12/22/2021

बाबांची परी... (कविता)

आज अगदी पहाटे पावणे तीन वाजता काम संपवत होतो. पहाटेची भयाण शांतता होती. दिवसभर वल्लरीचा गडबड गोंधळ चालू असतो. पहाटेच्या शांततेतही तिचा किलबिलाट माझ्या कानात घुमत होता. तेव्हा अगदी १०-१५ मनात आलेले भाव कवितेच्या रूपात शब्दांतून उमटले. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.

7/11/2021

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌...
दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी जिंदगीच बदलून जाते‘, दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्यानं अनुभव सांगितला. "पण लग्नाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. दोनाचे चार हात चाराचे मग...‘ एका सुखी विवाहितानं उत्तर दिलं. "अरे, तुमचे अनुभव लादू नका. त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. अन्‌ ठरवू द्या ना!‘, ऑफिसमधील एका स्कॉलरने विचार मांडला. काही काळ शांतता पसरली. पुन्हा स्कॉलर बोलू लागला, "काय आहे, की 1981-1990 या दहा वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता त्यामुळे या नव्या पोरांना मुली मिळत नाहीएत?‘, स्कॉलरने पुन्हा "स्कॉलर‘ विचार मांडला. "आणि ज्या आहेत त्यांच्या अपेक्षा फारच... हे नको, ते हवं. ते नको हे हवं‘, मुली पाहणाऱ्या अविवाहितानं त्याच्यासमोरील आव्हानं सांगितली. काही वेळातच सगळेजण आपल्या कामाला लागले. हळूहळू चर्चा थांबली.


दुपारच्या चहाची वेळ झाली होती. सर्वजण कॅंटीनमध्ये चहाला जमले. तिथं काम करणारा पोऱ्या चुणचुणीत होता. तो आनंदाने आणि उत्साहाने चहा देत होता. यांच्यामध्ये पुन्हा सकाळची चर्चा रंगली. "हा पोरा बघा. काय फिकर-बिकर काय नाय. दिवसाला पगार. दिवसाचा खर्च भागला. संपलं...‘ एकाने पोराची जिंदगी उलगडून सांगितली. तेवढ्यात चहा घेऊन पोरा आला. "का रे? कशी झाली दिवाळी? सुटी घेतली का नाय?‘, एकाने पोराला सवाल केला. "होय, सायब चांगली 15 दिवस सुटी होती‘, पोराने उत्तर दिलं. "अरे 15 दिवस काय केलस मग?‘, पोराशी संवाद वाढविण्यात आला. "काय, नाय लग्न केलं सायब!‘, पोराने लाजत उत्तर दिलं. "अरे, पण मागे एकदा तू लग्न केलसं म्हणाला होतास ना?‘, एका वरिष्ठ सहकार्याने सवाल केला. "हो! आता हे दुसरं लग्न होतं...‘, पोराने निरागसपणे उत्तर दिलं. त्यावर सर्वांना धक्काच बसला. "आयला, आमाला एक मुलगी मिळना अन्‌ तू दोन दोन लग्न...‘, अविवाहितानं नेमका मर्मावर बोट ठेवला. आता पोरा बोलू लागला, "काय आहे सायब की पटवून घेतलं, समजून घेतलं की भागून जातं. नाय पटलं, नाय आवडलं तर फारकत घेतलेली बरी. मी तसचं केलं. पहिल्या बायकोशी नाय पटलं. तिला, तिच्या घरच्याला बोलावलं. आपलं पटत नाय सांगितलं. कोर्ट, फिर्ट चक्कर नकोय. आमीच तिचं दुसरं लग्न लावून देऊ असं सांगितलं. झालं..‘ पोरा तेवढ्यातच थांबला. आता त्याच्या स्टोरीत सगळ्यांनाच इंटरेस्ट निर्माण झाला होता. "मग, पुढं काय झालं?‘ स्कॉलरने उत्सुकता दाखवली. पोरा पुन्हा बोलू लागला, "सायब, तिनं बी सांगितलं नाय पटत. शेवटी माझ्या गावाकडच्या नात्यातल्यानं त्याना मदत केली दुसरं लग्नबी लावलं. आता माजंबी लग्न झालं. ती खूष मी बी खूष!‘ पोराने स्टोरी पूर्ण केली अन्‌ तो निघूनही गेला.


"बघा, साधा चहा विकणारा पोरगा दोन-दोन लग्न करतो. आपल्याला शहाणपणा शिकवतो. बघा...‘, स्कॉलरनं उपदेश सुरु केला. "त्याचं काय रे त्याची जिंदगी साधी आहे. दिवस भागला. संपलं. आपल्याकडच्या पोरी भविष्याचा विचार करतात. प्रॉपर्टी बघतात...‘, अविवाहितानं त्रागा केला. त्यावर दुसरा एक सहकारी म्हणाला, "अरे पण कसलं भविष्य अन्‌ कसलं काय. चहा विकणारा पोरा काय बी करू शकतो भौ..‘ आता चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. चहाचा कप रिकामा होत होता. चहावाल्या पोराला अनेकांना प्रश्‍न विचारायचे होते. त्यांनी त्याला पुन्हा आवाज दिला. पोरा आला. "काय रे? तुझी कमाई किती? बायको त्रास देत नाही का?‘ एकाने त्याला थेट सवाल विचारला. "सायब, पहिलीला पण मी लग्नाआधीच सांगितलं होतं. आपली कमाई एवढी. पुडं-मागं वाढलं. पर गॅरंटी नाय. वन रूम किचनचं छोटं घर बाप देऊन गेला. तीच प्रॉपर्टी. पर तिला नाय आवडलं. आपण बी जास्त इचार नाय केला. शेवटी इचार करून काय होतं सायब... जिंदगी महत्वाची ना..‘, पोराने तत्वज्ञानचं मांडलं. "लईच बोलतो रे तू....?‘, एकाने पोराची खेचली. त्यावर पोरा सुटलाच, "सायब, तुमच्या जिंदगीशी कंपेर करू नका आमाला. आमच्याकडं मोटं घर नाय. साधी दोन चाकाची गाडी बी नाय. रोजच्या रोज पगार. जे मिळलं त्यात सुख. आता घराजवळ एक चहाची टपरी सुरु केलीया. इथनं गेलं की तिथं धंदा सुरु. कमाई वाडतीया. रोज सुखानं झोप येतीया. बॅंकेच्या हप्त्याची कटकट नाय की हाय-फाय राहणीची... बापाने जिंदगी जगली. अन्‌ सोडली बी. बायको अन्‌ माय सोबत हाय... त्या बी टपरीसाठी मदत करत्यात... हप्त्यातून एकदा कोंबडं कापतो. महिन्यातनं एकदा गोड-धोड करतो. वर्षातनं एकदा फिरायलाबी जातो. एकाद्या दिवशी उपाशी झोपण्याचीबी तयारी हाय. काय जिंदगी असतीया अजून... दररोज पोटभर कष्टाची भाकर अन्‌ रोज रातच्याला शांत झोप...‘, पोरानं त्याचं आयुष्यच वाचून दाखवलं. आता सगळेच शांत झाले. तो तुलना करू नका म्हणत होता. पण सगळेजण स्वत:च्या जगण्याचीच त्याच्याशी तुलना करत होते.


सगळीकडे स्मशान शांतता पसरली. काही वेळाने स्कॉलर बोलू लागला, "काय असतं. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं नाही. मुलांच्या पण अपेक्षा असतातच. गोरी हवी, काळी नको. स्वयंपाक यायला हवा. गाडी यायला हवी. साडी घालता यावी. बाप श्रीमंत असावा. जावयाचा लाड करावा. बहिण-भाऊ शक्‍यतो नसावेत. आदी आदी...‘ आता अविवाहित बोलू लागला, "समजा, यापैकी एकही अपेक्षा नसेल तरीही मुलींच्या अपेक्षा असतातच ना?‘ "बीऽऽऽऽ कूल... अरे जी मुलगी आपली अख्खी लाईफ सोडून तुमच्याकडे येणार असते तिनं अपेक्षा ठेवल्या तर बिघडलं काय रे? तिने नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात!‘ स्कॉलर पेटला.


आता वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "शेवटी काय आहे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा एकूणात विचार हवा. शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्‍न असतो. प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींचं प्रमाणही ठरवायला हवं. अन्‌ त्या स्वीकारून आयुष्यभर परस्परांची साथ देण्याची हिम्मतही असावी. तसं झालं नाही तर प्रसंगी फारकत घेऊन दूर जाण्याचीही तयारी असावी. या पोरासारखी. जे आहे त्यात सुख मानायला हवं. जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नही अवश्‍य करावा. पण वास्तवाचं भान हवं. परस्परांना साथ द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... लक्षात ठेवा नवरा आणि बायको अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असताता, इतरांची खात्री नसते...‘सर्व वातावरण गंभीर झाले. ‘सिरीयसली विचार करा मित्रांनो आणि मात्र आता चला काम पडलीत...‘ असं म्हणत स्कॉलरने पूर्णविराम दिला.


