12/01/2013

हरीच्या ‘गुज’गोष्टी

जगण्याच्या पलिकडे अन् मरण्याच्या अलिकडे, श्‍वासाच्या पलिकडे अन् हृदयाच्या अलिकडे असणार्‍या भावना शब्दांच्या पलिकडल्या आहेत. त्या भावना प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या, ममतेनं ओथंबलेल्या, समाधानानं ओसंडणार्‍या आणि हृदयापासून निघून हृदयापर्यंत पोचणार्‍या असतात. या सर्वांची जाणीव करून घेण्याकरिता ‘स्व‘त्वाच्या पलिकडे, अहंकाराच्याही पलिकडे जाण्याची आवश्यकता आहे. 
छोट्या हरीला त्याच्या आईनं या जाणीवांची जाणीव करून देण्याकरिता सांगितलेल्या काही गुजगोष्टी...

हरीच्या घरातील देव्हारा समईतील मंद अन् तेजस्वी प्रकाशाने उजळत होता. हरीची आई अंगणात तुळशीवृंदावनापुढे दिवा लावीत होती. हरी वाड्यातील ओसरीवर अभ्यास करीत बसला होता. हरीची आई म्हणाली, ‘‘हरी, ये इकडे. आज आपण इथेच शुभंकरोति म्हणूयात.’’ त्या छोट्या हरीची छोटी पावलं धावतच अंगणातल्या तुळशीवृंदावनापर्यंत पोचली. हरी म्हणाला, ‘‘आई, शुभं करोति कधी तुळशीसमोर म्हणतात का?’’ हरीचा बाळबोध प्रश्न. तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘बाळ, हरी कुठलीही चांगली गोष्ट करण्याकरिता कुठलेही ठिकाण चांगलेच चालते. त्यामुळे इथं शुभंकरोति म्हटली तरी हरकत नाही.’’

आकाशात चंद्राचा प्रवास सुरु होता. हरीची शुभंकरोति संपली. आणि त्या चंद्राकडे हरीने आईला गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला. आईला हरीचा हट्ट मोडवला नाही. आई म्हणाली, ‘‘हरी आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे, त्याआधी तू मला शपथ दे की, तू आयुष्यात कितीही मोठा झालास तरी नम्रपणाने वागशील.’’ थोड्याश्या निराशेने हरी म्हणाला, ‘‘पण नम्रपणा म्हणजे काय गं आई?’’ आईने निर्विकारपणे उत्तर दिले, ‘‘बाळ, हरी! नदीला जेव्हा पूर येतात तेव्हा मोठमोठाली वृक्षे उन्मळून पडतात, मात्र त्याच नदीत असणारी नम्रपणाने वाकलेली लव्हाळे पूर ओसरला की मोठ्या उमेदीने पुन्हा उभी राहतात. समईतील मंद प्रकाश देणारी कापसाची वात आपला नम्रपणा कधी सोडते का? अर्धे शरीर नम्रपणाने तेलात तर अर्धे शरीर जळून प्रकाश देण्यासाठी समईच्या बाहेर डोकावत असते. माझ्या ‘हरी’चा जेव्हा मोठा हरी होईल. तेव्हा तू ही असंच वाग बरं! नम्र, अहंकाररहित!’’ आकाशातील चंद्राकडं, आईच्या चेहर्‍याकडं अन् तुळशीतल्या रोपाकडे पाहत पाहत हरी अगदी तन्मयतेनं सगळं ऐकत होता.

