May 18, 2019

आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात एक जण म्हणाला, "आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि आपल्याकडे काहीही नाही.' यावर त्या सर्वांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शेवटी प्रत्येकाने आपण आयुष्यात निराश असल्याचे सांगितले. तोपर्यंत दुपार झाली होती. त्यामुळे सर्वांना भूक लागली. एवढ्यात जंगलात काहीच मिळणार नाही म्हणून ते केवळ पाण्याचा शोध घेऊ लागले.पाण्याचा शोध घेता घेता त्यांना घनदाट जंगलात एक झोपडी दिसली. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिले. आत एक वृद्ध स्त्री होती. तिला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले. "आजी, आम्हाला थोडे पाणी मिळेल का?', एकाने विचारणा केली. वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, "मी पाणी फार दूरवरून आणते. इथे जवळपास पाणी नाही. तरीही माझ्याकडे पुरेसे पाणी आहे. पण ते पाणी देण्यासाठी काही नाही. फक्त नारळाच्या छिद्र पडलेल्या करवंट्या आहेत. त्यात तुम्हाला पाणी चालेल का?', वृद्धेने विचारणा केली. "हो, हो अगदी चालेल की!', तहान लागल्याने चौघांनी एकदमच होकार दिला. वृद्धेने वेगवेगळ्या आकाराच्या तीन कवट्यांमध्ये पाणी दिले. त्यामुळे एकाने शेवटी पाणी पिले. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर एक जण सहज म्हणाला. "आजी तुम्हाला इथं जंगलात छान प्रसन्न वाटत असेल ना? आम्हाला तर शहरात राहायचा आणि जगायचा कंटाळा आला आहे. रोज काहीतरी नव्या समस्या असतातच हो!' एकाने नाराजीचा सुरात माहिती दिली.

आजी म्हणाल्या, "बाळांनो, आयुष्यात कधीही नाराज होऊ नको. आता हेच बघा ना तुम्हाला आता मी ज्या करवंट्यामध्ये पाणी दिले होते. त्यापैकी तीनही करवंट्या एकसारख्या नव्हत्या. एकाला तर करवंटी मिळालीच नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्याने वापरलेली करवंटी नंतर वापरावी लागली. दोन करवंट्यांना छिद्रे पडली होती. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पाणी पिऊन तहान भागविलीतच ना? आयुष्याचंही असच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.' वृद्धेचा संदेश ऐकून तिघांनाही बोध झाला.

May 17, 2019

एक विचार नाश करू शकतो! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तेथे एका गुरुकुलात अनेक वर्षांपासून काही शिष्य विद्या ग्रहण करत होते. गुरूकुलातील गुरूजी शिष्यांवर प्रचंड प्रेम करत होते. दरवर्षी शिष्यांची एक तुकडी शिक्षण घेऊन बाहेर पडत होती. गुरूजी दरवर्षी मोठा निरोप समारंभ आयोजित करत होते. शिष्यांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले जायचे. एका वर्षी अशाच एका निरोप समारंभाची तयारी सुरू होती. एक शिष्य गुरुंकडे आला. तो अस्वस्थ असलेला गुरूजींना दिसला. ते म्हणाले, "काय झाले?' तो बोलू लागला, "गुरूजी, मी गेल्य अनेक वर्षांपासून येथे आलो आहे. मी सर्व विद्या ग्रहण केली. मला त्या साऱ्या विद्या अवगत आहेत. पण इतर शिष्यांप्रमाणे मी एकाही विद्येत पारंगत नाही. माझे आयुष्यात काय होईल? मी समर्थपणे आयुष्य जगू शकेल का? मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे गुरूजी.' त्यावर गुरूजी काहीही बोलले नाही. शेजारीच एक लिंबाचे झाड होते. गुरूजींनी शांतपणे एक लिंबू काढला आणि शिष्याच्या हातात ठेवला. आणि त्याला स्वयंपाक घरात घेऊन गेले. गुरूजींनी ते लिंबू कापायला सांगितले. शिष्याने ते कापले. आता गुरूजींनी निरोप समारंभातील भोजनासाठी तयार केलेल्या बासुंदीच्या मोठ्या पातेल्याजवळ शिष्याला आणले. गुरूजी म्हणाले, "हे कापलेल्या लिंबाचा एक थेंब फक्त या बासुंदीत सोड.'शिष्याला आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, "गुरूजी त्यामुळे एवढी सारी बासुंदी खराब होईल. वाया जाईल. फेकून द्यावी लागेल. कोणालाही खाता येणार नाही.' त्यावर गुरूजी शांतपणे बोलू लागले, "वत्सा, जर लिंबाच्या एका थेंबामुळे एवढी सारी बासुंदी खराब होत असेल, तर नैराश्‍याच्या, अस्वस्थतेच्या साध्या किरकोळ विचाराने तुझे मन खराब होणार नाही का? ज्याप्रमाणे खराब झालेली बासुंदी कोणी खाऊ शकणारय नाही, ती टाकून द्यावी लागेल. त्याप्रमाणे तुझे खराब झालेल्या मनाचा तरी काय उपयोग?' एवढे सारे ऐकून शिष्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने गुरूजींचे चरण धरले. "वत्सा, आयुष्यात कधीही नकारात्मक विचार मनाला स्पर्श करू देऊ नकोस. सतत सकारात्मक विचार कर आणि पुढे जा. एक वेळ शरीरावर जखम झाली तर ती भरून निघेल. पण मनाला जर जखम झाली तर ती भरून येईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे नकारात्मक विचारापासून सतत दूर रहा', एवढे बोलत गुरूजींनी पूर्णविराम दिला.

