दादांच्या (वडिल-उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर) आठवणीने आज मी फार अस्वस्थ झालो. त्यामुळे त्यांच्या आठवणींना त्यांनी केलेल्या संस्कारांना उजाळा देत आहे -
त्यावेळी मी पाचव्या वर्गात होतो. मी बीडच्या शनिमंदिराजवळील राजस्थानी शाळेत होतो. वडिल नोकरीत होते. आम्ही वडिलांना "दादा' म्हणायचो. शाळेची फीस भरायची होती. वर्गात सूचना मिळाली 40 रुपये फी भरा. काहीही मागितलं की वडिल जरा शहानिशा करून पैसे द्यायचे. वडिलांना फीस मागायला मला फार संकोच वाटायचा. त्यादिवशी घरी आल्यानंतर सांगू का नको असा खूप विचार केला. त्यातच रात्र झाली. झोपी जाण्यापूर्वी मी दादांना हळूच म्हणालो, "दादा उद्या फी भरायची आहे.' तर ते फक्त "ठीक आहे' म्हणाले. मला फार वाईट वाटले. यावेळी फिला उशीर होईल असे वाटले.
Letter to father: स्वर्गस्थ पित्याला आर्त हाक
दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो. साधारण दोन तासांनी वडिल स्वत: शाळेत आले. गुरूजींना भेटले. माझ्या प्रगतीची चौकशी केली. आणि फी भरली. मला फार फार आनंद झाला. वर्गातील इतर संपन्न स्थितीतील मित्रांपेक्षा माझी फी सर्वात आधी भरली गेल्याने मी खूप आनंदी झालो. त्यादिवशीपासून शालेय शिक्षण संपेपर्यंत दरवर्षी सर्वात आधी फीस भरल्याने माझा हजेरीपटावरील क्रमांक "एक' होता. त्यानंतर वेळोवेळी दादा शाळेतील सर्वात हुशार अशा गणेश लोटके, महेश मोढवे या विद्यार्थ्यांना भेटायचे. त्यांच्याकडे कोणती पुस्तके आहेत वगैरे चौकशी करायचे. मला काय हवे नको ते पहायचे. आजही ते काय हवे नको ते पाहतात. फरक फक्त एवढाच की ते या जगातून नव्हे तर वेगळ्या जगातून... दादांनी मला एक रुपयाची देखील संपत्ती दिली नाही. परंतु त्यापेक्षा अधिक मौल्यवान जीवनमूल्ये दिली आहेत.
0 comments:
Post a Comment