11/16/2019

मार्ग (लघुकथा)

`हॅलो, आज लवकर येशील? मला खूप बोअर होतयं रे!''
``हो... आज काही एवढं काम नाहीए येतो लवकर..''
ती, तो आणि त्यांचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. गोंडस कुटुंब. ती नोकरी करायची. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात नोकरी सोडली. छानसं बाळ झालं. मुलगी झाली. 
दारावरची बेल वाजली. तो आला. तिनं त्याला मिठीच मारली आणि ठसाठसा रडू लागली.
``राणी , अगं काय झालं'' तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.
``मला जगावसं वाटत नाही रे. खूप कसं तरी होतय रे.''
``तुझं काही दुखतय का? चल, मी डॉक्टरांना फोन लावतो. जाऊयात.''
``नाही रे. दुखत काही नाही. पण काय होतय तेच कळत नाही. म्हणजे बघ, पूर्वी कशी मी छानपैकी माझ्या प्रत्येक मिनिटा मिनिटाचं नियोजन करायचे. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, आपलं फिरणं, गप्पा किती छान जगत होते मी.''
``हो, काय भारी वाटायचं. आताही आपण हे सगळं करू शकतोच ना?''
``नाही रे. आता ही आलीय ना आपल्याकडं.''
``म्हणून काय झालं?''
``तिला घेऊन कुठं फिरणार अरे.''
``होईल ती लवकरच दोन-तीन महिन्यात सगळं ठीक होईल, राणी''
``बघ, दोन तासापासून त्रास देत होती. आता कुठं झोपलीय.''
``अगं बाळ आहे ते. त्याला काय माहिती आहे आपण जे करतोय त्यामुळं आपल्या आईला त्रास होतोय ते.''
``हो, अरे. पण ही झाल्यापासून या चार भिंतीतच मला जगावं लागतयं. ती तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणाकडे जात पण नाही रे.''
``तिला पाळणारघरात ठेवून तू नोकरी करतेस का?''
``मला तर आता वाटतय की मी या घरातून पुन्हा बाहेर जाईल की नाही. माझं सगळं संपलयं राजा.'' असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली.
त्यानं तिला गच्च मिठीत घेतलं. ``हे बघ, अगं ही आयुष्यातील एक फेज आहे. काळ निघून गेला की ही फेजही संपेल. तू पुन्हा तुझी नोकरी, तुझा पूर्वीसारखा कार्यक्रम सुरु ठेवशील.''
``मला तर आता असं काही वाटत नाही. ही फेज जाईपर्यंत मी राहते की...''
 तिच्या तोंडावर हात ठेवत तो बोलला, ``काहीही काय बोलते अगं, तू...''
``अरे, दिवसभर ती माझं आणि मी तिचं तोंड बघत बसते.  मलाही बोअर आणि तिलाही बोअर होत असेल.''
`हमममम'''
`कधी कधी वाटतं, आपण उगाच हिला जन्म...''
पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवत तो  म्हणाला, ``राणी, अगं.. असं ना बोलू..'
``मग मी काय करायचं दिवसभर सांग बरं तू?''
आता तो बोलू लागला, ``अगं सगळ्यात पहिल्यांदा तू हे असले विचार करणे सोडून दे. बी पॉझिटिव्ह. खूप काही करता येण्यासारखं आहे.''
``गप्पा मारणं सोप्पयं रे. दिवसभर तिच्याजवळ रहावं लागतं. तिला बघावं लागतं.''
``हो न. पण ती ज्यावेळी झोपते न त्या वेळेत खूप काही करता येतं.''
``काय? तेच तर सांग ना?''
``हे बघ,  ती झोपली की तू पुस्तक वाचू शकतेस, पेपर वाचू शकतेस.  टीव्ही पाहू शकतेस.''
``हे सगळं नाही आवडत मला.''
``मग तू फेसबुकवर मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारू शकतेस. चॅट करू शकतेस.''
``हे पुरुष लोक हरामखोर असतात अरे. थोड्या गप्पा मारायल्या की लागतात सलगी करायला...''
``असं नाहीए. पण असो. तू न तिला झोपवतेस कसं?''
``बाबा रे, तिला मांडीवर. मांडी हलवत गाणी म्हणत झोपवावं लागतं.''
``ओह. बघ तू जी गाणी म्हणतेस न ते रेकॉर्ड कर फोनवर...'
``आणि त्याचं काय करायचं?''
``फेसबुक, युट्युबवर आणि साऊंडच्या कितीतरी ऍप आणि वेबसाईटस् आहेत त्यावर अपलोड करायची गाणी.''
``बरं हे झालं. आणखी काय करायचं?''
`` रेडिओ ऐकायचा. त्यावर स्पर्धा असतात. त्यात भाग घ्यायचा.''
``आणखी''
``उद्या तुला एक डायरी आणून देतो. त्या डायरीत तुझ्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग लिहायचे आणि आयुष्यात पुढे काय काय करायचं आहे हे लिहायचं. दररोज किमान एक पान तरी लिहायचं.''
``हमम...''
``तू फक्त एवढं कर मनापासून. पुढचं पुढे सांगतो.'', असं म्हणत त्यानं तिच्या गालावर हळूवार किस्सू केला.