May 16, 2019

...असं होतं माणसाचं मन शुद्ध! (बोधकथा)

भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांबरोबर दूरच्या प्रवासाला निघाले होते. ते एका गावात पोहोचले. शेजारी नदी वाहत होती. बुद्धांनी सर्वांना थांबण्याचे आदेश दिले. सर्वजण एका झाडाखाली थांबले. बुद्धांनी तहान लागल्याचे सांगितले. एक शिष्य समोर आला. "गुरुवर्य मी शेजारच्या नदीतून पाणी घेऊन येतो' असे म्हणत तो कमंडलू घेऊन नदीकडे निघाला. काही वेळाने तो परतला. मात्र कमंडलू रिकामेच होते. बुद्धांनी विचारले, "पाणी का आणले नाहीस?' त्यावर त्याने या नदीतील पाणी खूप अस्वच्छ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "या नदीत कोणी कपडे धुवत आहेत. कोणी जनावरांना स्वच्छ करत आहे. कोणी स्नान करत आहेत. पाणी दूषित आहे. गुरुवर्य ते पाणी पिण्यायोग्य नाही.' यावर बुद्ध म्हणाले, "ठीक आहे. आपण आपला प्रवास सुरू ठेवू आणि पुढे कोठेतरी पाणी पिऊ' सर्व जण त्याच रस्त्याने सरळ पुढे प्रवासाला निघाले. शेजारून नदी वाहतच होती.साधारण 4-5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर बुद्धांनी पुन्हा सर्वांना थांबायला सांगितले. त्यांनी या आधी पाणी आणायला गेलेल्या शिष्याला बोलावले. त्यालाच पुन्हा पाणी आणण्यास सांगितले. तो कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी वाहत असलेल्या नदीकडे निघाला. नदीचे पाणी स्वच्छ होते. आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याने कमंडलू बुडवून पाणी भरले. तो बुद्धांजवळ आला. बुद्धांना त्याने कमंडलू दिले. बुद्ध म्हणाले, "मघाशी तुला ज्या नदीतील पाणी अस्वच्छ वाटत होते. त्याच नदीतील हे पाणी आहे. केवळ पुढे वाहत आल्याने ते स्वच्छ झाले. माणसाच्या मनाचेही असेच असते. मनाला एखाद्या चिंतेने ग्रासले की त्रस्त होऊ नये. केवळ काही काळ निघून गेला की या पाण्याप्रमाणे माणसाचे मनही स्वच्छ होते.'

May 15, 2019

सात्विक दान (बोधकथा)

एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते.काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली.

हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.'

बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.

May 14, 2019

ते स्वीकारूच नका! (बोधकथा)

एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला. "तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात....', अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला.स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग 5-7 मिनिटे बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले. काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला.

आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो बुद्धांना म्हणाला, "मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला? तुम्ही शांत कसे?' त्यावर बुद्ध म्हणाले, "मला एक सांग तू एखाद्याला भेट देण्यासाठी भेटवस्तू खरेदी केली आणि ती भेटवस्तू एखाद्याने स्वीकारलीच नाही. तर ती वस्तू कोणाची असेल?' तो व्यक्ती म्हणाला, "अर्थातच. मी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू माझीच असेल. पण त्याचा इथं काय संबंध?' बुद्ध शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, "वत्सा, तू दिलेल्या शिव्या आणि तू दिलेले वाईट शब्द आम्ही स्वीकारलेच नाहीत. त्यामुळे ते कोणाचे झाले?' त्यावर त्या व्यक्तीला आपली चूक उमगली आणि त्याने बुद्धांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून तो व्यक्ती बुद्धांचा शिष्य बनला. बुद्ध म्हणाले, "आयुष्यात बऱ्याच गोष्टी नाकारणे शक्‍य असतानाही आपण नको त्या गोष्टी स्वीकारतो त्यामुळे आपण बऱ्याचदा संकटात सापडतो. त्यामुळे चराचरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच स्वीकारा आणि आनंदी, उत्साही, शांत राहा.'

