12/24/2016

शनिवारची बोधकथा: अडचणींवर मात करण्याची गोष्ट

एक व्यक्ती काही गाढवांना घेऊन दुसऱ्या गावाला निघाला होता. प्रवास दूरचा होता. दिवस उन्हाळ्याचे होते. गाढवेही बरीच होती. त्यामध्ये काही वृद्ध गाढवेही होती. प्रवासादरम्यान ते एका मोकळ्या रानात पोचले. तेथून जात असताना शेजारीच एक कोरडी विहिर होती. पुढे जाताना एक वृद्ध गाढव पाय घसरून रिकाम्या विहिरीत पडले. विहीर खूप खोल होती. त्यामध्ये अजिबात पाणी नव्हते. त्या व्यक्तीने गाढवाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. जवळ असलेल्या साहित्याने त्याला वर काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही.

शेवटी त्या व्यक्तीने आजूबाजूच्या शेतातील लोकांना मदतीसाठी याचना केली. लोक आले. त्यांनीही पुरेसे प्रयत्न केले. पण गाढव वर येऊ शकले नाही. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या लोकांनी गाढवाला येथेच सोडून पुढे जाण्याचा सल्ला दिला. जाण्यापूर्वी वृद्ध गाढवावर माती टाकून त्याला या विहिरीतच गाडण्याचा सल्लाही त्यांनी दिली. सगळेजण निघून जाऊ लागले. तो व्यक्ती विचार करू लागला. हा गाढव वृद्ध झालेला आहे. शिवाय हा मेल्यावर याला गाडायचा प्रश्‍न आहेच. त्यामुळे येथेच याच्या अंगावर माती टाकून त्याला गाडून पुढे जाण्याचा निर्णय त्या व्यक्तीने घेतला. त्यासाठी त्याने निघून जात असलेल्या लोकांना माती टाकण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. लोकही मदत करण्यास तयार झाले. सर्वजण मिळून विहिरीत माती टाकण्याचा प्रयत्न करू लागले. पाहता पाहता विहिरीत माती पडू लागली.
विहिरीत अडकलेल्या गाढवाला वर काय होत आहे हे काहीच समजत नव्हते. "इतका वेळ आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारे आता आपल्या अंगावर माती का टाकत आहेत?', असा विचार ते करू लागले. पण त्याला काही कळले नाही. पण वरून अंगावर पडणारी माती ते झटकून तिच्यावर उभे राहू लागले. बघता बघता अशी खूप माती जमा पडू लागली. मातीचा ढीग तयार होऊ लागला. गाढव त्या ढिगावर चढू लागले. माती वाढत होती. ढीगही उंच होत होता. गाढवही अंग झटकून त्यावर चढत होते. खूप वेळानंतर ढीग एवढा मोठा झाला की ढीगावर उभे राहून गाढव सहजपणे विहिरीच्या बाहेर आले.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

12/17/2016

शनिवारची बोधकथा: प्रेम, समाधान आणि धन

'आईसाहेब, आम्हाला जेवण मिळेल का?', शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या तीन दिव्यपुरुषांनी एका घरात आवाज दिला. आतून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने या तिघांकडे पाहिले. आणि हे कोणीतरी दिव्यपुरुष असल्याचे समजल्याने तिने तिघांनाही आत येण्याची विनंती. केली. त्यावर तिघांपैकी एक जण म्हणाला, "माते, हा धन, हा समाधान आणि मी प्रेम. एकावेळी आमच्यापैकी केवळ एकजणच तुझ्या घरात प्रवेश करू शकतो. तू सांग आमच्यापैकी कोणी सर्वांत आधी आत यावे?' त्यावर "जरा आत जाऊन विचार करून सांगते' असे म्हणत ती स्त्री आत गेली.

तिने मुलाला विचारले "कोणाला आधी प्रवेश द्यावा?' त्यावर धनाला आधी प्रवेश द्यावा असे त्याने सांगितले. त्यानंतर तिने पतीला विचारले. तर त्याने "समाधानाला आत घे' असे सांगितले. हे ऐकून स्त्री बाहेर आली. आणि तिने प्रेमाला आत येण्याची विनंती केली. प्रेमाने आभार मानले आणि तो आत प्रवेश करू लागला. त्याने आत प्रवेश केल्याबरोबर धन आणि समाधानही आत येऊ लागले.

स्त्री म्हणाली, 'एकावेळी केवळ एकच जण येऊ शकतो असेच तुम्ही म्हणालात ना? मी तर केवळ प्रेमालाच आत येण्यास सांगितले आहे. मग तुम्ही आत का येत आहात?' त्यावर समाधानाने उत्तर दिले, "माते तू जर मला किंवा प्रेमाला बोलावले असते तर केवळ आम्ही एकटेच आलो असतो. मात्र तू प्रेमाला बोलावलेस. म्हणून आम्ही त्याच्या मागे आलो. ज्याठिकाणी प्रेम असते, त्याठिकाणी समाधान आणि धन असतेच.'

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

12/12/2016

'आयटी'ची नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा!

एखाद्या तरुणाला आयुष्याबद्दल जेवढ्या अपेक्षा असाव्यात सर्वसाधारण तेवढ्या अपेक्षांसह तो दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून पुण्यात आला. पुरेशा प्रयत्नानंतर त्याला चांगली नोकरीही मिळाली. नोकरीत जमही बसला. त्याला कविता करायची आवड होती. छोट्या-मोठ्या ठिकाणी कविता प्रसिद्धही होत होत्या. मात्र मनात कुठेतरी ‘आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो‘ हा विचार करून त्याला ‘आपण काहीच का करत नाही?‘ असा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. तशातच एक-दोन महिन्यांनी तो आई-वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे जात होता. भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील बहुतेक भागात बारा महिने अठरा काळ बाया-पोरांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असंच एक भयाण दृश्‍य त्याच्या संवेदनशील मनावर खोल परिणाम करून गेलं. त्याच काळात भीषण दुष्काळामुळे गावातील काही शेतकरी आत्महत्या करत होते. काही कुटुंबे घर-दार, जनावरे सारं काही सोडून काम शोधण्यासाठी गाव सोडतानाही त्याला दिसली. ती कुटुंबे जिथे जाणार होती तिथे कदाचित त्यांना पोटाची खळगी भरेल एवढे उत्पन्न मिळणारही होतं. पण दारिद्य्राचा हा नकोसा वाटणारा वारसा शिक्षणाअभावी पुढील पिढीकडे जाणार होता. त्याने ठरवलं या लोकांच्या मुलांना शिकवायचं. मोठं करायचं. स्वत:च्या पायावर उभं करायचं आणि ते त्यानं केलंही...

