6/10/2017

भ्रमात राहु नका (बोधकथा)

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले.

एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते. मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्यांना काहीच समजले नाही. मात्र दरोडेखोरांनी जाताना सर्व झोपडपट्यांना आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मुलाला घेऊन ते फरार झाले.

दुसऱ्या दिवशी काम संपवून तो व्यक्ती घराकडे आला. त्यावेळी समोरचे दृश्‍य पाहून त्याला प्रचंड दु:ख झाले. झोपडी जळाली. आपला मुलगाही त्यात जळून गेला, असे त्याला वाटले. त्याने प्रचंड शोक केला. काही दिवसांनी दु:खातून सावरत त्याने पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत त्याने पुन्हा झोपडी उभी केली. त्या आधी एका डब्यामध्ये झोपडीतील थोडी राख एकत्र केली. आपला मुलगा नव्हे तर किमान त्याची राख तरी आपल्यासोबत कायम राहील, असे समजून तो राखेचा डबा कायम स्वत:जवळ बाळगू लागला. अशातच काही वर्षे गेली. एके दिवशी काम संपवून सकाळी-सकाळी तो राखेचा डबा घेऊन झोपडीत आला. झोपडीचे दार त्याने आतून बंद केले होते. त्याचवेळी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटून त्याचा मुलगा त्याच्या दाराशी आला. बाहेरून जोरजोरात दार वाजवू लागला. "मी तुमचा मुलगा', असा आवाज देऊ लागला. मात्र आपला मुलगा तर केव्हाच मृत झाला आहे, असा समज करून बसलेल्या त्या व्यक्तीने स्वत:च्या मुलाकडेच दुर्लक्ष केले. शेजारच्या झोपडीतील मुले आपली गंमत करत असतील, असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ दार वाजवूनही दार न उघडल्याने मुलगा हताश होऊन पुन्हा दूर निघून गेला.

बुद्धांची गोष्ट संपली होती. मात्र शिष्यांची विचारप्रक्रिया सुरू झाली होती. बुद्ध सांगू लागले, "पाहा, "आपला मुलगा मेला' हा समज त्या व्यक्तीच्या मनावर एवढा खोल रूजला होता, की कदाचित सत्य काहीतरी वेगळेच असेल आणि आपला मुलगा जिवंत असेल एवढा विचार करण्याचेही त्याला भान नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे समजता तेच सत्य असते अशा भ्रमात राहु नका.'
 
(Courtesy: eSakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...