May 7, 2019

प्रेम (नवी कविता)जमीन तीच, आभाळ तेच
काळजाला लागते जोरात ठेच
तेव्हा समजा खरं खरं
नक्की पडलात प्रेमात बरं

कुट्ट अंधार लख्ख प्रकाश
गोड दिसतं सगळं आकाश
ध्यानी मनी स्वप्नी तेच
दूर होतात सगळे पेच

चंद्रात दिसतं आपलं प्रेम
आयुष्य होतं सुंदर गेम
तिचं त्याचं सगळंच सेम
एक होणं उरतं एम

तिची आवड, त्याची गोडी
हवीशी वाटते प्रत्येक खोडी
जपावा वाटतो प्रत्यक्ष क्षण
प्रेमातच जगू लागतं मन

त्याचं हसू, तिचे आसू
होऊ लागते खूप कदर
पोटात घ्यायला छोट्या चुका
मोठा होतो खूप पदर

व्यंकटेश कल्याणकर


May 6, 2019

आयुष्याचा उत्सव व्हावा (नवी कविता)लाथ मारुनी आव्हानांना
गंध यशाचा धुंद करावा
मिठित घ्यावी आपुली स्वप्ने
आयुष्याचा उत्सव व्हावा

तोच श्वास अन तीच हवा
पळ पळ भासो नित्य नवा
सजीव होण्या जिवंतपणा
आयुष्याचा उत्सव हवा

नको निराशा, नकोत मोह
स्वत: स्वत:चा सोडू डोह
जगणे आपुले सार्थ कराया
आयुष्याचा उत्सव व्हावा

कष्ट करा, गाळा घाम
नष्ट होतील सारे ताण
उंच होईल तुमची मान
आयुष्याचा उत्सव छान

होईल जेव्हा आपुला अंत
नयन मिटूया तेव्हा शांत
पाहून आपुला आयुष्य उत्सव
मरणाचाही होईल महोत्सव

व्यंकटेश कल्याणकर

Dec 23, 2018

काय आहे EMV कार्ड?


सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरपर्यंत बदलून घ्यावे लागतील अशा आशयाचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये झळकत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशातील सर्व बॅंकांना सर्व खातेदारांचे कार्ड EMV प्रकारात बदलून घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर २०१८ ही अंतिम मुदत होती. (संदर्भ:  https://www.businesstoday.in/sectors/banks/emv-chip-credit-card-atm-card-without-this-feature-will-stop-working-after-december-31/story/295405.html )  या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काय आहे EMV कार्ड? आणि का बदलून घ्यायचेत हे कार्डस्?  तत्पूर्वी कार्डचा प्रवास कसा सुरु झाला आणि त्यामध्ये कसा बदल होत गेला याबद्दलची माहिती फारच मजेदार आहे. त्यावर एक नजर टाकूयात -

टप्पा - १
अमेरिकेमध्ये १९७० च्या दशकात ज्यावेळी सर्व प्रथम कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. त्यावेळी कार्डधारकाला जेथे जेथे कार्ड पेमेंट करायचे आहे तेथे तेथे कार्डची झेरॉक्स (Imprint) द्यावी लागायची. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कार्डची सतत्या पडताळण्यात येत नव्हती. त्यामुळे संबंधित कार्ड देणा-या बॅंकेला संबंधित रक्कम स्वीकारणारा व्यक्ती (व्यापारी) फोनवर कार्डची माहिती विचारायचा आणि सत्यता पडताळल्या नंतर तो व्यवहार पूर्ण व्हायचा. या प्रकारात कोठेही कार्डधारकापासून त्याचे कार्ड दृष्टिआड केले जात नव्हते. अशा प्रकारात गैरव्यवहार टाळण्यासाठी त्याकाळी बनावट किंवा अवैध कार्डस्चे क्रमांक असलेली यादी प्रसिद्ध केली जात होती. त्यावरून संबंधित व्यापारी कार्डची सतत्या पडताळून खात्री करूनच कार्ड पेमेंट स्वीकारत होता. कोणतेही बनावट किंवा अवैध कार्ड आढळले तर त्या त्या वेळी यादीमध्ये त्याची नोंद केली जात होती.

