7/11/2021

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌...




दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी जिंदगीच बदलून जाते‘, दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्यानं अनुभव सांगितला. "पण लग्नाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. दोनाचे चार हात चाराचे मग...‘ एका सुखी विवाहितानं उत्तर दिलं. "अरे, तुमचे अनुभव लादू नका. त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. अन्‌ ठरवू द्या ना!‘, ऑफिसमधील एका स्कॉलरने विचार मांडला. काही काळ शांतता पसरली. पुन्हा स्कॉलर बोलू लागला, "काय आहे, की 1981-1990 या दहा वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता त्यामुळे या नव्या पोरांना मुली मिळत नाहीएत?‘, स्कॉलरने पुन्हा "स्कॉलर‘ विचार मांडला. "आणि ज्या आहेत त्यांच्या अपेक्षा फारच... हे नको, ते हवं. ते नको हे हवं‘, मुली पाहणाऱ्या अविवाहितानं त्याच्यासमोरील आव्हानं सांगितली. काही वेळातच सगळेजण आपल्या कामाला लागले. हळूहळू चर्चा थांबली.


दुपारच्या चहाची वेळ झाली होती. सर्वजण कॅंटीनमध्ये चहाला जमले. तिथं काम करणारा पोऱ्या चुणचुणीत होता. तो आनंदाने आणि उत्साहाने चहा देत होता. यांच्यामध्ये पुन्हा सकाळची चर्चा रंगली. "हा पोरा बघा. काय फिकर-बिकर काय नाय. दिवसाला पगार. दिवसाचा खर्च भागला. संपलं...‘ एकाने पोराची जिंदगी उलगडून सांगितली. तेवढ्यात चहा घेऊन पोरा आला. "का रे? कशी झाली दिवाळी? सुटी घेतली का नाय?‘, एकाने पोराला सवाल केला. "होय, सायब चांगली 15 दिवस सुटी होती‘, पोराने उत्तर दिलं. "अरे 15 दिवस काय केलस मग?‘, पोराशी संवाद वाढविण्यात आला. "काय, नाय लग्न केलं सायब!‘, पोराने लाजत उत्तर दिलं. "अरे, पण मागे एकदा तू लग्न केलसं म्हणाला होतास ना?‘, एका वरिष्ठ सहकार्याने सवाल केला. "हो! आता हे दुसरं लग्न होतं...‘, पोराने निरागसपणे उत्तर दिलं. त्यावर सर्वांना धक्काच बसला. "आयला, आमाला एक मुलगी मिळना अन्‌ तू दोन दोन लग्न...‘, अविवाहितानं नेमका मर्मावर बोट ठेवला. आता पोरा बोलू लागला, "काय आहे सायब की पटवून घेतलं, समजून घेतलं की भागून जातं. नाय पटलं, नाय आवडलं तर फारकत घेतलेली बरी. मी तसचं केलं. पहिल्या बायकोशी नाय पटलं. तिला, तिच्या घरच्याला बोलावलं. आपलं पटत नाय सांगितलं. कोर्ट, फिर्ट चक्कर नकोय. आमीच तिचं दुसरं लग्न लावून देऊ असं सांगितलं. झालं..‘ पोरा तेवढ्यातच थांबला. आता त्याच्या स्टोरीत सगळ्यांनाच इंटरेस्ट निर्माण झाला होता. "मग, पुढं काय झालं?‘ स्कॉलरने उत्सुकता दाखवली. पोरा पुन्हा बोलू लागला, "सायब, तिनं बी सांगितलं नाय पटत. शेवटी माझ्या गावाकडच्या नात्यातल्यानं त्याना मदत केली दुसरं लग्नबी लावलं. आता माजंबी लग्न झालं. ती खूष मी बी खूष!‘ पोराने स्टोरी पूर्ण केली अन्‌ तो निघूनही गेला.