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्‍यातील अशोक बाबाराव देशमाने. वय वर्षे 27. शिक्षण एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स. पुण्यात लठ्ठ पगाराची आयटीतील नोकरी. मात्र मनातील खदखद स्वस्थ बसू देत नव्हती. बाबा आमटेंचे साहित्य बालपणापासून वाचल्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. सुदैवाने पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाश आमटेंची भेट झाली. अखेर त्याने ठरवले आपण काहीतरी करायचे. काहीतरी ठरवलं की संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं, सारी सृष्टी मदतीला धावून येते.. त्याप्रमाणे त्याच्याही मदतीला त्याचा ‘भवताल‘ धावून आला. अखेर त्याने कामाची दिशाही ठरवली. आत्महत्याग्रस्त, स्थलांतरित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा, त्यांना ‘मोठं‘ करण्याचा खडतर मार्ग त्याने पत्करला. त्यासाठी ‘
स्नेहवन‘ नावाच्या संस्थेची नोंदणी केली. हे सारं करत असताना नोकरी सुरूच होती. मग शोध घेतला मराठवाड्यातील गरजवंत विद्यार्थ्यांचा. विद्यार्थीही मिळाले. आता जागेचा प्रश्‍न होता. भोसरीतील अनिल कोठे या सद्‌गृहस्थानं कोणतीही भाडे अगर अनामत रक्कम न घेता 1000 स्क्वेअर फुटाची बांधलेली प्रशस्त जागा वापरण्यास उपलब्ध करून दिली. शिवाय मित्रांची मदत सुरूच होती.

आता त्याचा मार्ग तयार झाला होता. मग त्याने याच कामात आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. घरीही तो निर्णय बोलून दाखवला. त्याच्या घरात धार्मिक वातावरण असल्याने, वडिल संतसाहित्याने प्रेरित असल्याने हा खडतर कठीण मार्ग त्यांनाही आवडला. अर्थात एवढा मोठा पसारा वाढवताना त्यांना थोडीशी चिंता होतीच मात्र सुपुत्रावर विश्‍वास दाखवत त्यांनीही तोच मार्ग पत्करला. भोसरीतील ‘स्नेहवन‘मध्ये त्याच्याकडे आता 9 ते 14 वयोगटातील 17 मुलांचे पालकत्व आहे. त्यामध्ये बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातील मुलांचाही समावेश आहे. काही मुलांच्या कुटुंबाची तर एवढी बिकट अवस्था होती की त्यांच्या आई-वडिलांना ‘स्नेहवन‘मध्ये मुलाला सोडवायला येण्यासही प्रवास खर्चासाठीही पैसे नव्हते. अशावेळी अशोकने पोस्टाने पैसे पाठवून मुलांना ‘जवळ‘ केले. या मुलांना भोसरीतीलच शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. आपला मुलगा चांगल्या माणसाच्या हाती लागला याचा आनंद त्या मुलांच्या पालकांना आहे.

अखेर काही महिन्यांपूर्वीच त्याने ‘आयटी‘तील लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. जेवढा पगार त्याला महिन्याला मिळत होता त्यापेक्षा अधिक खर्च त्याला सध्या महिन्याला येत आहे. तरीही आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत, त्यामुळे समाजही या मुलांसाठी काहीतरी करेल याच आशेवर त्याने एवढा सारा पसारा वाढवला आहे. त्याची आई सत्यभामा या दररोज एवढ्या साऱ्या मुलांचा चहा-दूध, नाष्टा, जेवण करतात. वडील मुलांना सांभाळतात. त्यांचा अभ्यास घेतात. अशोककडे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी कौशल्य आहे. कोणी गाणे छान गातो. कोणी उलटी कोलांटउडी मारतो. कोणी स्वयंपाक छान करतो. तर कोणी छान-छान चित्रे काढतो. प्रत्येकातील प्रतिभेला आणि कलेला जागृत ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात या मुलांनी टिकाव धरावा म्हणून तो सर्वांना संगणक प्रशिक्षण देतो. त्यासाठी समाजातीलच एका बांधवाने त्याला संगणक भेट दिले आहेत. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी आहे त्या जागेतच त्याने जमेल तेवढी पुस्तके जमवून ग्रंथालय तयार केले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्याही ठरलेली आहे. मुलेही अगदी आनंदाने राहतात. शिकतात. ‘आयुष्यात काहीही झाले तरी खोटे बोलायचे नाही‘ हा संदेश तो सर्वांच्या मनावर रुजविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सोबत राहत असल्याने कधी एखाद्याचे भांडण झाले तर संध्याकाळी ते प्रामाणिकपणे अशोककडे त्याची कबुली देऊन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. सर्व मुले ज्या शाळेत जातात तेथील शिक्षकांनाही या मुलांच्या हुशारीचे कौतुक वाटते. अशोक वडील बाबाराव यांनी मुलांना 30 पर्यंत पाढे शिकविले. त्याही पुढे जाऊन एका मुलाने तर 32 पर्यंतचे पाढे तयार केले आणि ते पाठही केले आहेत. ज्यावेळी ‘हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी‘, अशी प्रार्थना ज्यावेळी ‘स्नेहवन‘मधील विष्णू नावाचा बारा वर्षांचा मुलगा म्हणतो त्यावेळी संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात कालवाकलव झाल्याशिवाय राहत नाही.

या सर्व विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च 50-60 हजार रुपये असल्याने अशोकला मदतीसाठी सतत धावाधाव करावी लागते. सोबत आई-वडील मुलांकडे लक्ष देतात. अशा परिस्थितीत ज्यावेळी तो 50 हजार रुपये मिळवितो त्यावेळी फक्त पुढील एका महिन्याची सोय झालेली असते. त्यामुळे अशोकला सतत आर्थिक चिंता सतावत असते. एकप्रकारे समोर अंधार दिसत असताना अशोक मनातील आशेचा प्रदीप घेऊन पुढे जात आहे. त्याला गरज आहे समाजाच्या मदतीची. 

