5/15/2019

सात्विक दान (बोधकथा)

एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते.



काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली.

हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.'

बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.

2 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...