11/16/2017

संदेश (बोधकथा))

एका मोठ्या गुरूकुलात एक गुरुवर्य अध्यापन करत असत. एकदा त्यांनी सर्व शिष्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले. सर्व शिष्यांना एकत्र बोलवले. सर्वांना एक फळ दिले. "तुमच्याकडे दिलेले फळ संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊन खा, की जेथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. अशी कल्पना करा की हे फळ तुम्ही कोणालाही न विचारता आणले आहे आणि तुम्ही ते खात आहात', अशी सूचना गुरुवर्यांनी दिली. सर्व शिष्य फळ खाण्यासाठी जागा शोधू लागले. कोणी गुरुकुलापासून दूरवर असलेल्या डोंगरात, तर कोणी विस्तीर्ण झाडाच्या बुंध्याला जाऊन, कोणी गुरुकुलातील स्वत:च्या निवासस्थानी जाऊन फळ खाऊ लागले. तासाभरातच सर्व शिष्य फळ खाऊन गुरुवर्यांकडे परत आले. मात्र एक शिष्य गुरुवर्यांना दिसला नाही. फळ खाण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वेळ होती. त्यामुळे तो शिष्य आल्यावर चर्चा करण्याचे ठरले. इतर शिष्य आपला अनुभव सांगण्यास उत्सुक होते. मात्र त्या एका शिष्याची प्रतिक्षा करावी लागली. दोन तास झाले. चार तास झाले. मात्र शिष्य काही आला नाही. शेवटी सहा तासांनी शिष्य परतला. त्याच्या हातात फळ तसेच होते. त्याने फळ खाल्ले नव्हते. हे पाहून सारे जण त्याच्याकडे पाहून हसू लागले. हा गोंधळ पाहून गुरूवर्य तेथे पोचले. त्यामुळे सर्व शिष्य शांत झाले.

गुरुवर्य प्रत्येकाला त्यांचे अनुभव विचारू लागले. प्रत्येकजण आपला अनुभव कसा वेगळा आणि आपण एकांतात जाऊन कसे फळ खाल्ले हे सांगू लागला. सर्व शिष्यांनी आपले अनुभव कथन केले. आता गुरुवर्य हातात फळ घेऊन परतलेल्या शिष्याकडे वळले. त्याला अनुभव विचारू लागले. तो शिष्य अत्यंत नम्रपणे म्हणाला, "गुरुवर्य, मी आजूबाजूला कोणीही पाहणार नाही अशी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला तशी जागा मिळाली नाही. कारण प्रत्येक ठिकाणी एक जण मला पाहत होता. तो एक जण म्हणजे मी स्वत:च होतो. गुरुवर्य आपण या सर्व जगाला धोका देऊ शकतो पण स्वत:ला धोका कसा देणार? स्वत:पासून दूर कोठे जाणार? कसा शोधणार एकांत?' एवढे बोलून शिष्याने आपले म्हणणे पूर्ण केले.

त्यावर गुरुवर्य म्हणाले, "बघा, या एकाच शिष्याला माझा संदेश समजला. या जगात एकही अशी जागा नाही की जेथे तुम्ही स्वत:पासून दूर जाऊ शकता. त्यामुळे शिष्यांनो कोणीच पाहत नाही अशी कल्पना करून एकही कृती करू नका. तुम्हाला जे वाटतं, जे तुम्ही स्वत:ला दाखवू शकता. ज्याची तुम्हाला लाज वाटत नाही केवळ आणि केवळ असेच कृत्य करा. मला विश्‍वास आहे की अशी प्रत्येक कृती चांगल्या भावनेतूनच असेल. असे केलेत तर तुमच्या हातून आयुष्यभर एकही वाईट कृती घडणार नाही.'
Related Posts Plugin for WordPress, Blogger...