Showing posts with label inspirational thoughts. Show all posts
Showing posts with label inspirational thoughts. Show all posts

Saturday, March 21, 2020

प्रेरणादायी विचार... (04)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....







Tuesday, November 12, 2019

प्रेरणादायी विचार... (03)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....









Tuesday, July 09, 2019

हत्तीची गोष्ट! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता. राजा आणि मंत्री संपूर्ण बाजारात खूप वेळ फिरले. शेवटी मोठे हत्ती विकणाऱ्या एका विक्रेत्याजवळ थांबले. त्या विक्रेत्याकडील काही हत्ती राजाला आवडले. त्याप्रमाणे राजाने खरेदी करण्याची तयारी दर्शविली. हत्तींचा दरही ठरला. मंत्र्यांनी विक्रेत्याला पैसेही दिले.

हत्ती ताब्यात देताना विक्रेता प्रत्येक हत्तीच्या फक्त उजव्या पायाला थोडीशी बांधलेली दोरी राजाच्या सैनिकांकडे देऊ लागला. हे पाहून राजा म्हणाला, "अरे, ही दोरी एवढी साधी आहे की आम्ही दूरचा प्रवास करताना हा हत्ती कधीही ती तोडून आमच्यावर हल्ला करू शकतो.' विक्रेता शांतपणे म्हणाला, "तसं होणार नाही!' राजाला आश्‍चर्य वाटले, "अरे पण तसे होणार नाही याची खात्री काय?'

त्यावर विक्रेत्याने नम्रपणे उत्तर दिले, "राजेसाहेब, हे हत्ती छोटे असल्यापासून माझ्याकडे आहेत. सुरूवातीला त्यांच्या चारही पायांना खूप जाड दोरी बांधत होतो. तेव्हा ते दोरीचे बंधन तोडण्याचा खूप प्रयत्न करत होते. कितीतरी दिवस ते दोरी तोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या पायातून रक्त निघायचे. त्यांना त्रास व्हायचा. त्यावेळी ते काही खातही नव्हते. त्यामुळे अशक्तपणा यायचा. शेवटी एकेदिवशी त्यांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करली आणि धडपडण्याचा प्रयत्न सोडून दिला. येथून पळून जाणे हे क्षमतेबाहेरचे आहे असा त्यांचा समज झाला. आज त्यांच्या पायात मोठे बंधन नाही. मात्र त्यांची पळून जाण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. पळून जाणे अगदी सहज शक्‍य असतानाही त्यांच्याकडे तेवढे सामर्थ्य असतानाही त्यांना असेच वाटते की प्रयत्न करून काहीही उपयोग होणार नाही. प्रयत्न निरर्थक जातील. त्यामुळे त्यांनी प्रयत्नच सोडून दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पायातील ही दोरी जरी मी बाजूला काढून ठेवली तरी देखील ते पळून जाऊ शकणार नाहीत.' विक्रेत्याने दीर्घ खुलासा केला.

राजासह मंत्री आणि अन्य सर्वांना विक्रेत्याचे म्हणणे पटले.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)

Monday, June 24, 2019

एक ठिणगी

कधी... कधी...

आकाश भरून येतं. आक्राळविक्राळ काळेकुट्ट ढग एकत्र येतात. भयावह काळोख गिळायला पाहतो. क्षितीज संपलयं वाटतं. संकटं मिठित घेतात. आव्हानं क्रूर थट्टा करतात. अस्ताचा आरंभ झाल्यासारखं वाटतं. पण....  तेवढ्यात, तेवढ्यात एक कर्णकर्कश्श आवाज होतो. एक दैदिप्यमान उजेड पळभरातच अंधाराला खाऊन टाकतो. नष्ट होतात आसमंतावर पसरलेली काळीकुट्ट जळमटं. अस्ताच्या आभासाचा अस्त होतो. भवताल निर्मळ होतं. आसमंत सुंदर होतो. मन: पडद्यावर दिसू लागते वाट. दैदिप्यमान उजेड जगायला शिकवतो.

आणि आणि तेव्हाच जाणवतं...

