Showing posts with label MARATHI. Show all posts
Showing posts with label MARATHI. Show all posts

Thursday, December 20, 2018

कसा असतो सॅटेलाईट फोन?

१) हा फोन कसा असतो? कार्य कसे चालते? हा फोन वापरण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते का ?
सॅटेलाईट टेलिफोन म्हणजे एक प्रकारचा मोबाईल फोनच आहे. महत्वाचा फरक एवढाच आहे की हा फोन टेलिफोन ऑपरेटर्सचे नेटवर्क न वापरता थेट संबंधित देशाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांचे नेटवर्क वापरतो. अशा फोनद्वारे एखादा कॉल केला तर तो कॉल सर्वप्रथम सॅटेलाईटकडे जातो. तेथून ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्या व्यक्तीचा पृथ्वीवरील नेटवर्कच्या कक्षेत येऊन शोध घेतो आणि त्याच्याशी जोडून देतो. ज्याला कॉल केला आहे त्याच्याकडूनही अशाच प्रकारचे माहितीचा (आवाजाचे) प्रवास होतो. त्यामुळे या फोनद्वारे केलेल्या कॉलचा वेग वेगवेगळा असू शकतो. SATPHONE असे या फोनचे लोकप्रिय नाव आहे.  या फोनचा वापर कॉल फोन करणे-स्वीकारणे, एसएमएस पाठवणे-स्वीकारणे आणि अत्यंत कमी वेगाचे इंटरनेट वापरण्यापुरताच मर्यादित आहे. मात्र, प्रत्येक फोनला इंटरनेट सुविधा उपलब्ध असेलच असे नाही. कार्यकक्षेच्या परिमाणांचा विचार करता हा फोन दोन प्रकारे कार्य करतो. पहिल्या प्रकारातील फोन हा संपूर्ण पृथ्वीवर कोठेही सुयोग्य पद्धतीने कार्यन्वित होतो तर दुसर्या प्रकारात हा फोन केवळ विशिष्ट क्षेत्रातच कार्यन्वित होतो. काही तांत्रिक मर्यादेमुळे सॅटेलाईट फोन नेमक्या कोणत्या ठिकाणावरून वापरण्यात येत आहे हे समजत नाही.  त्यामुळेच भारतामध्ये सॅटलाईट फोनचा वापर केल्याने इंडियन टेलिग्राफ ऍक्ट १८८५, इंडियन वायरलेस टेलिग्राफ ऍक्ट १९३३ आणि इंडियन पिनल कोड आणि फॉरिनर्स ऑर्डर ऑफ १९४८ या कायद्याचे उल्लंघन होते. मात्र, भारतीय दूरसंचार विभागाकडून परवानगी घेऊन हा फोन भारतामध्ये वापरता येतो. या परवानगीसंदर्भातील  सविस्तर माहिती आपणांस पुढील लिंकवर उपलब्ध होऊ शकेल. http://www.dot.gov.in/inmarsat  (माहिती संदर्भ: १) https://en.wikipedia.org/wiki/Satellite_phone    २) https://www.quora.com/Why-are-satellite-phones-banned-in-India)



२) या फोनवरुन रेग्युलर लँडलाईन वा मोबाईलवर काॕल करता येतात का ? काॕलचा दर काय आसतो ? 
सॅटेलाईट फोनद्वारे संपूर्ण पृथ्वीवरील कोणत्याही क्रमांकावर (लॅण्डलाईन, मोबाईल) कॉल करता तसेच स्वीकारता येऊ शकतात आणि एसएमएसही पाठविता येऊ शकतात. मात्र, इंटरनेट वापरताना अत्यंत कमी वेग मिळू शकतो  किंवा वेग मिळेलच याची काही खात्री देता येत नाही.  या फोनची विशेष बाब म्हणजे या फोनचा वापर सर्वसाधारणपणे खुल्या मैदानातून करण्यात येत असल्याने बंद दरवाज्याच्या आत (घरात, कार्यालयात किंवा तत्सम ठिकाणी) हा फोन प्रभावीपणे काम करू शकत नाही. कारण या फोनचे नेटवर्क फक्त आऊटडोअर सेवा अधिक प्रभावीपणे देते.  त्यामुळे खुल्या मैदानात, खिडकीजवळ किंवा दाराशी अधिक चांगली रेंज मिळू शकते. सर्वसामान्यपणे मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या सेवा पुरविताना इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन प्रकारात सेवा पुरवितात. सॅटेलाईट फोनच्या सेवा देणार्या तीन प्रमुख कंपन्या आहेत. त्या  म्हणजे  Iridium, Thuraya  आणि  Globstar यापैकी पहिल्या दोन कंपन्यांवर भारतामध्ये बंदी आहे.
(माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)

