बॅंका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देण्यास सुरुवात करण्यात आली. शिवाय एटीएम्समधून रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरूच होती. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर आठ दिवसांनीही गर्दी म्हणावी तेवढी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. त्या ‘आमचं काय चुकलं?‘ असा सहज विचार मनात येणं साहजिकच आहे. त्या अनुषंगाने खालील मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात.
  1. मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच सर्व एटीएममध्ये गर्दी झाली. एरवी एकाच वेळी हजारो रुपये काढणाऱया नागरिकांनी त्यादिवशी शंभर रुपयांच्या नोटा मिळाव्यात म्हणून चारशे रूपये अनेकदा काढले. आवश्‍यकता नसताना शिकल्या-सवरल्या लोकांनी भीतीपोटी शंभर रुपयांच्या नोटा काढून घेतल्या; तेथे जरा श्रद्धा-सबुरी दाखविली असती तर?
  2. दुसऱ्या दिवशीपासून नागरिक बॅंका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करू लागले. काही ठिकाणी एकच व्यक्ती वेगवेगळ्या बॅंका, पोस्ट कार्यालयातून दोन-दोन वेळा नोटा बदलून घेत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. एकावेळी चार हजार रुपये बदलून मिळणार होते. खरोखरच एकाच दिवशी आठ हजार रुपये रोखीची गरज इतक्या साऱयांना एकाच वेळी होती का?
  3. जेथे "कॅशलेस‘ व्यवहार अवघड असतात, अशा ठिकाणी म्हणजेच प्रवासामध्ये, भाजीपाला खरेदी करताना, किराणा दुकाने आदी ठिकाणांसाठी रोख रकमेची कमतरता होती. त्याचवेळी अशीही काही ठिकाणे होती, जेथे ग्राहकांना भाजीविक्रेते, किराणा दुकानदार उधारीने देण्यास तयार होते. अशा परिस्थितीतही उधार घेण्यापेक्षा रांगेत थांबून नोटा बदलण्यावरच लोक भर देत होते. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा उधारी घेता आली असती ना!
  4. नोटा बंद झाल्याने काळा पैसाधारक सैरभैर झाले. त्यामुळेच ते काळा पैसा पांढरा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या शोधात आहेत. शिकले-सवरलेले लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी टक्‍क्‍यांची भाषा बोलत आहेत. बऱ्याच ठिकाणी हेच लोक बॅंकेत रक्कम टाकण्यासाठी गर्दी करत आहेत. जमा केल्यानंतर पुन्हा दररोज जेवढे शक्‍य आहेत तेवढे पैसे काढून परतावा देत आहेत. हे चित्र सगळीकडेच असेल असे नाही. मात्र, बहुतेक ठिकाणी अशा चर्चा आणि चित्र दिसत आहेच ना. ते टाळता आले नसते का?
  5. पेट्रोलपंपांवर गर्दी झाली. त्यामुळे पेट्रोलपंपावर सुट्याच्या प्रश्‍न निर्माण झाला. नोटा बंद झाल्याने आहेत त्या नोटा लोक खपवू लागले. त्यासाठी गाडीत नको तेवढे पेट्रोल टाकण्यात आले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी झाली आणि त्यांनीही नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे पंपांवर गर्दी वाढली आणि खरोखरच काहीतरी वेगळे घडत आहे असे लोकांना वाटू लागले आणि भीतीचे वातावरण पसरले. हे टाळता आले नसते का?
वरील प्रमुख बाबी सोडल्या तर या 8 नोव्हेंबरपूर्वी देखील आपण काही चुका केल्या आहेत. जरा व्यापक दृष्टिने पाहिले तर त्या ही आजच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे दिसून येईल.
  1. सरकारी खात्यांमध्ये नेहमीच आपली काही कामे असतात. अशा ठिकाणी आपण कोणावर तरी विश्‍वास ठेवतो आणि "पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत हो!‘ असे आपण गृहित धरतो. तेथे मग काम लवकर होण्यासाठी आपण पन्नास रुपयांपासून लाच देऊ लागतो. जी लाच आपण रोखीने देतो ती व्यवहारात दाखविली जात नाही. घेणाराही तो तशी व्यवहारात दाखवत नाही. त्यामुळे सरकार मोदींचे असो किंवा अन्य कोणाचेही काळा पैशाची निर्मिती होतेच. आपण वेळीच ही अशी लाच देणे टाळले असते तर सरकारला नोटा बंद करण्याची आणि आपल्याला आज रांगेत उभे राहण्याची गरज पडली असती का?
  2. आपण दुचाकी, चारचाकी चालवताना आपण बऱ्याचदा नियमांचा भंग करतो. त्यावेळी समोर कोपऱ्यात कोठेतरी "मामा‘ उभा असतो. तो अचानक आपल्यासमोर येतो आणि दंड मागू लागतो. मग आपण गयावया करू लागतो आणि 100-200 ची लाच देऊन वेळ मारून देण्याचा प्रयत्न करतो. तो ही पैसा कोठे व्यवहारात दाखविला जात नाही आणि तो काळा होता. हे टाळता आले नसते का?
  3. आपल्या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असतात. त्यावेळी नेते आपल्या सोसायटीला मोफत रंगरंगोटी करून देण्याचे आमीष दाखवतात. आपण त्यास अगदी सहजपणे बळी पडतो. सोसायटीला रंगरंगोटी होते. आपल्याला त्यासाठी खर्चाचे भागीदार व्हावे लागत नाही. तो खर्च व्यवहारात दाखविला जात नाही. ते पैसे कोणी दिले? कोठून दिले? कसे दिले? याचा विचार आपण कधी करतो का?
राहिला प्रश्‍न दोन हजार रुपयांच्या नोटेचा...तर ज्यावेळी एखादा नवा पूलाचे बांधकाम काढले जाते, त्यावेळी त्या पुलाच्या शेजारून पर्यायी रस्ता किंवा पूल उपलब्ध करून देण्यात येतो. पर्यायी रस्ता हाच हमरस्ता नसतो, हे भान आपल्यालाही राहिलेले नाही.

