12/04/2013

जीवनमूल्यांचे आदर्श

अवघ्या पृथ्वीतलावरील समस्त मनुष्यमात्र हा शाश्वत सुख, आंतरिक समाधान, मानसिक शांती आणि निस्सीम प्रेमाच्या शोधात असतो. त्याकरिता तो वेगवेगळे मार्ग अवलंबित असतो. मात्र, या सार्‍यांकडे जाणारे मार्ग मूल्यांच्या वाटेवरूनच जात असतात. इंद्रियसुखातून आपणास क्षणिक सुख आणि अशाश्‍वत आनंद मिळतो, तर आत्मसुखातून चिरंतन आनंद मिळतो. एखाद्या गर्दीच्या बसमधून तुम्ही बसून आनंदाने प्रवास करीत आहात. मात्र, बसमधील गर्दीत एखादी वृद्ध व्यक्ती उभ्याने प्रवास करीत असताना तुम्हाला दिसते. अशा वेळी तुम्ही जर स्वत: उभे राहिलात अन् त्या वृद्धाला बसण्याकरिता जागा दिलीत तर त्यातून जो आनंद मिळेल तो शाश्वत आनंद असेल.

दैनंदिन जीवनात अशा छोट्या छोट्या गोष्टी अवलंबिल्या तर तुम्ही असंख्य वेळा शाश्‍वत सुख अनुभवू शकाल. साधारणपणे स्वत:चे जीवनमान स्वत:च्या दृष्टीतून उंचावणारे सत्त्व म्हणजे मूल्य किंवा जीवनमूल्य असे आपल्याला म्हणता येईल. जीवन-मूल्यांवर आपली निष्ठा हवी. कै. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, ‘‘लोकांवरील, लोकशाहीवरील श्रद्धेच्या बळावर राष्ट्रनिष्ठा, समूहनिष्ठा, मानवतेवरील निष्ठा या जीवननिष्ठेपासून मी कधीही अलग होऊ दिल्या नाहीत.’’

प्रत्येक काळातील  राज्यकर्त्यांनी, पराक्रमी पुरुषांनी त्यांच्या कारकिर्दीत जीवनमूल्यांना सर्वोच्च स्थान देण्याचा प्रयत्न केला आहेे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तर मूल्ये जोपासणार्‍या राजाचे जाज्वल्य आणि आदर्श उदाहरणच आहे. स्त्रीवर केल्या जाणार्‍या अत्याचाराविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद महाराजांनी आपल्या कार्यकाळात अवलंबिली होती. यामुळे अवघ्या स्त्रीवर्गाला सन्मान देण्याचे मूल्यशिक्षण त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवून दिले. अशा प्रकारच्या अनेक मार्गांतून त्यांनी राज्यातील रयतेमध्ये मूल्यांचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला होता.

सत्यवचन, प्रामाणिकपणा, अहिंसा, समता, स्त्री-पुरुष समानता यासारखे उच्चकोटीचे जीवनादर्श म्हणजेच जीवनमूल्य होय. एखाद्या व्यक्तीचे मूल्य (रुपयांतील नव्हे) निश्‍चित करायचे असेल तर त्याच्या जीवनात त्याने अंगीकारलेल्या मूल्यांचा विचार करणे अनिवार्य आहे. फुलांंचा सुगंध, एखाद्या पदार्थाची चव, मायेचा कोमल स्पर्श या गोष्टी ज्याप्रमाणे इंद्रियांना संतुष्ट करतात, त्याचप्रमाणे ‘जीवनमूल्ये’  मनाला संतुष्ट करतात, त्यातून चिरंतन आनंदाचा अनुभव देतात. जीवनमूल्ये प्रत्यक्ष दिसत नाहीत, ती अनुभवावी लागतात. त्यामुळेच येथे प्रत्यक्ष कृतीतून जीवनमूल्ये अंगीकारणार्‍या महापुरुषांची उदाहरणे दिली आहेत.
संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींनी किंवा महापुरुषांनी सर्वच्या सर्व जीवनमूल्यांना आपल्या जीवनात अग्रक्रम दिला. या मूल्यसंवर्धनाकरिता, जनसामान्यांमध्ये ते रुजविण्याकरिता, त्यांच्या प्रचार-प्रसाराकरिता आपले अवघे जीवन खर्ची घातले. भारता-सारख्या विविध संस्कृतींनी नटलेल्या देशात प्रत्येक सांस्कृतिक परंपरेमध्येही याच मूल्यांच्या संवर्धनाला वेळोवेळी अधोरेखित केले आहेे.

