12/15/2014

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीचे पत्र...

परवाचे तुझे पत्र मिळाले. ते पत्र केवळ पत्र नव्हते तर भावनांनी ओतप्रोत वाहणारा जलौघ होता. ते वाचून मी खरेच तुझ्या भावनांच्या प्रेमात पडले. अर्थात याचा अनुभव मी यापूर्वीच घेतला होता. त्यादिवशी तुझा ओठ थरथरत होता. तुझे शब्ददेखिल हरवले होते आणि मी समोर बसले होते. तू मला म्हणालास ’तुम्ही मला आवडता’ आणि मी म्हणाले उद्या सांगितले तर चालेल का? त्यानंतर दोन दिवस आपण दोघंही या जगात नव्हतो. तू स्वप्नात जगत होता आणि मी वास्तवात कसे जगावे याचा विचार करत होते. नंतर मी तुला मी माझा नकार कळविला.

तुझा अल्लड, अवखळ, निरागस स्वभाव मला समजत नाही असे तुला वाटते का? तुझ्या डोळ्यातील पवित्र अन मंगल भाव मी जाणत नाही असे तुला वाटते का? तुझ्यासाठी म्हणून सांगते स्त्रीला इश्वराने एक अशी शक्ती दिली आहे की ज्यावरुन ती पुरुषाच्या एका नजरेतून त्याच्या मनातील भाग ओळखू शकते. आपण तर जवळपास वर्षभरापासून एकमेकांना ओळखतो. मर्यादा पाळण्याचे तुझ्याकडे विलक्षण सामर्थ्य आहे. जिंकण्याची जिद्द तुझ्याकडे आहे. पराभव स्विकारण्याचं मोठं मन तुझ्याकडे आहे.

म्हणूनच तुला सांगते स्वप्नांचे जग सोडून आपणांस या जिवंत जगात जगायचे आहे. इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेले बंधने पाळणे हे आपले कर्तव्य नाही का? माझे तुझ्यावर प्रेम आहेसुध्दा आणि नाहीसुध्दा! तुला जर मी भोगण्यासाठी हवी असेल तर ते या जन्मात शक्य नाही. कारण जगातील कोणतीही स्त्री भोगल्यावर तुला तो आनंद मिळू शकेल.

मात्र तुला प्रेमासाठी त्यागाची अन समर्पणाची भावना स्वतःमध्ये रुजविण्याची गरज वाटत असेल अन तेवढी तुझ्यात पात्रता असेल तर मी तुझीच आहे. प्रेमासाठी तू माझा त्याग करायला तयार आहेस का? या व्यवस्थेच्या भिंतीत जगताना मी तुला काहीही देऊ शकत नाही. म्हणूनच माझा ’नकार’ तुझ्याकडे दिला आहे. त्याच्यावरसुध्दा माझ्याइतकेच प्रेम कर.

आपण एकत्र आलोच नाहीत म्हणून काय झाले. आपण युगानयुगापर्यंत भेटलो नाही म्हणून काय झाले. खरे अन पवित्र प्रेम त्याग, समर्पित भावना यांच्यासह सहवास, संवाद यांच्यापलिकडची अनुभूती असते. त्या अनुभूतीला खरेच नाव नाही. ती भावना शब्दातीत आहे.

हे माझे शेवटचे पत्र आहे. मला विश्वास आहे. तू विवेकी आहेस. मला नक्कीच समजून घेशील. या दिसणा-या जगात जरी आपण भेटू शकलो नाही. तरी इथलं जगणं झाल्यावर त्या न दिसणा-या जगात आपण नक्की भेटू!

तुझी न होऊ शकणारी,

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...