2/08/2015

स्पर्श : उत्तर

आकाशातील लाल गोळा खाली जात होता. तर याच्या पोटात भुकेचा गोळा उगवत होता. संपूर्ण दिवस दोन कटिंगवर काढत तो खूप धावला होता. रविवारी रस्त्यावर गर्दी असल्याने त्याने विकायला आणलेली खेळण्यातील "विमाने' सिग्नलवर थांबूनच चांगली विकली होती. रात्री माय अन्‌ छोट्या भावासोबत गोडाधोडाच्या जेवणाची स्वप्ने तो पाहत होता. गोडाधोडाच्या जेवणात गोड काहीच नव्हतं, पण जेवण पोटभर होतं, ते ही कमाईचं. तेच गोड मानून खाऊन त्यालाच ते गोडाधोडाचं जेवण म्हणत होते. अंधार पडला. तो जेवणाची तयारी करू लागला. एरवी भाजीवाल्याची सडलेली भाजी अन्‌ गिरणीतलं सांडलेलं पीठ खाणारं त्याचं कुटुंब दुकानातल्या पीठासोबत ताज्या भाजीचा स्वर्गिय आनंद लुटणार होतं. ठरल्याप्रमाणे सगळं झालं. आमावस्येची रात्र असूनही फूटपाथवरील त्यांच्या "मूव्हेबल' घरात गोडाधोडाच्या जेवणामुळे आनंदाचा प्रकाश पडला होता. उद्याचा विचार न करता तृप्त मनानं ते कुटुंब निद्रिस्त झालं.

दुसरा दिवस उजाडला. तो आज रूमाल अन्‌ गजरे घेऊन रस्त्याच्या सिग्नलवर धावू लागला. दुपारपर्यंत फक्त एकच रुमाल विकला. कालचे पैसे कालच उधळले होते. आज हातात काहीच नव्हतं. संध्याकाळी गर्दी होईल म्हणून तो धावू लागला. माय अन्‌ भाऊ दूर उभे राहून सारं पाहत होते. धावता धावता बसला आडवं जाताना त्याचा तोल गेला, अन्‌ क्षणार्धात हातातील रूमाल अन्‌ गजरे रक्तात माखून निघाले. मर्त्य जग सोडून तो क्षणार्धात निघून गेला होता. थोडी गर्दी झाली. हॉर्न वाजू लागले. थोडावेळ ट्रॅफिक जाम. काही वेळात कोणीतरी रक्तात माखलेला "मृत' देह कडेला नेला.

माय अन्‌ भाऊ अजूनही कडेला थांबून रडत होते. पोलिस आपल्याला पकडतील म्हणून ते पुढे सरकले नाहीत. मेलेल्याला पाहायचे का जिवंत असलेल्याला सांभाळायचे अशी मायची अवस्था झाली. शिवाय "मेल्या'ला जाळायचं कुठं हा प्रश्‍नही होताच. दोघेजण फूटपाथवरून अश्रू ढाळत "त्या'च्या पासून दूर जाऊ लागले. 2-3 किलोमीटरवर नदीच्या काठी येऊन बसले. कालचं गोडधोड जेवण पोटात मावलं होतं. पण आजचं दु:ख पोटात मावणारं नव्हतं. तिनं दादल्याची बॉडीपण अशीच सोडली होती, अन्‌ आता थोरल्या पोराची पण.

बराच वेळापासून हे सगळं पाहणारा 4-5 वर्षाचा धाकला निरागसपणे म्हणाला, "माय, तू मला बी अशीच सोडून जाशील?' मायकडं उत्तर द्यायला शब्द तर नव्हतेच, पण अश्रू ढाळायला डोळ्यात पाणीपण नव्हतं.

Related Posts:

  • इतक्‍या पगारात कसे भागेल? तो चांगल्या कुटुंबातील होता. शिक्षणही चांगले झाले होते. एक चांगली कायम नोकरीही त्याला होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. तो त्याचे आई आणि वडील असे त्यांचे कुटु… Read More
  • माय आपल्याला जेवण का नाय? संध्याकाळचे चार वाजून गेले होते. समारंभासाठी हॉल छान सजला होता. नयनररम्य डेकोरेशन, कर्णमधूर सनईवादन, लज्जतदार जेवणाची तयारी आदी व्यवस्था चोख होती . विवाहसमारंभ वाटावा एवढा मोठा समारंभ होता. पण विवाह समारंभ नसून घरगुती कार… Read More
  • हे अपंगत्व व्यवस्थेचे! साधारण सकाळचे अकरा वाजत होते. पंचायत समितीचे कार्यालयही उघडले होते. आज आठवड्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. कार्यालय तसे छोटेच होते. बहुतेकजण रजेवर असल्याने कार्यालयात केवळ एकच … Read More
  • आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌... दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत … Read More
  • माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा होता. त्याला जात, पात, धर्म, पंथ वगैरे वगैरे बंधने अजिबातच मान्य नव्हती. ही व्यवस्था ब… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...