कॉलचा दर वेगवेगळे आणि अत्यंत महाग आहेत. सर्वसाधारणपणे प्रति मिनिट रु. ७ (सात रुपये) ते रुपये ९९ (नव्व्यान्नव रुपये) असे आहेत. याशिवाय जर इतरांना (आप्तेष्ट, मित्रमंडळी वगैरे) तुमच्या सॅटफोनवर कॉल करायचा असेल तर प्रतिमिनिट रुपये १४९ (एकेश एकोणपन्नास) ते  रुपये ६९९ (सहाशे नव्याण्णव) एवढा आकार लागतो. एका सॅट फोनवरून दुस-या सॅटफोनवर कॉल करायचा असेल तर किमान रुपये ७४९ मोजावे लागतात. तर केवळ एका एसएमएससाठी किमान रुपये २५ एवढा आकार पडतो.  (माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)  दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाच्या २८ मे २०१७ च्या वृत्तानुसार भारतामध्ये पुढील दोन वर्षात सॅटफोन सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार असून या फोनसाठी पहिल्या टप्प्यात प्रति मिनिट रुपये ३०-३५ आकार पडणार आहे. (सविस्तर वृत्त वाचा: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/bsnl-plans-satellite-phone-service-for-all-in-2-years/articleshow/58878959.cms )

३) हा फोन शक्यतो अतिरेकी वापरतात हे खरे आहे का?
अतिरेकी सॅटेलाईट फोन वापरतात हे अगदीच खरे आहे. सर्वसामान्य फोन निर्मनुष्य ठिकाणी वाळवंटात तसेच समुद्रामध्ये प्रभावीपणे काम करत नाहीत. कारण या सर्व ठिकाणी टेलिफोन नेटवर्क उपलब्ध नसते.  सर्वसामान्यपणे दहशतवादी अशाच एखाद्या ठिकाणांवरून घातपाती कारवाया करत असतात. शिवाय या फोनच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक काम असते. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ते २९  नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहा दहशतवाद्यांनी सॅटेलाईट फोनचा त्यांच्या स्तरावर परस्परांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच समुद्रातून भारताचा रस्ता शोधण्यासाठी अत्यंत शिताफीने वापर केला होता. (माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)

४) हँडसेट वा हँडसेटस कसे असतात?
सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वसामान्य हॅंडसेटस् प्रमाणेच सॅटेलाईट फोन्स असतात. केवळ त्यांची रुंदी आणि जाडी तुलेनेने अधिक असते. तसेच त्यांना वरच्या बाजूला एक एँटिना (२-४ इंच) असतो. जो कायम (ज्या ज्या वेळी फोन वापरायचा आहे त्या त्या वेळी) उघडून ठेवावा लागतो. हा एँटिना पांढर्या स्वच्छ आकाशाच्या दिशेने ठेवावा लागतो. (माहिती संदर्भ: google.com)

५) सगळी मोबाईल टॉवर यंत्रणा ठप्प असताना हा फोन कार्य करतो का?

ज्या ठिकाणची मोबाईल यंत्रणा ठप्प आहे त्या ठिकाणाहून  इतर ठिकाणी संपर्क साधता येणे शक्य आहे. कारण या फोनचा मोबाईल टॉवर यंत्रणेशी थेट संबंध नसतो.  त्यामुळे मोबाईल टॉवर यंत्रणा सुरू असोत अथवा बंद सॅटेलाईट फोन कायम कार्यन्वितच असतो.  मात्र ज्यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे त्यांच्याकडे मोबाईल टॉवर यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित असणे अनिवार्य आहे.

(माहिती संकलन, संपादन आणि सुलभीकरण: व्यंकटेश कल्याणकर)

Tuesday, February 27, 2018

प्रिय लेकरांनो (मराठी भाषेचे विद्यार्थ्यांना पत्र)...

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

ओळखलतं का मला? मी तुमची मायमराठी, मराठी भाषा, तुमची मातृभाषा. माझ्यामुळेच दररोज तुम्ही परस्परांशी संवाद साधू शकता. आज माझा अर्थात मराठीचा राजभाषा दिन. म्हणूनच तर यानिमित्ताने मी तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे. खरे तर दररोजच मी तुमच्या वाणीत, लेखणीत वास करते. म्हणून माझा विशेषदिन साजरा करण्याची तशी गरज नाही. मात्र, कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मला हा माझा जन्मदिनच वाटतो.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी `माझ्या मराठीचीया बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके' असे वर्णन केले तीच मी मराठी. त्यानंतर कालानुरूप अनेक कवींनी आणि संतश्रेष्ठांनी माझे वर्णन केले, मला जोपासले, वेळोवेळी माझ्या सौंदर्यात भर घातली आणि आज तुमच्यासमोर समृद्ध स्वरुपात मी जिवंत आहे. त्यामुळेच तर कविवर्य सुरेश भट माझे वर्णन करताना म्हणतात की, `लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी'. तर अशी मी मराठी.