© व्यंकटेश कल्याणकर

7/08/2021

आभासी वास्तवाची (Virtual Reality) एक जादुई दुनिया


आपण तंत्रज्ञानानं समृद्ध झालेल्या एका अद्‌भूत जगात जगत आहोत. आज आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला बोलू शकत आहोत, त्या व्यक्तीला आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकत आहोत. बेडवर झोपून कोणतीही वस्तू खरेदी करू शकत आहोत. जिना उतरून जाईपर्यंत पुढील प्रवासासाठी दारात कार बोलवू शकत आहोत. भूक लागल्यानंतर हवं ते दारात येऊ लागलं आहे. अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी मोबाईलला आपल्याला कसं जायचं, कुठं वळायचं हे सांगत मार्ग दाखवत आहे. लॉकडाऊननंतर तर शाळा, कॉलेज, बैठका आणि ऑफिस हे घराच्या हॉलमध्येच भरू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या उन्नत आविष्काराने साकारलेल्या एका अद्‌भूत जगात आपण जगत आहोत.

क्षणाक्षणाला नवा आविष्कार समोर येणारं जग अधिकाधिक जादुई होत चाललं आहे. जगणं सोप्पं करणाऱ्या या सर्व सुविधांच्या पलिकडे आता पुढे काय, हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. आणि त्याचं उत्तरही तयार आहे. नजीकच्या काळात अनेक अकल्पिक, असंभवनीय आणि अद्‌भूत आविष्कार उदयाला येणार आहेत. त्यापैकीच सर्वांत महत्वाचं म्हणजे येणारं जग हे Virtual Reality अर्थात आभासी वास्तवाचं जग असणार आहे.


काय आहे Virtual Reality?

चौदाव्या शतकाच्या मध्यात Virtual हा शब्द अस्तित्वात आला. व्हर्च्युअल म्हणजे एक असा अनुभव किंवा असा परिणाम जो अस्तित्वात नाही. अधिक सोप्या भाषेत सांगायचं तर भौतिक अस्तित्व नसलेला मात्र संगणकीय प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) तयार करण्यात आलेला अनुभव म्हणजे Virtual असं म्हणता येईल. या अर्थाने हा शब्द १९५९ साली सर्वप्रथम वापरण्यात आला. तर Reality चा सरळ सरळ अर्थ आहे वास्तव. थोडक्यात Virtual Reality म्हणजे संगणक निर्मित प्रतिमा ज्यामध्ये युजर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसच्या माध्यमातून त्रिमितीय (Three Dimentional) स्वरुपातील कृत्रिम दृश्य, वातावरण किंवा परिणाम असलेल्या जगाचा अनुभव घेऊ शकतो.

Virtual Realtiy च्या जगात तुम्हाला फक्त तुमचे डोळे आणि कान या दोनच अवयवांचा वापर करावा लागतो. डोळ्यांना जे दिसतं ते आणि कानांना जे ऐकू येतं ते तुम्हाला खरं वाटू लागतं आणि त्यातूनच तुम्हाला एका वेगळ्या जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. विशिष्ट प्रकारचे गेम्समध्ये तुम्हाला तुमचे हात, पाय मर्यादित स्वरुपात वापरावे लागतात.

जाणून घ्या EMV कार्डबद्दल…


कसं अनुभवयाचं Virtual Reality चं जग?

Virtual Reality च्या जगात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडं विशिष्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असणं गरजेचं आहे. त्याला VR Device म्हटलं जातं. अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला हा डिव्हाईस खरेदी करता येईल. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र फेसबुकचा Oculus हा डिव्हाईस ऑल-इन-वन प्रकारातील सर्वांत लोकप्रिय डिव्हाईस मानला जातो. चष्म्यासारखा दिसणारा हा डिव्हाईस फक्त डोळ्यांवर परिधान केली की तुम्हाला त्रिमितीय दृश्ये, प्रतिमा, वातावरण दिसू लागतं. ज्यामुळं तुम्ही प्रत्यक्षात कुठे आहात हे विसरून समोर दिसणाऱ्या दृष्टीला काही काळापुरतं खरंखुरं जग (वास्तव) मानता.

VR डिव्हाईस डोळ्यांवर परिधान करून तुम्ही स्वत:भोवती ३६० अंशात फिरून त्या आभासी जगातील वेगवेगळ्या दृश्यांचा अनुभव घेऊ शकाल. डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे, वर आणि खाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या आभासी जगातील वेगवेगळे दृश्ये दिसू शकतात. अर्थातच तुम्ही जे काही पाहत आहात, त्या प्रोग्रामच्या व्यापकतेवर हे अवलंबून आहे.

Virtual Reality चा वापर कुठे केला जातो?

सध्या तरी Virtual Reality चा सर्वांत लोकप्रिय वापर म्हणजे व्हिडिओ गेम्स किंवा चित्रपट पाहण्यासाठी होतो. मात्र, त्याही पलिकडे जाऊन वेगवेगळ्या शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणीही Virtual Reality चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याशिवाय आपल्याला सहजपणे Virtual Reality चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील बहुतेक मॉल्समध्ये असा अनुभव घेता येतो. त्यामध्ये एखादा गेम खेळता येतो किंवा ज्युरासिक पार्कसारख्या ठिकाणाला भेट देता येते.

अतिशय उपयुक्त आणि प्रभावी-परिणामकारक ठिकाणी Virtual Reality वापर करण्यात येत. त्यापैकी काही प्रमुख वापर खालीलप्रमाणे -

लष्करी प्रशिक्षण : अमेरिकेतील नौदल, हवाई दल, सागरी आणि तटरक्षक दलांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Reality चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याद्वारे प्रशिक्षणार्थींच्या डोळ्यांवर VR Device लावून त्यांना वेगवेगळ्या युद्धजनिक किंवा तत्सम परिस्थिती अनुभवण्याची संधी देण्यात येते. यातून कोणत्या परिस्थिती कसे वागायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.

क्रीडा प्रशिक्षण : वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी Virtual Reality चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामध्ये लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच वेगवेगळ्या परिस्थितीत खेळाडूने कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा किंवा कोणता निर्णय घ्यावा यासाठी उपयुक्त ठरत आहे. या शिवाय अनेक ठिकाणी क्रीडा प्रेक्षकांनाही प्रत्यक्ष मैदानात राहून सामन्याचा आनंद घेण्यासाठी Virtual Reality चा वापर होत आहे.


मानसिक उपचार : मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी Virtual Reality तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. रुग्णाला ज्या गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती वाटते, अशा गोष्टी किंवा परिस्थिती Virtual Reality मध्ये निर्माण करून रुग्णाला अतिशय सुरक्षित, नियंत्रित वातावरणात तसा अनुभव देण्यात येतो. यातून रुग्णाच्या मनातील भीती हळूहळू नष्ट करण्यात येते. मानवी समाजासाठी Virtual Reality चा हा सर्वांत सकारात्मक वापर असल्याचे मानला जाते.

वैद्यकीय प्रशिक्षण : लष्करी आणि क्रीडा प्रशिक्षणाप्रमाणेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी Virtual Reality चा वापर करण्यात येतो. यातून प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रत्यक्ष रुग्णाच्या शरीरावर उपचार करताना होणाऱ्या चुका किंवा त्रुटी टाळता येणे शक्य होते.

शैक्षणिक अभ्यासक्रम : विद्यार्थ्यांना शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या संकल्पना समजून सांगण्यासाठी Virtual Reality चा वापर होत आहे. अवकाश-सौरमालेची सफर, समुद्राच्या-पृथ्वीच्या आतील जग, मानवी शरीरातील अंतर्गत रचना वगैरे क्लिष्ट बाबी विद्यार्थ्यांना सहजपणे कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा पद्धतीने समजून सांगणे शक्य होते.

Virtual Reality चा असाही वापर शक्य!

नजीकच्या भविष्यात स्थानिक स्तरावर आणि सध्या आपण वापरत असलेल्या सोयीसुविधांसाठी Virtual Reality चा वापर वाढणार आहे. त्यापैकी काही उदाहरणे अशी असू शकतात –

ऑनलाईन खरेदी : सध्या आपण ऑनलाईन खरेदीमध्ये एखाद्या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी शोधून त्या खरेदी करतो. मात्र, Virtual Reality द्वारे हीच खरेदी प्रत्यक्ष ऑफलाईन खरेदीचा अनुभव देऊ शकते. Virtual Reality द्वारे ऑनलाईन खरेदीसाठी युजरला एक कॅरेक्टर तयार करावे लागेल. ते कॅरेक्टर Virtual Reality च्या जगात आपले प्रतिनिधीत्व करेल. त्यानंतर खरेदीसाठी आपण (आपले कॅरेक्टर) एका मोठ्या मॉलमध्ये प्रवेश करेल. तेथे सगळीकडे फिरून आपण आपल्याला हव्या त्या वस्तू आपल्या बास्केटमध्ये घेऊ शकतो. शेवटी चेक आऊट करून बिल पे करून आपण खरेदी पूर्ण करू शकतो. खरेदी केलेला माल ठरलेल्या दिवशी आपल्याला घरपोच मिळू शकतो.

ऐतिहासिक स्थळांना भेट : अनेक ऐतिहासिक स्थळांना प्रत्येकाला भेट देण्यासाठी Virtual Reality चा वापर करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे

प्राचीन काळाला-प्रसंगांचा अनुभव
: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना अर्पण केलेला प्रसंग, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, रामायण-महाभारतातील काही प्रसंग इत्यादी प्राचीन ऐतिहासिक प्रसंगांचा अनुभव Virtual Reality द्वारे पुन्हा एकदा अनुभवता येऊ शकतो.