‘मी ज्यावेळी गावाकडे गेलो त्यावेळी भीषण दुष्काळामुळे 100 रुपयांसाठी लोक 3-4 एकर जमीन सोडून जात होते. सोबत त्यांची मुलेही होती. ती मुले तशीच शिक्षणाअभावी जगणार होती आणि दारिद्य्रात आयुष्य काढणार होती. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्याचवेळी मी त्यांना शिक्षण देऊन सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘स्नेहवन‘चा जन्म झाला. नोकरीतील सारी बचत मी ‘स्नेहवन‘साठी खर्च केली आहे. आता मित्रांच्या, समाजातील दानशूरांच्या मदतीने मी हे सारे काम पुढे घेऊन जात आहे.‘
- अशोक बाबाराव देशमाने

‘यापैकी काही मुले आर्थिकदृष्ट्या एवढी दुर्बल होती की, त्यांच्या पालकांना येथे आणून सोडणेही शक्‍य नव्हते. त्यावेळी आम्ही त्यांना पोस्टाने पैसे पाठवून बोलावून घेतले. आता ही मुले येथे आनंदाने राहतात. खेळतात. शिकतात. ती मोठी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘
- बाबाराव देशमाने, अशोकचे वडील

‘सतरा मुलांचे पालकत्व स्वीकारल्याने यावर्षी गणेशोत्सादरम्यान येणाऱ्या महालक्ष्मीचीही (गौरी) स्थापना करता आली नाही. मात्र, लहान-लहान, निराधार, निरागस मुलांना सांभाळल्याने आम्हाला त्याची खंत महालक्ष्मी न केल्याची खंत वाटत नाही. शेवटी ‘मनुष्यसेवा हीच ईश्‍वरसेवा‘ यावर आम्हा सर्वांचा विश्‍वास आहे.‘
- सत्यभामा देशमाने, अशोकची आई

स्नेहवन संस्थेच्या बॅंक खात्याचा तपशील
Current Account Name : Snehwan
Branch Name : Pimpri Town
MICR : 411002019
Swift Code : SBININBB200
Bank Name : State Bank of India
Account Number : 35517151681
Branch Code : 05923
PAN : AAQTS5600L
IFSC Code : SBIN0005923

(Courtesy: eSakal.com)

12/10/2016

शनिवारची बोधकथा: यशापर्यंत पोचण्यासाठी....

एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना भेटायला गेला. गुरुंना तो म्हणाला, "गुरुजी मला यशस्वी व्हायचे आहे. माझे प्रयत्न सुरु आहेत. मी आणखी काय करायला हवे?' त्यावर गुरूजींनी शिष्याला समुद्राजवळ नेले आणि त्याला समुद्रात पाण्यात जाण्यास सांगितले. शिष्य पाण्यात गेला. त्यावर गुरु म्हणाले, "आणखी पुढे जा' शिष्य पुढे जात राहिला. आता शिष्याच्या गळ्यापर्यंत पाणी आले. गुरूजी त्याच्या मागून पाण्यात गेले. त्याचे डोके पकडून त्याला पाण्यात बुडवू लागले. त्यावर शिष्य शांत.

एक वेळ गुरुजींनी शिष्याचे डोके बराच वेळ पाण्यात दाबून ठेवले. शिष्याला धाप लागली. तो डोके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी शिष्याच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागले. त्यानंतर काही वेळाने गुरूजींनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्या छातीला दाबत नाका-तोंडातील पाणी बाहेर काढले. शांत झाल्यावर गुरूजी म्हणाले, "तुझे नाक, तोंड, डोके ज्यावेळी पाण्यात होते. त्यावेळी तुला काय वाटत होते?' त्यावर शिष्य म्हणाला, "मला मी मरेल असे वाटत होते' त्यावर गुरूजी म्हणाले, "त्या क्षणी जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटत होते?' त्यावर शिष्य म्हणाला, "मला पाण्याच्या बाहेर डोके काढून श्‍वास घ्यावासा वाटत होता.' त्यावर गुरूजी म्हणाले, "अगदी बरोबर! जगण्यासाठी जेवढी गरज तुला त्या क्षणी श्‍वासांची वाटत होती. यश मिळविण्यासाठी तेवढीच प्रयत्नांची गरज आहे. श्‍वासांइतकीच प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्न हवेत. तरच तू यशस्वी होऊ शकशील.!'

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

12/09/2016

'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार?'

"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं त्यांना भान नसतं‘, तो प्रचंड त्रागा करत हॉस्टेलच्या खोलीत पोचला. हॉस्टेलच्या खोलीत चार जण होते. "आयला, आधी काय झालं ते तरी सांग की राव...‘ एकाने विचारले. "अरे, नेहमीप्रमाणे एक पोरगी आलती बघायला. डायरेक्‍ट विचारती राव लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘ त्याने स्पष्ट केले. "साधी गोष्ट हाय राव. एवढं ओरडायला काय झालं मग.. "डस्टबिन‘ कोठे ठेवतात एवढी अक्कल नाही अन्‌ चाललाय लग्नाच्या बोहल्यावर चढायला‘, एकाने त्यालाच झापलं. "अरे, भावा पण ती "डस्टबिन‘ कोणाला म्हटली माहितेय का?‘, त्याचा आवाज चढला. "आमाला काय माहित. सांग की तूच!‘, एकाने त्याला प्रत्युत्तर दिले. "माझ्या आई-बाबांना म्हटली ती "डस्टबिन‘..‘, त्यानंतर काही क्षण खोलीत शांतता पसरली. "अरे, सगळ्यात हाईट म्हणजे ती आमच्या घरी आली होती. आम्ही एका खोलीत बसलो होतो. त्याच खोलीत जरा शेजारी आम्हाला दोघांना बोलायला सांगितले. तिने मुद्दाम सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात विचारलं लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘, त्याने अधिक विस्ताराने सांगितले. पुन्हा काही वेळ शांतता पसरली. 

"अरे, छोड दे ना यार... नको करू लग्न त्या पोरीशी नायतर करूच नको लग्न...‘, एकाने त्याला पुन्हा छेडले. "गप रे. एवढा सिरीयस विषय आहे. अन तू..‘, एका समजूतदार रूममेट म्हणाला. "काय आहे की अलिकडच्या मुलींवर जसे संस्कार झालेत किंवा त्या ज्या कल्चरमध्ये वाढल्या आहेत ना त्यामुळं त्यांनी काही शब्द तयार केले आहेत. आता हे खरंय की त्यांनी असे शब्द चार-चौघात बोलायला नको होते. आपल्या आई-बापाला असं कोणी बोललं तर वाईट वाटत नॅचरल आहे. पण त्या गोष्टीचा आपल्यालाच त्रास होणार. त्यामुळे अशा गोष्टी सोडून द्यायच्या. ती, तिचे शब्द अन्‌ तिचं आयुष्य. ती तिचे बघून घेईल. आपण आपले बघायचे‘, समजूतदार पार्टनरने समजावणीच्या स्वरात सांगितले. आता पुन्हा काही काळ शांतता पसरली. 

"खरं आहे राव. पण मुली असं कसं बोलू शकतात‘, व्यथित झालेला मित्र पुन्हा बोलू लागला. "अरे. पुन्हा तेच. त्यांची तसे कल्चर असेल. त्यांची तशीच थिंकिंग असेल. त्यांना लग्नानंतर आई-वडिलांना वेगळे करायचे असेल. त्यांना नवऱ्यासोबत स्वतंत्र राहायचे असेल. तो त्यांचा प्रश्‍न आहे आणि त्यांनी तसा विचारच करू नये का? अर्थात तो चांगला आहे की वाईट ती गोष्ट वेगळी.‘, समजूदार ‘पार्टनर‘ अधिक खुलून बोलू लागला. 
 