मला आहेत हजारो चक्षु. आहेत सहस्र बाहू. बाहूंमध्ये आहे कोट्यवधी हत्तींचं बळ. माझ्यात आहे हा आसमंत कवेत घेण्याची ताकद. माझ्या धमन्यांमधून रक्त नव्हे वाहतोय उजेड. अंधाराची चिरफाड कडून शरीरभर सळसळतयं उजेडाचं चैतन्य. वाटतं हजारो पृथ्वींना गदागदा हलवण्याचं सामर्थ्य आहे या मर्दात. क्षुद्र संकटांची गुंडाळी करून मी भिरकावतोय लांब लांब ढगात. तिळाएवढी आव्हानं मी खाऊन टाकू शकतो आणि मी देऊ शकतो स्वप्नांच्या तृप्ततेचा कृतार्थ ढेकर.

कारण... कारण...

माझ्यात आहे दैदिप्यमान उजेड पुरविणारी एक अंत:प्रेरणेची ठिणगी. जी पेटवून टाकेल सा-या विश्वाला आणि निर्माणही करेल नवं विश्व. जी लाथ मारेल काळ्या ढगांना आणि चुंबन घेईल आभाळाच्या उंचीचं. दमड्या फेकून ही ठिणगी तुमच्या बाजारात विकत मिळणार नाही. ती घुसमटतेय माझ्या आत. तुमच्या आत. सगळ्यांच्याच आत. तिच्या घुसमटीचा अंत करा.  उडू द्या तिला मुक्त आकाशात. उधळू द्या तिने अवकाशात अनेक रंग आणि साजरा करा फक्त आयुष्याचा उत्सव...

त्यानंतर

एक दिवस तुमचं शरीर न्यायला तो येईल. तुमची ठिणगी मात्र तो इथेच ठेऊन जाईल. इथल्या प्रत्येकाला पेटवण्यासाठी खूप आतून...

© व्यंकटेश कल्याणकर

Saturday, May 18, 2019

आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात एक जण म्हणाला, "आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि आपल्याकडे काहीही नाही.' यावर त्या सर्वांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शेवटी प्रत्येकाने आपण आयुष्यात निराश असल्याचे सांगितले. तोपर्यंत दुपार झाली होती. त्यामुळे सर्वांना भूक लागली. एवढ्यात जंगलात काहीच मिळणार नाही म्हणून ते केवळ पाण्याचा शोध घेऊ लागले.



पाण्याचा शोध घेता घेता त्यांना घनदाट जंगलात एक झोपडी दिसली. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिले. आत एक वृद्ध स्त्री होती. तिला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले. "आजी, आम्हाला थोडे पाणी मिळेल का?', एकाने विचारणा केली. वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, "मी पाणी फार दूरवरून आणते. इथे जवळपास पाणी नाही. तरीही माझ्याकडे पुरेसे पाणी आहे. पण ते पाणी देण्यासाठी काही नाही. फक्त नारळाच्या छिद्र पडलेल्या करवंट्या आहेत. त्यात तुम्हाला पाणी चालेल का?', वृद्धेने विचारणा केली. "हो, हो अगदी चालेल की!', तहान लागल्याने चौघांनी एकदमच होकार दिला. वृद्धेने वेगवेगळ्या आकाराच्या तीन कवट्यांमध्ये पाणी दिले. त्यामुळे एकाने शेवटी पाणी पिले. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर एक जण सहज म्हणाला. "आजी तुम्हाला इथं जंगलात छान प्रसन्न वाटत असेल ना? आम्हाला तर शहरात राहायचा आणि जगायचा कंटाळा आला आहे. रोज काहीतरी नव्या समस्या असतातच हो!' एकाने नाराजीचा सुरात माहिती दिली.

आजी म्हणाल्या, "बाळांनो, आयुष्यात कधीही नाराज होऊ नको. आता हेच बघा ना तुम्हाला आता मी ज्या करवंट्यामध्ये पाणी दिले होते. त्यापैकी तीनही करवंट्या एकसारख्या नव्हत्या. एकाला तर करवंटी मिळालीच नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्याने वापरलेली करवंटी नंतर वापरावी लागली. दोन करवंट्यांना छिद्रे पडली होती. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पाणी पिऊन तहान भागविलीतच ना? आयुष्याचंही असच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.' वृद्धेचा संदेश ऐकून तिघांनाही बोध झाला.

