2/27/2018

प्रिय लेकरांनो (मराठी भाषेचे विद्यार्थ्यांना पत्र)...

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

ओळखलतं का मला? मी तुमची मायमराठी, मराठी भाषा, तुमची मातृभाषा. माझ्यामुळेच दररोज तुम्ही परस्परांशी संवाद साधू शकता. आज माझा अर्थात मराठीचा राजभाषा दिन. म्हणूनच तर यानिमित्ताने मी तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे. खरे तर दररोजच मी तुमच्या वाणीत, लेखणीत वास करते. म्हणून माझा विशेषदिन साजरा करण्याची तशी गरज नाही. मात्र, कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मला हा माझा जन्मदिनच वाटतो.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी `माझ्या मराठीचीया बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके' असे वर्णन केले तीच मी मराठी. त्यानंतर कालानुरूप अनेक कवींनी आणि संतश्रेष्ठांनी माझे वर्णन केले, मला जोपासले, वेळोवेळी माझ्या सौंदर्यात भर घातली आणि आज तुमच्यासमोर समृद्ध स्वरुपात मी जिवंत आहे. त्यामुळेच तर कविवर्य सुरेश भट माझे वर्णन करताना म्हणतात की, `लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी'. तर अशी मी मराठी.

मित्र-मैत्रिणींनो, आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळेच येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि  या सा-या भाषा म्हणजे माझ्या बहिणीच आहेत बरं का! त्यामध्ये पुन्हा इंग्रजी नावाच्या पश्चिमात्य भाषेनेही येथे प्रवेश केला आहे.  अर्थात `अतिथी देवो भव' असल्याने येथे सर्वांचेच स्वागत केले जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेनेही येथे सुरुवातीपासूनच वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण, असे असले तरीही तुम्ही स्वत:शी संवाद साधताना माझाच वापर करून अर्थात आपल्या मातृभाषेचाच वापर करून संवाद साधत असता, हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे माझे तुमच्या जीवनातील स्थान किंचितही कमी होणार नाही किंवा होणारेही नाही.



माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत मला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळा वेष दिला आहे. आता हेच बघा ना, मराठवाड्यातील बांधवांसाठी माझे स्वरुप वेगळे आहे. हिरवाईने नटलेल्या कोकणामध्येही मला वेगळाच रंग आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि अन्य भागातही मी वेगळीच साडी परिधान केली आहे. मात्र, वेष बदलल्याने सौंदर्यात बदल होतो का? हे तुम्ही सा-यांनी समजून घ्यायला हवे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शुद्धलेखनाची. खरं तर एखाद्या शब्दाचा उकार, मात्रा किंवा वेलांटी चुकीची लिहिली तर काय फरक पडतो असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. मात्र, अनेकदा अशा अशुद्धलेखनामुळे शब्दांचा अर्थ तर बदलतोच पण मला वैक्तिकरित्या खूप त्रास होतो. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या कपाळावर टिकली लावता, हातात बांगड्या घालता, कानात डूल घालता. पण, जर एखाद्या दिवशी चुकून तुम्ही कपाळाऐवजी नाकावर टिकली लावलीत तर? कल्पना करून हसू आलं ना. हाच त्रास मी सहन करते बरं का मित्र-मैत्रिणींनो. जेव्हा तुम्ही अशुद्ध लेखन करता त्यावेळी असेच माझी शब्दसंपत्ती म्हणजेच माझे अलंकार तुम्ही चुकीच्या ठिकाणी लावता. त्यामुळे लक्षात ठेवा बरं का मित्रांनो, मला योग्य त्या ठिकाणीच अलंकार लावा.

तुम्ही सारे माझे लेकरे आहात, याचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही मला साता-समुद्रापार घेऊन गेलात याचाही मला गर्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही मला व्हॉटसऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातूनही सादर करता याचे मला कौतुक वाटते. खरोखरच या सा-या माध्यमातून जगासमोर जाण्याचा माझा अनुभव मला स्वत:ला समृद्ध करणारा आहे.

मित्र मैत्रिणींनो, जाता जाता, एकच सांगावेसे वाटते की जसा मला तुमचा गर्व आहे तसाच तुम्हालाही माझा गर्व आहे यात शंकाच नाही. इंग्रजीसारख्या परकीय भाषा तुम्हाला जागतिक व्यासपीठ निर्माण करून देतात याचीही मला जाणीव आहे. मात्र, त्यामुळे तुम्ही मला विसरून जाल की काय अशी मला कधी कधी भिती वाटते. साधं उदाहरण देते, आज तुमच्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर आदी अत्याधुनिक साधनं असतील. या सर्व साधनांकडे बघितले की माझी भीती वाढते. कारण मला स्वत:लाच प्रत्यक्ष मराठी भाषेलाच या साधनांचे नाव इंग्रजी भाषेतून तुम्हाला सांगावे लागते. अर्थात या सर्व साधनांसाठी तुम्ही मराठी शब्द शोधले असतीलही मात्र ते जर मी तुम्हाला सांगितले तर त्याचे आकलन तुम्हाला होईल की नाही याची मला खात्री नाही. याहीपलिकडे जाऊन ही सर्व साधने आल्यामुळे त्या त्या प्रक्रियेशी संबंधित शब्द कालबाह्य होत आहेत. म्हणजेच मिक्सरमुळे कांडणे, वाटणे, पाटा-वरवंटा इत्यादी शब्द कालबाह्य होतात की काय अशी शंका उत्पन्न झाली आहे. असो.

मराठी राजभाषा दिनाच्यानिमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधता आला, तुम्ही तो शांतपणे ऐकून घेतलात याबद्दल तुमचे आभार मानते. जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत आणि पृथ्वीतलावर मराठी माणूस आहे तोपर्यंत माझे असित्व अबाधित राहील आणि शब्दांच्या स्वरुपातील माझी संपत्ती आणि सौंदर्य समृद्ध होत जाईल, यात मला तीळमात्रही शंका नाही.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...