"तुला आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या भावासाठी मी मुलगी पाहात आहे. सहज काल एका मॅट्रिमोनियल साईटवर एका मुलीची माहिती दिसली. फार इंटरेस्टिंग वाटली मला. ती मुलगी घटस्फोटित होती. तिने स्पष्ट लिहिले होते की, लग्नानंतर मंगळसूत्र, साडी, बांगड्या वगैरे वगैरे घालण्याचा आग्रह करायचा नाही. ती सोशल ड्रिंकर होती. विशेष म्हणजे तिने लग्नानंतर एक मुलगी दत्तक घेणार असल्याचे लिहिले होते. शिवाय तिला वर्कहोलिक नवरा नको होता. मजा आली मला प्रोफाईल वाचून.‘ आता दुसरा एक रूममेट बोलू लागला, "डेंजर परिस्थिती आहे.‘ 

"बाबांनो, डेंजर वगैरे काही नाहीए रे. फक्त काय आहे की आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यावरून आपण तर्क लावतो आणि निष्कर्ष काढून शिव्या घालू लागतो. आजही बघा जरा शोधा काही अशाही मुली आहेत की त्यांना घरात बसून सासू-सासऱ्यांची सेवा करायची आहे. काही मुलींची जॉईंट फॅमिली ही अट आहे. काहींना गावाकडे मस्त वाडा असणारा मुलगा हवा आहे. आणि तुम्ही मुलींच्या अँगलनी विचार करा. ती तिचं सगळं तुम्हाला देणार असते. मग जर तिची काही अपेक्षा असणारच. अर्थात ती तुम्हाला पटेल की नाही हा वेगळा विषय आहे आणि हजारात एखादी मुलगी असा "डस्टबिन‘ शब्द बोलते. त्यामुळे काय आहे की असे वेगळे अनुभव आले की व्यथित न होता, त्रास करून न घेता. शांतपणे त्या अनुभवांना सामोरं जायला हवं ना...‘, समजूतदार पार्टनरने आपले म्हणणे पूर्ण केले. 

(Courtesy: eSakal.com)

12/08/2016

'पगारापेक्षा जास्त काम करा!'

खूप दिवसांनी विद्यापीठाच्या कॅंटिनला सगळे एकत्र आले होते. "जाम वैतागलो राव. काम करून करून. कामातच जिंदगी जाते की काय असं वाटतं राव कधी कधी?‘, एकाने मनावरचा ताण हलका केला. "वर्क इज लाईफ है डिअर‘, दुसऱ्याने त्याला समजावलं. "काय घंटा वर्क? आयला जे करतात तेच करत राहतात. जे करत नाहीत ते निवांत..‘, एका त्रस्त मित्राने त्रागा केला. पुन्हा पहिला मित्र बोलू लागला, "खरयं खरयं. अगदी खरयं. बघा नेत्यांना दुप्पट पगारवाढ, गव्हर्नमेंटवाल्यांना पे कमिशन आणि आपल्याला काय? वर्षाकाठी किरकोळ वाढ फक्त...‘ त्याच्या मतावर सगळ्यांनीच सहमती दर्शविली. त्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली.

"पण काही म्हणा राव जो पगारापेक्षा जास्त काम करतो ना त्योच जातो पुढे...‘, मघापासून शांत असलेल्या एका मित्राने सुरुवात केली. "अरे भवड्या, तुला पगार किती? तू बोलतो किती? त्याच्यामुळेच तुझ्यासारखी माणसं मागे असतात. नुसतं काम अन नुसत्या गप्पा‘, एकाने त्याला खडे बोल सुनावले. "हा हा असला तुमचा ऍटिट्युड आहे ना. त्यामुळे तुम्हाला काम करायला त्रास होतो!‘, शांत मित्र चांगलाच पेटला. "बरं! मग तुझ्या म्हणण्यानुसार आठ तासाऐवजी 16 तास काम करू का? 8 तासाच्या पगारात?‘, पुन्हा वाद पेटला. "मी तसं थोडचं म्हटलोय. पण हा काम करत नाही. तो काम करत नाही. म्हणून आपण त्रास का करून घ्यायचा. आपण आपलं आठ तास काम प्रामाणिकपणे करावं‘, शांत मित्राने स्पष्ट केलं. "प्रामाणिकपणा म्हणजे पगारापेक्षा जास्त काम असा होत नाही ना पण?‘, त्याला पुन्हा उचकवण्यात आलं. "हे बघा मित्रांनो, मी तुम्ही कामचुकार आहात असं म्हणत नाहीए. पण नोकरीत एक असतं. तुम्ही जिथं काम करता ना तिथं तुमच्या कामावर कोणाचं तरी लक्ष असतं. कधी कधी तुम्हाला त्याचं ऍप्रिसिएशनही मिळू शकतं. बऱ्याचदा ही गोष्ट तुम्हाला माहित नसते‘, त्याने पुन्हा फिलॉसॉफी मांडली. "बरं! आहे लक्ष आमच्यावर. काय उपयोग? आणि जे काम करत नाहीत त्यांच्यावर कोण लक्ष देणार?‘, मित्राने प्रश्‍न उपस्थित केला. "त्यांच्याकडेही लक्ष असतं. पण त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज काय? त्यांची लाईफ, त्यांचं काम ते बघून घेतील. काम करत नसल्याचा त्यांना कधी तरी त्रास होणारच आहे‘, शांत मित्राने शांतपणे सांगितले. "बरं. पण मग पगारापेक्षा जास्त काम करून काय उपयोग? पगार तर तेवढीच मिळणार ना! आणि हॅट्रिक म्हणजे हे काम न करणारे लोकच सगळे काम करत असल्याचा आव आणत असतात‘, त्याच्याशी संवाद वाढविण्यात आला.

"मित्रांनो, कसं आहे. की आपण आपल्याला जितका पगार मिळतो तेवढं काम करू असं म्हणतो. पण वास्तविक आपण आजूबाजूच्या काम न करणाऱ्यांकडे बघून तेवढं काम पण करत नाहीत. मात्र तुम्ही कुठंही बघा. ज्याने पगाराच्या आकड्याकडे न बघता पगारापेक्षा जास्त काम निष्ठेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम केले त्याच्याच कष्टाचे कुठेतरी चीज झाले आहे. फार कमी काळात तो माणूस पुढे गेलेला आहे. जरा डोळे उघडे ठेवून तुमच्या आजूबाजूला बघा‘, शांत मित्राने पुन्हा शांतपणे सांगितले. "बरं, पण कधी कधी होतं की लक्ष ठेवणाऱ्यालाच पटवण्याचा प्रयत्न केला जातो‘, पुन्हा प्रतिप्रश्‍न आला. "हे बघा. लाईफ म्हटलं की या साऱ्या बारा भानगडी आल्याच. त्यातच नोकरीत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आणि समजा, तुम्ही खूप खूप कष्ट केलेत आणि त्याचे काहीच फळ मिळाले नाही, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या अनुभवाचा फायदा तर होईलच ना दुसरीकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कशाचाच फायदा झाला नाही तर तुम्हाला काम केल्याचा जो आनंद मिळेल, त्यातून जे समाधान मिळेल. ते कदाचित आयुष्यभर मेडिटेशन केल्यानंतर मिळणाऱ्या शांती आणि समाधानापेक्षा कमी नसेल. मात्र हे आयुष्याच्या शेवटी समजून येईल‘, शांत मित्राने दीर्घ भाषण केलं.