Friday, May 17, 2019

एक विचार नाश करू शकतो! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तेथे एका गुरुकुलात अनेक वर्षांपासून काही शिष्य विद्या ग्रहण करत होते. गुरूकुलातील गुरूजी शिष्यांवर प्रचंड प्रेम करत होते. दरवर्षी शिष्यांची एक तुकडी शिक्षण घेऊन बाहेर पडत होती. गुरूजी दरवर्षी मोठा निरोप समारंभ आयोजित करत होते. शिष्यांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले जायचे. एका वर्षी अशाच एका निरोप समारंभाची तयारी सुरू होती. एक शिष्य गुरुंकडे आला. तो अस्वस्थ असलेला गुरूजींना दिसला. ते म्हणाले, "काय झाले?' तो बोलू लागला, "गुरूजी, मी गेल्य अनेक वर्षांपासून येथे आलो आहे. मी सर्व विद्या ग्रहण केली. मला त्या साऱ्या विद्या अवगत आहेत. पण इतर शिष्यांप्रमाणे मी एकाही विद्येत पारंगत नाही. माझे आयुष्यात काय होईल? मी समर्थपणे आयुष्य जगू शकेल का? मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे गुरूजी.' त्यावर गुरूजी काहीही बोलले नाही. शेजारीच एक लिंबाचे झाड होते. गुरूजींनी शांतपणे एक लिंबू काढला आणि शिष्याच्या हातात ठेवला. आणि त्याला स्वयंपाक घरात घेऊन गेले. गुरूजींनी ते लिंबू कापायला सांगितले. शिष्याने ते कापले. आता गुरूजींनी निरोप समारंभातील भोजनासाठी तयार केलेल्या बासुंदीच्या मोठ्या पातेल्याजवळ शिष्याला आणले. गुरूजी म्हणाले, "हे कापलेल्या लिंबाचा एक थेंब फक्त या बासुंदीत सोड.'



शिष्याला आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, "गुरूजी त्यामुळे एवढी सारी बासुंदी खराब होईल. वाया जाईल. फेकून द्यावी लागेल. कोणालाही खाता येणार नाही.' त्यावर गुरूजी शांतपणे बोलू लागले, "वत्सा, जर लिंबाच्या एका थेंबामुळे एवढी सारी बासुंदी खराब होत असेल, तर नैराश्‍याच्या, अस्वस्थतेच्या साध्या किरकोळ विचाराने तुझे मन खराब होणार नाही का? ज्याप्रमाणे खराब झालेली बासुंदी कोणी खाऊ शकणारय नाही, ती टाकून द्यावी लागेल. त्याप्रमाणे तुझे खराब झालेल्या मनाचा तरी काय उपयोग?' एवढे सारे ऐकून शिष्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने गुरूजींचे चरण धरले. "वत्सा, आयुष्यात कधीही नकारात्मक विचार मनाला स्पर्श करू देऊ नकोस. सतत सकारात्मक विचार कर आणि पुढे जा. एक वेळ शरीरावर जखम झाली तर ती भरून निघेल. पण मनाला जर जखम झाली तर ती भरून येईलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे नकारात्मक विचारापासून सतत दूर रहा', एवढे बोलत गुरूजींनी पूर्णविराम दिला.

Thursday, May 16, 2019

...असं होतं माणसाचं मन शुद्ध! (बोधकथा)

भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांबरोबर दूरच्या प्रवासाला निघाले होते. ते एका गावात पोहोचले. शेजारी नदी वाहत होती. बुद्धांनी सर्वांना थांबण्याचे आदेश दिले. सर्वजण एका झाडाखाली थांबले. बुद्धांनी तहान लागल्याचे सांगितले. एक शिष्य समोर आला. "गुरुवर्य मी शेजारच्या नदीतून पाणी घेऊन येतो' असे म्हणत तो कमंडलू घेऊन नदीकडे निघाला. काही वेळाने तो परतला. मात्र कमंडलू रिकामेच होते. बुद्धांनी विचारले, "पाणी का आणले नाहीस?' त्यावर त्याने या नदीतील पाणी खूप अस्वच्छ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "या नदीत कोणी कपडे धुवत आहेत. कोणी जनावरांना स्वच्छ करत आहे. कोणी स्नान करत आहेत. पाणी दूषित आहे. गुरुवर्य ते पाणी पिण्यायोग्य नाही.' यावर बुद्ध म्हणाले, "ठीक आहे. आपण आपला प्रवास सुरू ठेवू आणि पुढे कोठेतरी पाणी पिऊ' सर्व जण त्याच रस्त्याने सरळ पुढे प्रवासाला निघाले. शेजारून नदी वाहतच होती.