सत्यवचन

फार पूर्वी राजा हरिश्चंद्र नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने आपल्या हयातभर आपले वचन पाळण्या- करण्याकरिता प्रयत्न केले. त्यासाठी त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्याला अक्षरश: तिलांजली दिली. सत्य-वचनाचा आदर्श ठेवताना राजा हरिश्चंद्राचे नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सत्यवचन हे जीवनमूल्य अंगीकारणे सद्यकाळात अत्यंत आवश्यक आहे. नव्हे, ती काळाची गरज बनत चालली आहे.

अहिंसा

अहिंसा या मूल्याचा विचार करताना आपणास अलीकडच्या काळात आदर्श उदाहरण ठरलेल्या गांधीजींचा उल्लेख करावा लागेल. गांधीजींनी अहिंसा-मूल्याला आपले जीवन मानले. बालपणी एकदा गांधीजींना त्यांच्या आईने बाजारातून आंबे आणायला सांगितले. गांधीजी बाजारात गेले. त्यांनी सर्वोत्कृष्ट असे दिसणारे आंबे खरेदी करून घरी आणले. ज्या वेळी त्या आंब्याचा आमरस करण्यात आला. त्या वेळी ते आंबे अत्यंत निकृष्ट प्रतीचे आढळून आले. तेव्हा गांधीजीं आमरसाचे ते भांडे जसेच्या तसे घेऊन बाजारात गेले. जेथून आंबे खरेदी केले होते त्या व्यापार्‍याकडे ते आले आणि आंबेखरेदी केलेले पैसे परत करण्याविषयी त्यांनी विनंती केली. छोट्या मुलाला पाहून व्यापार्‍याने त्याकडे दुर्लक्ष केले. पैसे मिळणार नाहीत, असे त्याने सांगितले. त्यावर गांधीजी तेथेच शेजारी उभे राहिले आणि त्यांनी त्या व्यापार्‍याकडे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला त्या भांड्यातील आमरसाची चव दिली आणि सांगितले, की येथून आंबे खरेदी करू नका, येथे आंबे निकृष्ट प्रतीचे आहेत. ही घटना पाहून त्या व्यापार्‍याने गांधीजींना पैसे परत दिले. अशा प्रकारे त्यांनी बालपणापासूनच अहिंसेचा मार्ग अवलंबिला. त्याच बळावर त्यांनी मोठा जनसमुदाय या मूल्याकडे वळविला. या समुदायाचे प्रबोधन करून अहिंसेच्या माध्यमातून परकीय आक्रमकांविरूद्ध लढा दिला. आपले आजचे स्वातंत्र्य हे त्यांच्या लढ्याचे फळ आहे.

समता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि सामाजिक न्याय या जीवन-मूल्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले. त्याकरिता त्यांनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा संत तुकाराम महाराजांचा विचार त्यांनी जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. सगळी माणसे सारखी आहेत. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. त्यामुळे सर्वांना समतेची, न्यायाची वागणूक मिळावी, असा विचार त्यांनी अधोरेखित केला. त्याकरिता व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करून दाखविले.

शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांकरिता जीवनमूल्य

अलीकडेच शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेत नव्याने येऊ इच्छिणार्‍यांकरिता तसेच शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतही नीती व मूल्य हे विषय समाविष्ट केले आहेत.

या पार्श्वभूमीवर शासकीय कामाकरिता कार्यालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देणे, कामावर श्रद्धा-निष्ठा ठेवणे, काम पारदर्शकपणाने करणे, कामात प्रामाणिकपणा ठेवणे, यासारखी अनेक जीवनमूल्ये प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे. त्यातून आपले परमवैभवाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईलच त्याशिवाय स्वत:ला शाश्‍वत आनंदाचाही अनुभव येईल.

(यशदा यशमंथन  जुलै-सप्टेंबर २०१३)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...