"अबे, पण समाधानाला घेऊन काय करायचं आहे? जिंदगीत पैसा महत्त्वाचाए!‘, एकाने त्याला पुन्हा उचकावले. "हे बघा तुम्हाला ऐकायचे की नाय ते तुमचे तुम्ही ठरवा. तुम्ही कामचुकारपणाही करू शकता. तुम्ही लक्ष ठेवणाऱ्याला पकडून पटवूही शकता. त्यातून तुम्ही नोकरी टिकवत आयुष्य कसेबसे निभावून न्यालही. पण जेव्हा हातात काठी येईल आणि डोक्‍यावरचे केस मार्गस्थ होतील तेव्हा कळेल आयुष्यभर काहीच केलं नाही ते!‘ त्याच्या या वाक्‍यानंतर सगळीकडे शांतता पसरली.

12/06/2016

'...म्हणून जग टिकून आहे आज'

‘आई मला शाळेचं नवीन दप्तर आणायचं हाय‘, ती काही दिवसांपासून हट्ट करत होती. "घीऊ लवकर‘ असं म्हणत तिने रोजच्याप्रमाणे मुलीचे समाधान केले. तिचा नवरा भाड्याची रिक्षा चालवत होता. तर ती आजूबाजूच्या काही घरात धुणं-भांडे करत हातभार लावत होती. दोघांचे उत्पन्न मिळून कसाबसा संसार पुढे जात होता.

एका इमारतीतील सहाव्या मजल्यावरील घरातील कामवाली गेल्या काही दिवसांपासून येत नव्हती. कामवालीशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे तिच्याकडे विचारणा झाली. काम देणारे कुटुंब सधन होते. त्यामुळे मोबदलाही चांगला मिळणार होता. नवे काम मिळाल्याने चिमुकलीला भारीचे दप्तर घेता येणार होते. शिवाय काही बचतही शक्‍य होणार होती. त्यामुळे तिने अगदी आनंदाने काम करण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवसापासून व्यवहाराच्या गोष्टी झाल्यावर ती कामावर रूजू झाली. दोन दिवस छान काम चालले. दरम्यान तिने चिमुकलीला आश्‍वासन दिले "येणाऱ्या पगारात तुला नवं कोरं दप्तर घ्यायचं‘! नेमकेपणाने उत्तर मिळाल्याने चिमुकलीही महिना संपण्याच्या प्रतिक्षेत होती.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या दिवशी ती कामाला निघाली. सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये बसली. सोबत आणखी दोन महिला लिफ्टमध्ये आल्या. त्या दोन महिलांचा संवाद सुरू झाला. "अगं धीर सोडू नगं. मी सांगत्ये मॅडमला. त्या लई चांगल्या हायेत‘, एक महिला बोलली. त्यावर दुसरी महिला म्हणाली, "अगं खरंय! पर आता ह्या सहाव्या मजल्यावरील मॅडमनीबी नवी बाई ठेवली असल तर कामाला. कसं काय होईल काय माहित? इन-मीन चार घरात कामं करत होती. कसंबसं चाललं होतं. मध्येच ह्यो दवाखाना माझ्यामागं लागला अन समदी कामं गेली. अन कळवलंबी नाय गं म्या‘, असं म्हणत त्या महिलेला डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तोपर्यंत सहावा मजला आला. तिघीजणी एकाच घरात आल्या.

घरातील मॅडमनी दार उघडले. समोर तिघी उभ्या. आधीच्या आणि नव्या कामवालीला एकत्र पाहून मॅडमला आश्‍चर्य वाटले. त्यांना काय करावे काहीच समजेना. त्यांनी सगळ्यांना आत घेतलं. पहिल्या कामवालीला मॅडम म्हणाल्या, ‘काय गं तुझा पत्ताच नाही. काही कळवायचं तरी किमान. तुझी वाट बघून शेवटी मी हिला ठेवलं कामावर‘, मॅडमनी खुलासा केला. त्यावर पहिल्या कामवालीला फारच वाईट वाटलं. तिला काय बोलावे तेच समजेना. तिच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या. ही सारी अवस्था पाहून नव्याने कामाला रूजू झालेली ती बोलू लागली, "मॅडम ह्या पहिल्या बाईलाच ठेवा कामावर. तिला लय गरज हाय कामाची. मला काय माझ्याकडं हायेत कामं पोटापुरती...‘, असं म्हणत मॅडमचं काहीही न ऐकता किंवा मागच्या दोन दिवसांचा पगारही न मागता ती घराबाहेर पडली.

चिमुकलीच्या नव्या दप्तराचं स्वप्न सोबत घेऊन जात असलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पहिल्या कामवालीचे आपोआपच हात जुळले. हे सारं पाहून काम मॅडम म्हणाल्या, "काय बाई आहे बघ! एकीकडे कामं मिळवण्यासाठी सगळं जग धडपडतयं. एकमेकांचे पाय खेचतयं. आणि ही बाई चक्क काम सोडून गेली. ते पण तुझ्यासारख्या अनोळखी बाईसाठी. धन्य आहे ती! बघ ही अशी माणसं आहेत ना म्हणून जग टिकून आहे आज..‘

12/05/2016

...जसं वाटतं तसं जगायला हवं!

कंपनीच्या आवारात रोज रात्री एक आलिशान चारचाकी गाडी यायची. रात्री उशिरा गाडी यायची. गेल्या अनेक दिवसांपासून ती गाडी पार्किंगमध्येच दिसत होती. ही गोष्ट कंपनीच्या कॅम्पस मॅनेजरच्या लक्षात आली. त्याने वॉचमनला विचारले. "रोज रात्री येते ती गाडी. त्यात कोणीतरी असतं बहुतेक.‘, वॉचमनने माहिती दिली. मॅनेजरने संबंधित गाडीबाबत सविस्तर माहिती काढली. ती गाडी एका महिला एम्प्लॉयीची असल्याचे आढळून आले. संबंधित महिलेच्या विभागाला याबाबत विचारणा करण्यात आली. विभागाने टीमलिडरने काही दिवसांत रिप्लाय देतो, असे कळविले. ती महिला कामात अगदी तत्पर होती. गेल्या दोन वर्षांपासून ती कंपनीत काम करत होती. तशी ती कामात हुशार होती. बऱ्याचदा ती ड्रिंकही करत होती. त्याने महिलेशी अनफॉर्मल चर्चा करण्याचे ठरविले.