‘‘सांग ना आता आई गोष्ट’’ हरी मोठ्या आशेनं आईच्या डोळ्यात पाहून म्हणाला.
‘‘मग लक्षपूर्वक ऐक आता मी जी गोष्ट सांगते ती!’’ आणि आईनं गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
एकदा एका आश्रमात गुरुंकडे काही शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. गुरुंनी सर्वांची परीक्षा घेण्याचे ठरविले. दुसर्‍या दिवशी पहाटे गुरुजींनी सर्वांना बोलाविले आणि प्रत्येकाच्या हातात एक आंबा दिला आणि म्हणाले, तुम्ही प्रत्येकाने हा आंबा खायचा मात्र, तो खाताना कोणी पाहणार नाही याची दक्षता घ्यायची. अशा ठिकाणी जाऊन आंबा खा. ज्याठिकाणाहून तुम्हाला कोणीही पाहणार नाही. आणि दिवस मावळायच्या आत तुम्ही सर्वजण आंबा खाऊन या. अगदी गडबडीनं मग सारे शिष्य आपापली जागा शोधू लागले. कोणी झाडाच्या टोकाला, कोणी दूरवर रानात, कोणी खोल दरीत दगडाच्या मागे, तर कोणी आश्रमातील मेजाखाली जाऊन लपले. सूर्य जसजसा पुढे सरकू लागला तसतसे एक-एक करत सारे शिष्यगण जमा झाले. सूर्य बुडाल्यानंतर गुरु आले आणि म्हणाले की मुलांना आता प्रत्येकाने पुढे यायचे आणि सांगायचे की तुम्ही कोठे बसून आंबा खाल्ला आणि आंबा कसा होता. सर्व शिष्यांनी आपण बसलेली जागा सांगितली आणि आंब्याची चवपण सांगितली. सर्वांनी जवळजवळ आंबा गोड होता असेच सांगितले. सर्व शिष्यांचे सांगून झाले. गुरूजी उभे राहिले आणि त्यांनी शिष्यांवर एकवार नजर फिरविली. ‘अरे, माधव तू आंबा खाल्ला नाहीस का? तुझ्या हाताच दिसतोय’ माधवकडे पाहून गुरूजी म्हणाले. माधव बोलला, ‘‘गुरूजी तुम्ही अशा जागी जावयास सांगितले की जेथे कोणी बघणार नाही. मात्र देव या चराचरात आहे, इथल्या कणाकणात आहे, प्रत्येक माणसामाणसात आहे म्हटल्यावर माझ्या अंत:करणातील, इथल्या चराचरातील, इथल्या कणाकणातील देवाला सोडून मी कोठे जाऊ शकतो आणि अशी एकांतातील जागा मला या ब्रह्मांडात तरी सापडेल का? म्हणून मी आंबा खाल्ला नाही?’’ गुरुजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.’’  गुरुजींनी माधवच्या पाठीवर शाब्बासकी देऊन म्हटले की माधवला मी जे काही आजपर्यंत शिकविले त्याचे चांगले ग्रहण झाले असून तो माझा आदर्श शिष्य आहे.

हरीची आई हरीला म्हणाली, ‘‘बघ हरी, तू सुद्धा शिकलेले चांगले ग्रहण करून एक आदर्श विद्यार्थी हो बरे!’’ ‘‘हो आई. पण मग हरीचे पुढे काय झाले?’’ हरी मोठ्या उत्सुकतेनं म्हणाला. ‘‘अरे हरी, एकाच दिवशी सगळ्या गोष्ट सांगू का? उद्या सांगेन बरे.’’ हरीने तरीही आईकडे आणखी एक गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला. हरीचा बालहट्ट आईला मोडवला नाही. आईने पुन्हा गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