"बघा, साधा चहा विकणारा पोरगा दोन-दोन लग्न करतो. आपल्याला शहाणपणा शिकवतो. बघा...‘, स्कॉलरनं उपदेश सुरु केला. "त्याचं काय रे त्याची जिंदगी साधी आहे. दिवस भागला. संपलं. आपल्याकडच्या पोरी भविष्याचा विचार करतात. प्रॉपर्टी बघतात...‘, अविवाहितानं त्रागा केला. त्यावर दुसरा एक सहकारी म्हणाला, "अरे पण कसलं भविष्य अन्‌ कसलं काय. चहा विकणारा पोरा काय बी करू शकतो भौ..‘ आता चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. चहाचा कप रिकामा होत होता. चहावाल्या पोराला अनेकांना प्रश्‍न विचारायचे होते. त्यांनी त्याला पुन्हा आवाज दिला. पोरा आला. "काय रे? तुझी कमाई किती? बायको त्रास देत नाही का?‘ एकाने त्याला थेट सवाल विचारला. "सायब, पहिलीला पण मी लग्नाआधीच सांगितलं होतं. आपली कमाई एवढी. पुडं-मागं वाढलं. पर गॅरंटी नाय. वन रूम किचनचं छोटं घर बाप देऊन गेला. तीच प्रॉपर्टी. पर तिला नाय आवडलं. आपण बी जास्त इचार नाय केला. शेवटी इचार करून काय होतं सायब... जिंदगी महत्वाची ना..‘, पोराने तत्वज्ञानचं मांडलं. "लईच बोलतो रे तू....?‘, एकाने पोराची खेचली. त्यावर पोरा सुटलाच, "सायब, तुमच्या जिंदगीशी कंपेर करू नका आमाला. आमच्याकडं मोटं घर नाय. साधी दोन चाकाची गाडी बी नाय. रोजच्या रोज पगार. जे मिळलं त्यात सुख. आता घराजवळ एक चहाची टपरी सुरु केलीया. इथनं गेलं की तिथं धंदा सुरु. कमाई वाडतीया. रोज सुखानं झोप येतीया. बॅंकेच्या हप्त्याची कटकट नाय की हाय-फाय राहणीची... बापाने जिंदगी जगली. अन्‌ सोडली बी. बायको अन्‌ माय सोबत हाय... त्या बी टपरीसाठी मदत करत्यात... हप्त्यातून एकदा कोंबडं कापतो. महिन्यातनं एकदा गोड-धोड करतो. वर्षातनं एकदा फिरायलाबी जातो. एकाद्या दिवशी उपाशी झोपण्याचीबी तयारी हाय. काय जिंदगी असतीया अजून... दररोज पोटभर कष्टाची भाकर अन्‌ रोज रातच्याला शांत झोप...‘, पोरानं त्याचं आयुष्यच वाचून दाखवलं. आता सगळेच शांत झाले. तो तुलना करू नका म्हणत होता. पण सगळेजण स्वत:च्या जगण्याचीच त्याच्याशी तुलना करत होते.


सगळीकडे स्मशान शांतता पसरली. काही वेळाने स्कॉलर बोलू लागला, "काय असतं. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं नाही. मुलांच्या पण अपेक्षा असतातच. गोरी हवी, काळी नको. स्वयंपाक यायला हवा. गाडी यायला हवी. साडी घालता यावी. बाप श्रीमंत असावा. जावयाचा लाड करावा. बहिण-भाऊ शक्‍यतो नसावेत. आदी आदी...‘ आता अविवाहित बोलू लागला, "समजा, यापैकी एकही अपेक्षा नसेल तरीही मुलींच्या अपेक्षा असतातच ना?‘ "बीऽऽऽऽ कूल... अरे जी मुलगी आपली अख्खी लाईफ सोडून तुमच्याकडे येणार असते तिनं अपेक्षा ठेवल्या तर बिघडलं काय रे? तिने नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात!‘ स्कॉलर पेटला.


आता वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "शेवटी काय आहे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा एकूणात विचार हवा. शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्‍न असतो. प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींचं प्रमाणही ठरवायला हवं. अन्‌ त्या स्वीकारून आयुष्यभर परस्परांची साथ देण्याची हिम्मतही असावी. तसं झालं नाही तर प्रसंगी फारकत घेऊन दूर जाण्याचीही तयारी असावी. या पोरासारखी. जे आहे त्यात सुख मानायला हवं. जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नही अवश्‍य करावा. पण वास्तवाचं भान हवं. परस्परांना साथ द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... लक्षात ठेवा नवरा आणि बायको अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असताता, इतरांची खात्री नसते...‘सर्व वातावरण गंभीर झाले. ‘सिरीयसली विचार करा मित्रांनो आणि मात्र आता चला काम पडलीत...‘ असं म्हणत स्कॉलरने पूर्णविराम दिला.


© व्यंकटेश कल्याणकर

1 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...