त्यानंतर एक-दोन दिवसांनी लिडरने खास सबंधित महिलेला कॅंटिनमध्ये कॉफी प्यायला नेले. दोघेही कॅंटिनमध्ये आले. ऑफिसच्या कामाच्या गप्पा झाल्यानंतर लिडरने मुद्याला हात घातला, "तू राहतेस कुठे?‘ यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला आणि म्हणाली, "होता एक फ्लॅट माझा. पण आता नाहीए. नुकताच विकला तो.‘ "मग काय भाड्याने राहतेस?‘, लिडरने प्रतिप्रश्‍न केला. ती एकदम गप्प झाली. त्यावर लिडरच पुन्हा बोलू लागला, "हे बघ. तू कुठेही राहिलीस तरी काहीही फरक पडत नाही. फक्त जिथे राहशील तेथे तुला चांगला आराम मिळायला हवा. कारण आराम केलास तरच तुला कामावर लक्ष देता येईल?‘ त्याने आपले बोलणे संपविले. पुन्हा काही काळ शांतता पसरली. ती किंचित जोरात बोलू लागली, "म्हणजे आता मी कामावर लक्ष देत नाही असे वाटते का तुला?‘ ‘तसे नाही गं! पण तुला आराम मिळायला हवा व्यवस्थित ना! पुढे आपल्या टीमकडे एकाच वेळी दोन-तीन प्रोजेक्‍टवर नजर ठेवण्याची जबाबदारी येणार आहे. म्हणून...‘ लिडरने स्पष्ट केले. "मी नुकतीच एक माझी आवडती कार घेतली आहे. त्यातच राहते!‘, तिने खुलासा केला.

"म्हणजे?‘, लिडरने काही समजले नाही. "म्हणजे बघ. दिवसभर ऑफिसला कामात असते. त्यानंतर रात्री थोडीफार शॉपिंग वगैरेसाठी बाहेर जाते आणि बाहेरच डीनर वगैरे करून पुन्हा कार ऑफिसला आणून त्यातच झोपते‘, तिने सगळचं स्पष्ट सांगितलं. "पण...!‘, लिडरने प्रश्‍न विचारायचा प्रयत्न केला. "मला माहिती आहे तुम्हाला खूप प्रश्‍न पडले असतील. मी मुलगी. एकटी. कारमध्ये राहते. घर नाही. कपडे वगैरे? अरे, ऍडजस्ट केलं की सगळं ऍडजस्ट होतं!‘, तिने आणखी गूढ निर्माण केलं. "म्हणजे जरा समजून सांग की!‘, लिडरने तिला आणखी बोलते केले. ती बोलू लागली, "म्हणजे मी ऑफिसला फ्रेश होते आणि कारमध्ये झोपते. बाहेर जेवते. फ्लॅट घेतला होता. पण माझी कार मला फार आवडते. घराचे कर्ज होते. घर विकून ते संपवले आणि आता नवे कर्ज घेऊन आवडती कार घेतली. आता तिच माझं आयुष्य आहे.‘

लिडर गोंधळात पडला, "ए, काहीतरी गंमत करू नकोस बरं!‘ "अरे गंमत कसली? हेच खरं आहे. काय लागतं जगायला माणसाला? मी तुम्हा साऱ्यांना आय मिन जगाला जसं वाटतं तसं जगत नाही, तर मला जसं वाटतं तसं जगते. जगात सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते असं आपल्या मनासारखं जगता येत नाही त्यामुळे निर्माण होतात. हा फक्त एवढंच आहे की आपल्या एखाद्या ऍक्‍शनमुळे कोणाला काही प्रॉब्लेम होऊ नये एवढं बघायला हवं. ही महागडी पण आवडती कार घेणं माझं स्वप्न होतं ते मी माझ्या हिमतीने पूर्ण केलं आहे. बस्सं...! माय लाईफ, माय रूल्स!! आता माझ्या घराचं म्हणशील तर माझं घर इथून खूप दूर आहे. त्यांना मी इथे नोकरी करते एवढच माहिती आहे. बाकी काही त्यांना मी सांगत नाही. जरा वेगळं आहे हे सगळं. पण जगण्याची ही माझी पद्धत आहे. ऑफिसमध्ये जर रोज पार्किंग करण्याबद्दल कोणी काही म्हटलं तर तसं मला स्पष्ट सांग. मला तुला प्रॉब्लेममध्ये टाकायचं नाहीए. मी करेल दुसरीकडे पार्किंग...‘, तिने एका दमात सगळाच खुलासा केला.

हे सगळं ऐकून आयुष्याकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल काय बोलावे, हेच त्याला कळेनासे झाले

12/03/2016

शनिवारची गोष्ट: 'श्रद्धा' म्हणजे काय?

आटपाट नगर होतं. नगरावर एक राजा राज्य करत होता. नगरातील लोक श्रद्धाळू होते. नगरात एक मोठे मंदिर होते. मंदिराचा गाभारा खूप मोठा होता. तो पाण्याच्या हौदासारखाच होता. राजाने एकदा आदेश दिले. मंदिराचा गाभारा फक्त दुधाने भरून काढायचा. त्यासाठी नगरातील लोकांकडून दूध गोळा करायचे. ज्याला जेवढे जमेल त्याने तेवढे दूध आणून गाभाऱ्यात ओतायचे. दिवस ठरला. वेळ ठरली. दवंडी पिटवण्यात आली. सारे जण तयारीला लागले.

तो दिवस उजाडला. प्रत्येकाने आपल्या घरात कोणालाही दूध न देता सगळे दूध गाभाऱ्यात आणून ओतले. दूध ओतण्यासाठी मंदिरात रांगा लागल्या. प्रत्येकजण घरातील सगळेच्या सगळे दूध आणून ओतत होता. अशातच दोन-तीन तास झाले. खूप सारे दूध ओतूनही गाभारा दुधाने भरला नाही. दूध ओतण्यासाठी रांगा सुरूच होत्या. लोक दूध ओततच होते. गाभारा काही भरत नव्हता. अशातच दुपारचे बारा वाजून गेले. गर्दीही संपली. गाभारा अजून भरलेला नव्हता. मात्र गाभारा भरण्याची वाट पाहण्यासाठी मंदिराभोवती गर्दी होती. सर्वांना चिंता लागली. आणखी दूध आणायचे कोठून? तेवढ्यात एक वृद्ध स्त्री मंदिराच्या दिशेने आली. तिच्या हातात केवळ अर्धा पेला दूध होते. "एवढ्याशा दुधाने काय होणार आजी', गर्दीतून आवाज आला. वृद्ध स्त्रीने दुर्लक्ष केले. ती गाभाऱ्याच्या दिशेने चालू लागली. तिने मंदिरातील मूर्तीला दुरूनच मन:पूर्वक नमस्कार केला. हातातील अर्धा पेला दूध गाभाऱ्यात ओतले. आणि काय आश्‍चर्य! क्षणार्धात गाभारा दुधाने भरलाच आणि ओसंडून वाहू लागला. गर्दीने जल्लोष केला.