***

काही दिवसांनी...

`हॅलो, अरे राजा आज लवकर येशील का? मला न बक्षीस मिळालयं रेडिओच्या स्पर्धेत. ते आणायला जायचयं..''
``वॉव, ग्रेट. निघतो मी लवकर''

**

आणखी काही दिवसांनी... 
``राजा, अरे आज मी खूप खुष आहे.''
``काय झालं?''
``तू दिलेल्या त्या डायरीत मी आठवण म्हणून जी कविता लिहिली होती न. ज्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं कॉलेजात असताना. ती आज पेपरात छापून आली आहे.''
``अरे व्वा. भारीच की''
``खूप जणांचे फोन आले. सोसायटीतील बायकांनीही फोन केलेला. खूप भारी वाटतयं. आता मी आठवड्यात एक तरी कविता लिहिणार.''
आज मी लवकर येतो.

सायंकाळी...
आल्या आल्या त्यानं तिला मिठीत घेतलं आणि हळूवारपणे केसावर हात फिरवत म्हणाला, ``हे बघ. महिन्याभरातच तू कशी फ्रेश झालीस. बी पॉझिटिव्ह राणी. आपल्याकडं करता येण्यासारखं खूप काही असतं. पण आपण वेगळा विचार कधी करत नाही. आपल्या अडचणींवर मात आपणच करायला हवी. छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद लुटायला हवा. लक्षात ठेव दूधात लिंबाच्या रसाचा एक थेंब जरी पडला तरी ते सगळं दूध नासून जातं अगदी एक थेंब किती तरी लिटर दूधाला संपवतं. तसचं आपल्या मनाचं असतं. मनाला एक वाईट विचारानं स्पर्श केला की आपली विद्वत्ता, हुशारी, प्रगल्भता नासून जाते. त्यामुळं मनाला कधी मळ चढू द्यायचा नाही. बस्स... बघ एवढं गोड बाळाला सांभाळत असतानाच तूच तुझ्या अडचणीवर मार्ग काढलास की नाही...''
``हो, रे माझ्या राजा आता मला आणखी काही कविता सुचताहेत. त्यांचं मी एक पुस्तक छापणार आहे.''
``ग्रेट... ग्रेट'', असं म्हणत असताना लाडानं तिनचं त्याच्या ओठावर ओठ टेकवला.

© व्यंकटेश कल्याणकर

#Anandyatri #VyankateshKalyankar

Related Posts:

  • हत्तीची गोष्ट! (बोधकथा) आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता… Read More
  • एक ठिणगी कधी... कधी... आकाश भरून येतं. आक्राळविक्राळ काळेकुट्ट ढग एकत्र येतात. भयावह काळोख गिळायला पाहतो. क्षितीज संपलयं वाटतं. संकटं मिठित घेतात. आव्हानं क्रूर थट्टा करतात. अस्ताचा आरंभ झाल्यासारखं वाटतं. पण....  तेवढ्यात, त… Read More
  • ...असं होतं माणसाचं मन शुद्ध! (बोधकथा) भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांबरोबर दूरच्या प्रवासाला निघाले होते. ते एका गावात पोहोचले. शेजारी नदी वाहत होती. बुद्धांनी सर्वांना थांबण्याचे आदेश दिले. सर्वजण एका झाडाखाली थांबले. बुद्धांनी तहान लागल्याचे सांगितले. एक … Read More
  • एक विचार नाश करू शकतो! (बोधकथा) आटपाट नगर होतं. तेथे एका गुरुकुलात अनेक वर्षांपासून काही शिष्य विद्या ग्रहण करत होते. गुरूकुलातील गुरूजी शिष्यांवर प्रचंड प्रेम करत होते. दरवर्षी शिष्यांची एक तुकडी शिक्षण घेऊन बाहेर पडत होती. गुरूजी दरवर्षी मोठा निरोप समारं… Read More
  • आनंदानं जगायला हवं (बोधकथा) चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात एक जण म्हणाला, "आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि … Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...