कष्टाचे फळ (बोधकथा)

एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांगले संस्कार केले होते. नेहमी छोट्या छोट्या कृतीमधून ते मुलांना एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देत. एकदा त्यांनी सर्व मुलांची परिक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सर्व मुलांना एकत्र घेतले. आजोबा म्हणाले, "आपण उद्या पहाटे दूरपर्यंत फिरायला जाणार आहोत. आपण आधी गाडीने शेजारच्या गावातील डोंगराजवळ जाणार आहोत. तेथून चालत पुढे जाणार आहोत. चालण्याचे अंतर थोडे जास्त आहे. त्यामुळे मी तयारीसाठी पुढे जाणार आहे. आणि हो, तुमच्यासोबत मोठे कोणीही असणार नाही. सोबत फक्त तुम्हाला त्या गावातील एक व्यक्ती प्रत्येकाला लाकडाच्या जराशा जाड आणि 8-10 फूट लांब फळ्या देणार आहे. त्या तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन याव्या लागणार आहेत. त्यातून आपण खेळ खेळणार आहोत. चला तर मग सकाळी लवकर गाडी तयार असेल.' काही नातवंडांनी शंका उपस्थित केल्या. त्या सर्व शंकांचे निरसन झाल्यावर सर्व जण झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व जण ठरल्याप्रमाणे निघाले. नातवंडांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नातवंडांचा समावेश होता. ठरलेल्या वेळेत सर्वजण ठरलेल्या ठिकाणी पोचले. सर्वांना पुढे काय होणार याची खूप उत्सुकता लागली होती. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती फळ्या घेऊन तेथे आला. त्याने प्रत्येकाला एक-एक फळी दिली. फळी तशी जड होती. गावकऱ्याकडे नातवंडांनी चौकशी केली येथून आजोबा किती अंतरावर आहेत. "इथून सरळ सरळ पुढेपर्यंत चालत जा', अशी सूचना गावकऱ्याने दिली. त्याप्रमाणे सर्व मुले उत्साहाने त्या मार्गाने चालू लागली. दोन किलोमीटरचे अंतर चालून गेल्यानंतर मुलांना दम लागू लागला. सगळेजण एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. "आपल्याला आजोबांनी एवढी जाड फळी घेऊन एवढ्या दूर का बोलावले असेल?', एका लहान नातवंडाने प्रश्‍न उपस्थित केला. "अरे, आजोबांनी सांगितले ना आपण या फळीने खेळ खेळणार आहोत', दुसऱ्या एका नातवंडाने उत्तर दिले. "अरे, पण आपले आजोबा आपल्याला एवढे कष्ट का देत आहेत?', पुन्हा प्रश्‍न आला. त्यावर "चला, लवकर म्हणजे याचे उत्तर आपण आजोबांनाच विचारू', असे एकाने सांगितले. काही वेळाने सगळेजण पुन्हा चालू लागले.

पुन्हा काही अंतर गेल्यावर सर्वांत लहान नातवंड थकल्याने त्याने फळी सोडून दिली. "मी आजोबांना सांगेल की मला नाही उचलली फळी', असे इतर जणांना सांगून तो पुढे चालू लागला. आणखी काही अंतर गेल्यावर आणखी एकाने फळी टाकून दिली. पुढे चालू लागला. फळी सोडून दिल्याने या दोघांनाही आता चालताना त्रास होत नव्हता. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप पुढे चालू लागले. असे करत करत दहापैकी 7 जणांनी फळी सोडून दिली आणि "आम्हाला नको खेळायचा असला खेळ' म्हणत पुढे चालू लागले. आता केवळ फळी घेतलेले तिघेच उरले होते. आणखी एकालाही आता असह्य झाले. त्यानेही फळी सोडून दिली. आता फक्त दोन जणच फळी घेऊन पुढे चालत होते. इतर सगळेजण एवढे पुढे गेले होते की ते दिसेनासे झाले. हे दोघेच प्रामाणिकपणे फळी घेऊन पुढे चालू लागले. त्यांना घाम आला. तरीही त्यांनी फळी सोडली नाही. आणखी काही अंतर गेल्यावर त्यांना सगळेजण एकाठिकणी थांबलेले दिसले. तेथे फळी घेतलेले दोघे जण पोचले. समोरचे दृश्‍य पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. कारण पुढे 10-15 फुटांच्या अंतरावरच आजोबा उभे होते. मात्र मध्ये एक 7 फूटांची दरी होती. आजोबांनी सांगितले. ज्यांच्याकडे फळी आहे त्यांनी आपली फळी या दोन डोंगरावर टाका. तिचा वापर पुलासारखा करा आणि माझ्यापर्यंत पोचा. केवळ दोघांकडेच फळी असल्याने दोघे जण सहजपर्यंत आजोबांपर्यंत पोचले. आजोबांनी त्यांना जवळ घेतले. त्यांचा घाम पुसला. त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. इतर आठ जण दुसऱ्याच टोकाला होते. आजोबा दूरवरूनच बोलू लागले, "मुलांनो. आता समजले का ही फळी मी तुम्हाला का आणायला सांगितली होती. खरं तर एकच फळी आणूनही काम भागले असते. मात्र त्यामुळे तुमच्यापैकी एकालाच कष्ट पडले असते किंवा तुम्ही एकेकाने ती फळी उचलली असती. बाळांनो, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे कष्ट वाटून घेता येत नाहीत. तुम्हाला पुढील आयुष्यात खूप कष्ट करावे लागतील. मात्र तुम्ही कधीही त्याचा कंटाळा करू नका. ते कष्ट तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडतीलच. ते कष्ट कधीही वाया जात नाहीत', असा संदेश देत आजोबांना एक फळी दरीवर टाकली आणि सर्वांना आपल्याकडे बोलावून घेतले.