ती त्याला कधीतरी भेटलेली असते. आणि त्याच भेटीमुळे तो तिच्या मनात घर करून राहिलेला असतो. नकळतपणानं तो तिच्या अगदी खोलवर आत तो विराजमान होतो. पण ती कधी व्यक्त होत नाही. त्याला आतल्या आत दाबून टाकते. त्याचा विचार आतच ठेवते. अगदी इच्छा असतांनाही त्याला तसेच ठेवते, मनाच्या खोल गाभार्यात. तो अस्वस्थ होतो. अगदी अचल होतो. तो आतून ओरडून सांगतो, ‘‘फक्त एक संधी दे मला, तुझे दु:ख दूर करण्याची, तुझ्या वेदना संपवून टाकण्याची, गालांवरची... मी येऊन निघून जाईल, कधीच न येण्यासाठी’’ ती ‘नाही’च म्हणते. अगदी शेवटपर्यंत ‘नाही’. तो खूप प्रयत्न करतो. अगदी अखेरपर्यंत. मात्र, ती कठोर होते. ती म्हणत तू आतच रहा. कधीच बाहेर येऊ नकोस. तिच्या ‘नकारा’वर त्याला समाधान मानावे लागते. तिच्या ‘नकारा’समवेत तो जगत राहतो. तरीदेखील तो तिच्या वेदनांशी, तिच्या दु:खांशी समरस होऊन जातो. तो आतल्या आत तिच्याशी समरूप होण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला शक्य तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कधीच त्याला जवळ येऊ देत नाही.
एक दिवस एक अवखळ क्षण तिच्या आयुष्यात येतो. त्या अनामिक, अनोळखी, अवखळ क्षणी ती डोळे गच्च मिटून घेते. आणि त्याला आठवण्याचा प्रयत्न करते. अगदी मनापासून. तिच्या दु:खांचा, वेदनांचा तो पराकोटीचा परमबिंदू असतो. अशावेळी तिलाही तो हवाच असतो. पण ती त्याला काहीच बोलत नाही. तिच्या मौनाची भाषा तो चपखलपणानं जाणतो. आणि सारी बंधनं झुगारून देतो. तिच्या दु:खांचा नाश करण्यासाठी तो तळमळत तळमळत तिच्याही नकळत तिच्या गालांवर अगदी अलवारपणे येतो. तिचीच वेदना पिऊन, तीच वेदना दूर करण्यासाठी तो अनावर होतो. तिची दु:ख दूर करण्यासाठी तो तिचेच सांत्त्वन करीत करीत निघून जातो, दूर कुठेतरी पुन्हा न भेटण्यासाठी... पुन्हा कधीच न भेटण्यासाठी... तिच्या अवघ्या शरीरभरावरून प्रेमानं स्पर्श करीत तो निघून जातो. शेवटी तिच्या पदांना स्पर्श करत, तो धरणीशी एकरूप होतो.
तिचं दु:ख गाडून टाकण्यासाठी. पुन्हा कधीच तिला न भेटण्यासाठी...
हे वेडं जग तेव्हा तिला ‘रडू नकोस’ म्हणतं.
अन् हेच वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं...
हे वेडं जग तेव्हा त्याला ‘अश्रू’ म्हणून संबोधतं...
0 comments:
Post a Comment