माधवचे सगळे शिक्षण पुढे पूर्ण झाले. मग पुढे माधव सोबतच शिकत असलेल्या दुसर्‍या एका केशव नावाच्या शिष्याला गुरुजींचा काही वर्षांनी असे वाटायला लागले की, आपण आता सर्वश्रेष्ठ शिष्य झालो. तो गुरुजींकडे जाऊन म्हणाला, ‘‘गुरूजी मला आपण दिलेले ज्ञान ज्ञात झाले असून आता मी आपल्या सर्व शिष्यांमध्ये आणि कदाचित सर्व मनुष्यमात्रामध्येच श्रेष्ठ ठरू शकतो, ना?’’ गुरूजी अगदी निरलसपणे त्या शिष्याकडे पाहून म्हणाले, ‘‘केशवा, तू सर्व मनुष्यमात्रामध्येच काय सर्व प्राणीमात्रांमध्येही सर्वश्रेष्ठ ठरू शकतोस फक्त तू एक सजीव अथवा निर्जीव वस्तू आण जी की तुझ्यापेक्षा कनिष्ठ असेल’’ केशव जिंकल्याच्या आवीर्भावात म्हणाला, ‘‘काय गुरूजी, मी असा माझ्या मातृग्रही जातो आणि लगेच माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेली एक काय अनेक गोष्टी घेऊन येतो.’’ पुढे काहीही न ऐकता गुरूजींना नमस्कार करून केशव निघाला.

कल्पित आनंदाच्या विश्वात फिरत फिरत माधव मातृग्रही परतला आणि थेट आपल्या आईकडे जाऊन आईला नमस्कार करून म्हणाला, ‘‘आई, आज मी गुरु कडून सगळी सगळी विद्या ग्रहण करून आलो आहे. केवळ एक कनिष्ठ गोष्ट मी गुरुंकडे घेऊन गेलो की मी आता सर्व प्राणीमात्रांमध्येही श्रेष्ठ ठरणार आहे. आई, तू माझ्यासोबत येशील?’’ आईनं माधवच्या डोक्यावरून अगदी प्रेमभावाने हात फिरविला आणि म्हणाली, ‘‘बाळ माधवा, मी तुझ्यापेक्षा नक्कीच कनिष्ठ आहे रे, पण मी जर तुझ्यापेक्षा कनिष्ठ ठरले, तर तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि मोठा ठरशील आणि तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी लहानच आहेस ना, मग मी तुझ्यासोबत  कशी येऊ?’’ निराश मनाने माधव आपल्या वडिलांकडे गेला, नमस्कार करून म्हणाला, ‘‘पिताश्री, गुरूंनी सांगितले आहे की सर्वश्रेष्ठ होण्यासाठी केवळ एक माझ्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट मला हवी आहे. आपण मजसोबत याल का?’’ माधवच्या वडिलांची प्रसन्न आणि भारदस्त देहयष्टी क्षणार्धात कापू लागली आणि तो नरदेह डोळ्यात आग ओकू लागला. वडिलांची ही अवस्था पाहून माधवने वडिलांना नमस्कार केला आणि म्हणाला, ‘‘पिताजी क्षमा असावी.’’

आपल्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट शोधता शोधता पंधरा दिवस झाले. पण माधवने आपला निश्चय बदलला नाही. तो आपल्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, ‘‘तू माझ्यापेक्षा कनिष्ठ म्हणून गुरुजींकडे येशील?’’ त्यावर पत्नी म्हणाली, ‘‘माझ्या वडिलांच्या घरी असतांना मी सुखात होते, तुमच्याकडे आले आणि माझे सुख कमी झाले. मग मी तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे ठरेल?’’ पत्नीशी वाद न घालता माधव सगळ्या सगळ्या ठिकाणी जाऊन आला. आपल्या पुत्रांकडे, मित्रांकडे अगदी सगळीकडे. मात्र त्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट सापडली नाही. अशातच एका वर्षाचा कालावधी लोटला. मग मात्र त्याला आठवले, की गुरूजी म्हणाले होते की कुठलीही सजीव अथवा निर्जिव गोष्ट कनिष्ठ म्हणून चालेल. मग तो थेट आपल्या स्वत:च्या विष्ठेला आपल्यापेक्षा कनिष्ठ म्हणून स्पर्श करण्यास गेला. तेवढ्यात त्या मानवी आवाजात ती विष्ठा बोलू लागली, ‘‘खबरदार, जर मला कनिष्ठ म्हणून हात लावशील तर! अरे, तुझा स्पर्श होण्यापूर्वी मी स्वादिष्ट आणि रूचकर मिष्टान्न होते, तुझा स्पर्श झाला आणि माझी विष्ठा झाली, मग तू कनिष्ठ की मी?’’ माधवचा चेहरा अगदी उतरला. त्याला आपल्या स्वत्वाची जाणीव झाली, आपण किती क्षुद्र आहोत आणि आपण किती श्रेष्ठत्वाचे स्वप्न पाहत होतो  असे त्याला वाटायला लागले. त्याचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आणि तो थेट गुरूकडे माफी मागण्यास गेला. गुरूजींना नमस्कार करून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. गुरूजी म्हणाले, ‘‘माधवा, तुला तुझ्या स्वत्वाची जाणीव झाली आहे हे फार मोलाचे आहे. ब्रह्मांड खूप मोठे आहे. या विशाल अशा ब्रह्मांडात तू एका बिंदूपेक्षासुद्धा लहान आहेस. मात्र एक लक्षात ठेव. तू सर्वश्रेष्ठ नसलास तरी सर्वांना सोबत घेऊन तू कीर्तीनं, समाजातील गोरगरिबांना मदत करून मोठा होऊ शकतोस. तेव्हा श्रेष्ठत्वापेक्षाही आपल्या कार्याचा उपयोग समाजासाठी कर!’’

