8/03/2013




प्रिय ‘मैत्री’स

परवाच आम्ही तुझा दिवस साजरा केला. खरे तर ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून तुझ्यासाठी वर्षातला एक दिवस राखून ठेवायचा आणि त्याच दिवशी तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या अशी अजिबात भावना नाही. मात्र, तुझं अस्तित्व आहे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो हे दाखवून देण्याचं आम्हाला एक निमित्त मिळतं. मग वर्षभर आम्ही तुला निभावून नेतोच!





जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या दिसत नाहीत पण विलक्षण अनुभव देतात, जिवंत असल्याचा निक्षून सांगतात. जगण्यातील आनंदाची जाणीव निर्माण करून देतात. त्या  जाणिवांना जगातील कोठलेही भेदाभेद असत नाहीत. त्या जाणीवा फक्त अनुभवता येतात, हृदयापासून हृदयापर्यंत!

तुझा आणि आमचा परिचय तसा अगदी बालपणापासून सुरु होतो आणि अखेरपर्यंत कदाचित त्यानंतरसुद्धा सुरुच राहतो. तुला आठवतं तू अगदी पहिल्यांदा भेटलीस माझ्या शाळेच्या पहिल्याच दिवशी. आई-बाबांनी बोट धरून मला शाळेच्या दारात सोडलं. मी निरागसपणे त्यांच्या चेहर्‍याकडं बघत बघत वर्गात प्रवेश केला आणि समोर कितीतरी माझ्यासारखेच निर्विकार चेहरे दिसले. शाळा चालू होती अन् माझ्या मनात त्या अनोळखी चेहर्‍यांबद्दल एक अनामिक ओढ लागून राहिली होती. तशातच शाळेची घंटी वाजली अन् शाळा सुटलीसुद्धा, जाताना मात्र तू भेटलीस मित्राच्या आणि माझ्यात लपून बसलेली तू तेव्हापासून आजतागायत आम्हाला भेटतच राहिलीस. अगदी त्याच निर्विकारपणे, त्याच निरागसपणे आणि त्याच प्रसन्नतेने.

पुढे आम्ही जिथं तिथं तुला शोधू लागलो. आई-बाबांशी ‘मैत्री’पूर्ण संबंध असले की त्यांनाही आनंद वाटतोच ना, पुन्हा तिथं तू भेटलीस. पुढे आमच्या कॉलेजमध्येतर तुला बहर आला अगदी तेव्हासुद्धा तू तरुण भासत होतीस, प्रेमात पडावं एवढी सौंदर्यवान. त्यातूनच आमचा मित्रपरिवार वाढत गेला आणि जगण्याला अर्थ प्राप्त होत गेला. पुढे पुढे तर ‘अर्था’शी सुद्धा आम्ही मैत्रिपूर्ण संबंध ठेवले. नाहीतर कोर्‍या कागदावर छापलेल्या रंगीबेरंगी आकड्यांसाठी आम्ही एवढी धावपळ थोडीच केली असती!

आम्हा माणसांना तू सतत भेटत राहिलीस कधी तापलेल्या उन्हात गवसणार्‍या वटवृक्षाच्या छायेसारखी, कधी आमची वेदना घेऊन गालांवरून जाताना आमचंच सांत्वन करणार्‍या अश्रूंसारखी, कधी आशीर्वाद देण्यासाठी हिमालयाच्या उत्तुंग पर्वतांएवढी, कधी कधीच न समजणार्‍या समुद्राच्या खोलीएवढी, तर कधी काळेकुट्ट ढग घेऊन बरसणार्‍या श्रावणधारांसारखी..  तू भेटण्याच्या जागा सतत बदलत राहिलीस, पण प्रत्येक जागेसाठी आमच्या हृदयात जागा राखून ठेवलीस. बालपणी मित्राच्या रूपाने भेटलीस, नंतर कॉलेजातील मित्रांच्या रूपाने, नंतर कधी रूमपार्टनरच्या रूपाने तर कधी आयुष्याच्या पार्टनरच्या रूपाने तू भेटलीस.

तू या चराचरात आहेस, म्हणून ही सृष्टी सजीव आहे. अगदी इथल्या निर्जिव पदार्थांमध्येसुद्धा तूच आहेस. नाहीतर ‘देवपणाच्या’ निर्मितीची क्षमता असलेल्या ‘हातोडी’ने आपल्या मित्राला दगडाला आपली हयात घालवून देवपण दिले असते का? समुद्र अन् पर्वतामध्ये तू आहेस, निसर्ग अन् परमेश्वर यांच्यामध्येसुद्धा तूच आहेस. आम्ही पामर ‘माणसं’ दरवेळी आमच्या जवळच्या माणसांतच तुला शोधण्याचा प्रयत्न करतो.
मग इथंच प्रत्येक माणूस भेटला की आम्हाला ‘आनंद’ का वाटत नाही आणि आम्ही त्यावेळी तुझी आठवण का काढत नाही? अर्थात् असे झाले असते तर जगात कोठेच कधीच कोणतेच स्फोट झाले नसते, युद्ध झाले नसते! सगळीकडे निरव शांतता, निरागस प्रेम अन् ममत्वानं हे जग ओथंबून वाहिले असते...

पण जाऊ दे, शेवटी तुला एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही ज्याला अल्लाह, खुदा, भगवान, परमेश्वर, देव वगैरे नावानं हाक मारतो त्यानं तुला एवढी शक्ती द्यावी, एवढं बळ द्यावं, एवढं प्रेम द्यावं की तु ते जगभर वाटशील अन् आम्हा माणसामाणसांमधील भेदाभेदाचे अमंगळ काळे ढग दूर सारून तेथे निव्वळ मैत्रीचा वर्षाव होईल!

आम्ही माणसं एक दिवस संपणार आहोतच! पण तू नाही....



व्यंकटेश कल्याणकर

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...