8/19/2015

सर्वव्यापी 'क्‍यूआर कोड' (वेबटेक)

लेखकाच्या मोबाइल क्रमांकासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.



माणसाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची अफाट शक्ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज अनुभवास येत असते. कमीत कमी श्रमात अपेक्षित उद्दिष्ट गाठून अत्यल्प वेळात कार्य सिद्धीस नेणे, हा तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व क्रांतीचा प्रमुख हेतू आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या माध्यमातून मोबाईलक्रांती, थ्री- डी प्रिंटिंग आदी आविष्कार आपण अनुभवत आहोतच. ‘क्‍यूआर कोड‘ हा त्यापैकीच एक. 

वाहन उत्पादन क्षेत्रात वाहनाचे उत्पादन होत असताना, वाहनाच्या विविध भागांची स्थिती जाणून घेण्यासाठी केवळ यंत्रालाच वाचता येतील, अशा बारकोडचा उपयोग करण्यात येत होता. त्यातून पुढे केवळ द्विमितीय पद्धतीसाठी ‘क्‍यूआर कोड‘चा जन्म झाला. जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता या वैशिष्ट्यांमुळे विविध क्षेत्रांमध्ये या तंत्राचा वापर होत आहे. स्मार्ट फोनचा उपयोग वाढत असताना या तंत्राला नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे. 

काय आहे ‘क्‍यूआर कोड‘? 
‘क्‍यूआर कोड‘ म्हणजे Quick Response Code अर्थात जलद प्रतिसाद संकेतावली. केवळ यंत्रालाच वाचता येईल अशा भाषेतील उभ्या आणि आडव्या चौकोनांच्या संचाला ‘क्‍यूआर कोड‘ म्हणतात. ‘डेन्सो‘ या जपानमधील वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपनीच्या ‘डेन्सो वेव्ह‘ विभागाने 1994 मध्ये जपान रोबो असोसिएशनच्या सहकार्याने ‘क्‍यूआर कोड‘चे तंत्र विकसित केले. वाहन उत्पादन क्षेत्रातील या तंत्राच्या यशस्वी वापरानंतर इतर क्षेत्रांतही त्याचा वापर सुरू झाला. मानवाला न समजणारी भाषा समाविष्ट असलेला, डिजिटल पडद्यावर प्रतिमेच्या किंवा कागदावरील प्रतिमेच्या स्वरूपात हा कोड तयार करता येतो. 

‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग 
स्मार्टफोनद्वारे एखाद्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी प्रथम ब्राऊजर उघडून यूआरएल टाइप करावी लागते. यावर मात करण्यासाठी एखाद्या संकेतस्थळाचा ‘क्‍यूआर कोड‘ स्मार्टफोनद्वारे स्कॅन केला की थेट त्या संकेतस्थळाला भेट देता येते. हा अगदी प्राथमिक उपयोग आहे. मोबाईलमध्ये नवा कॉन्टॅक्‍ट सेव्ह करण्यासाठी, एखादा संदेश पाठविण्यासाठी, उत्पादनादरम्यान उत्पादनाची स्थिती जाणून घेण्यासाठी, मार्केटिंगसारख्या अनेक क्षेत्रांतही या तंत्राचा वापर वाढत आहे. मॉलसारख्या मोठ्या ठिकाणी ग्राहकांची बिले तयार करण्यासाठीही या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ग्राहकांना आकर्षित करून विविध ऑफर देण्यासाठी हा कोड वापरण्याची पद्धत हळूहळू लोकप्रिय होत आहे. 

‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन कसा करायचा? 
‘क्‍यूआर कोड‘ वाचण्यासाठी तो आधी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अनेक विनामूल्य मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. ते स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे आवश्‍यक असते. एकदा ऍप इन्स्टॉल केले की त्याद्वारे कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ समोर मोबाईल धरून कॅमेऱ्याद्वारे स्कॅन करावा लागतो. साधारण अर्धा- एक सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण होते. स्मार्टफोन स्कॅन केलेला ‘क्‍यूआर कोड‘ वाचतो आणि त्यातील आज्ञावलीप्रमाणे कार्य करतो. कोणत्याही प्रकारचा ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी हीच पद्धती अवलंबिली जाते. अल्पावधीतच स्मार्टफोन्समध्येच ‘क्‍यूआर कोड रीडर‘ची ‘इन बिल्ट‘ सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावरील ‘क्‍यूआर कोड‘ स्कॅन करण्यासाठी इतर डिव्हाईसही उपलब्ध आहेत. 

‘क्‍यूआर कोड‘चे भविष्य 
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सध्या कार्डबाबतची माहिती, तसेच पासवर्डही देणे आवश्‍यक आहे. मात्र, नजीकच्या काळात ही सर्व माहिती असलेला ‘क्‍यूआर कोड‘ तयार करून, केवळ त्याच ‘क्‍यूआर कोड‘द्वारे कोड पेमेंटची सुविधा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यामध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डऐवजी बॅंकेने दिलेला ‘क्‍यूआर कोड‘ खिशात दिसण्याची शक्‍यता आहे. ‘क्‍यूआर कोड‘च्या गुणवैशिष्ट्यांमुळे नजीकच्या काळात बहुतेक सर्वच क्षेत्रांत ‘क्‍यूआर कोड‘चा उपयोग वाढणार आहे.
(Courtesy: www.eSakal.com) 

Related Posts:

  • "आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी" : चांद्रयानचं भारतीयांना पत्र.! नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो ओळखलत का मला? मी `विक्रम’. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम’. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर … Read More
  • संगणक प्रशिक्षण (आकाशावानिवारा दि. २३ जुलै २०१२ रोजी प्रसारित झालेले भाषण) मित्रांनो, या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत माणूस सतत संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेत आहे.… Read More
  • ग्रामविकासात संतांची भूमिका ग्रामविकासात संतांची भूमिका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर लोकजागर या कार्यक्रमात ‘ग्रामविकासात संतांची भूमिका’ या विषयावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्रातील व्यंकटेश… Read More
  • काय आहे EMV कार्ड? सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरपर्यंत बदलून घ्यावे लागतील अशा आशयाचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये झळकत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशातील सर्व बॅंकांना सर्व खातेदारांचे कार्ड … Read More
  • कसा असतो सॅटेलाईट फोन? १) हा फोन कसा असतो? कार्य कसे चालते? हा फोन वापरण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते का ? सॅटेलाईट टेलिफोन म्हणजे एक प्रकारचा मोबाईल फोनच आहे. महत्वाचा फरक एवढाच आहे की हा फोन टेलिफोन ऑपरेटर्सचे नेटवर्क न व… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...