ही वार्ता राजापर्यंत पोचली. राजाने त्या वृद्ध स्त्रीला राजवाड्यात बोलावून घेतले. वृद्ध स्त्रीला तातडीने राजवाड्यात आणण्यात आले. राजाने तिला विचारले, "माते, तू घरून आणलेल्या अर्ध्या पेल्याच्या दुधात काय होते की ज्यामुळे गाभारा भरून गेला.' वृद्ध स्त्री बोलू लागली, "राजेसाहेब गाभाऱ्यात सकाळपासून खूप लोकांनी दूध ओतले. पण गाभारा भरला नाही. त्या सगळ्या लोकांनी घरातील लहान बाळाला, प्राण्यांना आणि सगळ्या लोकांना दूधापासून वंचित ठेवले. त्यामुळे काही घरातून दूध ओतण्यास विरोध झाला. पण तो विरोध झुगारून त्या त्या घरातील सगळे दूध गाभाऱ्यात येऊन पडले. मी मात्र कोणाचीही नाराजी किंवा विरोध पत्करला नाही. आधी माझ्या नातवाला रोजच्याप्रमाणे दूध दिले. माझ्या मुलाला, सुनेला नेहमीप्रमाणे दूध दिले. मी पण दररोजप्रमाणे दूध पिले. घरातील मांजर आणि कुत्र्यालाही दररोजसारखे दूध पाजले. एवढे करून माझ्याकडे अर्धा पेलाच दूध उरले. ते घेऊन मी मोठ्या श्रद्धेने मंदिरात आले. माझ्या दुधाने गाभारा भरण्याची देवाला मनातून विनंती केली. दूध ओतले. सर्वांना समाधान देऊन उरलेले दूध गाभाऱ्यात पडल्याने देवही खूष झाला आणि गाभारा दुधाने ओसंडून वाहू लागला.'

वृद्ध स्त्रीची गोष्ट ऐकून संपूर्ण राजवाड्यात शांतता पसरली.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

12/02/2016

'या हयातीत तुमचे घर होणार नाही!'

ते दोघे कॉलेजपासून चांगले मित्र होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच होती. तरीही ते कुटुंबियांसोबत खाऊन-पिऊन सुखी होते. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. आपापल्या क्षेत्रात ते निष्णात आणि प्रामाणिक होते. आता ते दोघेही नोकरीच्या निमित्ताने एका मोठ्या महानगरात स्थिर होत होते. स्थिरतेच्या व्याख्येतील "घर‘ नावाची महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे अद्याप नव्हती. त्यांना ती फारच आवश्‍यक वाटत होती. त्यासाठी त्यांनी आवश्‍यक ते प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांचा पगार बॅंकेच्या कर्जासाठीच्या किमान अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यांना हे माहिती होतेच. मात्र तरीही त्यांचे प्रयत्न सुरूच होते.



चौकशी करता करता एकेदिवशी एका लोकप्रिय आणि मोठ्या बॅंकेत त्यांनी गृहकर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी भेट देण्याचे धाडस केले. दोघेही बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या दालनात आले. अधिकाऱ्याने चांगले स्वागत केले. सर्व माहिती देण्यात आली. "तुमची पे-स्लिप सोबत आहे का?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "हो‘ म्हणत दोघांनीही आपापल्या पे-स्लिप अधिकाऱ्याला दाखवल्या. अधिकाऱ्याचा चेहरा एकदम उतरला. तो म्हणाला, ‘तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही आपलं भाड्याच्या घरात आयुष्य काढा. एवढ्या पगारात या शहरात तुमच्या हयातीत तुमचं घर होणं शक्‍य नाही. कशाला या भानगडीत पडता.‘ दोघेही एकदम अस्वस्थ झाले. धीर करत एक मित्र म्हणाला, ‘पण...‘ त्याला मध्येच थांबवत अधिकारी म्हणाला, "अहो, भाड्याच्या घरातच राहायचे आणि करार वाढवत राहायचे. दोन-तीन वर्षांनी घर बदलायचे. त्याला पर्याय नाही. शेवटी जगणं महत्त्वाचं आहे. स्वत:चं घर काय आणि भाड्याचं काय?‘ आणखी अस्वस्थ होत दोघेही मित्र काहीही न बोलता बाहेर पडले.



या घटनेनंतर दोन वर्षांनी पुन्हा ते दोघे अतिशय आनंदात त्याच बॅंकेच्या त्याच अधिकाऱ्याकडे पेढे घेऊन आले. पुन्हा त्याच दालनात दोन वर्षांपूर्वीचे दृश्‍य. "पेढे घ्या पेढे!‘, अधिकाऱ्याला दोघेही जण पेढे देऊ लागले. "अभिनंदन! पण कसले पेढे? आपण ओळखतो का?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "साहेब, दोन वर्षांपूर्वी तुमच्याकडे गृहकर्जाची चौकशी करायला आलो होतो. त्यावेळी आम्ही आमच्या हयातभर स्वत:चे घर घेऊच शकत नाहीत असं तुम्ही म्हणाला होतात. याच हयातीत आम्ही आमचे घर केले आहे. हे पेढे आमच्या घराचेच‘, दोघांपैकी एकाने खुलासा केला. त्यावर अधिकाऱ्याने "अभिनंदन! अभिनंदन!!!‘ म्हणत त्यांचे स्वागत केले. "पण एक सांगा. तुम्ही त्यावेळी आम्हाला एवढ्या निगेटिव्ह भाषेत का सांगितले होते? तुम्ही तर बॅंकेचे अधिकारी! तुम्हाला तर गृहकर्ज देण्यात अधिक रस असतो ना?‘, एका मित्राने प्रश्‍न केला. "छान प्रश्‍न विचारलात. त्यावेळी जर मी तुम्हाला तसं म्हणालो नसतो तर आज तुमचे स्वत:चे घर झालेच नसते. माणसाच्या मनातील पॉझिटिव्ह विचारांना कधी कधी निगेटिव्ह विचार पुढे ढकलत असतात. खरोखरच तुम्ही ज्यावेळी लोनच्या चौकशीला आला होता त्यावेळी तुमच्या पगारात तुम्हाला कोणत्याच बॅंकेने कर्ज दिले नसते. पण मग तुम्ही पगार कसा वाढवलात? काय केलेत?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "तुम्ही आमच्या पगारावर इतके निगेटिव्ह बोललात की त्यानंतर काही दिवस आम्ही दोघेही बेचैन होतो. खूप विचार केला आम्ही. काय करता येईल. मी नवी नोकरी शोधली आणि याने "नोकरी सोडणार‘ म्हटल्यावर त्याला आहे तिथेच पगार वाढवून मिळाला आणि आमचा पगार "कर्जपात्र‘ ठरला. आज आम्ही तुम्हाला दाखवून दिले की आम्ही घर घेऊ शकतो‘, एकाने खुलासा केला. ‘छान. कदाचित मी जर तुम्हाला तेवढ्या स्पष्ट शब्दांत सुनावले नसते तर तुम्ही प्रयत्न वाढवले नसते. दुसऱ्या एखाद्या बॅंकेने किंवा तेथील अधिकाऱ्याने हीच गोष्ट तुम्हाला गोड शब्दांत सांगितली असती. मात्र परिणामी तुम्ही आजही तुमचे घर घेऊ शकला नसता. बऱ्याचदा काय असतं की प्रयत्न आणि इच्छाशक्ती प्रबळ असते. पण प्रयत्नांना "पुश‘ करण्यात आपण कमी पडतो. मी तुम्हाला फक्त "पुश‘ करण्याचे प्रयत्न केले. मल माहिती आहे की तुम्ही बाहेर जाऊन मला शिव्या घातल्या असतील. पण त्याचे मला काही नाही. कारण दोन कुटुंबांना त्यामुळे स्वत:च्या घरात जाता आले. महिन्या-दोन महिन्याला असेच ज्यांना मी निगेटिव्ह बोलतो ते मला पेढे द्यायला येतात. भरून येते. त्यावेळी निगेटिव्ह थॉट दिल्याचे दु:ख नव्हे तर "पुश‘ करून एनर्जी दिल्याचा आनंद होतो. लक्षात ठेवा कधी कधी तुमच्या आजूबाजूचा निगेटिव्ह थॉट तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो. मी तेवढेच करतो‘, अधिकाऱ्याने दीर्घ भाषण ठोकले.



