5/05/2014

प्रेम नाकारलेल्या प्रियकराचे पत्र...

प्रिये,

‘प्रिये’ हा शब्द ऐकून तुला आश्चर्य वाटलं असेल. मात्र, ज्या शब्दासाठी तू अगदी आतूर होतीस तो तुझ्याचसाठी लिहिला आहे आणि केवळ लिहिलाच नाही तर तू खरच मला प्रिय आहेस. हे तुला इतक्या दिवस मी सांगितलं नाही अगदी तू विचारल्यावरसुद्धा. त्यावेळी मी केवळ निशब्द होतो, निशब्द! इथल्या व्यवस्थेनं आपल्यावर लादलेली बंधनं आपण नको असताना स्विकारलेलीच आहेत. ती पाळणं आपलं कर्तव्यच आहे. आपण देहानं जवळ आलो नाहीत म्हणून काय झालं आपण हृदयानं एक आहोतच. ही सारी सृष्टी एकच आहे. मग आपण भिन्न कसे असू? असो. तत्त्वज्ञान सांगण्यासाठी तुला पत्र लिहित नाही, तर केवळ तुला माझ्या मनातील भावना समजाव्यात म्हणून हा उपद्व्याप.

तू माझ्यासाठी सारी सारी बंधनं तोडून यायला तयार होतीस. मी ही ती अगदी ताकदीनं तोडण्यासाठी समर्थ होतो. पण असल्या तोडाफोडीपेक्षा परस्परांचे जोडलेले हृदये कधीच तुटू न देण्याचं मी ठरवलं. अन् एक न होता वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. तोही तुझ्या नकळत! तुला थोडसं दुखावून... पण ‘प्रेमात’सारच माफ असतं ना. मात्र, माझ्याकडं ही बंधनं तोडण्याची हिम्मत नव्हती असा आरोप कदापि करू नकोस, ती हिम्मत नसती तर तुझं प्रेम स्विकारण्याची हिम्मतही मी दाखविली नसती.

तुला मी मिळू शकलो नाही म्हणून तू खूप अस्वस्थ झाल्याचं समजलं. अन् त्यामुळेच मला पत्र लिहिण्याचं बळ मिळालं. तुला एक सांगतो. मी तुला मिळालो नाही, म्हणून कधीही अस्वस्थ न होता फुलांकडं बघ! प्रत्येक फुलाचं काहीतरी स्वप्न असतं! कोणाला एखाद्याच्या कोटावर रूबाबात मिरवावसं वाटत असेल, कुणाला एखाद्या सौंदर्यवतीच्या काळ्याभोर केसांवर लोळावसं वाटत असेल, तर कोणाला एखाद्या वीराच्या देहाला चिरशांती देताना त्यासोबतच जळून जावसंं वाटत असेल. पण प्रत्येक फुलाचं स्वप्न साकार होतच असं नाही. तरीसुद्धा त्याच्या वाट्याला जे येतं त्यात ते आनंदी असतं अन् तेवढाच सुगंध अन् सौंदर्य ते त्याला देत राहतं. तूही तसंच रहा... फुलांसारखं...

कधी तुला फार वाईट वाटलं तर वाहणारं पाण्याकडं बघ! पुढे अडचणी आल्या म्हणून ते आपलं वाहणं कधीच थांबवत नाही. अडचणी आल्या की ते किंचितसा प्रवाह बदलतं अन् खळखळून वाहत पुढे जात राहतं. त्यावेळी जो आवाज होतो, तो अगदी कर्णमधूर असतो. आज आपल्यासमोर व्यवस्थेची जी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळं आपण आपलं प्रेम किंचितही कमी करत नाहीत, तर त्याचा प्रवाह किंचितसा बदलत आहोत. त्यातून जो आवाज निर्माण होईल, तो आज जरी नकोसा वाटत असेल, तरी उद्या जगाला तो कर्णमधूर वाटेल. त्यामुळे कोणतीही चिंता करू नकोस. माझी आठवण आली तर मी तुझ्या सोबतच आहे असं समज अन् तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न कर. त्यावेळी तुला तो कर्णमधूर भासेल.
तुझ्या प्रेमासाठी एवढं करशील....(?)

तुझाच

2 comments:

  1. झक्कास! Classy !
    व्यंकटेशराव, २०१२ सालच्या मनोगतच्या दिवाळी अंकात मी आपले श्राव्य साहित्य ऐकले होते. त्यानंतर आपल्याला फोन केला हाेता. नंतर मेलही पाठवली होती. आपले वरील पत्रही वाचले. प्रेमातील आपल्या पुढील सर्व अनुभवांना शुभेच्छा. ये इष्क नही आसां इतना समझ लीजिये, इक आगका दर्या है और डूबके जाना है.
    महाराष्ट्राला एक संवेदनाशील प्रतिभासंपन्न लेखक मिळालेला आहे. लिहीत रहा व इतरांना आनंद देत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अनमोल प्रतिक्रियांबद्दल आपले मन:पूर्वक आभार! आपणही लिहिण्याचा छंद जोपासत रहा. प्रत्येकात एक लेखक लपलेला असतो. गरज असते केवळ त्याला शब्दात व्यक्त करण्याची. बस्स! मी तेवढच केलं आणि ‘जगाला जे आवडतं ते लिहू नका, तर तुम्हाला जे वाटतं ते लिहा. एक दिवस तुमचं वाटणं ही जगाची आवड बनेल.’ हे माझेच विचार मी प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण फेसबुकवरही मला भेटू शकता. या ब्लॉगवर ती लिंक उपलब्ध आहे. पुनश्र्च आभार!

      -व्यंकटेश कल्याणकर

      Delete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...