11/07/2013

स्वप्नांचं जग...!!


स्वप्नांचं जग...!!



बघं ना आकाशात किती छान चंद्र आला आहे. त्याच्याभोवती किती किती मस्त चांदण्या आहेत. तो चंद्र एका रथात बसला आहे. त्या रथाला नाजूकश्या हरणांच्या दोन जोड्या आहेत. छोट्या छोट्या चांदण्या त्या रथाभोवती फिरत आहेत. आणि तो रथ आकाशातून आकाशात फिरत आहे. किती विलोभनीय दृश्य आहे ना हे. म्हणूनच तर बघ इतरांना दररोज आकाशातील फक्त तो चंद्र धावताना दिसत आहे. पण आपल्याला तर तो रथातून फिरताना भासत आहे. कारण आपण त्याच्याच जगात आहोत ना! पण मला तर बुवा या सा-या नजराण्यापेक्षाही इथे पृथ्वीवर माझ्या शेजारी बसलेली चांदणीच अधिक आवडते. ती किती गोड हसते. ती किती गोड लाजते. ती किती नाजूक आहे... लाल ओठांची चांदणी.. काळ्या केसांची चांदणी.. बघं बघं तू लाजलीस की नाही?




तो चंद्र जसा सा-या सा-या चांदण्यांना जपतो ना. तसा मी तुला मी जपेल. त्या चंद्राला अनेक चांदण्या आहेत. पण त्या सा-या चांदण्यांची मिळून तयार झालेली एकच चालती बोलती चांदणी देवानं माझ्याकडे पाठविली आहे. तिला मी कधीच सोडणार नाही... कधीच नाही.... मी तिच्यासाठी चंद्र बनेल. एकाच चांदणीचा चंद्र...!!!''

एवढ्यात त्याला जाग आली. तसाच तो तिला भेटायला गेला. ती आणि तो आता स्वप्नात नाही तर सत्यात भेटत होते. तो रथ, ती चांदणी, तो चंद्र.. तो स्वप्नातलं सारं सारं हृदयापासून सांगत होता. ती शांतपणानं ऐकत होती. इतक्यात तो म्हणाला, ''बघं, अश्शी अगदी अशीच तू स्वप्नात लाजली होतीस..'' तिच्या लालसर ओठांवर हळूवार हसू उमटले. ती म्हणाली. ''अरे,स्वप्नाचं जग किती सुंदर असतं ना. आपल्याला हवं ते तिथं पाहता येतं. हव्या त्या व्यक्तीला आपण तिथं कवेत घेऊ शकतो. अगदी त्या व्यक्तीच्या नकळत... पण ते सारे मनाचे खेळ असतात रे. त्यातून जगण्याची ऊर्जा नक्की मिळते. पण त्यासोबतच आपल्याला ख-या जगात पण जगायला हवं. इथल्या जगात लौकिकार्थानं कर्तृत्त्व गाजवायला हवं. कष्ट करायला हवेत. मान उंच करण्याएवढं मोठं व्हायला हवं. स्वप्न कल्पनेसोबतच सत्याच्या अनुभूतीची बघायला पडायला हवीत. उद्याच्या ख-या ध्यासाची बघायला हवीत. आणि ती सत्यात आणण्यासाठी धडपड करायला हवी. प्राणपणाने. माझ्याएवढचं प्रेम त्या स्वप्नांवर करायला हवं. मग पहा आज तू त्या चंद्राचे स्वप्न पाहतोस. उद्या त्या चंद्राला तुझे-माझे स्वप्नं पडतील... आणि आपण खरेच त्या स्वप्नांच्या जगात जगत राहू. सदाकरिता...!!!''

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...