याशिवाय पर्यटन किंवा धार्मिक स्थळांना भेटी, बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या प्रकल्पांचा (उदा. बंगला, फ्लॅट वगैरे) प्रकल्पपूर्तीपूर्वीच अनुभव इत्यादी ठिकाणीही आपण Virtual Reality चा वापर करू शकतो. केला जातो.

सॅटेलाईट फोनबद्दल सारं काही…


Virtual Reality निर्मिती प्रक्रिया

Virtual Reality मधील कंटेंटच्या निर्मितीची प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आणि दीर्घकाळ चालणारी असते. जेवढा Virtual Reality चा अनुभव समृद्ध, संपन्न आणि वास्तववादी वाटणारा हवा आहे, तेवढी त्याची निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची, वेळखाऊ आणि खर्चिक असते. Virtual Reality Content तयार करण्यासाठी काय दाखवायचं आहे याचा प्लॅन तयार केला जातो. त्यासाठीचा आवश्यक तो सर्व्हे केला जातो. माहिती संकलित केली जाते. त्याप्रमाणे द्वीमितीय, त्रिमितीय प्रतिमा तयार केल्या जातात. त्यासाठी उच्च क्षमतेचे कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि कॉम्प्युटर प्रोग्राम्सचा वापर केला जातो. यामध्ये 360 डिग्रीच्या फोटोजचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे सगळं तयार करताना त्यांचा आकार वास्तववादी वाटावा यासाठी प्रत्यक्ष मानवी जगातील आकारांच्या प्रमाणात सर्व काही तयार केलं जातं. ॲनिमेशनद्वारे प्रतिमांची हालचाल दाखविली जाते. हे काम मानवी शरीररचनेचा (Anatomy) सुक्ष्म अभ्यास असलेले तज्ज्ञ करतात. हे सर्व करताना Virtual Reality ची अनुभूती घेणाऱ्या युजरच्या हालचालींचाही विचार केला जातो. विशेषत: युजरचे डोळे, डोक्याच्या हालचालींप्रमाणे दृश्यांची रचना केली जाते.

खरोखरचे मानवी चेहरे असलेले प्रत्यक्ष छायाचित्रण जर Virtual Reality content मध्ये वापरायचे असल्यास ते अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक काम होते. कारण जो अँगल दाखवायचा आहे, त्या प्रत्येक ॲँगलमध्ये एकाचवेळी अनेक कॅमेऱ्यांचा सेटअप छायाचित्रण करतानाच करावा लागतो. एकदा का थीम तयार झाली की ती Virtual Reality Device मध्ये Install करण्यापूर्वी त्याची संगणकीय प्रोग्रामिंगद्वारे पुनर्रचना करावी लागते. या प्रक्रियेमुळे युजरच्या हालचालींप्रमाणे त्याला दृश्यांचा अनुभव घेता येतो. हे सगळं झालं की Virutal Reality Device वर हा Virtual Reality Content install केला जातो. समजा जर Device ला स्वतंत्र स्टोरेज क्षमता नसेल तर त्याला जोडलेल्या संगणक किंवा लॅपटॉपवर तो Content Install केला जातो. युजरला Virtual Reality चा अनुभव देता येतो.


Virtual Reality चा धोका

तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच माणूस स्वमग्न होत चालला आहे. अर्थातच Virtual Reality च्या जगातही युजर अधिकाधिक स्वमग्न होतो. परिणामी वास्तवाचा विसर पडणाऱ्या या जगाचा आकर्षण निर्माण होऊन व्यसन लागण्याची शक्यता असते. याशिवाय Virtual Reality चा अनुभव घेताना मानवी नैसर्गिक पद्धतीशिवाय कृत्रिम आणि संगणकाने निर्माण केलेल्या प्रोग्राम्सद्वारे दिसणाऱ्या इमेजेसचे आकलन करून त्याप्रमाणे अनुभव घेण्यासाठी मेंदूकडून डोळ्यांवर दबाव निर्माण होतो. परिणामी डोळ्यांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय वास्त

Virtual Reality ची काही यशस्वी उदाहरणे


  • मानसिकदृष्ट्या वाईट परिस्थितीतून जात असलेल्या व्यक्तीला प्रेरित करून त्याला यशस्वी करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाचे बहुमोल मदत होत असल्याचे म्हटले आहे.

  • अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील डक विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार रक्तातील हिमोग्लोबिनला परिणाम करणाऱ्या सिकलसेल आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपचारासोबतच व्हर्च्युअल रिॲलिटीचा प्रयोग यशस्वी झालेला आहे.

  • युकेतील व्हर्जिन हॉलिडेज या पर्यटन क्षेत्रातील कंपनीने व्हर्च्युअल रिॲलिटीची प्रभावी वापर केला आहे. पूर्वनियोजित सर्व टूर्स हाऊस फुल्ल झाल्यानंतर आपल्या ग्राहकांना टूरची अनुभूती देण्यासाठी व्हर्जिनने व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे वेटिंगमुळे नाराज झालेल्या ग्राहकांना त्यांना अपेक्षित स्थळांची व्हर्च्युअल टूर घडविली, ज्यामुळे हेच अपेक्षित ग्राहकांनी त्यांचे टूर पॅकेज खरेदी केले आणि कंपनीची सेल ७० टक्क्यांनी वाढला.

  • पत्रकारिता क्षेत्रातही व्हर्च्युअल रिॲलिटीचा यशस्वी वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत आपण बातमी फक्त पाहत किंवा वाचत होतो, मात्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने nytvr ॲपद्वारे बातमी घडत असताना प्रत्यक्ष तेथे उपस्थित असल्याचा अनुभव आपल्या प्रेक्षकांना देण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

  • मे २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात ‘ईबे’ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तब्बल १२,५०० उत्पादने खरेदी करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी स्टोअर खुले केले होते.

भारतासारख्या विकसनशील देशाने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग ओळखून Virtual Reality च्या क्षेत्रात प्रगती करणं आवश्यक आहे. पुरेसे मनुष्यबळाच्या भांडवलावर सरकारसह, खाजगी संस्था आणि कंपन्यांनीही या सर्व Virtual Reality च्या जगात स्वत:ची क्षमता, सामर्थ्य आणि व्याप्ती ओळखून वेळीच गुंतवणूक आणि वेगाने निर्णय घेण्याची गरज आहे.

(यशदा यशमंथनमध्ये प्रसिद्ध झालेला लेख)

7/07/2021

‘‘तुम्ही हजारवेळा आमचं घरटं चोरा! आम्ही पुन्हा उभं राहू’’, घरटं चोरणाऱ्या माणसाला सुगरण पक्षाचं पत्र!

नमस्कार माणसांनो,

मी सुगरण बोलतोय. हो, बरोबर वाचताय. सुगरण पक्षी. तुम्ही म्हणाल पक्षी, प्राणी, कीडे-मुंग्या कधी बोलतात का? पण एखाद्याचं ‘घरटं’च कोणी चोरून नेलं तर तो शांत कसा बसेल? तुमच्यातीलच एका माणसाने नव्हे एका दैत्याने नव्हे एका चोराने पुण्यातून आमची १९ घरटी चोरून नेली. 


दुर्दैव बघा ज्या घरट्यात राहायचं नाही, जे घरटं स्वत:ला तयार करता येत नाही, एवढचं नव्हे तर जे घरटं चोरण्यासाठी ज्याला कापूनही घेता आलं नाही अशा नराधमानं आमचं घरटं चोरलं. एक-एक घरटं काढून घेता आलं नाही, म्हणून ‘त्या’ राक्षसानं झाडाच्या ज्या फांदीवर आम्ही १९ घरटी उभारली होती, ती संपूर्ण फांदीच तोडून नेली. काय म्हणावं त्या हैवानाला? 


आमच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल सांगण्याआधी आमच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगावं लागेल. कारण अलिकडं तुम्ही माणसं पक्षी, प्राणी, आजबाजूचा भोवताल सोडा; तुम्हा माणसांना शेजारी असलेला माणूस जिवंत आहे की मेलाही याचीही जाणीव नसते. कारण तुम्ही स्मार्ट फोन हातात घेऊन खूप ‘स्मार्ट’ झाला आहात. त्या फोनमुळेच तर आमच्या कुळातील चिमण्यांना आपल्या डोळ्यादेखत आपल्या पिढ्या संपताना पहाव्या लागल्या. 


आमची संस्कृती थोडी वेगळी असते. आम्हाला कोणी सुगरण म्हणतं, कोणी बाया कोणी विणकर, तर कोणी गवळण म्हणून ओळखतं. आम्ही छानशा विहिरीवर घरटी बांधतो आणि तिथं बसून आमच्या प्रेयसीला (सुगरण मादी) आकर्षित करतो. त्या सुगरणीला जर घरटं आवडलं तर आमचा संसार सुरू होतो. 


आमच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेश असतो. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंपासून आम्ही हे घरटं व्यवस्थित विणून तयार करतो. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. आम्ही एकाचवेळी एकाच परिसरात एका पेक्षा जास्त घरटी तयार करतो. घरटं तयार करण्याचं काम आम्ही करतो. आमच्या सुगरणी घरट्यामध्ये एकावेळी २ ते ४ अंडी देतात. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. 