हरी अगदी तल्लीन होऊन हे सारं ऐकत होता. हरीनं प्रश्नार्थक नजरेनं आईला विचारलं, ‘‘पण आई माणसाला हे सारं ठाऊक असून त्याला अहंकार कसा काय होतो गं?’’ आई म्हणाली, ‘‘बाळ कुठलाही मनुष्य परिपूर्ण असत नाही किंवा कुठलाही मनुष्य कनिष्ठही असू शकत नाही. प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकण्यासारखे असते. तर प्रत्येक माणसात काही ना काही उणीव असते. त्यामुळे हरी, तू सुद्धा कधीही स्वत:ला मोठा, श्रेष्ठ समजू नकोस. प्रत्येकासोबत नम्रपणाने वागत जा. कधीही खोटे बोलू नकोस. दुवर्तन करू नकोस. सतत मोठ्यांचा, लहान्यांचा आणि सर्व मनुष्यमात्रांचा आदर करीत जा. सतत आपल्या आतला अर्थात् आत्म्याचा आवाज ऐकत जा. जेव्हा माणसाचं मरतो ना हरी त्यानंतर केवळ आपला आत्मा आपल्याला साथ देतो. त्यावेळी आपणांस त्याची किंमत कळते. त्यामुळे सर्वांनी जरी आपल्याला सोडले तरी आपला आत्मा आपली साथ सोडत नाही. आणि म्हणूनच तो आपल्याला कधी चुकीची दिशा दाखवित नाही, तर सतत योग्य दिशादर्शन करीत असतो. हरी, आज आपण पक्वान्न खात आहोत उद्या कदाचित भाजी-भाकरी खावी लागेल. पण तरीही तू सत्याला सोडू नकोस. भलेही प्राण गेला तरी चालेल. किमान तू सत्यवचनी, सद्वर्तनी म्हणून तरी देवाकडे जाशील.’’

हरी म्हणाला, ‘‘आई, तू फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतेस गं. मला एवढं सारं काही कळत नाही. पण तू जे सांगशील ते मी आयुष्यभर ऐकेल बरे!’’ हरीने अलगद आईच्या मांडीवर आपले डोके टेकवले. तुळशीवृंदावनासमोर दिवा जळत होता. पौर्णिमेचा चंद्र प्रकाशत होता. जणू काही हरीच्या गुजगोष्टी ऐकून तुळससुद्धा आनंदानं, समाधानानं डुलत होती आणि हरी आणि त्याच्या आईच्या डोळ्यात पौर्णिमेच्या चंद्रासोबतच अश्रू कधी ओघळले ते दोघांनाही समजले नाही.

(चिंतन आदेश दिवाळी अंक २०११)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...