भुंग्याची गोष्ट

एकदा भुंगा आणि फुलपाखरू एका फुलाजवळ येतात. फुलपाखरू फुलावर बसलेले असते. फूल अतिशय सुंदर असते. मात्र सूर्यास्त झाला की फुलाच्या पाकळ्या आपोपाप मिटण्याचा गुणधर्म फुलात असतो. तसेच सूर्योदय झाला की फुलाच्या पाकळ्या आपोआप उघडतही असतात. भुंग्याचे फुलावर प्रचंड प्रेम असते. त्यामुळे "फुलावर सर्वाधिक प्रेम कोण करतो आणि फुल कोणाचे?' यावरून फुलपाखरू आणि भुंगा यांच्यामध्ये वाद होतात. वाद वाढत जातो. मात्र थांबत नाही. शेजारी असलेला एक जुना वृक्ष हा सारा प्रकार पाहत असतो. तो दोघांनाही शांत करतो आणि एक सल्ला देतो. "उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी जो या फुलाजवळ पहिल्यांदा पोचेल त्याचेच या फुलावर प्रेम असेल आणि हे फूलही त्याचेच होईल', असा सल्ला वृक्ष देतो. हा भुंगा आणि फुलपाखरू दोघांनाही मान्य होतो. त्यानंतर दोघेही निघून जातात.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एक फुलपाखरू फुलाजवळ येते. फुलाच्या पाकळ्या बंद असतात. त्या उघडण्याची फुलपाखरू प्रतिक्षा करत असतो. दरम्यान भुंगा अजूनही आला नाही याचा त्याला आनंद होतो. कारण आता विजय आपलाच असा त्याचा ग्रह होतो. काही वेळाने सूर्योदय होऊ लागतो. भुंगा अजूनही आलेला नसतो. फुलपाखराला त्याचा आनंद होतो. फुलाच्या पाकळ्या उघडू लागतात. फुलपाखरू आता फुलाच्या दिशेने जाऊ लागते. तोच त्याला धक्का बसतो. कारण त्याला फुलाच्या आत भुंगा मृतावस्थेत दिसतो. त्यावर त्याला काहीच कळत नाही. इतक्‍यात शेजारचे वृक्ष बोलू लागतो. "फुलपाखरा, सकाळी उशीर होऊ नये म्हणून भुंगा काल पाकळ्या मिटण्यापूर्वीच फुलात जाऊन बसला होता. त्याचे फुलावर खूप खूप प्रेम होते. रोजच्याप्रमाणे सूर्यास्त झाला आणि फुलाच्या पाकळ्या मिटल्या गेल्या. एरवी कोणतीही वस्तू पोखरून काढणारा भुंगा फुलांच्या पाकळ्यांना मात्र पोखरू शकला नाही. मी त्याला आवाज देऊन बाहेर येण्याचा सल्ला दिला. पण त्याने माझे ऐकले नाही. फूल संपूर्ण मिटले आणि सूर्योदय होईपर्यंत भुंग्याचा आत गुदमरून मृत्यु झाला.'

त्यावर फुलपाखराला प्रचंड वेदना झाल्या. "फुलपाखरा आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीपासून आपल्याला कितीही धोका असला आणि आपल्यात कितीही सामर्थ्य असलं तरी आपण त्या गोष्टीला इजा नाही पोचवू शकत', वृक्षाने मोलाचा संदेश दिला.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)