साधारण 4-5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर बुद्धांनी पुन्हा सर्वांना थांबायला सांगितले. त्यांनी या आधी पाणी आणायला गेलेल्या शिष्याला बोलावले. त्यालाच पुन्हा पाणी आणण्यास सांगितले. तो कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी वाहत असलेल्या नदीकडे निघाला. नदीचे पाणी स्वच्छ होते. आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याने कमंडलू बुडवून पाणी भरले. तो बुद्धांजवळ आला. बुद्धांना त्याने कमंडलू दिले. बुद्ध म्हणाले, "मघाशी तुला ज्या नदीतील पाणी अस्वच्छ वाटत होते. त्याच नदीतील हे पाणी आहे. केवळ पुढे वाहत आल्याने ते स्वच्छ झाले. माणसाच्या मनाचेही असेच असते. मनाला एखाद्या चिंतेने ग्रासले की त्रस्त होऊ नये. केवळ काही काळ निघून गेला की या पाण्याप्रमाणे माणसाचे मनही स्वच्छ होते.'

Wednesday, May 15, 2019

सात्विक दान (बोधकथा)

एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते.



काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली.

हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.'

बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.

Tuesday, May 14, 2019

ते स्वीकारूच नका! (बोधकथा)

एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला. "तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात....', अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला.



स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग 5-7 मिनिटे बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले. काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला.

आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो बुद्धांना म्हणाला, "मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला? तुम्ही शांत कसे?' त्यावर बुद्ध म्हणाले, "मला एक सांग तू एखाद्याला भेट देण्यासाठी भेटवस्तू खरेदी केली आणि ती भेटवस्तू एखाद्याने स्वीकारलीच नाही. तर ती वस्तू कोणाची असेल?' तो व्यक्ती म्हणाला, "अर्थातच. मी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू माझीच असेल. पण त्याचा इथं काय संबंध?' बुद्ध शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, "वत्सा, तू दिलेल्या शिव्या आणि तू दिलेले वाईट शब्द आम्ही स्वीकारलेच नाहीत. त्यामुळे ते कोणाचे झाले?' त्यावर त्या व्यक्तीला आपली चूक उमगली आणि त्याने बुद्धांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून तो व्यक्ती बुद्धांचा शिष्य बनला. बुद्ध म्हणाले, "आयुष्यात बऱ्याच गोष्टी नाकारणे शक्‍य असतानाही आपण नको त्या गोष्टी स्वीकारतो त्यामुळे आपण बऱ्याचदा संकटात सापडतो. त्यामुळे चराचरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच स्वीकारा आणि आनंदी, उत्साही, शांत राहा.'

Tuesday, June 19, 2018

भुंग्याची गोष्ट

एकदा भुंगा आणि फुलपाखरू एका फुलाजवळ येतात. फुलपाखरू फुलावर बसलेले असते. फूल अतिशय सुंदर असते. मात्र सूर्यास्त झाला की फुलाच्या पाकळ्या आपोपाप मिटण्याचा गुणधर्म फुलात असतो. तसेच सूर्योदय झाला की फुलाच्या पाकळ्या आपोआप उघडतही असतात. भुंग्याचे फुलावर प्रचंड प्रेम असते. त्यामुळे "फुलावर सर्वाधिक प्रेम कोण करतो आणि फुल कोणाचे?' यावरून फुलपाखरू आणि भुंगा यांच्यामध्ये वाद होतात. वाद वाढत जातो. मात्र थांबत नाही. शेजारी असलेला एक जुना वृक्ष हा सारा प्रकार पाहत असतो. तो दोघांनाही शांत करतो आणि एक सल्ला देतो. "उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी जो या फुलाजवळ पहिल्यांदा पोचेल त्याचेच या फुलावर प्रेम असेल आणि हे फूलही त्याचेच होईल', असा सल्ला वृक्ष देतो. हा भुंगा आणि फुलपाखरू दोघांनाही मान्य होतो. त्यानंतर दोघेही निघून जातात.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एक फुलपाखरू फुलाजवळ येते. फुलाच्या पाकळ्या बंद असतात. त्या उघडण्याची फुलपाखरू प्रतिक्षा करत असतो. दरम्यान भुंगा अजूनही आला नाही याचा त्याला आनंद होतो. कारण आता विजय आपलाच असा त्याचा ग्रह होतो. काही वेळाने सूर्योदय होऊ लागतो. भुंगा अजूनही आलेला नसतो. फुलपाखराला त्याचा आनंद होतो. फुलाच्या पाकळ्या उघडू लागतात. फुलपाखरू आता फुलाच्या दिशेने जाऊ लागते. तोच त्याला धक्का बसतो. कारण त्याला फुलाच्या आत भुंगा मृतावस्थेत दिसतो. त्यावर त्याला काहीच कळत नाही. इतक्‍यात शेजारचे वृक्ष बोलू लागतो. "फुलपाखरा, सकाळी उशीर होऊ नये म्हणून भुंगा काल पाकळ्या मिटण्यापूर्वीच फुलात जाऊन बसला होता. त्याचे फुलावर खूप खूप प्रेम होते. रोजच्याप्रमाणे सूर्यास्त झाला आणि फुलाच्या पाकळ्या मिटल्या गेल्या. एरवी कोणतीही वस्तू पोखरून काढणारा भुंगा फुलांच्या पाकळ्यांना मात्र पोखरू शकला नाही. मी त्याला आवाज देऊन बाहेर येण्याचा सल्ला दिला. पण त्याने माझे ऐकले नाही. फूल संपूर्ण मिटले आणि सूर्योदय होईपर्यंत भुंग्याचा आत गुदमरून मृत्यु झाला.'

