11/22/2013

मधुचंद्राच्या पूर्वसंध्येला नववराला नववधूने लिहिलेले पत्र... ‘प्रिये...’














प्रिये,

तुला आठवतं तुला बघायला मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा तुझा तो लाजरा, बुजरा, अल्लड अन अवखळपणा. तुला माहितेय लाजाळूचं एक झाड असतं. त्याला सुंदर फुलं येतात. स्पर्श होताक्षणी ती फुलं आपल्या पाकळ्या मिटून घेतात. तू तर स्पर्शाशिवायच पाकळ्या मिटलेल्या लाजाळूच्या झाडासारखी त्यावेळी भासत होतीस.

आता नुकतेच तू उंबरठा ओलांडून आत आलीस. उंबरठ्यावरचे शुभ्र धान्याचे माप ओलांडलेस. तुझ्या नाजूक अस्तित्वानं ते मापसुद्धा हरखून गेलं. त्यातच त्यानं तुझा कोमल पदस्पर्श अनुभवला. काल कदाचित त्या मापाला या घरात राहण्याचं कृतार्थपण जाणवलं असेल. म्हणूनच त्यानं त्याच्यात सामावलेली समृद्धी कायम आपल्या घरात लोटण्याचा निश्‍चय केला असेल.


या मापाच्या स्पर्शासाठी तू किती सोसलस. गुलाबाचं सुंदर रोपटं दारात लावावं. त्याला नेमानं, प्रेमानं पाणी घालावं. ऊन, पाऊस अन वार्‍यापासून वाचवावं. त्या रोपाला कळी आली की आणखी जपावं. अन् एक दिवस त्यावर बागडणारं गुलाबाचं फूल कोणाला तरी देऊन टाकावं. दूर होताना त्या गुलाबाला अन् त्या रोपट्याला काय यातना होत असतील; हे ते गुलाब अन ते रोपटचं जाणोत. नववधूचा साज चढवून इकडं येताना तू मला गुलाबाचं फूल भासत होतीस. जे मी घेऊन जाणार होतो. आयुष्यभराकरिता. तुझ्या दोन्ही डोळ्यांत अश्रूच अश्रू ओघळत होते. एका डोळ्यात अश्रू होते रोपाला सोडून जाण्याचे विरहाचे. तर दुसर्‍या डोळ्यात औत्सुक्याचे अन आनंदाचे. कोणाची तरी शोभा वाढविण्यासाठीचे. गुलाब रडताना बघायचा असेल तर त्यासाठी आपल्या नववधूला अशा अवस्थेत बघावं. ही अवस्थाच अनाकलनीय असते. एका जादूईनगरीत कोण्या बालकानं अनाहूतपणे हिंडावं तसं त्यावेळी मी भावभावनांच्या एका अनोख्या जगात विहरत होतो.
उद्या या गुलाबाचा सुगंध मी घेणार आहे. या गुलाबाला प्राजक्ताच्या प्रांगणातून फिरवून आणणार आहे. जिथं वेगवेगळी फुलं या गुलाबाचं स्वागत करतील. प्रत्येक फुलाला निराळा गंध असेल, निराळा रंग असेल. जिथलं दृश्य नयनांनाच काय तर संपूर्ण कायेला रम्य वाटेल. गुलाब अधिक खुलायला लागेल, त्याचा रंग, रूप अधिक मनोहारी भासू लागेल.
एका विलक्षण जगात मी तुला उद्या घेऊन जाईल. जिथं फक्त तू असशील अन मी. तू सरिता असशील तर मी सागर. तू पाऊस असशील तर मी पाणी. तू अवनी असशील तर मी आकाश. तू प्रित असशील तर मी प्रेम. तू वृक्ष असशील तर मी छाया. तू ज्योत असशील तर मी समई. तू मधू असशील तर मी चंद्र. फक्त तू आणि फक्त मी. माझी अवस्था म्हणजे रम्य वनातील एका सुंदरशा फुलावर फुलपाखरू बागडल्यासारखी असेलं. अन तू फूल असशील फुलपाखराची वाट पाहणारं. तुझ्या तनुलतेवर मी फुलपाखरू होऊन येईल. आयुष्यातील उच्चकोटीच्या अनेक आनंदापैकी एक आनंद आपण लुटूयात.
आजचा चंद्रदेखील मला मखमली साज चढवून आल्यासारखा भासतोय. उद्या त्याच्या जगात आपण असणार नाहीत कारण आपण आपलचं जग निर्माण केलं असेल. चल, तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी जन्मभर जे-जे जपलेलं आहे ते-ते उधळून देऊयात. एक वेळ तर अशी येईल जिथं तू तू नसशील आणि मी मी नसेल. केवळ कायाच नव्हे तर आपलं मन देखील एकच असेल. त्यातून आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येईल. या दिव्यत्त्वातून मी तू पणाचा आलेला अंधार कुठल्या कुठे नाहीसा होईल. अशा रम्य बगिच्यात आपण त्या अंधाराला कधीच येऊ द्यायचं नाही बरं का!
जन्मोजन्मी फक्त तुझाच,

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...