पहाटे लवकर उठायचं. घरट्याबाहेर पडायचं. विहिरीतल्या पाण्यात स्नान करायचं. उंच आकाशात उडायचं. दाणे शोधायचे. सुगरणीकडं द्यायचे. पिल्लांना चोचीतून भरवताना बघायचं. पुन्हा दाणे आणायचे. दिवस मावळला की घरट्याकडे परतायचं. असा आमचा दिनक्रम. दरम्यान आम्ही आमच्या पिल्लांना उंच आकाशात झेप घ्यायला शिकवतो. कोकिळाबाई, चिऊताई आणि मैनाबाई यांच्याकडून गाणं शिकायला सांगतो. सोबतच आपल्याला धोका असल्याशिवाय कोणालाही त्रास द्यायचा नाही, हे आम्ही आवर्जुन सांगतो. 


आमच्या घरट्याला तुम्ही माणसं खोपा सुद्धा म्हणता. कवयित्री बहिणाबाईंनी, ‘‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाले टांगला’’ असं म्हणत आमचं कौतुक केलं आहे.


मागील काही दिवसांपासून मी माझ्या काही मित्र-नातेवाईकांसोबत पुण्यातील वारजे येथील एका छानशा टेकडीवर आम्ही राहत होतो. विहिरीच्या जवळ बाभळीच्या झाडावर प्रचंड मेहनतीनं घरटी तयार केली होती. दूरदूरवर जाऊन काडी, केस, माती शोधून, चोचीत धरून तयार केलेल्या आमच्या छानशा घरट्यात राहत होतो. त्यादिवशी मी प्रचंड थकलो होतो. पहाटेच्या हवेची मंद झुळूक, घरट्यातील उब अशा रम्य आणि स्वत:च्या घरट्यात शांतपणे आराम करत होतो. माझं घर सर्वार्थानं माझं होतं. कारण, आमच्यामागे ईएमआयची कटकट नव्हती. 


त्या रम्य वातावरणात आम्हाला अचानक भूकंपासारखा एकाएकी झटका जाणवला. खूप मोठा धोका असल्याचं आम्हाला समजलं. घरट्यातील आमच्या सुगरणी, पिल्ले हे सगळेजण जिवाच्या आकांतानं ओरडू लागले. एरवी इतर कीटक किंवा आमचे शत्रू हल्ले करतात, त्याची चाहुल आम्हाला आधीच लागते. आणि ते माणसांएवढे निर्घृण नसतात. ते हल्ला करतानासुद्धा हल्ल्याची काही नैतिकता पाळतात. 


मात्र, त्यादिवशी घडत असलेले हे सगळं अचंबित करणारं होतं. अचानकच झोपेत असताना हे सगळं घडत असल्याने काय होत आहे आणि काय करायचं आहे, हे कोणालाच समजत नव्हतं. उडत उडत बाहेर आल्यावर समजलं की पहाटेच्या अंधारात एक माणूस आम्ही ज्या फांदीवर घरटी बांधली होती, ती फांदी तोडत आहे. आम्ही पटकन आमच्या भाषेत सर्वांना जागृत केलं. आमच्या सुगरणींना, पिल्लांना आणि घातलेल्या अंड्यांना घरट्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही आमच्यापैकी काही पिल्लांना, काही मित्रांना आणि काही सुगरणींना आम्ही वाचवू शकलो नाही, याचं आम्हाला खूप वाईट वाटलं. हे सगळं अगदी एक-दोन मिनिटांत घडलं. आमची १९ घरटी घेऊन एका माणसाची काळी आकृती पहाटेच्या अंधारात गायब झाली. स्वत:ला सावरता सावरता त्या नराधमाच्या मागे जाऊन त्याला जाब विचारायचं राहून गेलं. म्हणूनच हा पत्रप्रपंच.


आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पण आम्ही सारे एकत्र आहोत. सोबत आहोत. कारण आमच्यामध्ये द्वेषाला स्थान नाही. आमच्यामध्ये भेदाभेदाची कोणतीही भिंत नाही. एकमेकांचे अश्रू पुसून पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद आमच्या पंखांमध्ये आहे. आम्ही पुन्हा उभं राहू. पुन्हा काडी काडी गोळा करू आणि पुन्हा घरटी बांधू. आम्ही दुसऱ्यांची घरं चोरणारी ‘माणसं’ नाहीत, तर स्वत:च्या सामर्थ्यावर, माणसांना तयार करता येणार नाहीत अशी घरटी उभारण्याचं सामर्थ्य असलेले  ‘सुगरण’ आहोत. तुम्ही १९ काय १९ लाख घरटी जरी घेऊन गेलात, तरी आम्ही खचणार नाही. पुन्हा उभं राहू. 


पण त्या दिवशीचा अनुभव विचित्र आणि तुम्हाला ‘माणूस’ म्हणावं का यावर आम्हा पक्षांना पुन्हा विचार करायला लावणारा होता. पण आम्हाला आजही विश्वास आहे. तुमच्यातलं ‘माणूसपण’ आजही शिल्लक आहे. कारण आमच्यात द्वेषाला स्थान नाही. तर आदर, सन्मान आणि संरक्षणासाठी सामर्थ्य हे आमचं जीवन आहे. त्यामुळेच तर आम्ही आमच्या पिल्लांना स्वत:च्या जीवाला धोका असल्याशिवाय हल्ला करायचा नाही, हे शिकवतो. त्यांना फक्त प्रेमच करायचं शिकवतो. फक्त प्रेम.


तो माणूस कुठे आहे? त्यानं आमची १९ घरटी का नेली? त्याचं पुढे काय केलं? त्यानं असं का केलं? हे सगळं तुम्ही शोधालच. कदाचित त्या माणसाला तुमच्या कायद्यानुसार शिक्षाही होईल. कदाचित असे प्रकार याआधी अनेकदा घडलेही असतील. पण पुण्यातील या घटनेमुळे आमच्या मनावर माणूस म्हणून तुमची जी प्रतिमा होती, त्याला जो धक्का पोहोचला आहे, तो पुन्हा कधीही भरून येणार नाही. कधीच भरून येणार नाही.


चला, निघतो. पिल्लं, सुगरण रस्त्यावर आहेत. घरटं बांधायचं आहे.

© व्यंकटेश कल्याणकर

6/06/2021

समृद्ध आशयसंपन्न कथासंग्रह : सारांश कथा

माणूस म्हणून जगताना अन्न, वस्त्र, निवा-यासोबतच रंजन ही देखील आता एक अनिवार्य गरज बनत चालली आहे. प्रत्येकाची अभिरूची वेगळी असू शकते, पण अंतिमत: हेतू रंजन हाच असतो. रंजनाची हजारो माध्यम आज आपल्या अवती-भोवती फेर धरून नाचत आहेत. नाटक, चित्रपट, वेबसिरीज वगैरे वगैरे. मात्र, सर्वांमध्ये एक कथानक आहे. परिमाणात मोजता येईल असा आशय आहे. दुर्दैवानं सांगावसं वाटतं की रंजनाच्या व्यावसायिकीकरणात आशयामध्ये टोकाची तडजोड करण्यात येत आहे. त्यामुळेच तर सुज्ञ आणि अभिरुचीसंपन्न वाचकवर्ग आशयसंपन्न साहित्याकडे वळत आहे. त्याचप्रमाणे युवालेखकही आशयसंपन्नतेला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. युवा लेखक व्यंकटेश कल्याणकर यांचा `सारांश कथा' हा कथासंग्रह याचं प्रतिक आहे.`सारांश कथा' म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय सांगणारी कथा. स्क्रोलिंग म्हणजेच दुर्लक्ष करत करत पुढे जाणा-या पिढीला खिळवून ठेवून, त्यांची विचारप्रक्रिया प्रज्वलित करणा-या २३ कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. सृजनशील नवलेखकांना सातत्याने प्रोत्साहित करत बळ देणा-या `चपराक प्रकाशन'नं हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.


अत्यल्प उत्पन्न असतानाही गैरमार्गानं पैसे न कमावणारा बाप आपल्या लेकीकडूनच कसं शिकतो हे `खोटं कधी बोलू नये' या कथेत समर्थपणे मांडलं आहे. `क्षितीज' आणि `आई मला पंख आहेत पण...' या कथा माणूस म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणा-या आहेत. `सुपारी', `प्रॅक्टिकल?', `रिअल एरर', `ते देवीकडं काय मागतात?', `मालक लढा', `नेमके खरे काय?' या कथा खरोखरच आपला भवताल किती गढूळ होत चालला आहे, याचं उदाहरण देतात. तर `आपलं ध्येय काय?', `नवस' या कथा थेटपणे संदेश देतात. `तू मला बी सोडून जाशील?', `आनंदाश्रू', `कोणी मरत कसं नाय?' या कथा वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडतात आणि भावविवश करतात.

