प्रिय राखीस,
एरवी आम्ही तुला ‘धागा’ म्हणून ओळखतो. पण हिरव्यागार श्रावणात तू रंगीबेरंगी वेष धारण करून भावा-बहिणीच्या आमच्या नात्याला बहर आणतेस. या जगात असलेल्या अन् नसलेल्याही सगळ्याच भावांना बहिणीची आणि बहिणींना भावाची आठवण करून देण्याचं सामर्थ्य तुझ्याच कुठून गं येतं?
बहिणीच्या नाजूक हातातून, पंचारतींच्या ताटातून, तू थेट रक्त सळसळणार्या मनगटात विराजमान होतेस तेव्हा तुझा मिजास काय वाढतो ना! कदाचित त्या भावाचं मनगटातील रक्तसुद्धा हा आनंदसोहळा पाहण्यासाठी पळभर थांबत असावं.
तुझं नाव घेतलं की, भावाला लहानपणीची बहिण आठवते. भातुकलीचा खेळ मांडून बसणारी, दादा, भैया, म्हणून हाक मारणारी, दिवाळीमध्ये रात्रभर घरातल्या सगळ्यांना मेहंदी काढणारी, सणासुदीला घराच्या दाराला तोरण अन् दारात रांगोळी रेखाटणारी ताई, आई घरात नसताना घर सांभाळणारी, घरात कोणालाही ‘बरे नसताना’ काळजी घेणारी, अंगणातील फुले वेचणारी, घरातला पसारा आवरणारी, लाजणारी, हसणारी, बोलणारी, रडणारी अक्का. अन् भावा-बहिणीचं नातं अगदी फुलत असताना हळूच नवर्याच्या गळ्यात माळ घालून निघून जाणारी. स्वत:च्याच सौख्यात प्रवेश करतांना स्वत:च्याच नात्याला परंपरेने दुरावणारी.
सौभाग्य सोबत असताना सुद्धा भावासाठी अश्रू ढाळणारी, ताई. नवा संसार थाटल्यावर सुद्धा सणासुदीला सासरच्या दारात ‘दादा’ची वाट पाहत बसणारी ताई. घरात ‘दादा’ नसला तरी या धरणीच्या दादाला ‘चंद्राला’च दादा म्हणून ओवाळणारी किंवा आकाशात बसलेल्या ‘दादा’ला ओवाळणारी भाबडी ताई.
या सगळ्या बहिणीच्या आठवणी तुलाच बघून कशा गं स्मरतात? तू येताना फक्त वेषभूषाच धारण करून येत नाहीस तर तू येताना त्या आठवणींना, जुन्या स्मृतींना, हसलेल्या, रडलेल्या क्षणांना सोबत घेऊन येतेस ना,
त्यामुळेच सर्वांना तू हवीहवीशी वाटतेस.
बहिणीलासुद्धा तुझं नाव घेतलं की आठवतो तो आपला दादा, भाऊ. लहानपणी सायकल खेळताना पडलेला अन् त्यातूनच उठून आयुष्यभर आपल्या ताईला सावरणारा. घर आवरत नसला तरी घराला आवरणारा. बाबा घरात नसताना देवपूजा करणारा. तुला (राखीला) कौतुकानं सगळ्यांना दाखवत मिरवणारा. आधी शाळेत, नंतर कॉलेजात अन् शेवटी पुन्हा आयुष्याच्या शाळेत जाणारा. परीक्षेचा निकाल सगळ्यात आधी ताईच्या कानात हळूच सांगणारा. प्रेमात पडल्यावर अन् मोडल्यावरसुद्धा ताईकडेच जाऊन रडणारा. ‘आई, हीला काहीतरी सांग?’ असं कधीतरी म्हणणारा. अन् राग आला की ताईचा भातुकलीचा डाव मोडणारा. पुढे ताईला भातुकलीचाच पण नवा संसार थाटून देणारा, ताईच्या नवर्याचा कान पिळणारा. अन् तिच्याच सुखासाठी तिलाच ‘सासरी’ जाताना पाहून कुठल्यातरी कोपर्यात जाऊन अश्रू ढाळणारा.
या सगळ्या सगळ्या भल्याबुर्या आठवणी घेऊन तू श्रावणातील पौर्णिमेला येतेस म्हणून आम्ही तुझी खूप खूप आठवण बघतो. तुझ्यामुळेच भावाला बहिणीची अन् बहिणीला भावाची ओढ निर्माण होते ना. लोक म्हणतात की भावाला ओवाळणार्या ‘ताई’चं लग्न झालं की सासरहून ती थेट देवाकडंच जाते, पण तुझ्या निमित्तानं, तिनं बांधलेल्या प्रेमपूर्ण बंधनामुळं भावाच्या हृदयातून तिला कोठेच जाण्याचं स्वातंत्र्य नसतं.
देहरूपी बहिण संपली, जग संपलं अन् भाऊ संपला तरीसुद्धा तू जिवंत असशील भावा-बहिणीच्या नात्यांना जपण्यासाठी या दिसणार्या जगात, दिसणार्या जगात अन् या पलिकडच्या जगातसुद्धा...
तुझ्या पौर्णिमेनिमित्त तुलाच शुभेच्छा... आनंद वाटण्यासाठी....
0 comments:
Post a Comment