6/09/2017

क्षमायाचना (बुद्धकथा)

एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्याने विचार केला. एकेदिवशी व्यापारी मुलांच्या मागे गेला. मुले बुद्ध बसलेल्या ठिकाणी आली. बुद्ध डोळे मिटून शांतपणे बसून होते. त्यांच्यासमोर काही लोकही बसले होते. मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून शांतपणे बसले. "त्यांनी डोळे मिटलेले आहेत आणि माझी मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून बसलेली आहेत', हे पाहून व्यापारी संतापला. व्यापाऱ्याने बुद्धांना दूषणे देण्यास प्रारंभ केला. जोराजोरात वाईट बोलू लागला. तरीही सारे जण शांत होते. बुद्ध किंवा समोर बसलेले मुले काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहत व्यापारी बुद्ध बसलेल्या ठिकाणाजवळ रागाने थुंकला आणि निघून गेला. बुद्ध, व्यापाऱ्याची मुले किंवा समोर बसलेल्यांपैकी कोणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे व्यापारी निघून गेला.

त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. आपण एवढी दूषणे दिली. एवढे वाईट बोललो. त्यांच्याजवळ थुंकलो. तरीही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इतर वेळी आपण कोणालाही एक शब्दही वाईट बोललो, तर लोक चिडतात. पण बुद्ध, त्यांचे अनुयायी मात्र शांत होते. कदाचित आपणच चुकीचे काम केले असेल. आपणच चुकलो आहोत, असा विचार व्यापारी करू लागला. त्याला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी उठून तो बुद्धांकडे गेला. बुद्धांना नमस्कार करून तो क्षमा मागू लागला. "मी जे केले आहे. त्याचा मला पश्‍चाताप होत आहे. कृपया मला माफ करा', व्यापारी विनंती करू लागला. मात्र बुद्धांनी अनपेक्षित उत्तर दिले, "मी तुला माफ करू शकत नाही!' त्यामुळे व्यापारी आणखी त्रस्त झाला. तो म्हणाला, "पण आपण मला का माफ करू शकत नाहीत?' त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, "ज्याने काल दूषणे देण्याचे, थुंकण्याचे कृत्य केले तो तू नाहीस. माझा द्वेष करणारा काल रात्रीच निघून गेला आहे. आता माझ्यासमोर जो माणूस क्षमायाचना करत आहे त्याने काहीही चूक केलेली नाही. जर तू काहीही चूक केली नसेल तर मी कशासाठी क्षमा करावी?'
हे ऐकून व्यापाऱ्याने बुद्धांचे पाय धरले.

(Source: esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...