माणसाला मिळालेल्या अश्रू ढाळण्याचं कारण सांगण्याच्या सामर्थ्याचा उपभोग घेतल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. त्याची प्रचिती पुस्तकाच्या प्रत्येक पानात येते. पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखकाने माणसाला मिळालेल्या पहिल्याच कथासंग्रहातून लेखकाची वैचारिक क्षमता, विचारविश्वाची व्याप्ती, भवतालच्या घटनांमधून आशय शोधण्याची शोधक दृष्टी, शब्दसामर्थ्य आणि काळजाला हात घालणारं लिहिण्याची हातोटी स्पष्ट दिसून येते. उत्कृष्ट मांडणी, कलेचे उपासक समीर नेर्लेकर यांनी साकारलेले साजेसे मुखपृष्ठ यामुळे कथासंग्रह अधिक बहारदार झाला आहे.


लेखकाला समजून घेण्याची वाचकांची प्रक्रिया सुरु होण्यासाठी जो अवधी लागतो, तो अवधी पूर्ण होण्याआधीच `सारांश कथे'तील प्रत्येक कथा शेवट गाठते. त्यामुळे लेखकाला समजून घेण्याआधीच वाचकांना लेखकाच्या भूमिकेत जावे लागते. मात्र, `सारांश कथा' हा संग्रह वाचकांना पुरेपूर वाचनानंद देतो, यात किंचितही शंका नाही.


सारांश कथा | चपराक प्रकाशन, पुणे

व्यंकटेश कल्याणकर

पाने : 48 । किमंत : रु. 50/-


पुस्तक खरेदीची लिंक : http://bit.ly/ChaprakSaranshKatha


(दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेला 'सारांश कथा' या कथासंग्रहाचा परिचय. त्याबद्दल पुण्यनगरीचे तत्कालिन पत्रकार स्वप्नील कुलकर्णी आणि ‘चपराक’चे प्रकाशक – संपादक घनश्याम पाटील सर यांचे आभार!)

7/24/2020

लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडिया ठरली जीवनसंजिवनी!

करोनाच्या रुपाने डोळ्यांना न दिसणार्या अदृष्य स्वरुपातील राक्षसामुळे मानवी अस्तित्वावर महाभयानक संकट ओढवले आहे. `माणूस जिवंत रहावा', या एकाच हेतूने जगातील बहुतेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, सतत कृतीशील-कार्यमग्न (एंगेज) राहण्याचा नैसर्गिक स्वभाव असलेल्या माणसाला लॉकडाऊनच्या काळात आधार ठरला तो इंटरनेटचा. सोशल मिडियानं माणसांना एंगेज ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ही एंगेजमेंट नजीकच्या काळात आपली व्याप्ती अधिक वाढविण्याचे संकेत दाखवित आहे. 

लॉकडाऊनच्या काळात रस्ते रिकामे असताना फेसबुक, व्हॉटसऍप, इंस्टाग्राम, ट्टिवर, लिंक्डइन इत्यादी सोशल मिडिया साईटस् झूम, लार्क, वेबेक्स इत्यादी वेबिनारची सुविधा देणारी माध्यमे तर युट्युब, नेटफ्लिक्स, मॅक्सप्लेअर, हॉटस्टार इत्यादी मनोरंजनाचा खजिना पुरविणारी माध्यमे माणसांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेली. ही गर्दी एवढी प्रचंड होती की बॅंडविड्थवर (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी माहिती (डेटा) पोहोचविणारी यंत्रणा) ताण आला आणि नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांना त्यांच्याद्वारे प्रसारित केले जाणारे व्हिडिओ एचडीवरून (हाय क्वालिटी) केवळ एसडी (स्टॅंडर्स क्वालिटी) दर्जाचेच दाखविण्याची वेळ आली.

कार्यमग्नता, रंजन आणि काही अंशी प्रबोधनासाठी या सर्व माध्यमांचा वापर करण्यात आला. लॉकडाऊन वाढत जाण्याची  चिन्हे दिसल्यानंतर काही आस्थापनांनी, कंपन्यांनी हा कालावधी प्रशिक्षण, गुणवत्ता सुधारणा आणि चिंतनासाठी सार्थकी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झूमचा (व्हिडिओ मिटिंग सुविधा असलेले संकेतस्थळ/ऍप) वापर वाढला. दरम्यान झूमशिवाय अन्य पर्यायही समोर आले. त्यामध्ये `गुगल डिओ'लाही मागणी वाढली. आणि कर्मचार्यांच्या घरांची कार्यालये झाली. प्रशासनानेही घरातूनच कामकाज सुरु केले. त्यासाठी नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केलेल्या सुरक्षित अशा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूलचा वापर करण्यात आला. केंद्र सरकारने मंत्री आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांना एनआयसीचेच टूल वापरावे असा अधिकृत सल्ला दिला. महानगरपालिका, नगरपालिकासारख्या स्थानिक प्रशासनानेही स्वनिर्मित किंवा अधिकृत टूल्सद्वारे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवले.  तर राजकीय व्यक्तींनीही फेसबुक लाईव्हसारख्या माध्यमातून जनतेशी संवाद सुरुच ठेवला.

खाजगी क्लासेस, खाजगी शाळा यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात एंगेज ठेवण्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय निवडला. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या बाळगोपाळांच्या कोमल ओठांतून `झूम' नाव बाहेर पडू लागले. कलावंतांना तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नवं व्यासपीठच मिळालं. कलावंतांचे समूह तयार झाले. काही विद्यापीठांनी `गुगल डिओ'द्वारे ऑनलाईन लेक्चर्सद्वारे अभ्यासक्रम सुरु ठेवले. याशिवाय हेलो, शेअरचॅट, टीकटॉक, ट्रूकॉलर, व्हीमेट या ऍप्सलाही मागणी वाढली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी चोखंदळ मराठी वाचकांनी प्रतिलिपी, इनमराठी, स्टोरीटेल यासह अन्य माध्यमांना पसंती दिली. या सर्वांद्वारे लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्यांचं चांगलच रंजन झालं. काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांनी केलेल्या अभ्यासानुसार फेसबुक आणि तत्सम ऍपच्या डाऊनलोडच्या प्रमाणात काहीही वाढ झालेली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, ज्यांनी आधीच अशी ऍप्स केवळ डाऊनलोड करून ठेवली होती. त्यांचं वापराचं प्रमाण वाढलं यात मात्र काहीही शंका नाही.

लॉकडाऊनपूर्वी खरेदीचं नियोजन केलेल्या मंडळींची लॉकडाऊनमुळे निराशा झाली. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऍप्सद्वारे खरेदी जरी शक्य झाली नसली तरीही खरेदी इच्छुक मंडळींनी वेगवेगळ्या वस्तूंची निवांतपणे सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे या ई-कॉमर्स ऍपवरही पुष्कळ गर्दी झाली.

अपग्रेडेशनला प्राधान्य
लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियाचा वापर वाढला. त्यामुळे फेसबुक, व्हॉटसऍपने युजरची गरज ओळखून अपग्रेडेशला प्राधान्य दिले. त्यासाठी रिसर्च डिपार्टमेंट कामाला लागले. मात्र, यासाठी कार्यरत बहुतेक कर्मचारी `वर्क फ्रॉम होम' करत होते. अखेरीस व्हॉटसऍपने काही दिवसांपूर्वीच एकाच वेळी आठ जणांना व्हिडिओ कॉलची सुविधा आणण्याचे जाहीर केले. तर फेसबुकने `फेसबुक मेसेंजर'द्वारे मल्टिव्हिडिओची सुविधा देण्याचा  निर्णय घेतला. याशिवाय फेसबुक लाईव्हद्वारे निधी संकलनाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही कळविले. याशिवाय गुगल, ट्विटर आणि अन्य कंपन्यांनीही आपला रिसर्च डिपार्टमेंट कामाला लावला आहे. 

लॉकडाऊनचे जग आणि सोशल मिडिया
लॉकडाऊननंतरचे जग कसे असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. एक मात्र खरे की लॉकडाऊननंतर माणसं माणसांमध्ये सामाजिक अंतर ठेवतील. कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घेतील आणि पर्यायाने ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देतील. याशिवाय सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. ऑनलाईन बैठका, प्रशिक्षण, मैफिली (निशुल्क-सशुल्क), चर्चासत्रे, कार्यशाळा आदींसाठी वेगवेगळी व्यासपीठे विकसित होतील. स्वयंशिक्षणाकडे कल वाढेल. यातून कौशल्याधारित मनुष्यबळाला मागणी वाढेल. तर जास्तीत जास्त मानवी हस्तक्षेप असलेल्या कारकूनी किंवा कामाच्या पारंपरिक पद्धतीला मागणी कमी होईल. त्यामुळे प्रत्येकालाच नव्या युगातील संसाधनांच्या किमान वापराची कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज ठरेल. कल्पकता, नाविन्यता आणि सर्जनशीलतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल. विशेषत: उपलब्ध तांत्रिक संसाधने-डिव्हाईसेस, माणसांच्या गरजा आदींची सांगड घालून नवे आविष्कार आणि सोयी-सुविधा निर्मितीकडे कल वाढेल. विशेष म्हणजे हे सगळं एखादी मोठी कंपनी किंवा समूह वगैरेच करेल हा भ्रम ठरेल. अशा तंत्रज्ञानाधारित निर्मितीला केवळ मानवी बुद्धिमत्ता हीच एकमेव भांडवल ठरेल. त्यामुळे एखादा शाळकरी विद्यार्थी किंवा एखादा वयोवृद्ध व्यक्तीही अशी लोकोपयोगी नवनिर्मिती करू शकेल. जो या सर्वांमध्ये पारंगत होईल, तो अल्पावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध होईल. 