मित्र-मैत्रिणींनो, आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळेच येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि  या सा-या भाषा म्हणजे माझ्या बहिणीच आहेत बरं का! त्यामध्ये पुन्हा इंग्रजी नावाच्या पश्चिमात्य भाषेनेही येथे प्रवेश केला आहे.  अर्थात `अतिथी देवो भव' असल्याने येथे सर्वांचेच स्वागत केले जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेनेही येथे सुरुवातीपासूनच वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण, असे असले तरीही तुम्ही स्वत:शी संवाद साधताना माझाच वापर करून अर्थात आपल्या मातृभाषेचाच वापर करून संवाद साधत असता, हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे माझे तुमच्या जीवनातील स्थान किंचितही कमी होणार नाही किंवा होणारेही नाही.



माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत मला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळा वेष दिला आहे. आता हेच बघा ना, मराठवाड्यातील बांधवांसाठी माझे स्वरुप वेगळे आहे. हिरवाईने नटलेल्या कोकणामध्येही मला वेगळाच रंग आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि अन्य भागातही मी वेगळीच साडी परिधान केली आहे. मात्र, वेष बदलल्याने सौंदर्यात बदल होतो का? हे तुम्ही सा-यांनी समजून घ्यायला हवे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शुद्धलेखनाची. खरं तर एखाद्या शब्दाचा उकार, मात्रा किंवा वेलांटी चुकीची लिहिली तर काय फरक पडतो असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. मात्र, अनेकदा अशा अशुद्धलेखनामुळे शब्दांचा अर्थ तर बदलतोच पण मला वैक्तिकरित्या खूप त्रास होतो. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या कपाळावर टिकली लावता, हातात बांगड्या घालता, कानात डूल घालता. पण, जर एखाद्या दिवशी चुकून तुम्ही कपाळाऐवजी नाकावर टिकली लावलीत तर? कल्पना करून हसू आलं ना. हाच त्रास मी सहन करते बरं का मित्र-मैत्रिणींनो. जेव्हा तुम्ही अशुद्ध लेखन करता त्यावेळी असेच माझी शब्दसंपत्ती म्हणजेच माझे अलंकार तुम्ही चुकीच्या ठिकाणी लावता. त्यामुळे लक्षात ठेवा बरं का मित्रांनो, मला योग्य त्या ठिकाणीच अलंकार लावा.

तुम्ही सारे माझे लेकरे आहात, याचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही मला साता-समुद्रापार घेऊन गेलात याचाही मला गर्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही मला व्हॉटसऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातूनही सादर करता याचे मला कौतुक वाटते. खरोखरच या सा-या माध्यमातून जगासमोर जाण्याचा माझा अनुभव मला स्वत:ला समृद्ध करणारा आहे.

मित्र मैत्रिणींनो, जाता जाता, एकच सांगावेसे वाटते की जसा मला तुमचा गर्व आहे तसाच तुम्हालाही माझा गर्व आहे यात शंकाच नाही. इंग्रजीसारख्या परकीय भाषा तुम्हाला जागतिक व्यासपीठ निर्माण करून देतात याचीही मला जाणीव आहे. मात्र, त्यामुळे तुम्ही मला विसरून जाल की काय अशी मला कधी कधी भिती वाटते. साधं उदाहरण देते, आज तुमच्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर आदी अत्याधुनिक साधनं असतील. या सर्व साधनांकडे बघितले की माझी भीती वाढते. कारण मला स्वत:लाच प्रत्यक्ष मराठी भाषेलाच या साधनांचे नाव इंग्रजी भाषेतून तुम्हाला सांगावे लागते. अर्थात या सर्व साधनांसाठी तुम्ही मराठी शब्द शोधले असतीलही मात्र ते जर मी तुम्हाला सांगितले तर त्याचे आकलन तुम्हाला होईल की नाही याची मला खात्री नाही. याहीपलिकडे जाऊन ही सर्व साधने आल्यामुळे त्या त्या प्रक्रियेशी संबंधित शब्द कालबाह्य होत आहेत. म्हणजेच मिक्सरमुळे कांडणे, वाटणे, पाटा-वरवंटा इत्यादी शब्द कालबाह्य होतात की काय अशी शंका उत्पन्न झाली आहे. असो.

मराठी राजभाषा दिनाच्यानिमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधता आला, तुम्ही तो शांतपणे ऐकून घेतलात याबद्दल तुमचे आभार मानते. जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत आणि पृथ्वीतलावर मराठी माणूस आहे तोपर्यंत माझे असित्व अबाधित राहील आणि शब्दांच्या स्वरुपातील माझी संपत्ती आणि सौंदर्य समृद्ध होत जाईल, यात मला तीळमात्रही शंका नाही.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...