"पण मग आम्ही तर तुमच्या बॅंकेतून कर्ज घेतले नाही. तरीही तुम्हाला आनंद...‘, एक मित्राने प्रश्‍न केला. "कोणत्या बॅंकेतून कर्ज घेता हा प्रश्‍न नाही. तुमचे स्वत:चे घर होणे महत्त्वाचे आहे. पुन्हा आमच्यावर काही लोक आरोप करतात की तुम्ही बिल्डर्सच्या फेव्हरमध्ये असता किंवा बिल्डर्सचा धंदा होण्यासाठी तुम्ही असे निगेटिव्ह थॉट देता. पण माझ्या मते माझ्यावर आरोप झाले तर एखादा स्वगृहात जात असेल तर मला त्याचे दु:ख नाही. शेवटी माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही?‘ अधिकाऱ्याने पूर्णविराम दिला आणि दोघेही मित्र त्यांचे आभार मानत बाहेर पडले.

(Courtesy: eSakal.com)

12/01/2016

'माणूस महत्त्वाचा की गुरे?'

डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकामासाठी गायी, बैल, म्हशी, गुरे होती. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोकरमाणूस नेमलेला होता. घरात एक ज्येष्ठ गृहस्थ होते. या साऱ्या संपत्तीचे ते जणू काही सम्राट होते. त्यामुळे सारे त्यांना मालक म्हणून हाक मारत. त्याशिवाय मालकांचे तीन मुले आणि त्यांचे नातवंडे वगैरेंनी वाडा नटलेला होता. पहाटे साडेचारपासून वाडा जागा व्हायचा. रात्री अकरापर्यंत वाड्यात हालचाल सुरूच राहायची. मालक तसा व्यवहारी पण अत्यंत मृदु, नम्र आणि प्रेमळ होता. त्यामुळेच वाड्यातील अनेक नोकरमाणसे अनेक वर्षांपासून इमानइतबारे काम करत होती. मालकाकडे संपत्ती आणि समृद्धी तर होतीच. पण त्याशिवाय त्याच्याकडे माणुसकीही होती.

एकदा नेहमीप्रमाणे नेहमीचा माणूस गायी-गुरांना डोंगरकड्यावर चरायला घेऊन गेला. इकडे वाड्यात इतर नेहमीची कामे सुरूच होती. साधारण अर्ध्याच तासात तो धावत धावत आला. त्याला खूप घाम आला होता. तो प्रचंड भेदरलेला दिसत होता. अशाच अवस्थेत तो वाड्याच्या दाराशी येऊन धडकला. तो फक्त जोरजोरात ओरडत होता. "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘, अशा हाका मारत तो मालकांच्या खोलीकडे जाऊ लागला. वाड्यातील सगळे नोकरचाकर "काय झालं? काय झालं?‘ म्हणत त्याच्या मागे धावू लागले. पण तो प्रचंड भेदरलेला होता. त्यामुळे तो कोणालाच दाद देत नव्हता. त्यामुळे वाड्याच्या मुख्य दारापासून मालकाच्या खोलीपर्यंत येताना गोंधळ निर्माण झाला. नेहमीप्रमाणे काम करणारा वाडा अचानक गोंधळून गेला. हे सारे वातावरण पाहून आत हिशोब मांडून बसलेला मालक त्याच्या खोलीच्या दाराशी आले. तेवढ्यात तो तिथे पोचला. आणि पुन्हा "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘, अशा हाका मारू लागल्या. "अरे, शांत हो! काय झालं काय नीट सांग?‘, मालकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘ एवढेच म्हणू लागला. मग काही वेळाने कोणीतरी मागून ओरडले, "मालक गुराजवळ वाघ आला वाटतं!‘ तेवढ्यात त्यानेही "होऽऽ होऽऽ वाघ वाघऽऽऽ‘ असे म्हणत समर्थन केले. त्यावर वाड्यात काम करणारा एक ज्येष्ठ माणूस जोरात धावत पुढे आला आणि "साल्या, जनावरांना, गुरा-ढोरांना तिथं टाकून इकड आलास होय र?‘, असे म्हणत त्याने ओरडणाऱ्या माणसाच्या कानाखाली जोरदार चपराक दिली. तेवढ्यात मालकांनी त्या कानाखाली मारणाऱ्या माणसाला खडसावले, "अरे, येडा आहेस की काय? त्यो एकटा. त्यो वाघ रानटी जनावर. कसा काय लढणार ह्यो त्या जनावरासोबत. आणि समजा एखाद्या गुरावर वाघाने हल्ला केलाच तर काय होईल? पर ह्यो माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा नाही का? तूच सांग मला शेवटी माणूस महत्त्वाचा की गुरे?‘

मालकांचे शब्द ऐकून काही वेळापूर्वी गोंधळून गेलेला वाडा पुन्हा निशब्द झाला.

(Courtesy: eSakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...