त्यावर फुलपाखराला प्रचंड वेदना झाल्या. "फुलपाखरा आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीपासून आपल्याला कितीही धोका असला आणि आपल्यात कितीही सामर्थ्य असलं तरी आपण त्या गोष्टीला इजा नाही पोचवू शकत', वृक्षाने मोलाचा संदेश दिला.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)

Tuesday, June 05, 2018

या तीन बोधकथा तुम्हाला नक्की आवडतील!


भ्रमात राहू नका

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले.... 

संपूर्ण कथा वाचण्यासाठी क्लिक करा




कष्टाचे फळ
पुन्हा काही अंतर गेल्यावर सर्वांत लहान नातवंड थकल्याने त्याने फळी सोडून दिली. "मी आजोबांना सांगेल की मला नाही उचलली फळी', असे इतर जणांना सांगून तो पुढे चालू लागला. आणखी काही अंतर गेल्यावर आणखी एकाने फळी टाकून दिली. पुढे चालू लागला. फळी सोडून दिल्याने या दोघांनाही आता चालताना त्रास होत नव्हता. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप पुढे चालू लागले. असे करत करत दहापैकी 7 जणांनी फळी सोडून दिली आणि "आम्हाला नको खेळायचा असला खेळ' म्हणत पुढे चालू लागले. आता केवळ फळी घेतलेले तिघेच उरले होते. आणखी एकालाही आता असह्य झाले. त्यानेही फळी सोडून दिली. आता फक्त दोन जणच फळी घेऊन पुढे चालत होते. इतर सगळेजण एवढे पुढे गेले होते की ते दिसेनासे झाले. हे दोघेच प्रामाणिकपणे फळी घेऊन पुढे चालू लागले. त्यांना घाम आला. तरीही त्यांनी फळी सोडली नाही. आणखी काही अंतर गेल्यावर त्यांना सगळेजण एकाठिकणी थांबलेले दिसले. तेथे फळी घेतलेले दोघे जण पोचले. समोरचे दृश्‍य पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. कारण...




संदेश
गुरुवर्य प्रत्येकाला त्यांचे अनुभव विचारू लागले. प्रत्येकजण आपला अनुभव कसा वेगळा आणि आपण एकांतात जाऊन कसे फळ खाल्ले हे सांगू लागला. सर्व शिष्यांनी आपले अनुभव कथन केले. आता गुरुवर्य हातात फळ घेऊन परतलेल्या शिष्याकडे वळले. त्याला अनुभव विचारू लागले. तो शिष्य अत्यंत नम्रपणे म्हणाला,....
संपूर्ण कथा वाचण्यासाठी क्लिक करा






Wednesday, March 29, 2017

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार







Sunday, February 22, 2015

प्रेरणादायी विचार... (01)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....














Saturday, November 08, 2014

प्रेरणादायी विचार... (02)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात 
हे सारे विचार वाचून होतील. 
मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं 
आयुष्य कमी पडेल 
असे काही प्रेरणादायी विचार....









Related Posts Plugin for WordPress, Blogger...