11/16/2014

अन तो निराधार झाला....



ती उठून निघून गेली. तिने तिच्या ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.


ती : भिऊ नकोस, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी प्रथमच करत असतो.

तो : पण, तिने "नाही' म्हटले तर....
ती : तिने "नाही' म्हटल्यावर हा विचार करू
तो : आणि तिने "हो' म्हटले आणि तितक्यात जग बुडाले तर...
ती : तुम्ही दोघं "प्रेमा'त बुडल्यावर जगाच्या भानगडीत कशाला पडता?

रविवारीदेखील त्यांचं एसएमएसवर बोलणं सुरुच होतं. तो अगदी साधा आणि भोळा होता. आणि त्याला ठाऊक होतं "ती' तिच आहे म्हणून. तिलाही नक्कीच ठाऊक होतं "ती' मीच आहे म्हणून. पण तरीही त्यांचा असा लुटूपुटूचा खेळ रंग भरत होता. पुन्हा त्यानं तिला विचारलं, ""मला तिला सांगायचयं मला जे वाटतं, ते कसं सांगू? एसएमएस, समोरासमोर का फोनवर?'' तिचं तात्काळ उत्तर, ""कोणत्याही मुलीला समोरासमोर धीटपणे बोलणारी मुलं आवडतात, पण तू तुझं ठरवं!'' त्यानं ठरवलं. आता थांबायचं नाही. उशिर झाला तर... नको नको उद्याच सांगून टाकू. कारण तो आणि ती एकाच ठिकाणी नोकरी करत होते.


सोमवारची सकाळ उजाडली. ऑफिसला पोचल्यावर खुर्चीवर बसण्याआधी तिचा एसएमएस "काय, विचारलसं का तिला?' त्याच्या छातीतील धडधड आता प्रत्यक्ष जाणवण्याइतपत वाढली होती. यातच तिचा होकार असल्याचं त्याला जाणवत होतं. त्याने थरथरत्या हातानेच रिप्लाय केला, "नाही, आज विचारतो!' दिवसभर तो तिच्या अपेक्षित-अनपेक्षित उत्तराच्या कल्पना विश्वात रमत राहिला. शेवटी निर्धार करुन मोठ्या धैर्यानं त्याने तिला चारच्या सुमारास एसएमएस केलाच, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे. काहीतरी बोलायचं आहे!' वाट पाहत असणाऱ्या तिचा तात्काळ रिप्लाय, "आजच का?' त्याला क्षणभर वाटलं, तूच म्हणालीस लवकरात लवकर सांग म्हणून... पण... त्यानं रिप्लाय बदलला आणि फक्त "प्लिज' म्हणून उत्तर पाठवलं. तिचाही वेगवान रिप्लाय, "ऑफिस सुटल्यावर कॅंटिनमध्ये भेटू!'  "ओके...' म्हणत त्याच्या धडधडीनं अधिक वेग घेतला.


संध्याकाळचे सहा वाजलेले....

तो आला. काही क्षणात तीही आली.
रिकाम्या कॅंटिनमध्ये ते दोघेच....
आता त्याची धाकधूक चेहऱ्यावर अन्‌ शरीरावरही परिणाम करत चालली होती.  त्यानं तिला विचारलं. "थंड' की "गरम'! ती "काहीच नको!' म्हणत असताना त्याने कोल्ड्रिंकची बाटली अन्‌ दोन रिकामे ग्लास आणले. रिकाम्या ग्लासाकडे पाहत त्यानं आतापर्यंतचं आयुष्य कसं रिकामं गेलं याचं मनातल्या मनात चिंतन केलं. अन्‌ दोघांच्या ग्लासात अर्ध्यापर्यंत कोल्ड्रिंक भरलं. तिच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासात त्याला स्वत:चं मनच दिसलं.