फेसबुकच ठरेल वरचढ!
`गुगल'ने सोशल मिडियामध्ये उतरण्यासाठी २००४ साली आणलेले `ऑरकुट' २०१४ साली ऑरकुट बंद केले. तर २०१४ साली आणलेले `गुगल प्लस'ही बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००४ पासून सुरु असलेले फेसबुक तब्बल १६ वर्षांपर्यंत अखंडपणे वाचकांच्या `लाईक्स' मिळवित आहे. फेसबुकने संपूर्ण सोशल मिडिया स्वत:च्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. `इन्स्टाग्राम' , `व्हॉटसऍप' ही काही उदाहरणे. याशिवाय स्पर्धा करणार्या छोट्या-मोठ्या कंपन्या विकत घेण्याचं फेसबुकचं धोरण कायम आहे. आतापर्यंत फेसबुकने तब्बल ८२ कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे बाजारातील स्पर्धाच ताब्यात घेण्याचा फेसबुकचा प्रयत्न दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र तुम्ही ज्यावेळी एक श्वास तुमच्या शरीरात घेता त्यावेळी फेसबुकच्या खात्यात प्रत्येक वेळी पाच लाख रुपये जमा झालेले असतात. यावरुन फेसबुकची व्याप्ती लक्षात येईल. फेसबुकने युजरसोबतच जाहिरातदारांनाही प्रचंड मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित ग्राहक शोधण्यासाठी १३०० पेक्षा अधिक स्थान, लिंग, वय, अभिरुची असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि यामुळेच फेसबुक सर्वांत वरचढ ठरणार आहे. 

आपला युजर फेसबुक सोडून दुसरीकडे जाऊ नये हा फेसबुकचा नित्यप्रयत्न असतो. त्यासाठी सातत्याने संशोधने आणि विकसन सुरु असतात. त्यामुळेच नजीकच्या काळात तुम्हाला काहीही करायचे असेल तर ते फेसबुकवर करता येणे शक्य होणार आहे. त्यामध्ये कोणत्यही प्रकारची खरेदी, कार्यशाळांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे यासह जे काही इंटरनेटविश्वावर करता येईल ते सर्व काही फेसबुकवर करता येणार  आहे. त्यामुळे नजीकच्या काळात किमान भारतीयांसाठी तरी फेसबुक म्हणजे इंटरनेट ठरेल असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.

प्रतिक्रिया 
लॉकडाऊनच्या काळात आम्ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार परवाने घेऊन आंबा विक्री सुरु केली. महाराष्ट्रभर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गांवर येणार्या शहरांमध्येच फेसबुकद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही दररोज किमान १००० डझन आंबा राज्यभर विक्री करत आहोत. 
- महेश पळसुलेदेसाई, रत्नागिरी (आंबा बागायतदार-व्यापारी)

मागील काही महिन्यांनापासून अनेक कंपन्यांनी आपल्या डिजीटल जाहिरातींसाठीची आर्थिक तरतूद वाढवली आहे. लॉकडाऊननंतर विपणन आणि जाहिरातींसाठी डिजीटल माध्यमांना पूर्वीपेक्षा अधिक महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी लवकरात लवकर या माध्यमांचा प्रभावी वापर करायला हवा.
- राघवेंद्र जोशी, विपणन तज्ज्ञ, पुणे

आम्ही कलावंत मंडळींच्या १४८ जणांच्या समूहाने लॉकडाऊनच्या काळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दररोज सात तास याप्रमाणे सलग ४० दिवसांमध्ये मिळून तब्बल २८० तासांच्या संगीत कार्यक्रमांचे प्रसारण केले. या कार्यक्रमांचा जवळपास काही लाख प्रेक्षकांनी लाभ घेतला. नजीकच्या भविष्यातही आम्ही ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- कीर्ती निलेश देसाई, पुणे (पार्श्वगायिका-गीतकार-संगीतकार)

नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प सुरु करण्यापूवी त्याची संकल्पना, योजना, नियोजन याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तसेच जनजागृती-जनप्रबोधनासाठी आम्ही सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. या माध्यमातून प्रशासनाशी नागरिकांना कनेक्ट करून त्यांना सहभागी करून घेता येणे शक्य झाले आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि नंतरही या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
- संग्राम जगताप, जनसंपर्क अधिकारी (पुणे स्मार्ट सिटी, पुणे)
'ई-पेपर'चा गोंधळ
लॉकडाऊनच्या काळात छापील वर्तमानपत्रांच्या घरोघरी जाऊन वितरणावर संसर्गाच्या धोक्यामुळे निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे बहुतेक माध्यम समूह आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माध्यम क्षेत्रातील कर्मचार्यांचे रोजगारावरही अनिश्चिततेची ग्रहण आले आहे. मात्र, सतत वाचकांसमोर रहावे यासाठी बहुतेक वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती अखंडपणे वाचकांसमोर ठेवली. त्यापैकी काही अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती पीडीएफ फाईलच्या स्वरुपात व्हॉटसऍपद्वारे शेअर केली. तिला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र त्यातून केवळ वाचकांसमोर वृत्तपत्र दिसण्याखेरीज महसूलाच्या दृष्टीने कोणताही लाभ होत नाही. याउलट जर वृत्तपत्रे ही त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर जाऊन ई-पेपरच्या स्वरुपात वाचली गेली असती तर त्यातून डिजीटल जाहिरातींद्वारे (गुगल ऍडस, ऍड जेब्रा किंवा तत्सम माध्यमातून) काही महसूल प्राप्त होऊ शकला असता. भलेही तो महसूल अगदी किरकोळ ठरला असता. मात्र, त्यातून भविष्यात मोठा लाभ होऊ शकला असता. लॉकडाऊनच्या काळात बहुतेक माध्यम समूहांना आपल्या वाचकवर्गाला ई-पेपरकडे (पीडीएफकडे नव्हे!) वळविण्याची आणि हळूहळू डिजीटल आवृत्तीकडे वळविण्याची सुवर्णसंधी लाभली होती. दुर्दैवाने, माध्यम समूहांनी तिचा फारसा लाभ घेतल्याचे दिसत नाही.

जिओमध्ये फेसबुकची गुंतवणूक
भारतामध्ये सर्वप्रथम सर्वांत स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सेवा देणार्या जिओमध्ये फेसबुकने ४३ हजार ५७४ रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील प्रमुख व्यवहारांपैकी हा एक व्यवहार ठरला आहे. यामुळे फेसबुक हे जिओचे सर्वांत मोठे शेअर होल्डर ठरणार आहे. नजीकच्या फेसबुकद्वारे स्थानिक व्यावसायिक आणि ग्राहकांना जिओमार्टच्या (ई-कॉमर्स पोर्टल) माध्यमातून कनेक्ट करण्याच्या हेतूने हा व्यवहार झाला आहे. यामुळे डिजीटल मार्केटिंगला अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

हे आवश्यकच!
जग बदलत आहे. लॉकडाऊननंतरही ते सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे या बदल्या जगात सर्वसामान्यांना आपली सर्वार्थानं समृद्धी करून घ्यायची असल्यास नेहमीचे कौटुंबिक कलह, घरगुती समस्या बाजूला ठेवून लोकांची गरज आणि तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल याबाबत सातत्याने विचार-चिंतन-मनन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी छोटे-मोठे नवीन कौशल्य  विकसनावरही भर द्यायला हवा. थोडक्यात फलप्राप्तीपेक्षा प्रत्यक्ष कृतीशीलतेला सर्वोच्च प्राधान्य दिले तर समृद्धीसोबतच नजीकच्या काळात तुमच्या हातून अनेक भव्य-दिव्य आविष्कार घडू शकतात.

7/23/2020

माहेराला येऊन जा... (कविता)


7/22/2020

दादाच माहेर (कविता)


7/21/2020

चल ना रे दादा पुन्हा लहान होऊ... (कविता)

ताई दादाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी कविता -

3/21/2020

प्रेरणादायी विचार... (04)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....11/16/2019

मार्ग (लघुकथा)

