7/07/2021

‘‘तुम्ही हजारवेळा आमचं घरटं चोरा! आम्ही पुन्हा उभं राहू’’, घरटं चोरणाऱ्या माणसाला सुगरण पक्षाचं पत्र!

नमस्कार माणसांनो,

मी सुगरण बोलतोय. हो, बरोबर वाचताय. सुगरण पक्षी. तुम्ही म्हणाल पक्षी, प्राणी, कीडे-मुंग्या कधी बोलतात का? पण एखाद्याचं ‘घरटं’च कोणी चोरून नेलं तर तो शांत कसा बसेल? तुमच्यातीलच एका माणसाने नव्हे एका दैत्याने नव्हे एका चोराने पुण्यातून आमची १९ घरटी चोरून नेली. 


दुर्दैव बघा ज्या घरट्यात राहायचं नाही, जे घरटं स्वत:ला तयार करता येत नाही, एवढचं नव्हे तर जे घरटं चोरण्यासाठी ज्याला कापूनही घेता आलं नाही अशा नराधमानं आमचं घरटं चोरलं. एक-एक घरटं काढून घेता आलं नाही, म्हणून ‘त्या’ राक्षसानं झाडाच्या ज्या फांदीवर आम्ही १९ घरटी उभारली होती, ती संपूर्ण फांदीच तोडून नेली. काय म्हणावं त्या हैवानाला? 


आमच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल सांगण्याआधी आमच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगावं लागेल. कारण अलिकडं तुम्ही माणसं पक्षी, प्राणी, आजबाजूचा भोवताल सोडा; तुम्हा माणसांना शेजारी असलेला माणूस जिवंत आहे की मेलाही याचीही जाणीव नसते. कारण तुम्ही स्मार्ट फोन हातात घेऊन खूप ‘स्मार्ट’ झाला आहात. त्या फोनमुळेच तर आमच्या कुळातील चिमण्यांना आपल्या डोळ्यादेखत आपल्या पिढ्या संपताना पहाव्या लागल्या. 


आमची संस्कृती थोडी वेगळी असते. आम्हाला कोणी सुगरण म्हणतं, कोणी बाया कोणी विणकर, तर कोणी गवळण म्हणून ओळखतं. आम्ही छानशा विहिरीवर घरटी बांधतो आणि तिथं बसून आमच्या प्रेयसीला (सुगरण मादी) आकर्षित करतो. त्या सुगरणीला जर घरटं आवडलं तर आमचा संसार सुरू होतो. 


आमच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेश असतो. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंपासून आम्ही हे घरटं व्यवस्थित विणून तयार करतो. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. आम्ही एकाचवेळी एकाच परिसरात एका पेक्षा जास्त घरटी तयार करतो. घरटं तयार करण्याचं काम आम्ही करतो. आमच्या सुगरणी घरट्यामध्ये एकावेळी २ ते ४ अंडी देतात. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. 


पहाटे लवकर उठायचं. घरट्याबाहेर पडायचं. विहिरीतल्या पाण्यात स्नान करायचं. उंच आकाशात उडायचं. दाणे शोधायचे. सुगरणीकडं द्यायचे. पिल्लांना चोचीतून भरवताना बघायचं. पुन्हा दाणे आणायचे. दिवस मावळला की घरट्याकडे परतायचं. असा आमचा दिनक्रम. दरम्यान आम्ही आमच्या पिल्लांना उंच आकाशात झेप घ्यायला शिकवतो. कोकिळाबाई, चिऊताई आणि मैनाबाई यांच्याकडून गाणं शिकायला सांगतो. सोबतच आपल्याला धोका असल्याशिवाय कोणालाही त्रास द्यायचा नाही, हे आम्ही आवर्जुन सांगतो. 


आमच्या घरट्याला तुम्ही माणसं खोपा सुद्धा म्हणता. कवयित्री बहिणाबाईंनी, ‘‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाले टांगला’’ असं म्हणत आमचं कौतुक केलं आहे.


मागील काही दिवसांपासून मी माझ्या काही मित्र-नातेवाईकांसोबत पुण्यातील वारजे येथील एका छानशा टेकडीवर आम्ही राहत होतो. विहिरीच्या जवळ बाभळीच्या झाडावर प्रचंड मेहनतीनं घरटी तयार केली होती. दूरदूरवर जाऊन काडी, केस, माती शोधून, चोचीत धरून तयार केलेल्या आमच्या छानशा घरट्यात राहत होतो. त्यादिवशी मी प्रचंड थकलो होतो. पहाटेच्या हवेची मंद झुळूक, घरट्यातील उब अशा रम्य आणि स्वत:च्या घरट्यात शांतपणे आराम करत होतो. माझं घर सर्वार्थानं माझं होतं. कारण, आमच्यामागे ईएमआयची कटकट नव्हती. 