सगळं जग संपून गेलं आहे की काय अशी स्मशान शांतता त्याला वाटत होती. मात्र ती समोर असल्यानं त्याला जगाची फिकिर नव्हती. शेवटी तीच म्हणाली, "बोल, तुला काय बोलायचे आहे ते' तो म्हणाला, "मला काय बोलायचं आहे ते तुला माहितच आहे' "पण मला ते तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे' आता त्याची धडधड एवढी वाढली की छाती फुटून जाते की काय असं वाटू लागलं. तो काही क्षण गप्पच राहिला. त्यावेळी ती काही बोलत नसतानाही त्याला ऐकू येऊ लागलं, "बोल, माणूस आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच करत असतो' तो धीर एकवटत छातीवर नियंत्रण मिळवत तिच्या डोळ्याला डोळे भिडवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याची हिम्मत झाली नाही. पुन्हा स्वत:समोरच्या अर्ध्या रिकाम्या अन्‌ अर्ध्या भरलेल्या ग्लासाकडे पाहत थरथरतच तो म्हणाला, "तू मला आवडतेस!' त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तिने भुवया किंचितश्‍या उंचावून एकदा त्याच्या डोळ्यात एकदा जमिनीकडे पाहून दीर्घ श्‍वास घेतला. त्याला अशा गोष्टींचा कधीच अनुभव नव्हता. त्याची धडधड काही अंशी कमी झाल्याची अनुभूती येत असतानाच तिच्या कटाक्षाने त्याच्यावर घाव केले होते. त्यामुळे त्याची धडधड पुन्हा वाढली होती. ती म्हणाली, "पण मी तसा कधी विचार केलाच नाही' त्याच्याकडे बोलण्यासाठी बळच उरलं नव्हतं. कारण यापूर्वीच त्याने त्यासाठी खूप शक्ती खच केली होती. ती पुढे म्हणाली, "मी, उद्या सांगितलं तर चालेल!' त्याने मानेनेच होकार दिला.

ती उठून निघून गेली. तिने ग्लासातील काही थेंबच पिले होते. त्याने तर एक थेंबही घेतला नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपला ग्लास तिच्या ग्लासात रिता करून टाकावा. अन्‌ तिचाच ग्लास पूर्ण भरावा. पण त्याचवेळी स्वत:च्या रिकाम्या "ग्लासा'चे काय करायचे असा प्रश्‍नही त्याला सतावत होता. पण काहीही झालं असतं तर एकच ग्लास पूर्ण भरणार होता, अन्‌ एक रिकामा राहणार होता.
तो दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्यासाठी तेथून बाहेर पडला. आता पुढचा क्षणन्‌क्षण जाण्यासाठी तो घड्याळाच्या काट्याकडे पाहू लागला. त्याला वाटत होतं, आयुष्य थांबून गेलं आहे. उद्या कधीच उगवणार नाही. पण त्याचक्षणी तिच्या "होकारा'ची त्याच्या मनात कल्पना येत होती अन्‌ तो पुन्हा मोठ्या आशेने घड्याळीकडे पाहत होता. त्याचे असेच विचारचक्र सुरु असताना दिवसानं अंधारात प्रवेश करून रात्रीचा मार्ग खुला केला होता.  त्याच्या कानाभोवती फक्त तिचे शब्द घुमत होते. "उद्या सांगितलं तर चालेल!'

संपूर्ण रात्रभर फार फार प्रत्येक तासात एक मिनिटच त्यानं डोळे बंद केले असतील. ते ही तिची आठवांसाठी.... सकाळ झाली तो मोठ्या आशेनं उठून धडपडू लागला. तिचा "होकार' किंवा "...' ऐकण्यासाठी...

तो ऑफिसला पोचला. त्याला राहवेचना. कसंतरी त्यानं मोठ्या कष्टानं दिवस ढकलला. साधारण पाच वाजता तिचा तोच मेसेज, "ऑफिस सुटल्यावर वेळ दे, काही बोलायचे आहे!' ठरलं. कालचीच जागा, कालचीच वेळ...

सहा वाजले...

तीच कॅंटिन तेच कोल्ड्रिंक, अन्‌ दोन ग्लास...
त्याने पुन्हा ते अर्धे अर्धे ओतले. पुन्हा तीच कल्पना.
यावेळी त्याला फक्त भरलेले ग्लास दिसत होते. रिकामे नाही.
ती बोलू लागली, "मी कधी असा विचार केलाच नाही. आमच्याकडे असं काही चालत नाही. तुझी ... अन्‌ माझी ... वेगळी आहे. आपलं होऊ शकणार नाही.' 
तो पुरता कोसळून गेला. होतं नव्हतं तेवढं बळ "ठीक आहे' म्हणण्यात त्यानं वाया घातलं. ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या "छबी'कडंही त्यानं पाहिलं नाही. कारण तिचं त्याचं जमणार नव्हतं.

त्याच्या प्रेमाऐवजी तिनं दोघांमधील भिंतीचाच आधार घेत त्याला कायमचं निराधार केलं होतं. 


1 comments:

  1. ये ज़मीन की फितरत है की हर चीज़ को सोख़ लेती है ,
    वर्ना इन आँखों से गिरने वाले आसुओं का एक अलग समुंदर होता

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...