`हॅलो, आज लवकर येशील? मला खूप बोअर होतयं रे!''
``हो... आज काही एवढं काम नाहीए येतो लवकर..''
ती, तो आणि त्यांचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. गोंडस कुटुंब. ती नोकरी करायची. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात नोकरी सोडली. छानसं बाळ झालं. मुलगी झाली. 
दारावरची बेल वाजली. तो आला. तिनं त्याला मिठीच मारली आणि ठसाठसा रडू लागली.
``राणी , अगं काय झालं'' तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.
``मला जगावसं वाटत नाही रे. खूप कसं तरी होतय रे.''
``तुझं काही दुखतय का? चल, मी डॉक्टरांना फोन लावतो. जाऊयात.''
``नाही रे. दुखत काही नाही. पण काय होतय तेच कळत नाही. म्हणजे बघ, पूर्वी कशी मी छानपैकी माझ्या प्रत्येक मिनिटा मिनिटाचं नियोजन करायचे. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, आपलं फिरणं, गप्पा किती छान जगत होते मी.''
``हो, काय भारी वाटायचं. आताही आपण हे सगळं करू शकतोच ना?''
``नाही रे. आता ही आलीय ना आपल्याकडं.''
``म्हणून काय झालं?''
``तिला घेऊन कुठं फिरणार अरे.''
``होईल ती लवकरच दोन-तीन महिन्यात सगळं ठीक होईल, राणी''
``बघ, दोन तासापासून त्रास देत होती. आता कुठं झोपलीय.''
``अगं बाळ आहे ते. त्याला काय माहिती आहे आपण जे करतोय त्यामुळं आपल्या आईला त्रास होतोय ते.''
``हो, अरे. पण ही झाल्यापासून या चार भिंतीतच मला जगावं लागतयं. ती तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणाकडे जात पण नाही रे.''
``तिला पाळणारघरात ठेवून तू नोकरी करतेस का?''
``मला तर आता वाटतय की मी या घरातून पुन्हा बाहेर जाईल की नाही. माझं सगळं संपलयं राजा.'' असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली.
त्यानं तिला गच्च मिठीत घेतलं. ``हे बघ, अगं ही आयुष्यातील एक फेज आहे. काळ निघून गेला की ही फेजही संपेल. तू पुन्हा तुझी नोकरी, तुझा पूर्वीसारखा कार्यक्रम सुरु ठेवशील.''
``मला तर आता असं काही वाटत नाही. ही फेज जाईपर्यंत मी राहते की...''
 तिच्या तोंडावर हात ठेवत तो बोलला, ``काहीही काय बोलते अगं, तू...''
``अरे, दिवसभर ती माझं आणि मी तिचं तोंड बघत बसते.  मलाही बोअर आणि तिलाही बोअर होत असेल.''
`हमममम'''
`कधी कधी वाटतं, आपण उगाच हिला जन्म...''
पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवत तो  म्हणाला, ``राणी, अगं.. असं ना बोलू..'
``मग मी काय करायचं दिवसभर सांग बरं तू?''
आता तो बोलू लागला, ``अगं सगळ्यात पहिल्यांदा तू हे असले विचार करणे सोडून दे. बी पॉझिटिव्ह. खूप काही करता येण्यासारखं आहे.''
``गप्पा मारणं सोप्पयं रे. दिवसभर तिच्याजवळ रहावं लागतं. तिला बघावं लागतं.''
``हो न. पण ती ज्यावेळी झोपते न त्या वेळेत खूप काही करता येतं.''
``काय? तेच तर सांग ना?''
``हे बघ,  ती झोपली की तू पुस्तक वाचू शकतेस, पेपर वाचू शकतेस.  टीव्ही पाहू शकतेस.''
``हे सगळं नाही आवडत मला.''
``मग तू फेसबुकवर मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारू शकतेस. चॅट करू शकतेस.''
``हे पुरुष लोक हरामखोर असतात अरे. थोड्या गप्पा मारायल्या की लागतात सलगी करायला...''
``असं नाहीए. पण असो. तू न तिला झोपवतेस कसं?''
``बाबा रे, तिला मांडीवर. मांडी हलवत गाणी म्हणत झोपवावं लागतं.''
``ओह. बघ तू जी गाणी म्हणतेस न ते रेकॉर्ड कर फोनवर...'
``आणि त्याचं काय करायचं?''
``फेसबुक, युट्युबवर आणि साऊंडच्या कितीतरी ऍप आणि वेबसाईटस् आहेत त्यावर अपलोड करायची गाणी.''
``बरं हे झालं. आणखी काय करायचं?''
`` रेडिओ ऐकायचा. त्यावर स्पर्धा असतात. त्यात भाग घ्यायचा.''
``आणखी''
``उद्या तुला एक डायरी आणून देतो. त्या डायरीत तुझ्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग लिहायचे आणि आयुष्यात पुढे काय काय करायचं आहे हे लिहायचं. दररोज किमान एक पान तरी लिहायचं.''
``हमम...''
``तू फक्त एवढं कर मनापासून. पुढचं पुढे सांगतो.'', असं म्हणत त्यानं तिच्या गालावर हळूवार किस्सू केला.

***

काही दिवसांनी...

`हॅलो, अरे राजा आज लवकर येशील का? मला न बक्षीस मिळालयं रेडिओच्या स्पर्धेत. ते आणायला जायचयं..''
``वॉव, ग्रेट. निघतो मी लवकर''

**

आणखी काही दिवसांनी... 
``राजा, अरे आज मी खूप खुष आहे.''
``काय झालं?''
``तू दिलेल्या त्या डायरीत मी आठवण म्हणून जी कविता लिहिली होती न. ज्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं कॉलेजात असताना. ती आज पेपरात छापून आली आहे.''
``अरे व्वा. भारीच की''
``खूप जणांचे फोन आले. सोसायटीतील बायकांनीही फोन केलेला. खूप भारी वाटतयं. आता मी आठवड्यात एक तरी कविता लिहिणार.''
आज मी लवकर येतो.

सायंकाळी...
आल्या आल्या त्यानं तिला मिठीत घेतलं आणि हळूवारपणे केसावर हात फिरवत म्हणाला, ``हे बघ. महिन्याभरातच तू कशी फ्रेश झालीस. बी पॉझिटिव्ह राणी. आपल्याकडं करता येण्यासारखं खूप काही असतं. पण आपण वेगळा विचार कधी करत नाही. आपल्या अडचणींवर मात आपणच करायला हवी. छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद लुटायला हवा. लक्षात ठेव दूधात लिंबाच्या रसाचा एक थेंब जरी पडला तरी ते सगळं दूध नासून जातं अगदी एक थेंब किती तरी लिटर दूधाला संपवतं. तसचं आपल्या मनाचं असतं. मनाला एक वाईट विचारानं स्पर्श केला की आपली विद्वत्ता, हुशारी, प्रगल्भता नासून जाते. त्यामुळं मनाला कधी मळ चढू द्यायचा नाही. बस्स... बघ एवढं गोड बाळाला सांभाळत असतानाच तूच तुझ्या अडचणीवर मार्ग काढलास की नाही...''
``हो, रे माझ्या राजा आता मला आणखी काही कविता सुचताहेत. त्यांचं मी एक पुस्तक छापणार आहे.''
``ग्रेट... ग्रेट'', असं म्हणत असताना लाडानं तिनचं त्याच्या ओठावर ओठ टेकवला.

© व्यंकटेश कल्याणकर

#Anandyatri #VyankateshKalyankar

11/13/2019

अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळा


माणूस माणसांना जन्म देतो. माणसांची साखळी तयार होते. या साखळीचा प्रारंभ आणि अंत याचा विचार केला तर हाती केवळ तर्कच येतात. फार फार तर त्यांना थोडे फार किरकोळ संदर्भ असू शकतात.
आज या साखळीचा एक भाग होऊन वर्ष झालं. अर्थातच कन्या वल्लरी एक वर्षाची झाली. आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अॉपरेशन थिएटरात वल्लरीनं जन्म घेतला. तर प्रसव वेदनेच्या महापूरात Pradnya तील आईनं जन्म घेतला. अन अॉपरेशन थिएटराबाहेर व्यंकटेश कल्याणकर नावाचा बाप जन्मला.
काही वेळानं मी वल्लरीला भेटलो. आपल्याच पेशींपासून तयार झालेला इवलासा देह आपल्याच डोळ्यांनी पाहणं, स्पर्शानं अनुभवणं आणि हा अदभूत सोहळा हृदयात साठवणं म्हणजे जणू एका अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळाच.
पुढं वर्षभर त्या इवल्याशा जीवात हळूहळू जाणिवा, चेतना जागृत झालेल्या पाहणं रोमांचकारी होतं. प्रत्येक घटना, प्रसंग म्हणजे एक चैतन्यउत्सवच होता. तिला वेदना झाली की माझ्या काळजात कळ येते.. ती गोड हसली की काळीज रक्त निर्माण करायचं सोडून आनंदलहरी निर्माण करतं. हे सारं विलक्षण आहे. ही अनुभूती वाट्याला येणं जणू पूर्वसंचितच!
दोन महिन्यापूर्वी ती स्वतःच्या दोन्ही पायांवर उभी राहिली अन काळजात धस्स झालं. कारण आयुष्यात आणखी एकदा ती स्वतःच्या पायांवर उभं राहिली की आज मुठीत मावणारा तो जीव तेव्हा मिठितही मावणार नाही. विरहावेग असह्य होईल.
तिच्या लीला पाहून वाटतं आभाळातल्या सगळ्या चांदण्या तिच्या मांडीवर ठेवाव्यात. विश्वातल्या सगळ्या सूर्यांचा प्रकाश तिच्या पायाशी ठेवावा.
इवल्याशा लेकीच्या डोळ्यातील भाव वाचणं, तिच्या गरजा ओळखणं, त्या पूर्ण केल्यावर तिच्या इवल्याइवल्या डोळ्यातलं कृतार्थपणं अनुभवणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ स्वर्गसुखच आहे. नव्हे नव्हे बाप नावाचा हा स्वर्गच जणू.
मी या लौकिक जगात असो अथवा नसो माझ्या काळजात ती अन तिच्या काळजात मी निरंतरपणे निवास करु हे निसंदेह!

11/12/2019

प्रेरणादायी विचार... (03)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....

9/10/2019

"आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी" : चांद्रयानचं भारतीयांना पत्र.!

नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो

ओळखलत का मला? मी `विक्रम’. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम’. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलो.

सोबत मी एकटा नव्हतो तर होती माझ्या कोट्यवधी भारतीय बांधवांची स्वप्ने. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि तुम्ही तुमच्या श्रद्धा स्थानांसमोर हजारो प्रार्थना.रोव्हर आज पहाटे बरोबर १ वाजून ३७ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी विषुववृत्ताशी ९० अंशाचा कोन करत होता. तेव्हा तो चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर होता. पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी तो धडपड करत होतो.

६ हजार किलोमीटर प्रतितास एवढ्या गतीने चाललेला रोव्हर शून्य किमी प्रतितास एवढ्या गतीवर येऊन म्हणजे स्थिर होऊन पृष्ठभागावर थांबणार होता. तो पृष्ठभागावर उतरल्यानंतर मी चंद्रावर उतरणार होतो.

इथं गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने रोव्हरला ३ ते ४ सेकंदात जवळपास ५० पेक्षा अधिक वेळा कोन बदलण्यासाठी प्रचंड हालचाल करावी लागली. यामुळे अवघ्या ८-१० मिनिटात माझ्या आत खूप उलथापालथ झाली.

त्यानंतर मी चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २१०० मीटर अंतरावर पोहोचलो.

माझ्या आत उलथापालथ सुरुच होती. भूकंप झाल्यावर तुमच्या घरातली भांडी पडतात तसेच माझ्या आतील मजबूत बसवलेली यंत्रे इकडे तिकडे फिरू लागली.

आणि दुर्दैवाने पृथ्वीशी संपर्क करणा-या यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाला आणि तुमच्याशी माझा संपर्क तुटला. पण माझे काम व्यवस्थितपणे सुरुच होते.

अखेर तुमच्या, माझ्या प्रयत्नांना, शुभेच्छांना यश मिळाले आणि आज पहाटे एक वाजून ५५ मिनिटांनी मी भारत माता की जय म्हणत इथं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुखरुप पोहोचलो आहे. हे सांगताना मी यंत्र असूनही मला भरून येत आहे.

मी इथं एकटा नाही पोहोचलो. तुमची स्वप्नं, तुमची महत्वाकांक्षा इथं माझ्या अवतीभोवती उत्सव साजरा करत आहेत. मला सांगितल्याप्रमाणे मी बरोबर दोन विवरांच्या मधोमध उतरलो आहे.

माझ्या एका बाजूला `मॅंझिनस सी’ आणि दुसर्या बाजूला `सिंपेलियस एन’ ही दोन विवरं आहेत. ती आपल्या डोंगरांसारखीच आहेत. पण स्थिर नाहीत. ती हलत असल्यासारखं मला भासत आहे.

इथं सध्यातरी मला प्रकाश दिसत नाही. इथं हवा नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. पाणी आहे की नाही माहिती नाही, त्याचा मी शोध घेत आहे.

पण कोट्यवधी भारतीय बंधूभगिनींच्या शुभेच्छांचा, आशीर्वादाचा, शास्त्रज्ञांच्या पराकोटीच्या प्रयत्नांचा ओलावा मला इथंही स्पष्टपणे जाणवतोय.

त्या बळावरच मी हळूहळू पुढे सरकतोय.

तुम्ही व्हॉटसऍपवर एखादा फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करताना जशी मध्येच रेंज जाते ना तेवढंच झालयं माझं. बाकी काही नाही.

माझा तुमच्याशी पुन्हा संपर्क होईल की नाही मला माहिती नाही. पण मी अखेरपर्यंत माझे काम चोखपणे पार पाडणार आहे. मी इथं चंद्राच्या पृष्ठभागाचे, विवरांचे, मातीचे छान छान फोटोज घेत आहे. मातीचे नमुनेही मी माझ्या पोटात साठवून ठेवत आहे.

हे सगळं घेऊन मला परत तुमच्यापर्यंत येऊन उत्सव साजरा करायचा होता. पण…

मी माझे काम चोखपणे बजावल्यावर माझे काय होईल याचा मलाही पत्ता नाही. कदाचित जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत पृथ्वीच्या सौरमालेत निरंतरपणे दिशाहीन भ्रमण करत राहील किंवा क्षणार्धात माझी राखही होईल आणि ती राखच अनंत काळापर्यंत ब्रह्मांडात फिरत राहील.

पण जोपर्यंत मी ज्या चंद्रावर उतरलोय तो चंद्र आणि मी ज्या सूर्यमालेत फिरतोय तो सूर्य अस्तित्वात असेल तोपर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचे, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे प्रतिक म्हणून मी जिवंत असेल.

इथं ब्रह्मांडात आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात.

सलाम!!!

भारत माता की जय!

व्यंकटेश कल्याणकर

7/09/2019

हत्तीची गोष्ट! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता. राजा आणि मंत्री संपूर्ण बाजारात खूप वेळ फिरले. शेवटी मोठे हत्ती विकणाऱ्या एका विक्रेत्याजवळ थांबले. त्या विक्रेत्याकडील काही हत्ती राजाला आवडले. त्याप्रमाणे राजाने खरेदी करण्याची तयारी दर्शविली. हत्तींचा दरही ठरला. मंत्र्यांनी विक्रेत्याला पैसेही दिले.

हत्ती ताब्यात देताना विक्रेता प्रत्येक हत्तीच्या फक्त उजव्या पायाला थोडीशी बांधलेली दोरी राजाच्या सैनिकांकडे देऊ लागला. हे पाहून राजा म्हणाला, "अरे, ही दोरी एवढी साधी आहे की आम्ही दूरचा प्रवास करताना हा हत्ती कधीही ती तोडून आमच्यावर हल्ला करू शकतो.' विक्रेता शांतपणे म्हणाला, "तसं होणार नाही!' राजाला आश्‍चर्य वाटले, "अरे पण तसे होणार नाही याची खात्री काय?'

त्यावर विक्रेत्याने नम्रपणे उत्तर दिले, "राजेसाहेब, हे हत्ती छोटे असल्यापासून माझ्याकडे आहेत. सुरूवातीला त्यांच्या चारही पायांना खूप जाड दोरी बांधत होतो. तेव्हा ते दोरीचे बंधन तोडण्याचा खूप प्रयत्न करत होते. कितीतरी दिवस ते दोरी तोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या पायातून रक्त निघायचे. त्यांना त्रास व्हायचा. त्यावेळी ते काही खातही नव्हते. त्यामुळे अशक्तपणा यायचा. शेवटी एकेदिवशी त्यांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करली आणि धडपडण्याचा प्रयत्न सोडून दिला. येथून पळून जाणे हे क्षमतेबाहेरचे आहे असा त्यांचा समज झाला. आज त्यांच्या पायात मोठे बंधन नाही. मात्र त्यांची पळून जाण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. पळून जाणे अगदी सहज शक्‍य असतानाही त्यांच्याकडे तेवढे सामर्थ्य असतानाही त्यांना असेच वाटते की प्रयत्न करून काहीही उपयोग होणार नाही. प्रयत्न निरर्थक जातील. त्यामुळे त्यांनी प्रयत्नच सोडून दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पायातील ही दोरी जरी मी बाजूला काढून ठेवली तरी देखील ते पळून जाऊ शकणार नाहीत.' विक्रेत्याने दीर्घ खुलासा केला.

राजासह मंत्री आणि अन्य सर्वांना विक्रेत्याचे म्हणणे पटले.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)

6/25/2019

फेस झालं बुक (कविता)
💫 फेस झालं बुक अन..
© व्यंकटेश कल्याणकर

🧐 फेस झाले बुक, 
अन्‌ कुठच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची 
भागना आमची भूक
आईबापाला केले आम्ही 
जिवंतपणी विभक्त
पराक्रमाच्या पोवाड्यानं 
सळसळना आमचं रक्त 

🌱 तोडली आम्ही तुळस अन्‌ 
सोडला आम्ही गाव
कुणाचा कुणालाच इथं 
लागना कसा ठाव?
हिरवा कंदिल पेटला की 
झाली आमची भेट
पाहिले नाही कित्येक दिवस
सग्यासोयऱ्यांचे गेट

🕺🏼 कसला आलाय सण अन्‌ 
कसला आलाय उत्सव
आमच्यासाठी चार भिंतीत 
स्वत:चाच महोत्सव
फेस झाले बुक, 
अन्‌ कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची 
भागना आमची भूक...

🍔 वाटलं कधी खावं खमंग तर
ऑनलाईन ऑर्डर
घरात असूनही होऊ लागला 
घरच्या चवीचा मर्डर
इंटरनेटवरूनच फिरतो आम्ही 
साऱ्या साऱ्या जगात
मग गरज काय कधी 
कोणाच्या डोकावयाची मनात

😟 माणूस झाला खूप छोटा अन 
इंटरनेट झालं मोठं 
एवढ्या मोठ्या जगात 
समजेना काय खर काय खोट
फेस झाले बुक, अन्‌ 
कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची 
भागना आमची भूक..

© *व्यंकटेश कल्याणकर*


( _कवितेचे स्वामित्व हक्क राखून ठेवले असून जशी आहे तशी फॉरवर्ड करण्यास हरकत नाही_ )
Related Posts Plugin for WordPress, Blogger...