11/13/2019

अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळा


माणूस माणसांना जन्म देतो. माणसांची साखळी तयार होते. या साखळीचा प्रारंभ आणि अंत याचा विचार केला तर हाती केवळ तर्कच येतात. फार फार तर त्यांना थोडे फार किरकोळ संदर्भ असू शकतात.
आज या साखळीचा एक भाग होऊन वर्ष झालं. अर्थातच कन्या वल्लरी एक वर्षाची झाली. आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अॉपरेशन थिएटरात वल्लरीनं जन्म घेतला. तर प्रसव वेदनेच्या महापूरात Pradnya तील आईनं जन्म घेतला. अन अॉपरेशन थिएटराबाहेर व्यंकटेश कल्याणकर नावाचा बाप जन्मला.
काही वेळानं मी वल्लरीला भेटलो. आपल्याच पेशींपासून तयार झालेला इवलासा देह आपल्याच डोळ्यांनी पाहणं, स्पर्शानं अनुभवणं आणि हा अदभूत सोहळा हृदयात साठवणं म्हणजे जणू एका अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळाच.
पुढं वर्षभर त्या इवल्याशा जीवात हळूहळू जाणिवा, चेतना जागृत झालेल्या पाहणं रोमांचकारी होतं. प्रत्येक घटना, प्रसंग म्हणजे एक चैतन्यउत्सवच होता. तिला वेदना झाली की माझ्या काळजात कळ येते.. ती गोड हसली की काळीज रक्त निर्माण करायचं सोडून आनंदलहरी निर्माण करतं. हे सारं विलक्षण आहे. ही अनुभूती वाट्याला येणं जणू पूर्वसंचितच!
दोन महिन्यापूर्वी ती स्वतःच्या दोन्ही पायांवर उभी राहिली अन काळजात धस्स झालं. कारण आयुष्यात आणखी एकदा ती स्वतःच्या पायांवर उभं राहिली की आज मुठीत मावणारा तो जीव तेव्हा मिठितही मावणार नाही. विरहावेग असह्य होईल.
तिच्या लीला पाहून वाटतं आभाळातल्या सगळ्या चांदण्या तिच्या मांडीवर ठेवाव्यात. विश्वातल्या सगळ्या सूर्यांचा प्रकाश तिच्या पायाशी ठेवावा.
इवल्याशा लेकीच्या डोळ्यातील भाव वाचणं, तिच्या गरजा ओळखणं, त्या पूर्ण केल्यावर तिच्या इवल्याइवल्या डोळ्यातलं कृतार्थपणं अनुभवणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ स्वर्गसुखच आहे. नव्हे नव्हे बाप नावाचा हा स्वर्गच जणू.
मी या लौकिक जगात असो अथवा नसो माझ्या काळजात ती अन तिच्या काळजात मी निरंतरपणे निवास करु हे निसंदेह!

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...