3/22/2015

स्पर्श : स्मार्ट पोराचा 'स्मार्ट फोन'

त्याला आज सुटीच होती. आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वृद्धापकाळ आणि आजारामुळे त्रस्त वडिल घरातील बेडरूममध्ये आराम करत होते. तर स्मार्ट मुलगा बाहेरच्या खोलीत स्मार्ट फोनला प्रेमळ स्पर्श करत होता. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवरून तो अपडेट राहत होता. प्रत्येक प्रेमळ स्पर्शागणिक त्याला जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळत होती, मनोरंजन होत होते. त्याच प्रेमळ स्पर्शासाठी याचे वडिल मात्र आतल्या खोलीत तळमळत होते. कानाला हेडफोन लावून संगीताचा आनंद लुटणाऱ्या स्मार्ट पोराला त्याची कल्पनाही नव्हती.

या पोराने अलिकडेच सोसायटीतील सर्वांचा एक ग्रुप केला होता. त्याद्वारे सोसाटीतील सगळे कामे चुटकीसरशी ऑनलाईन पार पडत होती. सोसायटीतील कित्येक लोकांची चेहरेदेखील त्यानं कधी पाहिले नव्हते; पण आभासी जगात त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. सोसायटीची मासिक बैठकही यानं ऑनलाईन सुरु केली होती. शिवाय अभिनव कल्पनाशक्तीमुळे प्रत्येक फ्लॅधारकाच्या फ्लॅटला क्रमांकाऐवजी फुलांची नावं दिली होती. स्वत:च्या फ्लॅटलाही हा "रेड रोझ‘ म्हणत होता. प्रत्यक्षात नाही पण व्हॉटस्‌ऍपवरून सोसायटीत याचं फार कौतुक होत होतं. तो स्मार्ट फोनच्या अधिकाधिक जवळ जात होता, तर जवळच्या माणसांपासून अधिकाधिक दूर जात होता.

दरम्यान वडिलांच्या कोणत्यातरी आजारावरील गोळीची वेळ झाली. वडिल पोराला अंत:करणातून आवाज देत होते. पण स्मार्ट मुलगा त्यांच्या जगापासून कितीतरी दूर गेला होता. शिवाय कानात हेडफोन असल्याने जवळचे ऐकण्याची क्षमताही गमावून बसला होता. घरात बोअर झाल्याने काही वेळात स्मार्ट पोरगा आपल्या मित्राला भेटायला जवळच्या कॉफी शॉपमध्ये पोचला. इथेही मित्रापेक्षा तो स्मार्टफोनच्याच अधिक जवळ होता. बोलता बोलता मुव्ही पाहण्याचा कार्यक्रम ठरला. दोघे थिएटरमध्ये पोचले. मुव्हीमध्येही त्याला स्मार्ट फोनपासून दूर करण्याचं सामर्थ्य नव्हतं. त्याचा प्रेमळ स्पर्श स्मार्टफोनला होत होताच. मुव्ही सुरु झाल्यानंतर तासाभरानं सोसायटीच्या ग्रुपवर एक व्हॉटस्‌ऍप मेसेज आला, ‘सॉरी टू से बट आवर रेड रोझ ओनर्स फादर इज नो मोअर. आरआयपी!‘ याच्या संवेदना अचानक जागृत झाल्या. तो तसाच धावत रेड रोझवर आला. व्हॉटस्‌ऍपचा मेसेज खराच होता. जिवंतपणी नव्हे तर मेल्यानंतर बापाला पोराचा प्रेमळ स्पर्श लाभला होता. कदाचित यानं फक्त एकदा रेड रोझमधून बाहेर पडताना वडिलांकडे पाहिले असते तर... त्यानंतर त्याला व्हॉटस्‌ऍपवर मेसेज येऊ लागले "आरआयपी टू युअर फादर!‘

(Courtesy: www.esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...