12/23/2018

काय आहे EMV कार्ड?


सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरपर्यंत बदलून घ्यावे लागतील अशा आशयाचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये झळकत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशातील सर्व बॅंकांना सर्व खातेदारांचे कार्ड EMV प्रकारात बदलून घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर २०१८ ही अंतिम मुदत होती. (संदर्भ:  https://www.businesstoday.in/sectors/banks/emv-chip-credit-card-atm-card-without-this-feature-will-stop-working-after-december-31/story/295405.html )  या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काय आहे EMV कार्ड? आणि का बदलून घ्यायचेत हे कार्डस्?  तत्पूर्वी कार्डचा प्रवास कसा सुरु झाला आणि त्यामध्ये कसा बदल होत गेला याबद्दलची माहिती फारच मजेदार आहे. त्यावर एक नजर टाकूयात -

टप्पा - १
अमेरिकेमध्ये १९७० च्या दशकात ज्यावेळी सर्व प्रथम कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. त्यावेळी कार्डधारकाला जेथे जेथे कार्ड पेमेंट करायचे आहे तेथे तेथे कार्डची झेरॉक्स (Imprint) द्यावी लागायची. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कार्डची सतत्या पडताळण्यात येत नव्हती. त्यामुळे संबंधित कार्ड देणा-या बॅंकेला संबंधित रक्कम स्वीकारणारा व्यक्ती (व्यापारी) फोनवर कार्डची माहिती विचारायचा आणि सत्यता पडताळल्या नंतर तो व्यवहार पूर्ण व्हायचा. या प्रकारात कोठेही कार्डधारकापासून त्याचे कार्ड दृष्टिआड केले जात नव्हते. अशा प्रकारात गैरव्यवहार टाळण्यासाठी त्याकाळी बनावट किंवा अवैध कार्डस्चे क्रमांक असलेली यादी प्रसिद्ध केली जात होती. त्यावरून संबंधित व्यापारी कार्डची सतत्या पडताळून खात्री करूनच कार्ड पेमेंट स्वीकारत होता. कोणतेही बनावट किंवा अवैध कार्ड आढळले तर त्या त्या वेळी यादीमध्ये त्याची नोंद केली जात होती.

टप्पा - २
वरील प्रकारात व्यवहार पूर्ण होण्यास बराच वेळ जात असावा म्हणून त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली व्यवहार पूर्ण करणारे कार्डस् आले. मात्र, यामध्ये कार्ड स्वॅप करणारे मशीन हा मुव्हेबल नसल्याने आणि कार्ड पेमेंटसाठी पिन क्रमांकाची गरज नसल्याने पेमेंट करताना कार्डधारकाच्या दृष्टिआड जाऊन कार्ड स्वॅप करावे लागत होते. अशा प्रकारात स्वॅप मशीमध्ये कार्डचे क्लोन तयार करणारे प्रोग्राम बनवून गैरव्यवहार करणे अधिक सोपे होते. त्यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक होता.

टप्पा - ३
सध्या अस्तित्वात असलेले कार्डस हे या टप्प्यात येतात. यामध्ये वायरलेस कार्ड रिडिंज मशीनमध्ये कार्ड स्वॅप करता येते. ते ही कार्डधारकाच्या डोळ्यासमोर आणि कार्डधारकाला दिलेला चार अंकी पिन क्रमांक नोंदविल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही.




मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड  (चुंबकीय कार्ड) म्हणजे काय?
दीड दशकापूर्वीपर्यंत आपण कॅसेट नावाच्या एका तंत्र प्रकारातून गाणी ऐकत होतो. या कॅसेटमध्ये मॅग्नेटचेच तंत्र वापरण्यात येत होते. म्हणजे मॅग्नेटच्या पार्टिकल्समध्ये माहिती स्टोअर केली जायची आणि हवी तेव्हा ती ध्वनीच्या स्वरुपातील (Audio) माहिती वाचता (ऐकता) येत होती. हेच तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात असलेल्या काही (बहुतेक सर्व) डेबिट/क्रेडिट कार्डमध्ये वापरले जात आहे. तुमच्या कार्डच्या मागच्या बाजूला एक काळी पट्टी असेल तर तुमचे कार्ड मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आहे असे समजा. यामध्ये तुमच्या बॅंकेची माहिती मॅग्नेट पार्टिकलमध्ये साठविलेली असते.  दुसर्या महायुद्धापासूनच हे तंत्रज्ञान विकसित झाले असून १९५० च्या दशकात संगणकीय माहिती साठविण्यासाठी या तंत्राचा वापरास प्रारंभ झाला. (संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Magnetic_stripe_card)

काय आहे EMV कार्ड?
युजर्सच्या माहितीची सर्वतोपरी सुरक्षितता असावी यासाठी विविध पेमेंट कार्डस् बनविणार्या तीन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी समान तांत्रिक परिमाणे असलेले सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित असे EMV कार्ड विकसित केले. EMV शब्दातील प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे ज्या तीन कंपन्या एकत्र आल्या त्या कंपन्यांच्या नावाचे आद्याक्षर आहे. अर्थातच EMV म्हणजे Europay, Mastercard and Visa  (संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/EMV#Differences_and_benefits_of_EMV )

EMV कार्डस तांत्रिक परिमाणे पूर्ण करणा-या कार्डसला `चिप ऍण्ड पिन' किंवा `चिप ऍण्ड सिग्नेचर' असेही म्हटले जाते. तसेच या तंत्राला Smart Card Based Credit Card Payment System असेही म्हटले जाते.



तुमचे कार्ड मॅग्नेटिक स्ट्रिप आहे की EMV कसे ओळखाल?
अगदी साधी, सोपी गोष्ट म्हणजे तुमचे कार्ड दोन्ही बाजूने व्यवस्थित बघा. कार्डाच्या दोन्ही पैकी कोणत्याही एका बाजूला डाव्या कोप-यात एक इलेक्ट्रॉनिक चीप (गोल्डन कलर असलेली) दिसेल. जर अशी चीप तुमच्या कार्डावर आढळली  तर समजावे की तुमचे कार्ड हे EMV प्रकारातील आहे. त्यामुळे तुम्हाला कार्ड बदलण्याची काहीही गरज नाही. जर तुमच्या कार्डावर अशी चीप नसेल तर तुम्हाला तुमचे कार्ड बदलून घेणे गरजेचे आहे. (संदर्भ:  https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1488896581658_FAQS.pdf )  येथे नोंद करण्यासारखी एक महत्वाची बाब म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक कार्डस हे EMV कार्ड आणि मॅग्नेटिक कार्ड अशा दोन्ही प्रकारांत काम करतात.



EMV कार्डचे लाभ काय आहेत?
१) मॅग्नेटिक कार्डसच्या तुलनेत प्रत्यक्ष व्यवहार करताना EMV कार्डस कमी वेळ घेतात.
२) मॅग्नेटिक कार्डसच्या तुलनेत EMV कार्डस अधिक सुरक्षित असतात.

सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक कार्डस् हे EMV कार्डस आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेले सर्वच्या सर्व कार्डस बदलून घेण्याची आवश्यकता नाही, हे मात्र नक्की.

(संपादन, संकलन: व्यंकटेश कल्याणकर)

1 comments:

  1. खूप छान माहिती वेंकटेशजी

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...