येथे काळा पैसा निर्मिती होण्यामागच्या काही प्रातिनिधीक कारणांचा उल्लेख केला आहे. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. मात्र कळत-नकळतपणे आपण या काळा पैसा निर्मितीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असतोच. खरं तर विद्यमान सरकारऐवजी पूर्वीच्या सरकारनेच नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. अर्थात गर्दी झालीच असती. पण आतापर्यंत आपण आर्थिक उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोचलो असतो. असो. मोदी सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि त्यातून काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ होतील ते येणाऱ्या काळात दिसून येतीलच.

बॅंकेतील गर्दी कमी होत आहे. लोकांना त्रास होत आहे. तरीही लोक आनंदित आहेत. "हे ही दिवस जातील‘ आणि आनंदाचे, सर्वसामान्यांच्या समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येतील. पर्यायाने आपला भारत देश परमवैभवाकडे भरारी घेऊ शकेल. त्यामुळे या आणि यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णयांना आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यास सज्ज होणे काळाची गरज आहे.

11/28/2016

पोटात आनंद तर असतोच की वो सायब

नेहमीप्रमाणे तो त्याच्या दुचाकीवरून घरी निघाला. रोजच्या पेक्षा आज त्याला जास्तच उशीर झाला होता. रात्रीचे 10 वाजून गेले होते. रोजच्या कटकटी, घरातील समस्या या साऱ्या गोष्टींचा विचार करत तो गाडी पुढे नेत होता. काही अंतर गेल्यावर त्याला एका बसस्टॉपवर विशीतला पोरगा हात करताना दिसला. गाडी येत असल्याचे पाहून त्या पोराने ‘सायब, सायब जरा पुडंपर्यंत सोडता का?‘ अशी आर्त हाक मारली. पोराच्या हाकेमध्ये त्याला सच्चाई जाणवली. त्यामुळे गाडी वेगात असूनही त्याने त्याच्याजवळ थांबवली. ‘सायब जरा पुडंपर्यंत सोडता का?‘ पोरानं पुन्हा अदबीने विचारलं. पोरगा फारच निरागस दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव होते. रंगाने थोडा काळा असला तरीही दिलानं गोरा वाटत होता. त्यामुळे त्याने फार काही चौकशी न करता ‘चल बस‘ म्हणत त्याला लिफ्ट दिली. 
गाडी पुढे जात होती. याच्या मनातील विचारचक्र सुरूच होते. सहजच त्याने पोराला विचारले, ‘का, रे आता काय बस नव्हती का तुला?‘ तो बोलू लागला, ‘सायब, बशी काय रातभर आहेत. पर आईशप्पथ सांगतो सायब माझ्याकडं आज रुपया सुद्धा नाही.‘ आता चालकाला त्याच्या स्टोरीत रस वाटू लागला. ‘काय करतोस काय तू?,‘ असं विचारत चालकाने त्याला बोलते केले. 