त्या रम्य वातावरणात आम्हाला अचानक भूकंपासारखा एकाएकी झटका जाणवला. खूप मोठा धोका असल्याचं आम्हाला समजलं. घरट्यातील आमच्या सुगरणी, पिल्ले हे सगळेजण जिवाच्या आकांतानं ओरडू लागले. एरवी इतर कीटक किंवा आमचे शत्रू हल्ले करतात, त्याची चाहुल आम्हाला आधीच लागते. आणि ते माणसांएवढे निर्घृण नसतात. ते हल्ला करतानासुद्धा हल्ल्याची काही नैतिकता पाळतात. 


मात्र, त्यादिवशी घडत असलेले हे सगळं अचंबित करणारं होतं. अचानकच झोपेत असताना हे सगळं घडत असल्याने काय होत आहे आणि काय करायचं आहे, हे कोणालाच समजत नव्हतं. उडत उडत बाहेर आल्यावर समजलं की पहाटेच्या अंधारात एक माणूस आम्ही ज्या फांदीवर घरटी बांधली होती, ती फांदी तोडत आहे. आम्ही पटकन आमच्या भाषेत सर्वांना जागृत केलं. आमच्या सुगरणींना, पिल्लांना आणि घातलेल्या अंड्यांना घरट्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही आमच्यापैकी काही पिल्लांना, काही मित्रांना आणि काही सुगरणींना आम्ही वाचवू शकलो नाही, याचं आम्हाला खूप वाईट वाटलं. हे सगळं अगदी एक-दोन मिनिटांत घडलं. आमची १९ घरटी घेऊन एका माणसाची काळी आकृती पहाटेच्या अंधारात गायब झाली. स्वत:ला सावरता सावरता त्या नराधमाच्या मागे जाऊन त्याला जाब विचारायचं राहून गेलं. म्हणूनच हा पत्रप्रपंच.


आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पण आम्ही सारे एकत्र आहोत. सोबत आहोत. कारण आमच्यामध्ये द्वेषाला स्थान नाही. आमच्यामध्ये भेदाभेदाची कोणतीही भिंत नाही. एकमेकांचे अश्रू पुसून पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद आमच्या पंखांमध्ये आहे. आम्ही पुन्हा उभं राहू. पुन्हा काडी काडी गोळा करू आणि पुन्हा घरटी बांधू. आम्ही दुसऱ्यांची घरं चोरणारी ‘माणसं’ नाहीत, तर स्वत:च्या सामर्थ्यावर, माणसांना तयार करता येणार नाहीत अशी घरटी उभारण्याचं सामर्थ्य असलेले  ‘सुगरण’ आहोत. तुम्ही १९ काय १९ लाख घरटी जरी घेऊन गेलात, तरी आम्ही खचणार नाही. पुन्हा उभं राहू. 


पण त्या दिवशीचा अनुभव विचित्र आणि तुम्हाला ‘माणूस’ म्हणावं का यावर आम्हा पक्षांना पुन्हा विचार करायला लावणारा होता. पण आम्हाला आजही विश्वास आहे. तुमच्यातलं ‘माणूसपण’ आजही शिल्लक आहे. कारण आमच्यात द्वेषाला स्थान नाही. तर आदर, सन्मान आणि संरक्षणासाठी सामर्थ्य हे आमचं जीवन आहे. त्यामुळेच तर आम्ही आमच्या पिल्लांना स्वत:च्या जीवाला धोका असल्याशिवाय हल्ला करायचा नाही, हे शिकवतो. त्यांना फक्त प्रेमच करायचं शिकवतो. फक्त प्रेम.


तो माणूस कुठे आहे? त्यानं आमची १९ घरटी का नेली? त्याचं पुढे काय केलं? त्यानं असं का केलं? हे सगळं तुम्ही शोधालच. कदाचित त्या माणसाला तुमच्या कायद्यानुसार शिक्षाही होईल. कदाचित असे प्रकार याआधी अनेकदा घडलेही असतील. पण पुण्यातील या घटनेमुळे आमच्या मनावर माणूस म्हणून तुमची जी प्रतिमा होती, त्याला जो धक्का पोहोचला आहे, तो पुन्हा कधीही भरून येणार नाही. कधीच भरून येणार नाही.


चला, निघतो. पिल्लं, सुगरण रस्त्यावर आहेत. घरटं बांधायचं आहे.

© व्यंकटेश कल्याणकर

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...