12/02/2013

ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता

काळ्यारात्रीला पार करून शुभ्र सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगत असतांना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याच्या शोधात आहे. अशा नाविन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपला विकास साधत असतो. आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी आकाशवाणीचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

अलिकडच्या काळात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे. याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. प्रथम कृषीक्षेत्रातील काही नव्या तंत्रांची माहिती घेऊयात.

अलिकडच्या दशकात शेतीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नॅनो म्हणजे छोटा. 80 च्या दशकात जन्म घेतलेल्या नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनस्पतींमधील सुप्त गुणांवर प्रयोग करून नवीन जाती विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. नॅनो चिप्सच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये असणारी विविध जनुके यांची चाचणी केली जाते. त्यातून कोणते जनुक वनस्पतीच्या चांगल्या स्थितीत व आजारपणाच्या काळात स्थिरावते किंवा क्रियाशील राहते याची कल्पना येते. या नॅनो तंत्राचा वापर करून पिकांवर पडणार्‍या किडी आणि रोगाचे नियंत्रण करता येते. नॅनो यंत्र अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतीची सुदृढता करून घेता येते. याच तंत्राच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून या खतांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम व जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पिकांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठीही या तंत्राची मोठी मदत होते. भाजीपाला साठवण व त्यावरील प्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत तर होतेच मात्र त्यातून गावातील शेतकर्‍यांचा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्यास मदत होते. याशिवाय लेसरचा वापर करून शेताचे सपाटीकरण, शेतात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जमिनीचे परीक्षण करण्याची पोर्टेबल किट वापरणे इत्यादी देखील नव्या तंत्रज्ञानाचे कृषि क्षेत्रातील उपयोगाची उदाहरणे देता येतील.

शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराला देखिल नव्या तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य झाले आहे. सौर ऊर्जेचा उपयोग पाणी गरम करणे, पदार्थ शिजविणे याबरोबरच रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो. अलिकडच्याच संशोधनाने आता आपली पिके, फलोद्यान, खुली कोठारे, कृषिभवने इत्यादींचे संरक्षणासाठीसुद्धा सौरऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे. ‘सौर फोटोव्होटाईक विद्युत कुंपण’ या तंत्राद्वारे हे संरक्षण करता येऊ शकते. यामध्ये रक्षित करावयाच्या क्षेत्राला दिलेल्या कुंपणामध्ये सौरऊर्जेद्वारे सौम्य प्रमाणात वीज प्रवाहित केली   जाते. ज्याद्वारे रानटी जनावरे, गुरेढोरे इत्यादींनी विद्युत कुंपणाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना 0.0003 सेकंद एवढा विद्युत धक्का जाणवतो, शिवाय ज्यातून त्या जनावरांना कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. मात्र ती जनावरे पुन्हा त्या कुंपणाला स्पर्श करीत नाहीत आणि आपले क्षेत्र त्यांच्यापासून सुरक्षित राहते. या तंत्राला ‘सौर कुंपण’ म्हणूनही संबोधले जाते.

एखाद्या रोगाची लागण कोणत्याही प्रदेशात झाली तरी त्यावर त्या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या योग्य आणि यशस्वी उपाययोजनेबाबतची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ज्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर त्या उपाययोजनांची माहिती घेता येऊ शकते. तसेच अधिक उत्पादन देणार्‍या  नव्या प्रयोगांची माहितीही आपल्याला इंटरनेटद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्यामुळे प्रयोगशील शेतकर्‍यांना नवे प्रयोग राबविण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय दररोजचे हवामान, वेधशाळेचा पावसाचा अंदाज इत्यादी माहितीदेखिल आपण इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून घेऊ शकते.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येऊ शकते. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते.
गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.  

गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून प्रशिक्षण थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. ज्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण संगणकाची मदत घेऊ शकतो.  याहीपलिकडे जाऊन गावाबाहेर असणार्‍या गावकर्‍यांना गावाच्या विकासात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना गावातील परिस्थिती, हवामान, पीक-पाऊस, गावातील एखादी महत्त्वाची घटना इत्यादीं माहितीच्या देवाणघेवाणीकरिता ई-मेलचा, एसएमएसचा, मोबाईलचा वापर करता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.

मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात.

धन्यवाद!

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...