टप्पा - २
वरील प्रकारात व्यवहार पूर्ण होण्यास बराच वेळ जात असावा म्हणून त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली व्यवहार पूर्ण करणारे कार्डस् आले. मात्र, यामध्ये कार्ड स्वॅप करणारे मशीन हा मुव्हेबल नसल्याने आणि कार्ड पेमेंटसाठी पिन क्रमांकाची गरज नसल्याने पेमेंट करताना कार्डधारकाच्या दृष्टिआड जाऊन कार्ड स्वॅप करावे लागत होते. अशा प्रकारात स्वॅप मशीमध्ये कार्डचे क्लोन तयार करणारे प्रोग्राम बनवून गैरव्यवहार करणे अधिक सोपे होते. त्यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक होता.

टप्पा - ३
सध्या अस्तित्वात असलेले कार्डस हे या टप्प्यात येतात. यामध्ये वायरलेस कार्ड रिडिंज मशीनमध्ये कार्ड स्वॅप करता येते. ते ही कार्डधारकाच्या डोळ्यासमोर आणि कार्डधारकाला दिलेला चार अंकी पिन क्रमांक नोंदविल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही.
मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड  (चुंबकीय कार्ड) म्हणजे काय?
दीड दशकापूर्वीपर्यंत आपण कॅसेट नावाच्या एका तंत्र प्रकारातून गाणी ऐकत होतो. या कॅसेटमध्ये मॅग्नेटचेच तंत्र वापरण्यात येत होते. म्हणजे मॅग्नेटच्या पार्टिकल्समध्ये माहिती स्टोअर केली जायची आणि हवी तेव्हा ती ध्वनीच्या स्वरुपातील (Audio) माहिती वाचता (ऐकता) येत होती. हेच तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात असलेल्या काही (बहुतेक सर्व) डेबिट/क्रेडिट कार्डमध्ये वापरले जात आहे. तुमच्या कार्डच्या मागच्या बाजूला एक काळी पट्टी असेल तर तुमचे कार्ड मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आहे असे समजा. यामध्ये तुमच्या बॅंकेची माहिती मॅग्नेट पार्टिकलमध्ये साठविलेली असते.  दुसर्या महायुद्धापासूनच हे तंत्रज्ञान विकसित झाले असून १९५० च्या दशकात संगणकीय माहिती साठविण्यासाठी या तंत्राचा वापरास प्रारंभ झाला. (संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Magnetic_stripe_card)

काय आहे EMV कार्ड?
युजर्सच्या माहितीची सर्वतोपरी सुरक्षितता असावी यासाठी विविध पेमेंट कार्डस् बनविणार्या तीन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी समान तांत्रिक परिमाणे असलेले सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित असे EMV कार्ड विकसित केले. EMV शब्दातील प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे ज्या तीन कंपन्या एकत्र आल्या त्या कंपन्यांच्या नावाचे आद्याक्षर आहे. अर्थातच EMV म्हणजे Europay, Mastercard and Visa  (संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/EMV#Differences_and_benefits_of_EMV )

EMV कार्डस तांत्रिक परिमाणे पूर्ण करणा-या कार्डसला `चिप ऍण्ड पिन' किंवा `चिप ऍण्ड सिग्नेचर' असेही म्हटले जाते. तसेच या तंत्राला Smart Card Based Credit Card Payment System असेही म्हटले जाते.तुमचे कार्ड मॅग्नेटिक स्ट्रिप आहे की EMV कसे ओळखाल?
अगदी साधी, सोपी गोष्ट म्हणजे तुमचे कार्ड दोन्ही बाजूने व्यवस्थित बघा. कार्डाच्या दोन्ही पैकी कोणत्याही एका बाजूला डाव्या कोप-यात एक इलेक्ट्रॉनिक चीप (गोल्डन कलर असलेली) दिसेल. जर अशी चीप तुमच्या कार्डावर आढळली  तर समजावे की तुमचे कार्ड हे EMV प्रकारातील आहे. त्यामुळे तुम्हाला कार्ड बदलण्याची काहीही गरज नाही. जर तुमच्या कार्डावर अशी चीप नसेल तर तुम्हाला तुमचे कार्ड बदलून घेणे गरजेचे आहे. (संदर्भ:  https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1488896581658_FAQS.pdf )  येथे नोंद करण्यासारखी एक महत्वाची बाब म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक कार्डस हे EMV कार्ड आणि मॅग्नेटिक कार्ड अशा दोन्ही प्रकारांत काम करतात.EMV कार्डचे लाभ काय आहेत?
१) मॅग्नेटिक कार्डसच्या तुलनेत प्रत्यक्ष व्यवहार करताना EMV कार्डस कमी वेळ घेतात.
२) मॅग्नेटिक कार्डसच्या तुलनेत EMV कार्डस अधिक सुरक्षित असतात.

सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक कार्डस् हे EMV कार्डस आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेले सर्वच्या सर्व कार्डस बदलून घेण्याची आवश्यकता नाही, हे मात्र नक्की.

(संपादन, संकलन: व्यंकटेश कल्याणकर)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...