‘इथंच हाय सायब एका हाटेलात कामाला. ताटं, बशा उचलायला,‘ पोऱ्या आता खुलून बोलू लागला. ‘आज मालक पगार देणार व्हता. पर न्हाय दिला त्यानं. मंग काय त्या आशेवर व्हतो. सकाळच्याला हाटेलात जाण्यापुरतेच पैसे व्हते खिशात. यायचं कसं?,‘ गाडी पुढे जात होती आणि पोरा आपली स्टोरी सांगत होता. ‘मग मी थांबलो नसतो तर काय केलं असतंस?,‘ पुन्हा त्यानं प्रश्‍न केला. ‘सायब, तसं कवा कवा मी चालत बी जातुया घरला. पर आज पोटात अन्न बी नाय त्यामुळं...‘ पोराने खुलासा केला. 
‘कुठं राहतोस कुठं तू?‘ 
‘सायब हिथून पाच-धा मिन्टात ईल माझं घर. घर कसलं सायब मी आलोया परराज्यातनं. हिथं गावातले काही पोरं-पोरं मिळून काम-धंदा मिळतूय का बगायला आलो व्हतो. लई नई, सा महिने झाल्यात यीऊन. धा-बारा पोरं हायेत.‘ पोराने सविस्तर माहिती दिली. 
‘बरं मग आता जेवायचं काय?‘ त्याने मुख्य मुद्याला हात घातला. ‘सायब, आता काय खोलीवर पोरांनी काय शिलकीत ठेवलं असलं तर खायचं, नायतर गिलासभर पाणी पिऊन पडलं. हे बी दिस जातील सायब,‘ पोरानं व्यथाच मांडली. याच्या पोटात धस्सं झालं. ‘पोटात अन्न नसताना तुला कसं काय सुचतं रे एवढं बोलायला,‘ याने सहज त्याला डिवचले. 
‘सायब पैसा काय आज हाय उद्या नाय. अन पोटात अन्न नसलं म्हणून काय झालं? पोटात आनंद तर असतोच की वो सायब. त्यो कुठं जातोय. माणसानं कसं कायम आनंदात, मजेत जगावं. समजा आता इथनं आपल्या म्हणजे तुमच्या गाडीला कोण धडकलं तर संपलाच ना खेळ!‘ पोराच्या या वाक्‍याने याच्या पोटात धस्स झालं. तेवढ्यात स्पीड ब्रेकर आल्यानं त्यानं कच्चकन ब्रेक दाबलं. 
पुढे काही काळ फक्त गाडी पुढे जाऊ लागली. कोणी काहीच बोललं नाही. तेवढ्यात पोरानं ‘सायब थांबवा थांबवा‘ म्हटलं. गाडी थांबली. याने खिशात हात घातला. 30-40 रुपये सुट्टे होते. ‘जा. जाता जाता काहीतरी खाऊन घे,‘ असे म्हणत त्याने पैसे त्याच्या हातात ठेवले.  ‘सायब म्या कुणाकडून कधी घेत नाय पर आता लय नड हाय... तुमचा पत्ता द्या. मी परत करतो तुमाला पगार झाला की,‘ त्याने अतिशय उत्साहाने सांगितले. 
‘जा रे! 30-40 रुपयाचं काय असतं?‘ त्याने पोराला सांगितले. पोराने त्याच्या पायाला स्पर्श केला अन्‌ ‘सायब देव भेटला बगा तुमच्या रुपानं‘ असे म्हणत मागे न पाहता निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहात याने मनातल्या मनात विचार केला. पोटात अन्न नाही. पगार नाही. घर नाही. खिशात रुपया पण नाही. तरीही केवढा उत्साह! प्रत्येक क्षण जगण्याचा मंत्रच जणू काही त्या बारक्‍या पोरानं दिला होता.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...