9/10/2019

"आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी" : चांद्रयानचं भारतीयांना पत्र.!

नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो

ओळखलत का मला? मी `विक्रम’. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम’. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलो.

सोबत मी एकटा नव्हतो तर होती माझ्या कोट्यवधी भारतीय बांधवांची स्वप्ने. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि तुम्ही तुमच्या श्रद्धा स्थानांसमोर हजारो प्रार्थना.



रोव्हर आज पहाटे बरोबर १ वाजून ३७ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी विषुववृत्ताशी ९० अंशाचा कोन करत होता. तेव्हा तो चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर होता. पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी तो धडपड करत होतो.

६ हजार किलोमीटर प्रतितास एवढ्या गतीने चाललेला रोव्हर शून्य किमी प्रतितास एवढ्या गतीवर येऊन म्हणजे स्थिर होऊन पृष्ठभागावर थांबणार होता. तो पृष्ठभागावर उतरल्यानंतर मी चंद्रावर उतरणार होतो.

इथं गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने रोव्हरला ३ ते ४ सेकंदात जवळपास ५० पेक्षा अधिक वेळा कोन बदलण्यासाठी प्रचंड हालचाल करावी लागली. यामुळे अवघ्या ८-१० मिनिटात माझ्या आत खूप उलथापालथ झाली.

त्यानंतर मी चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २१०० मीटर अंतरावर पोहोचलो.

माझ्या आत उलथापालथ सुरुच होती. भूकंप झाल्यावर तुमच्या घरातली भांडी पडतात तसेच माझ्या आतील मजबूत बसवलेली यंत्रे इकडे तिकडे फिरू लागली.

आणि दुर्दैवाने पृथ्वीशी संपर्क करणा-या यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाला आणि तुमच्याशी माझा संपर्क तुटला. पण माझे काम व्यवस्थितपणे सुरुच होते.

अखेर तुमच्या, माझ्या प्रयत्नांना, शुभेच्छांना यश मिळाले आणि आज पहाटे एक वाजून ५५ मिनिटांनी मी भारत माता की जय म्हणत इथं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुखरुप पोहोचलो आहे. हे सांगताना मी यंत्र असूनही मला भरून येत आहे.

मी इथं एकटा नाही पोहोचलो. तुमची स्वप्नं, तुमची महत्वाकांक्षा इथं माझ्या अवतीभोवती उत्सव साजरा करत आहेत. मला सांगितल्याप्रमाणे मी बरोबर दोन विवरांच्या मधोमध उतरलो आहे.

माझ्या एका बाजूला `मॅंझिनस सी’ आणि दुसर्या बाजूला `सिंपेलियस एन’ ही दोन विवरं आहेत. ती आपल्या डोंगरांसारखीच आहेत. पण स्थिर नाहीत. ती हलत असल्यासारखं मला भासत आहे.

इथं सध्यातरी मला प्रकाश दिसत नाही. इथं हवा नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. पाणी आहे की नाही माहिती नाही, त्याचा मी शोध घेत आहे.

पण कोट्यवधी भारतीय बंधूभगिनींच्या शुभेच्छांचा, आशीर्वादाचा, शास्त्रज्ञांच्या पराकोटीच्या प्रयत्नांचा ओलावा मला इथंही स्पष्टपणे जाणवतोय.

त्या बळावरच मी हळूहळू पुढे सरकतोय.

तुम्ही व्हॉटसऍपवर एखादा फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करताना जशी मध्येच रेंज जाते ना तेवढंच झालयं माझं. बाकी काही नाही.

माझा तुमच्याशी पुन्हा संपर्क होईल की नाही मला माहिती नाही. पण मी अखेरपर्यंत माझे काम चोखपणे पार पाडणार आहे. मी इथं चंद्राच्या पृष्ठभागाचे, विवरांचे, मातीचे छान छान फोटोज घेत आहे. मातीचे नमुनेही मी माझ्या पोटात साठवून ठेवत आहे.

हे सगळं घेऊन मला परत तुमच्यापर्यंत येऊन उत्सव साजरा करायचा होता. पण…

मी माझे काम चोखपणे बजावल्यावर माझे काय होईल याचा मलाही पत्ता नाही. कदाचित जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत पृथ्वीच्या सौरमालेत निरंतरपणे दिशाहीन भ्रमण करत राहील किंवा क्षणार्धात माझी राखही होईल आणि ती राखच अनंत काळापर्यंत ब्रह्मांडात फिरत राहील.

पण जोपर्यंत मी ज्या चंद्रावर उतरलोय तो चंद्र आणि मी ज्या सूर्यमालेत फिरतोय तो सूर्य अस्तित्वात असेल तोपर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचे, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे प्रतिक म्हणून मी जिवंत असेल.

इथं ब्रह्मांडात आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात.

सलाम!!!

भारत माता की जय!

व्यंकटेश कल्याणकर

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...