6/06/2021

समृद्ध आशयसंपन्न कथासंग्रह : सारांश कथा

माणूस म्हणून जगताना अन्न, वस्त्र, निवा-यासोबतच रंजन ही देखील आता एक अनिवार्य गरज बनत चालली आहे. प्रत्येकाची अभिरूची वेगळी असू शकते, पण अंतिमत: हेतू रंजन हाच असतो. रंजनाची हजारो माध्यम आज आपल्या अवती-भोवती फेर धरून नाचत आहेत. नाटक, चित्रपट, वेबसिरीज वगैरे वगैरे. मात्र, सर्वांमध्ये एक कथानक आहे. परिमाणात मोजता येईल असा आशय आहे. दुर्दैवानं सांगावसं वाटतं की रंजनाच्या व्यावसायिकीकरणात आशयामध्ये टोकाची तडजोड करण्यात येत आहे. त्यामुळेच तर सुज्ञ आणि अभिरुचीसंपन्न वाचकवर्ग आशयसंपन्न साहित्याकडे वळत आहे. त्याचप्रमाणे युवालेखकही आशयसंपन्नतेला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. युवा लेखक व्यंकटेश कल्याणकर यांचा `सारांश कथा' हा कथासंग्रह याचं प्रतिक आहे.



`सारांश कथा' म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय सांगणारी कथा. स्क्रोलिंग म्हणजेच दुर्लक्ष करत करत पुढे जाणा-या पिढीला खिळवून ठेवून, त्यांची विचारप्रक्रिया प्रज्वलित करणा-या २३ कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. सृजनशील नवलेखकांना सातत्याने प्रोत्साहित करत बळ देणा-या `चपराक प्रकाशन'नं हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.


अत्यल्प उत्पन्न असतानाही गैरमार्गानं पैसे न कमावणारा बाप आपल्या लेकीकडूनच कसं शिकतो हे `खोटं कधी बोलू नये' या कथेत समर्थपणे मांडलं आहे. `क्षितीज' आणि `आई मला पंख आहेत पण...' या कथा माणूस म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणा-या आहेत. `सुपारी', `प्रॅक्टिकल?', `रिअल एरर', `ते देवीकडं काय मागतात?', `मालक लढा', `नेमके खरे काय?' या कथा खरोखरच आपला भवताल किती गढूळ होत चालला आहे, याचं उदाहरण देतात. तर `आपलं ध्येय काय?', `नवस' या कथा थेटपणे संदेश देतात. `तू मला बी सोडून जाशील?', `आनंदाश्रू', `कोणी मरत कसं नाय?' या कथा वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडतात आणि भावविवश करतात.

माणसाला मिळालेल्या अश्रू ढाळण्याचं कारण सांगण्याच्या सामर्थ्याचा उपभोग घेतल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. त्याची प्रचिती पुस्तकाच्या प्रत्येक पानात येते. पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखकाने माणसाला मिळालेल्या पहिल्याच कथासंग्रहातून लेखकाची वैचारिक क्षमता, विचारविश्वाची व्याप्ती, भवतालच्या घटनांमधून आशय शोधण्याची शोधक दृष्टी, शब्दसामर्थ्य आणि काळजाला हात घालणारं लिहिण्याची हातोटी स्पष्ट दिसून येते. उत्कृष्ट मांडणी, कलेचे उपासक समीर नेर्लेकर यांनी साकारलेले साजेसे मुखपृष्ठ यामुळे कथासंग्रह अधिक बहारदार झाला आहे.


लेखकाला समजून घेण्याची वाचकांची प्रक्रिया सुरु होण्यासाठी जो अवधी लागतो, तो अवधी पूर्ण होण्याआधीच `सारांश कथे'तील प्रत्येक कथा शेवट गाठते. त्यामुळे लेखकाला समजून घेण्याआधीच वाचकांना लेखकाच्या भूमिकेत जावे लागते. मात्र, `सारांश कथा' हा संग्रह वाचकांना पुरेपूर वाचनानंद देतो, यात किंचितही शंका नाही.


सारांश कथा | चपराक प्रकाशन, पुणे

व्यंकटेश कल्याणकर

पाने : 48 । किमंत : रु. 50/-


पुस्तक खरेदीची लिंक : http://bit.ly/ChaprakSaranshKatha


(दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेला 'सारांश कथा' या कथासंग्रहाचा परिचय. त्याबद्दल पुण्यनगरीचे तत्कालिन पत्रकार स्वप्नील कुलकर्णी आणि ‘चपराक’चे प्रकाशक – संपादक घनश्याम पाटील सर यांचे आभार!)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...